RSS

Author Archives: अस्सल सोलापुरी

सामान्यांच्या जगण्याचे गाणे – ऐरणीच्या देवा तुला ….

एकोणीसशे साठच्या दशकाच्या सुरूवातीची ही गोष्ट. साधारण १९६३-६४ वगैरेचा काळ असावा. भालजींनी एका नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली. कलाकार, संगीतकार आणि इतर टीमचे कास्टिंग झाले होते. पण यावेळी भालजींनी एक महत्त्वाचा बदल केला होता. भालजींचा चित्रपट म्हटले की त्यात एक नाव २०० टक्के पक्के असायचे ते म्हणजे गीतकार जगदीश खेबुडकर. खेबुडकरांच्या गाण्याशिवाय भालजींचा चित्रपट हे समीकरण मान्यच नव्हते जणु त्यांनाच. पण यावेळी भालजींनी आपल्याच नियमात बदल करायचे ठरवले होते. या चित्रपटासाठी ‘जगदीशची गाणी’ घ्यायची नाहीत हे त्यांनी आधीच ठरवले होते आणि तसे खेबुडकराना कळवले सुद्धा होते. त्यामागचे खरे कारण माहिती असल्याने खेबुडकरांना देखील त्याचे थोडेफार वाईट वाटले असले तरी खंत नव्हती. कारण हा प्रयोगशील भालजींचा एक प्रयोग आहे हे पक्के माहिती होते त्यांना. या चित्रपटाची गाणी कवि योगेश आणि भालजीं स्वतःच लिहिताहेत हेही त्यांच्या कानावर आले होते आणि त्यामुळेच यातली गाणी कशी असतील याबद्दल खेबुडकरांना सुद्धा कमालीची उत्सुकता होती. (असे ऐकिवात आहे की भालजीनी स्वतःच  कवि योगेश हे टोपण नाव घेवून गीते लिहीली होती)

तशात एका दिवशी अगदी अनपेक्षीतपणे जगदीशजीना भालजींचे बोलावणे आले. खेबुडकरांनी सायकलीवर टांग टाकली आणि स्टुडिओत हजर झाले.
खेबुडकर भालजींना म्हणाले ‘बाबा काय बोलावणं?’
भालजी म्हणाले, ‘अरे जगदीश मी साधी माणसं करतोय’,
तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले, ‘हो मला माहित आहे, गीतंही तुमचीच आहेत’.
भालजी यावर म्हणाले, ‘हो मी काही गीतं लिहली आहेत, पण एका गाण्यासाठी अडलंय.’ खेबुडकर यावर म्हणाले ‘कोणतं हो गाणं?

मला एक ‘थीम साँग’ हवं आहे, ‘तुझं गाणी घ्यायची नाहीत, असा प्रयत्न करून लिहतोय, पण या एका गाण्यावर अडलंय’, असं भालजी पेंढारकर यांनी स्पष्टपणे जगदीश खेबुडकरांना सांगितलं. भालजींनी खेबुडकरांना नवीन चित्रपटातली कथा ऐकवली. चित्रपटातले गावाकडून शहरात आलेलं लोहारकाम करणारं जोडपं, त्यातली गोजिरी, नवऱ्यावर त्याच्या प्रामाणिकपणावर, कष्टाळू वृत्तीवर जीवापाड प्रेम करणारी, त्याबद्दल मनापासुन अभिमान बाळगणारी स्वाभिमानी पारू, नवऱ्याबद्दल तिच्या भावना, लोहारांचा देव म्हणजे त्यांचा भाता, त्यांना वाहिली जाणारी फुलं म्हणजे आगीच्या ठिणग्या असं काहीतरी प्रतिकात्मक , भावनांना हात घालणारे शब्द हवेत अशी भालजींची खेबुडकरांकडून अपेक्षा होती. आणि भालजींकडून हे ऐकत असतानाच खेबुडकरांच्या मनात हे गाणं आकार घेवू लागलं होतं. खेबुडकरांनी तिथेच भालजींकडून कागद आणि पेन मागून घेतला आणि गाण्याचा मुखड़ा लिहून दिला…

ऐरणीच्या देवा तुला आगिनफुलं वाहु दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी ऱ्हाऊ दे

चित्रपटाच्या संगीतकार आनंदघन म्हणजेच आपल्या लाडक्या लतादीदीनी पहिल्या ओळीत एक छोटासा बदल सुचवला आणि तो खेबुडकरांनी स्वीकारला…

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी ऱ्हाऊ दे

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी एका ठिकाणी म्हटले आहे…

” गाता येतं म्हणून संगीतकारही व्हावं आणि संगीत देता येतं म्हणून गाऊनही घ्यावं,असा संगीतविश्वाचा सध्याचा शिरस्ता झालेला आहे. यात ना निर्माण झालेल्या गाण्यात जीव असतो,ना आत्मा; पण लता मंगेशकर उर्फ आनंदघन यांनी जेव्हा संगीत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावलं होतं. तेव्हा त्यात नि:संशय कलाविषयक निष्ठा तर होतीच , त्याबरोबरीला संगीताच्या जाणकारीची, मातीच्या गंधाची आणि चिंतनाच्या खोलीचीही अपूर्व साथ होती. म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा स्वर जितका उच्च प्रतीचा होता, तसाच‘आनंदघन’म्हणून आकारास येणारा संगीताचा मेळाही लोकविलक्षण होता… !”

गायिका म्हणून लताबाई सर्वश्रेष्ठ आहेतच, पण त्यांनी संगीतकार म्हणूनही मोठे योगदान दिले आहे. ‘आनंदघन’या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून केलेला छोटासा, पण प्रतिभावान प्रवास चिरस्मरणीय ठरला आहे. चालींमधील वैशिष्ट्यपूर्ण माधुर्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या ओठी आजही रुळताना दिसत आहेत. चालीत माधुर्य आणि प्रामाणिकपणा असला, की ते गाणे हृदयाला भिडते. एकुण फक्त पाच सिनेमांना त्यांनी संगीत दिले. पण यातल्या प्रत्येक सिनेमातील गाणी आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करताना दिसून येतात. आणि आनंदघन उर्फ लताबाईंच्या संगीतकार म्हणून श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब होते. यातले चार सिनेमे भालजींचे होते इतका विश्वास भालजींचा आणि लताबाईंचा एकमेकांवर होता. भालजींना आपल्या सिनेमातून रसिकांना काय द्यायचे आहे,हे संगीतकार म्हणून बाईंना अचूक गवसले होते. त्यातुनच जन्माला आलेले हे एक रत्न.

प्रामाणिकपणे छोटी मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य, साध्या माणसांच्या जगण्यातील आनंद हे गाणी अश्या काही पद्धतीने मांडते की ते आपोआप या मराठी मातीशी असलेले आपले नाते स्पष्ट करायला लागते. महाराष्ट्र भूमीच्या रांगडेपणाचा, साधेपणाचा अस्सल सुगंध त्यामधून अनुभवायला मिळतो आणि म्हणूनच इतक्या काळानंतरही “ऐरणीच्या देवा” तुम्हा आम्हाला गुणगुणावेसे वाटते. कुठेही लागले की नकळत पाय ठेका धरतात. गंमत म्हणजे गाण्याच्या चित्रिकरणात नृत्याचा लवलेशही नाहीये, पण ऐकताना मनमयुर नाचायला लागतो. “साधी माणसं” या नावाप्रमाणेच चित्रपटाचं संगीतही साधंच होतं. आपल्या कामाशी प्रामाणिक पारू लोहारीण, नवर्‍याच्या साथीने आगीनफूल- ठिणगी ठिणगी, वाहून ऐरणीच्या देवाची पूजा मांडते. लोहाराच्या भात्याच्या आवाजात लताबाईंचा दैवी सूर मिसळतो. भाता, ऐरण आणि हातोडा ही लोहाराची हत्यारं मग संगीताची वाद्यं होतात आणि हातोड्याच्या ठोक्याबरोबर खेबुडकरांचे साधेच पण प्रत्ययकारी शब्द लताबाईंच्या दैवी आवाजात कानात रुंजी घालायला लागतात.

ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाऊ दे

पारुसाठी तिचे काम हाच तिचा देव आहे. तिचा नवरा शंकर हेच तिचे सर्वस्व आहे. त्याच्या जोडीने ती आपल्या कर्माला म्हणजे लोहार्‍याच्या भात्यालाच देव मानून त्याची पुजा करतेय. इथेही खेबुडकर आणि भालजी आपल्या साध्याश्या शब्दातुनसुद्धा त्या जोडप्याचे साधेपण, आपल्या कामाशी असलेली निष्ठा व्यक्त करतात. या पुजेत कसलेही अवडंबर नाही. उदबत्ती, निरांजने ओवाळून केलेले पुजेचे कर्मकांड नाही. फुले नाहीत, नैवेद्य नाही. तर आपल्या कामातूनच ती या आपल्या देवाला कर्माचेच तोरण बांधतेय. श्रमाचीच फुले आणि घामाचा, मेहनतीचा नैवेद्य चढवतेय. त्याला विनवतेय की आणखी काही नको, फक्त त्या आभाळागत तुझी कृपा कायम आमच्यावर राहू दे. ती आपल्या या देवाला धन संपत्ती नाही मागत, तर कायम काम करत राहण्याची संधी मिळो इतकीच मागणी मागतेय.

लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
दीन होऊ आबरूचं, धनी मातुर माजा देवा, वाघावानी असू दे

तिला धनसंपत्ती नकोय. नवर्‍याचा प्रामाणिकपणा, मेहनती वृत्ती आणि त्याची परिस्थितीशी झुंज देण्याची धाडसी वृत्ती हीच तिच्यासाठी खरी दौलत आहे. गरिबी असली तरी असू दे. तिच्यासाठी तेच खरे दागिने, जडजवाहिर, कपडेलत्ते आहेत. अर्थात संसारातील अडीअडचणींना तोंड देण्यासाठी धनी मात्र तिला वाघासारखा असायला हवा अशी तिची इच्छा आहे, प्रार्थना आहे. तिला याची जाणीव आहे की जीवनात कितीही कष्ट असले, कितीही संकटे आली तरी तिच्या शंकराची साथ असेल तर आपल्या मेहनतीच्या, श्रमाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर तो ल़क्ष्मीला आपल्या दारात चवरी ढाळायला भाग पाडेलच. तीचे मागणे एवढेच आहे की घरातली सगळी विघ्ने टळोत, इडा-पीडा जावो. तुझी कृपा आमच्या मेहनतीच्या, कष्टाच्या सुरांबरोबरच जगण्याच्ण गाणं होवून आयुष्यात मिसळून जावू दे.

लक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाऊ दे

पारूचे वय जरी कमी असले तरी तिची समज मोठी आहे. तिला आपल्या आयुष्याबद्दल उगीच कसल्याही भ्रामक कल्पना बाळगण्याची सवय नाहीये.

सुख थोडं, दु:ख भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगी बळ येउ दे !

तिला कल्पना आहे की आपल्या आयुष्यात सुख तुलनेने कमीच असणार आहे. दु:खाचाच भरमार जास्ती असणार आहे. पण तिने ते प्राक्तन स्वीकारलेले आहे. त्याबद्दल तिच्या मनात कसलीशी कटुता, कुठलाही कडवेपणा किंवा तक्रार नाहीये. जे आहे ते तिने मान्य केलेलं आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय अंगी देवपण येत नाही हे तिला माहीत आहे. त्यामुळे ती आपल्या देवाकडे सुख मागत नाही. तर ती मागते सामर्थ्य, सहनशीलता आयुष्याशी, सु:खाशी, संकटांशी झुंजण्यासाठी. इथे भालजी पारूचे वेगळेपण अधोरेखीत करतात. ती सामान्य असली तरी इतरांसारखी नाहीये. तिच्या अपेक्षा साध्या आहेत, पण त्यातुनच तिचे असामान्यत्व अधोरेखीत होतेय. ती सुख मागत नाही तर दु:खाशी लढण्याची शक्ती मागते.

शंकर आणि पार्वती हे लोहार दाम्पत्य हणबरवाडीत दिवसरात्र काबाडकष्ट करून मिळतील त्या चार पैशात आनंदानं संसार करीत असतात. पण या साध्या माणसांच्या जीवनातही अनपेक्षित वळणं येतात. गाडीचा कमानपाटा तुटला म्हणून ट्रक-ड्रायव्हर छक्कडराव शंकर लोहाराकडे जातो. शंकर तो दुरूस्त करून देतो. शंकरच्या कामावर छक्कडराव खूश होऊन शंकरला शहरात चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्याला कोल्हापूरला घेऊन येतो. आपल्या ओळखीनं एका फौंड्रीत नोकरीही मिळवून देतो. पण शहरातलं जीवन साधं नसतं. छक्कडरावचा बेत वेगळाच असतो. छक्कडरावच्या मनात पारूला गटवायचं असतं. छक्कडराव फसवणुकीच्या एका खोटय़ा केसमध्ये शंकरला गोवतो आणि त्याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होते. मग एकाकी पारूला अनेक आमिषं दाखवूनही ती वश होत नाही तेव्हा छक्कडराव तिच्यावर हात टाकतो. पारू साधी असली तरी पातिव्रत्य जपणारी, करारी आणि तडफदार आहे. प्रसंगी ती वाघीण होते. ती छक्कडरावच्या डोक्यात लाकूड घालून त्याला ठार मारते. पोलीस तिला पकडून नेतात. कोर्टात रीतसर खटला सुरू होतो. सरकारी वकील तिला या गुन्ह्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करतात. पार्वतीचे वकील बचावाच्या युक्तिवादाला उभे राहतात.

‘‘आरोपी पार्वती लोहार हिनं छक्कड ड्रायव्हरच्या डोक्यात लाकूड घालून ठार मारलं असं ती स्वत: कबूल करते. कारण ती बाई खरं बोलणारी आहे. गरीब, श्रमजीवी माणसाची ती बायको आहे. आपला नवरा, आपली अब्रू यापलीकडचं जग तिला माहीत नाही. अशी संसाराच्या उंबरठय़ावर उभी असलेली स्त्री जीव द्यायच्या तयारीनं एखाद्याचा जीव घेते याचा अर्थ काय? चारित्र्याचा बळी गेल्यानंतर अशा स्त्रीला जगात जगण्यासारखं दुसरं काहीच उरत नाही. कायद्याचा मूळ हेतू सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन करणं हा असेल तर या बाईला शिक्षा देताना हा हेतूच पराभूत होईल. म्हणून या शूर, स्वाभिमानी स्त्रीला संपूर्णपणे निर्दोष ठरवून तिला आदरपूर्वक मुक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो..’’

वकिलांनी पार्वतीची अशी बाजू मांडल्यानंतर न्यायाधीश तिला विचारतात, ‘‘तुला काही सांगायचं आहे का?’’
पार्वती म्हणते, ‘‘सरकार, आम्हा गरीबाची दौलत आमची अब्रू. जोवर डोईवर पदर.. गरतीचं जिणं तोवर. त्यालाच कोणी हात घातला तर आमी काय करावं? मी त्याला ठोकला हे खरं; आता तुमी काय बी करा.’’

एवढीच तिची कैफियत! पण त्यामध्ये तिच्या जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलेलं आहे. आणि इथेच ‘भालजींचा ‘ साधी माणसं ‘ सामान्य माणसाची स्वप्ने घेवून असामान्यत्वाच्या रांगेत जावून पोहोचतो. कारण इथे मग ही कथा, हि कैफियत एकट्या पारूची, शंकरची राहात नाही. ती आपोआप समाजातल्या प्रत्येक कष्टकरी व्यक्तीची, आयुष्याची झुंजत आपला संसार फुलवणार्‍या प्रत्येक जोडप्याची होवून जाते. एका छोट्याश्या गावातील पारू तिच्याही नकळत जागतीक स्तरावरच्या प्रत्येक स्त्रीशी आपले नाते सांगायला लागते. प्रत्येकीला स्वतःमध्ये पारू आणि पारूमध्ये स्वतःला बघावेसे वाटू लागते. तिथेच पारू निव्वळ चित्रपटापूरती मर्यादीत न राहता वास्तवाच्या पातळीवर उतरून प्रत्येक स्वाभिमानी, स्वावलंबी स्त्रीशी आपले नाते द्रुढ करते.

असं म्हणतात, की आजचा ‘उद्या’ हा परवाचा ‘काल’ होतो.  काळ कुणासाठीच थांबत नाही, त्याची गती कुणालाच थांबवता येत नाही. त्याला फक्त पुढे जाणे माहिती असते. चित्रपटाचा रूपेरी पडदा हा त्याचा महत्त्वाचा साक्षीदार ठरावा. दुर्दैवाने कृष्णधवल चित्रपट आता निघत नाहीत. त्यांची जागा आता रंगीत, मल्टीकलर चित्रपटांनी घेतलेली आहे. अद्ययावत तंत्रद्यानाचा वापर होतो आहे. जगातल्या प्रत्येक देशात जावून चित्रीकरण होते आहे. बदलती परिस्थिती व तंत्र यामुळे जयप्रभा स्टुडिओतली आणि पर्यायाने कोल्हापुरातली चित्रनिर्मिती  आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जयप्रभा स्टुडिओ तर कधीच बंद पडला आहे. ‘साधी माणसं’ मध्ये सहभाग असणारे बहुतेक कलावंत उदा. सूर्यकांत, जयश्री गडकर, राजशेखर, चंद्रकांत गोखले, मास्टर विठ्ठल, दीनानाथ टाकळकर, बर्चीबहाद्दर, संभा ऐरा, वसंत लाटकर, बाळ दैनी, पडद्यावर प्रतिमा निर्माण करणारे छायालेखक अरविंद लाड, कला-दिग्दर्शक सदाशिव गायकवाड, संकलक बाबुराव भोसले, स्थिर-छायाचित्रणकार शाम सासने, पोस्टर डिझाइन करणारे कलायोगी जी. कांबळे, निर्मिती व्यवस्थापक वसंत सरनाईक, त्यावेळी स्टुडिओत काम करणारे तंत्रज्ञ, दुय्यम साहाय्यक , कामगार आता हळुहळु विस्मरणात जाताहेत. या सर्वाना एकत्र आणून नवी क्षितिजं निर्माण करणारे भालजी पेंढारकर तर नव्या पिढीला माहीतही नसतील. पण जोवर सामान्य माणसाच्या मनात संगीताची गोडी आहे तोवर ही गाणी जनमनावर राज्य करत राहतील. सामान्यजनांच्या ओठावर रेंगाळत राहतील.

काळाचे हे क्षण गतकालाच्या स्मृती जतन करण्यासाठीच असतात. मागील पिढी पुढच्या पिढीला जो वारसा देते तो मोजायला व्यावहारिक यशाची परिमाणं पुरेशी ठरत नाहीत. हे वर्तमानकाळाचे संचित असते जे तो नित्यनेमाने जतन करण्यासाठी म्हणून भविष्याच्या स्वाधीन करत असतो. चित्रपटांच्या बाबतीत तर हे सार्वकालिक सत्य ठरावे. पुतळे बोलू शकत नाहीत पण चित्रपट, नाटके बोलतात. आपल्या वैभवशाली गतकाळाची कहाणी सांगतात. कधीकाळी फाळकेंनी बघितलेल्या स्वप्नांची गोष्ट आपल्यापर्यंत पोचवत राहतात. बाबुराव पेंटर, शांतारामबापू, सत्यजीत रे, के.आसिफ, कारदार, भालजी पेंढारकर, गुरुदत्त यांचे चित्रपट ही त्यांची खरीखुरी स्मारके आहेत. त्यातली गाणी हे त्या स्मारकांचे चालते-बोलते भाट-चारण आहेत. जोपर्यंत ही गाणी आपल्या ओठांवर आहेत तोवर जगणे असेच गाणे होत राहणार. समृद्ध होत राहणार.

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी, ०९९६७६६४९१९ . पनवेल.

 

हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले…

काल नेहमीप्रमाणे बॉसच्या केबिनमधून लेक्चर आणि नेहमीची मुक्ताफळे ऐकून बाहेर पडलो. बरोबरचा माझा सहकारी नागेश म्हणाला, “साला अपने जितनी (आम्ही सेल्सवाले) बदतर हालत तो प्युन की भी नहीं होगी!” आम्ही दोघेही एकमेकाला टाळी देवून हसलो. (सेल्समध्ये १८-१९ वर्षे काढल्यावर इतका निर्लज्जपणा येतोच अंगी.) मला नेमके त्याच वेळी आमच्या गालिबमियॉंचा शेर का आठवू नये ? गालिबमियॉं म्हणतात…

निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन
बहुत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले

मियॉं म्हणतात की माणसाची निर्मीती सर्वप्रथम जन्नतमध्ये म्हणजे स्वर्गात झाली असे ऐकत आलोय लहानपणापासून. पण तुझ्या गल्लीतून मात्र अतिशय बेइज्जत होवून बाहेर पडलो. प्रत्येक वेळी, म्हणजे तुमचा परफॉर्मन्स कितीही चांगला असला तरी बॉसच्या दॄष्टीने तुम्ही कायमच अंडर युटीलाइइज्ड असता. माझ्या सेल्सलाईनमधल्याच नव्हे तर सर्वच क्षेत्रातल्या मित्रांना याची चांगलीच सवय आणि जाणिव असेल. नागेशच्या नकळत गुपचूप कानाची पाळी पकडत मनातल्या मनात गालिबमियॉंची माफी मागितली आणि माझ्या डेस्ककडे वळलो. पण मनात मात्र मियॉं फेर धरायला लागले होते.

220px-Asad_ghalib

मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे नाव म्हणजे गझलेच्या क्षेत्रात नुसत्या उच्चाराबरोबर कानाची पाळी पकडायला लावणारं नाव. फारसी भाषेतील साहित्याला हिंदोस्तानी जुबानमध्ये स्वतःचा असा एक समर्थ प्रवाह मिळवून देणारं, गझलेच्या क्षेत्रात कायम उच्चासनावर विराजमान असलेलं हे नाव. जेवढं गालिबवर लिहीलं गेलय तितकं इतर कुठल्याही शायरवर लिहीलं गेलेलं नसेल. घरातली भाषा फारशी, पण याचं बहुतेक लेखन उर्दू भाषेत. आज बहुतेक वेळा गालिबला ‘उर्दू भाषेचा सर्वश्रेष्ठ कवि’म्हटलं जातं, ते मात्र मला पटत नाही. साहिरने त्याच्या एका शेरात म्हटलं होतं…

“ग़ालिब जिसे कहते हैं उर्दू का ही शायर था, उर्दू पे सितम ढाकर ग़ालिब पे करम क्यों है…” तसं पाहायला गेलं तर आजकाल सगळ्याच भाषांवर अन्याय, अत्याचार होताहेत. पण गालिब कधीच उर्दुपुरता मर्यादित नव्हता. मला वाटतं जगातल्या कित्येक भाषातून त्याच्या शायरीची भाषांतरे झालेली आहेत. तो सार्वकालिन आहे, सर्वव्यापक आहे. त्याची हि त्याच्यासारखीच सार्वकालिन, सर्वव्यापक गझल.

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले

त्याची शायरी फक्त प्रेम या विषयावर नाहीये, तर तत्त्वज्ञान, रोजच्या जिवनात येणारे साधे साधे प्रसंग आणि प्रसंगी तत्कालीन राजकारणावरही भाष्य करणारे समर्थ लेखन आहे हे. इथे तो मानवी आयुष्यातले एक महत्त्वाचे सत्य अधोरेखीत करतोय. आपण अनेक आकांक्षा घेवून जगत असतो. सगळ्याच इच्छा आपल्याला इतक्या जवळच्या असतात की एकेकीवर आयुष्य उधळून टाकावं. गंमत म्हणजे माणसाचा मोह कधीच संपत नाही. कितीही इच्छा पुर्ण झाल्या तरी रोज नवनव्या आकांक्षा, अपेक्षा जन्म घेतच असतात. हे सगळं आयुष्य देखील मानवी अपेक्षा, इच्छा पुर्‍न करायला कमीच पडावं इतक्या. त्या कधीच संपत नाहीत.

डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर
वो खून जो चश्म-ऐ-तर से उम्र भर यूं दम-ब-दम निकले

माझ्या इच्छा, अपेक्षा माझ्या आहेत. त्यांच्या पुर्ण होण्या , न होण्याची जबाबदारी पुर्णतया माझी आहे. एखादी इच्छा , विशेषतः पियामिलनाची पुर्ण नाही झाली तरी तो माझा प्रश्न आहे. त्यासाठी माझ्या प्रियेला (इथे तो आपल्या प्रियेला कातिल म्हणतोय, कारण तिच्या नकारानंतर जगण्यासारखं काही शिल्लकच राहात नाही) घाबरण्याची काहीच आवष्यकता नाहीये. कारण माझ्या डोळ्यातून आजन्म वाहणार्‍या आसवांसम रक्ताची जबाबदारी माझी आहे.

निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन
बहुत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले

इथे आपण जरा पार्श्वभूमी समजून घेवूयात. या शेराचा संबंध ‘आदम’शी आहे. पोथ्या, पुराणा, कुराण, बायबलनुसार विश्वातला पहिला मानव. कथा अशी आहे की आदमचा जन्म स्वर्गात झाला होता. पण त्याने खुदाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे त्याला स्वर्गातून हाकलून देण्यात आले. गालिब मिया इथे सर्वसाधारण प्रेमी जिवांचा, आशिक वृत्तीचा आणि त्याच्या प्राक्तनाचा संबंध आदमशी लावतात. की परमेश्वराने आदमला स्वर्गातून हाकलुन दिल्याचे ऐकून होतो, पण माझी तर तुझ्या गल्लीत नेहमीच त्याहीपेक्षा मोठी बेइइज्जती होते. मलाही त्याच पद्धतीने तुझ्या म्हणजे प्रियेच्या गल्लीतून बेदखल करण्यात आलेले आहे.

भरम खुल जाये जालीम तेरे कामत कि दराजी का
अगर इस तुर्रा-ए-पुरपेच-ओ-खम का पेच-ओ-खम निकले

साधी साधी रुपके वापरून मानवी स्वभावांवर भाष्य करणे यात मियाजींचा हातखंडा आहे. आमचे तुकोबा म्हणतात, ‘का रे भुललासी वरलिया रंगा’ तसेच इथे गालिब समोरच्या घमंडी व्यक्तीला सुनावतोय. तुझ्या मस्तावरील शिरपेचाच्या ते रुबाबदार तुर्‍याचा इतकाही गर्व करू नकोस. तो फक्त वरवरचा आहे. त्यामुळे तुला आपण कुणीतरी मोठे, उच्च असल्याचा भ्रम झाला असेल तर लक्षात ठेव, ते फक्त बाह्यरुप आहे. या पगडीखालच्या रेशमी केसांचे कुरळे तुरे जर बाहेर आले तर तुझ्या त्या कृत्रीम तुर्‍याची घमेंड उतरायला क्षणभरही लागणार नाही. म्हणजेच बाह्यरुपावर भाळण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून पाहा तिथले सौंदर्य यापेक्षाही जास्त मनमोहक आहे.

मगर लिखवाये कोई उसको खत तो हमसे लिखवाये
हुई सुबह और घर से कान पर रखकर कलम निकले

पण आपल्या प्रियेवरचं त्याचं प्रेमही अजब आहे. तिच्यावर फक्त मीच प्रेम करणार असा हट्ट नाहीये या आशिकमियाचा. तीचं सौंदर्य, आकर्षण हे सर्वव्यापक आहे, सर्वाकर्षक आहे याची त्याला जाणीव आहे. इथे सुद्धा रुपक आहे बरं. हि प्रिया केवळ कुणी स्त्रीच नव्हे, तर हे परमेश्वरालाही उद्देशून असू शकतं. हे ‘माये’ला सुद्धा उद्द्येशून असू शकतं. त्याची विनंती एवढीच आहे की तिची आराधना करताना मलापण तुमच्याबरोबर सामावून घ्या. अगदी तिला पत्र लिहायचं असेल तर मला सांगा, मी इतका आकंठ बुडालेलो आहे तिच्या प्रेमात की सकाळी घराबाहेर पडताना लेखणी कानाला लावूनच बाहेर पडतो. तिची किंवा त्या सर्वसमावेशक शक्तीची स्तुती करायला माझे शब्द केव्हाही आतुरच असतात.

हुई इस दौर में मनसूब मुझसे बादा-आशामी
फिर आया वो जमाना जो जहाँ से जाम-ए-जम निकले

ती प्रिया असो वा तिच्या प्राप्तीची इच्छा, तिच्या आराधनेच्या या काळात मझं नकळत मदीरेशी नातं जुळलं आणि मग मदीरेच्या प्याल्यातसुद्धा मला तीच दिसायला लागली. जणुकाही हातातला प्याला हा जादुई प्याला झाला, ज्याच्यात आपल्याला आवडणार्‍या कुठल्याही व्यक्तीला, गोष्टीला आपण हवे तेव्हा, हवे तितका वेळ पाहू शकतो. संत मीराबाईच्या श्रीकृष्णाशी असलेल्या सायुज्यतेशी नातं सांगणारं हे विलक्षण उदाहरण. मीराबाई म्हणते..

घडी एक नहिं आवडे तुम दरसण बिन मोय
तुम हो मेरे प्राण जी कासूं जीवण होय
धान न भावै नींद न आवै बिरह सतावे मोय
घायलसी घूमत फिरूं रे मेरो दरद न जाणै कोय

हि देखील अवस्था तशीच फक्त वर्णन करण्याची शैली, वापरलेली रुपके वेगळी, ऐहिक जगातली.

हुई जिनसे तव्वको खस्तगी की दाद पाने की
वो हमसे भी ज्यादा खस्ता-ए-तेग-ए-सितम निकले

प्रेम हि अशी अवस्था आहे की इथे आपणच आपले वाली असतो. ज्यांच्याकडून आपल्याला सांत्वनाची, सहानुभूतीची अपेक्षा असते त्यांची अवस्था आपल्यासारखीच, किंबहुना आपल्यापेक्षाही खस्ता आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. आशिक का जनाजा बडी धूम सें निकलता है, चाहे वो कोइ भी हों. !

मुहब्बत में नहीं है फ़र्क जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले

इथे जगण्या-मरण्याची सीमारेषा धुसर झालेली असते. मुळात प्रेमात जीवन आणि मृत्यू यात काही फरकच राहत नाही. प्रेमात पडलेला माणुस ज्या व्यक्तीवर मरतो तिच्याच्कडे बघून तर जगत असतो.

जरा कर जोर सिने पर कि तीर-ऐ-पुरसितम निकले
जो वो निकले तो दिल निकले, जो दिल निकले तो दम निकले

हे शादीवाल्या मोतीचुरच्या लड्डू सारखं आहे. तिच्या नजरेचा जो बाण माझ्या हृदयात आतवर शिरलाय तो एकतर तसाच राहू दे. कार्ण तो काम तिच्या असण्याची जाणिव करून देणारा आहे. आणि जर काढायचाच असेल तर माझ्या छातीवर जोर देवून तो बाण अश्या रितीने बाहे काढा की त्याबरोबर माझे हृदयसुद्धा बाहेर येइल. हृदय बाहेर आले की प्राणही बाहेर पडतील आणि मग मी तिच्याशी एकरूप व्हायला मोकळा. यातही सायुज्यतेचं अध्यात्म आहेच.

खुदा के बासते पर्दा ना काबे से उठा जालिम
कहीं ऐसा न हो याँ भी वही काफिर सनम निकले

प्रेमात एक अवस्था अशी येते की सगळं जग एकीकडे आणि एकीकडे प्रिया. सारी खुदाई एक तरफ और एत तरफ मेरा साजन. या अवस्थेला पोचलेला तो आशिक विनंती करतोय की कृपा करून काब्यावरुन तो पडदा उघडू नका. काबा हे मुस्लिमांचे सर्वात पवित्र धर्मक्षेत्र. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा का होइना काबाचे दर्षन करावेच नाहीतर त्याला अल्लाहच्या पायी जागा मिळत नाही असे म्हणतात. कवि म्हणतो की काबाच्या त्या पवित्र धर्मस्थळावर असलेला तो पडदा नका उघडू , माझ्यासाठी माझी प्रियाच सर्वस्व आहे. कदाचित अल्लाहच्या जागीसुद्धा मला तीच दिसायची.

कहाँ मयखाने का दरवाजा ‘गालिब’ और कहाँ वाइज़
पर इतना जानते हैं, कल वो जाता था के हम निकले

कुठे मदिरालयाचा दरवाजा आणि कुठे ‘वाइज’ ! वाईज म्हणजे धर्मोपदेशक. इथे पुन्हा मियाजी आयुष्यातले सत्य सांगून जातात.

या तो पिने दे मस्जीद में बैठकर, या फिर वो जगह बता जहां खुदा नही ! या शेराप्रमाणे प्रेमात पडलेल्या व्यक्तीसाठी त्याची प्रिया हेच त्याचे सर्वस्व असते. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याला तीच दिसत असते. त्याच्यासाठी मस्जीद आणि मदिरालय यातला फरक संपलेला असतो. जिथे त्याची प्रिया दिसेल तीच त्याची मस्जीद, तेच त्याचे मंदीर. म्हणून तो स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी, स्वतःचीच भलामण करण्यासाठी म्हणतो. कुठे माझे मदिरालय आणि कुठे ते पवित्र धर्मोपदेशक पण मला खात्री आहे मी मदिरालयातून बाहेर पडलो की तो नक्कीच आत शिरत असेल.

गालिबमियां, या तो आप समय सें पहले पैदा हुये थे या हम समय के बाद ! ये शिकायत हमेशा रहेगी खुदासे…

मियांबद्दल काय बोलणार अजून. गालिबचाच एक शेर आहे.

है और भी दुनियामें सुखनवर बहोत अच्छे |
कहते है के गालिब का है अंदाज-ए-बयाँ और ||

कहने कों बाकी रह ही क्यां जाता है ?

हि गझल गाणे हे प्रत्येक गझल गायकाचे स्वप्न असते. जवळजवळ सर्वच गायकांनी एकदा का होइना ही गझल गायलेली आहे. मी मात्र ‘मिर्झा गालिब’ या टिव्ही सिरियल साठी जगजीतजींनी गायलेल्या व्हर्जनच्या आकंठ प्रेमात आहे. गालिबचे शब्द आणि जगजीतचे सूर हा आपल्याला थेट दुसर्‍या दुनियेशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे हे लक्षात असू द्या म्हणजे झाले.

Hazaro khwahishe aisi

HAZARRO

 

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी. ०९९६७६६४९१९ . पनवेल.

 
 
%d bloggers like this: