दिवस कसे सर-सर निघून जातात. गणपती आले की जुन्या आठवणी मनाशी फ़ेर धरायला लागतात…
मला आठवते मी सातवी-आठवीत असताना बहुतेक पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला होता आम्ही. दौंडला एस.आर.पी. कँपातल्या पोलीस चाळीत (तिथे त्याला लाईन म्हटले जाते. जुनी लाईन आणि नवी लाईन असे दोन प्रकार आहेत)नव्या लायनीत राहायला होतो आम्ही. नव्या लायनीतल्या ‘पोलीस वायरलेस कॉलनीत’ आमचे घर होते. सगली मिळून १६ घरे. आम्ही पोरा-पोरांनी गणेशोत्सव करायचे ठरवले. १६ घरात फिरून वट्ट ९४ रुपये वर्गणी जमा केली. आमच्या घराच्या व्हराड्यातच नव्या लायनीच्या पहिल्या श्रीगणेशोत्सवाची स्थापना झाली. २१ रुपयांची ‘श्रीमुर्ती’ आणि ४० रुपयांचे डेकोरेशन. आकशी निळ्या रंगाची, नृत्यमुद्रेतली छोटीशीच पण सुंदर मुर्ती होती. त्यातही मंडपासाठी म्हणून चाळीतल्या काकु कंपनीने आपल्या नव्या साड्या दिलेल्या. ६X१० च्या व्हरांड्यात एक खाट आडवी टाकून त्यावर आमचा मंडप सजला. रोजच्या नैवैद्याची जबाबदारी चाळीतल्या काकालोकांनी रोज एकाने अशी उचलली होती. त्यातुनही एक दिवस आश्चर्याचा धक्का दिला काकालोकांनी. तुम्ही काही तरी स्पर्धा वगैरे घ्या, बक्षीसाचे आम्ही बघतो. मग काय धमालच धमाल. चित्रकला, बुद्धीबळं, लिंबु चमचा, प्रश्न मंजुषा अशी स्पर्धांची मजाच मजा झाली. नव्या लायनीतला हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने काकालोकांनी ऑफीसात कल्पना दिली होतीच. मग एक दिवस चाळीतल्याच भजनीमंडळाचे भजन झाले.
दुसर्या दिवशी विसर्जन असल्याने आम्ही एखादी हातगाडी मिळते का ते शोधत होतो मिरवणुकीसाठी. आधीच्या वर्गणीतले शिल्लक चाळीसेक रुपये आणि नंतर काकालोकांनी स्वेच्छेने दिलेले पन्नास रुपये असा वट्ट नव्वद रुपयांचा माल शिल्लक होता. त्यात चाळीस रुपये हातगाडीवाल्याला देवुन राहीलेल्या पैश्यात वादक (एक ढोल आणि बाकीचे टाळ-चिपळ्यावाले) बोलवायचे ठरले. पण त्या दिवशी चक्क एस.आर.पी.एफ. गृप ५ चे तत्कालीन कमांडंट श्री. पारधीसाहेब श्रींच्या दर्शनाला आले आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. पारधीसाहेबांनी मनापासून कौतुक तर केलेच पण मिरवणुकीसाठी गृपचे एक वाहन (जीप) आणि एस.आर.पी. गृप ५ चे खास वाद्यपथकही देवु केले. अवघ्या ९४ रुपयात साजर्या झालेल्या आमच्या गणेशोत्सवाची मिरवणूक मात्र खास सजवलेल्या जीपमधून जवळ-जवळ ३६ गणवेशधारी वादकांच्या पथकासमवेत मोठ्या जोशात आणि जल्लोषात निघाली. सुदैवाची गोष्ट म्हणजे त्यानंतर आमचा गणेशोत्सव आजतागायत मोठ्या जोशात सुरू आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आजही आमची आठवण ठेवली गेलीय. १९८६-८७ मध्ये आम्ही सुरुवात केली. पण आज देखील प्रत्येक वर्षी आम्हाला या गणेशोत्सवासाठी मानाचे निमंत्रण असते. त्यावेळी आम्ही सुरु केलेल्या लायनीच्या गणेशोत्सवाला आज खुप मोठे स्वरुप आलेय.
अर्थात पुलाखालुन खुप पाणी वाहून गेलय. आता वर्गणी फक्त लायनीपुरती मर्यादित राहीलेली नाहीये. त्या संपुर्ण भागातुन वर्गणी गोळा केली जाते. अक्षरशः काही लाखात वर्गणी गोळा होते. मोठ मोठे कार्यक्रम होतात. दोन वर्षांपुर्वी गेलो होतो आम्ही दोघेही. प्रचंड मोठा मंडप होता, सगळीकडे लायटींग, लांबपर्यंत रस्त्यावर बांधलेल्या कमानी, भरजरी कपड्यांची सजावट. आम्हा दोघांचेही खुप आनंदाने स्वागत झाले. दोन दिवस राहीलो, काही जुने मित्रही भेटले. मजा आली. शेवटी निघताना ‘विन्या’ (विनायक मोहिते) म्हणाला,
“विश्या, आपला गणेशोत्सव खुप मोठा झाला रे. पण लहान होता तोपर्यंत बाप्पांबरोबर आपण सगळे असायचो. आज बघ, बाप्पा एकटेच बसलेत मंडपात.”
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. कांबळेकाकांनी पाठीवर हलकेच थोपटले,
“चालायचेच विशु, म्हणतात ना ‘कालाय तस्मैं नमः ’!”
खरय काका…
आता श्रद्धा, भक्ती याला दुय्यम स्थान आलेय. मुंबईत तर गणपतीच्या मुर्तीचा आकार, दर्शनाला लागणार्या काही किलोमिटरच्या रांगा, भाविकांनी अर्पण केलेले दागिने यावरुन गणपतीचे मोठेपण ठरते आज 😦
विशाल…
vinita123
सप्टेंबर 11, 2012 at 1:22 pm
काय रे विशाल
पानी काढलेस डोळ्यातून!
माझा पण अनुभव असाच काहीसा! माहेरी १० दिवसाचा गणपति असतो आणि सासरी बसवत नाहीत, धार्जिन नाही म्हणे.
काय करणार, नाईलाज 😦
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 11, 2012 at 2:07 pm
विनिता, खुप त्रास होतो असं काही बघताना. पण आपण काहीही करु शकत नाही. आमच्या घरी सोलापूरला असतात गणपती दहा दिवस !
मग मी इथे पुण्यात दिड दिवसाचे गणपती बसवतो. दुसया दिवशी विसर्जन करुन सोलापूर गाठतो. मग गौरी करुन मी परत येतो, बायको विसर्जनापर्यंत थांबते.
अभिषेक
सप्टेंबर 11, 2012 at 1:37 pm
वाह रे विशालदा! गणेशोत्सव म्हणजे ‘तुमको भूल ना पायेंगे’ असत…. अगदी!
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 11, 2012 at 2:04 pm
अगदी अगदी रे अभि 🙂
मनातलं बोललास…
Prashant Panditrao Jadhav
सप्टेंबर 12, 2012 at 3:09 pm
फारच छान लेख…. वाचुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या….
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 12, 2012 at 3:22 pm
मन:पूर्वक आभार प्रशांतजी ! ’ऐसी अक्षरे मेळविन!’ वर आपले स्वागत आहे !!