RSS

Category Archives: केल्याने देशाटन

विदेश प्रवास वर्णन

निळाई…

माझं निळ्या रंगाचं वेड नक्की कधीपासुनचं आहे कोण जाणे पण आहे एवढं खरं…
मग ते निळे आकाश असो, निळा सागर असो, निळ्या डोळ्यांचा राज कपूर असो किंवा माझ्या आवडत्या सुशिंच्या कथेतला निळ्या डोळ्यांचा बॅरीस्टर अमर विश्वास असो. हा निळा रंग माझं सगळं आयुष्य व्यापून राहीलेला आहे हे मात्र खरं !

ग्रेसची एक कविता आहे… ‘निळाई’ !

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

ग्रेसना पण निळाईचे आकर्षण होते का हो? या ‘निळाई’च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये. सन १९०० ते १९०४ या कालावधीत पिकासोने असंख्य चित्रे केवळ निळ्या रंगात चितारलेली आहेत. त्याच्या आयुष्यातील हे काम ‘ब्ल्यु पिरियड‘ या नावानेच ओळखले जाते. मागच्या वर्षी ‘कास’च्या पठारावर पसरलेली नेमोफिला (Nemophila (Baby blue Eyes)) ची पठारावर नजर जाईल तिकडे पसरलेली निळी चादर पाहताना वेड लागल्यासारखे झाले होते. वेड लागण्यावरून आठवले ‘प्राण्यांची भाषा जाणण्याची जी कला असते ना तिला काय म्हणतात माहीतीये? …. निळावंती ! आणि ही कला जर नीट जमली नाही, व्यवस्थीत वापरली नाही तर वेड लागते असे एक मिथक आहे. निळावंतीशी कधी संबंध नाही आला माझा पण ही आसमंताची ‘निळाई’ मला कायमच वेड लावत आलेली आहे. गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात पुन्हा एकदा या निळाईच्या मोहजालाचा विलक्षण अनुभव आला.

पर्थमधला आमचा दिनक्रम साधारणपणे सकाळी ९ ते ५ ऑफीस आणि त्यानंतर साडे सहा – सातच्या दरम्यान कुठेतरी एकत्रीत रात्रीचे जेवण असा असतो. यावेळी एक दिवस गुरुपोर्णिमेचा असल्याने मी संध्याकाळी गृपबरोबर जेवण घ्यायचे टाळले. राहत्या हॉटेलवरच काहीतरी शाकाहारी जेवण घ्यायचे असे ठरवल्याने ती संध्याकाळ मला स्वतःसाठी देता आली. तिथेच जेवण करायचे असल्याने थोडा उशीर झाला तरी चालेल असे ठरवून कॅमेरा घेवून भटकंतीसाठी बाहेर पडलो. बाहेर पडण्यापुर्वी माझ्या रुमच्या बाल्कनीतून सहज एक नजर बाहेर टाकली. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले होते. इथे दिवस तसा लवकरच मावळतो. त्यामुळे आकाशात संध्येची चाहूल लागायला सुरूवात झालेली होती.

विरघले नभांगण…
बघ निघाला माघारी रवी
पसरले श्यामरंग
फुटे निळाईस पान्हा

हॉटेलच्या समोरच अगदी मधला एक रस्ता सोडला की समोरच पसरलेला अथांग सागर आहे… निळाशार ! त्यामुळे माझी ती संध्याकाळ तिथेच जाणार हे निश्चीत होते. किनार्‍यावर आलो तेव्हा समोर पसरलेला सागर आणि आकाशाच्या पांढुरक्या तपकिरी रंगाला हलकेच व्यापत चाललेली निळाई समोर आली.

अजुन बर्‍यापैकी उजेड होता. त्यामुळे नभांगणातल्या श्वेत ढगांची हळुहळु आसमंत व्यापत चाललेल्या निळाईशी स्वतःचे अस्तित्व राखण्याची शेवटची केविलवाणी धडपड चालु होती.

नकोच मजला सर्व नभांगण
क्षितीजाशी एक रेघ हवी
तुझीच सत्ता, तुझी निळाई
सोबत मजला तुझी हवी

एकमेकाशी मस्ती करत दोघांचा मस्त दंगा चाललेला होता.

अचानक पुन्हा त्या श्वेतरंगाने आक्रमक पवित्रा घ्यायचे स्विकारले असावे. त्या निळाईवर विजय स्थापीत करण्यासाठी त्याने बहुदा आपले, आपल्यात सामावलेल्या रंगांचे सामर्थ्य आजमावण्याचा निर्णय घेतला. क्षितीजाच्या एका कडेपासून हळुवारपणे सप्तरंगाची एक रेघ आसमंतात उमटायला सुरूवात झाली.

असली विलक्षण जुगलबंदी पाहताना मला मात्र संमोहनाचा भास होत होता. क्षितीजाच्या या टोकापासून निघालेल्या त्या सप्तरंगी रेघेचे रुपांतर आपल्या मनमोहक शस्त्रात करण्यासाठी श्वेतरंगाने दुसर्‍या टोकाकडूनही हालचाल सुरू केली होती.

थोड्या वेळातच अशी परिस्थिती निर्माण झाली की हा श्वेत रंग आपल्या रंगांच्या जोरावर त्या निळाईवर विजय मिळवतो की काय असे वाटायला लागले.

काही काळापुरता का होइना पण त्याने विजय मिळवला देखील. क्षणभर माझ्या लाडक्या निळाईला विसरून मी रंगांच्या त्या मनमोहक आविष्काराकडे भान हरपून बघत राहीलो.

सखे ही कसली चाहूल ?
मी झालो कसा मश्गुल ?
आकंठ जणु प्रत्यंचाच ती…

हा सोडून मोह स्वप्नांचा
मनाला पडली कसली भूल …… !

भान हरपून त्या वेड लावणार्‍या इंद्रधनुकडे पाहात राहणे एवढेच सद्ध्या आपल्या हातात उरलेले आहे याची नकळत जाणिव झाली आणि मी सगळी अवधाने सोडून त्या नवलाईत हरवत राहीलो….

पण किती वेळ चालणार ही मस्ती? शेवटी हळु हळू त्या निळाईने आपले निर्विवाद साम्राज्य पसरायला सुरूवात केली.

निळ्या अंबराची मिठी ही निळी
खुळ्या जिवाची दिठी ही निळी
निळाई…निळाई… स़खी ही निळी
निळ्या सागराची गाजही निळी

गंमत म्हणजे ही सगळी स्थित्यंतरे अवघ्या एका तासात झाली होती. मावळतीकडे निघालेला सहस्त्ररश्मी अजुनही आपले अस्तित्व दाखवून होता. पण गंमत म्हणजे तेजोमणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या भास्करालाही या निळाईने अगदी निष्प्रभ करून टाकले होते. त्या निळ्या रंगाच्या शितल किमयेपुढे तो सुद्धा आपला स्वभावच जणू विसरून बसला होता.

त्या श्यामल निळाईत हरवताना नकळत मला जाणवले की माझ्या ही नकळत मी देखील त्या निळाईचा एक पदर पांघरून घेतला होता.

‘ग्रेस’ म्हणतात…

निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा?

विशाल कुलकर्णी

 

आला… पाऊस आला !!!

खिडकीच्या गजांवर येऊन थांबलेले,
लाघवी मेघदूत,
खिडकीबाहेर रंगलेला…..
बेधुंद जलधारांचा विलक्षण नर्तनसोहळा…!
नेमक्या त्याच वेळी,
तुझ्या साजिर्‍या चेहर्‍याला
व्यापून राहिलेल्या लडिवाळ बटा….!

भरल्या पोटी नुकतंच काही सुचायला लागलेलं होतं.
शनिवार होता. दिनांक…?
जावु दे ना, नको ते तपशिल हवेतच कशाला? शनिवार होता इतके पुरे. तर शनीवारी रात्री जेवण केल्यावर अलगद सुचलेल्या ३-४ ओळी गुणगुणत रेडीओ लावला. कुठल्यातरी वाहिनीवर वाडकर तन्मय होवून गात होते.

पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये झुलतात गाणी दिवाणी
साद गंधातुनी, ओल्या मातीतुनी, आला ऋतू आला

अंग अंग स्पर्षताती मोती रुपेरी
आठवे ती अनावर भेट अधुरी
मन चिंब ओले, शहारत बोले, आला ऋतू आला

श्रीधर फडकेंचा जादुई स्पर्श झालेलं हे गाणं मला नेहमीच वेड लावत आलेलं आहे. त्या दिवशी, सॉरी त्या रात्री मात्र ते गाणं ऐकलं आणि राहवलं नाही. फ़ोन उचलला आणि नानाला रिंग दिली. नाना, माझा जिवश्च कंठश्च म्हणता येइल असा मित्र. (खरे तर मित्र म्हणलं की त्यात ’जिवश्च कंठश्च’ वगैरे येतंच,तरीसुद्धा मित्राला हे विशेषण का लावले जाते कुणास ठाऊक?)रात्रीचे साडे अकरा झाले होते, फोन ‘नानीने’ उचलला. मला शंका होतीच, हे येडं झोपलेलं असणार म्हणून.

“काय रे विशाल? एवढ्या रात्री फोन केलास?”
“उठव त्याला आणि विचार, उद्या कुठेतरी उंडगायला जायचं का म्हणून? मी आणि सायली तर निघतोय, तुम्ही येणार आहात की नाही? मस्त पाऊस पडतोय…, जावुयात भिजायला…”
“जाऊयात की, त्याला काय विचारायचेय?”

अशा पद्धतीने नानाला न विचारताच बेत ठरला. पावसात उंडगायला जायचेय म्हणल्यावर नान्या एका पायावर तयार होइल हे माहीत होते. सकाळी ६ वाजता जोडी आमच्या घरी हजर झाली. कुठे जायचे या प्रश्नावर चौघांकडून (नेहमीप्रमाणेच) चार पर्याय पुढे आले. शेवटी ठरले की गाडी काढून वंडरसिटीपाशी जावून उभे राहायचे. एका ठरावीक वेळी काऊंटडाऊन सुरू करायचा. त्यानंतर येणारी पहीली गाडी ज्या दिशेला जाईल तिकडे निघायचे. (हे देखील नेहमीचेच). पहिली गाडी आली ती मुंबईला जाणारी एक लालडब्बा ….! आम्ही आमच्या गाडीचे नाक वळवले आणि त्या दिशेने कुच केले. चांदनीचौकापाशी आल्यावर लवासाला जावुयात का असा एक विचार समोर आला आणि गाडी आतल्या रस्त्याने लवासाकडे वळवली. मध्येच कुलकर्णीबाईंचा आणि नानीचा मुड फिरला.

“सारखं-सारखं काय लवासा? आणि आहे काय तिथे? त्यापेक्षा असेच जात राहू ताम्हिणीच्या दिशेने. जिथे कंटाळा येइल तिथे थांबू….”

डेस्टीनेशन ताम्हिणी घाट !

पावसाने अजून तरी काही दर्शन दिले नव्हते. त्याची चाहूल मात्र लागत होती सारखी. पौडच्या आसपास कुठेतरी थांबून गरमा गरम चहा आणि भजी, मिसळ मारली.

टपरीच्या बाहेर आलो आणि…

घेऊन गिरकी पानांवरती थेंब उतरले
वार्‍याच्याही पायी वाजती पैंजण ओले 
(गीत: अश्विनी शेंडे)

आला..आला म्हणता म्हणता तो कोसळायला लागला. न राहवून आम्ही गाडीकडे पळालो. सौभाग्यवती तशाच जागेवर भिजत उभ्या. मग आठवलं , साला भिजायला तर आलोत ना?” खिश्यातलं पाकीट काढून गाडीत टाकलं आणि पावसाच्या स्वागताला मनापासून सज्ज झालो.

साहेबांनी हजेरी लावली आणि मग आमची पण कळी खुलली.

पावसाने, पावसाची ऐकली गाणी कधी
गर्द काळ्या अंबराशी मारल्या गप्पा कधी

डोलला वार्‍यावरी तो, बोलला माझ्यासवे
नाचल्या धारा जळाच्या होवूनी गारा कधी 

आता त्याने छान ताल धरायला सुरूवात केली होती. म्हणलं थांबलो तर इथेच भिजता येइल हवे तेवढे, पण मग पावसाबरोबर उंडगणं राहूनच जायचं. म्हणून पुढे निघालो. जाता-जाता पटापट जमतील तेवढे स्नॅप्स मारून घेतले.

आता हळुहळु शहरी वातावरणाच्या बाहेर पडून निसर्गाच्या अंगणात पाऊल पडायला सुरूवात झाली होती. वर्षेच्या आगमनाने उल्हसीत झालेली लेकुरवाळी धरा आपली सगळी हिरवाई अंगाखांद्यावर वागवत स्वागताला सज्ज होती.

‘पाऊस’ असा काही बरसत होता की जणु काही एखादे व्रात्य पोर आईची नजर चुकवून घराबाहेर पळावे आणि अंगणात साचलेल्या पाण्याच्या डबर्‍यांतून, ओहोळातून त्याने मजेत फतक-फतक करत नाचायला सुरूवात करावी. तितक्यात त्याचे इतर सवंगडीही जमा व्हावेत आणि त्यांनी फेर धरावा…
मला सानेकरांच्या ओळी आठवल्या नसत्या तरच नवल…

उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणुकाही मेघांचा तो निरोप घेवून पृथ्वीकडे झेपावणार्‍या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असावी. त्याचे थेंब पृथ्वीवर पोचले रे पोचले की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेवून सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र झालेले दिसत होते.

पुढे जाताना कुठल्या तरी वळणावर अचानक मुळशीचा तो शांत जलाशय सामोरा येवुन स्वागत करता झाला आणि नकळत भारावल्यासारखे झाले.

दुरवर पसरलेले पाणी आणि डोंगर सगळेच धुक्याची दुलई ओढून थंडी आणि पाऊस दोहोंची मजा घेत होते बहुदा.

जसजसे पुढे जायला लागलो तसतसे हिरवाईचा अंमल दिसायला लागला. वरुणराजाच्या आगमनातली जादु प्रत्ययाला यायला लागली.

इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ निशःब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर
ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात

दुपारचे बारा वाजून गेले होते. आम्ही साधारण अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो होतो. मध्येच एका ठिकाणी गाड्या उभ्या करून लोक आत, कुठेतरी जाताना दिसले. म्हणून मग आम्हीही त्यांच्या मागे गेलो. छान, विस्तीर्ण धबधबा होता, पण लोकांची गर्दी एवढी होती की धबधब्यात भिजण्यासाठी लोक रांगा लावल्यासारखे वाट बघत उभे होतो. आम्ही लांबुनच मागे फिरलो….

पुढे जावून एका लहानश्याच पण एकाकी धबधब्यापाशी थांबलो.

गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून आम्ही थोडे आत जंगलात, डोंगरात शिरलो. थोड्याच वेळात अजुन एका अशाच लहानश्या धबधब्यापाशी पोचलो आणि पायपीट सार्थकी लागली.

गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई
कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या
घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती,
जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत,
पाचूंची हिरवी राने झुलव गडे, झुळझुळ गाणे ।

तिथल्या पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यावर पुन्हा नव्याच्या शोधात पुढे निघालो. जिकडे बघावे तिकडे वरुणराजाच्या कृपेची उधळण स्पष्टपणे दिसून येत होती.

चार वाजेपर्यंत मनसोक्त फिरलो. आता पोटातल्या कावळ्यांना जाग आली होती. म्हणून नाईलाजाने परत फिरायचा निर्णय घेतला. मध्येच एका ठिकाणी थांबुन (जाताना एका ठिकाणी करवंदीच्या जाळ्या सापडल्या होत्या) कुलकर्णीबाई आणि नानीने करवंदे तोडून आणली. त्यावर ताव मारून परत हॉटेलच्या शोधात निघालो.

करवंदे घेवून रमत-गमत येणार्‍या दोन सख्या ! (डावीकडे आमच्या गृहमंत्री आणि उजवीकडे नानाची नानी 😉 )

नाना आणि अस्मादिक 🙂

येताना मध्येच एका हॉटेलावर धाड टाकून पोटपुजा आटोपून घेतली.

गरमागरम शेवभाजी..

झणझणीत आलू-मटर

भाकरी संपल्या होत्या. (मुळात पुण्याच्या १०० किमीच्या परिसरात असुनही संध्याकाळी पाचच्या सुमारास जेवण मिळाले हेच महत्वाचे होते) त्यामुळे तंदुरी रोटीवर काम चालवून घेतले.

हाच तो आमच्या अन्नदात्याचा अन्नमहाल..

जेवण करून भरल्या पोटाने आणि भारलेल्या मनाने परतीच्या वाटेला लागलो. उद्यापासून परत आठवडाभर आपले रुटीन सुरू….

रस्त्याने पुण्याकडे परतताना भेटलेले गणगोत… 😉

आणि लास्ट बट नॉट द लिस्ट…
जिच्या भरवश्यावर आणि जिच्या साथीत आमची ही छोटीशी भटकंती पार पडली ती अस्मादिकांची नवी सखी, अस्मादिकांसोबत !!!

क्रमशः

हे क्रमशः या लेखासाठी नसून आमच्या भटकंतीसाठी आहे. ती अशीच तहहयात चालूच राहणार आहे, म्हणून हे क्रमश: !!!! 00020473

 
 
%d bloggers like this: