RSS

Category Archives: अधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने

प्रजासत्ताक

​काल एका मित्राशी बोलताना सहज म्हणालो की यार ६८ वर्षे पूर्ण होताहेत भारतीय प्रजासत्ताकाला. तर तो हसायला लागला, म्हणाला 

“तुम्ही लेको भ्रमातच जगा आयुष्यभर.”

कसलं आलय बोडक्याचं स्वातंत्र्य आणि डोंबलाचं प्रजासत्ताक? सगळ्या समस्या निरक्षरता, गरीबी, अनारोग्य, प्रदूषण, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, हिंसाचार, सगळं तर तसेच आहे मग कसलं रे तुमचं प्रजासत्ताक? 

वाईट वाटलं, कारण त्याचं म्हणणं अगदीच खोटंही नव्हतं. पण याचा अर्थ हजारो, लाखो लोकांची बलिदाने खोटी आहेत का? साबरमतीच्या वृद्ध बापूचं मीठाचा सत्याग्रह करणं कालबाह्य झालंय का? स्वातंत्र्यवीरांनी भोगलेलं काळेपाणी खोटं होतं कां? लाल, बाल, पालादी नेत्यांनी घेतलेले कष्ट फुकटच होते का? 
हैदराबाद, गोवा मुक्ती संग्राम विसरलो आपण ?, बहुजनांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे आयुष्य व्यर्थच आहे का? समाजातील चुकीच्या रूढी परंपरांविरुद्ध आयुष्यभर झगडलेल्या डॉ. दाभोलकरांचे बलिदान व्यर्थच आहे का? आदरणीय आमटे कुटुंबीयांनी चालवलेला सेवेचा यज्ञ काय सांगतो?  ६१, ७१, कारगिल विसरलो का आपण?  मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभर एकवटलेले जनमत, २००६ च्या हाय टाईडच्या वेळी गरीब श्रीमंत, जात पात सगळे विसरून  एकमेकांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा भिडवून नेटाने उभे राहिलेला, लातूर, भूजचे भूकंप असोत, त्सुनामीची आपत्ती असो, बिहार, आसाम मध्ये येणारे पूर असोत प्रत्येक वेळी आपल्या बांधवांच्या मदतीसाठी एक दिलाने एकवटणारा समाज म्हणजे दुसरं काय असतं? 
प्रगती, विकास, न्यायसाधने, कायद्याची यंत्रणा या प्रजासत्ताक यशस्वी होण्याच्या महत्वाच्या पायऱ्या असतातच. पण प्रजासत्ताकाचा मूलभूत घटक आहे प्रजा. प्रजा म्हटले की त्यात अठरापगड माणसे असणार, वाद कलह भांडणे असणार. महत्वाचे आहे ते प्रसंगानुरूप त्याचे एकत्र येणे, कालानुरूप प्रगल्भ होत जाणे. वर उल्लेखलेल्या समस्यांशी आपली सरकारे गेली सत्तर वर्षे झगडताहेत. पण जोपर्यंत आपण स्वतः या प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होत नाही , जो पर्यंत लहान सहान कामे करून घेण्यासाठी आडमार्ग वापरायचे बंद करत नाही, टॅक्स चुकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधायचे थांबवत नाही, कामं लवकर करून घेण्यासाठी संबंधितांना चहापाणी करणे थांबवत नाही, रस्त्यावर एखाद्या भगिनीला छेडणाऱ्या रोड रोमिओला पुढे होऊन थोबाडण्याचे धैर्य दाखवत नाही. तो पर्यंत निव्वळ सरकारला किंवा कुणालाही दोष देण्यात काय अर्थ आहे?
निव्वळ येता जाता सरकारला शिव्या घालण्यापेक्षा हे आपले भारतीय प्रजासत्ताक समृद्ध, विकसित होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ? आपण काय करू शकू? यांच्यावर विचार करूयात आणि अंमल करूयात ?
असो, आजच्या पवित्र दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ही सदिच्छा 💐 
तळटीप : कृपया इथे सरकार ही संज्ञा सरकार या अर्थानेच घ्या, भाजप किंवा काँग्रेस नाही. ही पोस्ट राजकारणावर नाहीये, तेव्हा इतर कसलाही फालतूपणा सहन केला जाणार नाही
© विशाल कुलकर्णी

 

अधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने – २

Yes, I am a Salesman !

अधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने – १

“विशल्या, साल्या तू चुकून इंजीनीअर झालास. तू खरं तर मास्तरच व्हायला हवं होतंस, ते सुद्धा मराठीचा. ”

जुन्या मित्रांचा कंपू भेटला की गप्पांमध्ये एकदा तरी हे वाक्य ठरलेलं असतं. कुणी ना कुणी हे वाक्य टाकतंच. मग त्या अनुशंगाने दुसरा कुणीतरी विचारतो., “फोकलीच्या इंजीनीअरींगला कसा काय आलास मग? आणि इंजीनीअरींग करून सेल्सलाईनला कसा शिरलास येड्या? “.

मी पण उगीचच थोडा आव आणत ठोकुन देतो,” अबे लहानपणापासून भटकायची प्रचंड आवड होती. त्यामुळे ज्यात कंपनीच्या पैश्याने फिरता येइल अशी नोकरी निवडली झालं.”

पण खरं सांगू इंजीनीअरींग मध्ये कधीच रस नव्हता, सेल्समध्ये तर नव्हताच नव्हता. एका गोष्टीची खात्री होती तेव्हापासून की जे करू त्यात यश नक्की मिळणार. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायची तयारी होती, अजुनही करतोच आहे. आज बर्‍यापैकी यश मिळालय. पैसा मिळालाय. पण कधी कधी राहून राहून वाटतं की तेव्हा त्या भावनीक वादळांच्या आहारी जाऊन सेल्सलाईनकडे वळण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचीत आज मी काहीतरी वेगळे, माझ्या आवडीचे काम करत असतो. कदाचित पुर्णवेळ छायाचित्रकारही झालो असतो, कदाचित मास्तरकीही केली असती. कदाचित……

“वर्ष १९९२ , जानेवारीचा महीना. आमच्या सोलापूरातली प्रसिद्ध गड्ड्याची यात्रा आणि त्या यात्रेत बसुबरोबर एका कॉट टाकून त्यावर मांडलेला विवेकानंद केंद्राचा, रामकृष्ण मिशन प्रकाशित स्वामीजींच्या पुस्तकांचा स्टॉल. बसु म्हणजे श्री. बसवराज देशमुख, सोलापूर विवेकानंद केंद्राचा त्यावेळचा मुख्य सचिव. खरतर सचिव हे उगीचच म्हणायला म्हणून. बसु सोलापूर केंद्राचा सबकुछ होता. तसे असायला अध्यक्ष व इतर लोक होते. पण केंद्र अ‍ॅक्टीव्ह होतं ते बसुमुळे. ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत असलेला ‘बसु’ आपली सगळी अवधानं-व्यवधानं सांभाळून सोलापूर केंद्राचा व्याप सांभाळायचा. आम्ही त्याच्याबरोबर असायचो. इतर वेळी बोलताना दर चार शब्दानंतर अडखळणारा (हा त्याचा जिव्हादोष होता) बसु, पण स्वामीजींवर बोलायला लागला की तासनतास न अडखळता, न थकता बोलु शकतो. असो तर आम्ही गड्ड्याच्या जत्रेत केंद्राच्या पुस्तकांचा स्टॉल टाकला होता. बर्‍यापैकी विक्रीही होत होती. मध्येच बसुच्या मनात काय आले की? त्यातली ‘स्वामीजींच्या विचारांवरची’ ५-१० रुपये किंमत असलेली ९-१० छोटी पुस्तके उचलून माझ्या हातात दिली आणि म्हणाला, “जा, यात्रेत फिरून विकून टाक ही पुस्तके. कुणी जास्त चौकशी केली तर त्याला स्टॉलवर घेवून ये.”

मी पुस्तके घेवून निघालो खरा पण….

पहिलीच वेळ होती. धाडसच होत नव्हतं. धाडस म्हणण्यापेक्षा लाज वाटत होती. अशी मध्येच गर्दीत लोकांना थांबवून पुस्तके कशी विकायची? मी इंजीनीअर होणार होतो. इलेक्ट्रॉनिक्स शिकत होतो आणि असं कसं काय रस्त्यावरच्या लोकांना अडवून काही विकायचं? मी दोन चकरा मारल्या, पण नाही जमलं मला कुठल्या माणसापाशी थांबून त्याला पुस्तक विकायचा प्रयत्न करायला. मी तसाच परत आलो. परत आलो तेव्हा बसु कुठल्यातरी ग्राहकाशी बोलत होता, स्वामींजींच्या साहित्याबद्दल माहिती देत होता. थोड्या वेळाने तो माणुस निघून गेल्यावर बसुने विचारलं , “काय विशालराव, विकलीत का पुस्तकं?”

मी गोंधळलो, क्षणभरच पण लगेच सावरून घेतलं,” नाही रे, खुप जणांशी बोललो पण एकच पुस्तक विकलं गेलं फक्त. ” मी माझ्याच खिशातले १० रुपये काढून त्याच्या हातात ठेवले. पुस्तकं परत देताना एक सफाईने खिश्यातच लपवलं. बसुने ते दहा रुपये घेतले आणि पाठीवर एक मस्त थाप मारली…

“शाब्बास ! अरे पुस्तके विकली गेली तर हवीच आहेत पण केवळ पुस्तके विकणे हाच हेतु नव्हता तुला पाठवण्यात. तुझी भीड मरावी, संकोच सरावा म्हणून तुला पाठवले होते. समाजकार्य करायचे म्हणजे कशालाच लाजून चालत नाही. ती तुझी लाज संपावी म्हणुन पाठवले होते तुला. आणि बघा ना पुस्तके जरी विकली गेली नाहीत तरी तू कितीतरी लोकांपर्यंत स्वामीजींचे विचार पोहोचवलेस ना त्या निमीत्ताने, ते महत्त्वाचे रे.”

मी उगीचच कसनुसा होत हसलो. बसुला तो माझा विनय वाटला, खरी परिस्थिती मलाच माहीत होती. मघाशी वाटली नव्हती तेवढी लाज आता वाटायला लागली होती. आपण बसुशी खोटं बोललोय ही बाब मनात काचत होती. पण अजुनही मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात तथाकथीत प्रतिष्ठेचे, संकोचाचे भूत जागे होते. मी काहीच बोललो नाही बसुला. पण तेव्हाच मनाशी ठरवलं होतं.

“छ्या… सालं ४-५ पुस्तकं. तीही ५-१० रुपये किंमतीची, पण ती सुद्धा विकायला जमु नये. विकणं सोडा साधं लोकांशी संवाद साधणं गेलाबाजार नुसतं बोलणं सुद्धा जमू नये आपल्याला? वाट्टेल ते झालं तरी चालेल पण ही लाज, हा संकोच संपायलाच हवा. तेव्हाच ठरवलं शिक्षण काही का होइना पुढे, पण करीयर सेल्समध्येच करायचं. ”

आता हसू येतं स्वतःचंच. पण मी झपाटल्यासारखा झालो होतो त्या कल्पनेने. शिक्षण संपल्यावर सुद्धा ठरवल्याप्रमाणे सेल्सलाच घुसलो तो आजतागायत त्याच क्षेत्रात आहे. एके काळी ४-५ पुस्तके , ती सुद्धा अत्यल्प दरातली विकायला सुद्धा लाज वाटलेला मी. आज ‘ट्रिंबल पोझीशनींग’ सारख्या मल्टीनॅशनल कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आहे. संपुर्ण भारताबरोबर श्रीलंका, नेपाळ, भुतान, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशातला कंपनीचा ‘ओमनीस्टार जीपीएस रियल टाईम करेक्शन्स’चा व्यवसाय मी सांभाळतो. पण आजही जेव्हा ते ‘दहा रुपयाचं पुस्तक’, प्रत्यक्ष न विकता खोटंच, स्वतःच्या खिश्यातले दहा रुपये भरून, विकले असे सांगून बसुची शाबासकी मिळवणारा तो खोटारडा विशाल माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि ……….

बसु, मला आणि तुला प्रिय असलेल्या स्वामी विवेकानंदांची शपथ घेवून सांगतो. तो माझ्या आयुष्यातला शेवटचा खोटेपणा होता. गेली १६-१७ वर्षे सेल्सलाईनमध्ये आहे. तरीसुद्धा एकदाही मला माझे काम करण्यासाठी खोटेपणाचा आधार घ्यावा लागलेला नाही. कारण जेव्हा जेव्हा मी अशा प्रसंगात, अशा धर्मसंकटात अडकतो तेव्हा मला तो ‘विशाल’ डोळ्यासमोर दिसतो आणि “खोटारडा-खोटारडा” म्हणून ओरडायला लागतो. मग मी खंबीरपणे समोरच्या परिस्थितीशी वैध आणि योग्य मुद्द्यांवर झुंजायला तयार होतो.

Thanks Basu, I love you my friend. You made my life!!

विशाल…

 
 
%d bloggers like this: