काही दिवसांपूर्वी, कदाचित काही महिन्यांपूर्वी इथे फेसबुकवरच एक पोस्ट लिहिली होती. नामवंत गुजराती लेखक श्री ध्रुव भट्ट यांचे ‘अकुपार’ वाचताना त्यातली हिरण नदीवरची एक कविता / गाणे खुप आवडले होते. कथेच्या नायकाला गीरच्या वास्तव्यात भेटलेला एक अंध मालधारी (गुराख्याची एक जात) , ज्याने आयुष्यात कधीही प्रकाश बघितलेला नाही तो गिरच्या लेकीचं ” हीरण नदीचं ” सौंदर्य वर्णन करताना तिथल्या स्थानिक भाषेतलं एक गाणं ऐकवतो. त्या नायकालाही ते गाणं पुरतं समजलेलं नसतं, मलाही यातल्या खूप शब्दांचा अर्थ लागलेला नाहीये. पण त्यामागचं विलक्षण प्रेम, गीरबद्दलची, विशेषतः हीरण नदीबद्दलची आत्मीयता त्या गाण्यात जाणवत राहते.
गिरमधल्या रहिवाशांचे गिरशी, निसर्गाशी, सृष्टीशी असलेले नाते गडद होत जाते, उमजत जाते. शब्दांचे अर्थ कळत नाहीत पण कसा कोण जाणे त्या गाण्याचा भाव आपल्या मनापर्यंत सहज पोचत राहतो. अनेक भाषामधली अनेक विषयांवरची गाणी ऐकली, वाचली आहेत. पण स्पेशली एका नदीवर लिहिलं गेलेलं हे पहिलंच गाणं वाचायला मिळालं. (ज्या दिवशी अशाच कुणा स्थानिक गुराख्याकडून ऐकायला मिळेल तो सुदिन) ….
डुंगरथी दडती घाट उतरती पडती न पडती आखडती आवे उछळती जरा न डरती डगलां भरती मदझरती। किलकारा करती जाय गरजती घोराळी। हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी
आंकडीयावाळी हेलळियाली वेल्युवाळी वखवाळी। अवळा आंटाळी जामी जाळी भेखाडियाळी भेवाळी। तेने दई ताळी जातां भाळी लाख हिल्लोळी नखराळी हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी
आंबा आंबलयु उंब उंबरीयूं खेर खिजडियूं बोरडीयु। केहुडा कळियूं वा वखारीयुं हेमनी कळियु आवळियुं। प्रथवी उतरयुं सरगी परीयुं वळियुवाळी जळधारी। हीरण हलकारी जोबनवाली नदी रुपाळी नखराळी
आज हे सगळं पुन्हा नव्याने आठवायचे कारण म्हणजे संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांचा नवा चित्रपट ‘नदी वाहते’ !
एका मृत्युपंथाला लागलेल्या नदीला जीवंत ठेवण्यासाठी, तिचा काठ जागा ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या गावाची, गावच्या काही मनस्वी वेड्यांची ही कथा. ‘श्वास’ नंतर सावंतांच्या मनाने घेतलेली जगावेगळी ओढ़ #नदीवाहते या नितान्तसुन्दर चित्रपटाच्या रूपाने जन्माला आलीय. येत्या २२ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहातून दाखल होतोय.
या नदीच्या निमित्ताने कित्येक जुन्या आठवणीसुद्धा जाग्या झाल्यात. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पंढरपुरला आत्याकडे जायचो. हो, मला आठवतेय त्या दिवसात चंद्रभागेला बऱ्यापैकी पाणी असायचे. विशेषत: विप्रदत्त मंदिराच्या मागच्या भागात नदीत काही ठिकाणी खोलगट डोह तयार झाले होते, त्यातल्या पाण्यात आत्याच्या मुलांबरोबर तासनतास डूंबण्याच्या आठवणी असोत वा होडीत बसून विष्णुपदाला काढलेली सहल असो. मला आठवतेय पावसाळ्यात तर अगदी गोपाळपुरला सुद्धा होडीने जावे लागायचे.
आता पात्रातुन निवांत चालत पलीकडे जाता येते. कधीतरी उजनीचे पाणी सोडले तरच काय ते चंद्रभागेच्या पात्रात पाणी असते नाहीतर अकरा महीने चंद्रभागेच्या डोळ्यातच काय ते पाणी असेल फक्त. एवढे प्रचंड पात्र नदीचे, आता त्याचे गटारच व्हायचे काय ते बाकी राहीले आहे. तसेही वारीच्या दिवसात नदीची अवस्था गटारीपेक्षा वेगळी नसते म्हणा. नदीच्या वाळवंटाची तर कधीच हागणदारी झालीये. विठ्ठलाची बडव्याच्या तावडीतुन सुटका केली खरी पण माझ्या चंद्रभागेची या गटारगंगेतुन सुटका कोण करणार आणि कधी?
शाळेत असताना काही वर्षे दौंडला होतो. तिथुन आम्ही सिद्धटेकला गजाननाच्या दर्शनाला यायचो. दौंडहुन शिरापुर पर्यन्त लाल डब्बा आणि मग तिथुन होडीने नदी पार करून सिद्धटेक. लहान होतो, डोक्यात देव, दानव, सृष्ट, दुष्ट सगळ्याच गोष्टीचे सारखे महत्व असे . कुणीतरी सांगितलेले की होडीने नदी ओलांडताना मनात कसलीही म्हणजे पाणी वाढले तर, होडी बुडाली तर अशी कल्पनाही करायची नाही. का? तर म्हणे नदीच्या खोल पाण्याला आशा असते. (तेव्हा समुद्र फक्त ऐकूनच माहीत होता, फार फार फोटोत पाहीलेला आणि सावरकरांच्या “ने मजसी ने” मध्ये कोरसमध्ये आळवलेला). आपण असे काही मनात आणले की त्याला आमंत्रण दिल्यासारखे होते. मग आम्ही नदी क्रॉस करताना होडीच्या काठाला घट्ट धरून बसायचो. काही वाइट विचार मनात येवू नये म्हणून मोठ्या मोठ्याने एकमेकांशी गप्पा मारत राहायचो. पण तरीही मनात भीती उभी राहायचीच. पण पाण्याने आम्हाला कधीच ओढुन नेले नाही. त्यालासुद्धा बिचाऱ्याला पुढचे गाव गाठायची घाई असावी. पण गंमत म्हणजे कधीही काहीही न होवून सुद्धा प्रत्येक वेळी ही भीती मनात उभी राहायचीच. अगदी काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात स्वान नदीमध्ये क्रुझने फिरताना सुद्धा हा विचार मनात आला आणि स्वत:च्याच वेडेपणाचे हसू आले. काही वर्षापूर्वी गेलो होतो परत सिद्धटेकला. तेव्हा नदीची अवस्था पाहिली आणि वाटले , लहानपणी ऐकलेली ती वेडगळ गोष्ट खरी असती तरी सुद्धा कसलेही भय वाटले नसते. कारण नदीला आता जेमतेम गुडघे भिजतील एवढे पाणी असते.
त्यामानाने पर्थमध्ये स्वानच्या किंवा लंडनमध्ये थेम्सच्या किनारी फिरताना त्या नदीबायांचा फार हेवा वाटला होता. स्वच्छ किनारे, स्वच्छ पाणी, किनाऱ्याच्या बाजूने पादचाऱ्यांना फिरण्यासाठी असलेले स्वच्छ आणि टिपटॉप रस्ते, बसण्यासाठी बेंचेस. महत्वाचे म्हणजे आपल्या गावातली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडणारे प्रशासन आणि जागरूक नागरिक सुद्धा.
ही जागरूकता आपल्यात कधी येणार? नद्या या आपल्या भूभागाला जीवंत ठेवण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या रक्तवाहिन्या असतात. इथले समाजजीवन सुदृढ़ आणि निरोगी राहाण्यासाठी या रक्तवाहिन्या स्वच्छ आणि निरोगी असणे किती गरजेचे आहे हे आपल्याला कधी उमजणार? आपण जर असेच वागत राहीलो, निष्काळजीपणे नद्यांकडे दुर्लक्ष करत राहीलो तर एकेक करत या सगळ्याच बाया त्या सरस्वतीसारख्या लुप्त होत जातील आणि मग त्या मॅड मॅक्सच्या फ्यूरी रोडसारखे चित्र प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सावंतानू , लै भारी काम केलत ह्यां पिच्चर काडून. _/!\_
लोकांना किमान नदीच्या असण्याची गरज जरी समजली, पटली तरी या तुमच्या मेहनतीचे सार्थक होईल. कोण जाणे, खेड्यापाड्यातल्या गावा-शहरातल्या मृतप्राय होत चाललेल्या नद्या पुन्हा एकदा जीवनरसाने भरभरून, खळखळत वाहायला लागतील.
खुप खुप शुभेच्छा ! 💐💐💐💐
© विशाल विजय कुलकर्णी
अभिषेक
ऑगस्ट 19, 2017 at 9:27 pm
हल्ली निर्मळ नद्या बघायच्या तर परदेश वारी करावी लागते…. 😦
भारतासारख्या निसर्गसुंदर देशात भविष्याच्या पिढीच आपण सगळे मिळून किती किती वाट लावणार आहोत..
सावंतांना खूप शुभेच्छा
abhishekshinde007
ऑगस्ट 19, 2017 at 9:27 pm
हल्ली निर्मळ नद्या बघायच्या तर परदेश वारी करावी लागते…. 😦
भारतासारख्या निसर्गसुंदर देशात भविष्याच्या पिढीच आपण सगळे मिळून किती किती वाट लावणार आहोत..
सावंतांना खूप शुभेच्छा