RSS

Category Archives: माहीतीपर लेख

सर्व प्रकारच्या राजकीय, अराजकीय घडामोडी, तसेच तत्कालीन घटनांवर,
सामाजिक, आरोग्य संबंधीत बाबींवर प्रकाशझोत टाकणारे लेख.

“The Debt” च्या निमित्ताने : पुर्वार्ध

सन १९९७, इस्त्रायलमधील तेल अवीव्ह हे शहर. सारा गोल्ड नामक एका लेखिकेच्या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराच्या कार्यक्रमाने चित्रपटाला सुरूवात होते. साराची आई ‘रेचेल सिंगर’ हिच्या पुर्वायुष्यातील एक थरारक मिशनवर हे पुस्तक आधारलेले आहे. थरारक मिशन? तर रेचेल ही एक भुतपूर्व गुप्तहेर आहे, इस्त्रायलच्या कुख्यात की ख्यातनाम ‘मोस्साद’ची. ‘सर्जन ऑफ बिर्कनौ’ या नावाने कुख्यात असलेल्या एका नाझी डॉक्टरचे पुर्व बर्लिनमधून अपहरण करून त्याला इस्त्रायलमध्ये आणायचे आणि योग्य त्या शिक्षेसाठी त्याला न्यायासनासमोर उभे करायचे ही कामगिरी मोस्सादच्या इतर दोन गुप्तहेरांसोबत मिळुन रेचेलला पार पाडायची असते. खरेतर त्याला तिथेच बर्लिनमध्येच संपवता आले असते की पण ही मोस्सादची पद्धत नव्हेच. त्याला न्यायासनासमोर उभे करुन, त्याच्या पापांचा सर्व पाढा वाचून मगच त्याला देहदंड द्यायचा ही मोस्सादची पद्धत. म्हणजे देहदंड पक्का पण…..

तर या डॉक्टरचे नाव (चित्रपटातील) आहे डिटर वोगेल. साराच्या पुस्तकाच्या पुरस्कारप्रदान कार्यक्रमात रेचेलला पुस्तकातील एक प्रकरण वाचून दाखवण्याची विनंती केली जाते.

Helen Mirren as Rachel Singer (Old)

Helen Mirren as Rachel Singer (Old)

ते प्रकरण,  ज्यात या गुप्तहेरांच्या ताब्यातील तो कृरकर्मा एकट्या रेचेलला बघून तिच्यावर हल्ला करतो आणि पळून जायचा प्रयत्न करतो. या झटापटीत रेचेलला तिच्या चेहर्‍यावर आयुष्यभर साथ देइल अशी एक निशाणी मिळते. तशा जखमी अवस्थेतही रेचेल पळुन जाणार्‍या वोगेलला पाठीमागून एक गोळी घालून संपवते. बस्स संपली कथा !

नाही हो, संपते कसली, इथेच तर कथेला खरी सुरूवात होते. आपल्या लेकीच्या पुस्तकातील ते प्रकरण वाचता वाचता रेचेल अलगद भुतकाळात, त्या काळात जाऊन पोहोचते आणि दिग्दर्शक एक विलक्षण गुंतागुंतीच्या खेळाला सुरूवात करतो. तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? नेहमीचच तर आहे सगळं. पण सगळं दिसतं तसं नसतं हो….. मुळात त्या डॉक्टरने…, हो चक्क बर्लिनमध्ये सद्ध्या वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणारा डॉक्टर म्हणून सुविख्यात असलेल्या डॉक्टरने असे काय केलेय की त्याची गरज थेट मोस्सादला पडावी?

कट टू भुत़काळ….

साल १९६५, पुर्व बर्लिनमधला एक दिवस. रेचेल पुर्व बर्लीनमध्ये येवुन दाखल होते. इथे तिला अजुन दोन मोस्सादचे गुप्तहेर डेव्हिड पेरेट्ज आणि स्टिफन गोल्ड यांच्याबरोबर एका मोठ्या कामगिरीला यशस्वी करायचेय. आधीपासुनच बर्लिनमध्ये खोटे व्यक्तिमत्व (डु. आयडी ?) धारण करून वास्तव्यास असलेल्या डेव्हिड पेरेट्जची पत्नी म्हणून ती दाखल होते. मुल होत नसल्यामुळे तिला त्यावरील इलाजासाठी बर्लिनच्या विख्यात डॉक्टरकडून उपचार करुन घ्यायचेत. डेव्हिड तिला आपल्या मुक्कामी घेवुन येतो, जिथे तिची ओळख स्टिफनशी होते.

Rachel (तरुण)(Jessica Chastain) with David Peretz (Sam Worthington)

Rachel (तरुण)(Jessica Chastain) with David Peretz (Sam Worthington)

Rachel with Stefan Gold (Marton Csokas)

Rachel with Stefan Gold (Marton Csokas)

इथे स्टिफन तिला डॉक्टर वोगेलबद्दल सांगतो, त्याच्या प्रयोगाच्या काही फोटोंचे अल्बम बघायला देतो.व्होगेलने नाझी छळछावणीतील कैद्यांवर विशेषत: लहान मुलांवर केलेल्या अघोरी प्रयोगाचे ते फ़ोटो रेचेल बरोबर आपल्यालाही शहारून टाकतात.

कोण आहे हा डॉ. डिटर वोगेल?

Dieter Vogel (Jesper Christensen)

Dieter Vogel (Jesper Christensen)

डिटर वोगेलच्या काही प्रयोगांचे फ़ोटो…


डॉ. डेटर वोगेल हे त्याचे चित्रपटातील नाव आहे. ते कदाचित आपल्याला नवीन असेल पण त्याचा भुतकाळ त्याला ‘सर्जन ऑफ बिर्कनौ” या नावाने गौरवतो (?) हे नाव ‘सर्जन ऑफ बिर्कनौ ‘ आपल्यापैकी बर्‍याच जणांना ऐकुन माहीत असेल. विकृत आणि अविचारी हिटलरचे शुद्ध रक्ताचे प्रेम आणि अशुद्ध रक्ताबद्दलची म्हणजे यहुदी (ज्यु) आणि जिप्सी लोकांबद्दलची पराकोटीची घृणा, तिरस्कार यांनी भारलेला तो काळ होता. जर्मनी हा पुर्णपणे शुद्ध रक्ताच्या आणि सुदृढ, निरोगी माणसांचा देश असावा या विलक्षण भावनेने व्यापलेल्या हिटलरने त्या पवित्र (?) कारणावर संशोधन करण्यासाठी एका अनुवंशिकतेवर संशोधन करणार्‍या डॉक्टरची निवड केली होती. डॉ. जोसेफ मेंगेल. आपण हिटलरला कृरकर्मा म्हणतो पण हिटलरला कृरकर्मा ठरवताना त्या उपाधीचा खरा अधिकारी डॉ. जोसेफ मेंगेलला मात्र विसरतो. ऑशवित्झच्या छळछावणीत अनुवंशिकतेची लक्षणे आणि त्याचे परिणाम यावर संशोधन करायला म्हणून गेलेल्या जोसेफ मेंगेलची तिथली कारकिर्द प्रचंड रक्तरंजीत अशीच आहे. असो या भागाचा विषय जोसेफ मेंगेल नाही, त्याच्याबद्दल आपण पुढील भागात बोलुच….!

तर पुर्वाश्रमीचा हा कृरकर्मा सद्ध्याच्या बर्लीनमध्ये एक वंध्यत्वावर यशस्वी उपचार करणारा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असतो. पण मोस्सादने आपल्या ज्यु वंशावर झालेल्या अत्याचाराचे, हत्याकांडाचे आरोपी शोधण्याचे काम आजही चालु ठेवलेले आहे. जगभरातुन अशी माणसे शोधून काढून त्यांना त्यांच्या दुष्कृत्याची शिक्षा द्यायची हे काम अव्याहतपणे चालू आहे. त्याच मिशन अंतर्गत रेचेल, डेव्हिड आणि स्टिफन बर्लिनमध्ये हजर असतात. डॉ. वोगेलला चक्क पळवून इजरायला नेवुन न्यायासनासमोर उभे करायचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आलेले असते. त्यानुसार रेचेल डॉक्टरला जावून भेटते. मुलाची आस असलेली एक स्त्री म्हणून त्याचे उपचारही चालु करते. अर्थात वोगेल सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. शेवटी तो तिच्यावर उपचार करायला तयार होतो. त्याचा फायदा घेवून मोस्सादचे हे तिघे एजंट त्याला पळवण्यात यशस्वी होतात. डॉ. वोगेलच्या किडनॅपींगचा हा प्रसंग खरोखर सुंदर चित्रीत झाला आहे. कुठलीही अतिशयोक्ती न करता, नायक्-नायिकेला सुपरमॅन न बनवता केवळ अक्कलहुशारीच्या जोरावर आखलेला हा किडनॅपींगचा प्लान खरोखर आपली दाद घेवुन जातो.

या किडनॅपींगच्या वेळी डॉ. व्होगेलची प्रचंड घाबरलेली पत्नी रेचेलला विचारते, ” ते त्याला मारुन तर टाकणार नाहीत ना?” त्यावेळी रेचेलच्या चेहर्‍यावर उडालेली खळबळ एका क्षणात तिच्या अभिनयाची दाद घेवुन जाते.

पण ऐनवेळी ज्या रेलगाडीने त्याला बर्लिनच्या बाहेर घेवून जायचे असते तिथेच स्टेशनवर व्होगेलच्या धडपडीमुळे एका पोलीस अधिकार्‍याला संशय येतो आणि यांचा बर्लिनबाहेर पळून जाण्याचा बेत फसतो. त्यांना पुन्हा बर्लिनमध्येच, निदान पुढच्या संधीपर्यंत तरी भुमिगत आसरा घ्यावा लागतो. इथे ते तिघेही आळीपाळीने व्होगेलवर पहारा द्यायचे ठरवतात. इथुन पुढे हे मिशन फसायला सुरुवात होते.

या तिघा एजंटसपैकी ‘स्टीफन गोल्ड’ हा एकटाच काय तो खरोखर निर्दय आणि कर्तव्य कठोर एजंट वाटतो. त्याच्या दृष्टीने फक्त आपले काम पुर्ण करणे हीच प्राथमिकता असते. बाकी दोघे मात्र अजुनही माणुसकीच्या, भावनांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात. त्याच दरम्यान कुठेतरी नकळत रेचेल आणि डेव्हिड एकमेकात गुंतत जातात. कित्येक वर्षे नाझी छळछावण्यांवर काम केलेला डॉ. व्होगेल, रेचेल आणि डेव्हिडची ही अवस्था बरोबर हेरतो आणि त्याच्यावर मानसिकदृष्ट्या दबाव वाढवायचा प्रयत्न करायला लागतो. रेचेल आणि डॉक्टर व्होगेलमधले संवाद आणि दृष्ये पाहताना क्षणभर आपल्यालाही व्होगेलच्या निर्दोषत्वाची खात्री पटायला लागते. तो डेव्हिडला भडकवून त्याचे मानसिक संतुलन बिघडवण्याचाही प्रयत्न करतो. भडकलेला डेव्हिड हातातल्या चिनीमातीच्या किंवा तत्सम प्लेटने त्याच्यावर हल्ला करतो. त्यानंतर एकदा रेचेल एकटी असताना व्होगेल त्याच प्लेटच्या तुकड्याचा वापर करुन स्वतःची बंधने सोडवून घेतो आणि तिच्यावर सरळ सरळ हल्लाच करतो. प्रेग्नंट असलेल्या रेचेलच्या पोटावर लाथ मारुन तिला जखमी करतो आणि सुटका करुन घेतो. जखमी रेचेल तशाही अवस्थेत आपल्या पिस्तुलातून पळुन जाऊ पाहणार्‍या डॉ.व्होगेलवर मागुन गोळी झाडतो आणि तो कोसळतो. मिशन संपतं…….

पण व्होगेल खरोखरच संपलेला असतो का? अहं… वोगेल आपली सुटका करुन घेण्यात पुर्ण यशस्वी झालेला असतो. पुढे काय करायचे?

व्होगेल पळून जाण्यात यशस्वी झाला हे सगळ्यांसमोर कबुल करायचे की …..?

पण आता ही गोष्ट जाहीर करणं म्हणजे आपलं अपयश कबुल करणं आणि पर्यायाने मोस्साद, इजरायचीही बेअब्रु होवू देणं. हे टाळण्यासाठी स्टीफन, डेव्हीड आणि रेचेलची समजुत घालतो, शेवटी ते दोघेही त्याच्या सांगण्यावरुन खोटे बोलायला तयार होतात. डॉ. व्होगेलने पळून जायचा प्रयत्न केला आणि रेचेलने त्याचा गोळी घालुन वध केला ही खोटीच यशाची बातमी इजरायला पोचते. यावेळची स्टीफनची काही वाक्ये मला प्रचंड आवडली. तो म्हणतो…

“Nobody needs to know. No one will ever find him again. We have to lie. It makes no difference (whether he escaped or was shot.), “Truth is a luxury , the truth stays in this room.”

आपल्या खोटेपणाचे समर्थन करण्यासाठी तो दोघांना सांगतो “The important thing is Justice.”

मिशन संपल्यावर इजरायलमध्ये उतरताना...

मिशन संपल्यावर इजरायलमध्ये उतरताना…

पण हे व्होगेल नावाचे भुत ३० वर्षानंतर पुन्हा थडगे फोडून बाहेर येते. सारा गोल्ड , रेचेलच्या मुलीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी रेचेलला पुन्हा एक वयस्कर गृहस्थ भेटायला येतो. दरम्यानच्या काळात बरीच स्थित्यंतरे झालेली असतात. डेव्हिड अचानक गायब होतो. आपण देशाची, आपल्या लोकांची फसवणुक केली आहे, करतोय हे त्याच्या पचनी पडत नाही. तो एकटाच गेली कित्येक वर्षे गायब झालेल्या डॉ.व्होगेलला शोधत असतो. साराच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी रेचेलला भेटायला आलेला तो वयस्कर गृहस्थ म्हणजे डेव्हिडच आहे हे आता आपल्या लक्षात येते. डेव्हिड तिला सांगतो की वोगेल अजुनही जिवंत आहे. युक्रेनमधील एका उपनगरातील एका छोट्याश्या नर्सिंग होममधील एक वृद्ध माणुस तो स्वतःच ‘डेटर व्होगेल’ असल्याचे जाहीर करतो. ही बातमी पेपर आउट होते आणि एक पत्रकार सत्य शोधुन काढायच्या मागे लागतो. दरम्यानच्या काळात ‘स्टीफन’ मोस्सादचा चीफ बनलेला आहे, त्याने आणि रेचेलने लग्न केलेले आहे, घटस्फोटही उरकुन घेतलेला आहे ;). डेव्हिड रेचेलला भेटून सत्य जगासमोर आणायची मागणी करतो, आपण खोटे बोललो होतो, इजरायलची फसवणुक केली होती हे कबुल करायची कल्पना तो तिच्यासमोर मांडतो. तो लज्जास्पद भविष्याच्या कल्पनेने प्रचंड घाबरलेला आहे.

मिशननंतर ३० वर्षांनी भेटलेले डेव्हिड आनि रेचेल

परीणाम….?

स्टीफन आपली शक्ती आणि अधिकार वापरून पद्धतशीरपणे डेव्हिडचा काटा काढतो. रेचेलला भेटुन परत जात असताना एका रोड अ‍ॅक्सीडेंटमध्ये डेव्हिड मारला जातो. आता पाळी रेचेलची असते…

व्होगेलला मारल्याबद्दल गेली ३० वर्षे तिने इजरायलमधे प्रचंड मान सन्मान आणि प्रसिद्धी उपभोगलेली असते. तेव्हा आता स्वतःला व्होगेल म्हणवून घेणार्‍या त्या म्हातार्‍या गृहस्थाचा शोध घेणे आणि तो जर खरोखरच डॉ. डिटर व्होगेल असेल तर त्याला संपवणे हे तिचे कर्तव्य असते. किंबहुना तिचे ते इजरायल आणि मोस्सादप्रती ‘एक देणे’च असते. The Debt !

Rachel has been taking credit for killing Vogel for 30 years. She is the one who must now actually kill him. She owes “The Debt” because she took credit for something that she didn’t do. Now she must pay that Debt by killing Dieter Vogel.

पण त्यावेळची तरुण रेचेल आता ३० वर्षाने वृद्ध झालेली असते. पुढे काय होते? पन्नाशीतली रेचेल जेव्हा त्या नर्सिंग होममध्ये पोचते तेव्हा तिच्या लक्षात येते की हा गृहस्थ डेटर व्होगेल नसुन त्याचा तोतया आहे. त्यामुळी ती त्याला न मारताच परत फिरते. इथे मृत्युशय्येवर असलेल्या त्या तोतयाच्या सलाईनच्या बाटलीला विषाचे इंजेक्शन टोचताना मनातील कर्तव्य आणि सदसदविवेकबुद्धी या दोन भावनांचे प्रभावी द्वंद्व अभिनेत्री ’हेलेन मिरेन’ अतिशय प्रभावीपणे व्यक्त करते.

कर्तव्य आणि विवेक यांच्या कात्रीत अडकलेली रेचेल

पण तिथुन जाताना स्वतःच्याच सदसदविवेकबुद्धीच्या दबावाने खचलेली रेचेल एका कागदावर, व्होगेलच्या तोतयाला भेटायला येणार्‍या पत्रकारासाठी एक पत्र लिहून ठेवते, त्यात तीने तो तोतया आहे हे तर लिहीलेले असतेच पण व्होगेलच्या ३० वर्षापुर्वी झालेल्या मृत्युची बातमी खोटी असल्याबद्दलची कबुलीही दिलेली असते. शेवटे आपल्या खांद्यावरील या देण्याचे ओझे उतरवल्याच्या आनंदात ती परत फिरते.

पण हे ओझे खरोखर उतरते का? व्होगेलचे प्रत्यक्षात काय होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘The Debt’ पाहायलाच हवा… !

***************************************************************************************************************************

२०१० मध्ये आलेल्या या अमेरिकन चित्रपटाचे मुळ आहे २००७ साली आलेल्या ‘The Debt’ याच नावाच्या मुळ इजरायली चित्रपटात. (Ha-Hov or HaChov, in Hebrew). The Debt पासुन ‘सर्जन ऑफ बिर्कनौ’ “Surgeon of Birkenau” या संकल्पनेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण मुळ २००७ च्या चित्रपटात त्याला ‘सर्जन ऑफ ट्रेंब्लिंका (“the surgeon of Treblinka.”) असे उल्लेखलेले आहे. ‘ट्रेंब्लिंका’ ही जर्मन नाझींनी उभ्या केलेल्या पहिल्या मृत्यु छावण्यापैकी एक छावणी होती. पण तिथे पाठवण्यात आलेले ज्यु कैदी, तसेच काही ‘जिप्सी’ कैदी यांना लगेच मारण्यात आले. मग तिथे एका सर्जनची आवश्यकता का पडली असेल? कारण सर्जनचे काम असते शस्त्रक्रिया करणे. शस्त्रक्रिया ही माणसाचा प्राण वाचवण्यासाठी केली जाते. मग तिथे जर थेट ज्यु आणि जिप्सींच्या कृर हत्याच करण्यात आल्या असतील तर मग सर्जनची गरज का पडावी? जर ट्रेंब्लिंकाचाच कोणी सर्जन अस्तित्वात नसेल तर ‘सर्जन ऑफ बिर्कनौ’ ही कल्पनादेखील कपोलकल्पितच म्हणायची का?

तर नाही..! ते एक अघोरी आणि कटु सत्य होते. त्याबद्दल आपण लेखाच्या उत्तरार्धात बोलुच.

दोन्ही चित्रपटात नाही म्हणायला काही बदल केले आहेत. उदाहरणार्थ पात्रांची नावे बदलली आहेत.

मुळ कथेत स्त्रीपात्राचे नाव आहे ‘रेचेल बर्नर’ ती इथे ‘ रेचेल सिंगर’ झालेली आहे, तर एहुद आणि झ्वीचे (Ehud and Zvi) डेव्हिड आणि स्टीफनमध्ये रुपांतर झालेय. मुळ चित्रपटातल्या कृर डॉक्टरचे नाव आहे मॅक्स रेनर (Max Rainer ) तो इथे डेटर व्होगेल (Dieter Vogel) झालाय. मुळ कथानकात रेचेल त्या घटनेनंतर एकटीच राह्ते आणि तिने स्वतःच ते पुस्तक लिहीलेले आहे, तर अमेरिकन व्हर्जन मध्ये ती स्टीफन बरोबर लग्न करते आणि त्यांची मुलगी रेचेलवर, त्या घटनेवर पुस्तक लिहीते. जुना चित्रपट जास्त स्पष्ट आणि वास्तवाशी तोल सांभाळणारा वाटतो तर नव्या आवृत्तीमध्ये रेचेलच्या आपल्या सहकार्‍यांबरोबरच्या प्रेम त्रिकोणावर बराच भर दिलेला दिसतो. व्होगेलला ताब्यात घेतल्यावर त्याला बर्लिनच्या बाहेर नेण्याचा बेत फसतो तो प्रसंग जुन्या चित्रपटात नाहीये. मुळ कथानकात रेचेल आणि एहुद दोघे मिळुन त्या तोतयाच्या शोधासाठी युक्रेनला जातात, नव्या आवृत्तीत डेव्हिड आधीच मारला जातो. मुळ कथानकात व्होगेलबद्दलचा सगळा शोध एक पत्रकार घेत असतो, तर यात इजरायली सरकारबरोबर मोस्सादही त्याच्या मागे असते.

नव्या चित्रपटात कलाकारांना त्यांचे अभिनयगुण दाखवायला जास्त वाव मिळाला असावा हे जाणवते. मध्ये तीस वर्षाचा काळ उलटून गेलेला असल्याने ही तिन्ही पात्रे दोन्ही काळात वेगवेगळे कलाकार तेवढ्याच समर्थपणे उभे करतात. पण कलाकार बदललेले असुनही कुठेही लिंक तुटत नाही हे कलाकारांचे यश म्हणावे लागेल.

असो…

बाकी डॉ. व्होगेल अर्थात सर्जन ऑफ बिर्कनौ किंवा ‘सर्जन ऑफ ट्रेंब्लिंका’ हे व्यक्तीमत्व खरोखर अस्तित्वात होते का? असले तर नक्की कसे होते? कोण होता तो कृरकर्मा?

डॉ. जोसेफ मेंगेल…… त्याच्याबद्दल आपण पुढील भागात बोलूच !

सद्ध्या फक्त त्याचे आंतरजालावर उपलब्ध एक छायाचित्र देतोय. हे पाहा आणि विचारा स्वतःलाच …

“हा माणुस खरोखर एक क्रुरकर्मा होता? असु शकेल?”

डॉ. जोसेफ़ मेंगेल

क्रमश :

विशाल कुलकर्णी

 

एक म्याड, म्याड, म्याड असलेला शहाणा दोस्त…

१९९६ सालची घटना असावी बहुदा. त्यावेळी पुण्यात नोकरी करत होतो. सुटीसाठी म्हणुन सोलापूरला गेलो होतो. रवीवारचा दिवस, सकाळची वेळ, मस्त पुस्तक वाचत पडलो होतो आणि ेप्राचीचा फ़ोन आला. प्राची उर्फ़ प्राची देशमुख माझी भाच्ची. एका मानसभगिनीचे ७ वर्षाचे उपद्व्यापी कन्यारत्न. जगात काही लोक तुम्हाला छळायचे या एकाच कारणास्तव जन्म घेतात यावर माझा विश्वास बसावयास भाग पाडणारी एक गोड छोकरी. अर्थात प्राचीचा छळवाद मला प्रचंड हवाहवासा वाटतो कारण त्यातुन ती माझ्या बुद्धीलाच आव्हान देत असते. तिचे प्रश्नही अफ़ाट असतात.

उदा. तुला येते तशी दाढी मला का नाही? देव सगळीकडे आहे तर ऐन परीक्षेच्या वेळी तो का गायब होतो? मी आई-बाबांची एवढी लाडकी आहे तर त्यांच्या लग्नात मला का बोलावले नव्हते? नंदुआजोबा, तुला, मला आणि चंपीच्या बाळाला एकाच नावाने हाक का मारतात? (चंपी हे ताईच्या कुत्रीचं नाव आहे. नंदुमामा जगातल्या यच्चयावत सर्वच लहान मुलांना ’पिल्लु’ म्हणून हाक मारतो. आम्हीही अजुनही त्याच्या दृष्टीने लहानच आहोत)

तर त्यादिवशी सकाळी सकाळी प्राचीचा फ़ोन आला.

“माम्या, मी तुला ’मामा’ म्हणते, आईपण तुला ’विशुमामाच म्हणते, सौरभ (भावजींच्या धाकट्या बहिणीचा मुलगा) बाबांना मामा म्हणतो, मग आई बाबांना ’मामा’ का म्हणत नाही?”

“मामा” या शब्दाशी तिने तिच्या आईचा आणि माझा लावलेला संबंध पाहून मी अवाक झालो, त्यात सौरभचा संदर्भ अजुन खतरा होता. सौरभशी स्वत:ला रिलेट करुन बापाला ’मामा’ बनवण्याचा तेही आईकडून तिचा हा उपद्व्याप माझ्या मात्र मस्तकाला झिणझिण्या आणुन गेला.

मला काय उत्तर द्यावे तेच कळेना.

“वेडुच आहेस बच्चा तू. अगं तो ’बाबा’ आहे ना, मग बाबाला ’मामा’ कसे म्हणेल आई?”

“मग ती बाबा तरी कुठे म्हणते, योगेश म्हणते ना !”

मी नि:शब्द ! तिला म्हणालो, संध्याकाळी येतो तुला भेटायला तेव्हा आपण आईला विचारु.

कुठलेतरी पुस्तक वाचत आमचे एकतर्फ़ी संभाषण ऐकणारा माझा धाकटा भाऊ विनू म्हणाला…

“कोण रे ’पा’ होती का? (आम्ही प्राची ला ’पा’ असेही म्हणतो, ती अगदी लहान असताना तिला नाव विचारले की ती तेवढेच सांगायची)

“हो रे, असले एकेक भन्नाट प्रश्न विचारते आणि दांडी गुल करुन टाकते.”

मी त्याला सगळा किस्सा ऐकवला. त्यावर विनू म्हणाला…

“तुझ्या जागी लंप्या असता ना, तर म्हणाला असता….” प्राचीपण म्याडच आहे, अगदी १० गुणिले १० भागिले शंभर म्हणजे एक इतकी म्याड!”

मी चमकलो.. आणि लगेच लहानपणीच्या आठवणीत मागे गेलो …

’कुठलं वाचतोयस?’

विनुने हातातले पुस्तक माझ्याकडे दिले. ,”  अगदी लंप्या म्हणतो तसा ““माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”.

प्र.ना. संतांचं ’वनवास’ होतं ते. मी जरा चाळून त्याला परत केलं, तुझं झालं की दे म्हणून सांगितलं.

“तू वाच, मी तिसर्‍यांदा वाचतोय. मी जातो आंघोळीला नाहीतर मातोश्री फटकावतील”

मी पुस्तक हातात घेतलं आणि पुन्हा एकदा लहान झालो.  लंप्याची आणि माझी दोस्ती  तशी फ़ार जुनी नाही, मुळात संतांनी आपलं पहिलं पुस्तक वनवास लिहीलं तेच मुळी १९९४ साली जेव्हा मी विशीत होतो, पण आता चाळीशी आली तरी  ती दोस्ती मात्र अजुनही कायम आहे.

तर ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील बाल-नायक! खरेतर त्याला बाल म्हणणे त्याच्यावर अन्याय ठरेल, कारण प्रत्येक लहान सहान गोष्टींना तो लावत असलेलं भन्नाट लॉजिक भल्या भल्यांना वेड लावायला पुरेसं आहे. कारवार जवळच्या एका लहानश्या खेडेगावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा लंपन. आई वडील आणि त्याची छोटी बहीण जवळच्याच एका छोट्या शहरात राहतात. लंपनला त्याचे घडायचे वय म्हणुन त्याच्या आज्जी-आजोबांकडे शिकायला ठेवण्यात येते. लंपनचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन आहे. एक वेगळेच लॉजिक आहे. आजुबाजुच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीला स्वतःचं लॉजीक लावत अठ्ठाविसशे एकोणावीस वेळा त्यावर विचार करायची त्याची सवय आपल्यालाही वेड लावते. त्याला एक मैत्रीण पण आहे, सुमी उर्फ मिस सुमन हळदीपुर. लंपनच्या प्रेमात पडण्यामागे त्याचं हे स्वतःचं असं , स्वतःच निर्मीलेलं निरागस विश्व तर होतंच पण त्याहीपेक्षा महत्वाचे असे आम्हा दोघातले दोन कॉमन पॉईट्स मला सापडले होते ते म्हणजे लंप्याची गाण्याची आवड आणि पुस्तकांचे वेड !

मनापासुन सांगतो आगदी सत्तेचाळीस हजार एकोणाविसशे अठ्ठावीस वेळा वाचलाय मी लंपन, पण प्रत्येक वेळी तो काही ना काही नवीन शिकवतोच. वपुंनी उभी केलेली व्यक्तीचित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली हे माझं वेड आहे. पण लंप्याच्या डोळ्यातून पाहीलेले नकादुचे खंडागळे, जुन्या गाड्या नव्यासारख्या करुन विकणारे हिंडलगेकर अण्णा, त्यांच्या सगळ्या गल्लीला वेड लावणार्‍या पोरी, सारखा केसांवर हात फिरवत बोलणारा, हिडलगेकर अण्णांच्या मुलीवर लाईन मारणारा एसक्या, गाणं शिकवणार्‍या आचरेकर बाई, हत्तंगडी मास्तर, शारदा संगीतचे म्हापसेकर सर, आचरेकर बाईंचा मानलेला मुलगा ‘त्ये म्याडहुन म्याड जंब्या कटकोळ हंपायर’, फुटबॉलचं वेड असणारा पण प्रत्यक्षात सायकल दुरुस्तीचं दुकान चालवणारा कासारगौड, दुंडाप्पा हत्तरगीकर, त्याच्या टांग्याचा दर दोन मिनीटाला थांबणारा घोडा, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी असे लंप्याचे मित्र, सुमी उर्फ मिस हळदीपूर अशी एकेक पात्रे जेव्हा डोळ्यासमोर फेर धरुन नाचायला लागतात ना तेव्हा नकळत वपुंचाही विसर पडायला होतो.

लंप्याच्या अफलातुन भावविश्वाबद्दल युपुढेही बरेच काही लिहायचेय, मी तर लिहीणारच आहे. पण मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर लंप्याला वाचलय, त्याला पाहीलय. प्रत्येकाने कधी ना कधी स्वतःमध्ये लंप्याला जागवलय. तुम्हाला काय वाटतं? लंप्याची आठवण झाली की सगळ्यात आधी काय आठवतं. तुम्ही पण लिहा इथे प्रतिसादात, मी पण लिहीतो….

मला लंप्याचं नाव काढलं की आठवतो तो प्र. ना. संतांनी सांगितलेला गोट्या खेळताना म्हणायचा एक अफलातुन मंत्र……

पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर

मागे कधीतरी मिपावर श्रीं. नंदन यांनी लिहीलेल्या एका लेखात म्हटले होते…

“लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं. ”

वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ही चारच पुस्तके प्रकाश संतांनी लिहीली.

लंप्याची दुनीया

लंप्याची दुनीया

दुर्दैवाने २००३ साली त्यांचे अकाली निधन झाले. पण या चारही पुस्तकांनी माझे आयुष्य समृद्ध करुन सोडलेले आहे. माझे लहानपण गेले ते गोट्या आणि सुमाच्या गोष्टी, फाफेचे कारनामे, टारझनची साहसे, विक्रम वेताळाच्या गोष्टी आणि हान्स अ‍ॅंडरसनच्या परिकथा वाचण्यात. दुर्दैवाने प्रकाश नारायण संतांनी लंपनची पहिली कथा वनवास लिहीली त्या वर्षी म्हणजे १९९४ साली मी माझे बालपण खुप मागे सोडले होते. पण लंप्याच्या या ओळखीमुळे कुठेतरी हरवलेले ते बालपण पुन्हा एकदा जगण्याचा निर्भेळ आनंद उपभोगता आला. पुढचे काही माहीत नाही पण आज एक मात्र मी खात्रीने सांगतो की किमान मरेपर्यंत तरी मी लहानच राहणार आहे, निदान लंप्याशी असलेली माझी दोस्ती निभावण्यासाठी तरी……

मग लिहीताय ना?
लंपनशी असलेले तुमचे नाते, तुमच्या दोस्तीच्या त्या म्याड, म्याड आठवणी …..

विशाल…

 
 
%d bloggers like this: