आपण यापुर्वी कधीच भेटलेलो नाही? पुढे कधी भेटू शकु असेही वाटत नाही. पण प्रामाणिकपणे सांगू मला जर कधी देव भेटला, ज्याला तू अल्लाह म्हणतेस आणि मला म्हणाला की चल तुझी कुठलीही एक इच्छा मी पुर्ण करेन. तर मी त्याला एकच मागेन मला फ़क्त एकदा त्या पाकिस्तानी ’झाशीच्या राणीला’ प्रत्यक्ष डोळे भरून बघायचे आहे. जमल्यास तिच्या त्या चिमुकल्या बोटांचे चुंबन घ्यायचे आहे आणि मनापासून तिला सांगायचेय…
“मलाला, इस बात का ’मलाल’ तो हमेशा रहेगा की मै तुम्हारी तरहा बन ना सकुंगा!”
पोरी, कुठून आणलंस गं एवढं धैर्य.., एवढं साहस? भारतासारख्या लोकशाही आणि तुलनात्मक दृष्ट्या अधिक सुरक्षीत देशात राहूनसुद्धा जिथे दहशतवादावर बोलताना आम्ही दहा वेळा विचार करतो. तिथे कायम त्या तालिबानी दहशतवादाच्या छायेत राहणार्या तुझ्यासारख्या चिमुकल्या मुलीने कसं जमवलं असेल हे धाडस, हा आत्मविश्वास? साक्षात मृत्युलाच आव्हान देण्याची ही जिद्द ! त्रिवार मुजरा ‘मलाला’… त्रिवार मुजरा !!
कालपर्यंत तुझं नावही माहीत नव्हतं. आणि आज ते कळालं तर केव्हा, जेव्हा तू रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहेस तेव्हा? पण त्याचे मला काही वाटत नाही. तू पक्की लढवय्यी आहेस. अवघ्या अकराव्या वर्षी मानवतेच्या शत्रुंच्या विरुद्ध तू ‘जिहाद’ छेडलास. तूला हे कमजोर तालिबानी काय संपवणार? मला आठवत्म , अकरा वर्षाचा असताना मी नुकताच ‘चंपक’ वाचायला लागलो होतो. अधुनमधुन ‘चांदोबा’ किंवा तत्सम खास लहान मुलांसाठी लिहीली जाणारी पुस्तके हे आणि एवढं माझं वाचनविश्व होतं. बाराखडी आणि उजळणी वाचण्याचे ते दिवस. त्या दिवसात तू थेट तालिबान्यांशीच संघर्ष मांडलास. तुझ्या धाडसाला काय म्हणावं? पाकिस्तानातील ‘स्वात’ या तालिबानग्रस्त प्रांतातील ‘मिंगोरा’ या छोट्याश्या शहरातली/गावातली एका सामान्य घरातली लहानशी मुलगी तू. पण तूला सामान्य तरी कसं म्हणू? अवघ्या अकराव्या वर्षी तू जे दिव्य केलंस ते मला आजदेखील जमणार नाही.
स्वातवर तालिबान्यांनी कबजा मिळविल्यानंतर तिथल्या सामान्य माणसाची जी भयाण घुसमट सुरू झाली , त्यातून सामान्य विद्यार्थीही सुटले नाहीत . विशेषतः मुलींनी तर शिकूच नये असा फतवा रुढीवादी तालिबान्यांनी काढला. तसंही पाकिस्तान आधीच फतवेबाजीने त्रासलेलं आहे, त्यात हा एक नवा फतवा होता. साऱ्या वातावरणातच एक अनिश्चितता भरून राहिली होती. तुझ्यासारख्या संवेदनशील मुलीला जाणवली नसती तरच नवल . पण तरीही वयाच्या अवघ्या ११व्या वर्षीच बीबीसीच्या ऊर्दू भागासाठी ‘ गुल मकाई ‘ या नावानं लेखन सुरू करणं आणि तालिबानच्या कृर फतवेबाजीच्या विरोधात किंबहुना साक्षात मृत्युच्या विरोधात यल्गार पुकारत ‘स्वात’मधल्या भयाण वास्तवाचा विद्रुप चेहरा जगासमोर आणलास. तुझ्या या कृत्याने तालिबानी भडकले नसते तरच नवल होतं. जिथे ते मुलींनी शिकायच्या सुद्धा विरुद्ध होते तिथे एका लहानगीने त्यांच्या अजस्त्र सामर्थ्याला आणि बिभत्स मनोवृत्तीलाच आव्हान दिले होते.मी तर पुढे असंही ऐकलं, की तुझ्या या अतुलनीय धैर्याबद्दल तुझंनाव ‘ इंटरनॅशनल चिल्ड्रन्स पीस प्राईज ‘ साठी सुचविण्यात आलं होतं म्हणे. तुला ते बक्षीस नाही मिळालं म्हणे, त्याच्याऐवजी मिळालं कृर तालिबान्यांचं शतृत्व. पण त्याची तुला गरजही नाही. तुझ्या धैर्याने तुला त्याहीपेक्षा मोठं केलय. पण तू थांबली नाहीस. तुझी लेखणी थांबली नाही. तू लिहीत राहीलीस, मुर्ख आणि अत्याचारी तालिबान्यांच्या विरोधात आपला आवाज, आपली धारधार लेखणीची तलवार तू मुळीच म्यान केली नाहीस. तू लढत राहीलीस. पण दडपशाहीविरुद्ध तू उठवलेला आवाज दबलाही गेला नाही. मुलात तालिबान्यांना तो दाबता आला नाही. आकाशात सळसळणारी ‘वीज’ कधी बांधता येते का?
त्यामुळंच शाळा सुटल्यावर बसमधून आपल्या घरी जाताना तालिबान्यांनी तुझ्यावर हा जीवघेणा हल्ला केला. इथे पुन्हा तूच जिंकलीस. तुझ्यासारख्या एका अवघ्या १४ वर्षाच्या मुलीची त्या जगभर पसरलेल्या, अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या नाकीनऊ आणलेल्या अतिरेकी संघटनेला भीती वाटावी, इतकी भीती वाटावी की त्यांनी थेट तुझा जिव घेण्याचा प्रयत्न करावा यातच तुझा विजय आणि त्यांचा, पर्यायाने जहरी, विखारी आणि अत्याचारी रुढींचा पराभव लपलेला आहे. ते हारलेत ‘मलाला’ आणि तू जिंकली आहेस. मला आश्चर्य आणि अकुतुक वाटतं तुझ्या जिद्दीचं, तुझ्या चिवटपणाचं. डोक्यात गोळी घुसून देखील तू त्यांना पुरून उरलीस. मृत्युला देखील खिजवलंस पोरी. अर्थात बरोबरच आहे म्हणा, तुझ्यासारख्या ‘दुर्गेच्या’ वाट्याला जाताना तो मृत्युसुद्धा कचरला असेल थोडावेळ. सुदैवानं आता तुझ्या जिवाला धोका नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे . तुझ्या शरीरातल्या गोळ्या काढण्यात त्यांना यश आलेलं आहे. अजुन धोका पुर्णपणे टळलेला नाही असं जरी डॉक्टरांचं म्हणणं असलं तरी मला खात्री आहे. तूला काहीही होणार नाही. आपल्या इच्छाशक्तीच्या, आत्मशक्तीच्या बळावर तू परत येशील आणि आपली लढाई पुढे चालु ठेवशील.
पाकिस्तान आणि भारत या दोन देशांतून जरी विस्तव जात नसला तरी एक गोष्ट मनापासून सांगतो. “भारतातल्या पुण्यासारख्या तुझ्यापासुन हजारो किलोमीटर दुर असलेल्या शहरातून तुला प्रत्यक्ष मदत करणे जरी मला, आम्हाला शक्य नसले तरी आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तुझा आवाज, तुझी वेदना जगापर्यंत पोचवणे ही आम्ही आमची जबाबदारी मानतो आणि ती पार पाडण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न करु.
अल्लाताला, तुम्हे अपनी इनायतोसे नवाजे. तुम्हे बहुत सारी और लंबी जिंदगी दे ! अपने उसुलोंपे, अपनी बात पें डटे रहनेंकी ताकद दे यही दुआ है मेरी नन्ही दोस्त…… !
तुझा एक असा मित्र ज्याला तू कधीही भेटू शकणार नाहीस….
विशाल …
संदर्भ : http://www.guardian.co.uk/commentisfree/2012/oct/10/malala-yousafzai-taliban-misogyny
मलालाची बहुचर्चित डायरी
मलाला युसुफजई : विकीपिडीया
Sachin D. Pore
ऑक्टोबर 11, 2012 at 1:59 pm
Really Malala is very Great; definetly she will be fine and once again start her fight!
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 11, 2012 at 2:14 pm
आपण आपल्या चौकटीत सुरक्षीतपणे जगत असतो सचीन. आपल्या संकुचीत जगाच्या बाहेर काय चाललय? लोक कुठल्या अवस्थेत जगताहेत याची आपल्याला खबरही नसते आणि देणेघेणेही नसते. त्या पार्श्वभुमीवर ’मलाला’ सारखी अद्वितीय व्यक्तिमत्वे दिसली की आपोआप मान झुकते आणि त्याचबरोबर जगायला अजुन एक नवे कारणही मिळते.
वैभव टेकाम/Vaibhav Tekam
ऑक्टोबर 11, 2012 at 2:00 pm
शहारे आलेत अंगावर …
वाचतांना सुचत नव्हतं, कि थांबून विचार करू … कि मी काय केलं असतं जर तिच्या जागी असतो तर … कि वाचून काढू जे काही तू लिहिलं आहेस ते ..
>>अवघ्या अकराव्या वर्षी तू जे दिव्य केलंस ते मला आजदेखील जमणार नाही.
… खरंच दुसऱ्यांवर होणाऱ्या अन्यायचे तर राहूच दे, कधी कधी तर स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं सुद्धा धाडस होतं नाही माझे.
मानलं पण पोरीला!
तशी तिला मादितीची गरज नाहीये. लढलीये ती एकटीच!
गरज तर आपल्यालाच, .. कि म्हणू?
….मलाच आहे !
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 11, 2012 at 2:12 pm
“निर्बलसे लडाई बलवान की..ये कहानी है दिये की और तुफ़ानकी”….
आपल्या संकुचित जगाच्या बाहेर घडणार्या या अशा गोष्टी आणि अशी उत्तुंग व्यक्तिमत्वे बघीतली की आपल्या खुजेपणाची जाणिव होत राहते. ’मलाला’ तुझ्या धैर्याला सलाम !
Aparna
ऑक्टोबर 11, 2012 at 10:07 pm
मला डॉक्टर व्हायचंय हे सांगताना रडतानाची ती आणि मग हॉस्पिटलमध्ये झुंजणारी ती अशी दोन्ही रुपे काल बातम्यांमध्ये पाहिली आणि पुन्हा एकदा स्वतःच्या स्त्री असण्याचं सत्य डोळ्यासमोर आलं…
I am so proud of you Malala….and you can show the world what woman power is…..
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 11, 2012 at 10:46 pm
अर्धी लाकडं स्मशानात गेलेल्या बच्चनला आज किमान लाखभर जणांनी शुभेच्छा दिल्या असतील, पण अजुन धडपणे आयुष्याची सुरूवातही न झालेल्या त्या लेकरासाठी किती जणांनी दुवा मागितली असेल कोण जाणे? 😦
अभिषेक
ऑक्टोबर 11, 2012 at 11:29 pm
विशालदा, अरे फक्त १४ वर्ष! प्रचंड कौतुक… आणि खूप साऱ्या शुभेच्छा…
Saurabh
ऑक्टोबर 12, 2012 at 9:23 सकाळी
wahh wahh… gr8 write-up
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 12, 2012 at 9:48 सकाळी
Thanks Saurabh !
सुहास
ऑक्टोबर 12, 2012 at 10:55 सकाळी
ओह्ह्ह….. ह्या पोरीच्या जिद्दीला सलाम आणि ह्या कॉर्पोरेट लाईफमध्ये अडकलेल्या मला अश्या जळजळीत सत्याची माहिती दिल्याबद्दल विशालभाऊ आभार… काय बोलावं सुचत नाही. आपल्या इथे इतके प्रॉब्लेम आहे. सरकार आणि पूर्ण यंत्रणा दिवसेंदिवस आपले रक्त पीत आहेत आणि आपण पिऊ देतोय…. काय झालंय आपल्याला? आपल्यात कशी निर्माण होईल अशी आग? जिद्द… कधी? 😦 😦
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 12, 2012 at 2:15 pm
देव जाणे 😦
jaywant..jayu
ऑक्टोबर 12, 2012 at 12:59 pm
kharokhar shabadd kami padatil tichya stuteela……ishwar tila nahi tar prattekala ashech dhadas ;dheirya”’himmat…dewo hich prarthana….aayushman bahwo
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 12, 2012 at 2:15 pm
धन्यवाद जयवंतजी !
Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar
ऑक्टोबर 13, 2012 at 4:40 pm
काल tv वर मलाला यूसुफजई ची मुलाखत पाहीली….अणि तिच्या हिम्मतीला, तीच्या नजरे समोर असलेल्या ध्येयाला साष्टांग दंडवत घातला……अवघ्या १४ वर्ष वयाची….. प्रेम कविता गाणी सिनेमा च्या स्वप्नमय जीवनात जगण्याच , धिंगाणा मस्ती करण्याच वय असतान
ा ती चक्क राजकारणात जाऊन देशाची पंतप्रधान होण्याचे स्वप्न नव्हे ध्येय आपल्या समोर आहे हे खणखणीत पणे सांगते…….आपण राजकारणात आलो तरच आपल्या देशाची परिस्थिती सुधारू शकतो आणि मुलींच्या शिक्षणा करता काम करू शकतो या वर तीचा ठाम विश्वास आहे…..आपल्या कडील तरुण तरुणींच्या राजकारणा पासून दूर पळण्याच्या पार्श्वभूमीवर या बंदुकीच्या तोफेच्या गोळ्यांच्या आवाजातच जीवन जगणाऱ्या मलाल च्या रोखठोक विचारांचे कौतुक वाटते……. कदाचित या युद्धमय वातावरणा मुळे ती अधिक शक्तिशाली काटक झाली असावी….ज्या पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानच्या स्वात अफगाण खोऱ्यात दहशदवाद जोपासला तेच देश आता मलाला यूसुफजई वरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करत नार्काश्रू ढाळत आहेत………ती लवकर बरी व्हावी या साठी ईश्वर , अल्लाह कडे प्रार्थना
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 15, 2012 at 11:15 सकाळी
अगदी, अगदी माझ्या मनातलं बोललात परभणीकर ! मागे एकदा ’आदरणीय एसेम जोशी’ यांचं एक भाषण वाचलं होतं, त्यात एसेम म्हणाले होते ’आजकालची तरुण पोरं जेव्हा राजकारनात पडु का म्हणुन विचारतात तेव्हा मला खुप वाईट वाटते. अरे राजकारणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात शिरताना देखील ’पडायची’ मनोवृत्ती का? , राजकारणात ’पडायची’ नचे तर ’उडी मारायची’ तयारी ठेवा.”
मुद्दा हाच की आपल्याकडे का कोण जाणे पण जनसामान्यात ’राजकारण’हे आपले काम नव्हे! हीच वृत्ती प्रकर्षाने जपण्याची मनोवृत्ती दिसते. राजकारण हा समाजकारण करण्याचा सर्वात महत्वाचा आनि अधिकृत मार्ग आहे, जो तुम्हाला केवळ कर्तव्यभावनाच नव्हे तर त्याबरोबर अधिकारही मिळवून देतो हे कोणी लक्षातच घेत नाही. त्या पार्श्वभुमीवर ’मलालाची’ ही विजिगिषू वृत्ती खरोखर मान तुकवायला लावते. धन्यवाद !