दिल की तनहाईको आवाज बना लेते है…
दर्द जब हद से गुज़रता हैं… तो गा लेते है !
तो गाsss लेते है, हं…, गाsss लेते है ….
शाहरुख खान आणि पुजा भट्ट , बरोबर नासीरसाब आणि अनुपम खेर अशा दिग्गजांचा एक अतिशय पडेल आणि बकवास चित्रपट ‘चाहत’, त्यातले एवढे एक गाणेच काय ते लक्षात राहीले होते. गाणे सुद्धा फार काही छान होते अशातला भाग नाही. पण सानू आणि अन्नू या जोडगोळीने खरोखर मेहनत घेतली होती गाण्यावर. अर्थात या गाण्याचे खरे शक्तीस्थान होते ते म्हणजे निदा फाजलीसाहेबांचे अप्रतिम शब्द !
सर्वसामान्यांच्या जगण्यातले गाण्याचे, गुणगुणण्याचे, संगीताचे महत्त्व, स्थान स्पष्ट करणारे शब्द. उगीच नाही संगीताला पंचमवेद म्हटले जात. सगळी वेदना, विवंचना, दुःख , काही काळासाठी का होईना पण त्याचा विसर पाडण्याची ताकद, ते सामर्थ्य गाण्यात, गुणगुणण्यात असते. याचा अनुभव लहानपणापासून घेत आलेलो आहे मी. मन बेचैन, अस्वस्थ असलं की नकळत काहीतरी गुणगुणायला, स्वत:शीच गायला लागतो मी. मग त्ये गुणगुणणे काहीही असू शकते. लताबाईचॅ एखादे गाणे असेल, आशाची एखादी तान असेल, तलतची गझल असेल, श्रेयाची एखादी धुन्द करून टाकणारी गाण्याची ओळ असेल किंवा मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चा जप असेल. पण ते गुणगुणणे सुरु झाले की काही क्षणातच मन शांत व्हायला लागते. अर्थात हे बेसिक मेडिसिन असते मन शांत करण्यासाठी. खरे उपचार नंतर होतच असतात. कारण मन शांत, समाधानी नसेल तर जगातली कुठलीच गोष्ट तुमच्या समस्येचे, आपत्तीचे समाधान किंवा निराकरण करु शकतं नाही. ती सुरुवात, मनाला शांत करण्याचे ते पाहिले साधे, सोपे साधन असते गाणे, गुणगुणणे.
जनरली होते काय की मूड खराब असेल किंवा मनावरचा ताण वाढला की नकळत हृदयाचे ठोके जलद पडायला लागतात. त्याचा परिणाम शरीराला आणि मनाला जाणवतोच. अशावेळी त्या ताणावर, त्या समस्येवर उपाय शोधण्याआधी हृदयाची वाढलेली धडधड़ कमी करणे आवश्यक असते. काही जण त्यासाठी एक ते शंभर आकड़े मोजतात. रैंचोसारखे लोक ऑल इज वेल म्हणून मनाला शांतवण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतांश लोक , अगदी ज्यांना गाता गळा नसतो ते सुद्धा काहीतरी गुणगुणण्याचा प्रयत्न करत ताण घालवण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न करतात. आणि ही अतिशय सोपी व् आनंददायी पद्धत आहे. अगदी डॉक्टर लोक सुद्धा गरोदर स्त्रियांना सतत काहीतरी गुणगुणत राहण्याचा सल्ला देतात. गरोदर महिलांनी गाणे, गुणगुणणे गर्भातील मुलासाठी चांगले असते. त्यामुळे गरोदर महिलेच्या शरीरातील चांगले, आनंदी हार्मोन्स स्रवतात त्याचबरोबर गर्भातील मुलाबरोबर मातेचे एक वेगळे नाते निर्माण होते. असेही कुठेतरी वाचले होते.
निदासाहेब लिहितात…
आपके शहर में हम ले के वफ़ा आये हैं
मुफ़लिसी में भी अमीरी की अदा लाये हैं
हो जो भी भाता है ओsss
जो भी भाता है उसे अपना बना लेते हैं
दर्द जब हद से गुज़रता है तो गा लेते हैं –
आनंद देताना संगीत तुम्हाला तुमची जात, धर्म विचारत नाही. तुमचा आर्थिक , सामाजिक दर्जा विचारत नाही. तुम्ही गरीब असा वा श्रीमंत ते सगळ्यांना सारखाच आनंद देते. मागे कधीतरी नौशादसाहेब एका मुलाखतीत म्हणाले होते की ‘मौसिकी फ़कीर को भी बादशाह बना देती है!’ आणि यात काहीही चुकीचं नाहीये. त्या काही क्षणात तुम्ही तुमच्या मनाचे राजे असता. सगळ्या समस्या, विवंचना बाजूला ठेवून तो आनंद, ती बेफिकिरी जगण्याचे सामर्थ्य गाण्यात, गुणगुणण्यात सहज मिळून जाते.
मौसिकी दिल की आवाज़ है , दिल से सुनिए , है ग़ज़ल मीर की, ख्याम की सुनते रहिये , गाते रहिये !
गाणं, गुणगुणणं हां आपल्या जगण्याचा एक आधारभूत घटक असतो, रादर असावा. म्हणजे जगणे जरी सोपे होत नसले, तरी ते सोपे करण्यासाठी झगड़णे मात्र नक्कीच आपोआप सोपे व्हायला लागते. शेवटी ‘कट्यार’ मधले खाँसाहेब सदाशिवला देतात तो आशिर्वाद परमेश्वराकडून सर्वांसाठीच पसायदानासारखा मागून घ्यावासा वाटतोय.
“गाते रहो जीते रहो !”
© विशाल विजय कुलकर्णी