RSS

Category Archives: प्रासंगिक

वारसा

मी व्हाटसॅपवरील एका फॅमिली ग्रुपचा सभासद आहे. (आता आहे, त्याला कोण काय करणार? दुर्दैवाचे दशावतार भोगूनच संपवावे लागतात) माझ्या एका  मोठ्या मावसभावाने तिथे जोडून घेतलंय मला. दादाचा खूप जीव आहे माझ्यावर, माझ्या पत्नीवर . त्यामुळे मध्येच सोडून पळताही येत नाही) असो, मुद्दा फॅमिली ग्रुपचा नाही. मुद्दा तिथे रोज चालणाऱ्या व्हर्चुअल प्रवचनांचाही नाही. खरेतर मला कधीकधी वाटते की ही सोशल नेटवर्क्स हा केवढा मोठा आधार आहे कीर्तन , प्रवचनांना. आपली संस्कृती (म्हणजे काय असे विचारणे हा फाऊल गणला जाईल) या अशा व्हर्चुअल विचारवंतामूळे तर टिकून आहे. 

तर मुद्दा असा आहे की या ग्रुपवर एक सेवानिवृत्त काका आहेत. सर्वजण त्यांना नानाजी म्हणतात. या नानाजींना आपल्या संपूर्ण कुळाची वंशावळ बनवायचीय. त्यावर एक ग्रंथ लिहायचाय. विशेष म्हणजे त्यांच्या या कुळातील कुणीतरी पूर्वज म्हणे कुठल्यातरी समृद्ध राजघराण्याच्या  दरबारात राजआचार्य (आचारी असेल त्याचे यांनी आचार्य केलेय असे माझी बायको म्हणते)  म्हणून काम करत होता म्हणे. (त्याचे नावही कुणाला माहीत नाही) पण त्यामुळे नानाजींना कायम आपल्या कधीही आणि कुणीही न ऐकलेल्या, पाहिलेल्या या पूर्वजाची कायम आठवण येत असते आणि त्या भारावलेल्या अवस्थेत ते नेहमी वंशावळ-वंशावळ खेळत असतात. मग ते आपल्या समृद्ध (?) वारशाबद्दल भरभरून बोलतात. त्या आठवणी, ती माहिती जतन करणे हे आपले कर्तव्य आहे हे अगदी अटीतटीने मांडतात. पण ग्रुपवरचा बहुतांश युवा समाज हा माझ्याप्रमाणे वाया गेलेला असल्याने (आम्हाला वारसा म्हटले की कुणा आफ्रिकेतल्या दूरच्या आत्याने आमच्या नावावर केलेली इस्टेट नाहीतर कुणा दूरच्या नातेवाईकाने आमच्या नावावर केलेली हिऱ्याची खाणच डोळ्यासमोर उभी राहते यात आमचा तरी काय दोष? आमच्यावर (बॉलिवुडी) “संस्कार”च तसे झाले आहेत) कुणीही त्यांच्या शंकेला, पोस्टसना साधे उत्तरही देत नाही. पण ते मात्र भगिरथाच्या चिकाटीने नवनव्या कल्पना मांडत असतात.  काल त्यांनी अजून एक नवे पिल्लू सोडले…

“#$&$कर घराण्यातील जी मुले-मुली-सुना शिक्षण-नौकरी-व्यवसायानिमित्त भारताबाहेर आहेत अशांचा एक स्वतंत्र GP करावा असा विचार मनात आहे. तरी त्याबाबत पालकांनी  परदेशात असलेल्या  आपली मुले-मुली-सुना यांचेशी संवाद साधून आपले मत व्यक्त करावे.ही नवीन पिढी परस्परांशी कायम connect रहात संवाद साधू शकतील…!” 
नेहमीप्रमाणे आम्ही दुर्लक्ष केले तर आज त्यांनी बॉंबच टाकला.

“असा स्वतंत्र GP केला आहे. ” परदेशस्थ #$&$कर ” अशा नावाने हा  GP ओळखला जाईल. आपणाला आणखी समर्पक नाव सुचले तर जरूर सुचवा.परदेशात असलेल्या सुना,मुली,मुलांची पूर्ण नावे,मोबाईल नंबर,देश इ.माहिती कळवा…!” (जबरदस्ती?)

त्यानंतर त्यांनी त्यांची परदेशात असलेली दोन मुले, एक मुलगी, दोन भाच्या, एक पुतणे आणि बहिणीच्या दिराची एक लांबची बहीण अश्या कुणाकुणाची (मोठ्ठा मेसेज वाचायला सत्तर रुपये पडतील हा मेसेजची तोकडा पडावा) इतकी लांबलचक माहीती दिली. (वर आम्ही दोघे नवराबायको अधून मधून परदेशात फिरायला जात असतो, अशी पुस्तीही जोडली) 

शेवटी वैतागून मी त्यांना एक पर्सनल मेसेज टाकला आणि विचारले. 

“माझी भाजप, काँग्रेस, आप अशा अनेक पक्षांच्या सायबर विभागात बऱ्यापैकी ओळख आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का?” म्हणून….

इसमे दो बाते हो सकती है…

१. ते मला ब्लॉक करतील

२. मला कुणी उपरोल्लेखित नावांपैकी कुणाच्याही (जे सगळ्यात अव्वल असतील अशा) ट्रोल्सचे नंबर देईल काय? भोगायचेच असेल तर मी एकटाच का? सगळ्या देशाला भोगू देत ना!

“©” – व्हाटसॅपवर कॉपीराईट वगैरे काही नसतं हो, तो सार्वजनिक “वारसा” असतो.
इतकंच……  !

© विशाल कुलकर्णी

 

​प्रिय फेडी …

​प्रिय फेडी, 

फेअरवेल वगैरे नाही रे. आणि तुझ्याबद्दल टेनिसप्रेमींना नव्याने काही सांगायचीही गरज नाहीये. इथे तुझ्या कारकिर्दीचा प्रत्येक आकडा तोंडपाठ असलेले टेनिस वेडे आहेत. पण आज उगाचच वाटलं की तुझ्याशी बोलावं. आपल्या आवडत्या खेळाडूचे कौतुक करणे आम्हा भारतीयांना अतिशय आवडते. मग तो खेळाडू तेंडल्या असो, द्रविड असो सायना असो वा धनराज असो, किंवा मग जयसुर्या, लारा, रिचर्ड्स नाहीतर अजून कोणी. टेनिसच्या बाबतीत मात्र आम्हाला आमच्या पेस, भूपती, रमेश कृष्णन किंवा अमृतराज बंधू आणि सानियापेक्षा बोर्ग, एडबर्ग, बेकर, अगासी लेंडल, मेकान्रो, सांप्रास, राफा, जोकोविच, स्टेफी, मार्टिना, गॅबी आणि अर्थातच फेडी ही नावे जास्त जवळची, लाडकी असतात. 

तुझ्या गेममध्ये तू मास्टर आहेसच. २००२ मध्ये मायामीला अगासीबरोबर झुंजताना तुला पाहिले तेव्हाच तुझ्या, तुझ्या खेळाच्या प्रेमात पडलो बघ. ती फायनल तू गमावलीस खरी पण अगासीसारख्या मातब्बर खेळाडूशी अगदी शांतपणे, तरीही आक्रमक खेळत दिलेली झुंज माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मात्र जिंकून गेलेली मित्रा.

मी खरेतर आगासीचा डायहार्ड फॅन. आमचा चित्ता या नव्या पोराचे कसे हाल हाल करतो हे बघायला म्हणून पॉपकॉर्न घेऊन बसलेलो. अर्थात ती मॅच अगासीनेच जिंकली. पण तुझ्या खेळाने अगासीबरोबर आम्हा लाखो टेनिसवेड्यांना सुद्धा जिंकून घेतले होते. अर्थात त्या आधीच्या विंबल्डन मध्ये सांप्रासला हरवून क्वाटर्स मध्ये प्रवेश करताना तू ” सावध, मी आलोय ” अशी चेतावणी दिली होतीस जगभरातल्या टेनिसरसिकांना. पण त्या वेळीही असे खूप वन डे वंडर्स असायचे त्यामुळे आम्ही दुर्लक्षच केले होते. पण अगासीबरोबरच्या तुझ्या त्या खेळाने आम्हाला ‘रॉजर फेडरर’ या नावाची दखल घेणे भाग पाडले. मग नेहमीप्रमाणे तुझा इतिहास खंगाळून काढणे झाले. तेव्हा लक्षात आले की हे वादळ बऱ्याच दिवसापासून हल्ल्याची तयारी करतेय. मी जर चुकत नसेन तर १९९९ च्या मार्सेलि ओपनमध्ये कार्लोस  मोयाला धक्का देऊन आपल्या अश्वमेधाची सुरुवात आधीच केली होतीस तू. मायामीच्या त्या हातघाईच्या लढाईनंतर मात्र तुझे वारू चौखूर उधळले. त्यानंतर त्या विजयी अश्वाला लगाम लावणे मोठी अवघड गोष्ट होऊन बसली होती. २००३ च्या विबल्डनमध्ये मार्क फिलिप्पोसिसला आस्मान दाखवत आपले पहिले वहिले ग्रँडस्लॅम मिळवलेस आणि टेनिसच्या दुनियेला नवा सुपरस्टार मिळाला. अर्थात वर म्हणाल्या प्रमाणे असे वन डे, वन टाईम वंडर्स टेनिस जगताला नवीन नव्हते. पण तू तर सम्राट बनायच्या महत्वाकांक्षेने आला होतास. I am not just one another champion हे सिद्ध करायच्या हेतूने आलेला होतास. त्यानंतर रॉजर फेडरर हे नाव टेनिसप्रेमींसाठी परवलीचे नाव बनून गेले. 

सात विंबल्डन, पाच ऑस्ट्रेलियन ओपन, पाच यु एस ओपन आणि एक फ्रेंच ओपन, अठरा ग्रँडस्लॅम्स ? आणि हा दिग्वीजय करूनही फेडेक्स तोच २००२ मध्ये शांतपणे अगासीला झुंजवणारा सभ्य, सरळ माणूस होता. आता खेळात प्रचंड सुधारणा झालेली होती. आत्मविश्वास तर आधीपासून होताच पण आता त्यात अनुभवाची भर पडली होती. पण यशामुळे येणारा अहंकार, गर्व, उद्धटपणा याचा लवलेशही नव्हता. समोर होता तो, तोच जुना, प्रत्येक नव्या खेळाडुकडून सुद्धा सतत काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रयत्नरत असलेला झुंजार रॉजर फेडरर. 

२००४ साल तुझ्यासाठी स्पेशल भेट घेऊन आलं होतं. खरेतर आम्हा रसिकांना तू ते वेडं वर्ष भेट म्हणून दिलं होतंस. अठ्ठयाऐंशीमध्ये मॅट्स विलँडरने केलेल्या पराक्रमानंतर एका वर्षात सलग तीन ग्रँडस्लॅम जिंकणारा तू पहिलाच होतास. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सफिन, विंबल्डनमध्ये रॉडीक आणि यु एस ओपनमध्ये  हेवीटला नमवत तू एका नव्या विक्रमाला गवसणी घातलीस.

फ्रेंच ओपन मात्र तुला कायमच हुलकावणी देत आलं. २००९ चा अपवाद वगळला तर अर्थात. पण यावेळेस तू सुदैवी होतास कारण समोर गेल्या चार वेळचा फ्रेंच ओपन विजेता, क्ले कोर्टचा बादशहा राफा नव्हता. राफाच्या दुर्दैवाने राफाला सोडरलिंगकडून दुर्दैवी, धक्कादायक पराभव पत्करावा लागला आणि फायनल्स मध्ये तुझ्यासमोर आला तो सोडरलिंग. ते बहुतेक नियतीच्या मनातही तुझ्या लिस्टमध्ये किमान एक तरी फ्रेंच ओपन असावे ही इच्छा असावी म्हणूनच. याच वर्षी तू टेनिस जगतातल्या अजून एका निर्विवाद बादशहाच्या विक्रमाशी बरोबरी करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेस. सांप्रासच्या १४ ग्रँडस्लॅम्स च्या विक्रमाची बरोबरी केलीस. याच स्पर्धेत बहुदा नोवोक जोकोविचची पनवती संपली आणि या नंतरच्या काळात त्याचा सुवर्ण काळ सुरु झाला. 

२०१२ पासून बहुदा तुझा पडता काळ सुरु झाला असावा. खरेतर त्याला तुझा पडता काळ म्हणण्यापेक्षा राफा आणि जोकोविचचा चढता काळ असे म्हणावे लागेल. कारण फेडी अजून तसाच होता. एक शांत, संयमी लढवय्या. पण राफा आणि नोवॊकच्या जोडीला त्यांचं वय, त्यांचं तारुण्य होतं. टेनिस खेळाडूंचं आयुष्य फार फार तिसाव्या वर्षापर्यंत. मार्टिना एखादीच असते रे. पण कालच्या सामन्यात तू पुन्हा दाखवून दिलेस की Fedex is still the best.
अर्थात मला खात्री आहे की ही मॅच सुद्धा तू नेहमीप्रमाणे अजून एक मॅच हा दृष्टिकोन ठेवूनच खेळला असशील. कारण तुझ्यासाठी टेनिस हा श्वास आहे. व्यवसाय आहेच आहे पण तू त्याचा कधी धंदा होवू दिला नाहीस. साऊथ आफ्रिकेतील निराधार मुलांच्या शिक्षणासाठी , त्यांना खेळाचे व्यवस्थित प्रशिक्षण मिळावे म्हणून सदैव कार्यरत असणारे ‘रॉजर फेडरर फाउंडेशन’ याची साक्ष आहे. जगभर वेळोवेळी उभ्या राहिलेल्या नैसर्गिक आपत्तीना तोंड देण्यासाठी उभ्या राहिलेल्या फंड रेजिंग उपक्रमामध्ये रॉजर फेडरर हे नाव कायमच अग्रणी राहिलेले आहे. मैदानावर सम्राट बनून वावरताना मैदानाबाहेर मात्र तू कायम एक प्रेमळ पती, एक प्रेमळ बाप म्हणूनच दिसला आहेस.

आमच्या क्रिकेटच्या देवाचा, तेंडल्याचा सुपरहिरो सुद्धा रॉजर फेडररच आहे, यापेक्षा वेगळे अजून काय सांगावे? असे ऐकले की ही तुझी ऑस्ट्रेलियन ओपनमधली शेवटचीच मॅच होती. तुझी उणीव तर जाणवत राहिलंच पण ते ही कधी ना कधी होणारच ना? आनंदाची बाब ही की तुझी विक्रमाची पताका अशीच झळकवत ठेवण्याची परंपरा राफा, मरे, जोकोसारखे खंदे खेळाडू समर्थपणे पेलताहेत. कोण जाणे उद्या अजूनही कुणी नवा येईल. पण फेडी मात्र कधीच विस्मरणात जाणार नाही. 

परवा राफाला नमवल्यानंतर तू म्हणालास की खरेतर हे ग्रँडस्लॅम आम्हा दोघांमध्ये विभागून द्यायला हवे कारण या विजयाचा हक्कदार राफा देखील आहे. मला खात्री आहे तू हे केवळ वरवरचे किंवा औपचारिकता म्हणून म्हटलेले नाहीयेस. असला दांभिक दिखाऊपणा तुझ्या स्वभावातच नाहीये. तेच तर देखण्या फेडीच्या सरळ आणि सभ्य स्वभावाचे खरे खुरे सौंदर्य आहे. 

जियो दोस्त, खूप आनंद दिलास आजवर. या पुढेही देत राहशील. आज ना उद्या कधीतरी निवृत्तही होशील. पण टेनिसप्रेमींच्या मनावर रॉजर फेडरर हे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेलेले आहे यात शंका नाही. 

थँक्यू दोस्त, आजवर भरभरून दिलेल्या आणि यापुढेही तू देणार असलेल्या आनंदाबद्दल . थँक्यू व्हेरी मच ! 👌👍💐
तुझ्या लाखो करोडो पंख्यापैकी एक पंखा…
© विशाल विजय कुलकर्णी

 
 
%d bloggers like this: