RSS

गोष्ट जादूच्या चष्म्याची !

24 ऑक्टोबर

चष्म्यासारखा चष्मा ! त्याची काय गोष्ट असणार हो? म्हणजे बघा कापुसकोंड्याची असते, अरेबियन नाईट्स मधल्या त्या कुणा शहरजादची असते, इसाप नावाच्या कुणा बुद्धीमान गुलामाचीसुद्धा असते. पण चष्म्याची गोष्ट म्हणजे थोडं अतिच झालं ना? आता चष्म्याचे प्रकार आणि त्याचा वापर करण्याची कारणे वेगवेगळी असतात, असु शकतात. पण त्यावर गोष्ट लिहायची म्हणजे थोडं अतिच झालं ना?

positive-parenting-black-sunglasses-with-blue-glass-old-style

पण असते.. अगदी चष्म्याची सुद्धा गोष्ट असते. आता हेच बघा ना…..

*********************

सकाळपासुन हिंमतरावांनी सगळा बंगला डोक्यावर घेतला होता. एवढा कणखर, कठोर मनाचा माणुस पण सकाळपासून हिंमतराव अगदी सैरभैर झाले होते. स्वतः तर घरभर नाचत होतेच पण सगळे घरही त्यांच्याबरोबर नाचत होते. त्यांची दोन मुले, सुना, एवढंच काय नातवंडं सुद्धा त्यांच्याबरोबर घरभर नाचत होती. कारण होतं हिंमतरावांचा चष्मा ! सकाळपासुन हिंमतरावांना त्यांचा चष्मा सापडत नव्हता आणि चष्मा सापडत नाही म्हणून हिंमतराव अगदी वेडेपिसे झाले होते…..

हिंमतराव धोंडे-पाटील !

वायनरीच्या क्षेत्रातलं अतिशय बडं प्रस्थ. हिंमतरावांची वाईन भारतात तर जायचीच जायची पण तिला भारताबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी होती. वयाची त्र्याहत्तरी ओलांडलेले हिंमतराव अजुनही ताठ होते. कुठल्याही व्यस्त व्यावसायिकाप्रमाणे त्यांचा दिवसही पहाटे पाच वाजता सुरु व्हायचा. पहाटे उठले की (अजुनही) गार पाण्याने आंघोळ करुन हिंमतराव फिरायला म्हणून बाहेर पडत. त्र्याहत्तर वर्षाचा हा तरुण ट्रॅकसुट घालून सावकाश का होइना पण छोट्या छोट्या ढांगा टाकत पळायला लागला की सकाळी फिरायला आलेल्या म्हातार्‍यांबरोबर तरुणांच्याही माना उंचावत. अजुनही रोजचे ३ किलोमीटर धावणे आणि मग येताना तेच तीन किलोमीटर चालणे असा रोजचा व्यायाम असल्याने हिंमतराव अजुनही पन्नाशीत असल्यासारखे भासत. गोरा पान, आताशा थोडासा गव्हाळपणाकडे झुकलेला वर्ण, सहा-सव्वा सहा फुट उंची, तरतरीत नाक आणि ताठ कणा असा हा म्हातारा अजुनही तरुणांना लाजवत असे. तरुणपणी तत्कालिन  सिनेनट सुर्यकांतसारखे दिसणारे हिंमतराव आजही तितकेच देखणे दिसत. गेल्या काही वर्षांपूर्वी सगळा व्यवसाय त्यांनी आपल्या चिरंजिवांवर सोपवलेला होता. पण आजही साडे नवाच्या ठोक्याला हिंमतराव ऑफीसमध्ये हजर असत. थोरले चिरंजीव कुलदीपराव वायनरीचा व्यवसाय सांभाळत होते, तर धाकट्या दिपकरावांनी वारसाहक्काने चालत आलेली शेती  दुध डेअरीचा  व्यवसाय सांभाळायची जबाबदारी घेतलेली होती. गावाच्या वेशीजवळच असलेल्या ‘वत्सल’ बंगल्यात हे संपुर्ण कुटुंब आनंदाने नांदत होते. अजुन काही वर्षात नातवंडे हाताशी आली असती. पण हिंमतराव आजही व्यवसायातून स्वतःला मुक्त करायला तयार नव्हते. प्रत्यक्ष काम जरी कुलदीपराव सांभाळत असले तरी अजुनही व्यवसायाच्या सर्व निर्णयांवर हिंमतरावांचे शिक्कामोर्तब झाल्याशिवाय अंतीम निर्णय होत नसे. काही वर्षांपूर्वी धाकट्या दिपकरावांनी मनावर घेवून धोंडे-पाटलांच्या जुन्या चौसोपी वाड्याचेच नव्या आधुनिक बंगल्यात रुपांतर करुन घेतले होते. हिंमतरावांनी थोडी कुरकुर केली, नाही असे नाही पण वत्सलाबाईंनी लेकाची बाजू लावून धरली आणि हिंमतरावांना माघार घ्यावी लागली. अरे हो, घरातले महत्त्वाचे पात्र राहीलेच….

वत्सलाबाई…. वत्सलाबाई हिंमतराव धोंडे-पाटील. हिंमतरावांची भाग्यलक्ष्मी. खरेतर देखण्या हिंमतरावांसमोर वत्सलाबाई अगदीच सामान्य होत्या. जेमतेम सव्वापाच-साडेपाच फुट उंची, किंचीत गव्हाळपणाकडे झुकणारा सावळा रंग, दिसायलाही साधारणच. पण स्वभाव मात्र खोबर्‍यासारखा. प्रसंगी नारळाच्या कवठाप्रमाणे कठोर तर प्रसंगी आतल्या गोड रसाळ खोबर्‍याप्रमाणे रसाळ, गोड. त्यांच्या नावावारूनच दिपकरावांनी नवीन बंगल्याला ‘वत्सल’ हे नाव दिलेले होते. खरे तर तेव्हाच हिंमतरावांनी सगळ्या कामातून पुर्णपणे निवृत्ती स्विकारायचे ठरवले होते. पण नवीन बंगला अस्तित्वात आला आणि एक-दोन वर्षातच साध्या तापाचे निमीत्त होवून वत्सलाबाई सगळं काही मागे सोडून, हिंमतरावांना एकटेच सोडून देवाघरी निघून गेल्या… आणि उन्मळून पडलेल्या हिंमतरावांनी पुन्हा एकदा स्वतःला व्यवसायात झोकून दिले.

तर अश्या या कर्तव्यकठोर पुरुषाने आज सकाळपासून घर डोक्यावर घेतले होते कारण त्यांचा चष्मा त्यांना कुठे सापडत नव्हता. नुकताच दहावी झालेला त्यांचा नातु तेजस थोडा गोंधळात पडला होता. कारन आजोबांकडे चष्म्याचे एकुण सहा जोड होते. त्यापैकी एकतर सद्ध्या त्यांच्या डोळ्यांवरही होता. तरीही एका क्षुल्लकश्या चष्म्यासाठी त्याच्या एरव्ही अतिशय शांत असलेल्या आजोबांनी सगळे घर कामाला लावले होते.

शेवटी चष्मा सापडला. धाकट्या दिपकरावांची पाच वर्षाची राजकन्या प्रांजल, आजोबांचा चष्मा घालून बंगल्याभोवती असलेल्या बागेत भातुकलीचा खेळ मांडुन बसली होती. आज बाईसाहेब टीचर झाल्या होत्या. मग तिच्या दोन बाहुल्या, घरातली एक मांजर, चार भलीथोरली कुत्री हे तिचे विद्यार्थी होते. सकाळपासून या गोंधळात कुणाचे तिच्याकडे लक्षच  गेले नव्हते. जेव्हा लक्षात आले तेव्हा आजोबांनी ताबडतोब एका गड्याला गावात पाठवून तिच्यासाठी नव्या कोर्‍या चष्म्याची व्यवस्था केली. नवा कोरा, लालचुटुक चष्मा बघून प्रांजलराजे खुश होवून गेल्या. आजोबांनी आपला चष्मा ताब्यात घेतला. तेव्हा प्रथमच तेजसने त्यांचा ‘तो’ चष्मा बघीतला. खरेतर अगदी साधाच चष्मा होता तो. काळ्या रंगाच्या जाड फ्रेमचा, तशाच जाडसर लेन्सेसचा अगदी साधासा , हलका, अतिशय कमी किंमतीचा असा तो चष्मा बघून तेजस अजुनच बुचकळ्यात पडला. दहा-दहा, पंधरा-पंधरा हजारांच्या चष्म्याचे सहा जोड असताना आजोबांना त्या सामान्य चष्म्याचे एवढे अप्रुप असावे ही गोष्ट त्याच्या बालबुद्धीला थोडीशी चमत्कारीकच वाटली नसती तर नवल. पण त्याबद्दल आजोबांना काही विचारायची ही वेळ नव्हे हे तो चांगले ओळखून होता. शेवटी त्याने आईला गाठले. कुलदीपरावांच्या पत्नी सौ. अंजली म्हणजे हिंमतरावांच्याच एका जिवलग मित्त्राचं सगळ्यात मोठं कन्यारत्न. त्यांच्या जन्म झाला तेव्हाच हिंमतरावांनी आपल्या मित्राला सांगून टाकले होते की तुझी ही लेक आजपासुन तुझ्याकडे माझी ठेव असेल. तीचं शिक्षण झालं की ती माझी सुन होइल. आणि तसेच झाले. मात्र अंजलीवहिनी दादांच्या म्हणजे हिंमतरावांच्या विश्वासाला आणि वात्सल्याला पुरेपूर उतरल्या होत्या. वत्सलाबाईंच्यानंतर अंजलीवहीनींनी सगळा डोलारा आपल्या खांद्यावर सावरुन धरला होता. सात-आठ वर्षांपूर्वी धाकट्या जाऊबाई देवयानीबाई सुद्धा हाताशी आल्या. श्रीमंताघरच्या देवयानीताई थोड्याश्या चिडखोर, बंडखोर वृत्तीच्या होत्या. पण अंजलीवहीनींच्या प्रेमळ स्वभावापुढे त्यांनी कधी माघार घेतली ते त्यांनासुद्धा उमजले नव्हते. तर आपला प्रश्न घेवून तेजस आईकडे पोहोचला…

“आईसाहेब, हा काय प्रकार आहे? मी दादांना यापूर्वी कधीही इतके संतापलेले पाहीले नव्हते. इतके काय, खरेतर त्यांना चिडलेलेच कधी पाहिलेले नाहीये मी. मग आज एका सामान्य शे-दिडशे रुपड्यांच्या चष्म्यावरून त्यांनी एवढा गोंधळ घालावा? हे काही माझ्या लक्षात येत नाहीये आई.”

तशा अंजलीवहिनी हासल्या. हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी त्यांनाही पडला होता. पण त्या हिंमतरावांच्या लाडक्या असल्याने त्यांनी आपली शंका थेट  हिंमतरावांकडेच व्यक्त केली होती…

“तेजसबेटा, पहिली गोष्ट म्हणजे  तो चष्मा तुमच्या दादांना अतिशय  प्रिय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटतो तसा तो सामान्य चष्मा नाहीये.” आता त्यांच्या चेहर्‍यावरील मिस्कीलपणा गंभीरपणाकडे झुकायला लागला होता. चिरंजिवांच्या चेहर्‍यावरचे बुचकळ्याचे भाव पाहून त्यांना गंमत वाटली आणि पुर्ण गंभीरपणे त्यांनी त्यात अजून एक वाक्य जोडले.

” तेजस, तो चष्मा सामान्य नाहीये कारण….. तो चष्मा जादुचा आहे !”

आणि आता मला खुप काम आहे, आपण नंतर या चष्म्याबद्दल बोलुयात. तुमचीही अभ्यासाची वेळ झालेली आहे तेव्हा निघा, नाहीतर पुन्हा दादांनी बघीतलं तर ओरडा ऐकावा लागेल. “जादुचा चष्मा” हा गोंधळ , थोडंसं आश्चर्य डोक्यात ठेवुनच तेजस आपल्या अभ्यासाला लागला. एकविसाव्या शतकात सुद्धा जादु सारख्या गोष्टींवर आईचा, त्याहीपेक्षा आजोबांचा विश्वास आहे याचेच त्याला मोठे नवल वाटत होते.

तरीही आपली जिज्ञासा मनातच दाबत तो अभ्यासाला लागला. मात्र संध्याकाळी आजोबांचा मुड बघून या जादुच्या चष्म्याचे गुढ उलगडायचे त्यांने मनाशी पक्के ठरवले होते. संधी आणि आजोबांचा मुड पाहून त्याने बरोबर वेळ साधली.

“आजोबा, तुमचा जादु वगैरे गोष्टींवर विश्वास आहे?”

“तेजसराव, तुम्ही मोठे झालात आता. जादु-बिदू काहीही नसतं या जगात. असते ती फक्त हातचलाखी, हे माहीत आहे ना तुम्हाला?”

“मग आई असे का म्हणाली की तुमच्याकडचा तो ‘चष्मा जादुचा आहे’ म्हणून?

“जादुचा?”

हिंमतराव क्षणभर गोंधळल्यासारखे झाले खरे. पण  पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहर्‍यावरच्या सुरकुत्या उजळल्या. गोरे गाल नकळत गुलाबीसर झाल्यासारखे तेजसला वाटले.

“हो रे राजा, अगदी खरं आहे तुझ्या आईचं म्हणणं. तो चष्मा जादुचाच आहे. त्याच्यात प्रचंड ताकद आहे राजा. प्रचंड ताकद आहे. तुला खोटं वाटेल पण एका अतिशय वाईट राक्षसाचे छानश्या, प्रेमळ राजकुमारात रुपांतर केलेय त्याने. आणि बोलता बोलता हिंमतराव भुतकाळात शिरले. साधारण ४५ वर्षापुर्वींचा काळ हा..अगदी असा डोळ्यासमोर उभा राहीला त्यांच्या…….

**********************************************

जामगाव !

गाव तस्ं बर्‍यापैकी मोठं.  गावचे जहागीरदार आणि  विद्यमान सरपंच दाजीसाहेब धोंडे-पाटील गेल्या काही वर्षापासून गावाला तालुक्याची मान्यता मिळावी म्हणून झटत होते. गडगंज श्रीमंती दारात उतु चाललेली, पिढीजात जमीनदारी असल्यामुळे शेकडो एकर जमीन. दोन  साखर कारखान्यांमध्ये पार्टनरशीप, पंचक्रोशीत त्यांनीच पसरवलेला दुध डेअरीचा  अवाढव्य व्यवसाय यातुन त्यांना वेळच मिळत नसे. पण माणुस दिलदार . अडीनडीला कुणीही बिनदिक्कत रात्री-मध्यरात्री पाटलांचा दरवाजा ठोठवावा आणि तृप्त मनाने परत जावे ही वाड्याची ख्याती. सगळा गाव देव मानायचा त्यांना. गावातल्या पोरांना शि़क्षणासाठी बाहेर जावे लागू नये म्हणून त्यांनी गावातच अगदी शाळेपासून ते कला, वाणिज्य आणि शास्त्र अशा तिन्ही शाखांसाठी महाविद्यालय उभे केले होते. गावकर्‍यांच्याच मागणीमुळे मागे कधीतरी ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहीले. सरपंच झाले आणि तेव्हापासून आजतागायत गावाला  नव्या सरपंचाची गरज पडली नव्हती. नावापुरत्या निवडणुका जाहीर होत. इतर जागा बदलत राहात. पण सरपंचाच्या जागेसाठी मात्र दुसरे कुणी उभेच राहत नसे. खरेतर दाजीसाहेबांना राजकारणात अजिबात रस नव्हता. ते हाडाचे शेतकरी होते. पण…. चालायचच !

आणि अशा देवमाणसाच्या पोटी साक्षात दानवच जन्माला होता.

दाजीसाहेबांचं नाव घेतलं तरी आत्मीयतेने , आदराने हात जोडणारे गावकरी, त्यांच्या चिरंजिवांचं ‘हिंमतराव धोंडे-पाटलांचं’ नाव घेतली की बोटं मोडायला सुरु करायचे. कामाच्या व्यापातुन चिरंजिवाकडे ल़क्ष द्यायला दाजीसाहेबांना वेळ मिळत नसे.   अधुन-मधुन वाड्यावर तक्रारी जायच्या. तेवढ्यापुरते माघार घेवून, माफी मागुन हिंमतराव पुन्हा आपल्या चांडाल चौकडीबरोबर गावगोंधळ घालायला मो़कळे व्हायचे. जेमतेम तेवीशीत असलेले हिंमतराव जामगावातल्या कॉलेजचे विद्यार्थी. बापाचेच कॉलेज असल्याने  त्यांना नापास करण्याची कॉलेजच्या प्रशासनाची हिंमत नव्हती. तसेही हिंमतराव कॉलेजात कधी हजर नसायचेच. आपल्या चांडाल-चौकडीबरोबर गावभर बुलेट उडवत फिरणे. पोरींची टिंगल टवाळी करणे, छेड छाड करणे हा त्यांचा नित्याचा दिनक्रम होता.

आज कॉलेजच्या नव्या वर्षाचा पहिला दिवस. हिंमतरावांचे टोळके कॉलेजच्या फाटकापाशीच तळ ठोकून बसलेले. पहिला दिवस, म्हणजे पहिल्या वर्षाची नवी पाखरं येणार. येणार्‍या-जाणार्‍या मुलींची मस्करी, छेड छाड चालुच होती. तशा या गावातल्याच मुली. हिंमतरावांनी  आधीही पाहिलेल्या. पण कॉलेजच्या प्रांगणात शिरलं की कालपर्यंत परकरी वाटलेल्या पोरीच्या चेहर्‍यावर सुद्धा वेगळीच गंमत येते हे हिंमतरावांना अनुभवाने ठाऊक होतं.

सकाळपासून फाटकावर तळ ठोकून बसलेल्या हिंमतने ते नवखं टोळकं अगदी बरोबर हेरलं. ३-४ मुली होती. तीघी जणी पंजाबी ड्रेसमधल्या., गोर्‍या-गोमट्या , नुकत्याच स्पर्शलेल्या तारुण्याच्या सगळ्या खुणा अभिमानाने अंगा-खांद्यावर मिरवणार्‍या. तर एक त्यातलीच  त्यांच्याच वयाची , जराशी सावळीच चक्क साडी नेसलेली तरतरीत मुलगी. चेहर्‍यावर मेकअपचा कण नाही, साडीही अगदी साधीच, अतिशय हलक्या दर्जाची, आणि डोळ्यावर तो बटबटीत जाड भिंगांचा चष्मा. पण त्या पोरीच्या चेहर्‍यात काही तरी होतं ज्यामुळे हिंमतची का कोण जाणे पण तिला छेडण्याची हिंमतच झाली नाही. त्याने आपला मोहरा इतर तिघींकडे वळवला.

बुलेटवरुन उतरून हिंमत थेट त्या मुलींच्या घोळक्यासमोर जावून उभा राहीला.

“हाय मेरी मुमताज, मेरी मीनाकुमारी, क्या लग रही है यार ! एकदम कडक. ए… येती काय? तालुक्याच्या ठिकाणी घेवून जातो. मस्त फिरु, हॉटेलात जावू.. ऐश करु. क्या बोलती ?”

घाबरलेल्या मुलींनी त्याला चुकवून कॉलेजकडे पलायन केले. तरी  घाई करत हिंमतने त्यांच्यापैकी एकीची ओढणी ओढलीच. ती थेट त्याच्या हातातच आली. तशी ती मुलगी रडायलाच लागली. तिचे रडणे बघून हिंमतची चांडाल चौकडी मात्र खदखदा हसायला लागली. त्यांच्यासाठी हे नेहमीचेच होते. पण पुढे जे घडले ते मात्र अनपेक्षीत होते… त्यांनाही आणि हिंमतलाही !

ती काळी-सावळी दिसणारी, जाड भिंगांचा चष्मा लावणारी मुलगी रागारागात मागे फिरली, त्याच तावात तीने हिंमतच्या हातातली आपल्या मैत्रीणीची ओढणी काढून घेतली आणि पुढच्याच क्षणी हिंमतला विचार करण्याची देखील फुरसत न देता त्याच्या एक सणसणीत थोबाडीत  मारली.

काय झालय हे टोळक्याच्या लक्षात यायच्या आधीच त्या तिघी-चौघी तिथून निघुनही गेल्या होत्या.

“हिंमतराव, चला कालेजात जावुयात. कुटच्या ना कुटच्या वर्गात सापडलंच की ती. दावुयात तिला इंगा.”

“नाही दोस्तांनो, आयुष्यात  पहिल्यांदा कुणीतरी या हिंमतच्या मुस्कटात भडकावलीय. इतकी साधी शिक्षा नाय मिळणार तिला. पळता भुइ थोडी करेन मी तिला. बघाच आता….”

“दादा, उचलायची का?”

“येडा हायेस का? मागल्या हप्त्यातच दाजीसाहेबांनी हाग्या दम दिलाय . विसरलास काय? आता हे अजुन नवीन कळ्ळं तर ठासतीलच आपली. अहं… जरा डोक्याने काम करायला हवं? ”

“याला काय अर्थ हायका दादा, आता समदं काम तुमीच करायचं म्हंजी मं आमी वो काय कराचं? का कालिजात जावून बसु तासाला?”

“कमजोरी… कमजोरी शोधा पोरीची. त्या गृपमधल्या प्रत्येक पोरीची सविस्तर माहिती काढा. आवडी-निवडी, विक पॉईंट्स . दोन दिवसात सगळी माहिती पाहीजे आम्हाला.”

“आता हायका दादा ! काम द्या म्हन्लं तं तुमी तर पार कोथळाच काडाया निगाला. बरं बघतु काय करता येतय ते?”

*******************************************************************

दोन दिवसानंतर ….

“दादा तसा चौघींचा गृप हाये खरा, पर त्यातली येक अगदीच नवी हाये. तिघी मातुर लै जुन्या मैतरणी हायेत.”

“जिनं तुमच्या मुस्कटात….

“हं……,

“स्वारी दादा, तर ती पोरगी या गृपमदी कशी आली कुणास ठावं?  कारण ती लैच गरिबाची हाये. तिचा बाप आपल्याच डेरीत माळीकाम करतुया बगा.बाकीच्या पोरी तशा….. ”

“नाव?”

“अंजना…”

“बास्स झालं, पाहिजे ते मिळालं. आता एक काम करा. रंग्या, तुझी बहिण आहे ना कॉलेजात, तिला घुसव गृपमध्ये. एकदम दोस्ती व्हायला पाहीजे सगळ्यांशी. पुढचं मग मी बघतो.”

*****************************************

हिंमतच्या मनात काहीतरी शिजत होतं. रंग्याची बहीण हा हा म्हणता त्या गृपमध्ये मिसळून गेली. गृपमधल्या गुप्त वार्ता सुद्धा हिंमतरावापर्यंत आरामात पोचायला लागल्या. बघता बघता २-३ महिने उलटून गेले. एवढ्या बाबतीत मात्र हिंमतरावाचा पेशन्स कौतुकास्पद होता. अतिशय थंड डोक्याने सुडाची योजना त्याच्या डोक्यात आकार घेत होती. कधी नव्हे ते हिंमत आणि त्याचं टोळकं कॉलेजच्या वर्गांना नियमीत हजेरी लावायला लागलं. हिंमत कितीही वांड, टवाळ असला तरी दाजीसाहेबांकडून वारश्याने मिळालेली बुद्धीमत्ता होतीच. सगळं काही नीट चाललं होतं. कॉलेजातली पोरं पोरी सुद्धा हळुहळू झालेली घटना विसरून गेलेली होती. सुरुवातीला त्यांनाही आश्चर्य वाटलं. एवढा चारचौघात झालेला अपमान हिंमतराव कसा काय विसरला याचं? पण नंतर आपोआप सगळं मागं पडत गेलं.

उज्वला, रंग्याची बहिण आता त्या गृपमध्ये चांगलीच मिक्स झाली होती. जणुकाही त्या गृपचाच एक हिस्सा बनून गेली होती. चार-पाच महीने उलटून गेले आणि एक दिवस शनवारच्या संध्याकाळी….

“अंजे, संध्याकाळी  काय करतीयस आज?”

“उज्वला, अगं मी काय करणार? रोजचीच कामं. इथुन घरी गेलं की आईला स्वयंपाकात, घरातली इतर कामं करण्यात मदत करायची. धाकट्या भावाला सांभाळायचं. अजुन काय करणार? ”

“मग चल की आजचा दिवस माज्याबरोबर. दुधाळ्याच्या वस्तीवर माझी आत्त्ये राहती. तिच्याकडं जायचय. हवं तर तुझ्या बाबांची परवानगी मी काढते.”

पण त्याची गरज पडली नाही. उज्वला बरोबर आहे म्हणल्यावर अंजनाला तिच्या वडीलांनी सहजच परवानगी दिली. त्या बिचार्‍याला काय माहिती , आपली पोरगी कुठल्या संकटात सापडणार आहे ती?

उज्वलाने लगेच  आपल्या भावाला जावून सांगितले.

“ती आत्त्येकडं यायला तयार झालीय, पण पुढं काय करायचं? ”

“जायचं आत्त्येकडं, येताना उशीर करायचा. इतका की अर्ध्या वाटेत रात्र झाली पाहीजे.  अंधार पडला की घाबरल्यासारखं कर. तिला म्हणायचं की आजची रात आमच्या रानातल्या खोपटातच राहू.  रात्री ती झोपली की गपचूप तू भायेर पड, भायेरुन कडी लाव, म्या आसन तिथंच, तुला घेवून येइन घरी.”

“तुमी काय करायचं ठरवलय तीचं?”

“काळजी करु नगो, काय बी नाय करणार तिला. आंगाला हात सुदीक नाय लावणार. पन तरीबी तिला जन्माची अद्दल घडती का नाय बघ.”

“दादा, नक्की काय करणार नाय ना तुम्ही लोक?”

“सांगितलं ना काय नाय करणार म्हणून. तू तुला सांगितलं तेवढं कर. फकस्त येक गोष्ट लक्षात ठेवायची. गावात कुणी इच्यारलं तर ती तुज्याबरुबर नव्हती म्हणून सांगायचं.”

“काय आणि ती कशी ऐकंल? तिच्या बाबांना पण माहिती आहे ती माझ्या बरोबर येतेय ते.”

“तेच तर साधायचय. तिने बापाला तुझ्याबरोबर येतेय असे सांगितलेय आणि तू उद्याच्याला त्याला सांगशील,” आमचं ठरलं होतं आधी आत्त्येकडं जायाचं, तसं आमी  गेलोबी. पर येताना ती लवकरच निघाली बाबा रागवतील असे सांगून. आणि  त्यानंतर कुठे गेली मला नाही माहीत?”

“म्हणजे तुम्ही तिला…”

“सांगितलं ना, तिला हातबी लावणार नाय आमी. ती उद्या हातीपायी धड, टाकोटाक घरी परत येइल. ”

“बरय… पण तेवढं लक्षात असु दे. तिला कायबी झालं ना, तर म्या समद्या गावभर करीन तुमचं कारस्थान?”

****************************************

“दादा, तुमी सांगितल्याप्रमाणं सगळी व्यवस्था झालीय. पण माझ्या अजुनही लक्षात येत नाहीये तुमचा डाव. नक्की काय करणार आहात तुम्ही.? ”

“सकाळपर्यंत पोर घरात  नाय पोचली की बाप येडा होइल. तुझ्या बहिणीबरोबर गेली होती हे माहित असल्याने तुझ्या घरी येइल विचारायला. उज्वलाने आपण पढवून ठेवलेलं उतर दिलं की तू मोकळा. पुढचं काम रेवण करल.”

“काय करणार आहे रेवण.”

“त्याच्याशी तुला काय करायचय?”

“दादा आवो, तुमचा माणुस हाये मी, मलाबी सांगणार न्हाय काय?”

“रेवण तिच्या बापाला सांगंल की तिला त्यानं रंग्याच्या मळ्यावरच्या खोपीकडं जाताना बघीतलं आणि तिच्या मागोमाग धाकलं मालक म्हणजे आम्हीसुद्धा खोपीकडे जाताना दिसलो असे तो सांगेल. ते ऐकलं तिचा बाप मिळेल तेवढी माणसं घेवून खोपीकडं येइल. ते तिथं पोचायच्या दहा मिनीटे आधीच मी तिथे पोचलेला असेन. कडी उघडून आत शिरेन. तिला तिथे बघून दचकल्यासारखं करेन. सॉरी म्हणून गडबडीत मागे वळेन आणि नेमकं खोपीच्या दरवाज्याला धडकून पडेन. तेवढ्या वेळात रेवण तिचा बाप आणि इतर माणसं घेवून तिथं पोहोचेल. तो मला हाका मारतच येइल. मी खोपीचं दार उघडून बाहेर येइन. जे झालं ते लोकांना खरं खरं सांगेन. मी कसा चुकून आत शिरलो, तिला बघून कसा दचकलो आणि दाराला कसा धडकलो. सगळ काही खरंखरं सांगेन. ती देखील सगळ्यांना हेच सांगेल.बस्स….. झालं.”

“पण दादा, त्यामुळे आपला बदला कसा काय पुर्‍न व्हायचा?”

“होइल रंग्या, बदला पुर्ण होइल. कारण रेवणने सगळ्या गावकर्‍यांना मीठ मसाला लावून सांगितलेलें असेल की त्याने रात्रीच तिला आणि मला मळ्यातल्या खोपीत शिरताना बघीतलय. त्यानंतर तिने किंवा मी कितीही सांगितलं तरी मला खोपीतुन बाहेर पडताना बघितल्यावर लोकांचा तिच्यावर किंवा माझ्यावर चुकुनही विश्वास बसणार नाही. एक दोन दिवस नाय नाय केल्यावर मी कबुल करेन की आमच्यात ‘तसले’ संबंध आहेत म्हणून. तिच्या अंगाला हात पण न लावता माझा सुड पुर्ण होइल.”

हिंमतरावाच्या चेहर्‍यावर अतिशय खुनशी हास्य झळकायला लागले होते.

**************************************************

“ए रंग्या, भैताडा तुजी बहिण कुटं हाय रं. ए उजे, काल माज्या पोरीला बरोबर घेवून गेलीस, कुटं हाय माझी आंजी?” अंजनाचा बाप भयानक चिडला होता. लाडाची लेक  काल संध्याकाळी बाहेर पडलेली अजुन घराकडं परतली नव्हती. रंग्याने गपचूप उज्वलाला डोळा मारला. तिने ठरल्याप्रमाणे पढवलेली सगळी घोकंपट्टी वाजवून दाखवली. तेवढ्यात रेवण आलाच……

नाही नाही म्हणता म्हणता, रानावर पोचेपर्यंत रेवणने वीसेक माणुस तरी जमा केलं होतं. अंजनाच्या बापाची मान शरमेनं पार झुकून गेली होती. बरोबरची बायामाणसं कुजकट हासत, लागट बोलत होती. अंजीचा बाप बिचारा गुपचुप लेकीच्या दिशेने चालला होता.

खोपट समोर दिसताच रेवणने मालक-मालक म्हणुन पुकारा करायला सुरुवात केली. अंजीचा बाप शरमेने खोपटाच्या दाराकडं बघायला लागलं. पण पाच मिनीटं झाली तरी दार काही उघडेना. रेवणची चलबिचल व्हायला लागली. हो नाही करत शेवटी गावकर्‍यांच्या सांगण्यावरुन त्यानेच दार उघडलं. नुसतच लोटून घेतलेलं होतं. सहज उघडलं गेलं. आत बाजेवर हिंमत एकटाच पालथा पडलेला. खोपटात अजुन कुणीही नव्हतं.

“आयला हिच्या, अंजी कुठं गेली?”

ते बघीतलं आणि अंजीच्या बापाच्या जिवात जिव आला. पोरीची बदनामी तर वाचली, पर लेक गेली कुठं? जीव घाबरा झाला…..

रेवणने हलवून हलवून हिंमतला उठवला. “उठा मालक किती येळ  झोपताय? सकाळ झाली ,उठा !”

हिंमतला जाग आली, खोपटात अंजी कुठेच दिसत नाहीये हे कळल्यावर आपली योजना फसल्याचे त्याच्या लक्षात आले, तो गुपचुप उठून निघाला. तेवढ्यात घोळक्यातल्या एका बाईने लोकांचे लक्ष एका गोष्टीकडे वेधले.

“दादा, रगात दिसतय तिथं. एका साधारण ७-८ किलो वजनाचा धोंडा पडलेला होता. रक्ताने अक्षरशं माखलेला…. , जरा पुढं जावून बघीतल्यावर तिथे अजुन एक वस्तु दिसली.

तो एक जाड भिंगाचा, काळ्या फ्रेमचा चष्मा होता., एक काडी तुटली होती. चष्म्याला पण रक्त लागले होते….

“हा माज्या अंजीचा चेष्मा हाये.” अंजीचा बाप चष्म्याकडे बघुन ओरडला.

ते रक्त बघीतल्यावर त्याचे डोळेच फिरले

त्याने तशीच हिंमतरावाची कॉलर धरली, “काय केलंस तू माझ्या पोरीला? येवडं मोटं रगात आलय, माज्या पोरीचा चष्मा म्ह्ंजी रगात बी तिचंच आसणार?”

दुसर्‍याच क्षणी तो धाय मोकलून रडायला लागला. बिथरलेल्या गावकर्‍यांनी हिंमतला धरला आणि त्याच खोपीत कोंडला . दोघे जण पोलीस चौकीवर खबर द्यायला रवाना झाले.

*****************************************************

“साहेब, मी खरेच सांगतो. मी तिथे पोचलो तेव्हा खोपटात कुणीही नव्हतं , ते रिकांमं होतं. मी आत शिरलो आणि तेवढ्यात माझ्या डोक्याच्या मागच्या भागावर काहीतरी जोरात आदळलं. वेदनेचा आगडोंब उसळला आणि मी बेशुद्ध झालो. ते या रेवणने उठवल्यावरच उठलो. यापेक्षा अधिक मला काहीही माहीत नाही.”

हिंमत अगदी कळवळून सांगत होता. पण पोलीस फ़ौजदार विश्वास ठेवायला तयार नव्हते. रेवणने सगळ्या गावासमोर सांगितले होते की अंजी आणि मालक म्हणजे हिंमत रात्रीच खोप्यावर जाताना त्याने बघीतले होते. तिथे अंजीचा मोडलेला, रक्ताने बरबटलेला चष्माही सापडला होता. केवळ दाजीसाहेबांचा मुलगा म्हणून अजुन त्यांनी हिंमतला थर्ड डिग्री लावली नव्हती एवढेच. एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात होता.

“अंजी कुठाय?”

आणि हिंमतकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.

दाजीसाहेब येवुन गेले होते चौकीवर, पण त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं फौजदारांना….

“माझा मुलगा म्हणून त्याला कसलीही सवलत मिळता कामा नये? कुणाची तरी लेक गायब झालीय आणि त्याचा जर तिच्या गायब होण्याशी संबंध असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी. मी कायद्याच्या आड येणार नाही. अगदी जामीन द्यायला सुद्धा नकार दिला दाजीसाहेबांनी. तसंही शनीवारचा दिवस असल्याने आता सोमवारपर्यंत जामीन मिळणे शक्यही नव्हते. म्हणजे हिंमतला किमान दोन रात्री तर लॉक अपमध्ये काढण्यावाचून गत्यंतर नव्हते.

*********************************************

सोमवारी सकाळी कोर्ट उघडताच दाजीसाहेबांनी घडपड करून लेकासाठी जामीन मिळवला. कितीही म्हटलं तरी पोटचं पोर होतं. आणि तसंही अजुन अंजीचं प्रेत सापडलेलं नव्हतं. ते जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत कसलाही अंदाज बांधण्यात काहीच अर्थ नव्हता.

जेलमधल्या दोनच रात्रींनी हिंमतची पार रयाच गेली होती. प्रचंड घाबरलेला चेहरा, दोन रात्रीतच डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसायला लागली होती. रडून-रडून सुजावेत तसे डोळे सुजले होते. खुनाच्या आरोपामुळे तो पुर्णपणे खचला होता. तरी नशीब पोलीसांनी त्याला कसलाही शारिरीक त्रास दिलेला नव्हता, दाजीसाहेबांचे नाव पाठीशी होते त्याच्या. पण हिंमत हिंमत राहीला नव्हता. दोन रात्री तुरुंगात काढल्यानंतर घरी आलेला हिंमत, दाढी वाढलेली, वेड्यासारखी अवस्था झालेली.

घरी आल्या-आल्या जो स्वतःच्या खोलीत शिरला तो बाहेर पडायलाच तयार नाही. खुनाचा आरोप डोक्यावर, प्रचंड घाबरलेला….

..

दोन दिवसांनी दाजीसाहेब डेरीतुन आले आणि हिंमत आपल्या खोलीतून धावत येवून त्यांच्या पायावर कोसळला.

“आबा, मला वाचवा आबा यातुन. मी आईची शपथ घेवून सांगतो मी अंजीचा नाही मारलं, तिचा खुन नाही केला मी. हा तिला अद्दल घडवायचा प्लान होता आमचा. पण ती आलीच नाही त्या दिवशी. असे म्हणत हिंमतने आपली सगळी योजना दाजीसाहेबांच्या कानावर घातली .

“पण खरेच सांगतो आबा, ती नव्हती हो खोपटात. मी तिथे पोचलो तेव्हा खोपटात कुणीही नव्हतं , ते रिकांमं होतं. मी आत शिरलो आणि तेवढ्यात माझ्या डोक्याच्या मागच्या भागावर काहीतरी जोरात आदळलं. वेदनेचा आगडोंब उसळला आणि मी बेशुद्ध झालो. ते या रेवणने उठवल्यावरच उठलो. यापेक्षा अधिक मला काहीही माहीत नाही.”

“आबा, मी वचन देतो तुम्हाला, यापुढे तुम्ही म्हणाल तसे वागेन. उठ म्हणला की उठेन, बस म्हणला की बसेन. यापुढे गावगल्ला करणे, टवाळक्या करणे सगळे बंद करेन. इमाने इतबारे कॉलेज करेन, तुम्ही…तुम्ही म्हणाल ते करेन. पण मला यातून वाचवा. मी खरंच नाही मारलं हो अंजीला, खरंच नाही मारलं.”

“अशी वचनं तू या आधी सुद्धा खुप वेळा दिली आहेस हिंमत.”

“यावेळी मनापासुन वचन देतोय आबा. आईची शप्पथ घेवून वचन देतोय, मला यातुन वाचवा आबा. मी काहीही केलेलं नाहीये, अंजीचं काय झालं ? तीचा चष्मा त्या ठिकाणी कसा काय आला? ते रक्त, अंजी कुठे गेली? मला खरच काहीही माहीत नाहीये आबा.”

..

..

“मला माहितीये.” दाजीसाहेव शांतपणे उदगारले.

“काय?”

“मला माहिती आहे की अंजी कुठे आहे? मला माहिती आहे की ते रक्त आणि अंजीचा चष्मा तिथे कसा काय आला? मला माहिती आहे की तुझ्या डोक्यात तो फटका कुणी मारला होता?”

आता चमकण्याची पाळी हिंमतची होती.

“काय?”

“हो हिंमत, तुझ्या डोक्यात तो फटका मारणारा तुझा सख्खा बापच होता, आपल्याकडे मागच्या वर्षी बैलांसाठी आणलेल्या रबरी सोट्याने मी तुझ्या डोक्यात तो फटका मारला होता. तू काही वेळापुरता बेशुद्ध पडशील या बेताने.”

“आबा, पण का, कशासाठी?”

“तुझ्यासाठी, माझ्या हाताबाहेर चाललेल्या लेकाला पुन्हा मुळ रस्त्यावर आणण्यासाठी.”

“म्ह्णजे ? मी समजलो नाही आबा….”

“तू जेव्हा रंग्याच्या बहिणीला त्या अंजनाच्या गृपमध्ये घुसवलंस तेव्हाच त्या चाणाक्ष मुलीला शंका आलेली होती. तुझ्या दुर्दैवाने सगळ्या गावात तू बदनाम झालेला आहेस. त्याच्या फायदा घेवून अंजनाने उज्वलालाच आपलेसे केले, तिला आपल्या गोटात ओढून तुला हव्या त्या बातम्या तुझ्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली. नो डाऊट, ती पोरगी प्रचंड बुद्धीमान आहे. तीने काय केलं आणि कसं केलं हे मला माहीत नाही, पण तिने तुझा अतिशय जवळचा मित्र रंग्या, त्यालापण फितवलं. त्याला भाऊ बनवून आपल्या बाजुला वळवून घेतलं. ज्या दिवशी उज्वला तिला घेवून आपल्या आत्याकडे गेली, त्या दिवशी दुपारीच अंजना , उज्वला आणि रंग्याला घेवून माझ्याकडे आली होती. त्यावेळी नक्की तुझ्या डोक्यात काय शिजतय हे माहीत नव्हतं. पण नंतर तू रंग्यासमोर बोलून गेलास आणि रंग्याने ते लगेच मला येवून सांगितलं.

मी अंजनाला स्पष्टपणे सांगितलं की तुला तिथे जायची काहीही गरज नाही. तू तिथे नाहीस हे पाहिल्यावर हिंमत गपचुप घरी येइल आणि त्याचा प्लान आपोआपच उधळला जाईल. तर त्यावर ती पोरगी म्हणते कशी…..

“दाजीसाहेब, त्यामुळे माझी सुटका होइल. पण गावातल्या पोरी बाळी पुढेही अश्याच हिंमतरावांच्या त्रासाला बळी पडत राहतील. तुम्हाला तुमचा मुलगा सुधारलेला बघायला नकोय का? थोडा त्रास होइल त्यांना, पण कदाचीत त्यातुन काही सकारात्मक घडून आलं तर तुमचं आणि हिंमतरावांचं आयुष्य तर सुधारेलच पण गावातल्या पोरीबाली सुद्धा दुवा देतील.

मग आम्ही अंजीचा बाप आणि आपले फौजदारसाहेब अशा दोघांनाही विश्वासात घेतलं. त्यांना योजना नीट समजावून सांगितली. फौजदार साहेबांना तुझ्या डोळ्यापुढे फक्त एका खुनी माणसाचं पुढचं आयुष्य, तुरुंगातलं आयुष्य कसं असतं त्याचं भीषण चित्र उभं करायचं होतं. अर्थात हा सगळाच एक जुगार होता.  तू कितीही नालायकपणा करत असलास तरी अजुन तितका निर्ढावलेला नाहीयेस, फक्त पैश्याची गुर्मी, सत्तेचा माज आहे याची मला खात्री होती. त्यातुन तू मोकळा झालास की मला माझा हिंमत परत मिळणार होता. नाही म्हणायला तुझ्यावर काहीही परिणाम न होण्याचीही शक्यता होती पण ही रिस्क तर घ्यायला हवीच होती. ती आम्ही घेतली. त्यासाठी तुला दोन रात्री तुरुंगात काढाव्या लागल्या, पण त्याला नाईलाज होता. त्याशिवाय तुला त्यातली भीषणता कळली नसती.

सुदैवाने खंडेरायाने यश दिले आणि मला माझा हिंमत परत मिळाला.

त्या दिवशी अंजी दुधाळ्याच्या वस्तीवर , रंग्याच्या आत्त्याच्या घरीच राहिली होती. उज्वला फक्त तिचा चष्मा घेवुन माझ्याकडे आली. एक कोंबडं कापून त्याच्या रक्तात तो धोंडा भिजवावा लागला. तो रक्ताने भिजलेला धोंडा आणि अंजनाचा चष्मा खोपटात पोचवण्याचं काम रंग्याने केलं, त्या आधी मी खोपटात शिरून लपुन बसलो होतो. तू आत शिरताच मी हलक्या हाताने तुझ्या डोक्यावर फटका मारला आणि तू बेशुद्ध झाल्यावर तुला तिथेच बाजेवर पालथा  झोपवून मी मागच्या दाराने बाहेर पडलो. पुढे जे झालं ते तर तुला माहीतीच आहे.

“मग ते कोर्टाने दिलेलं जामीनपत्र?”

“कसलं कोर्ट आणि कसलं काय? कोरा कागद होता. ही कल्पना मात्र फौजदारांची होती. त्यांच्यामते त्यामुळे खुनाच्या कल्पनेची ग्राह्यता वाढणार होती. ”

“आणि अंजना?”

“ती गेली तिच्या बापाबरोबर तिच्या घरी, दोन दिवस आपल्या मावशीकडे जावून राहिली होती. कालच आलीय परत…..! एकच रिक्वेस्ट आहे हिंमत… निदान या वेळी तरी वचन मोडू नकोस. या बापाच्या विश्वासाला तडा जावू देवू नकोस”

बोलता बोलता दाजीसाहेबांनी नकळत हात जोडले, त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. ते बघीतलं आणि हिंमत अक्षरशः उन्मळून पडला…

दाजींच्या पायावर डो़कं ठेवून त्याने दाजींना वचन दिलं,” आबा, यापुढे हा हिंमत खर्‍या अर्थाने तुमची हिंमत, तुमची ताकद बनेल.”

दाजींसाहेबांनी आनंदाने लेकाला आपल्या मिठीत घेतलं.

“आबा, रागवणार नसाल तर एक विनंती आहे,” हिंमतने घाबरत घाबरतच विचारलं…

“आज तू काहीही माग रे……

“आबा एकतर मला तो “चष्मा” हवाय ज्याने माझ्यात हे एवढं मोठं स्थित्यंतर घड्वून आणलं आणि दुसरं म्हणजे तुमची परवानगी असेल तर ती ‘चष्मेवाली’ सुद्धा पाहीजे. मला तिच्याशी लग्न करायचय. माझ्यातल्या राक्षसाचा अंत करुन माझं माणुसपण जागवलय तिनं.”

“हिंमत, चष्मा तर माझ्याकडेच आहे, तो मोडल्यामुळे मी अंजनाला दिसरा नवीन घेवून दिला. पण तो मोडका चष्मा फौजदारांनी मला परत आणुन दिलाय, तो मी तुला सहज देवू शकेन. पण चष्मेवाली मिळेल की नाही ते माझ्या हातात नाही, ते तिलाच ठरवू दे…….

**********************************************************************************

“आजोबा, म्हणजे या कथेतला तो हिंमत म्हणजे तुम्ही होता तर. पण मग नंतर त्या ‘अंजना’चं काय झालं? ती कुठे गेली…..

हिंमतराव आपल्या मिशांवरून हात फिरवीत अलवार हसले आणि नातवाच्या खांद्यावर हलकेच थोपटत म्हणाले….

“अंजनाचं लग्न झालं. तिला अतिशय चांगलं सासर, एक प्रेमळ सासरा आणि एक नुकताच सुधारलेला नालायक नवरा मिळाला. लग्नानंतर  तिच्या सासुबाईंनी मोठ्या लाडानं तिचं नाव बदललं.

“काय नाव ठेवलं?”

हिंमतराव उठले आणि उठून वत्सलाबाईंच्या फोटोसमोर जावून उभे राहीले. त्या फोटोतल्या सुंदरीकडे अतिशय प्रेमाने पाहात उद्गारले…

“वत्सला” !

***********************************************

तर अशी ही एका जादुच्या चष्म्याची गोष्ट सुफळ संपुर्ण झाली. आता तुम्ही म्हणाल जादु…..

जादुच ना हो. एका माणसात अमुलाग्र बदल घडवून आणणारा, त्याचं आयुष्य पुर्णपणे बदलून टाकणारा चष्मा जादुचाच म्हणायला हवा ना!

समाप्त

विशाल कुलकर्णी

 

5 responses to “गोष्ट जादूच्या चष्म्याची !

 1. prasanna55

  ऑक्टोबर 25, 2014 at 7:48 pm

  Khupach chan watle wachtana. Tumcha likhan khupach chan ahe.

   
 2. paarijatak

  नोव्हेंबर 26, 2014 at 11:58 सकाळी

  mast
  !!!!
  keval Apratim

  2014-10-24 18:22 GMT+05:30 “” ऐसी अक्षरे मेळवीन !”” :

  > विशाल विजय कुलकर्णी posted: “चष्म्यासारखा चष्मा ! त्याची काय गोष्ट
  > असणार हो? म्हणजे बघा कापुसकोंड्याची असते, अरेबियन नाईट्स मधल्या त्या कुणा
  > शहरजादची असते, इसाप नावाच्या कुणा बुद्धीमान गुलामाचीसुद्धा असते. पण
  > चष्म्याची गोष्ट म्हणजे थोडं अतिच झालं ना? आता चष्म्याचे प्रकार आणि त्याचा
  > व”

   
 3. bhagyashree

  मार्च 11, 2017 at 11:06 pm

  Khupch chan katha kharach vichar karayla lavnari

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: