आज आपण एका वेगळ्याच गाण्याबद्दल बोलणार आहोत. आजवर मी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांवर लिहीलेय. भावगीत, भक्तिगीत, प्रेमगीत, विरहगीत, मीरेची भजने, गझल असे विविध प्रकार हाताळून पाहीलेत. पण आजचे गाणे माझ्यासाठी खास आहे. कारण हे निव्वळ एक गाणे नाहीये. हा एक संवाद आहे, एका लहानग्या, कदाचित नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवू पाहणाऱ्या एका गोड मुलीने थेट निसर्गदेवतेशी साधलेला एक मनस्वी, हॄदयस्पर्शी संवाद !
वॉल्ट डिस्ने हे अनिमेशनच्या क्षेत्रातले एक अतिशय मोठे आणि आश्वासक नाव. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात या माणसाने कधीना कधी आपल्या कार्टून्सच्या रूपाने प्रवेश केलेला आहे. खट्याळ मिकी माऊस आणि त्याची गोड मैत्रीण मिनी, अथवा डोनाल्ड डक, कंजूस अंकल स्क्रुझ आणि त्यांचे उद्योगी पुतणे, चिप एंड डेल, बल्लू, श्रेक अशी कितीतरी नावे आपल्या बालविश्वात अजरामर होवुन बसलेली आहेय. हिमगौरी आणि सात बुटके, ब्यूटी एंड द बीस्ट, सिंड्रेला अश्या कित्येक कथा डिस्ने यांनी चित्रपट रुपात आणून आपल्यावर प्रचंड मोठे उपकार करून ठेवलेले आहेत. पायरेट्स ऑफ द कॅरेबियन ही डिस्नेची जगप्रसिद्ध सिनेमालिका जगभर हजारो, लाखो, करोड़ो चाहते अभिमानाने मिरवते आहे. डिस्नेच्या कथा, मालिका , चित्रपट एवढे यशस्वी का होतात माहिती आहे? कारण कथेचे नायक-नायिका कुणीही असो, एखादे कार्टून वा हिमगौरीसारखी गोड़ राजकुमारी किंवा वडीलांच्या वचनामुळे बीस्टच्या बरोबर राहावे लागणारी एखादी गोड मुलगी असो. त्यांच्या कथेचा खरा आत्मा असतो निसर्ग. त्यांची प्रत्येक कथा कुठेना कुठे आधारलेली असते ती माणूस आणि निसर्ग यांच्यामधील नितांतसुंदर नात्यावर. आज आपण ज्या गाण्यावर बोलणार आहोत ते असेच माणूस आणि निसर्ग यांच्यातील अटूट नात्यावर भाष्य करणारे गाणे आहे. पाहायला गेले तर मोजून चार-पाच ओळीचे गीत आहे हे. पण या चार-पाच ओळीत साऱ्या विश्वाचे आर्त सामावले आहे.
KNOW WHO YOU ARE
I have crossed the horizon to find you
I know your name
They have stolen the heart from inside you
But this does not define you
This is not who you are
You know who you are
या रूपकाच्या माध्यमातून कविने निसर्गाकडे अखिल मानवजातीच्या चुकांची कबुलीच दिलेली आहे एकप्रकारे. कवितेचं हेच वैशिष्ठ्य असतं. एकेका वाक्यात, एकेका शब्दात एखाद्या शेकडो पानी ग्रंथांचा आशय सांगण्याची ताकद कवितेत असते. सर्वश्री Opetaia Foa’i आणि Lin-Manuel Miranda या गायक संगीतकार द्वयीने संगीतबद्ध केलेलं आणि Auli’i Carvalho या तरुण गुणी गायिकेने सहकाऱ्यासह गायलेलं हे गाणं म्हणजे चित्रपटाचा कळस आहे. तसं पाहायला गेलं तर हा संपूर्ण चित्रपट एक संगीतिकाच आहे. यातले साधे साधे संवाद सुद्धा गाण्याच्या, संगीताच्या स्वरुपात आहेत.
चित्रपटाचे नाव आहे “मोआना” (Moanna)
एनिमेशनच्या स्वरुपात मांडलेले हे कथानक हवाईयन बेटात प्रचलित असलेल्या एका दंतकथेवर आधारित आहे. एका अज्ञात बेटावरील आदिवासी समुहाच्या प्रमुखाची ही छोटीशी मुलगी. मोआना म्हणजे समुद्र. या मुलीलाही समुद्राबद्दल विलक्षण प्रेम आहे. पण आपल्या एका मित्राला समुद्रावर हरवून बसलेला वत्सल पिता आता आपल्या लेकीला गमवायला तयार नाही त्यामुळे तो तिला समुद्रापासुन दूर ठेवतोय. पण तिच्या आजीला तिची ओढ़ माहिती आहे. ती मोआनाला एक गोष्ट सांगते की फार पूर्वी माऊई नावाच्या एका खट्याळ देवाने निसर्गदेवतेचे हृदयच चोरुन नेले. त्यामुळे संतापुन तिने त्याची सगळी शक्ती , त्याचे शस्त्र हिरावून घेतले. त्या धावपळीत तिचे हॄदय समुद्रात पडून गेले. आता जोपर्यंत माऊईच्या मदतीनेच तिचे हॄदय तिला परत मिळत नाही तोवर ती अशीच संतापलेली राहणार. आणि ते जऱ तिला नाही मिळाले तर हळूहळू सगळ्या सृष्टीचा नाश होवुन जाणारं. है ऐकल्यावर छोटुकली मोआना टे-फिटी म्हणजे निसर्गदेवतेला तिचे हॄदय परत मिळवून देण्याच्या कामगिरीवर निघते.
तिचा तो प्रवास म्हणजे MOANNA !
मानवाचे निसर्गाशी असलेले नाते अतिशय पुरातन आणि चिरंतन आहे. निसर्गाच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जगूच शकत नाही. पण नेमके हेच माणूस विसरत चालला आहे हेच या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय.
They have stolen the heart from inside you…
माणसाने आपल्या प्रगतीसाठी निसर्गाला अगदी ओरबाड़ून घेतलेले आहे. मग त्यात विविध औषधी वनस्पति असोत, जमिनीईखाली दडलेली विविध मूल्यवान खनिजे असोत , पर्यावरणाचे संतुलन राखणारी झाड़े असोत किंवा ज्याला आपण जीवन म्हणतो ते जल असो निसर्गाकडून आपण हे धन कायम ओरबाड़ून घेत आलोय. पण त्या नैसर्गिक देणगीची परतफेड करणे मात्र कृतघ्न माणूसजात विसरलीय.
आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो, मात्र हवेतील ऑक्सिजनशिवाय क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य परिसरातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि हवेतील कार्बनडायऑक्साईड म्हणजे खराब हवा कायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा वायू हवेत सोडतात. त्यासाठी म्हणून प्रदूषण नियंत्रणात ठेवणे, वनस्पतीची , झाडांची लागवड करणे अत्यावश्यक आहे आणि आपण नेमके हेच विसरलोय. त्यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा तोल बिगड़त चाललाय.
प्रत्यक्षात, आपल्या रोजच्या जीवनात तरी काय वेगळे घडतेय? रोज तोडत चालेल्या झाडांच्या कत्तलीमुळे सिमेंटची जंगल उभी राहत आहेत परंतु पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास मानवाने लक्षात घेतला पाहिजे. दिवसेंदिवस वातावरणातील ओझोनचा थर प्रदूषणामुळे विरळ होतोय. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढत चाललाय. जागतिक तापमानवाढीचा प्रश्न भविष्यात अधिक उग्र बनण्याची लक्षणे आहेत. काही भागात कमी पाऊस, वाढते वाळवंटीकरण, काही ठिकाणी अतिवृष्टी/पूर, ध्रुवांवरील बर्फ वितळण्याचा दर वाढल्यास समुद्राची पातळी वाढण्याचा धोका, अश्या अनेक रूपाने हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे.
माऊईच्या मदतीने टे-फिटीला तिचे हृदय परत करायला निघालेली मोआना तिच्या वाटेत आडव्या आलेल्या टे-टका नावाच्या संतप्त आणि अतिबलाढ़य अग्निराक्षसाशी जिवाच्या आकांताने झुंज देते. आपली चूक कळलेला माऊईसुद्धा आपले सर्वस्व, सगळी शक्ती पणाला लावून मोआनाची साथ देतो आणि मोआना टे-फिटीच्या राज्यात जावून पोचते. पण तिथे पोचल्यावर तिच्या लक्षात येते की टे-फिटी तिथे नाहीचे. मग ती गेली कुठे? आता तिचे हॄदय तिला कसे परत करणार? सगळ्या सृष्टीचा होणारा ऱ्हास कसा थांबवणार? त्या हताश अवस्थेत तिचे दुरवर दिसणाऱ्या, आपल्या पराभवाने संतप्त झालेल्या टे-टका या अग्निराक्षसाकडे लक्ष जाते आणि एक फार मोठे कटुसत्य तिच्या लक्षात येते.
मोआना या चित्रपटातील निसर्गदेवतेचे , टे-फिटीचे तेच होते. तिचे हृदय म्हणजे हिरवाई, ऑक्सीजन, शुद्ध हवा गमावून बसल्यामुळे ती आपले मूळचे हिरवेगार, आरोग्यदायी , वरदायी अस्तित्व गमावून बसते आणि तिचे रूपांतर एका टे-टका नावाच्या तप्त, अग्निराक्षसात झालेय. जो मानवजातीवर अतिशय संतप्त झालेला आहे. समुद्र पार करू पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अग्निने भाजुन काढायला त्याने सुरुवात केलीय. टे-फिटीच टे-टका बनलीय हे लक्षात आल्यावर मोआना पुन्हा तिच्याशी संवाद साधण्यांचा प्रयत्न सुरु करते. आपल्या (मानवजातीच्या) चुका मान्य करून टे-फिटीला तिच्या मूळ स्वरूपाची जाणीव करून देते आणि तिचे हॄदय तिला परत देते. हॄदय परत मिळताच टे फिटी पुन्हा आपल्या मूळ स्वरुपात येते आणि सृष्टी पुन्हा पहिल्यासारखी होते.
अवघ्या चार पाच ओळीच्या या गाण्यातून केवढा मोठ्ठा संदेश देण्यात आलेला आहे. निसर्गाशिवाय आपण जगु शकत नाही. तो कायम भरभरुन देत आलेला आहे आपल्याला. पण त्या बदल्यात त्याचे संवर्धन करणे , समतोल साधणे हे आपले सुद्धा कर्तव्य आहे. हेच मोआना आणि टे-फिटीच्या या संगीतिकेतुन आपल्यापर्यंत पोचवण्याचा डिस्नेने प्रयत्न केला आहे. चला आपण सगळेच मोआना होवू यात आणि आपल्या टे-फिटीला तिचे हरवलेले हॄदय परत मिळवून देण्याच्या पवित्र आणि अत्यावश्यक कार्यासाठी कटिबद्ध होवूयात !
धन्यवाद.
दै. संचार, सोलापुरमधील “एक गाणे अनुभवावे” या माझ्या सदरातील आजचा लेख !

दै. संचार, सोलापुरमधील “एक गाणे अनुभवावे” या माझ्या सदरातील आजचा लेख !
विशाल कुलकर्णी , पनवेल
०९९६७६६४९१९ / ०९३२६३३७१४३
abhishek
ऑक्टोबर 7, 2018 at 10:16 सकाळी
ekach number vishal da
stutya lekh