RSS

Category Archives: रसग्रहण – कविता व गाणी

मायबोली तसेच मिसळपाववरील काही सुंदर कवितांचे तसेच जुन्या गाजलेल्या गाण्यांचे तेथील दिग्गज महारथींनी केलेले रसग्रहण.

तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले …

तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले …

१९५१ साल गीता दत्तच्या वैयक्तीक आयुष्यात एक नवं, सुंदर पर्व घेवुन आलं होतं. (ज्याचा अंत एका न संपणार्‍या विरहात होणार होता) ‘बाजी’ या चित्रपटाच्या दरम्यान तिची ओळख गुरुदत्तशी झाली आणि याच चित्रपटातील एका, पुढे प्रचंड गाजलेल्या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळी गुरुदत्त तिच्या प्रेमात पडला. गाणं होतं साहिर लुधियानवीचं…

“तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले.., एक दांव लगा ले”

‘बाजी’ हा चित्रपट खरेतर गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांसाठीसुद्धा एक जुगारच होता. त्या आधी दोघेही आपापल्या आयुष्यात खुप संघर्ष करुन थकले होते. असे म्हणतात की आपल्या संघर्षाच्या काळात या दोन मित्रांनी एकमेकांना वचन दिले होते की त्यांच्यापैकी जो कुणी प्रथम चित्रपट बनवेल , तो दुसर्‍याला आपल्या चित्रपटात संधी देइल. म्हणजे ‘देव’ने चित्रपट केला तर दिग्दर्शक गुरुदत्त असेल आणि गुरुदत्तने चित्रपट केला तर नायक ‘देव’ असेल. संधी ‘देव आनंद’ला मिळाली आणि त्याने आपले वचन पाळले. ‘बाजी’ हा चित्रपट व्यावसायिक यशाच्या पातळीवर देव आणि गुरुदत्त दोघांसाठी देखील एक पहिली आणि शेवटची संधीच होता. पण या संधीचे गुरुदत्तने सोने केले.

तर आज आपण बोलणार आहोत, गीता दत्त आणि गुरुदत्तच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा ठरलेल्या या नितांतसुंदर , कर्णमधुर गाण्याबद्दल. साहिर लुधियानवीच्या  ‘तदबीर से बिगड़ी हुई…… ‘ या गाण्याने लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडले आणि याच गाण्याच्या रेकॉर्डींगदरम्यान गीता रॉय गुरुदत्तच्या आयुष्यात आली आणि पुढे गीता दत्त झाली.

साहिर लुधियानवी हे हिंदी साहित्यसृष्टीला पडलेलं एक अतिशय देखणं स्वप्न आहे. हिंदी चित्रसृष्टीच्या, उर्दू-हिंदी साहित्याच्या क्षेत्रातले एक अतिशय उज्वल आणि महत्वाचे पान आहे. चित्रपटात एका प्रसंगात सर्वस्व गमावून बसलेला, निराश झालेला, आयुष्याप्रती एकदम उदासीन झालेला नायक (देव आनंद) , सदसद्विवेक बुद्धी आणि वास्तव यांच्या अजब संघर्षाच्या गुंत्यात अडकलेला असतो,  नशिबापुढे हार मानून परत निघालेला असतो. तेव्हा गिटारच्या धुंद करणार्‍या साथीत अवखळ नायिका (गीता बाली) त्याच्यातल्या हिंमतीला,  कर्तुत्वाला आव्हान करते. स्वतःवर विश्वास असेल तर अजुन एक संधी घेवून बघायला प्रेरीत करते. इथे रूपक जुगाराचे वापरले आहे. अजुन एकदा पत्ते मांड, घे नशिबाची परीक्षा. पण ‘साहिर’ला इथे निव्वळ जुगाराचा डाव अपेक्षित नाहीये….

माणसाचे आयुष्य तरी क़ाय हो, एक जुगारच आहे की ! जो संधीची वाट पाहात बसला त्याला आयुष्यभर वाटच पाहावी लागते. जे संधी घड़वण्यात विश्वास ठेवतात, उपलब्ध प्रत्येक संधी आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहतात, यश त्यानाच मिळते ही महत्वाची गोष्ट ‘साहिरमियाँ’ इथे अधोरेखित करतात.

तदबीर से बिगड़ी हुई तक़दीर बना ले, तक़दीर बना ले 
अपने पे भरोसा है तो इक दांव लगा ले,
लगा ले दांव लगा ले

भगवंतांनी गीतेत सांगितलेला कर्मयोगच थोडा वेगळ्या स्वरुपात आहे इथे. भगवंत म्हणतात ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ . इथे इनडायरेक्टली तेच सांगायचा प्रयत्न केलाय. पण इथे नुसता फुकाचा अध्यात्मवाद नाहीये. साहिरमियाँ त्याला वास्तविक आयुष्याची जोड़ देतायत.  इथे कर्माबरोबर फलाची अपेक्षाही आहे. नशिबावर विसंबून न राहता काहीतरी शक्कल, काहीतरी युक्ती लढवून नशिबावर मात करण्याचा सल्ला इथे देण्यात आलेला आहे. संधी शोधून मिळत नसते, ती घडवावी लागते. त्यासाठी धोका पत्करायची तयारी असावी लागते. तरच यशश्री माळ घालते.

डरता है ज़माने की निगाहों से भला क्यूँ
निगाहों से भला क्यूँ  – २
इन्साफ़ तेरे साथ है इलज़ाम उठा ले, इलज़ाम उठा ले..

समाज क़ाय, दोन्ही बाजूंनी बोलतो, तो बोलणारच. त्याच्या बोलण्याकड़े दुर्लक्ष कर. समाजाने दोष दिला तरी त्याची फिकीर न करता आपले कर्म करत राहा. आज जरी जग दोष देत असले तरी उद्याची यशस्वी पहाट तुझीच आहे. सत्य तुझ्या बाजुला आहे.

बाजी हा पन्नासच्या दशकातला (१९५१ साली आलेला) चित्रपट. देश नुकताच स्वतंत्र झालेला होता. फाळणीच्या दुष्टचक्रातुन हळूहळू बाहेर येत होता. तत्कालीन मध्यमवर्गीय  युवकांपुढे भविष्य तर होते, पण फारश्या संधी दिसत नव्हत्या. फाळणी, निर्वासितांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती. युवकवर्ग कळत-नकळत  मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकड़े खेचला जात होता. त्यामुळे प्रत्येक फाटक्या माणसाकड़े संशयाच्या नजरेने पाहिले जायचे. हे गाणे अश्या आत्मविश्वास गमवत चाललेल्या युवकांसाठी एक प्रेरणा ठरले नसते तरच नवल.

क्या खाक वो जीना है जो अपने ही लिये हो
अपने ही लिये हो  –
खुद मिटके किसी और को मिटने से बचा ले….

साहिरमियाँ सहजपणे यातून जगण्याचे गमक मांडून जातात. आयुष्य कसं व्यापक असावं. स्वत:पुरतं, आत्मकेंद्रित असू नये. स्वत: पुढे जाताना, आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेवून जाण्याचे स्वप्न, आकांक्षा जो बाळगतो तो खरा विजेता. प्रसंगी एखाद्याला उध्वस्त होण्यापासुन वाचवण्यासाठी स्वतःला उध्वस्त व्हावे लागले तरी चालेल. जो आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य सुद्धा उजळवतो तो खरा यशस्वी माणूस.

शेवटी साहिरमियाँ, एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगून जातात. यश मिळवायचे असेल तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा साधन म्हणून वापर करता यायला हवा. आपल्या उणीवा, आपली कमजोरीसुद्धा आपल्या सामर्थ्यात परावर्तीत करणे ज्याला जमते तोच यशस्वी होतो. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ असे म्हणतात. या अपयशातुन, लागलेल्या ठेचातुन आपल्या चुका ओळखून , त्या सुधारत , त्यानाच आपली ताकद बनवीत जो जगाला सामोरे जातो त्यांच्यासाठी क्षितीजसुद्धा अपूरे पडते.

टूटे हुए पतवार हैं कश्ती के तो हम क्या
हारी हुई बाहों को ही पतवार बना ले, पतवार बना ले…

सचिनदांचे अप्रतिम संगीत हा या गाण्याच्या यशातला सगळ्यात महत्वाचा फैक्टर होता.  या गाण्यात सचिनदांनी सगळी गृहीतकंच बदलून टाकली. साहिरची ही अप्रतिम गझल सचिनदांनी चक्क वेस्टर्न बाजात सादर केली. गझल म्हटली की सितार हवी, पण सचिनादांना एका जुगाराच्या अडडयावर सितार हि कल्पनाच रुचत नव्हती. शेवटी त्यांनी एक वेगळेच, अफाट धाडस केले. या क्लासिक गझलेला जाझच्या ठेक्यात बांधत सितारच्या ऐवजी व्हायोलिनच्या सुरात गुंफले. सचिनदांचा हा प्रयोग भल्याभल्यांच्या माना झुकवून गेला. साहिरच्या शब्दाना सचिनदांनी रत्नखचित शिरपेच चढवला.

या गाण्याने देवसाहेब, गुरुदत्त, गीतादत्त, साहिर अशा बऱ्याच जणांना नवसंजीवनी मिळवून दिली. गीताच्या बाबतीत तर हे गाणे खुप महत्वाचे ठरले. आपल्या नशिबावर आणि गुरुदत्तच्या प्रेमावर विश्वास ठेवून तिने हा डाव खेळला. कुठल्यातरी क्षणी ती देखील गुरुदत्तच्या प्रेमात पडली आणि १९५३ मध्ये तीने गुरुदत्तबरोबर विवाह केला. प्रथमदर्शनी तरी असेच भासले की तिने खेळलेला हा नशिबाचा डाव कमालीचा यशस्वी ठरला. बाजीच्या यशाने गीताला पार्श्वगायिका म्हणून पक्के स्थान मिळवून दिले. बाजीनंतर गुरुदत्तच्या बहुतेक सगळ्या चित्रपटात गीता गायली आणि जिव तोडून गायली. गुरुदत्त आणि गीताने या काळात एकाहुन एक सुंदर अशी अनेक कर्णमधुर गाणी दिली.

सचीनदा एकदा म्हणाले होते, “वो जब गुरुदत्तके लिये गाती है तो गलेसें नही, दिलसें गाती है!”

विशाल कुलकर्णी
०९९६७६६४८१९, पनवेल


 

शून्य गढ़ शहर ….

शून्य गढ शहर ….

‘कुमार गंधर्वांचं गाणं’ असा शब्दप्रयोग ज्या वेळी वापरला जातो, त्या वेळी मला आरती प्रभूंची एक ओळ आठवते. त्यांनी एके ठिकाणी लिहिलं आहे, ‘तो न गातो, ऐकतो तो सूर आपुला आतला.’ कुमार गंधर्व गायला लागला की, असं वाटतं की, हा गातो ते आत चाललेलं गाणं आहे. ते स्वत:च ऐकता ऐकता जे काही सूर बाहेर पडतात, त्यांचं गाणं तयार होतंय. ही वीणा, कुमार जन्माला आला त्या वेळी सुरू झालेली आहे. ही अशा प्रकारची आजतागायत चाललेली अक्षय वीणा आहे. ही मैफल आज चालूच आहे. जसा आपण एखादा पिंजरा उघडावा आणि आतला पक्षी बाहेर पडावा, तसं कुमार आ करतात आणि त्यातून गाणं बाहेर पडतं. ही गाण्यातील नैसर्गिकता आहे, हा सहजोदभव गंगोत्रीसारखा आहे. एखाद्या झऱ्यासारखं आलेलं असं हे गाणं अत्यंत दुर्मीळ, दुष्प्राप्य अशा प्रकारचं आहे.

– पु.ल.देशपांडे

कुमार गंधर्व ! भारतीय शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांच्या, रसिकांच्या हॄदयावर पिढ्यानुपिढ्या अनभिषिक्त साम्राज्य गाजवणारा हा एक खरोखर शापित गंधर्व ! कबीर, रसखान, रहीम यांचे दोहे, निर्गुणी भजने, माळव्याची गाणी, भारताच्या विविध प्रांतातील लोकसंगीत, संतकाव्य अश्या अनेक प्रतलातून लिलया विहार करणारा हा “हंस अकेला!” कुमारजी म्हणजे साक्षात संगीत. अगदी लहानपणी, अकराव्या वर्षी त्यांनी प्रथम गायला सुरुवात केली आणि हा अश्वमेध त्यांच्या या जगातुन एक्झीट घेईपर्यंत चालूच राहिला. कुठल्याही घराण्याची मक्तेदारी न स्वीकारता ते आपल्या पद्धतीने गात राहीले आणि स्वतःची अशी एक शैलीच कुमारजीनी विकसीत केली. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या कारकीर्दीत कुमारजीनी अनेक प्रकार आपल्या शैलीत गायले आहेत. त्यातलेच एक माझे अतिशय आवडते गाणे म्हणजे “शून्य गढ़ शहर, शहर घर बस्ती”.

नवनाथ संप्रदायाचे मुळ सदगुरु गुरु गोरक्षनाथ यांची ही अदभुत रचना. गोरक्षनाथ हे योग आणि अध्यात्म या क्षेत्रातले अधिकारी पुरुष. नवनाथांपैकी मच्छीन्द्रनाथ हे मायेच्या मोहपाशात अडकले. मच्छीन्द्रनाथ हे खरेतर गोरक्षनाथांचे गुरु. पण इथे या समर्थ शिष्यानेच गुरुला मायेच्या मोहपाशातून सोडवण्यासाठी केलेला हा उपदेश आहे. मानवी देह आणि आत्मा यातील संबंध स्पष्ट करताना आत्म्याचे महत्व मच्छीन्द्रनाथाना पटवून त्यांना मोहपाशातून बाहेर काढण्यासाठी गोरक्षनाथ हे अफाट रूपक मांडतात.

गुरु इथे या रचनेत मानवी शरीराला एका नगरीची उपमा देतात. पण शेवटी संतांचे कुठलेही साहित्य घ्या, कुठलीही रचना घ्या, ती रूपकात्मकच असते. इथे सुद्धा नगरीरूपी शरीराचे रूपक वापरून गोरक्षनाथांनी साक्षात ब्रह्मतत्वावर , त्याच्या स्वरूपावर भाष्य केलेले आहे.

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
कौन सूता कौन जागे है
लाल हमरे हम लालान के
तन सोता ब्रह्म जागे है

शरीररूपी तटबंदीमध्ये आत्म्याचा पक्षी वास करून असतो. त्याच्याशिवाय देहाला सार्थकता नाही. पण नुसता आत्मा असून उपयोगी नाही. त्याची जाणीव असणे हेच महत्वाचे. किती जणांना ती जाणीव असते? “कौन सुता कौन जागे है” ज्यांना त्याची जाणीव झाली ते जागृत होतात, कित्येक जण कायम सुप्तावस्थेतच राहतात. त्या आत्मतत्वाची जाणीव होणे अतिशय महत्वाचे. अन्यथा सगळेच शून्य. जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही तोवर सगळे अस्तित्वहीन. ‘लाल’ म्हणजे ईश्वर, ब्रह्मस्वरूप. तो आमचा आहे आणि आम्ही त्याचे अर्थातच आपण दोघे नसून एकच आहोत ही अद्वैताची, समर्पणाची, सायुज्यतेची भावना निर्माण होत नाही तोवर सगळे शून्यच.

जल बिच कमल, कमल बिच कलियाँ
भँवर बास न लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नित देता है

मानवी शरिराचे एकूण दहा दरवाजे. बघा हं, दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, दोन गुह्येंद्रिये आणि एक मुख व एक ब्रह्मरंध्र. ऐहिक आणि भौतिक अवस्थेतील मानवी प्रलोभने, इच्छा, आकांक्षा आणि वासनांची जणुकाही ही दारेच. ब्रह्म जाणलेला योगी या दरवाजांवर आपल्या संयमनाची कड्या-कुलूपे आणि मन नामक प्रभावी अस्त्र हातात घेवून जणुकाही या द्वारांवर सतत पहाराच देत असतो.  माझी एक व्यासंगी मैत्रीण सौ. आरती खोपकर , याबद्दल एक अजुनच खोल विचार मांडते. म्हणजे बघा ना. तिच्याच शब्दात सांगायचे तर…

“म्हटले तर कितीतरी मोह, कितीतरी प्रलोभने, कितीतरी भोग, कितीतरी तत्वे, कितीतरी विचार अन कितीतरी तत्वज्ञानं अन कितीतरी ज्ञानाची द्वारे,  अन अजून कितीतरी अनुभूती….!”

हा तसा समजून घ्यायला अतिशय कठीण, गूढ असा विचार  कुमारजी आपल्या गायकीतून अतिशय सोपा करून टाकतात. मुळातच कुमारजी हे निव्वळ रियाझी गायक नाहीयेत. कुठलीही रचना व्यवस्थित समजून घेवून, त्यातल्या शब्दोच्चारापेक्षा आशयाला, गर्भितार्थाला महत्व देत त्याचे सार विलक्षण प्रभावीपणे आपल्या सुरातून व्यक्त करतात.

तन की कुण्डी मन का सोटा
ज्ञानकी रगड लगाता है
पाञ्च पचीस बसे घट भीतर
उनकू घोट पिलाता है

लौकिकार्थाने बघितले तर मानवी शरीर हे पंचमहाभूते आणि त्यांनी बनलेली पंचवीस तत्त्वे यांपासून बनलेले असते. मांस-मातीपासून बनलेल्या या शरीराला साधनेने, तपस्या करून जागृत करावे लागते. पंचमहाभूतांपासुन अलिप्त राहुन शरीराला ज्ञानाचे, साधनेचे घोट पाजण्याची किमया ज्याला साधली तो योगी होतो.

अगन कुण्डसे तपसी ताप
तपसी तपसा करता है
पाञ्चो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है

ज्ञानप्राप्तीची परमोच्च अवस्था म्हणजे मोक्ष. ब्रह्म ! तिथे पुन्हा एक निर्विकार अवस्था येते. सगळ्या विचार-विकारापासुन मुक्तता देणारी अवस्था. म्हणजे पुन्हा एक शून्य अवस्था. पण हे सोपे, सहजसाध्य नाही, त्यासाठी अखंड तपस्या हवी. अध्यात्माचा परामर्श घेतला तर ही पंचमहाभूते म्हणजे जणुकाही आत्मारूपी योग्याचे शिष्यच असतात. पण खरा योगी या शिष्यापासुन अलिप्त राहतो. निर्विकारपणे तो अलख जपत राहतो. अलख म्हणजे जे सर्वसामान्य डोळ्यांना दिसत नाही पण सृष्टीच्या चराचरामध्ये भरून राहिलेले आहे ते ईश्वरस्वरूपी ब्रह्मतत्त्व. खरा योगी पंचमहाभूतांच्या मोहमायेत न अडकता त्या ब्रह्मस्वरूपात लीन होवून जाण्यात आयुष्याची कृतार्थता मानतो.

एक अप्सरा सामें उभी जी,
दूजी सूरमा हो सारे है
तीसरी रम्भा सेज बिछावे,
परण्या नहीं कुँवारी है

हे रूपक मात्र खरोखर अफाट आहे. यातून प्रत्येकाला आपल्याला हवा तसा अर्थ काढता येईल. या संपुर्ण रचनेचे स्वरूप हे साधक आणि त्याची ज्ञानोपासना यावर केंद्रीत आहे असेही म्हणता येईल. साधकाला सुरुवातीला अविद्यारूपी माया आपल्या मोहजालात अडकवते. गुरु तिला अप्सरा म्हणतात. विद्या प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्या विद्येमुळे त्याला सर्व कळत राहते, पण त्या कळण्यामागचे तत्व, ज्ञानाचा तो अखंड स्रोत म्हणजेच ब्रह्म त्याला अज्ञातच असते म्हणून विद्येलाही गुरु मायेचेच एक स्वरूप मानतात. मायेचे तीसरे रूप म्हणजे तिच्या मोहाने भारलेले मानवी मन. मायारूपी रंभेने जणुकाही बिछाना  सजवावा तसे हे मन आपल्याला हव्या तश्या आभासी विश्वाची निर्मिती करते आणि त्यातच अडकुन बसते. खरा साधक तोच जो या कुठल्यात मोहात न अडकता निःसंगपणे एखाद्या ब्रह्माचाऱ्याप्रमाणे साधनारत राहून ब्रह्मतत्वाची वाट धरतो.

म्हणजे बघा ना, आपला अधिकार नाहीये हे माहीत असूनही सगळे काही मिळवण्याची हाव असो किंवा त्यावर संयमन करून अलिप्त राहण्याची धडपड असो.  सृजनाचा ध्यास आणि त्याच्या हक्काची माया हेही सगळे भोगाचेच एक रुप. गंमत म्हणजे हे सर्व त्या ब्रह्मतत्वाच्या आधीन. एकंदरित काय तर या सर्वाचे उद्दीष्ठ एकच… मोक्ष, आत्मानुभूती. म्हणजे पुन्हा त्या निर्विकारतेकड़े, शून्याकडे चालू लागणे.

परण्या पहिले पुतुर जाया
मात पिता मन भाया है
शरण मच्छिन्दर गोरख बोले
एक अखण्डी ध्याया है

इथे गुरु गोरक्षनाथ पुन्हा मानवी रूपके वापरून ब्रम्हातत्वाचे स्वरूप विशद करतात. प्रकृति आणि पुरुषरुपी या दांपत्याला विवाह न करता प्राप्त झालेले अपत्य म्हणजे कसलीही आकांक्षा न बाळगता साधनारत राहणाऱ्या साधकाच्या रूपाने साकार झालेले अनिर्वचनीय असे ब्रह्मतत्वच असे गोरक्षनाथ सांगतात. हा बालकरूपी साधक त्या प्रकृतिपुरुषरूपी जोडप्याचा अतिशय लाडका आहे कारण त्याच्या या निरपेक्ष साधनेमुळेच त्याच्या समाधीवस्थेतच प्रकृति-पुरुषरूपी मुलतत्वाचे मिलन होते.

आणि म्हणून शेवटी गोरक्षनाथ विनम्रपणे मच्छीन्द्रनाथांना विनवतात की अश्या या साधकाच्या रुपात गोरक्षनाथ सदैव शिष्य म्हणून आपले गुरु मच्छीन्द्रनाथ यांना शरण आलेले आहेत आणि गुरुची कृपा हाच त्यांचा अखंड ध्यास आहे।

इथे पुन्हा मला माझी मैत्रीण आरती खोपकरचे विचार उद्धृत करावेसे वाटतात. मी तिला प्रेमाने, श्रद्धेने माय म्हणतो. माझी माय म्हणते…

” शेवटी हा सगळा आतल्या आतला संवाद, वाद, खल, झगडा… आपला आपल्यालाच सोडवायचा. आपलाच पहारा आपल्यावरच. आपलीच मोहमाया आपणच दूर करायची. आपल्या सुखाच्या मर्यादा ओलांडायच्या आपणच, अगदी पार व्हायचे, आपले आपणच.

ह्या शून्यप्राप्तीचा हा प्रवास, तो ही शून्यच… फक्त त्याची जाणीव होणं, राहणं, सतत ठेवणं हे त्या शून्याचे संपूर्णत्व. ते अंगी येणे म्हणजेच शून्यत्व…

शून्याकडून शून्याकडची वाट मात्र फार फार मोठी….!”

गुरु गोरक्षनाथांची ही अदभुत रचना, कुमारजींच्या दैवी आवाजात ऐकणे म्हणजे जणुकाही त्या निर्विकार, शून्यसम ब्रह्मतत्वाला शरण जाण्यासारखेच आहे.

दै. संचार, सोलापुर – १८ नोव्हेम्बर २०१८

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी, पनवेल
भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९

 
 
%d bloggers like this: