RSS

पाडस : पुस्तक परिचय

19 सप्टेंबर

बॅक्स्टर वाडीचा उमदा, दिलखुलास पेनी बॅक्स्टर, त्याची (आपली बरीच मुले गमावल्यामुळे चिडचिडी झालेली) स्थूल पत्नी ओरी आणि त्यांचा बऱ्याच मुलांनंतर जगलेला अल्लड, शैशव आणि पौगंडावस्थेच्या काठावर उभा मुलगा ‘ज्योडी’ आणि ज्योडीचा एकुलता एक मित्र , त्याने पाळलेलं एक हरणाचं ‘पाडस’ अर्थात फ्लॅग ! खरेतर हि कथा ज्योडी आणि फ्लॅगची , त्यांच्यातल्या नात्याची आहे. हि कथा सगळी संकटे झेलत, हसतमुखाने जगणाऱ्या आपल्या बायको मुलांबरोबरच आपल्या शेतांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पेनीची आहे, हि कथा नशिबाने चकवलेल्या, वरवर खाष्ट, कजाग वाटणाऱ्या ओरीची सुद्धा आहे.

20160919_200451

मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांची ही कादंबरी ज्योडी नावाच्या या एकाकी, फारसे कुणी मित्र नसलेल्या आणि त्यामुळे मैत्रीसाठी आसुसलेल्या मुलाबद्दल आहे. या एप्रिलपासून पुढच्या एप्रिलपर्यंत असा साधारण वर्षभराचा काळ कादंबरीत आहे. या एका वर्षात ज्योडीच्या मानसिक वयात आणि स्वभावात होत गेलेले बदल, त्याचं स्वतःच्याही नकळत आपलं बालपण मागे टाकणं हा सगळा प्रवास. निसर्गाच्या कायम बदलत्या रुपांच्या पार्श्वभूमीवर, ज्योडीच्या आयुष्यात आलेल्या एका हरणाच्या पिल्लाच्या माध्यमातून, त्याच्या ज्योडीबरोबरच्या नात्यातून हि कथा फुलत जाते.

निसर्गचक्र चालूच राहतं. या वर्षाच्या कालावधीत जे घडतं. जे तपशील येतात, ते शेती, जंगल आणि ज्योडी बॅक्स्टर आणि त्याचे आईवडील राहत असतात, त्या भागाचा एकंदरीत भूगोल यांचा संदर्भ घेऊन कथानक पुढे सरकत राहते. यात मध्येच काही मैलांवर राहणाऱ्या फॉरेस्टर कुटुंबाचा आणि त्यांच्या पांगळ्या मुलाचा फॉडरविगचा संदर्भ येतो. त्याचा अकाली मृत्यूही ज्योडीचा बरेच काही शिकवून जातो. लेखिकेने अगदी बारीक बारीक तपशील तरलपणे नोंदवत ज्योडीचा हा प्रवास रेखाटला आहे.

पेनीच्या गोळीची शिकार झालेल्या एका हरणीचे सैरभैर झालेले पाडस घेऊन ज्योडी घरी येतो. त्याच्या बारकुश्या झुपकेदार शेपटीमुळे फॉडरविगने त्याला फ्लॅग हे नाव दिलय. फ्लॅग बरोबर एकाकी ज्योडीची जोडी जमते. अल्पावधीत त्या दोघांमध्ये एक बिलक्षण नाते निर्माण होते. पण फ्लॅग वाढत असतो. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेलं ते निष्पाप लेकरू मानवाच्या म्हणजे पेनीच्या वसाहतीत त्रासदायक ठरायला लागतं. त्याचं आनंदात इकडे तिकडे बागडणं पेनीच्या शेतीचं नुकसान करायला लागतं. आपल्या कुटुंबियांसाठी लागणारं अन्न वाचवायचं कि ते हरणाचं पाडस, ज्योडीचा फ्लॅग, त्याला वाचवायचं या द्विधा मनस्थितीत पेनी अडकतो. शेवटी तो हा निर्णय ज्योडीवरच सोपवतो.

ज्योडीचा निर्णय काय असेल? त्याच्या एकटेपणातला त्याचा एकमेव जोडीदार फ्लॅग कि…….

मूळ पुस्तक : द यर्लिंग ( The Yearling )
मूळ लेखिका : मार्जोरी किनन रॉलिंग्ज
अनुवाद : राम पटवर्धन
प्रकाशन : मौज प्रकाशन

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: