साधारणतः चाळीसच्या दशकात खांडव्याहून मायानगरी मुंबईत आलेल्या आभासकुमार गांगूली नावाच्या त्या कलंदराने बहुदा रसिकांच्या मनावर तहहयात अधिराज्य गाजवायचं हे ठरवुनच मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. सुरूवात अभिनयक्षेत्रातुनच झाली. १९४६ मध्ये आलेल्या आणि अशोककुमार नायक असलेल्या ‘शिकारी’ मधुन किशोरदांनी एक अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. अशोककुमारांची इच्छा किशोरदांनी त्यांच्याप्रमाणे अभिनेता बनावे हीच होती. स्वत; किशोरदा मात्र फिल्मी करियरबद्दल फारसे गंभीर नव्हते. १९४८ साली आलेल्या ‘जिद्दी’ मध्ये संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोरदांना सर्वप्रथम गाण्याची संधी दिली. गाणे होते ,”मरने की दुवाये क्युं मांगू…” त्यानंतर किशोरदांचे अभिनय आणि पार्श्वगायन हे दोन्ही प्रकार समांतरपणे चालु होतेच. पण मुळात फिल्मलाईनमध्येच फारसे स्वारस्य नसल्याने किशोरदंच्या टिवल्या-बावल्याच जास्त चालु होत्या.
मी कुठेतरी वाचलं होतं की ‘मशाल’च्या निर्मीतीदरम्यान एकदा कै. सचीनदेव बर्मन काही कारणांमुळे अशोककुमार यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा किशोरदा कुंदनलाल सहगल यांचं एक गीत सैगलसाहेबांच्या स्टाईलमध्ये गुणगुणत होते. साहजिकच सचीनदा त्या अनघड आवाजाकडे आकर्षित झाले. गाणे ऐकल्यावर त्यांनी मनापासून किशोरदांचे कौतुक केले आणि एक मोलाचा सल्ला दिला, ” सैगलची नक्कल करण्यापेक्षा स्वतःची शैली विकसीत कर, या क्षेत्रात तुझे भवितव्य अतिशय उज्वल आहे.” सचीनदांसारख्या संगीतातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा सल्ला अव्हेरणे किशोरदांना शक्यच नव्हते. त्यांनी स्वतःची शैली विकसीत करण्याचे मनावर घेतले . पण सचीनदांनी केवळ कौतुक करून आपले कर्तव्य संपले असा भाव न बाळगता किशोरदांना आपल्या चित्रपटांमधून अनेक संधी दिल्या. त्या संधींचं किशोरदांनी काय केलं हे जगजाहीर आहे. सचीनदांसाठी गाताना पंचमशी मैत्र जुळले आणि मग एक नव्या पर्वाची सुरूवात झाली. सचीनदांच्या संगीतात किशोरदांचा आवाज, त्यांचे सुर विलक्षण खुलायचे. त्या स्वरांना आर.डी. अर्थात पंचमदांनी एक मनस्वी टोकदारपणा दिला. त्यात गुलझारसाहेबांची संगत लागली आणि ही जोडी अजुनच फुलून आली. या त्रिकुटाने अनेक सुंदर गाणी दिली आहेत. त्यातलंच एक जिवघेणं गाणं…..
तसं बघायला गेलं तर अगदी साधे थोडेसे श्रुंगारिकच वाटणारे शब्द. तसं तर हे गाणं कुठुनही आणि कधीही ऐकलं तरी आवडतंच कारण किशोरदांनी या गाण्याला ट्रीटमेंटच असली जबरा दिलेली आहे की पुछो मत. विशेषतः “फिर वोही…” हे दोन शब्द उच्चारताना ‘फिर’ मधल्या ‘र्’ची अनपेक्षीतपणे साथ सोडताना ‘वोही’ मधल्या ‘वो’ला लावलेला जीव.. कातिल ..कातिल सूर लावलेत किशोरदांनी. पण हे गाणं जर अनुभवायचं असेल तर हा चित्रपट पाहणे अतिशय गरजेचे होवून बसते. “फिर” वही रात… यातला ‘फिर’ हा शब्दच अतिशय वाईट्ट आहे. पुनरावृत्तीचा आनंद देतानाच जुन्या, गतकाळातील स्मृतींच्या खपल्या काढणारा आहे. एकमेवावर जिवापाड प्रेम करणारे विकास आणि आरती हे एक गोड जोडपे. विनोद मेहरा आणि रेखा असं सेटच्या बाहेरही गाजलेलं जोडपं 🙂 . आपल्या छोट्याश्या विश्वात रमलेले विकास आणि आरती एके दिवशी रात्री चित्रपट पाहून परत येताना त्यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडते आणि आरती मुळापासून कोसळून जाते, हरवून जाते. आणि मग सुरू होते तिला परत माणसात आणण्यासाठीची विकासची धडपड. तिच्या मनात एक किंतु जन्माला आलेला आहे. आता आपण शुद्ध राहीलेलो नाही. विकासच्या लायक राहीलेलो नाही. या भावनेतून मनोमन खचलेली, उध्वस्त झालेली ‘आरती’. तिचं हे खचलेपण, तिचं हे उध्वस्त होणं रेखाने प्रचंड ताकदीने उभं केलय. जरी ही प्रेमकथा असली तरी माझ्या मते या चित्रपटाची नायिका आणि नायक या दोन्ही भुमिका रेखानेच साकारलेल्या आहेत असे मला कायम वाटत आलेले आहे. शुन्यात हरवलेल्या, खचलेल्या ‘आरतीला’ त्या विमनस्क अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी धडपडणारा, त्यासाठी स्वतःची सगळी वेदना चेहर्यावरच्या खोट्या हास्यात बुडवून टाकणारा विकास देखील विनोदने अतिशय संयमीपणे उभा केलाय.
या सगळ्या पार्श्वभुमीवर ‘गुलझारसाहेबांचे’ विद्ध करणारे शब्द येतात….
काँच के ख्वाब हैं, आँखों में चुभ जायेंगे
पलकों पे लेना इन्हें, आँखों में रुक जायेंगे
गुलझारचं हेच वैशिष्ठ्य आहे, फारसं न बोलता प्रचंड काही सांगून जातात. मानवी आयुष्यात स्वप्नांचं महत्त्व अनमोल आहे. पण म्हणूनच स्वप्ने ही काचेसारखी असतात. विलक्षण जपावी लागतात, जरा हलगर्जीपणा झाला, थोडी जरी चुक झाली तरी तडा गेलाच म्हणून समजा. पापणीवर अलगद रेंगाळणार्या आंसवांप्रमाणे हळुवारपणे जपावं लागतं त्यांना. नाहीतर मग प्राक्तन फक्त आणि फक्त वेदना असते.
गंमत बघा, इथे गुलझारसाहेब किती सहजपणे शब्दांशी खेळतात. एकीकडे ‘फिर वोही रात है’ असे सांगताना तिच्या जुन्या रम्य आठवणींना उजाळा देण्याचं काम करतानाच, ती रात्र (दु:स्वप्न) आहे, पण म्हणूनच लवकरच संपणार, नवी, नव्या सुखांची पहाट होणार याचेही सुतोवाच करतात. इथे तिचे सांत्वन करतानाच ‘मी काहीही झाले तरी कायम तुझ्या सोबत आहे” हे अगदी सहजपणे तिला सांगून जातात….. “रात भर ख्वाबमें, देखा करेंगे तुम्हें”……
हे गाणं चालु असताना कॅमेरा हलके हलके कधी विकासच्या तर कधी आरतीच्या चेहर्यावर फिरत राहतो. विकासच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारं प्रेम आणि त्याचवेळी आरतीच्या डोळ्यातून जाणवणारं प्रचंड तुटलेपण आपल्याला आजुबाजुचं सगळं काही विसरायला लावतं.
मासूम सी नींद में, जब कोई सपना चले
हमको बुला लेना तुम, पलकों के पर्दे तले
“मासूमसी नींद” … स्पेशल गुलझार स्पर्श ! हे असलं काही गुलझारच करु जाणे. इथे पण बघा, परत शब्दांशी , त्यांच्या अर्थाशी खेळणं, त्यांना लडिवाळपणे गोंजारणं आहेच. इथे तुझ्या स्वप्नात सुद्धा मला जागा हवी अशी लाडिक मागणी करतानाच तिथे सुद्धा मी कायम तुझ्या बरोबर, तुझ्या पाठीशी आहे अशी आश्वासक प्रेमाची खात्री देणारे हे शब्द. गाणं संपत येताना विकास तीला झोप लागलीय असं समजून हलकेच ‘आरती’च्या अंगावरचं पांघरूण सारखं करतो. खिडकीचे पडदे ओढून घेवुन दिवे मालवतो आणि पलंगाशेजारी टिपॉयवर ठेवलेला अॅशट्रे रिकामा करण्यासाठी म्हणून उचलतो , नेमके त्याच वेळी त्याच्या लक्षात येतं की ती अजुनही जागीच आहे….
त्या क्षणी क्षणभर, अगदी क्षणभरच विकासचा वेदनेने पिळवटलेला चेहरा आपल्याला दिसतो, त्या एका क्षणभराच्या दर्शनाने आपण मुळापासून हलतो. दुसर्याच क्षणी विकासच्या चेहर्यावर परत हास्य येते आणि आपण अजुनच हळवे होतो. केवढी विलक्षण कुचंबणा आहे. तिचं सांत्वन तर करायचंय पण त्यावेळी स्वत:ची वेदना मात्र दाबून टाकायची.
उगीच नाहीत म्हणत ‘प्रेम ही जगातली सर्वोत्कृष्ट भावना आहे’ म्हणून…….
या गाण्यावरून अजुन एक असंच सुंदर गाणं आठवलं गुलझार आणि रेखाचंच…..
यात पहिल्या कडव्यात गुलझारसाहेबांनी एक शब्द वापरलाय… “कांच के ख्वाब” ! असंच एक नितांत सुंदर गाणं गुलझारसाहेब आणि रेखाने दिलं होतं ‘आस्था’ या चित्रपटात….
तनपें लगती ‘कांचकी बुंदे, मन पे लगे तो जानूं…
बर्फसे ठंडी आगकी बुंदे, दर्द चुगे तो जानू….
या गाण्याबद्दल पुढच्या लेखात. तो पर्यंत ‘घर’ मधलं हे गाणं ऐका, जमल्यास अनुभवून पाहा.
हा सगळा लिखाणाचा प्रपंच खरेतर ‘किशोरदांच्या’ अफाट सामर्थ्याला दाद देण्यासाठीच आहे. पण त्यावर मी काही बोलण्यापेक्षा हे गाणे आणि किशोरदांचे सुरच अधिक प्रभावीपणे बोलू शकतील म्हणून त्यावर काही भाष्य करण्याचा करंटेपणा हेतुपुरस्सर टाळला आहे. क्षमस्व
विशाल.
अभिषेक
मे 23, 2013 at 7:08 pm
“कांच के ख्वाब” आणि विनोद ची कुचंबणा!
डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू असे किती प्रसंग असतात आणि आणि किती परिस्थिती असतात… प्रत्येकाचे वेगळे घाव, वेगळे भाव…
विशाल कुलकर्णी
मे 23, 2013 at 7:10 pm
माझा अतिशय आवडता चित्रपट आहे हा. आणि विनोद-रेखा हे आवडते कलावंत. गायक किशोरदा हे आणि गुलझार ही दैवतं आणि पंचमदांचं दैवी संगीत !
सचिन ज्ञा. पोरे
मे 29, 2013 at 10:02 सकाळी
अतिशय सुंदर गाणे आहे हे मी हे पहिल्यांदा च ऐकले आणि मला खूपच आवडले.
विशाल कुलकर्णी
मे 29, 2013 at 12:43 pm
धन्यवाद सचिन 🙂
Dev
जून 3, 2013 at 11:08 सकाळी
माझं ऑलटाईम फेव्ह गाण्यातील हे एक गाणं आहे. खुप सुंदर लिहिलत.. अजुन गाण्याच्या प्रतिक्षेत.. 🙂
विशाल कुलकर्णी
जून 3, 2013 at 11:12 सकाळी
मन:पूर्वक आभार देव 🙂
dr m a hadi shaikh
एप्रिल 13, 2016 at 3:09 pm
lovely