RSS

Category Archives: सहज सुचलं म्हणुन….

सहज सुचलं म्हनून …
चालु घटना, घडामोडींवर भाष्य..!

रंगीत पडद्यावरचे सखे-सोबती …

“I have a lot of acquaintances, a few are buddies”
Toba beta (Indonacian author of ‘Master of Stupidity’)

आई-वडील, पत्नी, भावंडे, मित्र, आपले, परके, नातेवाईक, सहकारी असा कितीही गोतावळा कायम आपल्या भोवती असला तरी एक गोष्ट पक्की आणि नक्की असते की माणूस या जगात, स्वत:त कायम एकटाच असतो. अगदी कितीही प्रसिद्ध असला, मित्रांच्या बाबतीत सुदैवी असला तरी प्रत्येकाचा स्वतःचा असा एक परिघ असतो. ज्याला इंग्रजीत ‘ एव्हरीवन्स ओन स्पेस’ म्हणता येईल. तिथे तो एकटाच असतो. बऱ्याच लोकांना आपली ती स्पेस जपणे आवडते आणि ते ती जपतात देखील. पण बहुतांशी सर्वसाधारण माणूस हा एकटेपणा नाही सोसू शकत.

माणूस हा समुहात राहणारा प्राणी आहे. काही अपवाद सोडले तर तो एकटा राहुच शकत नाही. त्याला कायम आपल्या आजुबाजुला कोणीना कोणी हवे असते, ज्याच्याशी बोलता येईल, संवाद साधता येईल, आपला एकटेपणा ज्याच्यासह वाटून घेता येईल. असे जर कोणी सोबत नसेल तर तो अस्वस्थ होतो, वेडावून जातो. त्यामुळे सर्वसाधारणपणे माणूस आपल्या गोतावळ्यात, आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकाबरोबर राहतो. त्याशिवाय त्याला जगणे अशक्य होवून जाते. पण सगळेच काही , सगळ्याच वेळी मित्रांबरोबर, आप्तांबरोबर राहता येईल इतके नशीबवान नसतात. कधी नियती, कधी जवळचे लोक , कधी स्वतःचे वर्तन तर कधी स्वतः केलेल्या चुकादेखील त्याला एकटे पाडायला कारणीभूत ठरतात. अश्या वेळी माणूस संवाद साधण्यासाठी एरव्ही विचित्र वाटू शकणारे पर्याय शोधतो. काही सकारात्मक माणसे त्यातूनही काही चांगले पर्याय शोधतात. ज्यांना हे जमत नाही ते स्वत:पुरते का होईना सोबतीसाठी एरव्ही काहीसे वेगळे, विचित्र वाटणारे पर्याय शोधतात.

मी वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची स्वतःची अशी एक स्पेस असते, जिथे तो सर्वस्वी एकटा असतो. एकटाच राहु इच्छितो. पण एकटेपणा हा इतका सोपा नाहीये. त्यामुळे अश्या परिस्थितीतही माणूस त्याला सोइस्कर असा पर्याय शोधतो. मी सुद्धा माणूस आहे, मलाही कधीकधी स्वतःची स्पेस हवी असते. पण मुळातच एकांतप्रियता हा माझा स्वभाव नसल्याने त्या एकांतातही मला कुणाचीतरी सोबत हवी असतेच. अश्या वेळी मग मी ती सोबत कधी पुस्तकात शोधतो. कधी तलतच्या गाण्यात शोधतो, तर कधी व्यक्त होण्यासाठी माझ्या ब्लॉगची सोबत करतो. सुदैवाने माझ्याकडे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत की जे मला कधी एकटे पडू देत नाहीत. पण हा एकांत, हा एकटेपणा नेहमीच ऐच्छिक, स्वाभाविक नसतो. काही जणांच्या बाबतीत तो नियतीने, क्वचित त्यांच्या स्वतःच्या वर्तनाने सुद्धा लादला जातो.

माझ्या अश्या एकांतात मी पुस्तकांच्या नंतर सगळ्यात जास्ती सहारा घेतो तो एका टीव्ही सिरियलचा. माना उंचावल्या ना लगेच? विशल्या आणि टीव्ही सिरियल? But that’s true, अश्या वेळी मी एक मालिका आवडीने पाहतो. अर्थात आता ती कुठेच चालू नाहीये. पण इंटरनेटच्या माध्यमाने जुन्या मालिकांचे भाग पुन्हा पाहण्याची सोय करून देवून आपल्यावर प्रचंड उपकार करून ठेवलेले आहेत. अश्या वेळी माझ्या सोबत ‘मिस्टर बीन’ असतो. रॉन (किं रोवन) अॅटकिन्सनने साकारलेला जगावेगळा मिस्टर बीन. हा स्वभावाने काही प्रमाणात माझ्यासारखाच आहे. फक्त एकच फरक आहे आमच्यात , तो म्हणजे माझ्या सुदैवाने मला प्रचंड मोठे असे मित्रमंडळ लाभलेले आहे, तर ‘बीन’ अगदी एकटा आहे. कारणे काहीही असोत. पण त्याला त्या एकटेपणाची फिकीर नाही, कारण त्याने या एकटेपणावर त्याच्यापुरता पर्याय, एक सोबती शोधलेला आहे. त्याचा हा सोबती म्हणजे एक ब्राउन कलरचे सॉफ्ट टॉय आहे. एक टेडी बीअर. त्याचे नावही टेडीच आहे. एक निर्जीव खेळणे. मात्र बीन कायम त्याच्याशी एखाद्या सजीवासारखेच वागतो. केकचा एखादा तुकडा जरी असला तरी आधी टेडीला खाऊ घालतो. कुठेही गेला तरी टेडी त्याच्या बरोबर असतो. कुठलीही नवी गोष्ट असली, काही घटना असली की टेडीला सांगतो. पिकनिकला जाताना टेडीच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला बरोबर नेतो आणि तिथे पोचल्यावर त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढून त्याला आश्चर्यचकित करतो. इतकेच क़ाय, ख्रिसमसच्या रात्री फ़ायरप्लेसवर सांताच्या गिफ्टसाठी स्वत:बरोबर टेडीसाठी सुद्धा एक सॉक्स बांधतो. कधी संतापला की सगळा राग टेडीवर काढतो आणि मग त्याची माफीही मागतो. अगदी त्याने माफ करावे म्हणून त्याला वेगवेगळी आमिषे दाखवून त्याची मनधरणी सुद्धा करतो. बीनसाठी त्याचा हा टेडी म्हणजे बेस्ट बडी आहे, सर्वात जवळचा सोबती आहे.

टॉम हँक्सचा ‘कास्ट अवे’ आठवतो? कुरियरच्या व्यवसायात असलेला चक़ नोलैंड एका प्लेन क्रैशमध्ये एका मनुष्यवस्तीविरहीत एकाकी बेटावर अडकतो. कायम माणसांच्या रगाड्यात राहणाऱ्या चकला नियतीने थोपलेला हा एकाकीपणा खायला उठतो, वेड्यासारखी अवस्था होते त्याची. मग चक त्याला विमानाच्या अवशेषात सापडलेल्या एका फुटबॉललाच नाक डोळे काढतो आणि एका काठीला बांधून त्यालाच आपला बडी बनवतो. पुढची चार वर्षे त्या एकाकी बेटावर चक आपल्या या जगावेगळ्या सोबत्याच्या साथीत काढतो. प्रसंगी त्याच्याशी बोलतो, त्याच्यावर चिडतो, त्याला शिव्या देतो. त्याला आपल्या गर्लफ्रेंडबद्दल, आपल्या पहिल्या डेटबद्दल सांगतो. या जगावेगळ्या सोबत्याशी त्याचे इतके मैत्र जुळते की जेव्हा चक एक तराफ़ा तयार करून मेनलैंडकड़े परत जाण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपल्या या जोडीदारालाही आठवणीने सोबत घेतो. पुढे समुद्रातील एका वादळामुळे चकचा तराफ़ा फुटतो आणि त्याचा हा बडी त्याच्यापासुन दुरावतो. तेव्हा चकने त्या दुःखाने केलेला आक्रोश टॉम हँक्सने इतका प्रभावीपणे सादर केलाय की ते पड़द्यावर पाहताना सुद्धा आपण अक्षरशः मुळापासुन हलून जातो.

माणसाची ही सोबतीची, कुणीतरी सोबती , जोडीदार असण्याची गरज त्याला इतरांपेक्षा वेगळा बनवते. अर्थात ही सवय प्राण्यात देखील आढळते, नाही असे नाही. पण मनुष्यप्राण्यासाठी ती गरज असते. ‘लाईफ ऑफ पाय’ मधले पाय आणि रिचर्ड पार्कर उर्फ त्या बंगाली वाघाचे नाते असेच आहे. बोट बुडाल्यावर पाय एका छोट्या लाईफबोटीचा आसरा घेतो. तिथे त्याला वेगवेगळे सोबती भेटतात, एक माकड मग एक तरस आणि शेवटी मग त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत तगुन राहीलेला रिचर्ड पार्कर. हे नावही त्याला पायनेच दिलेले आहे. आधी रिचर्ड पार्करला घाबरणारा पाय नंतर मैत्री झाल्यावर त्याच्यावर दादागिरी करायला लागतो. उडत्या माशांचा थवा पाहिल्यावर दोघे मिळून एकत्र माशांची शिकारही करतात. आधी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पार्करला मारायला निघालेला पाय नंतर पार्कर अन्न न मिळाल्यामुळे अशक्त होतोय हे लक्षात आल्यावर खुप हळहळतो. शेवटी किनाऱ्याला लागल्यावर रिचर्ड पार्करचे त्याचा निरोप न घेता जंगलात निघुन जाणे त्याला प्रचंड खटकते इतका तो पार्करमध्ये गुंतला जातो.

माणूस आणि प्राणी यांच्यात हाच फरक आहे. कुत्र्यासारखे किंवा घोड्यासारखे काही अपवाद सोडले तर प्राण्याची स्मरणशक्ती आणि निष्ठा दोन्ही कमजोर असतात. ते आपल्या जोडीदाराला सहज विसरून जातात, नवा जोडीदार शोधतात. माणसाला नेमकी हिच गोष्ट अवघड जाते. तो नात्यात गुंतून जातो आणि मग दुःख करत बसतो. प्राण्यांचे तसे नाही त्यांच्यासाठी सदैव ‘नवी विटी नवे राज्य’ !

तरीही डिस्नेने बऱ्याच मालिका-चित्रपटामधून प्राण्यामधली मैत्री छान रंगवली आहे. हकुना मटाटाचे टिमॉन आणि पुम्बा, मादागास्कर सिरीजचे अलेक्स (सिंह), मेलमन(जिराफ), ग्लोरिया (हिप्पो) आणि मार्टी (झेब्रा) , आइस एजचे मॅनी सीड आणि डिएगो किंवा टारझन आणि त्याचे एप मित्र, मोगली आणि बगिरा, का, बल्लू ही सगळी पात्रे प्राणिमात्रांची मैत्रीची, सोबतीची गरज आणि महत्व स्पष्ट करतात. आपल्याकडे हिंदी चित्रपटात सुद्धा काही प्रमाणात माणूस आणि प्राणी यातले मैत्र रंगवलेले दिसून येते. उदा. तेरी मेहरबानियां, हाथी मेरे साथी, मर्द, परिवार, दूध का कर्ज वगैरे मसालापट, तसेच नव्यापैकी चिल्लर पार्टी आणि संतोष सिवनचा ‘हॅलो’. पण हॅलो आणि चिल्लर पार्टीसारखा एखादा अपवाद वगळला तर हे नाते आपल्याकडे ठळकपणे अधोरेखित होताना दिसत नाही.

शेवटी काय तर माणूस असो वा प्राणी , प्रत्येकाला कुणाची ना कुणाची सोबत हवीच असते. ती त्याची गरज आहे. हो ना?

© विशाल कुलकर्णी

 

“आवारा भंवरे जो होले होले गाए…!”

‘मिन्सारा कनवू’

थांबा, थांबा लगेच असे चित्र-विचित्र चेहरे करू नका. हे आफ्रिकेतल्या कुठल्या प्राण्याचे किंवा टांझानीयामधल्या कुठल्या तरुणीचे नाव नाहीये. अगदी शत प्रतिशत भारतीय नाव आहे हे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या एक तमिळ चित्रपटाचे हे नाव आहे. आता तुम्ही म्हणाल , हिंदी-मराठी गाण्यावर लिहीता लिहीता हा एकदम तमिळवर कुठे घसरला? तर तमिळ चित्रपट आणि त्यांची गाणीही मला अतिशय आवडतात. ( तिकडच्या अभिनेत्री जरा जास्तच) पण विषय तो नाहीये, आजही मी एका हिंदी गाण्यावरच बोलणार आहे. मग या ‘मिन्सारा कनवू’चा प्रपंच कशासाठी? तर हाच चित्रपट , त्याच वर्षी आपल्या बॉलीवुडमध्ये हिन्दीत सुद्धा प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे नाव होते ‘सपने’.

ए. आर. रहमानचे सुश्राव्य संगीत लाभलेल्या या चित्रपटासाठी सिद्धहस्त गीतकार जावेद अख्तर यांनी गीते लिहिली होती. ए. आर. रहमान आणि दाक्षिणात्य संगीत म्हटले की सर्वात प्रथम डोक्यात येतो तो एखाद्या पांगळ्या व्यक्तीलाही थिरकायला भाग पाडेल असा नृत्याचा ठेका आणि ऐकताक्षणी जणुकाही दुसऱ्या जगात नेणारे मोहक, मादक संगीत. दाक्षिणात्य चित्रपट संगीत म्हटले की आठवतो तो तिथल्या कलाकारांच्या अंगात भिनलेला संगीताचा, विशेषत: नृत्याचा कैफ. अगदी बाळकृष्ण, चिरंजीवी यांच्यासारखे तुलनात्मक दृष्टया स्थुल म्हणता येतील असे कलाकार सुद्धा नृत्य म्हणले की बेभान होवून थिरकताना दिसतात. इथे सपने मध्ये तर साक्षात प्रभुदेवा होता. ज्याच्या शरीरात हाडे आहेत की नाही अशी शंका यावी असा नृत्याचा बादशाह प्रभुदेवा. जोडीला बॉलीवुडची बबली गर्ल काजोल आणि अभिनयाचा ताज म्हणता येईल असा देखणा अरविंद स्वामी. एक हलकी-फुलकी प्रेमाचा त्रिकोण असलेली प्रेमकथा. चित्रपटाची स्टोरी हवी असेल तर कृपया गुगलबाबाला किंवा विकीकाकाला विचारा. मी बोलणार आहे या चित्रपटातील काजोलवर चित्रित झालेल्या आणि हेमा सरदेसाईने, मलेशिया वासुदेवन यांच्यासोबत गायलेल्या एका सुंदर गाण्याबद्दल !

आवारा भंवरे जो हौले हौले गाए
फूलों के तन पे हवायें सरसराए

या गाण्यातली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे (अगदी चित्रपटातसुद्धा) हे एक उस्फूर्त गाणे आहे. त्याला आधार म्हणून कुठलीही घटना, कथानक नाहीये चित्रपटात. उगीचच घुसडल्यासारखे असूनही तसे अजिबात न वाटता चित्रपटाशी एकरूप होवुन गेलेले गाणे आहे हे. हे गाणे म्हणजे आनंदाचा उस्फूर्त आणि मनमोहक आविष्कार आहे. एका स्कुलमध्ये शिक्षिका, वर्गातल्या विद्यार्थिनीना निसर्गाचे महत्व, त्याची जादू समजावून सांगत असताना आनंदविभोर झालेली एक विद्यार्थिनी न राहवून उठते आणि सरळ गायला , नाचायला सुरुवात करते. मग तिच्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा हरवून जातात आणि सुरु होतो आनंदसोहळा.

निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते ! आमच्या शांताबाई (शेळके) म्हणतात…

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

खरेतर समस्त निसर्गातच इतके संगीत ओतप्रोत भरलेले आहे की इतर कुठल्या मानवनिर्मित संगीतसाधनांची, वाद्यांची गरजच पडू नये. सतत कानावर येणारा भुंग्याचा गुंजारव, या फुलावरुन त्या फुलाकडे जाताना त्यांच्या पंखांची हळुवार आवाजातली गुणगुण किती श्रवणीय असते. कधी शांत, कोमलपणे तर कधी बेभान होत वाहणाऱ्या समीराची कानात साठवून ठेवावीशी वाटणारी सळसळ नेहमीच मनाला मोहवून टाकते.

कोयल की कुहू कुहू
पपिहे की पिहू पिहू
जंगल में झिंगुर की झाये झाये

कोकिळेची ‘कुहू कुहू साद, राव्याचा ‘पीहू पीहू ’ नाद आणि पाऊसकिडय़ांचा अनवरतपणे कानावर येणारा ध्वनी, यांनी सगळ्या निसर्गाचेच संगीत बनवले आहे. लचकत, मुरडत किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटांचे गाणे ऐकलेय कधी?

नदिया में लहरे आए
बलखाये छलकी जाए
भीगे होंठो से वो गुनगुनाए
गाता हैं साहील गाता हैं बहता पानी
गाता हैं ये दिल सुन सा रे गा मा पा धा नी सा रे

त्या गायला लागल्या की तो किनाराही त्यांना आवेगाने साथ देतो . त्या प्रवाही लाटा व स्तब्ध किनारा यांच्या सोबतीने मग कविमनही मुक्त कंठाने गाऊ लागते. ती सरगम हळूहळू सगळ्या आसमंतात झिरपायला लागते.
आणि हे सगळे कमी असते की काय म्हणून रात्रीच्या नीरव शांततेच्या संगीतात कित्येक मानवनिर्मित गोष्टीदेखील भर घालत असतात बरं.

रात जो आए तो सन्नाटा छाए तो
टिक टिक करे घडी सुनो

रात्रीच्या नीरव शांततेत घड्याळाची अविरत टिकटिक, कुठेतरी दूर एखाद्या पुलावरुन जाणाऱ्या आगगाडीची धडधड. रातकिड्यांची किरकिर या सगळ्यात एक प्रकारचे दैवी संगीत भरलेले आहे. कवि म्हणतो की हे मानवी मनाचे संगीत आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची, त्याचे गाणे करण्याची मानवी मनाची ही खूबी जागवा, तुमच्या आयुष्याचे संगीत होवू द्या.

दूर कही गुजरे रेल किसी पुल से
गूंजे धडाधडी सुनो
संगीत हैं ये, संगीत हैं..
मन का संगीत सुनो

एखादी आई अगदी हलक्या स्वरांत आपल्या बाळाला अंगाई गावून जोजवते तेव्हा त्यात दडलेले संगीत तृप्त करून जाते. त्याचा आस्वाद घेतलाय कधी?

हे गाणे म्हणजे मुक्त आनंदाचा उन्मुक्त अविष्कार आहे. या सगळ्या विद्यार्थिनी आपले सगळे दुःख, समस्या विसरुन काही क्षणासाठी का होईना आनंदविभोर होवुन मनसोक्त नाचतात. हे गाणे बघताना अजुन एक गोष्ट लक्षात येते. रादर ही दक्षीणेकडच्या चित्रपटांची खूबी आहे म्हटले तरी चालेल. ती म्हणजे या नृत्याला कुठल्याही चौकटी नाहीयेत. बॉलीवुडमधील कवायती नृत्य नाहीये हे. एखाददूसरी कॉमन स्टेप सोडली तर बहुतेक मूली आपल्याला हवे तसे नाचताना, बागडताना दिसतात. दक्षीणेकड़े बऱ्याचश्या भागात अजूनही स्त्रीला पुरुषाइतकाच रादर थोड़ा जास्तच मान आहे, आदर आहे. मोकळीक आहे. तिकडे स्त्रीपुरुषाचे नाते सुद्धा उत्तरेपेक्षा जास्त मोकळे आणि सहज आहे. तो मोकळेपणा, ते स्वातंत्र्य या गाण्यात स्पष्टपणे जाणवत राहते.

भीगे परिंदे जो, खुद को सुखाने को
पर फडफडाते हैं सुनो
गाये भी बैल भी, गले में पडी घंटी
कैसे बजाते हैं सुनो

भिजलेले पंख सुकवण्यासाठी जेव्हा पक्षी आपल्या पंखांची फडफड़ करतात तेव्हा त्याने निर्माण होणारा लयबद्ध नाद असो वा गाई-बैलांच्या गळ्यातील घंटीची नाजुक, सुरेल किणकीण असो या सर्वातच निसर्गाचे नादमधुर संगीत सामावलेले आहे. हे सगळे संगीत अनुभवायला शिकायला हवे. आपण आजकाल कानात हेडफोन अडकवतो आणि आपल्या संगीतवेडाचा दिखावा करत फिरतो. पण खरतर ती स्वत:चीच फसवणूक करत असतो आपण. या निसर्गात केवढंतरी आनंदमयी संगीत भरून राहिलेले आहे. अगदी गवताची सळसळ, झाडावरुन ओघळलेल्या शुष्क पानाचा गंभीर नाद, झरे, नदी, नाल्यांच्या वाहत्या पाण्याचे मंजुळ नाद. अगदी मनापासून सांगायचे झाले तर रात्रीच्या नीरव शांततेचाही एक स्वतःचा असा नाद असतो. तो ऐकायला अनुभवायला शिकले पाहीजे. संगीत सर्वत्र आहे पण ते अनुभवण्यासाठी संगीत आपल्या गात्रा-गात्रात रुजवावे लागते. स्वतःला विसरुन त्या निसर्गाशी एकरूप व्हावे लागते. कानाला हेडफोन लावून नव्हे तर कानाचे सगळे पडदे उघडून हे संगीत ऐकायला हवे.

पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’मधल्या लच्छीची गोष्ट आठवते का? मोर बघायचा असेल तर आपणच मोर व्हावे लागते. तारुण्यात प्रचंड ऊर्जा असते. ती जपता, टिकवता आली की जगण्याचे संगीत होवुन जाते आणि मग सात स्वर ‘सा रे ग म प ध नि सा ‘ करत आपल्याचे आयुष्यात एकरूप होवुन जातात. मनमोराचा पिसारा फुलतो आणि आपणच मोर होतो.

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी
भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९

 
 
%d bloggers like this: