RSS

Category Archives: अधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने

अधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने – १

नाही नाही म्हणता म्हणता चाळीशी आली राव. या वर्षी डिसेंबरात चाळीस पुर्ण होतील. घरातल्या एकंदर आर्थिक-मानसिक अवस्थेमुळे थोडी लवकरच अक्कल आली होती. गुण-दोष सगळेचे टोकाचे भरलेले होते, आहेत. आतापर्यंतच्या आयुष्यात असंख्य उलाढाली केल्या (उपद्व्याप म्हणणे जास्त योग्य ठरावे). काहींनी समाधान दिले, तर काहींनी तहहयात पुरणारी , पुरून उरणारी अस्वस्थता. आता या टप्प्यावर पोचल्यावर सहजच मागे वळून पाहताना त्या वेळी कधी जिद्दीने, कधी इरीशिरीने तर कधी खुन्नस म्हणून केलेल्या, पण आज त्या आठवणीनेही अस्वस्थ करणार्‍या कित्येक गोष्टी, घटना डोळ्यासमोर येतात. चांगल्या-वाईट , खुप काही साचलय. वाट करून देण्याचा प्रयत्न करतोय.

आपलाच

कुलकर्ण्यांचा विशल्या

*****************************************************************************

मी खराखुरा नास्तिक आहे…

नक्की काळ आठवत नाही आता, पण ते दिवस भयानकच होते. खरेतर अशा दिवसांना कुठलाही ठराविक असा काळ नसतोच. ते भुतकाळात असतात, ते वर्तमानात असतात, कदाचित ते भविष्यातही असू शकतात. पण असतात एवढे खरे…

म्हणजे मी लिहायला सुरूवात केली तेव्हापासून ! नक्की नाहीत आठवत ते दिवस, पण मला वाटतं ९२-९३ चाच काळ होता तो. ९२ ची ती घटना घडण्यापुर्वी आणि घडून गेल्यानंतरचा.

सतत, सतत एक अस्वस्थपणा … पुर्णपणे नसेल पण मनाच्या कुठल्यातरी एका कोपर्‍यात तो अस्वस्थपणा सदैव जिवंत आहे, असतो. भारलेलं वर्ष होतं १९९२. श्रीराम, रामजन्मभूमी, बाबरी, कारसेवा, कारसेवक, आंदोलने, अटका आणि तिथे रामलल्लाच्या जन्मस्थानी पोहोचण्यासाठी केलेला आटापिटा. सोलापुर, लातुर, नांदेड, नागपूर मग तिथुन सेवनी.. मग अयोध्येला जाणारे सगळे रस्ते ब्लॉक केलेत हे कळाल्यावर सेवनीवरून उलटे झाशीकडे रवाना. तिथे पोलीसांचा पाहुणचार आणि ३-४ दिवसांनी तिथुनच परत रवानगी.

मनात काहूर माजलेलं. दु:ख वाटत होतं की राग येत होता नक्की नाही सांगता येणार. पराभूत अवस्था होती ती. पण प्रचंड कढ दाटून आल्यासारखं व्हायचं कधी-कधी. तिथपर्यंत जावून, आता अवघ्या ७-८ तासांच्या अंतरावर उद्दीष्ठ आलेले असताना परत फिरावं लागणं. कुठेतरी मनात राग होता, तत्कालीन यंत्रणेविरुद्ध, यंत्रणेविषयी. असं वाटायचं की सगळंच भ्रष्ट आहे. बंदुक घ्यावी आणि ठ्या ठ्या करत गोळ्या घालत सुटावं. झाशीवरून पोलीस बंदोबस्तात परत फिरताना कित्येकदा मनात विचार यायचा की सालं आपण १२ जणं आहोत. बरोबर अवघे ४ बंदुकधारी पोलीस. ते ही टिपीकल ढेरपोटे. आम्ही त्यांच्या बंदुका हिसकावून पळालो असतो तर त्यांना आमच्या पाठीमागे पळता सुद्धा आलं नसतं. पण मग विन्या समजूत काढायचा. एवढं नको रे मनाला लावून घेवू. होतं असं बर्‍याचदा. प्रत्येक वेळी परिस्थिती अनुकूलच असेल असे नव्हे. आपण प्रयत्न केले ना…….? मग झालं तर….

परत फिरलो. नोव्हेंबर एंड पर्यंत सोलापूरात दाखल, पुन्हा कॉलेज सुरू? अभ्यास, प्रॅक्टीकल्स, जर्नल्स, ओरल्स, सेमिनार्स एटसेट्रा एटसेट्रा……….! ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी पडली. पडली, पाडली, मोडली हे तितकंसं महत्वाचं नव्हतं. महत्वाचा होता तो त्या घटनेने मनात निर्माण केलेला प्रश्न…

याचसाठी केला होता अट्टाहास….?

नाही…, मंदीर वही बनायेंगे हे तर पक्कं होतं…, होतंच, पक्कं होतं. पण त्यासाठी आधी तिथे असलेली मशीदीची वास्तु पाडावी लागेल हे काही कधी नव्हतं आलं डोक्या!

मग कोणीतरी म्हणालं. अरे येड्या, तिथे मंदीरच होतं आधी. या भोXXXनी रामलल्लाचं मंदीर पाडून तिथं मशीद बांधली होती म्हणून बाबरी पाडली. आता तिथे मोठं रामजन्मभूमी मंदीर उभे राहील. रोज महाआरत्या होतील, घंटानाद होतील. आमच्या कंपूतला एक येडXवा नास्तिक म्हणाला, ” पर काय बे, उद्या तुमी तिथं देवाळ बांधला तरी तुमचा राम येइल का राह्याला तिथं. इतक्या लोकांचे बळी गेले ना बे तिथं या गोंधळात. तुमच्या रामाला झोप लागल का त्या बळींच्या करुण किंकाळ्यांच्या एकोंनी पसरवलेल्या भयाण उदास शांततेत ? ”

खाडकन जागा झालो. आता २२ वर्षे होवून गेली त्या घटनेला. राम मंदीर अजुनही बनतेच आहे. महाआरती, घंटानाद.. कदाचीत होतही असतील. पण ऐकायला, त्या आरत्या, त्या घंटा ऐकुन जागा व्हायला तिथे ‘रामलल्ला’ असेल का? आपलं नक्की काय चुकत होतं? म्हणजे मला तेव्हा झाशीहून परतताना राग कशाचा आला होता? ज्या यंत्रणेला दोष देत होतोत, आम्ही सुद्धा त्या यंत्रणेचाच एक हिस्सा होतो ना. किंबहुना आम्हीपण यंत्रणाच होतो. ते आदर्श, ती तत्वं चुकीची होती का? पण ते खरोखर आदर्श होते? तत्वे होती? की…

की होती नुसतीच, फसवी, धोकादायक मृगजळं? तो झाशीतून आमची समजूत काढून , रागावून, प्रसंगी चार शिव्या घालून आम्हाला सोलापुरकडे परत पाठवणारा तिथला पोलीस अधिकारी जर परत कधी मला भेटला ना…. (त्यावेळी खरं तर त्याच्यासाठी ‘इथे भेटलास, वर नको भेटु’ अशी भावना होती मनात), पंण आज जर तो एस.एच.ओ. युद्धवीरसिंह भेटला ना तर मी त्याला आधी कडकडून मिठी मारेन, कदाचित त्याच्या गळ्यात पडून रडेनही. पण मग हळूच त्याला ‘थँक यु’ सुद्धा म्हणेन. नाही मी हिंदू आहेच आणि आजन्म राहीन, पण त्यावेळचं ते हिंदुत्व माझ्या सदसदविवेक बुद्धीला आज पेलणारं, रादर पटणारं नाहीये. माझे मित्र मला बर्‍याचदा ‘नास्तिकतेच्या मार्गावर असलेला देशस्थ’ असे म्हणून चिडवतात. तुम्हाला वाटतो तसला ‘नास्तिक’ नाहीये रे मी…

मी खराखुरा नास्तिक आहे.

विशाल

 
 
%d bloggers like this: