RSS

Category Archives: व्यक्तीचित्रणपर लेख

सर, तूम्ही परत या….

ये पावसा!

जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा
अश्रूंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबाथेंबातये पावसा!

धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतूनी
जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा!

सभोती पहा रूक्ष ओसाड राने, नदीपात्र झाले रिते-कोरडे
निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊन ये पावसा!

दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकूळ झाली गुरे-वासरे
त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा!

अता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके
घरा अंगणा जीवना शांतवाया तू देवतारूप ये पावसा!

तुला आण आहे तॄणांची,फुलांची,सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची
कवितेतूनी माझिया भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा!

काही दिवसांपूर्वी जेव्हा वरुणराजाने अचानक हजेरी लावली तेव्हा सरांची ही कविता आठवणे अगदी साहजिकच होते. प्रत्यक्ष सरांच्या मुखातून, त्यांच्या समोर बसून ऐकलेली ही कविता. खरेतर ही कविता सरांकडून ऐकताना तीचे शब्द ऐकण्याची गरजच पडली नव्हती. त्या विलक्षण प्रेमळ आणि कनवाळू माणसाच्या चेहयावर या कवितेचा सगळा भाव जणू दृष्यमान झाला होता. आज सरांच्या पश्चात हा लेख लिहीताना असं वाटतय की सर अजुनही कुठेतरी आसपासच असतील. अगदी उद्या जरी त्यांच्या घरी गेलो तरी नेहमीप्रमाणे, मनापासून ’या देवा’ अशी हृदयापासून हाक मारून स्वागत करतील.

कविवर्य कै. दत्ता हलसगीकर सर

कविवर्य कै. दत्ता हलसगीकर सर

कविवर्य कै. दत्ता हलसगीकर यांच्या ’चाहूल वसंताची’ या काव्यसंग्रहामधली ही कविता. सोलापूरी असण्याचे मला जे काही फ़ायदे मिळाले आहेत त्यापैकी एक अतिशय महत्वाचा लाभ म्हणजे सरांचा आशिर्वाद. यात माझे दोन शिक्षक येतात. एक म्हणजे ज्या तंत्रनिकेतनातून माझे शिक्षण झाले त्या एस.ई,एस. तंत्रनिकेतनाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. जीवन औरंगाबादकर सर आणि दुसरे म्हणजे कविवर्य दत्ता हलसगीकर. खरेतर हलसगीकर सरांची ओळख औरंगाबादकर सरांमुळेच झाली. प्रथमवर्षाला असताना आम्ही काही मित्रांनी मिळून कॉलेजचे पहीले हस्तलिखीत काढले ‘ज्ञानदीप’ या नावाने. त्यात माझी एक कथा आणि एक कविता दिली होती मी. ती कविता वाचून औरंगाबादकर सरांनी मला हलसगीकरांकडे पाठवले. त्यावेळी खरे तर प्रचंड दडपण होते मनावर. कारण मी लिहीत असे, पण त्यावेळी माझी कविता अगदीच बाल्यावस्थेत होती. त्याउलट हलसगीकर सरांचे नाव खुप मोठे होते. त्यामुळे पहिल्या भेटीत मी प्रचंड घाबरलेलो होतो. पण सोलापूरातील, सिद्धेश्वर नगरातल्या त्यांच्या घराची बेल वाजवली आणि आता कोण आपण? काय काम आहे? अशा प्रश्नांची अपेक्षा असताना अचानक समोरुन सरांच्या खळखळत्या, स्नेहाने-मायेने ओतप्रोत भरलेल्या शब्दात ‘या ss देवा’ म्हणून साद ऐकली आणि सगळं भय, सगळं दडपण दूर झालं. त्या दिवसापासून सरांशी ऋणानुबंध जुळले ते आजतागायत कायम आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली कविता. कविता कशी जगायची? याचा अनुभव, सगळंच कसं अगदी विलक्षण होतं.

आमचं सोलापूर पहिल्यापासूनच अतिशय समृद्ध अश्या साहित्यिक वारशाचे जडजवाहीर अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवत आलेलं आहे. त्यातही काव्याच्या बाबतीत सोलापूरचं भूषण म्हणजे कविवर्य संजीव, कविवर्य रा. ना. पवार आणि कविवर्य दत्ता हलसगीकर ही विलक्षण कवित्रयी! या तीन कवींमुळे स्वातंत्र्योत्तर कवितेच्या प्रांतात सोलापूरचा नावलौकिक वाढला होता. पण कवी संजीव किंवा रा. ना. पवार हे फारसे कुणात मिसळत नसत. आपल्याच कवितेच्या विश्‍वात ते रममाण होत असत. हलसगीकर सर मात्र विलक्षण माणुसवेडे कवि. माझ्यासारख्या कित्येक नवकविंचे आधारस्तंभ! कुणाही नवीन कवीला कवितेच्या रस्त्यावरचे खाचखळगे दाखवून त्याची वाटचाल सुलभ करुन देणे हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. माझ्यासारख्या कित्येकांच्या कवितेला वळण लावण्याचे काम त्यांनी केले. खरं तर चार-पाच पिढ्यांतील कवींच्या कवितांवर त्यांनी संस्कार केले म्हणायला हरकत नाही.

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत

त्यांची ही कविता जणु त्यांनी स्वत:च्या स्वभावात भिनवून घेतली होती. तसं पाहायला केलं तर त्यांनी कधीच कुणाच्याच कवितेत कसलेही फारसे फेरफार केले नाहीत. परंतु ही कविता कशी फुलवायची ? कवितेची बिकट वाट वहिवाट कशी बनवायची हे त्यांनी शिकवले. सरांची भेट होइपर्यंत माझी कविता, केवळ सुचतय म्हणून खरडायचं एवढीच होती. पण सरांनी कवितेकडे गांभिर्याने बघायला शिकवलं. तिच्या अंतरंगात शिरायचं कसं हे दाखवून दिलं. त्यांचं, इतके श्रेष्ठ आणि जेष्ठ कवि असणं त्यांच्या आणि माझ्यासारख्या नवोदितांच्या नात्याआड कधीच आलं नाही. पोटच्या लेकराला समजवावं तसं ते आम्हाला शिकवत राहीले. त्यांच्या त्या वृत्तीला साजेश्या त्यांच्या ‘उंची’ या कवितेत त्यांनीच म्हटलं आहे.

आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे

सरांचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची कविता अगदी साधी असे. कसलाही अभिनिवेश न बाळगणारी. अगदी सर्वसामान्यांना कळतील, पोचतील असे बोलीभाषेतील साधे सरळ पण थेट हृदयापर्यंत पोचणारे शब्द. एखादी निसर्ग कविता असो, किवा समाजाच्या वाईट रुढींवर प्रहार करणारे टीका काव्य असो सरांची कविता कधीच बोचली नाही. त्यांना कवितेतुन जे म्हणायचे असे ते अगदी तिसरी चौथी पास असणार्‍या माणसापर्यंतही सहज पोहोचत असे ही त्यांच्या लिखाणाची खासियत. कुठल्याही उपमा नाहीत, प्रतिमा नाहीत, कसलेही शब्दांचे अवडंबर नाही. महत्त्वाचे म्हणजे हा साधेपण केवळ त्यांच्या कवितेतच नाही तर आयुष्यात सुद्धा तितकाच भिनलेला होता. त्यांच्या घराचे दार येणार्‍या प्रत्येकासाठी कायम उघडे असे.

असीमासी जवळीकता
सीमा गेल्या विरघळून
मिळे समुद्राला थेंब
थेंब गेला समुद्रून

किती साधे परंतू परिणामकारक शब्द ! सरांनी अनेक प्रकारचे लेखन केले. निसर्ग, सामाजिक कवितांबरोबरच बाल कविताही लिहील्या. झोका, आई, जादूची पेटी, सुटी आली रे सुटी, रंग झेलू गंध झेलू हे त्यांचे बाल कवितांचे संग्रह तसेच पाझर आस्तेचे, तरुणांसाठी दासबोध, बहिणाबार्इंची गाणी, शब्दरूप मी, कवितेतील अमृतघन, मनातले काही, स्वस्तिंकाची पाऊले, उमाळे अंतरिचे, मन करावे समर्थ, परखड तुकाराम असे नानाविध विषयांवरील स्फुट – ललित लेखन. आषाढघन, उन्हातल्या चांदण्यात, सहवास, करुणाघन, कवडसे, चाहूल वसंताची हे काव्यसंग्रह असे विपूल लेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘चाहुल वसंताची’ काव्यसंग्रहाला मराठी साहित्य परिषदेचाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’ ही मिळाला होता. पण सर अशा पुरस्कारांच्या मोहात कधीच अडकून पडले नाहीत. वर दिलेल्या ‘उंची’ या कवितेची तर देशभरातल्या जवळ जवळ २२ भाषातून भाषांतरे झाली आहेत.

सरांच्या ‘चाहूल वसंताची’ या काव्यसंग्रहातील एक कविता त्यांच्याच आवाजात ऐका. http://youtu.be/Ggney47smbs

(छायाचित्र व ध्वनिचित्रफ़ीत आंतरजालावरून साभार)

असा हा माणुसवेडा कवि काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झाला. कोण जाणे तिथेही सरांकडे नवोदितांची रांग लागली असेल आणि सर आपले हात उंचावून येणार्‍या प्रत्येकाला प्रेमाने, मायेने पुकारत असतील..

“या देवा….!”

सर, ते शब्द पुन्हा एकदा तुमच्या तोंडून ऐकायचेत. तूम्ही परत याच……….

विशाल कुलकर्णी


 

एक वादळ भरकटलेलं….

अठरा जानेवारी १९५५ ला कराचीत रक्ताच्या उलट्या होवून तो वारला. गालिब त्याचा आवडता शायर. गालिबची एक ओळ आहे.

“बडे बेआबरु होकर तेरे कुचेसे हम निकले.’

त्याच्यावर लिहीलेल्या सुंदर मृत्युलेखात इस्मत चुगताईंनी कळकळीने सांगितलं होतं……..

“मेरे दामनपरभी खुन के नजर न आनेवाले छीटे है, जो सिर्फ मेरा ही दिल देख सकता है! वही दुनीया जिसने उसे मरने दिया मेरी ही तो दुनीया है! आज उसे मरने दिया और कल मुझे भी मर जानेकी इजाजत होगी और फीर लोग मातम करेंगे!”

सुप्रसिद्ध शायर आणि साहित्यिक फैज अहमद फैज यांनी त्याच्या मृत्युनंतर आपल्या पत्नीला लिहीलेल्या पत्रात त्याच्या कलंदरीला सलाम करताना म्हंटलं होतं…

“हमारे आजके शुराफा (मध्यम वर्गीय) जिन्हे आर्टीस्टके दिलके टुटने का न तो अहसास है न हमदर्दी, वह यही कहेंगे की मंटो मर गया तो उसका अपना कसूर है! बहोत पीता था, लेकिन कोई यह नही सोचेगा की उसने ऐसा  क्यों किया था?”

त्याचं सगळं आयुष्यच बेफाम होतं. सरदार अली जाफरी, फैज अहमद फैज, अब्बास, कृष्णचंदर, सिब्ते हसन रिझवी, सज्जाद जहीर अशी समकालीन साहित्यिक मंडळी मित्र म्हणून लाभली होती. पण हा वेडा त्यांच्यात कधी रमलाच नाही. फैज, जाफरी जेव्हा क्रांतिच्या अपेक्षेने आपल्या शायरीचे, कवितेचे इमले उभारत होते तेव्हा हा शहाणा वर्तमानपत्रातून के.आसिफ आणि सितारादेवीच्या प्रणयाच्या कंड्या पिकवत होता. त्याला वाटे, सधन म्हणता येइल अशा परिस्थितीतून आलेले हे नाजुक तरुण कसली क्रांति घडवणार? यांनी कधी दुर्दैवाचा फेरा पाहीलेला नाही. यांना कधी कष्टाचा स्पर्श नाही. कसली झीज म्हणुन सोसावी लागलेली नाही. हे काय क्रांति करणार? यांना छिन्नी हातोडी कसली असते ते माहीत नाही, हे कसले कामगारांचं आयुष्य बदलणार? हे फार तर कविता करतील, गझला लिहीतील. तथाकथीत जहाल लेख लिहून वर्तमानपत्रांची भर करतील. फार फार क्रांतिच्या ललकार्‍या मारत खादीचे कपडे घालून मिरवतील. त्याला हे सगळं मुळी मंजुरच नव्हतं. त्यालाही हवा होता इंन्किलाब, पण त्यासाठी लेखणीला राबवायची त्याची तयारी नव्हती.
हा वेडा एकदम रोखटोक, सडेतोड…. कविता, गझला कसल्या करता? क्रांति हवी असेल तर झोकुन द्या.

“इक आग का दरीया है और डुब के जाना है…………..”

जोश, जिगर मलिहाबादी, फैज अहमद फैज, बेहजाद लखनवी यांच्यासारखे उमदा शायर त्याला मित्र म्हणून लाभलेले. पण ती खानदानी सोहबत त्याला फार काळ गुंतवून ठेवु शकली नाही. ते मखमली जगणं मंटोने साफ नाकारलं आणि तो आपल्याला हवं तसंच जगला. त्याला दु:ख हवं होतं. त्याच्या शोधात तो जिथे जिथे ते सापडण्याची शक्यता होती तिथे तिथे तमाम उम्र भटकत होता. मग त्यातून दरिद्री, कंगाल झोपडपट्ट्यांपासून ते वेश्यांच्या भयाण गल्ल्यांपर्यंत काहीच चुकलं नव्हतं. गावकुसाबाहेरच्या त्या वस्त्यांमध्ये तो जास्त रमला रादर त्याला जे आयुष्याकडून अपेक्षीत होतं ते तिथेच सापडेल असं त्याला वाटत राहीलं. पुढे कधीतरी त्याचा भ्रमनिरास झाला, पण त्या भ्रमनिरासातुन उत्पन्न होणारं दु:खच तर हवं होतं त्याला. पण त्या काही दिवसांनी त्याला त्याच्या जगण्याचं सार शिकवलं. त्या वेश्यावस्त्यांमधल्या वर्षानुवर्षे सडणार्‍या स्त्रीया, ते दलाल – भडवे, तिथले ते गुंड- मवाली, चोर भामटे, तिथल्या यातना, तिथली दु:खे यांचे ठसे पुढे हयातभर त्याच्या लेखनातुन उमटत राहीले. सर्वसामान्य सोकॉलड पांढरपेशा, व्हाईट कॉलर्ड समाजाच्या तकलादु मुळांवरच घाव घालत राहीले.

आजकाल मंटोबद्दल पुन्हा ऐकायला मिळायला लागलय. परवा गुगलवर नुसतं ‘मंटो’ (Manto) असा सर्च दिला तर पोतंभर लिंक्स मिळाल्या मंटोबद्दल बोलणार्‍या. आश्चर्य वाटलं आणि खरं सांगायचं तर खुप आनंदही झाला मनापासून. मंटोवर खरेतर नियतीने खुप अन्याय केलाय, नियतीच का त्याने स्वतःही स्वतःवर फक्त अन्यायच केला. सुखाला ठोकर मारताना, दु:ख आपलंसं करताना, आपण स्वतःपासुनच दुर जातोय हे त्या वेड्याला कधी कळलंच नाही. अर्थात कळलं असतं तरी त्याने फारसा काही फरक पडला नसताच म्हणा. मंटोच्या निधनाची बातमी ऐकल्यावर त्याचा जुना, जवळचा मित्र तत्कालिन सिनेस्टार शाम म्हणाला होता….

“ऐसा कहाँसे लाऊ, तुझ-सा कहूं जिसे?”

शाम बरोबरच होता. मंटोसारखा दुसरा कुणी असुच शकत नाही. मंटोसारखा केवळ मंटोच असु शकतो, होवू शकतो.

‘बु’, ‘खोल दो, ‘थंडा गोश्त‘ आणि त्याची प्रचंड गाजलेली कथा ‘तोबा टेकसिंग‘ अशा अनेक कथांमधुन जगावेगळी, सर्व सामान्यांबरोबर, बहिष्कृतांच्याही दु:खांना वाचा फोडणारी वेदना चव्हाट्यावर मांडणारा मंटो…….”सआदत हसन मंटो….!

सआदत हसन मंटो

त्याचं सग़ळं आयुष्यच अदभुत होतं. मुळात मंटो लिहायला लागला ते दिवसच भारलेले होते. गांधींच्या सत्याग्रहाने जोर धरायला सुरुवात केली होती. बंगालमध्ये क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. क्रांतिने सगळ्यांनाच वेड लावले होते. प्रत्येक सभा, प्रत्येक मिरवणुक लोकांसाठी पर्वणी ठरु लागली होती. कायदेभंग करुन ब्रिटीशांच्या लाठ्या खाण्यात लोकांना एक नशा चढायचे ते दिवस होते. तशात सायमन कमिशनचा वाद उफाळून आला. वयोवृद्ध नेते लाला लाजपतराय यांचा अंत याच आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीमुळे झाला. सगळीच तरुण मने भडकली होती. कृष्नचंदर, अमृतलाल नागर यांनी आपापल्या पद्धतीने कवितेच्या, लिखाणाच्या माध्यमातुन आतली धग बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच सुमारास मंटोने आपली पहिलीवहीली कथा लिहीली, जालियनवालाबागेच्या पार्श्वभुमीवर ! अमृतसरच्या ‘खल्क’ या दैनिकात त्याची ही कथा छापुन आली ‘तमाशा’ या नावाने, मंटोच्या नावाशिवाय. कथा कुणी लिहीली असावी याबद्दल अनेक तर्क मांडले गेले…मंटो मात्र ठरवून अज्ञातच राहीला, हे त्याच्या विक्षिप्तपणाला साजेसंच होतं. मंटो म्हणे, तो चुकुन कथालेखक झाला, त्याच्या मते मुळात तो एक ‘अफसाना निगार’ , कथा सांगणारा (Story Teller) होता. जेव्हा ‘तमाशा’ छापुन आली तेव्हा तर त्याची याबद्दल खात्रीच पटली…., आयुष्यभर तो दु:खाच्याच कथा सांगत राहीला. अफसाना-ए-दर्द बयाँ करना उसका जुनून सा बन गया था.! त्यानंतर मंटोने अनेक कथा लिहील्या, अनेक अफसाने बयाँ केले… त्याच्यामते त्याचे कथा लिहीणे हा एक अपघात असायचा. या ओढवून घेतलेल्या अपघाताने त्याच्यावर वारंवार रक्तबंबाळ व्हायची पाळी आली. पण त्याने ते प्राक्तन म्हणुनच स्विकारले होते.

मंटोच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल फारशी काही माहिती मिळत नाही. ११ मे १९१२ साली पंजाबमधील (सद्ध्याचा पाकिस्तानमधील पंजाब) समराळा या गावी मंटोचा जन्म झाला. त्याचे वडील अकालीच गेले. अभ्यासात तो फारसा हुशार वगैरे नव्हता. ही आणि अशी काही मोजकीच माहिती त्याच्या त्या काळाबद्दल मिळते. पण त्याचे वडीलांशी कधीच जमले नाही. तो मातृभक्त होता. त्याच्या आईने आयुष्यभर दु:खच भोगले, तो याबद्दल आपल्या वडीलांना कारणीभुत मानत असे. कदाचित यामुळेच जगातील सर्व पतित, बहिष्कृत स्त्रीयांचे दु:ख त्याने आपले मानले आणि ते जगासमोर मांडले. सुप्रसिद्ध शायर आणि साहित्यिक फैज आणि मंटो यांच्या वयात फक्त वर्षभराचं अंतर होतं, पण फैज पदवीधर होवून अमृतसरला एम.ए,ओ. कॉलेजात इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून रुजु झाला तेव्हा मंटो एंट्रन्सच्या परीक्षेला दुसर्‍यांदा नापास झाला होता. विशेष म्हणजे साहेबांची विकेट गेली ती सुद्धा उर्दु विषयामध्ये, हे मंटोला जास्त बोचलं असावं कदाचित. कारण हे म्हणजे ‘गालिब’ला गझलेतलं काही कळत नाही असं म्हटल्यासारखं होतं. बरं आपल्यात काही कमी आहे, असेल हे मान्य करायची तयारी नाही. नम्रता, अदब , तहजिब कशाशी काही देणेघेणे नाही. उद्धटपणा, फटकळपणा रक्तात मुरलेला. आयुष्यालाच ठोकर मारण्याची गुर्मी अंगात होती. त्यामुळे कुणाशी नीट बोलणे माहित नव्हते.  खरेतर सुरुवातीला काही काळ मंटो डाव्या चळवळीशी जोडला गेला होता. अली सरदार जाफरींसारख्या माणसाला ‘सादत हसन मंटो’ नामक या फाटक्या कलंदराने एक काळ वेड लावले होते.  पण तिथेही त्याचं जमलं नाहीच. चळवळीत राहायचं म्हणजे तडजोडीची तयारी असावी लागते. एक तुझं एक माझं करत एकमेकांना सांभाळुन घेत पुढे जावं लागतं. पण मंटोला ते कधीच जमलं नाही. त्यांचं फाटकं तोंड, तिरसट, तुसडेपणा, जाता येता दुसर्‍याची टर उडवण्याची सवय, त्यामुळे लवकरच जवळची म्हणणारी माणसेसुद्धा त्याला टाळायला लागली. ‘नंगे से खुदा भी डरता है’…… याच्या तोंडी लागणे लोक टाळायला लागले. कधीही फटकन अपमान करेल हा माणुस, म्हणून लोक घाबरुन असत आणि मंटोला नेमका याचाच अभिमान वाटायला लागला. पण त्यामुळे मंटोचा एकटेपणा अजुन वाढत गेला, त्यामुळे त्याबरोबरच आपल्याला लोक टाळतात ही न्युनत्वाची भावना मनात घर करायला लागली, तसा त्याचबरोबर अहंकार आणि उर्मटपणा हे अंगभुत गुणदेखील आकार घेवु लागले. मग कधी हे न्युन लपवण्यासाठी तर कधी अहंकार मिरवण्यासाठी स्वतःला मर्द सिद्ध करण्याची एक केविलवाणी धडपड सुरु झाली. संभावितांच्या जगात त्याला प्रवेश नाकारला गेला होता, त्यामुळे त्याने आपले पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी अमृतसरच्या बाजाराची निवड केली. याच बाजाराने त्याला, त्याला हव्या असलेल्या दु:खाची ओळख करुन दिली. मंटोमधल्या ‘अफसाना निगार’चा तो खर्‍या अर्थाने नवा जन्म ठरला. सुरुवातीला एक ‘नर’ म्हणुन गणिकांच्या माड्या चढणारा ‘मंटो’ नंतर तिथे एक कलावंत म्हणुन जाऊ लागला, कलावंत म्हणुन ओळखला गेला.

अलिगड विद्यापिठाच्या कॅम्पसमधुन त्याला तडकाफडकी काढुन टाकण्यात आलं. अर्थात मंटोला क्षयरोग आहे, इतरांना ते धोकादायक ठरु शकतं हे कारण पुढे करण्यात आलं. पण खरी बाब होती ती त्याची राजकारणाबद्दलची बेफिकीर आणि स्फोटक मते. आणि ती उघडपणे मांडण्याची त्याची वृत्ती. एका ठिकाणी तो म्हणतो,

” लीडरों और दवाफरोशों (औषधाचे व्यापारी) को मैं एक ही जुमरेमें शामिल करता हुं. लीडरी हो या दवाफरोशी दोनो पेशे है! और अगर सियासतसे मुझे कोइ दिलचस्पी है तो सिर्फ उतनी जितनी की महात्मा गांधीजीको सिनेमासे होगी. वह सिनेमा नही देखते और मै अखबार नही पढता….!”
पुढे तो स्वतःच म्हणतो….
“असलमें हम दोनो गलती करते है! उन्हे फिल्म जरुर देखनी चाहिये और मुझे अखबार जरुर पढना चाहिये.”

तो असाच विक्षिप्तच होता. खरेतर साधा सरळ, व्यवस्थित, सारासार विवेक बाळगुन विचार करणे हेच मुळी त्याला मुर्खपणाचे वाटे. त्यामुळे त्याला सभ्य समजले जाईल, त्याच्यावर सज्जनपणाचा ठपका लागेल याची त्याला भीती वाटे. त्यामुळे तो कायम त्यापासुन दुरच पळत राहीला. पण मंटोला अलिगढ विद्यापिठाच्या कॅम्पसमधुन काढून टाकण्याच्या निर्णयाने त्याच्या या मस्तवाल वृत्तीला नवं बळ दिलं. त्याने स्वतःलाच वचन दिलं…’आता स्वतःला आवडेल तसंच जगायचं, हवी ती मनमानी करायची, जे स्वतःला आवडेल, रुचेल ते भरभरुन लिहायचं आणि आपल्या मनाच्या असंख्य जखमांमधुन वाहणार्‍या रक्ताची शाई करुन मंटो लिहीत राहिला…., लिहीत राहिला. १९३५ चं साल होतं….. अलिगढ सोडून ‘मंटो’ची पावलं मायानगरी मुंबईकडे वळली. अर्थात त्याआधी त्याने बरेच उपद्व्याप करुन बघीतले होते. आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला , पण ऐनवेळी हिंमतीने दगा दिला. खरेतर झोपेच्या गोळ्या खाऊन मरणे सोपे होते, पण गेल्या पाच सहा वर्षात दारु पिऊन्-पिऊन शरीरत ऑलरेडी एवढं विष भिनलं होतं की झोपेच्या गोळ्यांचा काही असर होइल याची त्यालाच खात्री वाटली नाही. अशातच १९३५ च्या दरम्यान त्याला मुंबईतील एक स्नेही मिस्टर नजीर यांच्याकडुन एक ऑफर आली. नजीर यांचं एक उर्दु साप्ताहिक होतं “मुसव्विर” या नावाचं. तर नजीरने ‘मुसव्विर’चा संपादक म्हणुन काम करण्यासाठी मंटोला मुंबईला बोलावून घेतलं. हि मंटोच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. कारण ‘मुसव्विर’ म्हणजे ‘मायापुरी’चाच जुना अवतार वाटावा असे साप्ताहिक होते. सिनेकलावंतांची प्रेमप्रकरणे, त्यांची लफडी, याबद्दलच्या अफवा-कंड्या पिकवणार्‍या बातम्या, किस्से यांना वाहिलेलं हे साप्ताहिक होतं. यात मंटोचे दोन कॉलम असत. एक ‘नित-नयी’ आणि दुसरा ‘बाल की खाल’……

‘बाल की खाल’ नावाप्रमाणेच जहाल आणि जहरी होतं. यातून मंटोने तत्कालिन अनेक प्रतिष्ठीतांचे बुरखे फाडण्याचं काम मनापासुन केलं. अनेकांची इभ्रतीचे धिंडवडे काढले. त्यामुळे फिल्मजगतातली सगळी दिग्गज मंडळी मंटोची शत्रु बनायला लागली. यात के. आसिफ – सितारादेवीपासुन कारदारपर्यंत कुणालाच मंटोने सोडले नव्हते. मंटोने आपल्या या दिवसात काही निवडक सिनेकलावंतांवर काही अप्रतिम लेख लिहीले आहेत. पुढे त्या लेखांचे ‘मीना बाजार’ या नावाने एक संकलित पुस्तक करण्यात आले. सितारादेवीवर त्याचा विशेष डोळा होता. जेवढी टीका त्याने सितारावर केली तेवढी कुणावरच केली नसेल. पण खरं सांगायचं तर कदाचित ‘मंटो’ सितारादेवीवर प्रचंड खुश असावा. कारण तीही त्याच्यासारखीच होती बंडखोर, प्रमाथी आपल्याच मनाप्रमाणे वागणारी. जगाला फाट्यावर मारणारी….. यादरम्यान सिनेसृष्टीतच त्याला काही जिवाभावाचे मित्रही मिळाले जे मंटोच्या प्रतीभेवर खरोखर फिदा होते. नजीर, शाहिद लतीफ, सिनेस्टार शाम, अशोककुमार, राजा मेहंदी अलीखाँ, शौकत हुसैन रिझवी, एस. मुखर्जी अगदी के.आसिफसुद्धा, ही त्यातलीच काही मोजकी नावे. आयुष्याशी झगडा आणि वेदनांशी चुम्मा चाटी चालुच होती. याच दरम्यान मंटोने चित्रपटांसाठीही काही कथा लिहील्या पण ते चित्रपट दणकुन आपटले. त्याच दिवसात कुठल्यातरी एका बेसावध क्षणी त्याने लग्नासाठी होकार दिला आणि त्याच्या आईने त्याचे लग्न एका खानदानी मुलीशी ‘सफिनाशी’ लावुन दिलं. त्या दरम्यान त्याने अनेक ठिकाणी कामे केली. काही सिने कंपन्यातुन कथा लेखक म्हणुन, पटकथा लेखक म्हणुन. कधी ४० रुपया महिना तर १०० रुपये…. पण नशिब काही साथ द्यायला तयार नव्हतं.

पण तरीही मंटो मुंबईत रमला. थोडी थोडकी नव्हे तर चांगली आठ वर्षे तो मुंबईच्या सिनेसृष्टीत रमला. ही रंगीबेरंगी पण भ्रामक दुनिया त्याला आपलिशी वाटली. इथलं सगळं क्षणभंगुर ! इथळ यशापयश, इथले झगडे, इथलं प्रेम, इथली भांडणं सगळंच तात्पुरतं. घडी घडीला बदलणारं. इथला प्रत्येक जण शापित होता. आयुष्य गहाण ठेवून नशिबाशी लपंडाव खेळणारा. तिन तासाचा खेळ झकास रंगवणारा. खेळ संपला की पुन्हा आपल्याच दु:खाशी झुंजत जगणारा. मंटो तरी कुठे वेगळा होता? त्यालाही हेच तर हवं होतं. पण त्याच्या दु:खांवर कोणी बोट ठेवलेलं मात्र त्याला खपत नसे. मनात आलं ते तो करत राहीला.

याच दरम्यान त्याची ओळख ‘इस्मतआपाशी’ झाली. इस्मत चुगताईंनी मंटोला भाऊच मानलं होतं. याच काळात मंटोला लेखक म्हणुनही प्रचंड नाव मिळालं. त्याने विपुल कथालेखन केलं ते याच दिवसात. पण त्याच्या लिखाणात ‘त्या’ दिवसांची छाप ठळकपणे उमटलेली असे. त्याच्या बिनधास्त लेखनावर अश्लिलपणाचे आरोपही होत. फिल्मिस्तान, बाँबे टॉकीज अशा चित्रपट संस्थासाठीही याच काळात त्याने लेखक म्हणुन काम केलं.पण इथेही त्याला परत अपयशच आलं. या अपयशाने मात्र ‘मंटो’ पोखरला गेला. इमारत अब ढहने लगी थी. सगळे संशय, भ्रम, न्युनगंडाची जुनीच भावना परत उफाळुन वर आली. याच दरम्यान फाळणीचे वारे देशात वाहायला लागले होते. त्याच कश्मकशमध्ये त्याने भारत सोडून पाकिस्तान गाठला. शेवटची सात वर्षे मंटोने पाकिस्तानमध्ये काढली. पण इथेही वाट्याला आली ती घोर विवंचना, मानसिक कुचंबणा…क्लेश ! पाकिस्तानमध्ये तर अश्लिल लिखाणासाठी म्हणून त्याच्यावर खटलेच भरले गेले. ‘थंडा गोश्त’ साठी त्याच्यावर झालेल्या खटल्यात तर त्याची सगळी उमेदच खच्ची झाली. मंटो परत प्यायला लागला. त्याचा जुना, जगाला तुच्छ लेखण्याचा स्वभाव पुन्हा वर यायला लागला. मध्ये काही काळ त्याला वेड्यांच्या इस्पितळातही भरती करंण्यात आले होते. १९५५ मध्ये रक्ताच्या उलट्या होवून मरण पावला.

मंटो मेला…
अतिशय हलाखीची आणि गुमनाम मौत मेला….
पण एक उच्च श्रेणीचा कथाकार म्हणुन त्याची थोरवी निसंदिग्धपणे वादातीत आहे. त्याच्या लिखाणात एक बेचैन सुर आहे जो कायम आपल्याबरोबर येत राहतो. त्याच्या कथेतली माणसे सामान्य आहेत, निरागस आहेत, निदान आपला निरागसपणा जपण्याची धडपड करताना दिसतात. राजकारण, सामाजिक स्थित्यंतरे यांच्या जात्यात ती भरडून निघतात… मंटो स्वतःतरी कुठे वेगळा राहिला होता यापासून?

सुरुवातीच्या काळात त्याने काही अनुवादही केले. यात व्हिक्टर ह्युगोपासुन ऑस्कर वाईल्डपर्यंत अनेकांची वर्णी लागली. या लेखनानेच खरे तर त्याला तत्कालिन डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये एक ओळख मिळवून दिली होती. पण मंटो तिथेही रमला नाही.

मंटोच्या काही गाजलेल्या कथा / कथासंग्रह …

आतिशपारे (Nuggets Of Fire)- १९३६
थंडा गोश्त
मंटो के अफसाने – १९४०
धुंआ – १९४२
अफसाने और ड्रामाये – १९४३
लज्जत ए सांग – १९४८ (The Taste Of Rock)
स्याह हाशिये – १९४८ (Black Borders)
बादशाहत का खातमा -१९५०
खाली बोतलें – १९५०
लाऊड स्पीकर
निमरुद की खुदाई -१९५०
थंडा गोश्त – १९५०
याझिद – १९५१
परदें के पीछे -१९५३
सडक के किनारे – १९५३
बगैर उन्वां कें (Without a Title)-१९५४
बगैर इजाजत – १९५५
बुरके – १९५५
फुंदने – १९५५ (Tassles)
सरकंडो के पीछे – १९५५ (Behind The Reeds)
शैतान – १९५५
शिकारी औरतें – १९५५

त्याच्या काही कथांना त्याच्या मृत्युनंतर प्रसिद्धी मिळाली.
रत्ती, मासा, तोला – १९५६
काली सलवार – १९६१
मंटो की बेहतरीन कहानियां – १९६३
ताहिरा सें ताहिर – १९७१

पुढे पाकिस्तानी सरकारने मंटोच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीटही काढले. पण तोवर मंटो खुप दुर निघून गेला होता.

तो बेबंद, बेफाम आयुष्य जगला म्हणून मोठा कलावंत नाही म्हणत मी त्याला. तर जगण्याच्या त्या धडपडीत, त्या पराभवाच्या चक्रातही तो आपल्या कलेशी प्रामाणिक राहिला. स्वतःसाठी, पोटासाठी, यशासाठी आपल्या कलेला राबवणं त्याने कधीही मंजुर केलं नाही. कलेचं शील त्याने प्राणापेक्षाही जास्त जपलं… म्हणुन मंटो मोठा होतो. त्याच्या लिखाणात विलक्षण मादकता असे, आसक्ती असे याचे कारण त्याच्या जिवनासक्तीत होते. आयुष्य भरपुर जगुन घेण्याची त्याची वृत्ती, जगण्यावर असलेली त्याची प्रचंड वासना त्याच्या कथांमधून डोकावत राहते….

आज परत बुद्धीवाद्यांना, सुशिक्षितांना मंटोच्या साहित्याची भुरळ पडू पाहतेय. मंटो पुन्हा चर्चेत येतोय. त्याच्या कथांचे अनुवाद होताहेत……!

वेलकम बॅक मंटो…, वेलकम बॅक !

विशाल

 
 
%d bloggers like this: