तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा आणि नव वर्ष सुख-समृद्धीचे, भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना !
आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा! मराठी नव्या वर्षाची सुरुवात….
गुढी पाडव्याला नेहमीप्रमाणे प्रभात समयी आधी घरच्या देवाची षोडषोपचारे पुजा केली जाते.
महाराष्ट्रभर आज घरोघरी मंगल गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा केला जातो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते. एका बांबुच्या किंवा वेताच्या काठीला श्रद्धापूर्वक स्नान घालुन (स्वच्छ धुवून) नवे वस्त्र, एक आंब्याची डहाळी, साखरेची माळ आणि तांब्या लावला जातो. आपापल्या आर्थिक स्थितीनुसार कोणी तांब्याचा, कोणी स्टीलचा तर कोणी चांदीचा तांब्याही वापरतात.
घरोघरी गोडा-धोडाचा स्वयंपाक केला जातो. पुर्वी सर्रास पुरणपोळीचा बेत असे पण आजकाल बदलत्या काळाप्रमाणे श्रीखंड पुरी किंवा बासुंदी पुरीचाही बेत केला जातो.घरात जरी गोड्-धोडाचे जेवण असले तरी त्याबरोबर कडुनिंबाची चटणी आठवणीने केली जाते. यामागचे कारण असे की एकीकडे गुढी उभारुन आपण त्याला साखरेची माळ लावतो, घरी गोडाचा स्वयंपाक करतो, आनंदाने, सुखाने नववर्षाचे स्वागत करतो. ते तर करायचेच पण सुखासमोर दु:खालाही विसरायचे नाही. त्याला त्याज्य किंवा कमी लेखायचे नाही. गोडाच्या जेवणाबरोबर कडुनिंबाची कडू चटणीही खायची अर्थातच सुखाबरोबर आपल्या पदरी आलेल्या किंवा येणाया दु:खाचेही आनंदाने स्वागत करायचे. जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही. हा मंत्र जर तुम्ही आयुष्यभर जपलात तर जीवन नक्क्कीच सुखी होऊन जाईल.
चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते.प्रभुरामाच्या परत येण्याच्या आनंदाप्रित्यर्थ अयोध्येच्या नागरिकांनी पाडव्याचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला होता. अशी पुराणातली एक कथा आहे.
भगवद गीतेत श्रीकृष्णांनी म्हटलेले आहे…
“भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “सुखाची गुढी उभारण्यासाठी, विश्वसु्खाचा ध्वज उभविण्यासाठी मी युगायु्गांचे ठायी अवतार घेतो, हे खरे, पण ही गुढी, हा ध्वज मी स्वत: उभारीत नाही. जे सज्जन असतील, त्यांच्याकडून मी हे तोरण उंचवितो. सीमेला पोंचलेला अ-धर्म मी नष्ट करतों. अनेक दोषांनी, प्रमादांनी व पापांनी काळवंडलेली कर्म-लिखितांची बाडेच्या बाडें मी नष्ट करतों.”
याचे वर्णन करता संत ज्ञानेश्वर म्हणतात..
अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। – ज्ञानेश्वरी, ४-५२
याबरोबरच शककर्ता गौतमीपुत्र सातकर्णी या महान सम्राटाने नहपान या क्षत्रप राजावर मिळवलेल्या विजयाचा दिवस म्हणजेही गुढीपाडवा. आजच्याच दिवशी गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवला होता हे आपल्यापैकी खुप जणांना माहीतच नसते.
चला आज वर्षप्रतिपदेच्या या शुभमुहुर्तावर आपणही एक मंगलमय गुढी उभी करुया. प्रत्येकाने ही गुढी स्वतंत्रपणे व स्वत: उभारावयाची तर आहेच, पण आपल्याबरोबर सर्व स्नेही, सुहदांनाही गुढी उभी करायला प्रोत्साहीत करु या. ही गुढी असेल ऐक्याची, समतेची, जागतिक शांतीची, मानवी संस्कृतीच्या अभ्युदयाची, सत्-प्रवृत्तींची.
चला तर मग….
सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
अवांतर : गुढी उभारून झाल्यावर मस्त आराम करायला हरकत नाही.
सस्नेह,
विशाल कुलकर्णी
Priya
मार्च 27, 2012 at 2:02 सकाळी
तुझा फोटो पाहुन मला मंडईच्या गणपतीची आठवण झाली
फक्त वहिनीची कमी आहे फोटोमध्ये 😀
आणि त्या गोडाधोडाच्या स्वयंपाकाचा पण फोटो टाकायचा ना 🙂
विशाल कुलकर्णी
मार्च 27, 2012 at 9:36 सकाळी
स्वयंपाक अजुन झाला नव्हता गं. मी पुजा करुन, गुढी उभारुन सव्वा आठ वाजता घरून निघालो होतो. 🙂