RSS

​ज्याचा त्याचा पाऊस…

“ए रंग्याsss, शान्या चल की खेळाया. साळेच्या मागल्या बाजूला पावसाच्या पान्याचं लै भारी डबरं झालय. आ पोरं कवाच्यान वाट बगायलीत लेका तुजी? चल लौकर …..”
पुन्हा एकदा साद आली…
“इन्या तिसऱ्यां टायमाला हाका घालीत आलाय आये, जावु का?”
“जाशील रं लेकरा, येवडं काम सपलं की जा म्हनं.”
कपाळावरचा घाम पुसत रंग्याच्या मायनं सांगितलं आणि ती माऊली पुन्हा जोर लावून समोर ठेवलेल्या कुळवाच्या पात्यावर हातोड्याचे ठोके द्यायला लागली. रंग्या एकदा आशाळभूत नजरेने फर्लांगभर अंतरावर असलेल्या शाळेकड़े पाहीले. कदाचित मनातल्या मनात इथून न दिसणारा पण शाळेच्या वास्तुच्या मागे साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या त्या डबऱ्यात रंगलेला सोहळा त्याच्या डोळ्यासमोर तरळुनही गेला असेल. कोण जाणे?
निग्रहाने त्याने मान वळवली. अंगातल्या गंजीफराकाचा लांबलेला भाग वर ओढुन त्याने तोड़ावरचा घाम पुसला , नाक शिंकरलं. नंतर तसंच राहीलेला जिन्नस आत ओढून घेतला. आणि शाळेकडें पाहात आता तिथे आता नसलेल्या सवंगड्याला उद्देशुन जोरात पुकारा केला.
“आलुच रं इन्या, तुमी करा सुरु तवर..”
आणि पुन्हा एकदा सगळी ताकद एकवटत भट्टीचा भाता मारायला सुरुवात केली. समोरची भट्टी पोटात लागलेल्या भुकेच्या आगेसारखी भरारुन पेटलेली. रंग्याचं आपल्या मायच्या चेहऱ्यावर लक्ष गेलं. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर सतत भट्टीच्या आगीसमोर बसून बारीक बारीक फोड़ आलेले होते. डावा हात परवा जगदाळयाच्या नांगराचा फ़ाळ भट्टीतुन बाहेर काढताना होरपळलेला. त्याला तशीच ऐका धडूत्याची चिंधी गुंडाळून त्याच हातातल्या चिमट्याने तिने कुळवाचा फाळ पकडला होता आणि उजव्या हाताने त्यावर हातोड्याचे घाव घालीत होती.
“लै दुकायलय का गं आये?”
तशी मायनें नजर वर उचलली, हाताने हातोड्याचे ठोके चालूच ठेवत ती म्हणाली.
“न्हाय रं, आता नाय दुकत. धाच मिन्ट मार भाता. येवड़ा कुळव झाला की जा म्हनं खेळाया. बाकीचं काम सांच्याला करु म्हनं.”
बोलता बोलता तिने आजुबाजुला नजर फिरवली. चार पाच नागराचे फाळ, तीनेक औती, पराण्या, चाकाला ठोकायच्या काही लोखंडी पट्टया असं बरंच काहीबाही पडलं होतं. पावसाला तर सुरुवात झाली होती. आता पेरण्या सुरु होतील. त्याच्या आधी सगळी औजारं तय्यार व्हायलाच पाहिजेत. ती झाली तर त्येच्या बदल्यात थोडं पैकं मिळतील. 
“रंग्या, यंदाच्याला दिगुकाका पाटलांकडं दोन पायल्या धान बी मागून घ्यायचं ध्यान कर लेकरा. आन बायजाकाकी म्हनलीय, पायलीभर जवार आन मकाबी देते आसं. ”
रंग्याने मान हलवली आणि तो पुन्हा घामेजला होत भाता मारायला लागला. मायनें खोपटाच्या आत फाटक्या चटइवर पडलेल्या , खोकणाऱ्या रंग्याच्या दमेकरी बापाकडें एकदा बघितलं. पारावर बसल्या बसल्या मलाही त्याचं खोकणं स्पष्ट ऐकु येत होतं.
“तुजा बा धड़ असता तर तुजा खेळ सोडून तुला कामाला लावलं नसतं रं पोरा. पर ऐन पावसाच्या तोंडाव त्येचं दुकनं उचल धरल आसं कुणाला म्हायीत हुतं रं. काम घेटलेलं फुरं तर कराला फायजे का नाय? नायतर पेरण्या कश्या हुतील? लै नुस्कानी व्हइल लोकांची. आन आपली बी चूल पेटायला फायजे ना?” 
थोड्या वेळाने तिने ठोके थांबवले. कड़ोसरीचा बटवा काढून त्यातले काही पैसे रंग्याच्या हातावर ठेवले. 
“जा आता खेळाया. आन हे पैकं आसुदेत. खेळुन झालं की भजी खा म्हनं दोस्ताबरुबर, समदे मिळून खावा रे, नायतर एकटाच खाशील मुडद्या.” 
रंग्या हासतच नाक वर ओढत शाळेकडे पळाला. तिथे त्याचे दोस्त वाट बघत होते पहिल्या पावसाच्या पाण्याने केलेल्या डबऱ्यात शिवा शिवी खेळायला. 
“यार विशल्या, आपलं काही खरं नाही य्यार. आपलं आयुष्य हे ई एम आय, ई एम आय करण्यातच जाणार. ते सुद्धा वन बी एचके साठी. टू बी एच के ची फक्त स्वप्नेच पाहायची. साला महागाई केवढी वाढलीय, पगार काही वाढत नाही. बर जॉब चेंज करावा म्हटलं तर रिसेशनमुळे ते सुद्धा शक्य नाही.”
बरोबरचा मित्र नेहमीप्रमाणे नशिबाला शिव्या घालत , करवादत होता. माझं मात्र त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर राहून राहून येत होता, इतक्या लहान वयात नियतीला फाटक्या नशिबाचे ई एम आय भरत पहिल्या पावसाच्या पाण्यात मनसोक्त डूंबणारा रंग्या आणि एकीकडे घरातली चूल कशी पेटणार या काळजीत असताना पोराला दिलेल्या चार-पाच रूपयात येणारी भजी सगळे मिळून खा म्हणून सांगणारी ती अन्नपूर्णा !
© विशाल विजय कुलकर्णी

 

परीस

अगदी सातवी आठवीत येईपर्यंत सुशि, शरदचंद्र वालिंबे, सुभाष शहा, गुरुनाथ नाइक इथपासुन ते वेदप्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन भारती, मेजर बलवंत , ओमप्रकाश शर्मा प्रभुतीची ओळख झालेली होती. त्यामुळे आमच्या वाचनाच्या आवडी-निवडी सुद्धा तश्याच झालेल्या. नाही म्हणायला फ़ाफ़े, फेलूदा आणि अधुन मधून गोट्या, एलिस, पिनाकियो, गलिव्हर, टारझन असायचे जोडीला (यांची भेट कुर्डवाडीच्या नगर वाचनालायात झालेली – इयत्ता चौथी, पाचवीत @विकु). 
पण मग आठवी की नववीत असताना वुडहाऊसची एक कथा वाचनात आली. आमची शाळा मराठी मिडियम, त्यामुळे साहजिकच अडलेल्या इंग्रजी शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाडक्या काकड़ेबाईना पकडले. बाईंनी ती कथा तर समजावून दिलीच, पण त्याबरोबर एक मंत्रही दिला. वुडहाऊसचे इंग्रजी जर अवघड जात असेल तर सद्ध्या पुलदे वाच . मोठा झाल्यावर वुडहाउस वाचशीलच. गंमत म्हणजे पु.ल. वाचायला लागल्यावर लक्षात आले की ते सुद्धा वुडहाऊसचे प्रेमी आहेत. (भक्त म्हणायचे होते पण म्हटलं नकोच, उगीच कुणाच्यातरी भावना दुखावायच्या). तर सांगायचे इतकेच की काकड़ेबाईंनी पुलदे नावाचे जालिम व्यसन लावले आणि मी कट्टर व्यसनी बनलो.
तोपर्यंत विनोदी वाचन झालेले नव्हते अशातला भाग नव्हता चिं. वि. जोशीचा चिमणराव किंवा गडकरींचा बाळकराम वाचले होतेच. पण पुलंनी टेस्टच बदलून टाकली. माझ्याबाबतीत म्हणाल तर क़ाय वाचावे याबरोबर का वाचावे हे पुलंनी शिकवले. कुठल्याही जड़, अलंकारिक शब्दाचा आधार न घेता साध्या सरळ आणि नेमक्या, सोप्या शब्दात टोकदार तरीही न दुखावणारा विनोद क़ाय असतो हे पुलदे वाचताना समजले. तत्कालीन  विनोदी लेखकांच्या बहुतांशी लेखनातून आलेला विनोद हा तात्कालिक परिस्थितीवर आधारीत असायचा. आत्यंतिक दारिद्र्य, समाजाच्या जाचक रूढीपरंपरा, लोकांचे दुटप्पी वागणे, तत्कालीन सरकारचे जाचक नियम. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला शालजोडीतुन फटके मारत, त्या गोष्टीची, व्यक्तीची इनडायरेक्टली खलनायक/खलनायिका म्हणून प्रतिष्ठापना करत त्याला शब्दातुन विरोध म्हणून हा विनोद जन्माला आलेला असे. पुलंच्या विनोदाचे वैशिष्ठ्य हे की त्यात खलनायकाला स्थानच नव्हते. साध्या साध्या शब्दात खळखळून हसायला लावत , छोट्या छोट्या त्रुटी आणि उणीवावर बोट ठेवत हसवताना कुठेतरी नकळत पटकन डोळ्यांत पाणी आणणारा असा पुलंचा विनोद आहे. आठवा ना, व्यक्ती आणि वल्लीमधले कुठलेही पात्र आठवा. एक नंदा प्रधान सोडला तर प्रत्येक व्यक्तिचारित्र हे खळखळून हसवते आणि जाता जाता तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्यांत पाणी उभे करुन जाते. 
“…… अजुन थोड़ा वेळ लागला असता तर आमचा गणपती बाप्पा मोरया झाला असता म्हणणारे पेस्तनकाका असोत, तेवढं प्राचीला गच्ची जुळतय का बघा की, म्हणणारे रावसाहेब असोत, समस्त रत्नाग्रीच्या गाई तुर्तास गाभण क़ाय रे म्हणत येता जाता टोमणे मारणारे अंतुशेठ असोत किंवा पुराव्याने शाबित करेन अशी खात्री देणारे हरितात्या असोत. पुलंच्या प्रत्येक विनोदाला एक करुण, हळवी किनार आहे, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्की ओले करते, आतवर कुठेतरी हलवून जाते.
परवा एका मित्रांशी बोलताना त्याच्या कुणा गुणी मित्राचा विषय निघाला. तर आमचा मित्र कौतुकाने म्हणाला,” अरे त्याच्याबद्दल क़ाय सांगणार? क़ाय येत नाही असे नाही. प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे, तेंडुलकरच म्हण ना!” माझ्या मनात लगेच पु.ल.च आले. मला वाटते पुलंनी फक्त खेळ हे एकच क्षेत्र सोडले असेल. पण मला खात्री आहे की मनावर घेतले असते तर त्यांनी हे सुद्धा क्षेत्र लीलया गाजवले असते. भल्या भल्या दिग्गजांची सहज हातात बॉल नसतानाही हुकमी विकेट काढ़णारा कसबी गोलंदाज होते पुल. आचार्य अत्रेसारख्या हुकमी पेसरचे चेंडू लीलया सीमेपार पोचवणारा एकमेव फलन्दाज होता तो. गायन, संगीत, लेखन, वक्तृत्व, चित्रपट दिग्दर्शन हे सगळे पैलु तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला होतेच. पण पुलंचे वैशिष्ठ्य म्हणजे ते परीस होते. फेसबुकवरचे एक लोकप्रिय लेखक जयंतदादा विद्वान्स यांनी आजच्या त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीला, गोष्टीला, प्रसंगाला  पुलंचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श झाला त्या त्या व्यक्तीचे, गोष्टीचे , प्रसंगाचे सोने झालेय. 
त्यांची आणि सुनिताबाइंची जोड़ी हे साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्राला लाभलेले लक्ष्मी-नारायणच म्हणायला हवेत. आपलं जे काही होतं ते सगळं या जोडीने समाजाला देवून टाकलं. त्यांनी दिलेल्या दानावर, देणग्यावर आजही कितीतरी समाजोपयोगी ट्रस्ट चालु आहेत. 
पुलंनी मला क़ाय दिलं? तर जगण्यासाठी धन, संपत्ती नव्हे तर एक कारण हवे असते, एक उद्दीष्ठ्य हवे असते हे शिकवलं. प्रत्येक भल्या-बऱ्या गोष्टीकड़े सकारात्मक नजरेने पाहायला शिकवले. हे जग खुप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजुन सुंदर करायचे आहे याची जाणीव करुन दिली. 
आज पुलंचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या लेखनाबद्दल शेकडो पाने लिहून काढली आहेत साहित्यिकानी. मी पामर क़ाय वेगळे लिहिणार? एवढेच म्हणेन… 
थैंक्यू भाईकाका , तुम्हाला भाईकाका म्हणण्याइतकी जवळीक नसेल आपल्यात कदाचित. आपण कधीही भेटलो नसु. पण दररोज भेटणाऱ्या दर दहा व्यक्तीत कुठे ना कुठे आम्हाला पुलदे भेटतात , भेटत राहतील कारण ते आमच्या हृदयात पक्की जागा करून बसलेत हो. 
सुरूवातीला उगीचच वाटायचं … 
तुम्ही गेलात !

आज इतक्या वर्षानंतरसुद्धा स्वत:लाच खोटं ठरताना, चुकीचं ठरताना पाहूनही इतका आनंद होण्याची अशी उदाहरणे विरळाच ! _/\_
सादर अभिवादन ! 💐
© विशाल विजय कुलकर्णी

 
 
%d bloggers like this: