एका मनस्वी आणि चतुरस्त्र कलावंताचा नितांतसुंदर प्रवास !
कमलहसन आणि दिलीपजी हे दोघेही माझे प्रचंड आवडते कलावंत. सतत काहीतरी वेगळं करण्याचा, नवेनवे प्रयोग करण्याचा प्रयत्न आणि सहजसुंदर अभिनय हे दोघांचे प्लस पॉईंट. वेगवेगळी रूपे साकारण्याचे दोघांचेही वेड…
पण नंतर कमलहसन त्या मेकअपच्या फारच आहारी गेला. मेकअपचा अतिरेक इतका वाढला की त्याच्या बोलक्या चेहऱ्यावरचे भावही दिसेनात. पण प्रभावळकरांना मात्र सुवर्ण मध्य साधणे जमलेले आहे. माफक मेकअप करून बाकी सगळी भिस्त कायिक-वाचिक अभिनयावर ठेवण्यात त्यांना यश आले.
रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यातील क्रूर चेटकीण ते लोभसवाणे टिपरेआजोबा असा प्रवास साकारताना त्यांनी नाना तऱ्हेच्या भूमिका साकारल्या. मग त्यात नातीगोती मधला असहाय बाप असो की चौकटराजाचा वेल्हाळ नंदू , प्रत्येक भूमिका तितक्याच समरसतेने त्यांनी निभावली. मग त्यात साळसुदचा घातकी खलनायक असो की एनकाउंटरचा कुरूप पुनाप्पा , ते उठून दिसले !
विशेष म्हणजे ‘भूमिका जगणे’ हि संकल्पनाच त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते एखादी भूमिका करत असताना एका त्रयस्थ प्रेक्षकांच्या नजरेने स्वतःला अवलोकता येणे जास्त महत्वाचे असते. मी करतोय ती एक भूमिका आहे. तो मी नव्हे याचे भान असणे गरजेचे असते.
अशा या मनस्वी कलावंताने रसिकांशी मांडलेला हा संवाद !
एका खेळियाने …
लेखक : दिलीप प्रभावळकर
प्रकाशक : अक्षर प्रकाशन
अनि़श
सप्टेंबर 20, 2016 at 5:28 सकाळी
अभिनय आणि साहित्य दोन्ही क्षेत्रात तितक्याच ताकदीनिशी लिलया संचार करणारा अवलिया,चिमणराव पासुन,टिपरेपर्यत आणि तात्या विंचुपासुन देउळमधल्या अण्णांपर्यंत सर्व भुमिका समरसुन निभवणार्या जातीच्या कलावंताला सलाम.