मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ ….
प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात.
न तड़पने की इजाजत है न फरियाद की है,
घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है !
१९४४ साली उर्दु लघुकथांसाठी विख्यात असलेले प्रख्यात साहित्यिक, अफसाना निगार ( storyteller) राजिन्दरसिंग बेदी यांनी रेडिओसाठी म्हणून एक लघुकथा रादर एकांकिका लिहीली होती. ‘नकी-ए-मकानी’ या नावाची. १९७० मध्ये याच रेडिओ प्लेवर आधारीत कथानक असलेला, त्यांनी स्वतःच दिग्दर्शीत केलेला एक चित्रपट पडद्यावर आला. चित्रपटाचे नाव होते ‘दस्तक’ ! सर्वश्री संजीव कुमार आणि रेहाना सुलतान अभिनीत हा प्राक्तनाने आणि समाजाने केलेल्या , एका नवविवाहित दांपत्त्याच्या ससेहोलपटीची कथा सांगणारा चित्रपट.
एक साधा कारकुन असलेला हमीद आणि त्याची नवपरिणीता पत्नी सलमा मुंबईच्या एका भागात भाड्याने घर घेतात. दुर्दैवाने आणि गरिबीमुळे त्याला अश्या भागात घर घ्यावे लागते की जो परिसर रेड लाइट एरिया अर्थात वेश्या व्यवसायासाठी कुख्यात असतो. राहायला आल्यावर काही दिवसातच रात्री-बेरात्री कुणा शमशादला शोधत येणारे रंगेल लोक त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावू लागतात. शमशाद ही त्या घरातली पुर्वीची भाडेकरू आणि त्या भागातली कुख्यात तवायफ, मुजरेवाली असते. हमीदचे दुसरे घर शोधायचे प्रयत्न चालु असतात. त्यासाठी आवश्यक पागडीचे पैसे तो जमवत असतो. तो नोकरीला गेला की घरात एकटी सलमा. आता इथे कुचंबणा अशी आहे की सलमाचे वडील शास्त्रीय गायक, त्यामुळे तिच्याही रक्तात संगीत आणि गायन मुरलेले. राहती जागा पुर्वीच्या एका तवायफची. साहजिकच आजुबाजुचे लोक गाणार्या सलमाकडे त्याच नजरेने बघायला लागतात. तिने लोकांसाठी गावे अशी जबरदस्तीही काही जण करतात. पण हमीद आणि सलमा त्यांना न जुमानता तसेच दिवस कंठत असतात. यात होते असे की सलमाचा श्वास असलेले तिचे संगीत, तिचे गायन या सगळ्या प्रकारामुळे बंद होवून जाते. तिचा लाडका तानपुरासुद्धा तिला वाजवता येत नाही.
घराच्या बाहेरुन विकृत लोकांचे कारनामे आणि घरात ही अशी मनाविरुद्ध, साधी गुणगुणण्याची आवडही जपता न येण्याची परिस्थिती. हि मानसिक कुचंबणा सलमा सहन करू शकत नाही. तुटून जाते. कोलमडून जाते. आणि बंडखोरी करून तानपुरा वाजवते. त्यामुळे संतप्त झालेला हमीद अजुनच भडकतो. बरंच काही घडतं आणि सलमाचं गाणं आणि तानपुरा दोन्ही पुर्णपणे बंद होवून जातं. नवर्याची असहाय्यताही तिला क्ळत असते आणि स्वतःची कुचंबणाही शांत बसू देत नाही. मग त्या कुचंबणेतून जन्माला आलेली असहायता, हतबलता संपुर्ण चित्रपटभर एखाद्या चाबकासाठी आपल्या मनावर आदळत, आघात करत राहते.चित्रपटात अनेक अंगाने प्रतिकात्मकता आहे. पण यातले सर्वात प्रभावी प्रतिक आहे ते म्हणजे घरात पिंजर्यात बंद असलेली मैना. स्वच्छंद म्हणून ओळखली जाणारी ही मैना त्या पिंजर्यात अडकल्याने आपले गाणेच विसरून गेलेली आहे. इथे ती पिंजर्यातली मैना आणि प्राक्तनाच्या, डोळ्यांना न दिसणार्या गजांआड बंदीस्त झालेली सलमा दोघीही नकळत एकाच पातळीवर येवून उभ्या राहतात. त्या घालमेलीत अडकलेली सलमा एके दिवशी त्या मैनेपुढे आपली वेदना ओततेच.
मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ ….
मजरुहचे शब्द आणि मदनमोहनचं जिवघेणं कंपोझिशन त्यात लताबाईंचा कमालीचा आवाज. राजिन्दरसिंग बेदी यांनी अश्याच विषयावर म्हणजे स्त्रीयांच्या समस्यावर आधारीत अजुन एक चित्रपट केला होता. तो म्हणजे एक चादर मैली सी. त्यातही असेच स्त्रीयांच्या घुसमटीचे, कुचंबणेचे चित्रण होते. असो. तर हमीद कामासाठी घराबाहेर पडलेला. घरात एकटी सलमा आणि तिच्या जोडीला ती पिंजर्यात बंदीस्त मैना. घराला असलेल्या एकमेव खिडकीतून बाहेर डोकवायचा प्रयत्न करावा तर बाहेर लोकांच्या नजरा त्या खिडकीवर टपून बसलेल्या. नवर्याने गाणे आणि तानपुरा वाजवणे यावर घातलेली बंदी. त्यामुळे सलमाची अवस्था त्या मैनेसारखीच झालीय. नवराही असहाय आहे त्यामुळे आपली कुचंबणा धड त्यालाही सांगता येत नाही. या अवस्थेतून जन्माला आलेली वेदना लताबाई या गाण्यातून अतिशय ताकदीने व्यक्त करतात.
माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की, माई री ….
हमीद, कामाला निघून गेल्यानंतर घरात अडकून पडणारी सलमा अतिशय विचित्र अवस्थेत अडकलेली आहे. इतर सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे तिला घराबाहेर पडता येत नाहीये कारण आजुबाजुचा भाग हा ‘ नाचने-गानेवालीयोंका मुहल्ला’ आहे. इतर स्त्रियांप्रमाणे शेजारणी-पाजारणी सख्या म्हणून तिला लाभलेल्या नाहीयेत. तिच्या शेजारी आहेत दारुचे गुत्ते, पानमसाल्याची दुकाने आणि तिथल्या बुभुक्षीत नजरा. ती विव्हळ आहे की माझ्या मनातली वेदना व्यक्त करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे कोणी नाहीये.
ओस नयन की उनके मेरी लगी को बुझाये ना
तन मन भीगो दे आके ऐसी घटा कोई छाये ना
मोहे बहा ले जाये ऐसी लहर कोइ आये ना
मोठी अजब अवस्था आहे तिची. सलमा स्वतः संगीत शिकलेली आहे. एका उच्च दर्जाच्या शास्त्रीय गायकाची ती मुलगी आहे. दुर्दैवाने ज्या परिसरात ती राहतेय तो परिसर पण “गानेवालीयोंका” आहे. त्यामुळे कानावर सतत गाणे येतेय. नवर्याला तिची तगमग कळतेय, तिची वेदना त्याला वाटून घेता येत नसली तरी तो अगदी अनभिज्ञही नाहीये. पण त्याचे वाईट वाटणे किंवा तिच्याबद्दल सहानुभूती वाटणे तिच्यासाठी पुरेसे नाहीये. कारण गाणे हा तिचा श्वास आहे. तिचा सुख-दु:खाचा खरा साथी, तिचा तंबोरा तिच्या सोबत आहे. पण बिचारी अश्या ठिकाणी अडकलीय की गाण्याची इच्छा झाली तरी गुणगुणायची सुद्धा परवानगी नाहीये नवर्याची. कारण बाहेरची गिर्हाइके डोळा ठेवूनच आहेत. घरात तंबोरा असून तो वाजवता येत नाही त्याच्या सुरांशी खेळता येत नाही. आजुबाजुला संगीताची नदी वाहतेय पण त्या सुरगंगेत आपली तहान भागवायची परवानगी तिला नाहीये.
ओस नयन की उनके मेरी लगी को बुझाये ना
पड़ी नदिया के किनारे मैं प्यासी
बाहेर गेलेला हमीद कधी एकदा घरी परत येतो या प्रतीक्षेत त्याची तासंतास वाट पाहात बसणे इतकेच तिच्या हातात आहे. रडून-रडून चेहरा फिकुटलाय. डोळ्यातून सतत वाहणार्या आसवांमुळे डोळ्यातले काजळ वाहून जाणे ही तर नित्याचीच बाब.
पी की डगर में बैठा मैला हुआ री मोरा आंचरा
मुखडा है फीका फीका नैनों में सोहे नहीं काजरा,
कोई जो देखे मैया प्रीत का वासे कहूं माजरा लट में पड़ी कैसी बिरहा की माटी
एकटेपणाला ती इतकी कंटाळलीय की कुणीही भेटू दे, कुणीतरी भेटु दे ज्याला माझी वेदना, माझी अवस्था सांगता येइल एवढीच तिची अपेक्षा आहे. नवीनच लग्न झालेले आहे तिचे. कुठल्याही नवपरिणीतेची असतात तशी तिचीही काही स्वप्ने आहेत. काही अपेक्षा आहेत. लग्न करून पियाच्या घरी येताना तिनेही भावी आयुष्याबद्दल अनेक सुखद कल्पना केलेल्या आहेत. पहिली रात्र, श्रुंगार याबद्दलही तिच्या अनेक स्वप्नाळु, सोनेरी कल्पना आहेत. पण इथे परिस्थिती अशी आहे की रात्री-बेरात्री सुद्धा लोक दारा-खिडक्यांना कान आणि डोळे लावून बसलेले असतात. ते लक्षात आलेले असल्याने मुळातच बुजरा असलेला हमीद अजुनच संकोचून गेलेला आहे. तो तिच्या जवळच यायला तयार नाही. त्यामुळे नवरा जवळ असूनही त्याच्या सहवासाचे सुख नाही. हि अवस्था खुप वाईट असते. एखादी गोष्ट आपल्याकडे नसेलच तर एकवेळ आपण तिचे नसणे सहन करू शकतो, त्या नसण्याची सवय होवून जाते. पण जे सर्वस्वी आपले आहे, सदैव आपल्या समोर आहे त्याचे सुख घेता न येणे, त्याचा उपभोग घेता न येणे यासाऱखे दारुण दु:ख नाही दुसरे.
आँखों में चलते फिरते रोज़ मिले पिया बावरे
बैंया की छैंया आके मिलते नहीं कभी साँवरे
सगळ्यात मोठी कुचंबणा ही आहे की हे दु:ख सांगायचे कुणाला? चार भिंतींना की तिच्याइतक्याच एकट्या असलेल्या त्या मैनेला? तिला एक गोष्ट कळुन चुकलेली आहे की जोवर नवर्याला दुसरी चांगली जागा मिळत नाही तोवर तिच्या नशिबात हा जिवघेणा एकांत आहे. तिच्या हातात फक्त एकच आहे ते पण अथक, अविरत प्रतीक्षा. हे दु:ख घेवून जाणार तरी कुठे आणि कुणाला सांगणार?
दुःख ये मिलन का लेकर काह कारूँ कहाँ जाउँ रे
आँखों में चलते फिरते रोज़ मिले पिया बावरे
पाकर भी नहीं उनको मैं पाती
माई री …
हा चित्रपट प्रचंड गाजला. अतिशय नावाजला गेला. संजीव कुमार आणि रेहाना सुलतान यांचा मनस्वी जिवंत अनुभव, त्या साथीला मजरुह सुलतानपुरींची कमालीची गीते, मदन मोहन यांचे जिवघेणे, अद्वितीय असे संगीत आणि या सगळ्यावर कडी करणारे कमल बोस यांचे कृष्णधवल चल-छाया-चित्रण. या चित्रपटाने चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट अभिनेता – संजीव कुमार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेहाना सुलतान, सर्वोत्कृष्ट संगीतकार – मदनमोहन, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – कमल बोस.
या चित्रपटाने रेहाना सुलतानला एक जबरदस्त ब्रेक मिळवून दिला इंडस्ट्रीत. अर्थात तिला त्याचा फारसा फायदा मिळवता आला नाही ही बाब अलाहिदा. पण ‘दस्तक’ खर्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीचा मैलाचा दगड आहे हे मात्र निश्चित !
माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की
गीत : माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की, माई री
गीतकार : मजरुह सुलतानपूरी
संगीतकार : मदनमोहन
गायक : लता मंगेशकर / मदन मोहन
धन्यवाद.
*************************************************
विशाल विजय कुलकर्णी
दुरध्वनी : ९९६७६६४९१९ / ०२१४३-२२३३५० विरोप : kulvk2015@gmail.com
विलास कुळकर्णी
मार्च 11, 2018 at 1:57 pm
विशाल,
खूप खूप सुंदर उलगडले आहे काव्य तू ! दोन वेळा वाचून सुद्धा समाधान होत नाही!
धन्यवाद !
विलास कुलकर्णी
artarati
मार्च 29, 2018 at 7:46 pm
किती मनस्वी लिहितोस रे ___/\___
खुप भावलं. जियो
– अवल