मी व्हाटसॅपवरील एका फॅमिली ग्रुपचा सभासद आहे. (आता आहे, त्याला कोण काय करणार? दुर्दैवाचे दशावतार भोगूनच संपवावे लागतात) माझ्या एका मोठ्या मावसभावाने तिथे जोडून घेतलंय मला. दादाचा खूप जीव आहे माझ्यावर, माझ्या पत्नीवर . त्यामुळे मध्येच सोडून पळताही येत नाही) असो, मुद्दा फॅमिली ग्रुपचा नाही. मुद्दा तिथे रोज चालणाऱ्या व्हर्चुअल प्रवचनांचाही नाही. खरेतर मला कधीकधी वाटते की ही सोशल नेटवर्क्स हा केवढा मोठा आधार आहे कीर्तन , प्रवचनांना. आपली संस्कृती (म्हणजे काय असे विचारणे हा फाऊल गणला जाईल) या अशा व्हर्चुअल विचारवंतामूळे तर टिकून आहे.
तर मुद्दा असा आहे की या ग्रुपवर एक सेवानिवृत्त काका आहेत. सर्वजण त्यांना नानाजी म्हणतात. या नानाजींना आपल्या संपूर्ण कुळाची वंशावळ बनवायचीय. त्यावर एक ग्रंथ लिहायचाय. विशेष म्हणजे त्यांच्या या कुळातील कुणीतरी पूर्वज म्हणे कुठल्यातरी समृद्ध राजघराण्याच्या दरबारात राजआचार्य (आचारी असेल त्याचे यांनी आचार्य केलेय असे माझी बायको म्हणते) म्हणून काम करत होता म्हणे. (त्याचे नावही कुणाला माहीत नाही) पण त्यामुळे नानाजींना कायम आपल्या कधीही आणि कुणीही न ऐकलेल्या, पाहिलेल्या या पूर्वजाची कायम आठवण येत असते आणि त्या भारावलेल्या अवस्थेत ते नेहमी वंशावळ-वंशावळ खेळत असतात. मग ते आपल्या समृद्ध (?) वारशाबद्दल भरभरून बोलतात. त्या आठवणी, ती माहिती जतन करणे हे आपले कर्तव्य आहे हे अगदी अटीतटीने मांडतात. पण ग्रुपवरचा बहुतांश युवा समाज हा माझ्याप्रमाणे वाया गेलेला असल्याने (आम्हाला वारसा म्हटले की कुणा आफ्रिकेतल्या दूरच्या आत्याने आमच्या नावावर केलेली इस्टेट नाहीतर कुणा दूरच्या नातेवाईकाने आमच्या नावावर केलेली हिऱ्याची खाणच डोळ्यासमोर उभी राहते यात आमचा तरी काय दोष? आमच्यावर (बॉलिवुडी) “संस्कार”च तसे झाले आहेत) कुणीही त्यांच्या शंकेला, पोस्टसना साधे उत्तरही देत नाही. पण ते मात्र भगिरथाच्या चिकाटीने नवनव्या कल्पना मांडत असतात. काल त्यांनी अजून एक नवे पिल्लू सोडले…
“#$&$कर घराण्यातील जी मुले-मुली-सुना शिक्षण-नौकरी-व्यवसायानिमित्त भारताबाहेर आहेत अशांचा एक स्वतंत्र GP करावा असा विचार मनात आहे. तरी त्याबाबत पालकांनी परदेशात असलेल्या आपली मुले-मुली-सुना यांचेशी संवाद साधून आपले मत व्यक्त करावे.ही नवीन पिढी परस्परांशी कायम connect रहात संवाद साधू शकतील…!”
नेहमीप्रमाणे आम्ही दुर्लक्ष केले तर आज त्यांनी बॉंबच टाकला.
“असा स्वतंत्र GP केला आहे. ” परदेशस्थ #$&$कर ” अशा नावाने हा GP ओळखला जाईल. आपणाला आणखी समर्पक नाव सुचले तर जरूर सुचवा.परदेशात असलेल्या सुना,मुली,मुलांची पूर्ण नावे,मोबाईल नंबर,देश इ.माहिती कळवा…!” (जबरदस्ती?)
त्यानंतर त्यांनी त्यांची परदेशात असलेली दोन मुले, एक मुलगी, दोन भाच्या, एक पुतणे आणि बहिणीच्या दिराची एक लांबची बहीण अश्या कुणाकुणाची (मोठ्ठा मेसेज वाचायला सत्तर रुपये पडतील हा मेसेजची तोकडा पडावा) इतकी लांबलचक माहीती दिली. (वर आम्ही दोघे नवराबायको अधून मधून परदेशात फिरायला जात असतो, अशी पुस्तीही जोडली)
शेवटी वैतागून मी त्यांना एक पर्सनल मेसेज टाकला आणि विचारले.
“माझी भाजप, काँग्रेस, आप अशा अनेक पक्षांच्या सायबर विभागात बऱ्यापैकी ओळख आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात का?” म्हणून….
इसमे दो बाते हो सकती है…
१. ते मला ब्लॉक करतील
२. मला कुणी उपरोल्लेखित नावांपैकी कुणाच्याही (जे सगळ्यात अव्वल असतील अशा) ट्रोल्सचे नंबर देईल काय? भोगायचेच असेल तर मी एकटाच का? सगळ्या देशाला भोगू देत ना!
“©” – व्हाटसॅपवर कॉपीराईट वगैरे काही नसतं हो, तो सार्वजनिक “वारसा” असतो.
इतकंच…… !
© विशाल कुलकर्णी
B S Jain
एप्रिल 6, 2017 at 10:03 pm
Vishal – Too good ! … Tuze “Prasangik” waachun Hasave ki radave tech samjat nahi !!!
अस्सल सोलापुरी
एप्रिल 19, 2017 at 10:51 सकाळी
Thanks Sir ! Yeh aapbiti hai 😉
Ghy
एप्रिल 25, 2017 at 12:14 pm
Lekhan ekdum kantalvane zale aahe
अस्सल सोलापुरी
एप्रिल 26, 2017 at 10:44 सकाळी
Thanks for reading !