आज सकाळी पनवेलहून अंधेरीला जाणारी ७.४० पकडली. पनवेलहूनच निघणारी असल्यामुळे नेहमीप्रमाणे विंडो सीट मिळाली, मी आपलं नेहमीप्रमाणे बॅगेतून पुस्तक काढलं आणि पुस्तकात डोकं खुपसलं. (बादवे सद्ध्या कँडी मिलरचे ‘सॉल्ट अँड हनी’ वाचतोय) पण आज पुस्तकात लक्ष नव्हते. आज कान आजूबाजूला लागलेले. आज निकाल लागणार होता ना…
गाडीतही तीच चर्चा चालू होती. कडवट्ट (?) शिवसैनिक, पारदर्शकतावादी भाजपेयी यांची संख्या जास्त जाणवत होती. आजपर्यंत निवडणुका म्हटले की भाजपा vs काँग्रेस, शिवसेना vs काँग्रेस , किंवा काँग्रेसच्या जागी राष्ट्रवादी अशा चर्चा रंगलेल्या ऐकलेल्या होत्या. यावेळी मात्र बहुतांश चर्चांचा विषय उद्धवजी विरुद्ध देवेंद्रजी असाच दिसत होता. तावातावाने गप्पा आणि वाद चालू होते. #स्वबळ #पारदर्शकता #स्वाभिमान #इंगा #पंगा #माज #गर्व असे शब्द वारंवार कानावर पडत होते. काँग्रेस किंवा इतर कुठल्याच पक्षाचे फारसे कार्यकर्ते उरले नाहीत की काय असे वाटावे इतपत परिस्थिती होती. मी अंधेरीला जाईपर्यंत गर्दीची पर्वा न करता मिळालेली जागा सोडून मुद्दाम तीन चार डबे बदलले. बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या समर्थकांमध्ये जुंपलेली. यात उद्भवजींबरोबर रावतांचाही उद्धार होत होता. देवेंद्रजी आता लवकरच माजी मुख्यमंत्री होणार अश्या टिप्पण्याही ऐकायला मिळाल्या . अधून मधून एखादा मनसेचा कार्यकर्ता सापडत होता. पण बहुतांश दंगली सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांच्याच होत्या.
संध्याकाळची वेळ. ऑन माय वे बॅक टू पनवेल…
आता निकाल आले आहेत. शिवसेना आणि भाजप पुन्हा ‘मुंबईच्या भल्यासाठी’ (?) गळ्यात गळा घालणार अशी लक्षणे दिसताहेत. शेवटी सत्तेची समीकरणे वेगळीच असतात हो. इथे कुणीही सर्वकाळ मित्र नाही आणि कुणीही सर्वकाळ शत्रू नाही. खुर्चीसाठी जिवलग मित्र मित्राची मान केसाने कापू शकतो, तर खुर्चीसाठीच कट्टर शत्रू तुमच्या गळ्यात गळा घालून मिरवूही शकतो. आपण सगळ्यांनीच आधी विचार केल्याप्रमाणे पुन्हा युतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कदाचित सेना-भाजपा पुन्हा एकत्र येतील. विकासाच्या नावाखाली पुन्हा पुढची पाच वर्षे एकमेकांच्या तंगड्या खेचत खुर्च्या उबवत राहतील.
ठीक आहे, मिठी नदी अजूनही कुरूप, काळीकूट्टच आहे. अजूनही मुंबईच्या रस्त्यांवर पुरेशी स्वच्छतागृहे नाहीयेत (महिलांसाठी तर स्वच्छतागृहांची संख्या जवळ जवळ १००:१ या प्रमाणात आहे). गेली कित्येक वर्षे पाऊस आला की मिलन सबवे तुंबतोच आहे. रेल्वेरुळावर पाणी येऊन लोकल ट्रेन्स डिले होणे, बंद पडणे चालूच आहे. पण म्हणून काय झाले? विकासकामे जोरात चालू आहेत बर्कां. मेट्रोच्या कामाने जोर धरलाय. रोड्स रिपेअरिंग, मेन्टेनन्सची कामे जोरात सुरु आहेत. मोठेमोठे टॉवर उभे राहताहेत. किती जणांना रोजगार मिळतोय म्हणे.
पण आज संध्याकाळी आता परत घरी जाताना, पुन्हा चर्चा ऐकतोय. सकाळी गर्व होता आता बराचसा उन्मादही आहे. शहरातून बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते गाड्या उडवत फिरताहेत. ट्रॅफिक सिग्नल ही संकल्पना आजच्या पुरती बहुदा फाट्यावर मारलेली आहे या लोकांनी. नक्की कुणाला आणि का निवडून दिलेय लोकांनी हा प्रश्न पडतोय, बिनधास्त सिग्नल तोंडात गाड्या उडवणारे कार्यकर्ते बघून. ८४ आणि ८१ चा हा कैफ उद्या, परवा उतरेल. मला प्रश्न पडलाय तो आज गर्व, स्वाभिमान, पारदर्शकता वगैरे गोष्टींवर तावातावाने भांडणारे कार्यकर्ते , उद्या जर कदाचित पुन्हा “मुंबई आणि मुंबैकारांच्या तथाकथित कल्याणासाठी” हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर या कार्यकर्त्यांची नक्की भावना काय असेल? इतर वेळी जिवलग मित्र म्हणून वावरणारे गेल्या काही दिवसात आपापल्या नेतृत्वाच्या समर्थनात फेसबुकवर एकमेकांचे गळे धरत होते. आता पुन्हा जर का युती झालीच तर या माझ्या मित्रांची भावना काय असेल नक्की? पुन्हा पूर्वीच्याच प्रेमाने एकमेकाला माफ करून गळ्यात पडू शकतील? वरवर दाखवले तरी आतून कुठेतरी, काहीतरी चुकल्याचा सल त्यांना छळत राहील का?
मला राहून राहून माझीच एक जुनी कविता आठवतेय…
दादा म्हनले
आंदोलन करा
आमी बशी जाळ्ळ्या…
दादा म्हनले
चळवळ करा
आमी दुकानं फोळ्ळी…
दादा म्हनले
सत्याग्रेव करा
आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी…
दादा म्हनले
त्यो लै बोलतुया
तेची जीभ तोळ्ळी …
दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
…
…
आता वो………….?
ताजा कलम : आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही कारणामुळे हार्बर लाईनवरची लोकलसेवा खंडित झालेली आहे. ट्रेन्स बंद झाल्यामुळे हजारो लोक वडाळा स्टेशन बाहेरच्या रोडवर उतरले आहेत. सगळा नुसता हल्लकल्लोळ माजला आहे. लोक बहुदा निवडणुकांचे निकाल, स्वबळ, माज, गर्व, अभिमान, पारदर्शकता सबकुछ विसरून बस, कॅब्स , ओला, उबेर शोधून घरी जाण्याचे मार्ग धुंडाळताहेत. मी ही बाहेर येऊन ओला शेअर पकडलीय एक. आता मुंबईच्या ट्रॅफिकमधून कधीतरी पनवेलला घरी पोचेन.
जय हो … ! 😎
© विशाल विजय कुलकर्णी