त्या दिवसानंतर तो परत कधीच दिसला नाही. प्रत्येक वेळी कळंबोली फाट्यावर एक्सप्रेस वेच्या खालून पनवेलला जाण्याच्या रस्त्यावर असलेल्या चौकात सिग्नलला गाडी थांबली कि माझी नजर त्याला शोधायला लागते. पण तो बहुदा पुढे निघून गेला असावा, आपली स्वप्ने शोधायला किंबहुना खरी करायला. त्या दिवशी त्याचा फोटो काढून ठेवला नाही याची मला कायम खंत लागून राहील.
त्यादिवशी असाच पाऊस मनसोक्त बरसत होता. कळंबोली फाट्यावर हि लांबलचक रांग लागलेली वाहनांची. म्हणजे बघा, माझी गाडी मॅकडोनाल्ड समोर होती, यावरून ट्रॅफिक जामचा अंदाज येईल. तर मी शांतपणे ट्रॅफिक हलके होण्याची वाट बघत होता. सहज उजव्या बाजूला लक्ष गेलं , तिथे तो उभा होता. त्या मुसळधार पावसात भिजत उभा होता. अंगात एक जुनाट , मळकट रंगाची जीन, कुठल्याही रंगाचे लेबल खपून जाईल असा टीशर्ट. गोरा पण कदाचित उन्हाने रापलेला रंग. माझ्या गाडीपासून अवघ्या ३-४ फुटावर उभा होता.
त्याच्या उभे राहण्यात काहीतरी ओळखीचे जाणवत होते. एकदम लक्षात आले की अरे हा ,मोहोब्बते मधला राज आर्यन आहे. त्या तसल्या पावसातही तो आपला आब राखून उभा होता. अधूनमधून पावसामुळे कपाळावर येणारे केस खास शाहरुखच्याच स्टाइलमध्ये मागे सारत…
मी त्याला जवळ बोलावले.
क्या नाम है, दोस्त?
“डॉन का पता तो बारा देशोकी …..”
त्याने सलग दोन तीन डायलॉग मारून दाखवले शाहरुखचे, शाहरुखच्या स्टाइलमध्ये.
पाऊस चालूच होता. मी डॅशबोर्डवर ठेवलेल्या नोटांपैकी एक दहाची नोट उचलली आणि त्याच्यापुढे केली. टू माय सरप्राईज, त्याने टिपिकल शाहरुख स्टाइलमध्ये मान उडवली आणि माझ्याकडे पाठ फिरवून उभा राहीला. इतक्यात ट्रॅफिक पुन्हा पुढे सरकायला लागले तशी मी गाडी पूढे काढली, पाठमोऱ्या उभ्या त्या शाहरुखकडे बघत.
जरा पुढे जाऊन परत गाडी थांबली. तसा तो वळला आणि पळत पळत परत गाडीकडे आला.
“साबजी, वो दस का नोट?”
अरे अभी तो मना कर दिया था ना तुमने?
“साब, वो तो मै शारुकबॉस था ना तब, तब तुमेरेसे पैसे लेता तो शारुकबॉस का क्या इज्जत रै जाता? जब आपुन उस्को मिलेन्गा, तो मूं कैसे दिकायेन्गा उस्को ?”
अब आपुन सिर्फ कलिम है, कलिम शेख, बॉससे मिलने के वास्ते आयेला है, सिद्धे सहारनपुरसे !
ट्रॅफिक पुन्हा हलायला लागलं, मी दहाच्या जागी वीस ची नोट त्याच्या हातावर ठेवली. १४-१५ वर्षांचा शारुकबॉस गोड हसला आणि पुढच्या गाडीकडे वळला.
त्यानंतर रोज त्याला शोधतोय मी. त्याला सांगायचंय कि ….
“बाबारे, परत जा. शारुक बनण्यासाठी आधी शाहरुख प्रमाणे आपलं शिक्षण पूर्ण कर आणि मग ये.”
पण त्या दिवसानंतर तो कधी दिसलाच नाही. शोधलाच तर सापडेल कदाचित ‘मन्नत’समोर. परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे, कि तो अशाच ठिकाणी कुठेतरी असू दे. स्टेशनवर भीक मागताना तो दिसणार नाही याची खात्री आहे कारण त्याच्या बॉसला तोंड दाखवायचेय त्याला.
I hope, he will get what he needs actually and what he deserve !
विशाल कुलकर्णी
छायाचित्र : आंतरजालावरून साभार
Abhishek
ऑगस्ट 24, 2016 at 12:32 pm
ज़िन्दगी कैसी है पहेली हाय
कभी तो हँसाए, कभी ये रुलाये
कभी देखो मन नहीं जागे, पीछे-पीछे सपनों के भागे
एक दिन सपनों का राही, चला जाये सपनो के आगे कहाँ
ज़िन्दगी कैसी है पहेली…
जिन्होंने सजाये यहाँ मेले, सुख-दुःख संग-संग झेले
वही चुनकर खामोशी, यूँ चले जाएँ अकेले कहाँ
ज़िन्दगी कैसी है पहेली..!!
shubhada
ऑगस्ट 24, 2016 at 4:18 pm
Really notalgic