Yes, I am a Salesman !
अधुर्या डायरीची अस्वस्थ पाने – १
“विशल्या, साल्या तू चुकून इंजीनीअर झालास. तू खरं तर मास्तरच व्हायला हवं होतंस, ते सुद्धा मराठीचा. ”
जुन्या मित्रांचा कंपू भेटला की गप्पांमध्ये एकदा तरी हे वाक्य ठरलेलं असतं. कुणी ना कुणी हे वाक्य टाकतंच. मग त्या अनुशंगाने दुसरा कुणीतरी विचारतो., “फोकलीच्या इंजीनीअरींगला कसा काय आलास मग? आणि इंजीनीअरींग करून सेल्सलाईनला कसा शिरलास येड्या? “.
मी पण उगीचच थोडा आव आणत ठोकुन देतो,” अबे लहानपणापासून भटकायची प्रचंड आवड होती. त्यामुळे ज्यात कंपनीच्या पैश्याने फिरता येइल अशी नोकरी निवडली झालं.”
पण खरं सांगू इंजीनीअरींग मध्ये कधीच रस नव्हता, सेल्समध्ये तर नव्हताच नव्हता. एका गोष्टीची खात्री होती तेव्हापासून की जे करू त्यात यश नक्की मिळणार. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायची तयारी होती, अजुनही करतोच आहे. आज बर्यापैकी यश मिळालय. पैसा मिळालाय. पण कधी कधी राहून राहून वाटतं की तेव्हा त्या भावनीक वादळांच्या आहारी जाऊन सेल्सलाईनकडे वळण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचीत आज मी काहीतरी वेगळे, माझ्या आवडीचे काम करत असतो. कदाचित पुर्णवेळ छायाचित्रकारही झालो असतो, कदाचित मास्तरकीही केली असती. कदाचित……
“वर्ष १९९२ , जानेवारीचा महीना. आमच्या सोलापूरातली प्रसिद्ध गड्ड्याची यात्रा आणि त्या यात्रेत बसुबरोबर एका कॉट टाकून त्यावर मांडलेला विवेकानंद केंद्राचा, रामकृष्ण मिशन प्रकाशित स्वामीजींच्या पुस्तकांचा स्टॉल. बसु म्हणजे श्री. बसवराज देशमुख, सोलापूर विवेकानंद केंद्राचा त्यावेळचा मुख्य सचिव. खरतर सचिव हे उगीचच म्हणायला म्हणून. बसु सोलापूर केंद्राचा सबकुछ होता. तसे असायला अध्यक्ष व इतर लोक होते. पण केंद्र अॅक्टीव्ह होतं ते बसुमुळे. ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत असलेला ‘बसु’ आपली सगळी अवधानं-व्यवधानं सांभाळून सोलापूर केंद्राचा व्याप सांभाळायचा. आम्ही त्याच्याबरोबर असायचो. इतर वेळी बोलताना दर चार शब्दानंतर अडखळणारा (हा त्याचा जिव्हादोष होता) बसु, पण स्वामीजींवर बोलायला लागला की तासनतास न अडखळता, न थकता बोलु शकतो. असो तर आम्ही गड्ड्याच्या जत्रेत केंद्राच्या पुस्तकांचा स्टॉल टाकला होता. बर्यापैकी विक्रीही होत होती. मध्येच बसुच्या मनात काय आले की? त्यातली ‘स्वामीजींच्या विचारांवरची’ ५-१० रुपये किंमत असलेली ९-१० छोटी पुस्तके उचलून माझ्या हातात दिली आणि म्हणाला, “जा, यात्रेत फिरून विकून टाक ही पुस्तके. कुणी जास्त चौकशी केली तर त्याला स्टॉलवर घेवून ये.”
मी पुस्तके घेवून निघालो खरा पण….
पहिलीच वेळ होती. धाडसच होत नव्हतं. धाडस म्हणण्यापेक्षा लाज वाटत होती. अशी मध्येच गर्दीत लोकांना थांबवून पुस्तके कशी विकायची? मी इंजीनीअर होणार होतो. इलेक्ट्रॉनिक्स शिकत होतो आणि असं कसं काय रस्त्यावरच्या लोकांना अडवून काही विकायचं? मी दोन चकरा मारल्या, पण नाही जमलं मला कुठल्या माणसापाशी थांबून त्याला पुस्तक विकायचा प्रयत्न करायला. मी तसाच परत आलो. परत आलो तेव्हा बसु कुठल्यातरी ग्राहकाशी बोलत होता, स्वामींजींच्या साहित्याबद्दल माहिती देत होता. थोड्या वेळाने तो माणुस निघून गेल्यावर बसुने विचारलं , “काय विशालराव, विकलीत का पुस्तकं?”
मी गोंधळलो, क्षणभरच पण लगेच सावरून घेतलं,” नाही रे, खुप जणांशी बोललो पण एकच पुस्तक विकलं गेलं फक्त. ” मी माझ्याच खिशातले १० रुपये काढून त्याच्या हातात ठेवले. पुस्तकं परत देताना एक सफाईने खिश्यातच लपवलं. बसुने ते दहा रुपये घेतले आणि पाठीवर एक मस्त थाप मारली…
“शाब्बास ! अरे पुस्तके विकली गेली तर हवीच आहेत पण केवळ पुस्तके विकणे हाच हेतु नव्हता तुला पाठवण्यात. तुझी भीड मरावी, संकोच सरावा म्हणून तुला पाठवले होते. समाजकार्य करायचे म्हणजे कशालाच लाजून चालत नाही. ती तुझी लाज संपावी म्हणुन पाठवले होते तुला. आणि बघा ना पुस्तके जरी विकली गेली नाहीत तरी तू कितीतरी लोकांपर्यंत स्वामीजींचे विचार पोहोचवलेस ना त्या निमीत्ताने, ते महत्त्वाचे रे.”
मी उगीचच कसनुसा होत हसलो. बसुला तो माझा विनय वाटला, खरी परिस्थिती मलाच माहीत होती. मघाशी वाटली नव्हती तेवढी लाज आता वाटायला लागली होती. आपण बसुशी खोटं बोललोय ही बाब मनात काचत होती. पण अजुनही मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात तथाकथीत प्रतिष्ठेचे, संकोचाचे भूत जागे होते. मी काहीच बोललो नाही बसुला. पण तेव्हाच मनाशी ठरवलं होतं.
“छ्या… सालं ४-५ पुस्तकं. तीही ५-१० रुपये किंमतीची, पण ती सुद्धा विकायला जमु नये. विकणं सोडा साधं लोकांशी संवाद साधणं गेलाबाजार नुसतं बोलणं सुद्धा जमू नये आपल्याला? वाट्टेल ते झालं तरी चालेल पण ही लाज, हा संकोच संपायलाच हवा. तेव्हाच ठरवलं शिक्षण काही का होइना पुढे, पण करीयर सेल्समध्येच करायचं. ”
आता हसू येतं स्वतःचंच. पण मी झपाटल्यासारखा झालो होतो त्या कल्पनेने. शिक्षण संपल्यावर सुद्धा ठरवल्याप्रमाणे सेल्सलाच घुसलो तो आजतागायत त्याच क्षेत्रात आहे. एके काळी ४-५ पुस्तके , ती सुद्धा अत्यल्प दरातली विकायला सुद्धा लाज वाटलेला मी. आज ‘ट्रिंबल पोझीशनींग’ सारख्या मल्टीनॅशनल कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आहे. संपुर्ण भारताबरोबर श्रीलंका, नेपाळ, भुतान, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशातला कंपनीचा ‘ओमनीस्टार जीपीएस रियल टाईम करेक्शन्स’चा व्यवसाय मी सांभाळतो. पण आजही जेव्हा ते ‘दहा रुपयाचं पुस्तक’, प्रत्यक्ष न विकता खोटंच, स्वतःच्या खिश्यातले दहा रुपये भरून, विकले असे सांगून बसुची शाबासकी मिळवणारा तो खोटारडा विशाल माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि ……….
बसु, मला आणि तुला प्रिय असलेल्या स्वामी विवेकानंदांची शपथ घेवून सांगतो. तो माझ्या आयुष्यातला शेवटचा खोटेपणा होता. गेली १६-१७ वर्षे सेल्सलाईनमध्ये आहे. तरीसुद्धा एकदाही मला माझे काम करण्यासाठी खोटेपणाचा आधार घ्यावा लागलेला नाही. कारण जेव्हा जेव्हा मी अशा प्रसंगात, अशा धर्मसंकटात अडकतो तेव्हा मला तो ‘विशाल’ डोळ्यासमोर दिसतो आणि “खोटारडा-खोटारडा” म्हणून ओरडायला लागतो. मग मी खंबीरपणे समोरच्या परिस्थितीशी वैध आणि योग्य मुद्द्यांवर झुंजायला तयार होतो.
Thanks Basu, I love you my friend. You made my life!!
विशाल…
ruchira2702
एप्रिल 23, 2014 at 4:05 pm
होतं खरं असं कधीकधी नकळत वाट मिळते खुप छान लिहिता तुम्ही
अभिषेक
एप्रिल 23, 2014 at 5:09 pm
जे बात!…
सुहास
एप्रिल 23, 2014 at 5:27 pm
काही वाटा खूप अंतर चालून गेल्यावर एकत्र येतात… सो आशावादी रहा. जे तुला हवं, ते होईलच 🙂 🙂
विशाल विजय कुलकर्णी
एप्रिल 23, 2014 at 5:33 pm
नाही रे सुहास, खंत नाहीये. हा मार्ग स्वत:हून स्विकारलेला आहे त्यामुळे खंत अजिबात नाहीये. इथे सुद्धा मला मान-सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, मित्र सर्वकाही मिळालेय, मिळतेय. त्यामुळे कुठलीही कटूता नाहीये मनात. आता सुदैवाने पुरेसा वेळ मिळतोय त्यामुळे मी माझ्या छंदांनाही खतपाणी घालू शकतोय.. So I am happy !
फ़क्त ती एक ’खोटेपणाची’ खंत मनात होती, त्या खदखदीला उद्रेक होवू नये म्हणून कुठेतरी जागा करून देणे गरजेचे होते, म्हणून हा डायरीचा प्रपंच
Priya
एप्रिल 23, 2014 at 11:47 pm
mast 🙂
B S Jain
एप्रिल 6, 2017 at 10:14 pm
Dear Vishal – Very delayed response; but I never visited this site so far. It is just marvelous, the way you have expressed yourself. I am trying to understand you slowly – I think I know you little more with each of your article that I happen to come across & read !!!