RSS

एखादा दिवसच मोठा गोड असतो….

16 सप्टेंबर

काल काही कामानिमीत्त नाशिकला एकदिवसाचा धावता दौरा झाला. सौभाग्यवतींच्या लघु उद्योगासाठी काही खरेदी करायची होती. शुक्रवारी दुपारी अचानक जायचे ठरले. नाशिकला जातोय हे कळताच लगेच सासुबाईंचा फोन आला लेकीला. अधिकाचा महिना चालु आहे, अनायासे जातीच आहेस नाशिकला तर रामाचं आणि गंगामाईचं दर्शन घेवुनच घ्या. मग तर काय? कुलकर्णीबाई अजुनच उत्साहाने तयार झाल्या. शुक्रवारी रात्री ११ च्या नाशिक गाडीने निघालो. सौ.च्या बहिणीचे एक चुलत दीर नाशिकमध्ये राहायला असतात. सौ. रुपालीने (आमची मेव्हणी) लगेच आमच्या कलत्राला सांगितले की सकाळी उतरल्यावर हक्काने थेट राजनदादांकडेच जा. मला टेन्शन… !

मी आतापर्यंत राजनदादा या सदगृहस्थाबद्दल फक्त याच्या-त्याच्या कडून तोंडी ऐकलेले.लग्नानंतर गेल्या सात वर्षात एकदाही प्रत्यक्ष भेटीचा योग नव्हता आलेला. आणि जी काही ऐकीव माहिती होती ती फार कही उत्साहजनक वगैरे नव्हती.

“प्रचंड चिकट माणुस आहे. नको तितकी काटकसर करायची सवय. कुणाला लावून घ्यायला नको काही नको. तासभर समोर बसुन राहीलात तर तोंड उघडेल याची शाश्वती नाही.”

अशी अतिशय उत्साहजनक (?) माहिती कानावर आलेली आतापर्यंत आणि तशात सौंच्या लाडक्या बहिणाबाईची आर्जवाची सुचना. राजनदादांकडेच जा ! कसं असतं ना बघा, मी त्यांना या आधी कधीही भेटलेलो नव्हतो. बघितल्याचेही आठवत नव्हते. कुणाच्या लग्नात-मुंजीत पाहीले असले तरी नक्की चेहरा डोळ्यासमोर येत नव्हता. पण तरीही का कुणास ठाऊक रुपालीकडून त्यांचं नाव ऐकल्यावर नकळतच माझ्या कपाळावर एक आठी उमटली असावी बहुदा. रुपालीने अगदी हळुच ‘विशु प्लीज, प्रसादसाठी म्हणून जा हवा तर” असं सांगितलं. प्रसाद उर्फ पशा म्हणजे रुपालीचा नवरा. पण त्याहीपेक्षा माझ्यासाठी पशा महत्त्वाचा आहे तो एक अतिशय जवळचा, कुठल्याही प्रसंगात खात्रीने ज्याच्यावर विसंबता येइल असा एक जवळचा मित्र म्हणून. राजनदादा म्हणजे पशाचे चुलतभाऊ. त्यामुळे आता मनात असो वा नसो, त्यांच्या घरी जाणे आले.  खरे तर मी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. पण एखाद्या व्यक्तीबद्दल अशा गोष्टी चार लोकांकडून ऐकल्या की आपोआपच आपण विश्वास ठेवुन टाकतो. मुळात मला कायम माणसे लागतात. मी माणसांत रमणारा प्राणी आहे. बघ इतर सुखसोयी नसल्या तरीही चालतेल. बरोबर गप्पा मारायला कोणीतरी असले की झाले. तरीही शेवटी केवळ पशासाठी म्हणून मी राजनदादांकडे जायला तयार झालो. पश्याने लगेचच त्यांना फोन केला.

“विशालचे काहीतरी काम आहे नाशकात. तो आणि दिपाली (आमच्या सौ.चे माहेरचे नाव) आपल्या घरी येतील. ते आज रात्री ११च्या गाडीने पुण्यातुन निघताहेत. तिथे पोचला की विशाल फोन करेल, त्याला पत्ता नीट सांग म्हणजे घरी व्यवस्थीत येता येइल.” शेवटी राजनदादांना एक गोष्ट सांगितली माझ्याबद्दल पशाने “तो पण पश्याच आहे!” मी पश्याकडे विचित्र नजरेने बघीतलं, पश्या माझ्याकडं बघून नुसताच हसला.

दुसर्‍या दिवशी पहाटेच ५ वाजता गाडी नाशकात पोहोचली. नाशिकच्या नव्या सीबीएसला उतरलो. घड्याळात पहाटेचे पाच वाजत आलेले. एवढ्या पहाटे राजनदादांना फोन करून उठवायचे माझ्या जिवावर आले. एकतर त्यांच्या विक्षिप्त स्वभावाबद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या, त्यात एवढ्या पहाटे त्यांना फोन करायचा म्हणजे…

मी पत्नीला म्हणालो ,”आपण सरळ थोडा वेळ थांबुयात इथेच. जरा उजाडले की रिक्षा करुन जावुयात. आत्ता लगेच जायचे म्हणजे रिक्षावाले अव्वाच्या सव्वा दर सांगणार. त्यात इतक्या पहाटे दादांना फोन करुन त्यांची झोपमोड करणे मला तरी रास्त वाटत नाहीये. थोड्या वेळाने सहाच्या दरम्यान रिक्षा करुन रवीवार कारंज्यापर्यंत जावुयात. तिथुन फोन करु. तोपर्यंत बर्‍यापैकी उजाडलेलेही असते, म्हणजे त्यांची झोपमोडही होणार नाही. ” अर्थातच तिलाही ते पटले आणि आम्ही तिथेच स्टॅंडवर एका ठिकाणी टेकलो.

पाचच मिनीटे झाली नसतील टेकुन तोवर सायलीने एका व्यक्तीकडे निर्देश करत मला खुणावले..

“विशु, राजनदादा !” अस्मादिक शॉक्ड….

तोवर दादांनीही तिला पाहिले होतेच. माझी जरी त्यांच्याशी भेट नसली तरी दादा सायलीला ओळखत होते. (प्रसाद उर्फ पश्या हा आमच्या सौच्या सख्ख्या आत्याचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्याकडची मंडळी आमच्या सौ.कडच्या सर्वांना ओळखतात) दादा आमच्याकडे आले. मी नकळत दोन्ही हात जोडून नमस्कार केला. दादांनीही प्रसन्नपणे हासत हात जोडले.

” तुम्ही अकरा वाजता पुण्यातुन निघालात म्हणजे ४.३०- ५ वाजेपर्यंत इथे पोचणार. अशावेळी म्हणजे पहाटेच्या वेळी रिक्षावाले काय वाट्टेल ते दर सांगतात. म्हणून मग मीच आलो स्कुटर घेवुन तुम्हाला घ्यायला.चला…” बोलत बोलत त्यांनी सायलीच्या हातातली बॅग घेतली आणि आम्ही निघालो…! मला प्रचंड संकोचल्यासारखे झाले होते.

“दादा, अहो थोडा वेळ थांबून आलो असतो ना आम्ही. तुम्ही कशाला विनाकारण त्रास घेतलात.”

“अरे त्रास कसला आलाय त्यात? काकु (प्रसादच्या कै.आई) तुला आपल्या मुलासारखेच मानायची म्हणजे मग तू माझापण धाकटा भाऊच झालास ना? मग त्यात कसला आलाय त्रास?”

कुठलाही अभिनिवेष, कुठलीही औपचारिकता न बाळगता अगदी वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखत असल्याप्रमाणे दादा अगदी सहज एकेरीवर आले होते. ही गोष्ट मला प्रचंड सुखावून गेली. क्षणात सगळे किंतु मिटले आणि दादांच्या स्कुटरवर पुढे दादा, मध्ये सायली आणि मागे मी असे ट्रिपल सीट बसून आम्ही घरी पोचलो. माझ्या मनात विचारांचे कल्लोळ उठलेले. किती मुर्ख असतो ना आपण. एखाद्या व्यक्तीला न भेटता, न ओळखता उगीचच ऐकीव गोष्टींवरून आपण त्याच्याबद्दल नाही नाही त्या कल्पना करुन घेतो. आता हेच बघा ना, दहा मिनीटापुर्वी माझ्या मनात दादांबद्दल एक वेगळीच परकेपणाची, अलिप्तपणाची भावना होती आणि आता मात्र ते मला माझ्या सख्ख्या मोठ्या भावाप्रमाणे जवळचे वाटायला लागले होते. स्वतःचीच खुप शरम वाटायला लागली होती. आपल्याकडून इतकी मोठी चुक झालीच कशी? घरापाशी पोचल्यावर दादांनी बिल्डिंगच्या पार्कींगमध्ये आपली स्कुटर स्टँडला लावली. आता मात्र मला राहावले नाही…, मी नकळता बोलून गेलो.

“सॉरी दादा !”

जणु काही त्यामागची भावना कळल्यासारखे दादा हसले आणि म्हणाले…

“मला माहितीये तू सॉरी कशासाठी म्हणतोयस ते. पण त्यात चुक काहीच नाहीये. तू जसे ऐकले आहेस तसाच आहे मी.”

मी स्टन्ड होवुन त्यांच्याकडे बघायला लागलो. हा माणुस मनकवडापण आहे की काय?

” म्हणजे मला माणसात मिसळायला आवडत नाही असे नाहीये रे. पण तुला माहितीय, आपले चार नातेवाईक एकत्र आले की पहिल्या इकडच्या तिकडच्या गोष्टी संपल्या मग एकमेकाच्या उखाळ्या-पाखाळ्या चालु होतात. बरं समोरचा माणुस आपल्याला जवळचा समजुन बोलत असतो. त्यामुळे ते आवडत नसले तरी ऐकावे लागते, जे मला मुळीच आवडत नाही. त्यामुळे मी शक्यतो अलिप्तच राहतो. आता आपल्या लोकांना तो माझा शिष्ठपणा वाटतो, विक्षिप्तपणा वाटतो…पण वाटो. आता तुझ्याबाबतीत म्हणशील तर तुला यापुर्वी एकदाही भेटलेलो नसताना मी माझ्या स्वभावाल मुरड घातली कारण काल पश्याने फोनवर सांगितले होते “तो पण दुसरा पश्याच आहे.” तेव्हाच मनाशी ठरवले होते की या माणसाशी आपला इम्पेडन्स मॅच होणार आणि तो झाला. बरोबर ना!”

दादा अगदी मिस्किलपणे हसले, तसा मी ही मोकळा होत अगदी अक्षरशः कोपरापासुन हात जोडले. तसे दादा अजुनच खदखदुन हसायला लागले,

“चला म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर, आणि पश्याचे वाक्यही योग्यच होते. तू दुसरा पश्याच आहेस. आपले नक्कीच जमेल.”

केवढी सुंदर सुरुवात होती दिवसाची. एका अतिशय मनस्वी, तरीही विलक्षण गोड माणसाची अगदी पहाटे पहाटे ओळख झाली होती, जी मला जन्मभर पुरणार होती. गंमत म्हणजे वहिनीचा स्वभाव दादाच्या स्वभावापेक्षा एकदम टोकाचा. (कुठल्यातरी सुंदर क्षणी मी ही सगळ्या औपचारिकता सोडून नकळत एकेरीवर आलो होतो, अहो दादाचे ‘ए’ दादा कधी झाले माझे मलाच कळले नाही. वहिनीला कायम आजुबाजुला माणसे लागतात, माझ्यासारखेच. नवर्‍याचा स्वभाव चांगलाच माहीत असल्याने बहुतेक ती कमी वहिनी भरुन काढत असावी. मी आयुष्यात प्रथमच या गोड दांपत्याला भेटत होतो पण काही क्षणातच मी त्यांचा ‘विशु’ होवून गेलो होतो. आजचा दिवस खरोखर खुप छान जाणार होता.

क्रमश: 😀

विशाल…

 

12 responses to “एखादा दिवसच मोठा गोड असतो….

 1. सागर भंडारे

  सप्टेंबर 16, 2012 at 3:22 pm

  विशालभाऊ पुढचा भाग कधी? नाशिक मला अगदी पुण्याइतकेच माहिती आहे 😉 तेव्हा या अनुभव मालिकेवर बारीक लक्ष आहे. रविवार कारंजा सुखावून गेला. त्याच्या जवळच असलेल्या मेन रोडवर तुफान खरेदी केली असशील मग तू 🙂

   
 2. Rajesh Shelar

  सप्टेंबर 16, 2012 at 5:50 pm

  Khup good anubhav… 🙂

   
 3. Swapnil

  सप्टेंबर 16, 2012 at 6:15 pm

  mast..

   
 4. vinita123

  सप्टेंबर 17, 2012 at 10:58 सकाळी

  मेनरोडला शालीमार म्हणून एक पावभाजी सेंटर आहे. नासिकचे फेमस!!
  तसे नासिकच फेमस आहे म्हणा, अस्मादिक तिथलेच ना 😀
  मजा करा, नदीकाठच्या देवीला जरुर जा. तिला सान्द्व्या वरची देवी म्हणतात.
  खुप प्रसन्न भाव आहेत तिच्या चेहऱ्यावर 🙂

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 17, 2012 at 11:08 सकाळी

   धन्यवाद विनीता ! मी आलो कालच परत 🙂
   पण छान अनुभव होता, अजुनही लिहीन लवकरच !

    
 5. Vinita

  सप्टेंबर 17, 2012 at 12:04 pm

  नंतर कधी जा!
  आता दादा आहेतच तिथे 🙂

   
 6. inigoy

  सप्टेंबर 26, 2012 at 10:55 सकाळी

  माणसं खरंच खूप सरप्रायझिंग असतात. तीच माणसंही नवनवा अनुभव देऊन जातात कैक वेळा.

  (फक्त .. “खरे तर मी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. पण एखाद्या व्यक्तीबद्दल अशा गोष्टी चार लोकांकडून ऐकल्या की आपोआपच आपण विश्वास ठेवुन टाकतो.” ही वाक्यं परस्पर विसंगत वाटली जरा..)

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 26, 2012 at 10:59 सकाळी

   योगिनी, मी सहमत आहे. पण प्रत्यक्ष अनुभवावरून पाहायला गेले तर अशा विसंगती आयुष्यात असतातच. पटो अथवा न पटो, आपल्याला कुठल्यातरी पातळीवर काही अंशी का होइना पण सहमत व्हावेच लागते. 🙂
   धन्स !!

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: