RSS

Category Archives: सहज सुचलं म्हणुन….

सहज सुचलं म्हनून …
चालु घटना, घडामोडींवर भाष्य..!

ये दिन क्या आए लगे फूल हँसने…

त्या दिवशी जेवण झाले आणि मी हात धुवुन येईपर्यन्त मित्राने हॉटेलच्या काउंटरवरुन त्याची सिगरेट विकत घेतली आणि बाहेर जावून सिगरेट ओढ़त उभा राहीला.

“सम्या, यार एक गोष्ट सांग मला. तुला दर तासा-अर्ध्यातासाला सिगरेट लागते, मग पिक्चरला थिएटरमध्ये गेल्यावर कसा बसून राहतोस इंटरव्हलपर्यन्त. Movie is also your passion.” मी मुद्दाम खोड काढली.

“अबे सिगरेट सॉंग्स असतात ना प्रत्येक चित्रपटात. ”

माझ्या कपाळावर हे मोठ्ठालं प्रश्नचिन्ह उमटलं असावं बहुदा. तो पुढे समजवायला लागला. अरे आजकाल पिक्चरमध्ये बरीच गाणी अशी असतात की ज्यांचा कथानकाशी फारसा संबंध नसतो. अश्या वेळी मी बाहेर येवून बासरी वाजवून घेतो. हाय काय आन नाय काय?
तुला हे कधी जाणवले नसणार. तू कायम ते सत्तरच्या दशकातले सिनेमे पाहात असतोस. त्यात अगदी बॅकग्राउंड सॉंग्ससुद्धा कथानकाशी निगडित असायची.

माझ्या डोक्यात लागलीच चक्र सुरु झाले. प्यासाच्या एका गाण्याबद्दल मागे एकदा वहिदाने सांगितले होते एका मुलाखतीत. प्यासा या चित्रपटातील गीता दत्तने ग़ायलेले वहिदावर चित्रित झालेले एक गाणे गुरुदत्तने नंतर काढून टाकले होते. “रुत फिरे पर दिन हमारे फिरे ना फिरे… ”
यावर गुरुदत्तने दिलेले स्पष्टीकरण असे होते की तो या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेला असताना त्याच्या लक्षात आले की हे गाणे सुरु झाले की लोक सिगरेट ओढायला म्हणून थिएटरबाहेर पडतात. गुरुदत्तसारख्या परफेक्शनिस्टला हे खटकले आणि त्याने हे गाणेच काढून टाकले. म्हणजे सिगरेट सॉंग्स तेव्हाही होतीच की हो.

मग अशी अनेक गाणी डोळ्यासमोरून सरकायला लागली. बासूदांच्या प्रत्येक चित्रपटात असे एक तरी गाणे असेच की जे निव्वळ पार्श्वभूमीवर वाजत असे. पण गंमत म्हणजे त्यात मला एकही गाणे असे सापडेना की ज्याला सिगरेट सॉंग म्हणता येईल. बासूदांचे प्रत्येक गाणे मग ते कलावंतावर चित्रित झालेले असो वा पार्श्वगीत असो, त्याचा कथानकाशी दाट आणि जवळचा संबंध असे. हि गाणी फारशी लक्षात राहात नसत पण तरीही ती तितकीच सुंदर असत. हे सगळे आठवत असताना बासूदांच्या “छोटी सी बात” ची आठवण होणे साहजिकच होते. यात मुकेशजीच्या आवाजातले एक नितान्तसुन्दर पार्श्वगीत आहे. आज हे गाणे किती जणांना आठवत असेल याबद्दल थोड़ी शंकाच आहे. पण मी हे गाणे नक्कीच कधीही विसरणार नाही. कारण बासूदांच्या चित्रपटात अशी गाणी म्हणजे सिग्नेचरट्यून असे. पाच-सहा मिनिटाच्या त्या गाण्यातून बासुदा आपल्या चित्रपटाची वनलाईन मांडत असत. (पटकथालेखकांच्या भाषेत वनलाइन म्हणजे मोजक्या शब्दात कथेचा सारांश मांडणे)
मंझीलमधले लताबाईंचे ‘रिमझिम गिरे सावन’ पण याच श्रेणीतले गाणे होते.

mqdefault

तर आपण बोलत होतो छोटी सी बात बद्दल. गाण्याच्या ओळी आहेत…

“ये दिन क्या आए लगे फूल हँसने
देखो बसंती-बसंती होने लगे मेरे सपने”

बासूदांचे चित्रपट नेहमी सामान्य माणसाची छोटी छोटी स्वप्ने, त्याच्या आकांक्षा, समस्या यावर केंद्रीत असत. छोटी सी बात ही सुद्धा अशीच एका सामान्य प्रेमी जोडप्याची कथा आहे. एका खाजगी आस्थापनेत काम करणारा अरुण (अमोल पालेकर) दुसऱ्या एका ठिकाणी काम करणाऱ्या प्रभाच्या (विद्या सिन्हा) प्रेमात पडतो. गंमत म्हणजे बासूदांच्या चित्रपटातले खलनायक सुद्धा सामान्यजनच असत. इथे प्रेमाचा तीसरा कोन म्हणजे प्रभाच्याच ऑफिसमध्ये काम करणारा तिचा ओव्हरस्मार्ट पण तोही तिच्यावर प्रेम करणारा सहकारी नागेश (असरानी). सर्वथा सॉफिस्टिकेटेड आणि स्मार्ट असणारा नागेश प्रत्येक ठिकाणी साध्या सरळ अरुणवर सहज मात करत राहतो. क़ुरघोडी करत राहतो. अश्या परिस्थितीत निराशाग्रस्त झालेल्या, न्यूनगंडाने ग्रासलेल्या अरुणला कर्नलसाहेबांच्या (अशोककुमार) रुपात जणु काही देवदूतच भेटतो. कर्नल त्याच्यातल्या उणिवा बरोबर हेरतात आणि त्याला प्रशिक्षण देवून त्या उणिवा दूर करण्यात त्याची मदत करतात. अरुणची सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. कर्नलसाहेब त्याला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून देतात आणि काही महत्वाच्या टिप्स देतात जगण्यासाठी. अमुलाग्र बदल झालेला अरुण परत येतो आणि अगदी सहज नागेशवर मात करत प्रभाला जिंकून घेतो. चित्रपट संपताना नागेशसुद्धा कर्नलसाहेबांना शरण आलेला दाखवून बासुदा सूचीत करतात की येथे कोणीच वाईट नसतो, जो तो आपल्या इप्सितप्राप्तीसाठी धडपडत असतो. त्यासाठी कधी योग्य मार्ग निवडले जातात तर कधी चुकीचे.

Chhoti Si Baat

असो. तर अरुण परत आल्यावर जे घडते तो परिवर्तनाचा प्रवास बासुदा या गाण्यात मांडतात. पुन्हा गीतकार कवि योगेशजीच आहेत. रिमझिम गिरे सावनचे गीतकार.

कर्नलसाहेबांकडून ट्रेनिंग पूर्ण करून अरुण परत येतो आणि त्यांनी दिलेल्या टिप्स वापरून प्रभाला इम्प्रेस करायच्या मागे लागतो. इथे पुन्हा नागेशचा अडथळा मध्ये आहेच. पण आता अरुण पूर्वीचा साधा सरळ तरुण राहिलेला नाहीये. कर्नलसाहेबांनी दिलेल्या टिप्स वापरून तो नागेशला प्रत्येक ठिकाणी मात द्यायला सुरुवात करतो. आणि मागे सलील चौधरींच्या सहजसुंदर संगीताने नटलेल्या योगेशजींच्या ओळी कानावर यायला लागतात.

ये दिन क्या आए लगे फूल हँसने
देखो बसंती-बसंती होने लगे मेरे सपने

आता बाजी पलटलेली आहे. अरुणची समयसूचकता आणि कर्नलसाहेबांच्या टिप्स यामुळे प्रत्येक ठिकाणी नागेशला मात खावी लागते. इकडे ऑलरेडी अरुणबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्या प्रभाच्या मनात अरुणबद्दल प्रीतीची भावना निर्माण होवू लागलेली आहे. अरुणने पाहिलेली स्वप्ने पूर्ण होण्याची लक्षणे दिसू लागलेली आहेत.

प्रेम ही भावनाच मोठी सुंदर असते. त्यात त्या प्रेमाचं वर्णन करायला योगेशजीसारखा समर्थ कवि, सलीलदा सारखा प्रयोगशील संगीतकार, बासूदांचे अप्रतिम दिग्दर्शन आणि जोडीला मुकेशचा मधाळ आवाज. या गाण्यासाठी मुकेशला निवडणे हा सलीलदांचा अतिशय धाडसी आणि तरीही अतिशय योग्य असा निर्णय होता. तसं पाहायला गेलं तर सुरुवातीपासून मुकेश म्हणजे कुंदनलाल सैगल यांचे चाहते. त्यांच्या गाण्यावर सैगलसाहेबांचा प्रभाव बऱ्यापैकी दिसून येतो. खरेतर बॉलीवूडमधील तत्कालीन गायकांपैकी बहुतेक जण सैगलसाहेबांची नक्कल करतच इंडस्ट्रीत आलेले, मग त्यातून दुराणी, श्यामसुंदर, सी. एच. आत्मा, सुरेंद्र पासून मोहम्मद रफी ते मुकेशसुद्धा सुटलेले नाहीत. पण रफीसाहेब फार लौकर त्या प्रभावातून मुक्त झाले. मुकेशवर मात्र सैगलसाहेबांच्या गायकीचा प्रभाव बराच काळ पर्यंत जाणवत राहिला. त्यामुळे त्यांची गाणीही बऱ्यापैकी त्याच धर्तीवर थोडी मेलोड्रामाच्या अंगाने जाणारी वाटतात. तश्या परिस्थितीत मुकेशला हे हलक्या फुलक्या चालीचे, आनंदी ढंगाचे गाणे देऊन सलीलदांनी मास्टरस्ट्रोक मारलेला होता. आणि अर्थातच मुकेशजींनी या गाण्याचे सोने केले आहे.

यात सर्वात महत्वाचा रोल प्ले केला होता तो बासूदांच्या सर्वांगसुंदर चित्रीकरणाने. या गाण्यात दिसणारी त्या काळची शांत देखणी मुंबई पाहणे हा अतिशय मनमोहक अनुभव आहे. तेव्हा मुंबईत एवढी गर्दी नव्हती. संध्याकाळच्या वेळी बसमध्ये बसून मरीन लाईन्स, कुलाबा, नरीमन पॉईंट या भागात चक्कर मारणे हा एक अतिशय सुखद अनुभव असे. ती शांत , सहज मुंबई या गाण्यातून अनुभवायला मिळते. मरीन लाईन्सवरून फिरणारी बस, जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोवार कॅफेतली कलावंताची, रसिकांची मांदियाळी आणि कुलाब्यातल्या चायनीज फ्लोरा रेस्टोरंटचा आगळा अॅम्बीयन्स गाण्याची रंगत वाढवत राहतो. कथानक आपल्या गतीने पुढे सरकत असते आणि मागे गाणे वाजत असते. !!.

सोने जैसी हो रही है हर सुबह मेरी
लगे हर साँस अब गुलाल से भरी
चलने लगी महकी हुई पवन मगर झूम के
आँचल तेरा चूम के….

प्रेमात पडले की सगळा नुरच बदलून जातो जगण्याचा. आणि त्यातही मनातला आत्मविश्वास जागृत झालेला असेल तर सगळे कसे सहज, सोपे वाटू लागते. प्रत्येक पहाट सुवर्णासारखा यशाचा तेजस्वी रंग लेवुन येते. असे वाटायला लागते की येणारी वाऱ्याची झुळूकसुद्धा जणु काही प्रियेचा स्पर्श लेवुन आलीय. सगळे जगच जणु प्रेमरंगाने रंगीबेरंगी होवून जाते.

रिटायर्ड कर्नल ज्यूलियस नगेन्द्रनाथ विल्फ्रेड सिंग उर्फ सदाबहार अशोककुमार आपल्या भूमिकेत विलक्षण रंगत आणतात. कर्नलने एक अतिशय महत्वाची टिप दिलेली असते अरुणला…

“जिंदगी की क्रिकेट मे ड्रॉ नहीं होता। या तो जीत होती है या हार। और जीत उसी की होती है जो उपर है।’ किंवा ‘यू नो अरुण, दी बॉटम इज ऑल व्हेरी क्राउडेड बट देअर इज ऑल्वेज रूम अॅट दी टॉप’…

आणि हळूहळू कर्नल त्याला प्रेमातल्या प्रतिस्पर्ध्यावर बाजी उलटवण्याशिवाय पर्याय नाही हे समजावतो आणि मुलीला जिंकायचे डावपेच शिकवतो… ते सर्व ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखंच

अमोल पालेकर आणि असरानी यांचा सहजसुन्दर अभिनय, विद्या सिन्हाचे गर्ल नेक्स्ट डोअर स्टाइलचे निरागस , साधेपणातले सौंदर्य हा या कथेचा यूएसपी होता. प्रभाला इम्प्रेस करण्यासाठीची त्या दोघांची धडपड, ती जुगलबंदी, ते दावपेच आणि आपल्याला अरूण आवडतोय हे लक्षात येवूनही नागेशला सरळ-सरळ नाही म्हणू न शकणारा तिचा मध्यमवर्गीय भिडस्तपणा, तिचा निरागस साधेपणा अगदी ठळकपणे प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यात बासुदा कमालीचे यशस्वी झाले आहेत.

VS

विद्या सिन्हा म्हणजे माझ्यासारख्या नवथर तरुणांसाठी एक गोड स्वप्न होते तेव्हा. तिची कुठलीही भूमिका बघा ती कधीही चित्रपटाची हिरोइन वगैरे वाटली नाही. आजकाल करीना, दीपिका, अनुष्काकड़े पाहताना जसे लगेच त्यांचे अप्राप्य असणे जाणवते तसे विद्या सिन्हाच्या बाबतीत कधीच होत नसे. बहुतेक वेळी कायम एखाद्या साध्या साडीत किंवा ड्रेसमध्ये वावरणारी, जणु काही आपल्या शेजारच्या घरातली एखादी गोड मुलगी वाटावी असा तिचा वावर असे. त्यातूनही महत्वाचे म्हणजे तिचे प्रसन्न हास्य. त्या हासऱ्या चेहऱ्यातुन उत्फुल्लपणे फुलणारी प्रसन्न निरागसता आणि नैसर्गिक अभिनय हा तिचा यू एस पी होता. त्यात जोडीला अमोल पालेकर आणि असरानीसारखे सहजसुंदर अभिनय आणि टायमिंगचे बादशाह बरोबर होते.

कहाँ मेरा मन बावरा उड़ चला
जहाँ पर है गगन सलोना साँवला
जा के कहीं रख दे मन रंगों में घोल के
सपने ये अनमोल से
ये दिन क्या आए …

आता अरुणला आपले प्रेम यशस्वी होणार याची खात्री पटलेली आहे. तर त्याचे बदललेले रूप, त्याचे आत्मविश्वासपूर्ण वागणे, तिच्या प्राप्तीसाठी त्याचे नागेशबरोबर स्पर्धा करणे यामुळे प्रभाही विलक्षण सुखावलेली आहे. कारण तिचेही अरुणवर प्रेम आहेच. इतके दिवस मनात जे द्वंद्व चालू होते ते संपलेले आहे. आता मनाच्या भराऱ्याना क्षितीजाचेच काय ते बंधन उरलें आहे. स्वप्ने खरी होताना दिसताहेत त्यामुळे तिच्या मनातले प्रेमांक़ुर फुलून येताहेत.

एक गंमत सांगतो तुम्हाला. त्या काळी विद्या सिन्हाच्या साध्या, शालीन सौंदर्याने अनेक तरुणांचे हृदय चोरले होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे विद्याने तिचा पहिला चित्रपट रजनीगन्धा साइन केला तेव्हा ती आधीच विवाहित होती. विशेष म्हणजे लव्ह मैरेज आहे तिचे आणि महत्वाचे म्हणजे आजही टिकून आहे. लग्नानंतर ती फ़िल्म इंडस्ट्रीत आली. असे अजुन एक उदाहरण म्हणजे बासूदांनीच यश मिळवून दिलेली मौसमी चटर्जी.

काल परवा कुठल्याश्या चॅनेलवर आर जे अनमोलला मुलाखत देताना विद्याला तिचा आवडता चित्रपट विचारण्यात आला. ती सहज मिस्किलपणे हसत म्हणाली, “और कौनसी मुव्ही हो सकती है? मेरा फिल्मी करियरभी कहाँ इतना बड़ा था? “छोटी सी तो बात है!” आणि पुन्हा अगदीच तशीच प्रसन्न आणि उत्फुल्लपणे हसली. आता चेहऱ्यावर, कायेवर वयाचे परिणाम झालेत तिच्याही. पण ते देखणे, निरागस हास्य अजूनही तितकेच प्रसन्न, गोड़ आणि सहजसुन्दर आहे.

फिल्मः छोटी सी बात (१९७५)
गायक : मुकेश
संगीतकारः सलिल चौधरी
गीतकारः योगेश
कलाकारः अमोल पालेकर, विद्या सिन्हा

विशाल कुलकर्णी
०९९६७६६४९१९

 

” चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो “

” चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो “
काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र ‘चलो एक बार फिरसे वर..’लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे. त्यामुळे चित्रपट पाहणे मस्ट झाले.
नैनितालमधील एका सधन कुटुंबातील दोन बहिणी, कमला आणि मीना. कमला आपल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेली असताना तिला धाकट्या बहिणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते. कमला आपल्या पतीच्या अशोकच्या मदतीने मीनाचे तिच्या प्रियकराशी राजेंद्रशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेते. पण अ‍ॅज युज्वल द ग्रेटेस्ट ट्वीस्टमास्टर ऑफ द वर्ल्ड मिस्टर समय उर्फ काळमहाशय आपली खेळी करतात आणि कमलाचा मृत्यु होतो. बहिणीच्या लेकरांसाठी म्हणून मीना तिच्या नवर्‍याशी लग्न करायचा निर्णय घेते आणि करतेही. एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे राजेंद्र आणि मीना, मीनाच्या या एका निर्णयाने एकमेकाम्पासून दूर फेकले जातात. ज्यांनी एकमेकांना एकत्र जगण्या मरण्याची वचनं दिली होती, ते एकमेकांपासून वेगळे होतात. पण नियतीबाई इथे थांबत नाहीत…
एका वळणावर राजेंद्र, अशोक आणि मीना पुन्हा समोरासमोर येतात आणि नव्या द्वंद्वाला सुरुवात होते. काहीही कल्पना नसलेला सरळ, सुस्वभावी अशोक, प्रेयसीच्या अचानक, काहीही न सांगता निघून जाण्याने अंतर्यामी दुखावलेला, तरीही आहे ते, आहे तसे स्वीकारण्याचा तयार झालेला राजेंद्र आणि प्रियकराला समोर पाहताच अपराध भावनेने कोलमडून गेलेली मीना.
काय म्हणाला ? हो हो, अक्षय कुमार आणि करिनाचा बेवफा याच चित्रपटावरून प्रेरीत होता. तर राजेंद्र गायक आहे हे समजल्यावर रसिकमनाचा अशोक त्याला गाण्याची विनंती करतो. आणि साहिर नावाचा मनस्वी, विलक्षण  शब्दांचा जादुगार महेंद्रभाईंच्या टोकदार आवाजाचा आसरा घेत थेट , अगदी ऐन शुन्य अंशापेक्षा कमी तपमानाच्या अवस्थेत सर्वांगाला बर्फाच्या सुया टोचाव्यात तसा विकल करत, आपल्या काळजावर मनस्वी बोचरे वार करत जातो.
रवीसाहेबांचं हलकं फुलकं तरीही विलक्षण अस्वस्थ करत काळीज चिरत जाणारं संगीत आणि त्यात महेंद्र कपूरने लावलेला टोकदार तरीही अतिशय हळवा, भावूक आवाज. महेंद्रभाईंच्या वाट्याला अशी नजाकतभरी, हळुवार गाणी तशी कमीच आली असतील. पण जेव्हा कधी संधी मिळाली त्यांनी तिचे सोने केलेले आहे. अतिशय ताकदीचा स्वर लाभलेले महेंद्रभाई, पण बॉलीवुडचे काही मोजके संगीतकार सोडले तर बहुतेकांनी त्यांच्या कलागुणांचा फारसा वापरच करून घेतलेला नाही असेच म्हणावे लागेल दुर्दैवाने. एक विलक्षण योगायोग म्हणजे महेंद्रभाईंनी आपल्या इथल्या करियरची सुरूवात सुद्धा साहिरच्या गीतापासून केलेली आहे. १९५३ साली आलेल्या ‘ मदमस्त ‘ या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेल्या ‘आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया ‘ या त्यांच्या पहिल्या गीताचा गीतकार साहिरच होता. आणि गुमराहसाठी गायलेल्या साहिरच्याच या गाण्याने त्यांना त्यांचा दुसरा फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळवून दिला.
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो
किती विलक्षण आर्त, विकल अवस्था आहे. समोर जिच्यावर / ज्याच्यावर अतिशय जिवापाड प्रेम केले अशी व्यक्ती. पण प्रेम, गिले- शिकवे तर दूरच साधी ओळख दाखवणेही शक्य नाही. अश्या विलक्षण कुचंबणेत अडकलेले मीना आणि राजेंद्र…
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज़ नज़रों से
आयुष्य, प्राक्तन कधी-कधी अतिशय विचित्र अशी कोडी घालतं. तिथे सुटका नसते. त्यापासून दूरही पळता येत नाही आणि सहनही होत नाही. किती कठीण अवस्था असेल ती. किती जिवघेणी विकल अवस्था. तू माझ्यासाठी काही करावेस अशी कुठलीही अपेक्षा नाहीये. पण प्लीज ते तसं व्याकुळ नजरेने, जिवघेणे कटाक्ष टाकणे बंद कर बयो.
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये मेरी बातों से
न ज़ाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज़ नज़रों से
चलो इक बार फिर से …
माझ्या काळजाची आर्त, विव्हल धडधड तुझ्यापर्यंत येणार नाही याची काळजी मी घेइन. तू पण तुझी वेदना तेवढी लपवता येते का पाहा. केवढी विलक्षण कुचंबणा? किती केविलवाणी धडपड , स्वतःलाच चुकवून स्वतःपासूनच दूर पळण्याची. हे फार क्लेशकारक असतं. आतल्याआत स्वतःशीच चाललेला हा झगडा, हे अंतर्द्वंद्व प्रत्येक माणुस कधीना कधी, कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्वतःशीच लढत असतोच. एखादाच साहिर अतिशय सार्थ आणि परिणामकारक शब्दात ही भावना मांडून जातो आणि आतवर कुठेतरी चाललेला तो संघर्ष क्षणार्धात सगळं उध्वस्त करून जातो.
तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से
मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पराए हैं
मेरे हमराह भी रुसवाइयां हैं मेरे माझी की – २
तुम्हारे साथ भी गुज़री हुई रातों के साये हैं
चलो इक बार फिर से …
त्याला कल्पना आहे की ती बेवफा नाहीये, बेइमान नाहीये. पण नियतीच्या खेळापुढे दोघेही लाचार आहेत. कदाचित कुठेतरी समपर्ण कमी पडलेय का तिचे? आपलं सर्वस्व पणाला लावण्यात ती कमी पडलीय का? कदाचित त्याच्यातही काही दोष असतील . पण यापुढे काय्म एक बोचरी जाणिव की आता यापुढे कायम अनोळखी, तिर्‍हाईताचा मुखवटा लावुन जगणे आले. तिची असहाय्यता, मनातली आर्त खळबळ , एकत्र घालवलेले ते धुंद क्षण, त्या रात्री, दिवसेंदिवस गडद होत जाणार आहेत . त्या जीवघेण्या आठवणी सतत पाठलाग करणार आहेत … अखेरपर्यंत
तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से … “
मला साहिर विलक्षण आवडतो. हा माणुस खुप छळतो मला, पण …., वही दर्द है और वहीं मेरी दवाभी. तारूफ रोग बन जाए तो उसको भुलना बेहतर, ताल्लूक बोझ बन जाए तो उसको छोडना अच्छा” असं म्हणणारा साहीर कळतो खरा पण वळत मात्र नाही. त्यामुळे अशी कित्येक अनोळखी, हवीशी-नकोशी नाती, ओळखींचे ओझे डोक्यावर घेवून आपण जगत राहतो.
कुठे थांबायचं हे सुद्धा कळायला हवं, समजायला हवं. जेव्हा कुठेतरी गुंतलेलं मन आपल्यालाच आतून पोखरायला लागतं, जिवापाड जपलेलं एखादं नातंसुद्धा जेव्हा गळफास बनू पहातं. तेव्हा त्यातून मनस्तापा खेरीज काहीच मिळणार नाही हे पक्कं होवून जातं. अश्या वेळी ते नातं तोडणं हाच उत्तम आणि योग्य पर्याय असतो. ज्या कथेचा, नात्याचा शेवट आपल्याला हवा तसा होणार नाहीये, त्यातुन सगळ्यांच्याच वाट्याला फक्त दु:ख आणि वेदनाच येणार आहे हे जेव्हा कळुन चुकते तेव्हा त्या , त्या नात्यासाठी दिशाहीन , भरकटत जाण्यापेक्षा आपणच दिशा बदलावी आणि या आयुष्याला छानसे सुरेख वळण द्यावे . जगण्याचा प्रवास नव्याने सुरु करावा हेच उत्तम.
मला साहिर आवडतो कारण साहिर जगण्याला एक विलक्षण सकारात्मक अशी दिशा दाखवत राहतो. त्याच्या लहानपणी जे त्याने भोगलय. विक्षिप्त वडील, कायम बापाच्या अत्याचाराला बळी पडलेली आई आणि अश्या परिस्थीतीत लहानाचा मोठा झालेला साहिर त्याच्या मनात एकुण आयुष्याबद्दलच कटुतेची भावना निर्माण झाली असती तरी काही वाटले नसते. पण आयुष्यभर अनेक वाईट अनुभव घेत मोठा झालेला साहिर सगळी कटुता बाजूला ठेवून जगंण्याच्या सकारात्मकतेवर भाष्य करतो. जगण्यातल्या आनंद, त्याची सार्थकता दाखवून देतो तेव्हा तो अधिकाधिक जवळचा वाटायला लागतो..
हम कहतें है ये जग अपना है, तुम कहतें हो झुठा सपना है
हम जनम बीताकर जायेंगे, तुम जनम गवांकर जाओगे
साहीर ने लिहिलेल्या या ओळी जीवनाचा अर्थ परत एकदा नव्याने सांगतात. त्रासदायक होणार्‍या एखाद्या नात्यात गुंतून न पडता त्याकडे त्रयस्थ ज्ञजरेने पाहात त्यापासून दूर होता आलं पाहीजे. जगण्याचा प्रवास कुणासाठी थांबत नाही आणि तो थांबूही नये. फार जड होतेय, थकल्यासारखे वाटतेय असे वाटले की सरळ कात बदलून रिकामे व्हावे. मनात कसलीही खंत, कसलेही किल्मिश न बाळगता त्या जुना कातीकडे, नात्याकडे त्रयस्थपणे , नव्या औत्सुक्याने पाहात पुढल्या प्रवासाला लागणे हेच उत्तम.
Sanchar VK 22-4-18
Sanchar VK 22-4-18_1
स्वतःच्याच मनाला अगदी आपलेपणाने, खंत न बाळगता सांगता आले पाहीजे की….
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो …
काय , जमेल ना?
चित्रपट / Film: Gumraah
संगीतकार / Music Director: Ravi
गीतकार / Lyricist: साहिर-(Sahir)
गायक / Singer(s): महेन्द्र कपूर-(Mahendra Kapoor)
समाप्त
विशाल विजय कुलकर्णी
भ्रमणध्वनी – ०९९६७६६४९१९

 
 
%d bloggers like this: