श्शी ssssssss
श्श्या ssssssssss
हम्म्म…
ह्म्म्म्म्….
जाम कंटाळा आलाय आता…
मलाही…तू काय ठरवलयस?
कशाबद्दल?
कशाबद्दल म्हणजे काय? तुझं लक्ष कुठेय?
का?
तू बोलणार आहेस की नाही?
बोलतोच तर आहे…
माझ्याशी नाही म्हणत आहे मी…
मग काय तिच्याशी बोलू?
त्याने जरा अंतर राखून बसलेल्या, बर्याच वेळापासून आजुबाजुच्या गर्दीची पर्वा न करता आपल्याच चाळ्यात दंगलेल्या त्या जोडप्यातील ‘ती’च्याकडे बोट दाखवत मिश्किल स्वरात विचारलं.
भंकस नकोय हा. मी थट्टेच्या मुडमध्ये अजिबात नाहीये.
ती त्याच्या थंडपणामुळे आता हळुहळु उखडायला लागलेली. त्याचं आपलं आकाशाकडे बघत तारे मोजणं सुरू…
किती आहेत रे?
आईच्या चेहर्यावरील सुरकुत्या आणि बापाच्या कपाळावरील आठ्यांपेक्षा थोडे कमीच असावेत.
ती एक थंड सुस्कारा सोडते.
आलास पुन्हा फिरून तिथेच?
कुठे जाणार? सांग ना, कुठे जाणार? आपण मध्यमवर्गीय माणसं कायम या वर्तुळातच फिरत राहणार गं. या फिरण्याला शेवट आहे का? मुळात वर्तुळालाच अंत नाही. इथे फक्त फिरत राहायचं. कधी थकवा जाणवलाच तर थोडावेळ बसायचं…
जसं आपण बसतो नेहमी इथे येवून? आकाशातले तारे मोजत नाहीतर त्या समोरच्या तळ्यात दगड फेकुन त्या दगडाचे पाण्यावर तीनच का टप्पे पडतात. चौथा, पाचवा कधीच का पडत नाही याचा विचार करत….
तो कसनुसा होत हासतो. खिश्यातला रुमाल काढून त्याच्या घड्या चेक करतो. त्यापैकी त्यातल्या त्यात स्वच्छ असलेली बाजु शोधून कपाळावर न आलेला घाम आणि मानेवरचा चिकटपणा खरडून काढायचा प्रयत्न करतो. तिला माहीती आहे, ही त्याची नेहमीची युक्ती आहे. तिच्या प्रश्नाचं उत्तर टाळण्याची…. तीला पक्कं माहिती आहे, तिच्या प्रश्नाचं उत्तर टाळायचा त्याचा हेतु अजिबात नसतो. पण त्याच्याकडे तीच्या प्रश्नाचं उत्तरच नसेल तरे तो तरी बापडा काय करणार? तीचे आणि त्याचे दोघांचेही प्रश्न असेच असतात. कुरोसावाच्या राशोमानसारखे….
म्हटलं तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. पण म्हटलं तर ते योग्य असेलच, योग्य ठरेलच याची खात्री नाही. पण तीचा आशावाद प्रबळ आहे. ती प्रयत्न करणे सोडत नाही.
तसं तर हे रोजचंच झालय. संध्याकाळी ऑफीस सुटलं की ती इथे येवुन बसते. थोड्या वेळात तोही येवून तीला जॉइन होतो. फारसं बोलणं होत नाहीच. तेच ते तारे मोजणं, नाहीतर तळ्याच्या शांत पाण्यावर दगड भिरकावून तयार होणार्या लहरी मोजायचा प्रयत्न करणं…..
निघूयात?
ह्म्म्म्म
तो उठतो, नाईलाजाने ती ही …!
मग… ?
मग काय
काय..काय? तू बोलणार आहेस की नाही?
बोलेन गं..
गेले सहा महिने तू मला हेच सांगतोयस….
बोलतो लवकरच…
लवकर बोल नाहीतर, कदाचित खुप उशीर होइल रे….
तो तिच्याकडे बघत केविलवाणा होत हसतो आणि तळ्याकाठच्या त्या मातीतून, प्रचंड थकल्यासारखा कसातरी पाय ओढत पुढे निघतो, त्याच्यामागे तीही.
***************************************************************************************************************************************************************************
आज बरोबर सहा महिने, १८ दिवस आणि १६ तास झालेत, कदाचित… ३७ मिनीटे… तीची पहिली भेट झाली त्या क्षणाला. पण काय फरक पडतो? आजकाल ती सारखीच मागे लागते…
मला पण नाही आवडत तिला असं टांगणीला लावून ठेवणं. पण मी तरी काय करू?
काय विचारू बाबांना आणि कसं विचारू?
मुळात त्यांना काही विचारायला ते भेटायला तरी हवेत. गेल्या कित्येक दिवसात माझीच भेट नाही त्यांच्याशी. खरंतर बाबा असे कधीच नव्हते. पण बाबा असे नव्हते म्हणजे नक्की कसे नव्हते? मी कधी एवढा जवळ आलोच नाही बाबांच्या की ते कसे आहेत हे कळावे. आधीच त्यांचा अबोल स्वभाव, त्यात सेल्समनची नोकरी. सकाळी मी उठायच्या आत घराबाहेर पडायचे, जेव्हा परतायचे तेव्हा मी झोपलेलो असायचो. कधी-कधी अर्धजागृतावस्थेत त्यांच्या खरखरीत हातांचा मायाळू स्पर्श जाणवायचा पण तेवढंच.
मुळात मी आईच्या तरी जवळ कधी होतो फारसा. आई कायम तिच्या कसल्या-कसल्या अनुष्ठानांमध्ये गुंतलेली. सकाळी शाळेत जाताना काकु डबा करुन द्यायच्या, संध्याकाळी शाळेतुन घरी आल्यावर त्यांच्याच हातचे जेवून मी झोपायचा. खुप जीव त्यांचा माझ्यावर. तसं तर त्याही निराधार होत्या. बाबांवर मोठ्या बहिणीप्रमाणे जीव त्यांचा. पण मी इतक्या वेळा रडारड करुनही त्या कधीच मुक्कामाला राहील्या नाहीत की बाबांनी कित्येकदा विनवूनही कायमच्या घरी राहायला आल्या नाहीत.
तीन महिन्यांपूर्वी आईचं तसं झालं आणि खरेतर त्यानंतर त्यांची इतकी गरज असतानाही बाबांनी सविताकाकुंना निरोप दिला. तो दिवस मला अजुनही आठवतो….
बाबा आणि काकु बोलत होते…..
“खरेतर तुम्हाला जा म्हणताना जीवावर येतेय ताई पण….”
“मला पण सोडवत नाहीये दादा. पण कधी ना कधी ही वेळ येणारच होती. तरीही बाई आजारी असताना तुम्ही मला जायला सांगताय हे काही कळत नाही. त्यांचे तुम्ही सर्व व्यवस्थीत करालच, पण त्याचं काय? त्याच्याकडे लक्ष देणं होणार आहे का तुम्हाला? तुमची नोकरी, बाईंची सुश्रुषा दोन्ही कसे काय साधणार आहात?”
“मी नोकरी सोडलीय ताई. आता पुर्ण वेळ तिच्या सुश्रुषेसाठी द्यायचे ठरवलेय. त्याचं काय? आता काही लहान राहीलेला नाहीये तो. चांगला २६ वर्षाचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे खंबीर आहे. बघेल त्याचे तो.”
काकुंनी एक सुस्कारा सोडला…
कदाचित मीदेखील !
दुसरं काय करु शकत होतो म्हणा. पण त्यानंतर मात्र बाबांचं रुटीनच बदलून गेलं. तसे आधीही ते घराबाहेरच असायचे नोकरीच्या निमित्ताने. आताही त्यांचे बाहेरचे वास्तव्य वाढले. कुठे कुठे फ़िरले असतील बाबा गेल्या काही महिन्यात? आईवर उपचार करण्यासाठी म्हणून कुठकुठली ठिकाणे त्यांनी पालथी घातलीत ते ते स्वत: आणि दुसरे तो आकाशातला देवच जाणे? बाहेरुन परत आले की ती रात्र (बाबा बहुदा रात्रीच परत येतात) आणि पुढचा संपुर्ण दिवस आईच्या खोलीत बंद असतात. दुसर्या दिवशी संध्याकाळी बाहेर पडतात तेव्हा अक्षरश: प्रचंड थकुन गेलेले असतात. त्यांना स्वतःच्या पायावर उभे देखील राहता येत नाही. पण तशा अवस्थेतही आईच्या खोलीला परत कुलुप लावायला मात्र विसरत नाहीत. (हे ही थोडं विचीत्रच वाटेल, पण गेल्या काही महिन्यात मी आईचा चेहराही बघीतलेला नाही)
अहो मुलगा आहे मी तिचा, मग मला देखील माझ्या आजारी आईला भेटायला बंदी का म्हणून?
कारकुनाची का होइना नोकरी आहे माझी, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न नाही पडला. पण एक गोष्ट मला आजही कळालेली नाहीये….
“बाबांनी नोकरी तर सोडली मग आईच्या आजारपणावरील उपचारांचा खर्च कसा काय करताहेत? परवा सहज म्हणून काही पैसे द्यायला गेलो तर केवढे बिथरले. नाहीच घेतले त्यांनी पैसे माझ्याकडून. म्हणाले… मी भागवेन ते सगळं. तू नकोस याच्यात पडू. त्यांचं एक वाक्य मात्र कोड्यात पाडतय मला..
“या असल्या कामासाठी तुझी मेहनतीची कमाई नको वाया जायला?”
“वाया जायला?” ….. वाया…?
माझ्या आईच्या उपचारांवर जर माझी कमाई खर्च होत असेल तर ती वाया कशी जाईल? खरेतर तो त्याचा अगदी सार्थ उपयोग असेल! पण म्हटलं ना, बाबा मला कधी समजलेच नाहीत. आयुष्यभर त्यांची अरेरावी, बेफ़िकीरी आणि संतापच सहन करत आलोय.
*************************************************************************************
मला आता खरेच काळजी वाटायला लागलीय..
तो आजकाल काही विचित्रच वागतोय. नाही… तसं ते नवीन नाहीये. रोज तळ्याकाठी भेटणं. काही न बोलता शुन्यात नजर लावून तळ्याच्या संथ पाण्यात दगडं भिरकावत राहणं हे जुनंच आहे. पण….
पण आजकाल तो काहीतरी विचित्र किंबहुना विक्षिप्तासारखा वागतोय. का कोण जाणे, पण आतुन प्रचंड खचल्यासारखा वाटतोय. बरं माझ्याशी काही बोलतही नाही. अरे ज्या काही समस्या आहेत त्या जर सांगितल्या नाहीत तर मला कळणार कशा? कालचाच प्रसंग घ्या. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे तळ्याकाठी भेटलो. मी ठरवलं होतं की आज तो विषय नाही काढायचा, तो दुखावेल असं काहीही करायचं , वागायचं नाही..पण…..
“ए, आईंची तब्येत कशी आहे रे?
कुणास ठाऊक?
कुणास ठाऊक? अरे तुझ्या आईबद्दल विचारतेय मी. आजारी आहेत ना त्या?
अं…., काय म्हणालीस? आजारी होतीस? दवाखान्यात जायचे ना मग. गेली होतीस का?
छप्पाक्क…
आज तर दोनच टप्पे पडले बघ. दिवसेंदिवस संख्या कमीच होत चालली आहे. मी कमजोर होतोय का?
त्याची नजर कुठेतरी शुन्यात लागलेली…
अरे मी माझ्याबद्दल नाही, तुझ्या आईबद्दल बोलतेय. आजारी आहेत ना त्या? कशी आहे त्यांची तब्येत? डॉक्टर काय म्हणतात?
अच्छा..आईबद्दल बोलते आहेस तर. तिला काय झालय? आजारीच तर आहे ती… आणि डॉक्टर कशाला काय म्हणतील? त्यांना माहितीच कुठे आहे तिच्या आजाराबद्दल?
क्षणभर मला काही कळेच ना. हा थट्टा तर करत नाहीये ना. किती असंबद्ध बोलत होता. पण त्याच्या एकंदर स्वभावावरुन तो चेष्टा करेलसेही वाटत नाही. शेजारची (ऑफीसमधली) टायपिस्ट नेहमी विचारतेय मला…
“काय बघीतलंस तू त्या मुखदुर्बळ रड्यात?”
खरेच काय बघीतले होते मी त्याच्यात. कशी काय प्रेमात पडले असेन मी त्याच्या. गेल्या सहा महिन्यात त्याला एकदाही हसताना बघीतलेलं नाही मी.
अरेच्च्या, मला पश्चाताप होतोय का त्याच्या प्रेमात पडल्याचा? नाही…. तसं नसेल ते
नक्की काय नातं आहे आमच्यात? प्रेम, अनुकंपा की निव्वळ सहानुभुती?
पण निव्वळ सहानुभूती असती तर माझी अशी घालमेल का व्हावी? तो येवो न येवो, बोलो न बोलो त्याला एकदा पाहता यावं म्हणून मी रोज धडपडत तळ्याकाठी का यावं?
त्याहीपेक्षा त्रासदायक गोष्ट म्हणजे जर त्याला माझ्याशी बोलायचच नसतं तर तो तरी का येतो तळ्याकाठी? रोजच्या रोज……?
*************************************************************************************
मला बाबांचं काही कळतच नाही आज काल.
नाही तसे ते विक्षीप्त आहेतच, पण आजकाल त्यांचा तिरसटपणा फ़ारच वाढलाय. कालचीच गोष्ट घ्या. मी त्यांना सहज विचारलं…
बाबा, तुमची धावपळ पाहतोय मी रोज.
नाईलाज आहे बाळा. प्राक्तन चुकत नाही रे बाबा कुणाला. माझे भोग आहेत …भोगतोय झालं.
बाबा, अहो ती जशी तुमची पत्नी आहे तशीच माझी आईदेखील आहे. थोडे कष्ट मी घेतले तिच्यासाठी तर कुठे बिघडलं? ऐका माझं, तुमची ही धावपळ बंद करा आता. मी देत जाईन महिन्याच्या महिन्याला पैसे आईच्या उपचारांसाठी. हवे तर अजुन एक पार्टटाईम नोकरी पकडतो मी. तुमची धावपळ, तुम्हाला होणारा त्रास नाही बघवत मला.
अरे मला कसला आलाय त्रास? ठणठणीत आहे मी अगदी!
कसले बोडक्याचे ठणठणीत बाबा. अहो डोळ्याखाली त्या काळ्या खुणा बघा जरा आरश्यात. परवापर्यंत एखाद्या मल्लासारखं दणदणीत असलेलं तुमचं शरीर, आज त्याची अवस्था काय झालीये? चक्क कंबरेत वाकला आहात तुम्ही. तेही अवघ्या ३-४ महिन्यात. ऐका माझं, मला पण थोडी मदत करु द्यात.
‘सांगितलं ना तुला एकदा ! अजिबात नाही म्हणजे नाही. पुन्हा जर असला हट्ट केलास तर तिला घेवून निघुन जाईन मी इथुन. समजलं?
अचानकच भडकले माझ्यावर.. मी अवाक !
“तसं नाही रे राजा, मला तुझी तळमळ कळत का नाही? पण खरं सांगु? कधी कधी वर्तुळाच्या बाहेर असलेलं बरं असतं. एकदा का तुम्ही त्या वर्तुळाच्या परिघाला चिकटलात की मग अव्याहतपणे त्याबरोबर फिरत राहता, इच्छा असो वा नसो ! एक सांगु तुला, ऐकशील या म्हातार्याचं?”
बोला ना बाबा, अहो तुम्ही सांगाल ते ऐकेन मी.
मला स्वतःचंच आश्चर्य वाटलं, माझ्या मनात बाबांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असा फारसा उरलेलाच नव्हता. केवळ आईबद्दल काही तरी वाटत असावं आत कुठेतरी, म्हणून…..
कुठेतरी शुन्यात नजर लावून बाबा बोलत होते….., माझ्याकडे लक्षच नव्हतं त्यांचं.
तू लग्न कर. सरळ एखादी दुसरी जागा बघ आणि तिकडे जाऊन सुखाने संसार कर. आता माझ्याबद्दल बोलशील तर हेच माझे प्राक्तन आहे. त्यातुन माझी सुटका नाही. मी हा असाच फिरत राहणार बहुदा, तेल मागत फिरणार्या अश्वत्थाम्यासारखा ! ती जर बरी होइल तेव्हाच माझी सुटका होइल यातून.
मला बाबा कधी कळालेच नाहीत. कुठे ते महिनो-महिने घरांपासुन दुर राहणारे बाबा, आईशी बोलायला देखील टाळणारे बाबा आणि कुठे हे आईला बरं करण्यासाठी धडपडणारे बाबा? पण माझी मदत का नकोय त्यांना? कुठल्या वर्तुळाबद्दल बोलताहेत ते. हे कोडं मात्र अजुनही उलगडत नाहीये. याचा शोध घ्यायलाच हवा. कदाचित काकुला माहीत असेल..
काकुशीच बोलायला हवं एकदा !
****************************************************************************************************
तू एवढासा होतास, तेव्हापासून तू माझ्याच कडेवर लहानाच मोठा झालायस. तुला खोटं वाटेल पण अगदी तान्हा होतास ना, तेव्हा तुला माझं दुध देखील पाजलय मी. लग्न झालेलं नव्हतं, पण प्रेमात पडण्याचा गुन्हा केला. आई-बापानी घराबाहेर काढलं. पण मी बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. पण माझं नशीबच खोटं. छातीला दुध तर होतं पण बाळच मृत जन्माला आलं.
काकु….
मला बोलु दे आधी. कधी बोलले नाही कुणाकडे. आता सगळा कढ निघतोय बाहेर तर निघु दे रे. तर मी त्या दिवशी आत्महत्याच करायला निघाले होते. पण तुझ्या बाबांनी वाचवलं, घरी घेवुन आले. वहीनीसाहेब कायम त्यांच्या ‘त्या’ उद्योगात गढलेल्या असायच्या. त्यांची अनुष्ठानं, ते प्रयोग काय काय चालु असायचं. तुझ्या बाबांनी सगळी कल्पना दिली होती मला. मला काही त्रास होणार नाही याची ग्वाहीसुद्धा दिली होती. मला फक्त तुला सांभाळायचं होतं. त्यासाठी तुझ्या बाबांनी मला तुमच्या घराजवळच एक लहानशी खोली घेवुन दिली. कारण रात्रीच्या वेळी त्या घरात राहायला ठाम नकार दिला होता मी.
काकु, ‘ते’ उद्योग म्हणजे. अगं, आई थोडी जास्तच देवभोळी आहे मान्य आहे मला. म्हणजे कधी कधी तर अतिरेक होतो, हे ही मान्य आहे मला. पण तेवढंच त्यात घाबरण्यासारखं काय होतं…
बाळा, तुमच्या घरात देवाचा एकतरी फोटो आहे का रे? देवभोळी म्हणे..?
काकु, उदाससं हसली….
“आहे ना त्या मंगलबाबांचा ! आईसाठी कुठल्याही देवापेक्षा तीचे ते सदगुरुच श्रेष्ठ होते. आणि कधीही न पाहीलेल्या देवापेक्षा प्रत्यक्ष आधार देणार्या सदगुरुंची भक्ती केलेली काय वाईट?
तू लहान होतास रे तेव्हा. एकदा हा मंगलबाबा घरी आला होता तुमच्या. माफ कर बाळा, तुझी आई होती ती. तरीही सांगते, तीन दिवस तो मंगलबाबा तुझ्या आईच्या खोलीत बंद होता. आतुन नको नको ते आवाज कानावर येत होते. एक दिवस मी कसे बसे सहन केले ते सारे. दुसर्या दिवशी तुला घेवुन माझ्या खोलीवर आले. तुझ्या बाबांना सरळ सांगितले, तो बाबा गेला की मला सांगा. मी परत येइन बाळाला घेवुन.
काकु, तू लहानपणापासून मला वाढवलं आहेस. आईपेक्षाही जास्त तुझ्या अंगा-खांद्यावर वाढलोय मी. पण तरीही हे पटत नाही मला. मी आईला देखील कायम तुझा दुस्वास करतानाच बघीतलेय. जर रागावणार नसलीस तर एक गोष्ट विचारू?
काकुच्या चेहर्यावर परत तेच उदास हास्य. तीने केविलवाणं होत माझ्याकडे पाहीले. तिच्या नजरेतलं ते ‘तू सुद्धा?’ बघीतलं आणि माझी मलाच लाज वाटली..
काकु, प्लीज ! म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं गं! पण्…खरं तर मला काहीच समजेनासं झालं आहे आजकाल. बाबा तसे विचित्र वागताहेत. तू आईबद्दल एवढं काहीतरी भयानक सांगुनही त्याचा मला बसायला हवा तसा धक्का बसत नाहीये. मी हे स्वतःहुनच एक्सेप्ट करुन टाकलय का गं? आणि तू म्हणतेस तशी जर ‘आई’ असती तर बाबा गप्प बसले असते का? तूला तर माहीतीय ना, ते किती संतापी आणि विक्षीप्त आहेत. त्यांनी कधीच घराबाहेर काढलं असतं आईला.
नाही रे बाळा, तुझे बाबा संतापी, विक्षीप्त वगैरे काहीही नाहीत. तो केवळ एक मुखवटा आहे त्यांनी घातलेला. आपली असहायता, आपला भित्रेपणा लपवण्यासाठी स्वतःच्या खर्या चेहर्यावर घातलेला एक मुखवटा !
काकु…
हो, तुझे बाबा तुझ्या आईला घाबरतात. तेच काय मीसुद्धा घाबरतो. खरं तर अख़्खा गाव घाबरतो तिला. त्यावेळी नुकतंच मी माझं बाळ गमावलेलं, त्या अवस्थेत तुझ्या बाबांनी पदरात टाकलेल्या तुझा लळा नसता लागला, तो मोह नसता पडला तर मी कधीच हे गाव सुद्धा सोडून गेले असते. आजही मी या गावात टिकून आहे ते केवळ तुझ्यासाठी. नाहीतर तुझ्या आईने प्रचंड त्रास दिलाय मला. बघायचाय…
काकुने माझ्याकडे पाठ करत पदर खाली टाकला. तिच्या संपुर्ण पाठीवर अतिशय विचित्र अशा जखमा होत्या. मी शहारलो….
जा बाळा, परत जा. तुझ्या आईला कळलं तर तुझी खैर नाही.
अस्सं कस्सं म्हणतेस तू? काहीही झालं तरी मी तिचा मुलगा आहे.
काकु पुन्हा तेच भेसुर हसली…
हं… वेडा आहेस ! तू काय किंवा तुझे बाबा काय तिच्यासाठी फक्त एक माध्यम आहात. शहाणा असशील तर तुझे बाबा म्हणतात ते ऐक. हे घर, मी तर म्हणते घरच काय गावसुद्धा सोडून जा. तरच वाचशील.
********************************************************************************************
क्रमश :
हेरंब ओक
सप्टेंबर 4, 2012 at 12:43 pm
कसलं जबरदस्त लिहिलं आहेस विशाल !! मध्यरात्री वाचतोय मी हि आणि साफ टरकलोय !!
लवकर टाक पुढचा भाग !
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 4, 2012 at 12:45 pm
धन्स रे हेरंबा ! लिहीतोय पुढचा भाग, जमल्यास संध्याकाळ पर्यंत किंवा फ़ारतर उद्या पोस्ट करेन पुढचा आणि शेवटचा भाग ! 🙂
sanjay
डिसेंबर 24, 2015 at 5:41 pm
विशाल वतूळ चा शेवटचा भाग पाठवा
प्रिया
सप्टेंबर 4, 2012 at 1:07 pm
बाप्रे!
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 4, 2012 at 1:09 pm
🙂
anagha
सप्टेंबर 4, 2012 at 2:25 pm
aggobai? pudhe kaay jhale?
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 4, 2012 at 5:16 pm
थोडी कळ काढ माय ! कळेलच लवकर 🙂
Rahul Bhaje
सप्टेंबर 4, 2012 at 4:57 pm
आई शप्पथ…वाचतांना चक्क पात्रे समोर उभी झालीत…..
पुढे नक्किच काहितरी विचित्र घडनार असं वाटतय…..
पुढच्या भागाची वाट बघतोय…
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 4, 2012 at 5:17 pm
धन्स राहुल ! १-२ दिवसात पुढचा भाग टाकतोच आहे.
Piyu
सप्टेंबर 4, 2012 at 10:10 pm
खूपच भयंकर.. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 5, 2012 at 12:03 pm
मन:पूर्वक धन्यवाद 🙂
नागेश
सप्टेंबर 4, 2012 at 10:57 pm
आता माझ्याबद्दल बोलशील तर हेच माझे प्राक्तन आहे. त्यातुन माझी सुटका नाही. मी हा असाच फिरत राहणार बहुदा, तेल मागत फिरणार्या अश्वत्थाम्यासारखा ! <– EK Number 🙂
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 5, 2012 at 12:04 pm
धन्यु मालको 🙂
jadhav
सप्टेंबर 5, 2012 at 11:34 सकाळी
khup chhan katha pudacha bhag kadhi vachayala milel khup utsukata lagali ahe!
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 5, 2012 at 12:04 pm
मन:पूर्वक आभार मित्रा ! १-२ दिवसात टाकतोच आहे पुढचा भाग.
Niyati
सप्टेंबर 6, 2012 at 1:58 pm
Vishal, tumachya ashya vishayachya kathanchi kadhipasun vaat baghatey, Mastach. Pudhacha bhag lavakar taka
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 6, 2012 at 1:59 pm
धन्यवाद ! लवकरच पोस्ट करतोय 🙂
.
सप्टेंबर 7, 2012 at 7:58 pm
कुल बोलू?.. कुलच वाटतंय…पुढे वाचल्याला थांबलोय,
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 11, 2012 at 11:22 सकाळी
धन्यवाद मित्रा, लवकरच टाकतोय पुढचा भाग 🙂
Mandar D. Joshi
सप्टेंबर 8, 2012 at 12:11 सकाळी
Vishalya, pudhcha Suhas Shirvalkar aahes.
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 11, 2012 at 11:21 सकाळी
धन्यवाद रे मंदार 🙂
suraj wasudeo
ऑक्टोबर 10, 2012 at 9:13 pm
सहज म्हणुन वाचता वाचता कधी गंभीर झालो कळले पण नाही. खरच लिहिण्यात प्रचंड जिवंतपणा वाटला.
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 11, 2012 at 10:55 pm
धन्यवाद सुरजजी 🙂
sheetal shinde
नोव्हेंबर 26, 2014 at 12:20 pm
Pls post last part at the earliest !!!!