RSS

Category Archives: माहीतीपर लेख

सर्व प्रकारच्या राजकीय, अराजकीय घडामोडी, तसेच तत्कालीन घटनांवर,
सामाजिक, आरोग्य संबंधीत बाबींवर प्रकाशझोत टाकणारे लेख.

माझी वाईट्ट व्यसनं : बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

नववी – दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,”चल बे, पिक्चर टाकु आज” , तर एकच उत्तर मिळायचे …

“नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर.”

मला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा). पण दहावीच्या ऐन परीक्षेत दुसर्‍या दिवशी रसायनशास्त्र आणि भुमितीचा पेपर असतानासुद्धा आदल्या रात्री चाळीत भाड्याने आणलेल्या व्हिडीओवर बच्चनचे तुफान आणि जंजीर असे दोन चित्रपट (यातला जंजीर आधी ४-५ वेळा पाहिलेला होता) बघु द्यायला नकार देण्याचा कद्रुपणा आमच्या पिताश्रींनी केलेला नव्हता. कदाचित चित्रपटांचं वेड हे माझ्याकडे त्यांच्याकडुनच आलेलं आहे. अर्थात त्या काळी आमच्या आवडी निवडी वेगळ्या होत्या. कायम बच्चन, धर्मेंद्र आणि खासकरून लाडक्या मिथुनदांचे चित्रपट पाहणे ही आमची आवड. त्याच बरोबर महेंद्र संधू (हे नाव तरी आठवतय का कुणाला?) , विक्रम हे फायटींग करणारे कलाकार जास्त आवडीचे. अशा आवडींच्या त्या काळात जेव्हा आण्णा, दुरदर्शनवर लागणार्‍या कुठल्यातरी जुनाट चित्रपटातल्या त्या गोर्‍या-गोमट्या, रेशमी केसाच्या शामळु हिरोचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायचे तेव्हा आम्ही भाऊ गपचुप्-गपचुप हसायचो. आण्णांना काही पण आवडतं राव!

मग कधीतरी अकरावीला वगैरे होतो तेव्हा, एका मित्राकडे रात्री अभ्यासाला म्हणून गेलेलो असताना एक चित्रपट पाहण्यात आला. (मित्रांकडे रात्री अभ्यासाला जायचे म्हणजे पिक्चर पाहायलाच जाणे असायचे. अर्थात तेव्हासुद्धा अजुन ‘भक्त पुंडलीक’चे वेड लागलेले नव्हते. त्यानंतरही कधी लागु शकले नाही)

त्याच त्या शामळू हिरोची मुख्य नट म्हणून भुमिका असलेला चित्रपट होता तो. १९८६ साली आलेला मुजफ़्फ़र अलीचा ’अंजुमन’. मुजफ़्फ़र अलींच्या नेहमीच्या पद्धतीने स्त्रीयांचे शोषण, उत्पीडन आणि स्त्रीयांच्या हक्कासाठी त्यातल्याच एकीने उठवलेला आवाज असा नेहमीचाच विषय होता. शबाना आझमी आणि “फ़ारुक शेख” हे कलाकार. खय्याम साहेबांचं संगीत, स्वत: मुजफ़्फ़र अलींचीच कथा, राही मासुन रझासाहेबांचे संवाद, शहरयार साहेब तसेच शायरे आझम फ़ैज अहम फ़ैज साहेबांची शायरी, गाणी. शबानाने स्वत;च्या आवाजात गायलेली गाणी सगळाच अदभूत संगम होता चित्रपटात. शबानाच्या आई शौकत कैफ़ी आझमी यांची पण भुमिका होती या चित्रपटात. पण मला या चित्रपटात काही आवडले असेल तर तो होता ’फ़ारुक शेखचा बोलका चेहरा आणि त्यांचा चित्रपटातला सहज-सुंदर अभिनय’ . चित्रपटाची कथा पुर्णपणे शबानाच्या भुमिकेवर ’अंजुमन’वर केंद्रीत होती पण लक्षात राहीला तो ’फारुक शेख’. फिल्म इंडस्ट्रीत मोतीलाल आणि बलराज सहानी यांच्यानंतर इतका सभ्य वाटणारा आणि प्रत्यक्षातही तितकाच सभ्य असणारा असा कलाकार विरळाच असेल. असो…. सांगायचे हे की त्या दिवसापासून मी फारुक शेख या व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पडलो. आण्णांना हा माणुस इतका का आवडतो हे तेव्हा कळाले.

दुसर्‍या दिवशी आण्णांना मी हे सांगितले. आण्णासाहेब एकदम खुश. आण्णांची प्रतिक्रिया होती. “मोठा झालास !” अस्मादिकपण खुश 🙂

त्यानंतर मात्र फारुकजींचे चित्रपट पाहण्याचा धडाका सुरु केला. जमाना अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र, मिथुन यांचा होता. फारुखजींचे चित्रपट बहुतांशी ‘समांतर’ या श्रेणीतले. त्यामुळे हे चित्रपट सिनेमाघरातुन खुप कमी लागायचे. लागले तरी फार दिवस टिकायचे नाहीत. त्यामुळे आम्ही कायम शोधातच असायचो. कुठे फारुकजींचा सिनेमा लागलाय असे कळले की आम्ही पोचलोच. पुन्हा तिकीटही सहज मिळून जायचे. सगळ्यात पुढचे आठ रुपयांचे तिकीट काढून आम्ही थेटरात दाखल व्हायचो. तिथे मोजुन ३०-४० टाळकी असायची, फार-फार शंभर. त्यामुळे राज्य आपलंच असायचं.

farooq-sheikh-wallpaper_1

अशातच एके दिवशी अशातच एके दिवशी १९७३ साली आलेला, एम्.एस्.सथ्युंचा ‘गर्म हवा’ पाहण्यात आला. फारुकजींचा हा पहिलाच मोठा चित्रपट होता. फाळणीनंतर भारतात मागे राहीलेल्या मुस्लीम समाजाच्या मनस्थितीचे, अवस्थेचे खोल चित्रण करणारा हा चित्रपट. या चित्रपटात फारुकजींनी सलीम मिर्झाच्या (बलराज सहानी) धाकट्या मुलाची सिकंदर मिर्झाची भुमिका निभावलेली होती. त्या काळातल्या बंडखोर, कम्युनिझ्मकडे झुकलेल्या तरुणाईचे प्रतिक असलेली ही सिकंदर मिर्झाची भुमिका होती. भारत सोडून पाकिस्तानात स्थलांतरीत व्हायला विरोध करणारा, पित्यावर झालेल्या खोट्या आरोपांनी घाबरून न जाता यंत्रणेच्या विरुद्ध लढायला तयार असलेला सिंकदर मिर्झा फारुकजींनी जीव तोडून रंगवला होता. खरेतर त्यातली फारुखजींची भुमिका तशी दुय्यमच होती. पण ती त्यांनी अतिशय आत्मीयतेने रंगवली होती.

या चित्रपटाचा फ़ारुकभाईंना  आर्थिक पातळीवर नसला तर अभिनयाच्या पातळीवर. एक खुप मोठा फ़ायदा झाला. ’गर्म हवा’ साठी फ़ारुकजींना फ़क्त ७५० रुपये मानधन मिळाले होते. पण नफ्याची बाजु ही होती की पहिल्याच भुमिकेत ’नैसर्गिक आणि सहजसुंदर अभिनयाचा बादशहा’ म्हणुन ओळखल्या गेलेल्या ’कै. बलराज सहानीं’ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बलराज -साहेबांच्या सहज सुंदर अभिनयशैलीचा पगडा फारुकभाईंसारख्या गुणी व्यक्तीत्वावर पडला नसता तरच नवल. त्यामुळे पुढे आपल्या संपुर्ण कारकिर्दीत फारुकभाईंनी नैसर्गीक अभिनयावरच अधिक भर दिला.

gh1

माझ्यासाठी अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना, देव आनंद, दिलीपकुमार अशी आवडत्या कलावंतांची हायरार्ची असलेली विचारसरणी बदलण्याच्या दिवसांची ती सुरूवात होती. आता अमिताभच्या नावाआधी बलराज सहानी, फारुक शेख, नासिरुद्दीन शाह अशी नावे यायला लागली होती. हो, फ़ारुकभाईंच्या चित्रपटांनी मला नासिरुद्दीन शहा नावाच्या अफाट कलावंताची ओळख करून दिली. त्याबद्दल नंतर कधीतरी….

गुजरातमधल्या अमरोलीत एका खानदानी जमीनदार घराण्यात जन्माला आलेला हा देखणा कलावंत उच्चविद्याविभुषीत होता. लहानपणापासून मुस्लीम जमीनदारी वातावरणात वाढल्यामुळे ती खानदानी अदब, तो रुबाबदारपणा त्यांच्यात चांगलाच मुरलेला होता.

कदाचित म्हणूनच १९८१ साली जेव्हा मुजफ़्फ़र अलीला एका रसिक, खुशमिजाज नवाबाचे पात्र उभे करायचे ठरवले तेव्हा फ़ारुकजींनाच ही संधी द्याविशी वाटली असेल. तेव्हा अलीसाहेबांना वाटले सुद्धा नसेल की हा चित्रपट इतिहास घडवणार आहे. मुझफ्फर अलीचा चित्रपट, त्यामुळे पुन्हा विषय स्त्रीप्रधानच होता. मिर्झा हादी रुसवा यांच्या कथेवर आधारीत ‘उमराव जान’ने तत्कालीन रसिकांवर गारुड केलं. इथेही फारुकजींच्या वाट्याला आलेली भुमिका तशी (नायक असुनही) दुय्यमच होती. उमराववर जिवापाड प्रेम करणारा नवाब सुलतान त्यांनी ताकदीने रंगवला होता. उमराववर मनापासून, उत्कटपणे मोहोब्बत करणारा नवाब सुलतान, आपले कुटुंब, खानदान की आपली प्रिया या द्वंद्वात नाईलाजाने आपल्या परिवाराची निवड करणारा एक पराभूत प्रेमी अश्या दोन टोकाच्या दोन तर्‍हा फारुकभाईंनी विलक्षण उत्कटतेने रंगवल्या होत्या.

कै. सत्यजीत रें यांचा ’शतरंज के खिलाडी’ या पुर्वीच येवून गेला होता. फारुकभाईंची कारकिर्द हळुहळू पण विलक्षण ताकदीने बहराला येत होती. मला वाटतं सत्तरचे दशक फारुकभाईंसाठी खुप महत्वाचे आणि भाग्योदयाचे ठरले. या काळात त्यांची जोडी कलात्मक चित्रपटांची तत्कालीन मोठी अभिनेत्री ’दीप्ती नवल’ यांच्याबरोबर जमली होती.

download

या जोडीने एका मागुन एक खुप सुंदर चित्रपट दिले. साथ-साथ, चष्मेबद्दूर, कथा, किसीसे न कहना, रंगबिरंगी, टेल मी ओ खुदा ही त्यातलीच काही नावाजलेली नावे. चष्मेबद्दूर मधला सरळमार्गी, साधा सरळ प्रेमीक असो वा ’कथा’मधला गुलछबू, दिलफेक आशिक असो दोन्ही भुमिका फ़ारुकभाईंनी मनापासून उभ्या केल्या होत्या. ’Listen Amaya’ या २०१० च्या दशकात येवुन गेलेल्या चित्रपटात हे दोघे परत एकदा एकत्र झळकले.

Farooq-Shaikh-Deepti-Naval

अशातच कुणाकडून तरी कळालं की फारुकभाई आणि शबाना आझमी मिळून एक थिएटर प्ले (नाटक) सुद्धा करत. “तुम्हारी अमृता” या नावाचा. आणि मग आपोआपच अमृताला शोधणे अपरिहार्य ठरले…

“‘लिखना मुझे अच्छा लगता है अमृता। ख़ास तौर से तुम्हें। ये ख़त नहीं हैं।  मेरी जान ये मैं हूं। ये मेरी रुह के टुकड़े हैं। तुम चाहो तो इन्हें टुकड़े-टुकड़े कर डालो।’ ”

१९९२ मध्ये जावेद सिद्दिकीने हे नाटक लिहीले होते. ए.आर. गर्नीच्या ’लव लेटर्स’ वरून प्रेरीत होऊन. ८ वर्ष वयाची अमृता निगम वय वर्षे १० च्या जुल्फिकार हैदरला पत्रे लिहीते. पुढची पस्तीस वर्षे हा पत्रव्यवहार चालू राहतो. केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या एवढ्या मोजक्या नेपथ्यावर (नंतर काही प्रयोगात दोन टेबल आले) फारुकभाई आणि शबाना हे नाटक सादर करीत. दोघे खुर्चीवर बसून एकामागुन एक , एकमेकांना लिहीलेली पत्रे वाचत असत. पण हा प्रयोग ते दोघेही इतक्या परिणामकारकरित्या सादर करत की या नाटकाचे फ़ारुक आणि शबाना या जोडीने जवळ-जवळ ३०० हाऊसफ़ुल्ल प्रयोग केले.

तुम्हारी अमृता

तुम्हारी अमृता

जवळ-जवळ १२ वर्षे  ’तुम्हारी अमृता’ने रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर २०४ मध्ये सोनाली बेंद्रेच्या साथीत फारुकभाईंनी या नाटकाचा एक सिक्वेल ’ आपकी सोनीया’ या नावाने केला होता. पण तो फ़ारसा यशस्वी ठरला नाही. शबाना आनि फारुक शेख ही जोडी सुद्धा काही मोजक्या पण समर्थ दिग्दर्शकांच्या चित्रपटातून झळकली. यात कल्पना लाजमींचा ’एक पल’ , सागर सरहदीचा ’लोरी’ आणि मुजफ़्फ़र अलींचा ’अंजुमन’ ही नावे ठळकपणे आपले अस्तित्व दाखवून देतात.

दरम्यान फारुकभाईंचे इतरही चित्रपट पाहणे सुरूच होते. जुन्यापैकी बाजार, नुरी तर नव्यापैकी बीवी हो तो ऐसी, माया मेमसाब, लाहौर, सास बहु और सेन्सेक्स, शांघाय अशा चित्रपटांमधून फारुकभाई आपले प्रसन्न दर्शन देतच होते. लाहौर साठी तर २०१० साली फ़ारुकभाईंना उत्कृष्ट सहकलावंतासाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

या दरम्यान फ़ारुकभाई अधुन मधून इडीयट बॉक्सवर सुद्धा झळकत होतेच.१९८५-८६ साली दुरदर्शनची गाजलेली मालिका ’श्रीकांत’ असो, वा त्यानंतर स्टार प्लस वर आलेली ’जी मंत्रीजी’ असो अथवा सोनी टिव्हीवरची ’चमत्कार’ असो फ़ारुकभाई कुठल्या ना कुठल्या मार्गाने सतत चाहत्यांच्या संपर्कात होतेच. त्याच दरम्यान फारुकभाईंनी चित्रपट क्षेत्रातील कलावंतांच्या मुलाखतीवर आधारीत असलेली  ” जिना इसी का नाम है” या नावाची एक मालिका सुद्धा केली. अल्पावधीतच या मालिकेने यशोशिखर गाठले. या मालिकेचे दुसरे पर्व सुरेश ओबेरॊय यांनी केले पण ते काही फारुकभाईंची उंची गाठु शकले नाहीत. फ़ारुकभाईंची विनिदाची उत्तम जाण आणि विनम्र स्वभाव, समोरच्या व्यक्तीला क्षणात आपलेसे करत बोलते करण्याची हातोटी हा या कार्यक्रमाचा मर्मबिंदू होता, जिथे सुरेश ओबेरॉय कमी पडले.

२७ डिसेंबर २०१३ रोजी दुबईमध्ये दीप्ती नवलच्याच कुठल्यातरी कार्यक्रमासाठी म्हणून गेलेले फारुकभाई हृदयविकाराच्या धक्क्याने अल्लामियाच्या घरी वर्दी बजावण्यास निघून गेले. हिंदी समांतर चित्रपटांच्या इतिहासातलं एक देखणं, अभिनय संपन्न पर्व नकळत संपलं…….

फारुकभाई, तुम्ही गेलात, पण तुमचे चित्रपट, तुम्ही गाजवलेली गाणी कायम आमच्या हृदयात वास करतील. ती गाणी पुन्हा पुन्हा पाहणे, तुमच्या चित्रपटांची पारायणे करने हीच तुम्हाला आमची श्रद्धांजली असेल, श्रद्धांजली ठरेल…..

विशाल कुलकर्णी

९९६७६६४९१९

 

 

 

रंग सोन्नलगीचे – अर्थात आमचं सोलापूर !

यंदाच्या मायबोली गणेशोत्सवांतर्गत घेतलेल्या ’गर्जा महाराष्ट्र माझा’ या गटलेखन स्पर्धेत आमच्या ’लैभारी’ या गटाने लिहीलेल्या ’रंग सोन्नलगीचे’ या सोलापूर शहरावरील माहितीपर लेखास प्रथम पारितोषिक मिळाले. विजेतपदासाठी मायबोलीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या मतदानावरच विजेता ठरणार होता. त्यानुसार मायबोलीकरांनी आमच्या ’रंग सोन्नलगीचे’ या लेखाला ४४% (८७ मते) आणि ७४ लाईक्स असे बहुमताने निवडून दिले. ही संधी दि्ल्याबद्दल मायबोली व्यवस्थापक, संयोजक आणि समस्त मायबोलीकरांचे मन:पूर्वक अभिनंदन !

मायबोली गणेशोत्सव २०१२ : स्पर्धा निकाल

"लैभारी"

“लैभारी”

———————————————————————————————————
———————————————————————————————————
कंपुचे नाव :-लैभारी.
लेखाचे नाव :- रंग सोन्नलगीचे.

सहभागी मायबोलीकर

विशाल कुलकर्णी
मल्लिनाथ करकंटी
मुग्धा कुलकर्णी
स्वप्ना लाड
कांचन कुलकर्णी (भंडारे)

———————————————————————————————————
———————————————————————————————————

२००६ मधली घटना. नुकताच फुग्रो ओमनीस्टारला जॉइन झालो होतो. काही मुलभूत प्रशिक्षणासाठी म्हणून हॉलंडला कंपनीच्या मुख्यालयात हजर झालो होतो. दोन महिन्यासाठी तिथे राहावे लागणार होते. पाच दिवसाचा कामाचा आठवडा असे. शनिवार-रवीवार बुड उचलून भटकायला निघायचो. दुसर्‍या महिन्याच्या अश्याच एका रविवारी अ‍ॅमस्टरडॅमच्या ‘वॅन गॉ’ संग्रहालयात तळ ठोकलेला होता. इतक्यात फोन वाजला, खरेतर ग्लोबल रोमींग असल्याने उचलायला मन धजावेना, पण फोनच्या स्क्रीनवर झळकलेले नाव वाचुन राहवेना. फोन ‘राजा साळुंकेचा होता. माझा जिवश्चकंठश्च मित्र. मनावर आणि खिश्यावर दगड ठेवुन फोन उचलला.

” काय करायला बे भाxxx? फोन उचलाला येवडा वेळा लागालाका तुला? (इथे टायपो नाहीये, आमच्याकडे उचलायला, बोलायला, लागायला म्हणताना मधला ‘य’ कृष्णार्पण करण्याची पद्धत आहे. 😉 ) दात आले का बे गांX ? ”

मी अक्षरशः मोहरलो. तसे घरच्यांशी बोलणे व्हायचे अधुन्-मधुन. पण खास सोलापूरी भाषेतल्या त्या मायेच्या 😉 शिव्या ऐकताना अगदी मस्त वाटले. मी राजाला ती सगळी वाक्ये रिपीट करायला लावली. आणि नंतर….

“हॉलंडात आलो बे फोकलीच्या. रोमींगमध्ये आहे. बंद कर, नायतर परत आलो की ‘देत्तो बग कडेलकनी एकच कनपट्टीखाली’ ! ”

आणि नंतर ३-४ वाक्ये त्याची, ३-४ वाक्ये माझी झाली असतील. प्रत्येक वाक्यात शिव्यांचा आणि स्पेशली ‘बे’ चा रतीब होता. रोमींगमध्ये असल्याने फारसे ताणले नाही राजाने, फोन बंद झाला. मी मागे वळलो, मागे एक चाळीशीचा तरुण उभा होता. चेहरा-मोहरा भारतीय.

“सोलापूरी का बे ?”

माझा चेहरा उजळला.

“तू पण?”

“ते फोनवरचं प्रेमळ संभाषण ऐकलं तेव्हाच ओळखलं हा भाड्या सोलापूरचा दिसतोय.”

काय गंमत बघा, दिड महिना सोलापूरी शिव्यांना अंतरलेला मी, तिथे अ‍ॅमस्टरडॅममध्ये एक सोलापूरी भेटावा आणि त्याने कसल्याही औपचारिकता न बाळगता झक्कास आमच्या सोलापूरी भाषेत शिव्यांचा रतीब सुरु करावा. यासारखं भाग्य नाही. अर्थात त्यातली मजा अनुभवण्यासाठी तुम्ही सोलापूरी असणं गरजेचं आहे. ‘बे’, भाड्या, भाडखाव, गांX या शिव्या आमच्याकडे प्रिय, जिगरी, जवळचा या अर्थाने घ्यायची पद्धत आहे. त्यामुळे सोलापूरी माणसाला वाक्यात या पैकी एखादी तरी शिवी लागतेच लागते, नाहीतर उगीचच चांदीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगाची फुळकवणी आमटी प्यायला दिल्याचा फील येतो.

आमच्या सोलापुरात बे सारखंच ’मारणे’ हे क्रियापद एक लै मारलं जातय बगा, म्हंजे वापरलं जातं. कसं ? म्हणजे पहा, आम्ही गाडी चालवत नाही, गाडी मारतो. फोन, मिस कॉल सुद्धा मारतो. रंग लावत नाही, रंग मारला जातो.  ’ए चल बे गाडी तु मार आज.’, ’काम संपल्यावर कॉल मार बे’, ’काय बे, नविन रंग मारलायस काय बे घराला?’ ’अरे कालच मी एक फोटो प्रिंट मारलो बे.’ ’अबे बोर नको मारुस’!  हे क्रियापद चालवुन पहा तुम्हीही एकदा 😉

तर असा आमचा स्वभाव गुण आहे. उगीचच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोखठोक पाहीजे. मग भले कुणी अम्हाला फाटक्या तोंडाचा का म्हणेना !

पण केवळ फटकळपणा हा सोलापूरचा गुणधर्म नव्हे. आजकाल सगळीकडे सोलापूर म्हणले की तिथे वाक्या-वाक्यात पेरल्या जाणार्‍या शिव्या, शेंगाची चटणी आणि टेक्सटाईल्सचा व्यवसाय या तीन मुद्द्यावरच चर्चा येवून थांबते. माझ्यासारख्या अस्सल सोलापूरी माणसाला ही गोष्ट अपमानास्पद वाटते. कारण माझं सोलापूर एवढ्यापुरतंच मर्यादीत नाहीये. सोलापूर म्हणलं की अनेक गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे. त्यात सोलापूरच्या भौगोलिक परिस्थीतीबरोबरच तिथली खाद्यसंस्कृती, कन्नड, मराठी, तेलगु आणि हैदराबादी घाटणीची अफलातून उर्दुमिश्रीत हिंदी भाषिक माणसे या सर्वांना बरोबर घेवुन, त्यांचा समतोल साधत प्रगतीपथावर मार्गक्रमण करणारी सोलापूरची खर्‍या अर्थाने सहिष्णु मानवी संस्कृती, आजुबाजुची देवस्थाने, सोलापूरातील शैक्षणिक संस्था, स्वातंत्र्याच्या चळवळीत सोलापूरचा सहभाग, चार हुतात्म्यांची अमरगाथा या बरोबरच सोलापूरचा मानबिंदु आणि ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाचाही विचार होणे अत्यावश्यक आहे. चला केवळ गप्पा मारण्यापेक्षा, गप्पा मारत मारत एक आढावाच घेवुयात सोलापूरच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा !

सुरुवात करुयात सोलापूरची अमरगाथा सांगणार्‍या पोवाड्यापासून…

वंदन करुनी भूमातेला, भाळी टिळा लावितो,
स्वातंत्र्याच्या होमी पडले त्यांची कथा सांगतो, सांगतो, त्यांची कथा सांगतो.
बीज पेरिले स्वातंत्र्याचे, वृक्ष आजि दिसतसे,
त्या वृक्षाला निजरक्ताचे पाणी घातले कसे? सांगतो, पाणी घातले कसे.
ऐक रसिका ऐक कथा हि प्राण आणुनी कानी,
देह अर्पिला निष्कामाने स्वातंत्र्याच्या रणी सांगतो त्यांचीच मी कहाणी

हेरंबा गणनायका ओ ssssssssssssssssssss
हेरंबा गणनायका, गौरीबालका, जगतचालका, नमितो तुजला मी त्रिवार,
भक्ती मनी दाटे अपरंपार, शाहीर करती जयजयकार हो जी जी……
शाहीर करती जयजयकार हो जी जी…..

ही नगरी सोलापूर …….. हो sssssssssssssssssssssssss हो
ही नगरी सोलापूर, माती कणखर, देव सिद्धेश्‍वर,
तयाची किरपा गावावर
शिवशंभुचा अवतार, म्हणुनी त्याचा जयजयकार…………हो जी जी
रूपाई भवानी आहे सदा पाठीशी हो जी जी ….
संकटी रक्षितो माझा देव खंडोबा हो जी जी ….
सावळी विठाई चंद्रभागेच्या तीरी हो जी जी …
तिचे पुत्र खरे गुणवंत, तसे शिलवंत, आणि यशवंत
जगी ठरले ….
मृत्यूला जिंकून ते उरले
हुतात्मे धन्य धन्य झाले हो जी जी……
हुतात्मे धन्य धन्य झाले हो जी जी……

हा पुर्ण पोवाडा तुम्हाला “सोलापूरनगरीचा पोवाडा” इथे वाचता येइल आणि “सोलापूरनगरीचा पोवाडा“>इथे डाउनलोड करुन ऐकता येइल.

सोलापूर…माझं सोलापूर…
सिद्धेश्वराची पुण्यनगरी सोलापूर..
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच इंग्रज सरकारला हाकलून देऊन ९ ते ११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगलेल्या बहाद्दर जनतेचे सोलापूर.
देशात पहिल्यांदा तिरंगा महानगर पालिकेवर फडकला तो सोलापुरच्या महानगर पालिकेवर.
मार्शल लॉच्या दरम्यान आपल्या प्राणांचं बलिदान केलेल्या चार हुतात्म्यांचं सोलापूर…
सोलापूरी चादरीसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर…
एका बाजुला तुळजापूरची आई भवानी आणि एकीकडे अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ माऊलींच्या कृपाछत्राखाली वसलेले सोलापूर
‘भेटेन नऊ महिन्यांनी’ या अजरामर ओळी लिहिणार्‍या कवि कुंजविहारींचे सोलापूर..
चीनच्या सारख्या परक्या देशात भारताचे नाव उंच करणारे भारताचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणिसांचे सोलापूर !
‘हटा तटाने पटा रंगवूनी जटा धरीशी का शिरी, मठाची उठाठेव का करी?” असे म्हणत शुभरायबुवाची कान उघाडणी करणार्‍या शाहीर रामजोशींचे सोलापूर…..
समोरच्या पडद्यावर अमिताभ असो वा मिथुन की अजय देवगण असो, चिरंजिवी असो वा महेशबाबु की रवी तेजा असो, अर्नॉल्ड असो वा जॅकी चॅन वा टॉम हँक्स असो… आमचं नातं चित्रपटांशी म्हणत, यच्चयावर सर्वच भल्या-बुर्‍या चित्रपटांना डोक्यावर घेणार्‍या चित्रपटवेड्यांचं सोलापूर…
एखाद्याला जिव लावला की त्याच्यासाठी जिव द्यायला आणि वेळ पडल्यास घ्यायलाही तयार असणार्‍या दिलदार लोकांचं सोलापुर
मराठी, कन्नड, उर्दु मिश्रीत हैदराबादी हिंदी, तेलगु अशा अनेक भाषांनी सजलेलं सोलापुर
आमच्या सोलापूराबद्दल काय आणि किती बोलावं ….

थोडासा इतिहास…
असे मानले जाते की सोलापुर हे नाव सोळा गावांमुळे पडले. आदीलपुर, अहमद्पुर, चपळदेव, फतेपुर, जामदारडी, कळजापुर, खडरपुर, खंडेरवकिवाडी, मुहम्मदपुर, रानापुर, संदाळपुर, शैखपुर, सोलापुर, सॉन्नलगी, सोनपुर आणि वैदाकवाडी. पण कल्याणि काळातले श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या लेखातुन, त्यांचा साहित्यातुन असे कळते की आधी याला ‘सोन्नलगे’ म्हणायचे, ज्याचे नंतर ‘सोन्नलगी’ आणि त्या नंतर सोलापुर झाले. आर्यभट्ट, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव आणि ब्रहण्मणी असे कित्त्येकांनी राज्य केले. यादवांचे राज्य असे पर्यंत याला ‘सोन्नलगी’ म्हंटले जायचे. नंतरच्या काळात त्याचे ‘सोलापुर’ मध्ये रुपांतर झाले.

सोलापूर शहरापासुन ३० किमी अंतरावरील मोहोळच्या जवळ असलेल्या कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत लेखात असा उल्लेख आहे की, यादतवांच्या उतरत्या काळात याला ‘सोनलिपुर’ म्हंटले जायचे. सोलापुर किल्ल्यात सापडलेल्या दोन शिलालेखात दोन वेगे वेगळ्या नावांचा उल्लेख आहे. एका लेखात ‘सोनालपुर’, तर दुसर्‍या लेखात ‘संदालपुर’ म्हंटले जायचे. नंतर ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी याचे ‘शोलापुर’ केले, आणि नंतर त्याचे आजच्या नावात म्हणजे ‘सोलापुर’त रुपांतर झाले.

सध्याचा सोलापुर जिल्हा हा अहमदनगर, पुणे आणि सातार्‍याचा भाग होता. १८३८, १८६४, १८७१, १८७५ आणि १९५६ अश्या विभागण्या होत होत १९६० मध्ये सध्याचा सोलापुर तयार झाला. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत.

सोलापूर म्हणलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि ग्रामदेवता आई रुपाभवानी ! खरेतर सच्चा सोलापूरकर सोलापुरला सिद्धेश्वर नगरी म्हणुनच ओळखतो, मग त्याचं मुळचं जुनं नाव सोन्नलगी असलं तरी. खुप पुर्वी साधारण १२ व्या शतकात सिद्धेश्वर नामक भक्ताच्या तपस्येवर प्रसन्न होवून श्री शिवशंकराने त्यांना दर्शन दिले. त्या नंतर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात अनेक ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केली. त्यापैकी पहिलं स्थान म्हणजे भुइकोट किल्ल्याच्या मागे तळ्यात वसलेलं श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदीर. सिद्धेश्वर यांनी स्थापना केली, म्हणुन इथे शिवालाही सिद्धेश्वर याच भक्ताच्या नावाने ओळखले गेले. श्री सिद्धेश्वर महाराजांनी पुढे जिवंत समाधी घेतली. सिद्धेश्वर मंदीरातच त्यांची संजिवन समाधी आहे. सोलापूरात मध्यवर्ती असलेलं श्री सिद्धेश्वराचं देखणं, मनोहारी आणि भर गर्दीत देखील नेहमी शांत असणारं मंदीर हा सोलापूरकरांच्या श्रद्धेचा आणि अभिमानाचा विषय असतो. एका भव्य जलाशयाच्या (तळ्याच्या) मधोमध असलेलं सिद्धेश्वराचं रम्य आणि निसर्गसुंदर देवस्थान हे सोलापूराचं शक्तीस्थळ आहे असं म्हटलं तरी त्यात गैर काही नसावे. सिद्धेश्वर मंदीराला लागुनच असलेला सोलापूरचा भुइकोट किल्ला आता फक्त “इमारत कभी काफी बुलंद हुआ करती थी” एवढं सांगण्याच्याच पात्रतेचा उरलेला आहे. आता किल्ल्यात महानगरपालिकेने बाग केलेली आहे. अर्थात आज तीदेखील कधी काळी खुप सुंदर होती असे म्हणायची वेळ आलेली आहे.

मार्शल लॉ

उगवत्या मराठी साम्राज्याची जेव्हा इंग्रज चर्चा करीत होते  तेव्हा त्या निवडक जिल्ह्यांमध्ये त्यांनी सोलापूरचाही समावेश केला होता. त्यात शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरने इंग्रजांना लढा दिला. १९व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे मध्यमवर्गीय लोकांमध्ये राजकीय आणि सामजिक जाणीवा वाढीस लागल्या होत्या तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर न्या. रानडे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी भारावून गेले होते. १९२० मध्ये जोमाने पसरलेल्या राष्ट्रीय चळवळीचा परिणाम सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्येही दिसून आला.लोकमान्य टिळकांनी १९२० मध्ये सोलापूरात दिलेल्या भाषणाचा हा परिणाम म्हणुन पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता..

गिरणी कामगारांची सरकार आणि भांडवलदारांविरुद्धची चळवळ जोर धरू लागली .यात ७ कामगार मृत्युमुखी पडले तर शेकडो जखमी झाले. गिरणी कामगारांनी केलेला हा हरताळ ही देशातल्या महत्त्वपूर्ण क्रांतीची नांदीच होती. १९३० मधील गांधीजींच्या दांडीयात्रेनंतर <strong>६ एप्रिल १९३० रोजी सोलापूरातील म्युनसिपल कॉर्पोरेशन एक बिल संमत केले आणि राष्ट्रीय ध्वजाचे रोहण करण्यात आले</strong>. या घटनेनंतर सोलापूरात जे काही घडले  ते इतिहासात सुवर्णाक्षरात लिहून ठेवले गेले आहे. ५ मे १९३० रोजी मध्यरात्री गांधीजींना अटक करण्यात आल्याची बातमी सोलापूरात पसरली. या विरोधात जनतेने मोर्चे काढले, देशभक्तीपर गीते गायिली. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा गिरणी कामगार कामावर गेले तेव्हा त्यांनी ही बातमी ऐकताच याविरुद्ध निदर्शने केली. गिरण्या बंद झाल्या, जनतेने रेल्वे अडविल्या, डब्बे जाळल, शिंदीची झाडे पाडली. यात मॅजिस्ट्रेट जखमी झाले, पोलिस स्टेशन जाळले. परंतु सायंकाळी सगळ्या नेत्यांनी शांततेचा मार्ग अवलंबायचे असे ठरविले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

८ मे १९३० रोजी सरकारने बजाज आनि नरीमन यांना अटक केली. नरीमन युवकांचा लाडका नेता होता.जनतेने या घटनेचा तीव्र निषेध केला. जगन्नाथ सिंदे आनि कुर्बान हुसेन यांनी या प्रिय नेत्यांच्या छायाचित्रांची मिरवणूक काढण्याचे ठरविले. आणि त्यांनी तसे केलेही. काही युवक शहरातील रुपाभवानी भागात शिंदीची झाडे पाडण्यास गेले. हे पोलिसांना कळताच त्यांनी गोळीबार सुरु केला. जेव्हा पोलिसांच्या गोळ्या संपल्या तेव्हा लोकांनी त्यांना पकडून त्यांच्या दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी लोकनेते मल्लप्पा धनशेट्टी तेथे आले आणि त्यांनी जनतेला शांत केले व कलेक्टर नाईटना लोकांच्या तावडीतून सोडविले. पण या गोष्टीची जराही जाणीव न ठेवता पोलिसांनी जनतेवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यात कितीतरी बायका मुले म्रुत्युमुखी पडले. तेथे शंकर शिवधर नावाचा नेता मृत्युमुखी पडला आणि तोच पहिला हुतात्मा ठरला. हे सगळे पाहून जनतेने सरकारी कार्यालये पेटविली, सरकारी कर्मचार्‍यांवर द्गडफेक केली. या सगळ्याकडे नाईट यांनी दुर्लक्ष केले. जेव्हा सगळे शांत झाले पोलिसांनी त्यांच्या गाड्यांमधून गोळीबार सुरु केला. दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत पोलिसांनी शहराच्या प्रत्येक गल्ली बोळांमधून गोळीबार केला. यात ५० निष्पाप जीवांचा बळी गेला.ह्या घटनेची सविस्तर माहिती रामभाऊ राजवाडेंच्या “कर्मयोगी” या साप्ताहिकात मिळेल(१० मे १९३०). या घटनेने संपूर्ण इंग्रज साम्राज्य हादरून गेले होते. मिनी जालियानवाला घटनेची छोटी आवृत्ती म्हणून ओळखल्या जाणारी सोलापूर मार्शल लॉ चळवळ हे संपूर्ण स्वातंत्र्य लढय़ातील एकमेव उदाहरण आहे. परंतु तरीदेखील त्याची इतिहासात फारशी दखल घेतली गेली नाही.

या सगळ्या प्रकारामुळे  भयभीत झालेली जनता सोलापूर हे सुरक्षित ठिकाण नाही असे मानून सोलापूर सोडून स्थलांतरीत झाली. जवळ जवळ २५००० लोक सोलापूर सोडून निघून गेले.या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय नेत्यांनी सोलापूरला स्वतंत्र घोषित केले. ३ दिवस सोलापूर स्वतंत्ररित्या कार्यरत होते. स्वतःच्या यंत्रणेखाली जखमींची देखभाल केली गेली.सगळे अगदी स्वतंत्र निर्भीड!!  अगदी अश्याच प्रकारची घटना १९७१ मध्ये पॅरीस मध्ये घडली. निवृत्त पोलिस अधिकारी इमाम शेख यांच्या मदतीने नाईटने सोलापूरची क्रांती चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक द्वेषापोटी खानने सोलापूरात मार्शल लॉ लागू केला. अश्या तर्‍हेने महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापूरात मार्शल लॉ लागू झाला..

संपूर्ण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ात १९३० साली एकमेव सोलापुरात मार्शल लॉ लागु झाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच यात सोलापूरच्या बहाद्दर जनतेने इंग्रज सरकारला हाकलून देऊन ९, १० आणि ११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. त्या वेळी सोलापूर नगरपालिकेवर युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला होता.

मार्शल लो असताना सोलापुरात राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यात आली होती. राष्टनेते श्री. व्ही.व्ही. साठे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रध्वजासमेत सोलापुरात आले. त्यांना स्टेशनवरच अटक झाली. त्यानंतर या झेंडा सत्याग्रहासाठी सम्पूर्ण देशभरातून लोक सोलापुरात येवून दाखल होवून लागले. सरतेशेवटी स्वतः गव्हर्नर मुंबईहून येथे आले. व त्यांनी पाहाणी केली. नंतर ३० जून १९३० या दिवशी तब्बल ४८ दिवसांनी सोलापुरातील मार्शल लो मागे घेण्यात आला. कोर्टाला आग लावल्या प्रकरणी १८ ऑक्टोबर१९३० रोजी निकाल देण्यात आला. जगन्नाथ परदेशी, छन्नूसिंग चंदेले, डॉ. अंत्रोळीकर या तिघांना दोषी ठरविण्यात आले.

या घटनेचा सूड उगवण्यासाठी पुण्यात वासुदेव गोगटे याने हॉटसनवर हल्ला केला. पण चिलखतामुळे हॉटसन वाचला. त्याला या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले असता त्याने ,” ब्रिटीश सरकारच्या सोलापुरातील अमानुष कृत्याचा निषेध म्हणून मी हे केले” असे सांगितले. अशा प्रकारे सोलापुरातील मार्शल लो भारताच्या स्वातंत्र लढ्यातील एक महत्वाची घटना होती.

सोलापूरातील हा पहिलाच मार्शल लॉ असल्याने जनतेला बरेच सहन करावे लागले.गांधी टोपीवर बंदी घालण्यात आली, लोकांना निर्दयपणे मारण्यात आले, म्युनिसिपल प्रमुख माणिकचंद शहा यांनी राष्ट्रध्वज काढण्यास नकार दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.पोलिसांनी धनशेट्टी,सारडा, हुसेन, शिंदे यांची धिंड काढली.या चौघांना पुण्याच्या सेशन कोर्टाने ८ मे १९३० रोजी झालेल्या पोलिसाच्या मृत्युसंदर्भात  दोषी ठरवून  मरेपर्यंत फाशी देण्याचा आदेश काढला.खरेतर यात या चौघांची काहीच चूक नव्हती. फासावर चढताना ते जयहिंद, वंदे मातरम ई.नारे देत फासावर चढले. लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या ब्रिटीशांनी ४ निष्पाप लोकांचा बळी दिला. पुण्यात या विरोधात बरीच निदर्शने झाली. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सर्व भागातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. रविंद्रनाथ टागोरांनी देखील लंडन टाईम्स मध्ये या घटनेचा निषेध केला.

त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

१. मल्लप्पा धनशेट्टी: “पेंढारकर” पेढी मध्ये कारकून म्हणून कार्यरत.यांनी नाईटचा जीव वाचविला.
२. जगन्नाथ शिंदे: युवानेता, अप्रतिम वक्तृत्वशैली. मिलिटरी लॉ अंतर्गत शिक्षा झाले.
३. किसानलाल सारडा: श्रीमंत मारवाडी. खरेतर राजकारण, समाजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हिंदू समाजाचे सुदृढीकरण केले.
४. कुर्बान हुसेन:  गिरणी कामगारांचा लाडका युवा नेता. हिंदु मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील.

या घटनेनंतर या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे वेगवेगळ्या जाती-धर्माचे चार देशभक्त फासावर गेले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांचे पुतळे पूर्वीच्या कामगार बागेजवळ व सध्याच्या पार्क स्टेडियमजवळ उभारण्यात आले आहेत. चार हुतात्मा चौक म्हणून हा परिसर ओळखला जातो. हे चार हुतात्मे तरूणांसाठी स्फूर्तिस्थाने आहेत. येथे आल्यानंतर तरूणांमध्ये वीररस निर्माण व्हावा म्हणून या चार हुतात्मा पुतळ्यांचे दिमाखदार स्मारक निर्माण करण्यात आले आहे. राष्ट्रपुरूषांचे स्मृती सर्वासाठी स्फूर्तीदायी असतात. मार्शल लॉमधील चार हुतात्म्यांचे हे पुतळे आम्हा सोलापूरकरांसाठी मानबिंदू आहेत.

सोलापूरची खादगी..

मुळचा सोलापूरी माणुस अस्सल खवैय्या आहे. आम्ही आमच्या पुरती मराठीतली एक म्हण मॉडीफाय करुन घेतलेली आहे. आम्ही म्हणतो “चवण्याचे खाणार त्याला सोलापुरकर देणार

आमच्या सोलापूरच्या शेंगांची बातच काही वेगळी. त्यामुळे ईथल्या शेंगाची चटणी, शेंगा पोळ्या आणि ठेचा खूपच प्रसिद्ध् आहे. तेल न घालता सुद्धा तेलकट, लालबुंद असुन सुद्धा कमी तिखट, जाड्या भरड्या अश्या शेंगाच्या चटणीची बातच काही और. इतक्या सुंदर चवीचे घटक पण फक्त मोजकेच, भाजक्या शेंगा ,तिखट,मीठ,जीरे आणि लसूण. सगळे जिन्नस एकत्र करुन ऊखळात कुटले की झाली शेंगा चटणी तयार. ह्याशिवाय संक्रांतीच्या दिवसात शेंगाचाच अजून एक केला जाणारा लै भारी प्रकार म्हणजे शेंगा पोळी. सोलपुरच्या पदार्थांची खासियत हीच की कमीत कमी घटक वापरुन चवदार पदार्थ करायचा. त्याप्रमाणे शेंगा +गूळ एकत्र करुन कुटायचा आणि कणकेच्या पारीत हे सारण घालून पातळ अशी पोळी लाटून तगड या एका वेगळ्या प्रकारच्या पत्र्यावर लाटायच्या आणि तव्यावर खरपूस भाजायची आणि नंतर तूप लावून खायची……स्वर्गसुख म्हणजे आणखी काय !!!!(ताटातील पदार्थ (डावीकडून सुरुवात): दही शेंगाचटणी, शेंगापोळी, बाजरीची कडक भाकरी. तिखट आमटी. भरली वांगी, गरगट्टा)(ताटातील पदार्थ (डावीकडून सुरुवात): दही शेंगाचटणी, शेंगापोळी, बाजरीची कडक भाकरी. तिखट आमटी. भरली वांगी, गरगट्टा)

पोळी तर झालीच पण भाकरी आणि तत्सम प्रकरांमध्ये सुद्धा आम्ही फेमस आहोत. पुरीसारखी टम्म फुगलेली ज्वारीची कडक पण तरीही कागदासारखी आणि कागदाएवढी पातळ भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि दही ! बास्स…. कुठलाही सोलापुरकर काय किंवा एकदाच चव चाखलेला बाहेरगावचा माणुस काय, कुणीही ही चव विसरणार नाही. बरं भाकरीची पद्धत ही नेहमीच्या भाकरीं सारखीच फक्त भाजून झाल्यावर चुलीच्या मागे ठेवायची. पद्धत जरी तीच असली तरी चव मात्र फक्त आमच्या सोलापुरातच. अशीच संक्रांतीच्या दिवसात केली जाणारी तिळ लावुन केलेली बाजरीची भाकरी . हे सगळे लिहताना आता कधी एकदा संक्रांत येतेय असे झाले आहे. भाकरीचाच अजून एक प्रकार म्हणजे धपाटे. ज्वारीच्या पिठात तिखट,मीठ, ठेचलेला लसूण,हळद, हिंग घालून एखाद्या कापडावर पातळ थापून भाजलेला प्रकार तो हाच.

भाकरीचे प्रकार झाले आता तोंडी लावायला काहीतरी हवेच. काहीतरी म्हणजे काय तर एक साधा, सोप्पा पदार्थ तो म्हण्जे मिरचीचा खर्डा/ठेचा. ईतर प्रकारांप्रमाणेच अगदी मोजकेच घटक वापरले जातात. प्रथम एका तव्यावर सर्व साधारणपणे भाकरी करून झाल्यावर त्याच तव्यावर मिरच्या व लसूण तेल टाकून ठेवायच्या. नंतर त्याच्यात अक्खे शेंगदाणे व मीठ घालून वाटीने तव्यावरच ठेचायचा (कच्चे टमाटेही मऊ परतुन घालु शकता). झाला ठेचा तयार.

ह्या पारंपारिक पदार्थाबरोबरच चाट प्रकारातही आम्ही मागे नाहि आहोत्.पुण्या-मुंबईतल्या सारखी गरम व २-३ प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्यांची पाणीपुरी नाही तर एका पाण्यातच आंबट, तिखट, गोड चवीची एकदम थंडगार अशी पाणीपुरी खायची तर एकदा सोलापुरात ‘पार्क’ ला भेट द्याच. हे पार्क म्हण्जे बाग नाही बरंका.. तर ही आहे सोलापुरची चौपाटी. इथलाच अजून एक पदार्थ “भैय्या ची भेळ”, “अनेकात एक आमचाच भैय्या” हे त्याच्या भेळेच्या गाडीवर लिहीलेले वाक्य तो खरे करून दाखवतो आणि एक प्लेट खाऊन पोट भरते पण मन काही भरत नाही.

शाकाहारी खादाडी :

चार पुतळ्यासमोरचे हॉटेल सिटी पार्क, हॉटेल ऐश्वर्या, टिळक चौकातले श्री दत्त इडली गृह, सोलापूर बस स्टँड समोरचे सोलापुर इडली गृह, सुप्रजाची पावभाजी आणि लांबोटीचा खुसखुशीत आणि झणझणीत मक्याचा चिवडा, भाग्यश्रीचा खमंग चिवडा आणि मुंबईच्या जंबो वडापावच्या तोंडात मारेल असा झकास भाग्यश्री वडा, नव्या पेठेतली आण्णाची मिरची भजी, पांचाली, रसिक सारखी गुजराथी हॉटेल्स, सात रस्त्यावरची सिद्धेश्वरची भेळ आणि महादेवची डिस्कोभजी ही सोलापूरच्या शाकाहारी मंडळींची आवडीची ठिकाणं ! याचबरोबर सोलापूर – पुणे रोडवरीला सिद्धेश्वर, हॉटेल अविराज, नसले बंधुंचे हॉटेल ही देखील काही चांगली हॉटेल्स…

मांसाहारी मंडळींसाठीदेखील बरीच ठिकाणे आहेत बरंका….
पण फेमस म्हणाल तर ‘सावजी’ची सगळी मांसाहारी हॉटेल्स, एंप्लॉयमेंट चौकातलं ‘सावजी बिर्याणी’ आणि हैदराबाद रोडवरचा ‘चाचा’चा धाबा ! इथलं मटणाचं लोणचं खायला लोक कुठुन कुठुन येत असतात. विजापूर वेशीतली कित्येक हॉटेल्स खास मोगलाई आणि हैदराबादी पद्धतीच्या सामिष जेवणासाठी लोकप्रिय आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिटी पार्क सारखी जरा मोठी हॉटेल्स सोडली तर खादाडीची बहुतेक सगळीच ठिकाणं सर्वसामान्याच्या खिश्यालाही परवडणारी.

आमच्या सोलापुरात आणी आजुबाजुला पहाण्या सारखंही खुप आहे. दोन ते तीन दिवसात सारं फिरुन होईल. आता सोलापुरातच पहा ना इथे पार्क, भुईकोट किल्ला, श्री सिद्धेश्वर देउळ, पार्क, कंबर तलाव वगैरे तर आहेतच, पण शेजार पाजारची ठिकाणं म्हणाल तर तुळजापुर, अक्कलकोट, नळदुर्ग, पंढरपुर सुद्धा आहेत. सारं कसं हातभर अंतरावरचं आहे बघा.

(सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज, डावीकडून: आई तुळजाभवानी, आजोबा गणपती, सिद्धेश्वर महाराजांची योग समाधी, उजवीकडे: श्री मल्लिकार्जुन)

(कंबर तलाव, नळदुर्ग किल्ला (नर मादी धबधबा), सिद्धेश्वर तलाव, उजवीकडे : १५ ऑगस्टला भुईकोट किल्ल्यावर फडकवलेला झेंडा, इंद्रभुवन (सोलापूर महानगरपालिका), चार हुतात्म्यांचे अर्धपुतळे)

सोलापूरची कधी आशिया खंडाचे मँचेस्टर ही ओळख होती. पण आता ही ओळख बदलतेय. दुर्दैवाने पुसली जातेय. लक्ष्मी विष्णु, नरसिंग गिरजी, जुनी मिल या सोलापूरची शान असलेल्या टेक्स्टाईल मिल्स आता बंद पडल्या आहेत. तिथे त्या जागांवर बिल्डर माफियाचा कब्जा होतोय. पुर्व भागात अजुनही तशा बर्‍याच समृद्ध मिल्स आहेत. पुलगम, चिल्का, क्षीरसागर, चाटला आणि पुर्व भागातील साळी (पद्मशाली) बांधवाच्या घरा-घरातून चालणारे पॉवरलुम्स, हँडलुम्स आजही चालतात. सोलापूरातून आजही चादरी, बेडशीट्स, टॉवेल्स जगभर निर्यात होतात. परमेश्वर करो आणि माझ्या या सिद्धेश्वरनगरीला तिची जुनी ओळख पुन्हा प्राप्त होवो.

आमच्या काही खास सोलापुरकरांची नावे :

स्वातंत्र्य सैनिक :
जगन्नाथ शिंदे, मल्लपा धनशेट्टी, कुर्बान हुसेन आणी किसन सारडा.
तुलसीदास जाधव, चंद्रशेखर म्हमाणे, शंकरराव मोहिते-पाटील, माने गुरुजी.

शंकर राव मोहिते पाटील हे फक्त स्वातंत्र्य सैनिक नव्हते तर सहकार चळवळीचे मुख्य नेते होते. त्यांनी सोलापुर जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांसाठी सहकार चळवळ सुरु केली.

चित्रपट सृष्टी :
डॉ. जब्बार पटेल( चित्रपटः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जैत रे जैत, सिंहासन, उंबरठा,  नाटकः शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल्,अशी पाखरे येती)
शशीकला(मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू)
सरला येवलेकर
अतुल कुलकर्णी
वेदिका कुमार(तामीळ, तेलुगु , कानडी चित्रपटांतील नायिका)
फय्याज (गायीका, अभिनेत्री)
दिपक देशपांडे (पहिला हास्य सम्राट)

राजकीय व्यक्तिमत्त्व
सुशीलकुमार शिंदे (युनोमध्ये भारताचे पहिले नेतृत्व)

कलाक्षेत्र 
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि वादग्रस्त चित्रकार कै. एम.एफ हुसेन
शिल्पकार भगवान रामपुरे (मुंबईतील स्टॉक एक्स्चेंजसमोर उभ्या असलेल्या ‘बुल’ चे निर्माते)

नामांकित व्यावसायिक
वालचंद हिराचंद दोशी: २३ नोव्हेंबर १८८२ ते ८ एप्रिल १९५३ भारतात सर्वप्रथम आधुनिक बंदर, विमान निर्माण आणि कार तयार करण्याचा कारखाना यांनी सुरु केला

क्रीडा क्षेत्र
सलील अंकोला : १९९६च्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या भारतीय संघात समावेश,
पॉली उम्रीगर – क्रिकेटपटू
अनघा देशपांडे- महिला क्रिकेट पटू

साहित्यिकः
राम जोशी
कवी कुंजविहारी
रा.ना. पवार
श्रीराम पुजारी
डॉ. निर्मलकुमार फडकुले
कवी संजीव
दत्ताहलसगीकर                                                                                                                                                                                                                                        मारुती चितमपल्ली

संगणक क्षेत्रातील महत्वाचे नाव : अच्युत गोडबोले.

अजुन काय काय आहे आमच्या सोलापुरात ?

सोलापूरातील महत्वाच्या शिक्षणसंस्था

वालचंद इंन्स्टिट्युट ऑफ़ टेक्नॉलॉजी
शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर
एस.ई.एस. तंत्रनिकेतन, सोलापुर
कॉलेज ऒफ़ आर्किटेक्चर, सोलापुर
कॊलेज ऑफ़ फ़ार्मसी, सोलापुर
डी.बी.एफ़. दयानंद कॉलेज ऑफ़ आर्ट्स & सायन्स, सोलापूर
डीजीबी दयानंद लॉ कॉलेज, सोलापूर
दयानंद कॉलेज ऒफ़ एज्युकेशन, सोलापूर
हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ़ कॉमर्स, सोलापूर
प्रि. के.पी. मंगळवेढेकर कॉलेज ऑफ़ मॅनेजमेंट रिसर्च & डेव्हलपमेंट, सोलापुर
संगमेश्वर कॉलेज, सोलापुर

ही झाली महत्वाच्या काही महाविद्यालयांची यादी. संपुर्ण यादी इथुन उतरवून घेता येइल.

आमचे प्रसिद्ध पदार्थ
पाणीपुरी
शेंगाचटणी
हुरडा
ज्वारीची, बाजरीची भाकरी
ठेचा/खरडा
सावरकर मैदानाजवळचं झणझणीत रगडा पॅटीस एकदा चाखायलाच हवं…

आमचे खाऊचे अड्डे
पार्क(पाणी पुरी, भेळ, कचोरी)
सुप्रजा(पावभाजी हुतात्मा बागेजवळ)
इडली गृह(इडली द. कसबा)
कृष्णा(आईसक्रीम- सात रस्ता)
कामत हॉटेल(चहा जुना एंप्लोयमेंट चौक)
हॉटेल सिटी पार्क(पार्क)
नसले ढाबा(पुणे हायवे)
चंद्रबळ(पुणे हायवे)

आमच्या बागा
राणीची बाग (विजापूर रोड)
किल्ल्याची बाग(लकी चौक)
संभाजी तलाव(कंबर तलाव विजापूर रोड)
रेवणसिद्धेश्वर प्राणीसंग्रहालय (विजापूर रोड)
हुतात्मा बाग(सावरकर मैदान)
चार पुतळे(पार्क)

आमची देऊळे
श्री सिद्धेश्वर मंदिर
श्री मल्लिकार्जुन मंदिर
श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर
श्री राघवेंद्र मंदिर
रुपाभवानी मंदिर
आजोबा गणपती
गजानन महाराज मंदिर
साईबाबा मंदिर

आमची ग्रंथालये
हिराचंद .नेमचंद वाचनालय

भारत वाचनालय, नवी पेठ (सर्व प्रकारच्या शैक्षणीक (पदवीच्या सर्व शाखा तसेच अभियांत्रिकीच्या पुस्तकांसाठी)

आमची प्रेक्षणीय स्थळे
चार हुतात्मा स्मारक
भुइकोट किल्ला
हिप्परगा तलाव
महानगर पालिका भवन

आमची चित्रपटगृहे
आशा
उषा
मीना
चित्रा
प्रभात
गेंट्याल
लक्ष्मी(७० मीमी)
कल्पना
कलामंदिर

भागवत चित्रमंदीर (जेव्हा उर्वरीत महाराष्ट्राला कदाचित भारताला सुद्धा मल्टीप्लेक्स ही संकल्पनाही माहीत नव्हते तेव्हापासुन आमच्या सोलापुरात सहा स्क्रीन्स (सिनेमागृहे) असलेलं भागवत चित्रपटगृह संकुल अस्तित्वात आहे 🙂

भेट देण्याजोगी जवळपासची ठिकाणे

पंढरपूर
तुळजापूर
अक्कलकोट
विजापूर(गोलघुमट)
गाणगापूर
हत्तरसंग  कुडाल
नळदुर्ग

निंबाळ येथील गुरुदेव रानडेंचा मठ

तर मंडळी  असं आहे आमचं सोलापुर….

यावं मंडळी, यावं आपण सोलापुराला
इथे येवूनी नतमस्तक व्हा सिद्धेश्वराला
कुडल खजिना किल्ला साक्ष आमच्या इतिहासाला
हुतात्म्याच्या गावी या जरा विसाव्याला,

यावं एकदा संक्रांतीच्या गड्ड्याला,
फिरणाया झोपाळ्याला, शोधनाया पन्नालाला,
भेळ, पाणीपुरी, पाव-भाजी, रगडा, पार्क चौपाटीला.
अन आत्मा तृप्त करणाया ’कृष्णा’ला.

शाल मायेची चादर घ्या या चाटला पुलगमला,
संध्याकाळी फेरफटका मीना, भागवतला,
रात्रीला बेत नक्की सावजी हाटेला.

गोड मानुनी घ्यावे आमच्या पाहुणचाराला
हातभार लागे मग आमच्या विकासाला.
एवढ्या माहीती वरुन एकदा तरी सोलापुरला चक्कर मारावं वाटेलच तुम्हाला यात शंका नाही. आणी हो, या व्यतिरीक्त अजुन काही माहीती हवी असेल तर आम्हास संपर्क साधायला विसरु नका.

तर मग कधी करताय बेत सोलापुरचा…..  ?

———————————————————————————————————
———————————————————————————————————
पुर्ण पोवाडा तुम्हाला <a href=”https://docs.google.com/file/d/0BwCHY6Ve_4hITDlOM1QtODBuV0k/preview&#8221; title=”सोलापूरनगरीचा पोवाडा”>इथे</a> वाचता येइल आणि <a href=”https://docs.google.com/open?id=0BwCHY6Ve_4hIOGdqdGhLQjNMQWc&#8221; title=”सोलापूरनगरीचा पोवाडा”>इथे</a> डाउनलोड करुन ऐकता येइल.
———————————————————————————————————
———————————————————————————————————
श्रेयनामावली
१. सौ. राजेश्वरी आपटे
२. श्री. रोहित आपटे
३. गायन- कु. श्रुती विश्वकर्मा , तबला- श्री. मुकुंद दातार, संकलन- सौ. दिपाली दातार
४. प्रा. मोहिनी पिटके
५. श्री. सु. ना. मित्रगोत्री
६. सौ. तेजस्विनी करकंटी

आम्ही सोलापूरकर !!

 
 
%d bloggers like this: