अंधेरी स्टेशन ते सिप्झ मेन गेट ! जेमतेम वीस मिनिटे किंवा ट्रॅफिक असेल तर जास्तीत जास्त अर्धा तास.
सद्ध्या रोजचा अनुभव आहे माझा. सकाळी पनवेल ते अंधेरी लोकल ट्रेन आणि अंधेरी स्टेशन ते सिप्झ मेन गेट असा प्रवास बसने. सुदैवाने आता एसी बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. तर झाले असे आज बस निघाली, माझ्या शेजारी एक २४ – २५ वर्षांचा तरुण मुलगा बसलेला. हातात स्मार्टफोन, कानाला हेडफोन. बहुतेक मोबाईलवर काहीतरी विनोदी बघत होता. त्याला हसू आवरत नव्हते आणि तो ते दाबतही नव्हता. त्याच्या स्वतःच्या कानाला हेडफोन असल्याने कदाचित त्याला जाणवले नसावे पण तो अगदी मोठ्या-मोठ्याने मनमुराद हासत होता. बस मधल्या , सॉरी.. एसी बसमधल्या प्रतिष्ठित प्रवाशांना ते खटकायला लागले बहुदा. जो तो त्याच्याकडे वळून-वळून बघायला लागले. आमच्या पुढच्या सीटवर बसलेल्या एका कन्यकेने ‘बावळटच’ दिसतोय, इडियट ‘ असे म्हणूनही घेतले. मला मात्र त्याचा प्रचंड हेवा वाटत होता. तो मस्त, मोकळेपणाने हसत होता.
पण चकाला येईपर्यंत बसमधल्या लोकांनी इतक्या वेळा वळून बघितलं कि ते त्याच्याही लक्षात आलं असावं. लोक आपल्याकडे बघून हसताहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि तो नकळत वरमला. आपसूक त्याचं ते मनमुराद हसणं बंद झालं. मोबाईलमधली ती क्लिप बघणं चालूच होतं त्याचं, फक्त आता तो हसणं दाबण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला ते खूप कठीण जात होतं.
आता मात्र मला राहवेना. मी त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटलं, तसं त्याने कानातील हेड फोन बाहेर काढला आणि मला म्हणाला ” सॉरी सर, मी बंद करतो क्लिप.”
मी म्हटले, “का रे बाबा? मोबाईल तुझा आहे? कान तुझे, हेडफोन तुझा. मग क्लिप कशाला बंद करतोयस? डोन्ट वरी इतका वेळ एकटा होतास म्हणून लोक वळून पाहत होते, now you are not alone!
Btw myself Vishal Kulkarni. Friends?” हसत त्याने हात पुढे केला. त्याच्या हेडफोनचे एक टोक त्याच्या उजव्या कानात आणि दुसरे टोक माझ्या डाव्या कानात !
…… आणि मग दोन नव्याने दोस्त झालेली बावळट, इडियट माणसं आजूबाजूच्या सॉफीस्टिकेटेड गर्दीला फाट्यावर मारत बिनधास्त खिदळत मोबल्यावरची रेकॉर्डेड ‘F.R.I.E.N.D.S.’ ची क्लिप एन्जॉय करायला लागली.
विशाल कुलकर्णी
Ashwini
जानेवारी 8, 2017 at 3:45 pm
Mast ☺