ये पावसा!
जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा
अश्रूंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबाथेंबातये पावसा!
धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतूनी
जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा!
सभोती पहा रूक्ष ओसाड राने, नदीपात्र झाले रिते-कोरडे
निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊन ये पावसा!
दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकूळ झाली गुरे-वासरे
त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा!
अता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके
घरा अंगणा जीवना शांतवाया तू देवतारूप ये पावसा!
तुला आण आहे तॄणांची,फुलांची,सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची
कवितेतूनी माझिया भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा!
काही दिवसांपूर्वी जेव्हा वरुणराजाने अचानक हजेरी लावली तेव्हा सरांची ही कविता आठवणे अगदी साहजिकच होते. प्रत्यक्ष सरांच्या मुखातून, त्यांच्या समोर बसून ऐकलेली ही कविता. खरेतर ही कविता सरांकडून ऐकताना तीचे शब्द ऐकण्याची गरजच पडली नव्हती. त्या विलक्षण प्रेमळ आणि कनवाळू माणसाच्या चेहयावर या कवितेचा सगळा भाव जणू दृष्यमान झाला होता. आज सरांच्या पश्चात हा लेख लिहीताना असं वाटतय की सर अजुनही कुठेतरी आसपासच असतील. अगदी उद्या जरी त्यांच्या घरी गेलो तरी नेहमीप्रमाणे, मनापासून ’या देवा’ अशी हृदयापासून हाक मारून स्वागत करतील.
कविवर्य कै. दत्ता हलसगीकर यांच्या ’चाहूल वसंताची’ या काव्यसंग्रहामधली ही कविता. सोलापूरी असण्याचे मला जे काही फ़ायदे मिळाले आहेत त्यापैकी एक अतिशय महत्वाचा लाभ म्हणजे सरांचा आशिर्वाद. यात माझे दोन शिक्षक येतात. एक म्हणजे ज्या तंत्रनिकेतनातून माझे शिक्षण झाले त्या एस.ई,एस. तंत्रनिकेतनाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. जीवन औरंगाबादकर सर आणि दुसरे म्हणजे कविवर्य दत्ता हलसगीकर. खरेतर हलसगीकर सरांची ओळख औरंगाबादकर सरांमुळेच झाली. प्रथमवर्षाला असताना आम्ही काही मित्रांनी मिळून कॉलेजचे पहीले हस्तलिखीत काढले ‘ज्ञानदीप’ या नावाने. त्यात माझी एक कथा आणि एक कविता दिली होती मी. ती कविता वाचून औरंगाबादकर सरांनी मला हलसगीकरांकडे पाठवले. त्यावेळी खरे तर प्रचंड दडपण होते मनावर. कारण मी लिहीत असे, पण त्यावेळी माझी कविता अगदीच बाल्यावस्थेत होती. त्याउलट हलसगीकर सरांचे नाव खुप मोठे होते. त्यामुळे पहिल्या भेटीत मी प्रचंड घाबरलेलो होतो. पण सोलापूरातील, सिद्धेश्वर नगरातल्या त्यांच्या घराची बेल वाजवली आणि आता कोण आपण? काय काम आहे? अशा प्रश्नांची अपेक्षा असताना अचानक समोरुन सरांच्या खळखळत्या, स्नेहाने-मायेने ओतप्रोत भरलेल्या शब्दात ‘या ss देवा’ म्हणून साद ऐकली आणि सगळं भय, सगळं दडपण दूर झालं. त्या दिवसापासून सरांशी ऋणानुबंध जुळले ते आजतागायत कायम आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली कविता. कविता कशी जगायची? याचा अनुभव, सगळंच कसं अगदी विलक्षण होतं.
आमचं सोलापूर पहिल्यापासूनच अतिशय समृद्ध अश्या साहित्यिक वारशाचे जडजवाहीर अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवत आलेलं आहे. त्यातही काव्याच्या बाबतीत सोलापूरचं भूषण म्हणजे कविवर्य संजीव, कविवर्य रा. ना. पवार आणि कविवर्य दत्ता हलसगीकर ही विलक्षण कवित्रयी! या तीन कवींमुळे स्वातंत्र्योत्तर कवितेच्या प्रांतात सोलापूरचा नावलौकिक वाढला होता. पण कवी संजीव किंवा रा. ना. पवार हे फारसे कुणात मिसळत नसत. आपल्याच कवितेच्या विश्वात ते रममाण होत असत. हलसगीकर सर मात्र विलक्षण माणुसवेडे कवि. माझ्यासारख्या कित्येक नवकविंचे आधारस्तंभ! कुणाही नवीन कवीला कवितेच्या रस्त्यावरचे खाचखळगे दाखवून त्याची वाटचाल सुलभ करुन देणे हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. माझ्यासारख्या कित्येकांच्या कवितेला वळण लावण्याचे काम त्यांनी केले. खरं तर चार-पाच पिढ्यांतील कवींच्या कवितांवर त्यांनी संस्कार केले म्हणायला हरकत नाही.
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
त्यांची ही कविता जणु त्यांनी स्वत:च्या स्वभावात भिनवून घेतली होती. तसं पाहायला केलं तर त्यांनी कधीच कुणाच्याच कवितेत कसलेही फारसे फेरफार केले नाहीत. परंतु ही कविता कशी फुलवायची ? कवितेची बिकट वाट वहिवाट कशी बनवायची हे त्यांनी शिकवले. सरांची भेट होइपर्यंत माझी कविता, केवळ सुचतय म्हणून खरडायचं एवढीच होती. पण सरांनी कवितेकडे गांभिर्याने बघायला शिकवलं. तिच्या अंतरंगात शिरायचं कसं हे दाखवून दिलं. त्यांचं, इतके श्रेष्ठ आणि जेष्ठ कवि असणं त्यांच्या आणि माझ्यासारख्या नवोदितांच्या नात्याआड कधीच आलं नाही. पोटच्या लेकराला समजवावं तसं ते आम्हाला शिकवत राहीले. त्यांच्या त्या वृत्तीला साजेश्या त्यांच्या ‘उंची’ या कवितेत त्यांनीच म्हटलं आहे.
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे
सरांचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची कविता अगदी साधी असे. कसलाही अभिनिवेश न बाळगणारी. अगदी सर्वसामान्यांना कळतील, पोचतील असे बोलीभाषेतील साधे सरळ पण थेट हृदयापर्यंत पोचणारे शब्द. एखादी निसर्ग कविता असो, किवा समाजाच्या वाईट रुढींवर प्रहार करणारे टीका काव्य असो सरांची कविता कधीच बोचली नाही. त्यांना कवितेतुन जे म्हणायचे असे ते अगदी तिसरी चौथी पास असणार्या माणसापर्यंतही सहज पोहोचत असे ही त्यांच्या लिखाणाची खासियत. कुठल्याही उपमा नाहीत, प्रतिमा नाहीत, कसलेही शब्दांचे अवडंबर नाही. महत्त्वाचे म्हणजे हा साधेपण केवळ त्यांच्या कवितेतच नाही तर आयुष्यात सुद्धा तितकाच भिनलेला होता. त्यांच्या घराचे दार येणार्या प्रत्येकासाठी कायम उघडे असे.
असीमासी जवळीकता
सीमा गेल्या विरघळून
मिळे समुद्राला थेंब
थेंब गेला समुद्रून
किती साधे परंतू परिणामकारक शब्द ! सरांनी अनेक प्रकारचे लेखन केले. निसर्ग, सामाजिक कवितांबरोबरच बाल कविताही लिहील्या. झोका, आई, जादूची पेटी, सुटी आली रे सुटी, रंग झेलू गंध झेलू हे त्यांचे बाल कवितांचे संग्रह तसेच पाझर आस्तेचे, तरुणांसाठी दासबोध, बहिणाबार्इंची गाणी, शब्दरूप मी, कवितेतील अमृतघन, मनातले काही, स्वस्तिंकाची पाऊले, उमाळे अंतरिचे, मन करावे समर्थ, परखड तुकाराम असे नानाविध विषयांवरील स्फुट – ललित लेखन. आषाढघन, उन्हातल्या चांदण्यात, सहवास, करुणाघन, कवडसे, चाहूल वसंताची हे काव्यसंग्रह असे विपूल लेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘चाहुल वसंताची’ काव्यसंग्रहाला मराठी साहित्य परिषदेचाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’ ही मिळाला होता. पण सर अशा पुरस्कारांच्या मोहात कधीच अडकून पडले नाहीत. वर दिलेल्या ‘उंची’ या कवितेची तर देशभरातल्या जवळ जवळ २२ भाषातून भाषांतरे झाली आहेत.
सरांच्या ‘चाहूल वसंताची’ या काव्यसंग्रहातील एक कविता त्यांच्याच आवाजात ऐका. http://youtu.be/Ggney47smbs
(छायाचित्र व ध्वनिचित्रफ़ीत आंतरजालावरून साभार)
असा हा माणुसवेडा कवि काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झाला. कोण जाणे तिथेही सरांकडे नवोदितांची रांग लागली असेल आणि सर आपले हात उंचावून येणार्या प्रत्येकाला प्रेमाने, मायेने पुकारत असतील..
“या देवा….!”
सर, ते शब्द पुन्हा एकदा तुमच्या तोंडून ऐकायचेत. तूम्ही परत याच……….
विशाल कुलकर्णी
anuvina
जून 13, 2012 at 11:52 सकाळी
आपल्या गुरुजनांच्या ज्यांनी आपल्यावर संस्कार केले, आपल्याला घडवलं त्यांच्या अश्या अनेक आठवणी आपल्या मनात कायम रुजून राहतात. पण काही क्षणच असे असतात की त्यावेळी अश्या आठवणी परत रुंजी घालायला लागतात आणि आपण नकळत त्यात मुग्ध होतो. आपला लेख या अश्याच आठवणींनी भारलेला आहे म्हणून खुपच आवडला.
विशाल कुलकर्णी
जून 13, 2012 at 12:08 pm
धन्यवाद अनुविना ! सरांचे, खरंच खुप उपकार आहेत माझ्या लेखणीवर. त्यांचे मार्गदर्शन, आशिर्वाद लाभले नसते तर मी आज कवितेपासून किती दूर गेलो असतो देवच जाणे. 🙂
अभिषेक
जून 13, 2012 at 5:16 pm
अर्थात, वाचकांवरही आहेत! लेख आवडला!
विशाल कुलकर्णी
जून 14, 2012 at 2:55 pm
🙂