सुन्या-सुन्या मैफलीत माझ्या …
ऐशीच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीने अनेक सामाजिक बदल आणि घडामोडी रसिकांसमोर नाट्यमय रूपाने मांडल्या. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शीत ‘उंबरठा’ हा चित्रपट असाच सर्वसामान्य पण काहीतरी नैतिक आदर्श बाळगुन जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यातील सामाजिक तसेच कौटुंबिक उलाढाली किंबहुना कुचंबणेचे चित्रण करतो. सुलभा महाजन ही आपल्या सामाजिक जाणिवा, नैतिक मुल्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्यात होणारा राजकीय, वरिष्ठाचा हस्तक्षेप, दुरुपयोग अश्या चौफेर कात्रीत सापडलेली एका महिला सुधार गृहाची वार्डन आहे. समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडायचे म्हणून तिने जाणूनबुजुन हे क्षेत्र आपले करियर म्हणून निवडलेले आहे. यासाठी तिला आपले घर सोडावे लागते. पोटच्या मुलीला नणदेकड़े सोडून ती स्वतःला कामाला वाहुन घेते. पण या कामात पदोपदी वरिष्ठाकडून येणारे अडथळे, शासकीय कामातील ग़ैरव्यवहार, राजकीय नेत्यांकडून घेतला जाणारा ग़ैरफ़ायदा यामुळे एका बेसावध क्षणी ती सर्व सोडून संसारात परतण्याचा निर्णय घेते. पण परत आल्यावर तिच्या लक्षात येते की आपला नवरा आता आपला राहीलेला नाही. आणि त्या मानसिक संघर्षात ती पुन्हा आपल्या सामाजिक आयुष्यात परतायचा निर्णय घेते….

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
चित्रपट होता डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शीत “उंबरठा” आणि आजच्या आपल्या लेखाचा विषय आहे, या चित्रपटातील बहुचर्चित, लोकप्रिय गीत …
“सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की, अजून ही चांद रात आहे !!”
१९७७ साली आलेला सिनेमा. जवळजवळ ४० वर्षे होवून गेलेली आहेत आज. पण आजही या गीताची जादू तशीच कायम आहे. आजही रेडिओवर, टिव्हीवर है गाणे लागले की हरवून जायला होते. स्व. सुरेशजी भट यांचे नेमके शब्द, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं हलवून टाकणारं संगीत, थेट काळजाला हात घालणारे लतादीदीचे आर्त सुर आणि हे एवढं कमी होतं की क़ाय म्हणून गाणं चित्रीत झालेय स्मीता पाटीलवर , जिच्या चेहऱ्याची रेघ न रेघ गाण्याच्या प्रत्येक शब्दागणिक आपल्या मनावर चरे उमटवीत जाते.
कर्तव्य म्हणून निवडलेले सामाजिक करियर आणि आपला संसार, पती, पोटची पोर अश्या विलक्षण कात्रीत अडकलेली नायिका. तिची अवस्था शिखंडीसारखी झालेली आहे. ज्या सामाजिक जाणिवेपायी घर मागे सोडून कर्तव्याची कास धरली त्या क्षेत्रात माजलेल्या बजबजपूरीमुळे भ्रमनिरास झालेला आहे आणि त्या नादात संसार, पती एवढेच नव्हे तर पोटची लेकसुद्धा दुरावलीय. मन पुन्हा जुन्या आठवणीत रमू पाहतेय, पण आता मैफिल जवळजवळ संपल्यात जमा आहे.
उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?
ती थकलीय पण हारलेली नाहीये. आपल्या आयुष्याची आणि कृतीची तसेच त्याच्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी निव्वळ आपली आहे. हे तिने मनापासून स्वीकारलेले आहे. संसाराबद्दल मनापासून ओढ़ असली तरी आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची सुद्धा तिला जाणीव आहे. एका मुलाखतीत स्मीता म्हणाली होती की “सुलभाच्या (नायिका) मनात काय चाललय हे जाणून घेण्यासाठी अजुन वीस वर्षे जावु द्यावी लागतील.” म्हणजे तेव्हाही हे स्पष्ट होते की ही कथा वीस वर्षानंतरची आहे. दुर्दैवाने वीस क़ाय चाळीस वर्षे झाली तरी अजुनही अश्या अनेक सुलभा आजही तोच अनुभव घेताहेत.
तिची एवढीच अपेक्षा आहे की ती जशी आहे तशी तिला तिच्या कुटुंबाने स्वीकारावे. एक लक्षात घ्या, इथे कदाचित ती हट्टी, अहंकारी वाटू शकेल पण तसे नाहीये. हा सनातनकाळापासून अगदी गार्गीपासून चालत आलेला स्त्रीच्या अस्तित्वाचा लढ़ा आहे. एक माणूस म्हणून प्रत्येकाचा मूलभूत हक्क असलेले स्वतंत्र अस्तित्वच तर मागतेय ती.
कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !
असे ऐकिवात आहे की गाण्यातील मुळ ओळी “पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरश्यात आहे” अश्या होत्या. पंडितजी आणि डॉ. जब्बार दोघांनाही या ओळीतील ‘कुणीतरी’ हा शब्द खटकत होता. त्यामुळे त्यांनी भटांना काहीतरी नवीन शब्द सूचवण्याची विनंती केली. भटसाहेबांनी एक-दोन पर्याय सूचवले सुद्धा पण ते काही या दोघांनाही पटत नव्हते कारण ते चित्रपटातील प्रसंगाशी जुळत नव्हते. तेव्हा कुठल्यातरी दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग शेजारच्या स्टूडिओत चालू होते. कवयित्री शांता शेळके तिथे होत्या. सुरेश भटांच्या गाण्याचे रेकॉर्डिंग आहे हे समजल्यावर त्या तिथे आल्या. एक शब्द अडलेला आहे समजल्यावर त्यांनी लगेचच सांगितले, “त्यात काय एवढे? कुणीतरी च्या ऐवजी ‘तुझे हसू’ वापरा. ” भटसाहेबांनी लगेच “वा शांता” असे म्हणून मनापासून दाद दिली आणि हा शब्द दिग्दर्शक-संगीतकाय द्वयीने सुद्धा मनापासून स्विकारला.
हा मुळात स्वत:शीच मांडलेला संवाद आहे तिचा. किंबहुना मनातील द्वंद्व नकळत ओठावर आलेय. आज एवढ्या कालावधीनंतर स्वतःलाच आरश्यात पाहताना ती संभ्रमित झालीय की आरशातली ती नक्की कोण आहे? ती मीच आहे की अन्य कोणी? करियर म्हणून निवडलेला हा वेगळा मार्ग चोखाळण्यापूर्वीची ती हसरी, आयुष्यातली सूखे उपभोगायला आसुससलेली, जीवनाच्या चैतन्याने मुसमुसलेली सुलभा ती शोधते आहे. पण तिला आरश्यात दिसणारी सुलभा कोणी निराळीच आहे. प्रगल्भ जाणिवा आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याची ओढ़ , त्या बंडखोरपणामुळे वेगळा मार्ग निवडलेली पण आता एकटी पडलेली सुलभा त्या आरश्यात आपला हासरा, सुखद भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करतेय. गतस्मृतीचा रम्य पट जणु एखाद्या मालिकेसारखा डोळ्यासमोरून सरकतोय.
दुर्दैवाने आयुष्याचे कालचक्र उलटे फिरवता येत नाही. आपण क़ाय गमावले आहे हे तिला पक्के ठाऊक आहे. पण तिने ते अपरिहार्यपणे स्वीकारले आहे. काही ठिकाणी याबद्दल “तिला तिची चूक उमजलीय” असे स्पष्टीकरण माझ्या वाचनात आले. पण मला नाही पटले ते. हे प्राक्तन तिने कळून, समजून- उमजून, विचार करून स्वीकारलेले आहे. आपल्या कृतीच्या परिणामांची जबाबदारी तिने नाकारलेली नाहीये. त्या सगळ्या निश्चयातून, आत्मविश्वासातून तिने स्वतःला घडवले आहे. तरीही कुठेतरी तिच्यातली आई, पत्नी अजुनही तितक्याच उत्कटतेने जीवंत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा देताना ते दिवस आठवून नकळत तिच्या ओठांवर हासु उमलते.
पण तिला आपल्या वागण्याचा कसलाही पश्चाताप होत नाहीये. किंवा आपण काही चूक केलीय अशी भावनाही नाहीये. आपण आयुष्यातील अतिशय गोड , अतीव सुखाच्या क्षणांना मुकलोय, पारखे झालोय याची जाणीव, खंत नक्कीच तिला आहे. पण म्हणून आपला आज ती विसरलेली नाहीये. आज जे प्राक्तन समोर आ वासुन उभे आहे ते सुद्धा तिने तितक्याच ठामपणे, तितक्याच उत्कटतेने स्विकारलेले आहे.
उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे
तिच्या तेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय. आजही ती स्वतंत्र आहे. आपल्या अस्तित्वाची तिला जाणीव आहे. आजही ती स्वतःच्या शोधात आहे. नशिबाला, प्राक्तनाला दोष न देता आपण निवडलेल्या प्रवासात चालत राहण्यासाठी ती स्वत:शीच कटिबद्ध आहे.
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !
पुढें जाता जाता दुरावलेल्या नवऱ्याला ती जाणीव करून देतेय. की माझा मार्ग मी पूर्ण विचारांती निवडलेला आहे. तो उगाच उत्साहाच्या भरात घेतलेला आंधळा निर्णय नाही. त्यामुळे हे लक्षात असुदे की तू जरी माझ्यापासून दूर जाण्याचा दावा करत असलास तरी ते तितकेसे सत्य नाहीये. तू माझ्यापासुन दूर गेलेला असलास तरी मी माझ्या घरापासुन दूर गेलेले नाहीये. माझ्या मनातले घराबद्दलचे प्रेम अजुनही तितकेच ताजे, तितकेच उत्कट आहे. त्यामुळे यापुढेही तुला तुझ्या अवतीभोवती माझे अस्तित्व जाणवत राहिल. कितीही प्रयत्न केलास तरी माझे अस्तित्व, आपले नाते तुला पूर्णपणे कधीच नाकारता येणार नाही. माझ्या सुरांचा, स्मृतीचा सुगंध कायम तुझ्या आयुष्यात असाच दरावळत राहणार आहे. कारण माझा निर्णय आणि माझी भावना हे दोन्हीही तितकेच उत्कट, तितक्याच सच्च्या आहेत.
सर्वश्री विजय तेंडुलकरांचे अतिशय सशक्त आणि काळाच्या पुढचे कथानक, त्याला लाभलेला डॉ. जब्बार पटेल यांचा परिसस्पर्ष , पं. हॄदयनाथांचे अविस्मरणीय संगीत , लताबाईंचे सुर, स्मीता, गिरीश कर्नाड, श्रीकांत मोघे असे दिग्गज अभिनेते … या सर्वस्वी अफाट अश्या रत्नानी जडवलेला हा चित्रपट त्या काळातही कालातीत ठरावा असाच होता. समाजसेवेची वेगळी वाट चोखाळणाऱ्या स्त्रियांच्या वाट्याला क़ाय भोग येतात याची जाणीव तेव्हाच्या समाजाला असणे शक्यच नव्हते. (आतातरी कुठे आहे म्हणा!). १९७७ साली या चित्रपटात हाताळलेल्या निराधार स्त्रियांच्या समस्यांविषयी आजही तितकीच उदासीनता आहे. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. निराधार स्त्रियांचे प्रश्न आजही तितकेचे भीषण आहेत. पण तो आपल्या लेखाचा विषय नाही त्यामुळे त्यांबद्दल नंतर कधीतरी एखाद्या स्वतंत्र लेखात बोलू, तोवर इथेच थांबुयात.
जाता-जाता पुन्हा एकदा या अफाट कलाकृतीला मनापासून दाद द्याविशी वाटते. सगळ्यांनाच एक दंडवत घालावासा वाटतोय. स्व. सुरेश भटसाहेबांच्या शब्दाची जादू लताबाईंचा आवाज आणि स्मीताच्या बोलक्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या चिरंतन वेदनेतुन झिरपत जाते. तिचं आईपण नाकारलेल्या तिच्या लाडक्या लेकीचा फोटो पाहुन सुलभाच्या डोळ्यात दाटलेले आंसू पुन्हा-पुन्हा आपला पिच्छा पुरवत राहतात आणि आपण कासाविस होत, तरीही पुन्हा-पुन्हा गाण्याची ध्वनिफित मागे-पुढे सरकवत गाणे पुन्हा-पुन्हा जगत राहतो.
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या ….


विशाल कुलकर्णी
०९९६७६६४९१९
पनवेल.
मिलींद
डिसेंबर 17, 2018 at 2:53 pm
धन्यवाद! ते शांताबाईयांची आठवण विशेष वाटली!! दोघेही महान. आणि पाय जमिनीवर असणारे. गाणे पाहता आले – हे म्हणजे सोन्याहून पिवळं! -मिलींद. (पंखा).
अस्सल सोलापुरी
डिसेंबर 20, 2018 at 3:23 pm
धन्यवाद मिलींद 💐