RSS

बोक्या बिझनेसवुमन …

माझ्या बहिणीची धाकटी कार्टी सई. मागच्या वेळी पुण्यात गेलो होतो तेव्हा एक दिवस इस्कॉन मंदिरात गेलो कात्रजच्या. बहिणीकडे स्विफ्ट डिझायर आहे. सईला चिडवायचे म्हणून म्हणालो …

‘बोक्या, मी माझी बीट तुझ्या बाबाला देणार आहे आणि त्याची डिझायर मी घेणार आहे.’

वाटलं नेहमीप्रमाणे बोक्या फिस्कारणार. पण आजीबाई शांतपणे म्हणाल्या…

‘अरे काकड्या, डिझायर किती जुनी झालीय बघ. (पावसाचे दिवस असल्याने गाड़ी घाण झालेली). तू एक काम कर ना. नाना काकाने नवी आल्टो घेतलीय, तू ती घेवून जा. तुझी बीट दे मला. बाब्या डिझायर घेवून ऑपिसला गेला की मला आणि पूर्वा ताईला रिक्षाने जावे लागते शाळेत. उपयोगी येईल.”

मी चाटच पडलो. म्हटलं, “ढमे, नानाकाकाची गाड़ी मी घ्यायची, माझी गाड़ी तुला द्यायची. मग नाना काका ऑफिसला कसा जाणार?”
तर डोळे मिचकावत बोका म्हणतो, ” तो जाईल ना अजीता काकुच्या एक्टीव्हा वर बसून!”
त्यावेळी टिपलेली बोक्याची ही मिस्किल आणि चालू अदा…

© विशाल कुलकर्णी

 

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

ती गेली तेव्हा….
तीन शब्दाचा हा चक्रव्यूह ! ग्रेसबाबा, तु कसले प्राक्तन घेवून जन्माला आला होतास रे ? एखाद्याच्या आयुष्याला दुःखाचे, वेदनेचे किती विविध पदर असावेत याचे आदर्श उदाहरण असावे तुझे आयुष्य. पण बॉस, तुझी तऱ्हाच निराळी. त्या वेदनेलाच आपल्या जगण्याचे सूत्र बनवलेस. आम्ही वेदनेपासून दूर पळायला पाहतो, वेदना टाळायला पाहतो आणि तु तिलाच आपले शस्त्र बनवलेस?
20190508_133803
क्षमा कर ग्रेसबाबा, पण इथे, निदान या कवितेच्या बाबतीत मी तुझ्याइतकेच श्रेय पं. हृदयनाथ मंगेशकरांना सुद्धा देईंन. ग्रेसच्या अपार वेदनेला संगीताचा भरजरी साज चढ़वण्याची दुश्कर किमया फक्त बाळासाहेबच करू जाणोत. तुझी ही कविता अफाट आहेच पण तुझ्या इतर कवितांप्रमाणे दुर्बोध म्हणवली जाण्याचा शाप तिला देखील आहेच. पण बाळासाहेबांच्या संगीताने या कवितेला एक वेगळेच परिणाम प्राप्त करून दिलेले आहे.  देवानु, तुमच्या कवितेवर लिहायचे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याइतके कर्मकठीण काम असते. पण क़ाय रे, ही अफाट ताकद कवितेला लाभण्यासाठी वेदना हा मूलभूत घटक हवाच असतो का? त्या आरतीप्रभुंची सुद्धा हिच तऱ्हा. कुठल्या मुशीतुन घडला होतात रे तुम्ही लोक? तो स्वतःला अफसाना निगार म्हणून घेणारा मंटो, काळीज पिळवटुन टाकणारे आमचे साहिरमियाँ. तुम्ही सगळे बहुदा एक सारखेच नशीब घेवून जन्माला आला होता. वेदना हाच एक सामाईक घटक घेवून जगलात. पण त्या वेदनेचा वापर करून आमच्यासारख्या क्षुद्र चाहत्यांना मात्र अपार सुख दिलेत.
असो, तर आपण बोलत होतो तूझ्या त्या तीन शब्दाच्या चक्रव्यूहाबद्दल. मुळात एका ओळीत , अवघ्या सात शब्दात एवढ्या भावना, एवढं आर्त ओतणं कसं करायचास रे तू ग्रेसबाबा. ‘पाऊस निनादत होता‘ अवघ्या तीन शब्दात तन मन डोलायला लावणारा अनाहत नाद, त्या नादाला आनंदाचे उच्च परिणाम प्राप्त करून देणारा तो आनंददायी रिमझिम हा शब्द आणि हे सगळे कशासाठी? तर ‘ती’ गेली तेव्हा … ही वेदना मांडण्यासाठी?
ग्रेसबाबा, तुझ्या या ‘ती’ने आजवर अनेक संभ्रम निर्माण केलेत. मी सर्वात पहिल्यांदा ऐकलेली दंतकथा म्हणजे तुम्हाला आईच्या चितेसमोर ही कविता सूचली. केवढा थरारलो होतो तेव्हा. कित्येक वर्षे त्याच संमोहनात होतो. पण नंतर जेव्हा तुझ्याबद्दल, तू लिहीलेलं, तू वेगवेगळ्या मुलाखतीतुन सांगितलेलं सत्य कळालं तेव्हा या थराराची जागा शहाऱ्याने घेतली. क्षणभर स्वतःला तुझ्या जागी कल्पून बघितले आणि…. नाही, आपल्याला नसते जमले बाबा हे जगणे.  मी असं ऐकलंय की हे द्वंद्व तुझ्या सावत्र आईमुळे निर्माण झालेलं होतं. (खरं खोटं तुलाच माहीती.) पण ते जर खरं मानलें तर तशी वयाने तुला समवयस्क असणारी सावत्र आई जेव्हा तिच्या प्रियकराला भेटायला जात असे तेव्हा अनावर झालेला हा कढ़ आहे हे जेव्हा कळाले तेव्हा मुळातून हाललो होतो. नाही, मी तिला दोष नाही देत, तुही कधी दिला नाहीत. पण ती वेदना शब्दाच्या रुपात साकारलीत.  वर तुझ्या प्रतिभेचा कहर म्हणजे ती गेली तेव्हा, पाऊस रिमझिम निनादत होता हे सांगताना तिच्या केशांना तू मेघाची उपमा देतोस आणि वर आपल्या आंदोलित मनाची उलाघाल व्यक्त करताना सांगतोस की त्या मेघात अडकलेली किरणें, ती किरणे सोडवण्याचा प्रयत्न हा स्वतःच गोंधळलेला सूर्य करत होता. कुठून येतं रे हे बळ?
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता 
हे कडवं बाळासाहेबांनी आपल्या गाण्यात घेतलं नाहीये. कारण काहीही असो, पण त्यामुळे तुझ्या या गाण्यावर दुर्बोधतेचा शिक्का लागता लागता राहिला. नाही पण ते बरंच केलं. नाहीतर यातून अजुन हल्लकल्लोळ उडाला असता. कारण तुही कधी आपली कविता समजावून सांगण्याच्या भानगडीत पड़त नाहीस आणि या ओळीचा जो अर्थ मला लागलाय तो …
मी समजू शकतो. केवळ वडिलांची दूसरी बायको हेच क़ाय ते नाते, त्यात जवळपास तुझ्याच वयाची. हे वादळ कधी ना कधी दारात घोंघावणार होतंच. पण ते अंतर, नात्याचा तो तोल आणि आत्यंतिक मोहाची ती  अवस्था तू असोशीने जपलीस. नातं हे मानण्यावर असतं म्हटलं तरी काही गोष्टी प्रगल्भपणे जपाव्याच लागतात. संबोधनाला काही अर्थ नसतो म्हटले तरीही कुठलाच शब्द कधीच निरर्थक नसतो. त्यात काही ना काही अर्थ शिल्लक राहतोच. हा नाजुक तोल किती सुंदरपणे जपलायस तू गाण्यात.
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
‘घनव्याकुळ’ ! आईगगगं , केवढा आर्त, कवितेच्या आशयाशी आणि त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसाशी नाते
सांगणारा शब्द. हे असे नवे तरीही अर्थसमृद्ध शब्द निर्माण करण्यात तुझा हात कोण धरणार देवा? ‘ती आई होती म्हणूनी’…. उफ्फ, कसा सहन केलास तो कोंडमारा? अर्थात शब्द साथीला होते त्यामुळे त्या उद्रेकाला वाट करून दिलीत. तो कोंडमारा असह्य झाल्याने घनव्याकुळ म्हणजे आंसवे ढाळलीत हे सांगताना पूढच्याच ओळीत अश्या प्रसंगी सामोरे जावे लागणाऱ्या सामाजिक उपहासालाही वाचा फोडलीस. त्यावेळी ‘वारा सावध पाचोळा उडवित होता’ .  सावध खरेतर असंवेदनशील अश्या समाजाला तुमच्या भावनिक आन्दोलनाशी काहीच देणे घेणे नसतें. ते फक्त संधीचा फायदा उचलून टीकेचा पाचोळा उडवीत राहतात.
पण खरं सांगू, या संपूर्ण कडव्यात मला भावला तो ‘घनव्याकुळ’ हा शब्द. त्या एका शब्दाने तुझ्या अविरत वेदनेचा अमूर्त धागा नकळत माझ्या मनाशी जोडला गेला. तुझ्या मनात नक़्क़ी क़ाय आन्दोलने चालू असतील त्यांची जाणीव करून देवून गेला. त्या एका शब्दाने मला ग्रेसपुढे, त्याच्या वेदनेपुढे पूर्णत: समर्पित करून टाकलं.
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता 
किती त्रास देशील रे ग्रेसबाबा? ‘संपले बालपण माझे’ ! आता काहीच राहिलेलं नाहीये. ‘ती आई’ आता राहिलेली
नाहीये आणि ‘ती’ आता आई राहिलेली नाहीये. आई नाही म्हणजे घर नाही, म्हणजे अंगणही नाही. सगळे बंध, सगळी ओढ़ धूसर होवून गेलेली आहे. त्यावर कहर म्हणजे तू स्वतःची तुलना भिंतीवरच्या एकाकी धुरकट कंदीलाशी करतोस. त्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कंदीलाप्रमाणेच मी ही एकाकी झालोय, त्या चौकटीबद्ध आयुष्यात कायमचा गुरफटून गेलोय हे सुद्धा तू किती सहज सांगून जातोस.
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
ही केवढी विषण्ण, भीषण अवस्था आहे. आता माझे अस्तित्व म्हणजे निव्वळ एक दररोज वाढत राहणारा
हाड़ामासाचा गोळा इतकेच शिल्लक आहे. भावना, जाणिवा गोठुन गेल्याहेत. आईपासुन तुटण्याची ती भयाण प्रक्रिया,
तिने माझ्यातला जीवनरसच शोषुन घेतलाय. माझा मीच राहिलो नाहीये. तिचं जाणं मलाच दगड बनवून गेलय.
हे सगळं कमी होतं की क़ाय म्हणून जाताजाता एक मास्टरस्ट्रोक दिलासच तू…
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता 
इतके दिवस आईला, भलेही सावत्र असेल पण आईच ना. तिला समाजापासुन, त्यांच्या टीकेचे भक्ष्य होण्यापासुन वाचवण्यासाठी धडपडत राहिलो. अखेरपर्यंत तिच्यासाठी कृष्ण होवून वस्त्रे पुरवत राहिलो.  पण आता सगळेच एवढ्या अवस्थेला येवून पोचलेय की मीच असहाय होवून गेलोय. कुठल्याही प्रकारची मदत आता निरर्थक झालीय. तुला वस्त्रे पुरवताना त्यात मीच निर्वस्त्र झाल्याचा आभास होतोय.
यातलं  दुसरं आणि शेवटचं कडवं पंडितजीनी गाण्यात घेतलेलं नाहीये. कारणे त्यानाच ठाऊक पण याच्या संगीतात त्यांनी जे काही केलय, ज्या पद्धतीने त्यांनी हे गाणं स्वतः गायलय,  ते निव्वळ अफाट आहे, दैवी आहे. सर्वसामान्याच्या वेदनेची नाळ थेट ग्रेसबाबा तुझ्या वेदनेशी नेवून जोडणारे आहे. मला खरेतर पंडितजीच्या संगीताबद्दल, या गाण्याला त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटबद्दल खुप काही बोलावंसं वाटतेय पण ते पुन्हा कधीतरी. तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.  तुला खरं सांगु? तूझी कविता म्हणजे त्या Schrodinger’s Cat सारखी आहे. किंवा त्याही पेक्षा स्पष्ट बोलायचे झाले तर आपल्याकडच्या त्या ‘हत्ती आणि चार आंधळे’ गोष्टीसारखी आहे. तूझी कविता त्या गोष्टीतल्या हत्तीसारखी भव्य, विशाल आहे आणि आम्ही चाहते म्हणजे त्या चाचपडणाऱ्या आणि आपापल्या  आकलनक्षमतेनुसार आपल्याला हवे ते आणि तसे निष्कर्ष काढणाऱ्या आंधळ्यांसारखे आहोत. आपापल्या कुवतीनुसार, वकुबानुसार तुझ्या कवितेतले गर्भित अर्थ, अस्पर्श भावना शोधण्याचे अपयशी प्रयत्न करत असतो. मला माहितीये की तुला उगाचच नाती जोड़त येणारी माणसे आवडत नाहीत. पण माझाही नाईलाज आहे रे. क़ाय करणार तू माझ्या रक्ताच्या थेँबा-थेँबात रुतुन बसलाहेस ग्रेसबाबा. मीच का, माझ्यासारखे असे कितीतरी आंधळे असतील ज्यांच्यासाठी ग्रेस ही ऋणानुबंधांतली एक अमूल्य अशी ठेव आहे.

 

विशाल कुलकर्णी
०९९६७६६४९१९
 
 
%d bloggers like this: