RSS

Category Archives: सहज सुचलं म्हणुन….

सहज सुचलं म्हनून …
चालु घटना, घडामोडींवर भाष्य..!

” चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो “

” चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो “
काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र ‘चलो एक बार फिरसे वर..’लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे. त्यामुळे चित्रपट पाहणे मस्ट झाले.
नैनितालमधील एका सधन कुटुंबातील दोन बहिणी, कमला आणि मीना. कमला आपल्या बाळंतपणासाठी माहेरी आलेली असताना तिला धाकट्या बहिणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळते. कमला आपल्या पतीच्या अशोकच्या मदतीने मीनाचे तिच्या प्रियकराशी राजेंद्रशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेते. पण अ‍ॅज युज्वल द ग्रेटेस्ट ट्वीस्टमास्टर ऑफ द वर्ल्ड मिस्टर समय उर्फ काळमहाशय आपली खेळी करतात आणि कमलाचा मृत्यु होतो. बहिणीच्या लेकरांसाठी म्हणून मीना तिच्या नवर्‍याशी लग्न करायचा निर्णय घेते आणि करतेही. एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे राजेंद्र आणि मीना, मीनाच्या या एका निर्णयाने एकमेकाम्पासून दूर फेकले जातात. ज्यांनी एकमेकांना एकत्र जगण्या मरण्याची वचनं दिली होती, ते एकमेकांपासून वेगळे होतात. पण नियतीबाई इथे थांबत नाहीत…
एका वळणावर राजेंद्र, अशोक आणि मीना पुन्हा समोरासमोर येतात आणि नव्या द्वंद्वाला सुरुवात होते. काहीही कल्पना नसलेला सरळ, सुस्वभावी अशोक, प्रेयसीच्या अचानक, काहीही न सांगता निघून जाण्याने अंतर्यामी दुखावलेला, तरीही आहे ते, आहे तसे स्वीकारण्याचा तयार झालेला राजेंद्र आणि प्रियकराला समोर पाहताच अपराध भावनेने कोलमडून गेलेली मीना.
काय म्हणाला ? हो हो, अक्षय कुमार आणि करिनाचा बेवफा याच चित्रपटावरून प्रेरीत होता. तर राजेंद्र गायक आहे हे समजल्यावर रसिकमनाचा अशोक त्याला गाण्याची विनंती करतो. आणि साहिर नावाचा मनस्वी, विलक्षण  शब्दांचा जादुगार महेंद्रभाईंच्या टोकदार आवाजाचा आसरा घेत थेट , अगदी ऐन शुन्य अंशापेक्षा कमी तपमानाच्या अवस्थेत सर्वांगाला बर्फाच्या सुया टोचाव्यात तसा विकल करत, आपल्या काळजावर मनस्वी बोचरे वार करत जातो.
रवीसाहेबांचं हलकं फुलकं तरीही विलक्षण अस्वस्थ करत काळीज चिरत जाणारं संगीत आणि त्यात महेंद्र कपूरने लावलेला टोकदार तरीही अतिशय हळवा, भावूक आवाज. महेंद्रभाईंच्या वाट्याला अशी नजाकतभरी, हळुवार गाणी तशी कमीच आली असतील. पण जेव्हा कधी संधी मिळाली त्यांनी तिचे सोने केलेले आहे. अतिशय ताकदीचा स्वर लाभलेले महेंद्रभाई, पण बॉलीवुडचे काही मोजके संगीतकार सोडले तर बहुतेकांनी त्यांच्या कलागुणांचा फारसा वापरच करून घेतलेला नाही असेच म्हणावे लागेल दुर्दैवाने. एक विलक्षण योगायोग म्हणजे महेंद्रभाईंनी आपल्या इथल्या करियरची सुरूवात सुद्धा साहिरच्या गीतापासून केलेली आहे. १९५३ साली आलेल्या ‘ मदमस्त ‘ या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेल्या ‘आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया ‘ या त्यांच्या पहिल्या गीताचा गीतकार साहिरच होता. आणि गुमराहसाठी गायलेल्या साहिरच्याच या गाण्याने त्यांना त्यांचा दुसरा फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळवून दिला.
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो
किती विलक्षण आर्त, विकल अवस्था आहे. समोर जिच्यावर / ज्याच्यावर अतिशय जिवापाड प्रेम केले अशी व्यक्ती. पण प्रेम, गिले- शिकवे तर दूरच साधी ओळख दाखवणेही शक्य नाही. अश्या विलक्षण कुचंबणेत अडकलेले मीना आणि राजेंद्र…
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज़ नज़रों से
आयुष्य, प्राक्तन कधी-कधी अतिशय विचित्र अशी कोडी घालतं. तिथे सुटका नसते. त्यापासून दूरही पळता येत नाही आणि सहनही होत नाही. किती कठीण अवस्था असेल ती. किती जिवघेणी विकल अवस्था. तू माझ्यासाठी काही करावेस अशी कुठलीही अपेक्षा नाहीये. पण प्लीज ते तसं व्याकुळ नजरेने, जिवघेणे कटाक्ष टाकणे बंद कर बयो.
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाये मेरी बातों से
न ज़ाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज़ नज़रों से
चलो इक बार फिर से …
माझ्या काळजाची आर्त, विव्हल धडधड तुझ्यापर्यंत येणार नाही याची काळजी मी घेइन. तू पण तुझी वेदना तेवढी लपवता येते का पाहा. केवढी विलक्षण कुचंबणा? किती केविलवाणी धडपड , स्वतःलाच चुकवून स्वतःपासूनच दूर पळण्याची. हे फार क्लेशकारक असतं. आतल्याआत स्वतःशीच चाललेला हा झगडा, हे अंतर्द्वंद्व प्रत्येक माणुस कधीना कधी, कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्वतःशीच लढत असतोच. एखादाच साहिर अतिशय सार्थ आणि परिणामकारक शब्दात ही भावना मांडून जातो आणि आतवर कुठेतरी चाललेला तो संघर्ष क्षणार्धात सगळं उध्वस्त करून जातो.
तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से
मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पराए हैं
मेरे हमराह भी रुसवाइयां हैं मेरे माझी की – २
तुम्हारे साथ भी गुज़री हुई रातों के साये हैं
चलो इक बार फिर से …
त्याला कल्पना आहे की ती बेवफा नाहीये, बेइमान नाहीये. पण नियतीच्या खेळापुढे दोघेही लाचार आहेत. कदाचित कुठेतरी समपर्ण कमी पडलेय का तिचे? आपलं सर्वस्व पणाला लावण्यात ती कमी पडलीय का? कदाचित त्याच्यातही काही दोष असतील . पण यापुढे काय्म एक बोचरी जाणिव की आता यापुढे कायम अनोळखी, तिर्‍हाईताचा मुखवटा लावुन जगणे आले. तिची असहाय्यता, मनातली आर्त खळबळ , एकत्र घालवलेले ते धुंद क्षण, त्या रात्री, दिवसेंदिवस गडद होत जाणार आहेत . त्या जीवघेण्या आठवणी सतत पाठलाग करणार आहेत … अखेरपर्यंत
तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से … “
मला साहिर विलक्षण आवडतो. हा माणुस खुप छळतो मला, पण …., वही दर्द है और वहीं मेरी दवाभी. तारूफ रोग बन जाए तो उसको भुलना बेहतर, ताल्लूक बोझ बन जाए तो उसको छोडना अच्छा” असं म्हणणारा साहीर कळतो खरा पण वळत मात्र नाही. त्यामुळे अशी कित्येक अनोळखी, हवीशी-नकोशी नाती, ओळखींचे ओझे डोक्यावर घेवून आपण जगत राहतो.
कुठे थांबायचं हे सुद्धा कळायला हवं, समजायला हवं. जेव्हा कुठेतरी गुंतलेलं मन आपल्यालाच आतून पोखरायला लागतं, जिवापाड जपलेलं एखादं नातंसुद्धा जेव्हा गळफास बनू पहातं. तेव्हा त्यातून मनस्तापा खेरीज काहीच मिळणार नाही हे पक्कं होवून जातं. अश्या वेळी ते नातं तोडणं हाच उत्तम आणि योग्य पर्याय असतो. ज्या कथेचा, नात्याचा शेवट आपल्याला हवा तसा होणार नाहीये, त्यातुन सगळ्यांच्याच वाट्याला फक्त दु:ख आणि वेदनाच येणार आहे हे जेव्हा कळुन चुकते तेव्हा त्या , त्या नात्यासाठी दिशाहीन , भरकटत जाण्यापेक्षा आपणच दिशा बदलावी आणि या आयुष्याला छानसे सुरेख वळण द्यावे . जगण्याचा प्रवास नव्याने सुरु करावा हेच उत्तम.
मला साहिर आवडतो कारण साहिर जगण्याला एक विलक्षण सकारात्मक अशी दिशा दाखवत राहतो. त्याच्या लहानपणी जे त्याने भोगलय. विक्षिप्त वडील, कायम बापाच्या अत्याचाराला बळी पडलेली आई आणि अश्या परिस्थीतीत लहानाचा मोठा झालेला साहिर त्याच्या मनात एकुण आयुष्याबद्दलच कटुतेची भावना निर्माण झाली असती तरी काही वाटले नसते. पण आयुष्यभर अनेक वाईट अनुभव घेत मोठा झालेला साहिर सगळी कटुता बाजूला ठेवून जगंण्याच्या सकारात्मकतेवर भाष्य करतो. जगण्यातल्या आनंद, त्याची सार्थकता दाखवून देतो तेव्हा तो अधिकाधिक जवळचा वाटायला लागतो..
हम कहतें है ये जग अपना है, तुम कहतें हो झुठा सपना है
हम जनम बीताकर जायेंगे, तुम जनम गवांकर जाओगे
साहीर ने लिहिलेल्या या ओळी जीवनाचा अर्थ परत एकदा नव्याने सांगतात. त्रासदायक होणार्‍या एखाद्या नात्यात गुंतून न पडता त्याकडे त्रयस्थ ज्ञजरेने पाहात त्यापासून दूर होता आलं पाहीजे. जगण्याचा प्रवास कुणासाठी थांबत नाही आणि तो थांबूही नये. फार जड होतेय, थकल्यासारखे वाटतेय असे वाटले की सरळ कात बदलून रिकामे व्हावे. मनात कसलीही खंत, कसलेही किल्मिश न बाळगता त्या जुना कातीकडे, नात्याकडे त्रयस्थपणे , नव्या औत्सुक्याने पाहात पुढल्या प्रवासाला लागणे हेच उत्तम.
Sanchar VK 22-4-18
Sanchar VK 22-4-18_1
स्वतःच्याच मनाला अगदी आपलेपणाने, खंत न बाळगता सांगता आले पाहीजे की….
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो …
काय , जमेल ना?
चित्रपट / Film: Gumraah
संगीतकार / Music Director: Ravi
गीतकार / Lyricist: साहिर-(Sahir)
गायक / Singer(s): महेन्द्र कपूर-(Mahendra Kapoor)
समाप्त
विशाल विजय कुलकर्णी
भ्रमणध्वनी – ०९९६७६६४९१९

 

केळीचे सुकले बाग …

मानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते. अशावेळी जर मित्र, सगे सोयरे किंवा आयुष्याचा जोडीदार जर बरोबर नसेल तर तो एकटेपणा अक्षरशः खायला उठतो. एकटेपणाची ही जाणीव विलक्षण छळवाद मांडते. अतिशय क्लेशकारक, जीवघेणी असते. स्वजनांच्या विरहाची क्लेशकारक जाणीव करुन देणारी असते. अशा वेळी मला आवर्जून आठवण येते ती म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्या “केळीचे सुकले बाग….” या विख्यात विरहगीताची.

श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी या गाण्याचे संगीत दिलेले आहे. उषाताई मंगेशकरांनी ग़ायलेलं हे गीत यशवंत देवांच्या सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक म्हणून गणले जाते. या गाण्याच्या संदर्भात बोलताना एका मुलाखतीत देवसाहेब म्हणाले होते…

 

“समकालीन असलेले कवी अनिल आणि कवी वा. रा. कान्त हे दोन कवी रुढार्थाने गीतकार नव्हते, परंतु त्यांची भावकविता जोरकस होती. त्यांची भावकविता वाचत असतानाच डोळ्यांसमोर भावचित्रं उभी राहतात. शब्दांतून चित्र उभं करायची, कवीची हा ताकद मला खूप महत्त्वाची वाटत आलीय. संगीत देण्यासाठी मी ज्या कविता किंवा गाणी निवडली, त्याची माझी पूर्वअट हीच असायची, की ती कविता-गाणं वाचताना माझ्या डोळ्यांसमोर दृश्य उभं राहिलं पाहिजे. कारण कवीच्या भावना गीतामध्ये उतरलेल्या असतात, त्या ओळखून त्यांना योग्य प्रकारे शब्दबद्ध केलं, तरच ते गीत श्रोते आपल्या हृदयात आणि स्मरणात साठवून ठेवतात.”

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

यशवंत देवांच्या मते हे “विरहाचे सर्जनशील गीत” आहे.लौकिकार्थाने रोपाची व्यवस्थीत वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व काही गोष्टी मिळून सुद्धा ही केळीचं बाग मात्र सुकत चालली आहे. त्याला पाणी, सावली देऊन सुद्धा त्याची भरभराट होत नाहीये. अनिलांच्या बहुतेक कवितांप्रमाणे हि कविता सुद्धा मानवी आयुष्याचे एक रुपक आहे. सगळं काही आहे. धन, संपत्ती, आरोग्य पण तरीही समाधान नाही. कारण ज्याच्या / जिच्यासाठी हे सगळे हवे आहे ती प्रेमाची व्यक्तीच जवळ नाहीये. ती कुठेतरी दूर निघून गेलेली आहे।

अशि कुठे लागली आग, जळति जसे वारे                                                                                                     कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

 

हि अवस्था मोठी नाजुक असते, अगदी केळीच्या रोपासारखी. केळीचे रोप इतके नाजूक असते की आजुबाजुच्या आसमंतात दुरवर जरी कुठे आग लागली, वणवा भडकला तरी त्याचा केळीच्या रोपावर परिणाम जाणवतो. तसेच मानवी मनाचेही आहे. तुम्ही कितीही सुखात असाल, संपत्ती आणि आरोग्याने युक्त असाल तरी दुर गेलेल्या व्यक्तीची साधी आठवणसुद्धा सगळ्या आनंदावर पाणी फिरवायला पुरेशी ठरते. क्षणात सगळा आनंद नाहीसा होवून जातो, मनोवृत्ती बदलून जातात. हि कविता अनिलांनी नक्की कधी लिहीली असावी तो कालखंड माहीत नाहीये. पण बहुदा कुसुमावतीबाई गेल्यानंतरची असावी. १७ नोव्हेंबर १९६१ साली त्यांच्या पत्नी आणि जेष्ठ साहित्यिक सौ. कुसुमावती देशपांडे यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतरच कधीतरी बहुदा कवि अनिलांनी ही कविता लिहीली असावी.

विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन आलेले अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे नावाचं हे अतिशय हळव्या मनाचं व्यक्तिमत्व. पुढील शिक्षणासाठी म्हणून ते पुण्यात आले. इथे फर्गुसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. स्वभाव कमालीचा मितभाषी आणि त्यात अगदी लहानश्या खेड्यातून आलेले त्यामुळे सुरुवातीला त्यांना पुण्यातला रहिवास तसेच फर्गुसनच्या वातावरणाशी जुळवून घेणे जडच गेले. कुसुमावतीबाईंशी त्यांची ओळख बहुदा याच कालखंडात झाली असावी. समान स्वभाव आणि हळवे कविमन हा कॉमन पोइंट असल्याने बहुदा ते एकमेकाच्या प्रेमात पडले आणि या नात्याची सुरूवात झाली. १९२९ साली कुसुमावतीबाई लंडन विद्यापिठाची इंग्रजी साहित्यातील पदवी मिळवून परत आल्या आणि त्या दोघांनी लग्न केले. मधला काळ ते एकमेकापासून दूरच होते. कुसुमावती बाई नागपुर, मग लंडन अश्या ठिकाणी शिक्षणानिमित्त लांब होत्या आणि अनिलजी पुण्यात. पण प्रेम वाढतच राहिले. अनिल वृत्तीने कवि होते तर कुसुमावती लेखिका. दोघेही साहित्यावर जिवापाड प्रेम करत राहिले.  १९६१ मध्ये कुसुमावतीबाई   अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. सगळे काही व्यवस्थीत चालू असताना अचानक १७ नोव्हेंबर १९६१ ला बाप्पाला त्यांची आठवण झाली आणि तो त्यांना घेवून गेला. त्यानंतर अनिल त्या धक्क्यातच जगत राहिले.

अनिल आणि कुसुमावती यांच्यातले नाते अतिशय विलक्षण होते. लग्नाआधी त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह “कुसुमानिल’ या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांची पहिली भेट २ जुलै १९२१ रोजी झाली आणि अनिल यांनी आपल्या प्रियेला लिहिलेल्या पहिल्या पत्राची तारीख होती- २ जुलै १९२२. आजच्या मोबाईल आणि चॅटिंगच्या जमान्यात प्रेमपत्रे किंवा चिठ्ठी याचे महत्व आजच्या पिढीला कळणार नाही. पण प्रेम भावना किती हळुवारपणे आणि नितळ शैलीत व्यक्त करता येतात याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली

कुसुमावतींचं निधन झालं. परंतु त्यांच्यावर आत्यंतिक जिवापाड प्रेम करणाऱ्या कवी अनिलांच्या मनानं ते स्वीकारलं नव्हतं. कुसुमावतींच्या पार्थिव देहाकडे पाहतानाही त्यांना त्या डोळे मिटून शांत झोपल्या आहेत असंच वाटत होतं. घरातली माणसं कवी अनिलांना कसं समजवावं या पेचात होती. आपली पत्नी आहे, शांत झोपली आहे, ती बोलत नाहीये, रुसली असावी आपल्यावर, अशी कल्पना करून त्यांना सुचलेली कविता म्हणजे –‘अजुनी रुसुनि आहे, खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना…’ हा प्रसंग फारच हृद्य आणि काळजात कालवाकालव करणारा!

एकदा का जगण्यातील स्वारस्य संपुन गेले की मग सगळ्यात गोष्टीतला रस हळुहळु कमी होत जातो. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. तेव्हा कधी कधी प्रचंड वैफल्य येतं. नैराश्यामध्ये सोडलेला एक उसासा हजार शब्दात सांगता न करता येणारी भावना व्यक्त करतो. ”हिरो” या हिंदी चित्रपटातील लंबी जुदाई हे गाणे ऐकलेय का?

मौत ना आई तेरी याद क्यो आई… हाय…. लंबी जुदाई…

या ओळीमधला “हाय” एखादाच सेकंद रेंगाळतो पण त्यात तो आपलं काम अगदी चोख बजावतो. सारंगीच्या ताणलेल्या तारांवरती गज फिरवून आर्त आवाज निघावा तशी रेश्मा गातच असते. “बाग उजड गये……” लगेचच सूर बदलून हेच शब्द हताशपणे आळवले जातात…

बाग उजड गये खिलने से पहले….पंछी बिछड गये मिलने से पहले…

तसेच काहीसे या गाण्याचेही आहे. फक्त इथे कधीकाळी प्रेमाने, प्रियाने मिलनाने बहरून आलेला केळीचा बाग आता सुकत चालला आहे. आता फक्त विरहवेदना. आपल्यापासून दूर असलेल्या-गेलेल्या माणसाच्या आठवणीत आळवलेली. ही गाणी ऐकताना खूप आत खोल खोल दडपलेलं दुःख पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर येतं. परंतु ते दुःख नसतंच, कारण दुःख कुरवाळण्यातही एक सुख असतंच. आपण त्यानिमित्ताने ते क्षण पुन्हा पुन्हा जगत असतो. अजुनी रुसून आहे,… खुलता कळी खुले ना…, ‘बैस जवळि ये, बघ ही पश्चिमकोमल रंगी फुलली अनुपम’, ‘केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी’, ‘ कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ? रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा…सांगाल का त्या कोकिळा अशी अनेक एकाहुन एक उत्तर गीते कवि अनिलांनी दिलेली आहेत.

हे गाणे  यशवंत देवांनी उषा मंगेशकर यांच्याकडून गावून घेतले आहे. सुविख्यात गायिका उषा मंगेशकर यांचा सुमधुर, सुरेल आवाज या गीतातील आशयाला पूर्ण न्याय देणारा आहे. हा आवाज आपल्याला गीताच्या भावनेत सहज नेतो. त्यामुळे ती भावना हे गीत ऐकणाऱ्या प्रत्येकाची होते. हेच तर भावगीताचे शक्तिस्थान आहे. उषाताईंच्या आवाजात एक सुरेल अशी धार आहे. या आवाजाची क्षमता व ताकद यशवंत देवांनी नेमकी हेरली आणि एक अप्रतिम गीत जन्माला आले. या गीतात उषाताईंनी केलेला प्रत्येक शब्दाचा उच्चार इतका भावपूर्ण आहे, की त्यासाठी हे गीत पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. प्रत्येक शब्दातील भावना स्वरामध्ये उत्तम उतरली आहे आणि हे भान पूर्ण गायनभर सांभाळले आहे. या गीतातील चालीतले बारकावे व उच्चार याचे श्रेय त्या यशवंत देवांना देतात.

या लेखाच्या निमित्ताने त्या गाण्याची आठवण जागवत त्या महान कविश्रेष्ठाला माझा मानाचा मुजरा.

माहिती संदर्भ : आंतरजालावर उपलब्ध साहित्य, तसेच श्री. समीर गायकवाड, सोलापूर यांचा फेसबुकवरील एक लेख यातून साभार.

Sanchar VK 8-4-2018

धन्यवाद.

विशाल विजय कुलकर्णी, पनवेल . भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९

 
 
%d bloggers like this: