RSS

Category Archives: प्रासंगिक

परीस

अगदी सातवी आठवीत येईपर्यंत सुशि, शरदचंद्र वालिंबे, सुभाष शहा, गुरुनाथ नाइक इथपासुन ते वेदप्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन भारती, मेजर बलवंत , ओमप्रकाश शर्मा प्रभुतीची ओळख झालेली होती. त्यामुळे आमच्या वाचनाच्या आवडी-निवडी सुद्धा तश्याच झालेल्या. नाही म्हणायला फ़ाफ़े, फेलूदा आणि अधुन मधून गोट्या, एलिस, पिनाकियो, गलिव्हर, टारझन असायचे जोडीला (यांची भेट कुर्डवाडीच्या नगर वाचनालायात झालेली – इयत्ता चौथी, पाचवीत @विकु). 
पण मग आठवी की नववीत असताना वुडहाऊसची एक कथा वाचनात आली. आमची शाळा मराठी मिडियम, त्यामुळे साहजिकच अडलेल्या इंग्रजी शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाडक्या काकड़ेबाईना पकडले. बाईंनी ती कथा तर समजावून दिलीच, पण त्याबरोबर एक मंत्रही दिला. वुडहाऊसचे इंग्रजी जर अवघड जात असेल तर सद्ध्या पुलदे वाच . मोठा झाल्यावर वुडहाउस वाचशीलच. गंमत म्हणजे पु.ल. वाचायला लागल्यावर लक्षात आले की ते सुद्धा वुडहाऊसचे प्रेमी आहेत. (भक्त म्हणायचे होते पण म्हटलं नकोच, उगीच कुणाच्यातरी भावना दुखावायच्या). तर सांगायचे इतकेच की काकड़ेबाईंनी पुलदे नावाचे जालिम व्यसन लावले आणि मी कट्टर व्यसनी बनलो.
तोपर्यंत विनोदी वाचन झालेले नव्हते अशातला भाग नव्हता चिं. वि. जोशीचा चिमणराव किंवा गडकरींचा बाळकराम वाचले होतेच. पण पुलंनी टेस्टच बदलून टाकली. माझ्याबाबतीत म्हणाल तर क़ाय वाचावे याबरोबर का वाचावे हे पुलंनी शिकवले. कुठल्याही जड़, अलंकारिक शब्दाचा आधार न घेता साध्या सरळ आणि नेमक्या, सोप्या शब्दात टोकदार तरीही न दुखावणारा विनोद क़ाय असतो हे पुलदे वाचताना समजले. तत्कालीन  विनोदी लेखकांच्या बहुतांशी लेखनातून आलेला विनोद हा तात्कालिक परिस्थितीवर आधारीत असायचा. आत्यंतिक दारिद्र्य, समाजाच्या जाचक रूढीपरंपरा, लोकांचे दुटप्पी वागणे, तत्कालीन सरकारचे जाचक नियम. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला शालजोडीतुन फटके मारत, त्या गोष्टीची, व्यक्तीची इनडायरेक्टली खलनायक/खलनायिका म्हणून प्रतिष्ठापना करत त्याला शब्दातुन विरोध म्हणून हा विनोद जन्माला आलेला असे. पुलंच्या विनोदाचे वैशिष्ठ्य हे की त्यात खलनायकाला स्थानच नव्हते. साध्या साध्या शब्दात खळखळून हसायला लावत , छोट्या छोट्या त्रुटी आणि उणीवावर बोट ठेवत हसवताना कुठेतरी नकळत पटकन डोळ्यांत पाणी आणणारा असा पुलंचा विनोद आहे. आठवा ना, व्यक्ती आणि वल्लीमधले कुठलेही पात्र आठवा. एक नंदा प्रधान सोडला तर प्रत्येक व्यक्तिचारित्र हे खळखळून हसवते आणि जाता जाता तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्यांत पाणी उभे करुन जाते. 
“…… अजुन थोड़ा वेळ लागला असता तर आमचा गणपती बाप्पा मोरया झाला असता म्हणणारे पेस्तनकाका असोत, तेवढं प्राचीला गच्ची जुळतय का बघा की, म्हणणारे रावसाहेब असोत, समस्त रत्नाग्रीच्या गाई तुर्तास गाभण क़ाय रे म्हणत येता जाता टोमणे मारणारे अंतुशेठ असोत किंवा पुराव्याने शाबित करेन अशी खात्री देणारे हरितात्या असोत. पुलंच्या प्रत्येक विनोदाला एक करुण, हळवी किनार आहे, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्की ओले करते, आतवर कुठेतरी हलवून जाते.
परवा एका मित्रांशी बोलताना त्याच्या कुणा गुणी मित्राचा विषय निघाला. तर आमचा मित्र कौतुकाने म्हणाला,” अरे त्याच्याबद्दल क़ाय सांगणार? क़ाय येत नाही असे नाही. प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे, तेंडुलकरच म्हण ना!” माझ्या मनात लगेच पु.ल.च आले. मला वाटते पुलंनी फक्त खेळ हे एकच क्षेत्र सोडले असेल. पण मला खात्री आहे की मनावर घेतले असते तर त्यांनी हे सुद्धा क्षेत्र लीलया गाजवले असते. भल्या भल्या दिग्गजांची सहज हातात बॉल नसतानाही हुकमी विकेट काढ़णारा कसबी गोलंदाज होते पुल. आचार्य अत्रेसारख्या हुकमी पेसरचे चेंडू लीलया सीमेपार पोचवणारा एकमेव फलन्दाज होता तो. गायन, संगीत, लेखन, वक्तृत्व, चित्रपट दिग्दर्शन हे सगळे पैलु तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला होतेच. पण पुलंचे वैशिष्ठ्य म्हणजे ते परीस होते. फेसबुकवरचे एक लोकप्रिय लेखक जयंतदादा विद्वान्स यांनी आजच्या त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीला, गोष्टीला, प्रसंगाला  पुलंचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श झाला त्या त्या व्यक्तीचे, गोष्टीचे , प्रसंगाचे सोने झालेय. 
त्यांची आणि सुनिताबाइंची जोड़ी हे साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्राला लाभलेले लक्ष्मी-नारायणच म्हणायला हवेत. आपलं जे काही होतं ते सगळं या जोडीने समाजाला देवून टाकलं. त्यांनी दिलेल्या दानावर, देणग्यावर आजही कितीतरी समाजोपयोगी ट्रस्ट चालु आहेत. 
पुलंनी मला क़ाय दिलं? तर जगण्यासाठी धन, संपत्ती नव्हे तर एक कारण हवे असते, एक उद्दीष्ठ्य हवे असते हे शिकवलं. प्रत्येक भल्या-बऱ्या गोष्टीकड़े सकारात्मक नजरेने पाहायला शिकवले. हे जग खुप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजुन सुंदर करायचे आहे याची जाणीव करुन दिली. 
आज पुलंचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या लेखनाबद्दल शेकडो पाने लिहून काढली आहेत साहित्यिकानी. मी पामर क़ाय वेगळे लिहिणार? एवढेच म्हणेन… 
थैंक्यू भाईकाका , तुम्हाला भाईकाका म्हणण्याइतकी जवळीक नसेल आपल्यात कदाचित. आपण कधीही भेटलो नसु. पण दररोज भेटणाऱ्या दर दहा व्यक्तीत कुठे ना कुठे आम्हाला पुलदे भेटतात , भेटत राहतील कारण ते आमच्या हृदयात पक्की जागा करून बसलेत हो. 
सुरूवातीला उगीचच वाटायचं … 
तुम्ही गेलात !

आज इतक्या वर्षानंतरसुद्धा स्वत:लाच खोटं ठरताना, चुकीचं ठरताना पाहूनही इतका आनंद होण्याची अशी उदाहरणे विरळाच ! _/\_
सादर अभिवादन ! 💐
© विशाल विजय कुलकर्णी

 

वारसा

मी व्हाटसॅपवरील एका फॅमिली ग्रुपचा सभासद आहे. (आता आहे, त्याला कोण काय करणार? दुर्दैवाचे दशावतार भोगूनच संपवावे लागतात) माझ्या एका  मोठ्या मावसभावाने तिथे जोडून घेतलंय मला. दादाचा खूप जीव आहे माझ्यावर, माझ्या पत्नीवर . त्यामुळे मध्येच सोडून पळताही येत नाही) असो, मुद्दा फॅमिली ग्रुपचा नाही. मुद्दा तिथे रोज चालणाऱ्या व्हर्चुअल प्रवचनांचाही नाही. खरेतर मला कधीकधी वाटते की ही सोशल नेटवर्क्स हा केवढा मोठा आधार आहे कीर्तन , प्रवचनांना. आपली संस्कृती (म्हणजे काय असे विचारणे हा फाऊल गणला जाईल) या अशा व्हर्चुअल विचारवंतामूळे तर टिकून आहे. 

तर मुद्दा असा आहे की या ग्रुपवर एक सेवानिवृत्त काका आहेत. सर्वजण त्यांना नानाजी म्हणतात. या नानाजींना आपल्या संपूर्ण कुळाची वंशावळ बनवायचीय. त्यावर एक ग्रंथ लिहायचाय. विशेष म्हणजे त्यांच्या या कुळातील कुणीतरी पूर्वज म्हणे कुठल्यातरी समृद्ध राजघराण्याच्या  दरबारात राजआचार्य (आचारी असेल त्याचे यांनी आचार्य केलेय असे माझी बायको म्हणते)  म्हणून काम करत होता म्हणे. (त्याचे नावही कुणाला माहीत नाही) पण त्यामुळे नानाजींना कायम आपल्या कधीही आणि कुणीही न ऐकलेल्या, पाहिलेल्या या पूर्वजाची कायम आठवण येत असते आणि त्या भारावलेल्या अवस्थेत ते नेहमी वंशावळ-वंशावळ खेळत असतात. मग ते आपल्या समृद्ध (?) वारशाबद्दल भरभरून बोलतात. त्या आठवणी, ती माहिती जतन करणे हे आपले कर्तव्य आहे हे अगदी अटीतटीने मांडतात. पण ग्रुपवरचा बहुतांश युवा समाज हा माझ्याप्रमाणे वाया गेलेला असल्याने (आम्हाला वारसा म्हटले की कुणा आफ्रिकेतल्या दूरच्या आत्याने आमच्या नावावर केलेली इस्टेट नाहीतर कुणा दूरच्या नातेवाईकाने आमच्या नावावर केलेली हिऱ्याची खाणच डोळ्यासमोर उभी राहते यात आमचा तरी काय दोष? आमच्यावर (बॉलिवुडी) “संस्कार”च तसे झाले आहेत) कुणीही त्यांच्या शंकेला, पोस्टसना साधे उत्तरही देत नाही. पण ते मात्र भगिरथाच्या चिकाटीने नवनव्या कल्पना मांडत असतात.  काल त्यांनी अजून एक नवे पिल्लू सोडले…

“#$&$कर घराण्यातील जी मुले-मुली-सुना शिक्षण-नौकरी-व्यवसायानिमित्त भारताबाहेर आहेत अशांचा एक स्वतंत्र GP करावा असा विचार मनात आहे. तरी त्याबाबत पालकांनी  परदेशात असलेल्या  आपली मुले-मुली-सुना यांचेशी संवाद साधून आपले मत व्यक्त करावे.ही नवीन पिढी परस्परांशी कायम connect रहात संवाद साधू शकतील…!” 
नेहमीप्रमाणे आम्ही दुर्लक्ष केले तर आज त्यांनी बॉंबच टाकला.

“असा स्वतंत्र GP केला आहे. ” परदेशस्थ #$&$कर ” अशा नावाने हा  GP ओळखला जाईल. आपणाला आणखी समर्पक नाव सुचले तर जरूर सुचवा.परदेशात असलेल्या सुना,मुली,मुलांची पूर्ण नावे,मोबाईल नंबर,देश इ.माहिती कळवा…!” (जबरदस्ती?)

त्यानंतर त्यांनी त्यांची परदेशात असलेली दोन मुले, एक मुलगी, दोन भाच्या, एक पुतणे आणि बहिणीच्या दिराची एक लांबची बहीण अश्या कुणाकुणाची (मोठ्ठा मेसेज वाचायला सत्तर रुपये पडतील हा मेसेजची तोकडा पडावा) इतकी लांबलचक माहीती दिली. (वर आम्ही दोघे नवराबायको अधून मधून परदेशात फिरायला जात असतो, अशी पुस्तीही जोडली) 

शेवटी वैतागून मी त्यांना एक पर्सनल मेसेज टाकला आणि विचारले. 

“माझी भाजप, काँग्रेस, आप अशा अनेक पक्षांच्या सायबर विभागात बऱ्यापैकी ओळख आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का?” म्हणून….

इसमे दो बाते हो सकती है…

१. ते मला ब्लॉक करतील

२. मला कुणी उपरोल्लेखित नावांपैकी कुणाच्याही (जे सगळ्यात अव्वल असतील अशा) ट्रोल्सचे नंबर देईल काय? भोगायचेच असेल तर मी एकटाच का? सगळ्या देशाला भोगू देत ना!

“©” – व्हाटसॅपवर कॉपीराईट वगैरे काही नसतं हो, तो सार्वजनिक “वारसा” असतो.
इतकंच……  !

© विशाल कुलकर्णी

 
 
%d bloggers like this: