RSS

जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन : कविवर्य केशवसुत

07 ऑक्टोबर

“जुने जाऊ द्या मरणालागुनी” असे म्हणत मराठी कवितेच्या इतिहासात एक क्रांतिकारक पर्व उभे करणार्‍या, एकंदरीतच कवितेचा आशय, अभिव्यक्ती यामध्ये परिवर्तन घडवून आणणार्‍या ‘कृष्णाजी केशव दामले’ उर्फ ‘केशवसुत’ यांची आज जयंती !


७ ऑक्टोबर १८६६ रोजी कोकणातल्या मालगुंड येथे जन्मलेल्या या युगप्रवर्तक कविने मराठी कवितेला एक नवे रुपडे मिळवुन दिले. तोपर्यंत पुराण, अध्यात्म, ऐतिहासिक कथा-कल्पना यात अडकून पडलेल्या मराठी कवितेला केशवसुतांनी सर्वप्रथम सर्वसामान्य मानवी भाव्-भावनांचे अधिष्ठान दिले. वास्तव कविता नामक सामाजिक भान असलेला काव्यप्रकार केशवसुतांनी जनसामान्यात लोकप्रियच नव्हे तर अध्यारुढ केला. इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.

तत्कालीन सामाजिक विषय, मानवता, उदारमतवाद, राष्ट्रीयता, निसर्ग अशा अनेक भावनांना त्यांच्या कवितेत मानाचे स्थान मिळाले. त्या काळात हे विषय कवितेतुन खुप कमी प्रमाणात वापरले जात असल्याने केशवसुतांनी जरी खुप कमी कविता लिहीलेल्या (साधारणतः १३५ फक्त) असल्या तरी त्यांची कविता ही क्रांतिकारक ठरली. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. त्यांची ‘तुतारी’ ही कविता विशेष उल्लेखीली आणि अभ्यासली गेली.

मालगुंड येथील केशवसुतांचे राहते घर आता त्यांच्या स्मारकात रुपांतरीत करण्यात आले आहे. इथे केशवसुतांच्या गाजलेल्या कविता संगमरवरावर कोरून जिवंत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या वापरातील अनेक वस्तूंच्या साह्याने, तसेच अनेक दुर्मिळ फ़ोटो वापरून या स्मारकाचे निर्माण करण्यात आले आहे.

केशवसुत स्मारक, मालगुंड

केशवसुत स्मारक, मालगुंड

तुतारी – केशवसुत

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

अशा या युगप्रवर्तक कविवर्यांना त्यांच्या जन्मदिनादिवशी सादर अभिवादन.

माहिती आणि छायाचित्रे आंतरजालावरून (मनसे.ऑर्ग) साभार !

विशाल कुलकर्णी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: