१९९६ सालची घटना असावी बहुदा. त्यावेळी पुण्यात नोकरी करत होतो. सुटीसाठी म्हणुन सोलापूरला गेलो होतो. रवीवारचा दिवस, सकाळची वेळ, मस्त पुस्तक वाचत पडलो होतो आणि ेप्राचीचा फ़ोन आला. प्राची उर्फ़ प्राची देशमुख माझी भाच्ची. एका मानसभगिनीचे ७ वर्षाचे उपद्व्यापी कन्यारत्न. जगात काही लोक तुम्हाला छळायचे या एकाच कारणास्तव जन्म घेतात यावर माझा विश्वास बसावयास भाग पाडणारी एक गोड छोकरी. अर्थात प्राचीचा छळवाद मला प्रचंड हवाहवासा वाटतो कारण त्यातुन ती माझ्या बुद्धीलाच आव्हान देत असते. तिचे प्रश्नही अफ़ाट असतात.
उदा. तुला येते तशी दाढी मला का नाही? देव सगळीकडे आहे तर ऐन परीक्षेच्या वेळी तो का गायब होतो? मी आई-बाबांची एवढी लाडकी आहे तर त्यांच्या लग्नात मला का बोलावले नव्हते? नंदुआजोबा, तुला, मला आणि चंपीच्या बाळाला एकाच नावाने हाक का मारतात? (चंपी हे ताईच्या कुत्रीचं नाव आहे. नंदुमामा जगातल्या यच्चयावत सर्वच लहान मुलांना ’पिल्लु’ म्हणून हाक मारतो. आम्हीही अजुनही त्याच्या दृष्टीने लहानच आहोत)
तर त्यादिवशी सकाळी सकाळी प्राचीचा फ़ोन आला.
“माम्या, मी तुला ’मामा’ म्हणते, आईपण तुला ’विशुमामाच म्हणते, सौरभ (भावजींच्या धाकट्या बहिणीचा मुलगा) बाबांना मामा म्हणतो, मग आई बाबांना ’मामा’ का म्हणत नाही?”
“मामा” या शब्दाशी तिने तिच्या आईचा आणि माझा लावलेला संबंध पाहून मी अवाक झालो, त्यात सौरभचा संदर्भ अजुन खतरा होता. सौरभशी स्वत:ला रिलेट करुन बापाला ’मामा’ बनवण्याचा तेही आईकडून तिचा हा उपद्व्याप माझ्या मात्र मस्तकाला झिणझिण्या आणुन गेला.
मला काय उत्तर द्यावे तेच कळेना.
“वेडुच आहेस बच्चा तू. अगं तो ’बाबा’ आहे ना, मग बाबाला ’मामा’ कसे म्हणेल आई?”
“मग ती बाबा तरी कुठे म्हणते, योगेश म्हणते ना !”
मी नि:शब्द ! तिला म्हणालो, संध्याकाळी येतो तुला भेटायला तेव्हा आपण आईला विचारु.
कुठलेतरी पुस्तक वाचत आमचे एकतर्फ़ी संभाषण ऐकणारा माझा धाकटा भाऊ विनू म्हणाला…
“कोण रे ’पा’ होती का? (आम्ही प्राची ला ’पा’ असेही म्हणतो, ती अगदी लहान असताना तिला नाव विचारले की ती तेवढेच सांगायची)
“हो रे, असले एकेक भन्नाट प्रश्न विचारते आणि दांडी गुल करुन टाकते.”
मी त्याला सगळा किस्सा ऐकवला. त्यावर विनू म्हणाला…
“तुझ्या जागी लंप्या असता ना, तर म्हणाला असता….” प्राचीपण म्याडच आहे, अगदी १० गुणिले १० भागिले शंभर म्हणजे एक इतकी म्याड!”
मी चमकलो.. आणि लगेच लहानपणीच्या आठवणीत मागे गेलो …
’कुठलं वाचतोयस?’
विनुने हातातले पुस्तक माझ्याकडे दिले. ,” अगदी लंप्या म्हणतो तसा ““माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”.
प्र.ना. संतांचं ’वनवास’ होतं ते. मी जरा चाळून त्याला परत केलं, तुझं झालं की दे म्हणून सांगितलं.
“तू वाच, मी तिसर्यांदा वाचतोय. मी जातो आंघोळीला नाहीतर मातोश्री फटकावतील”
मी पुस्तक हातात घेतलं आणि पुन्हा एकदा लहान झालो. लंप्याची आणि माझी दोस्ती तशी फ़ार जुनी नाही, मुळात संतांनी आपलं पहिलं पुस्तक वनवास लिहीलं तेच मुळी १९९४ साली जेव्हा मी विशीत होतो, पण आता चाळीशी आली तरी ती दोस्ती मात्र अजुनही कायम आहे.
तर ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील बाल-नायक! खरेतर त्याला बाल म्हणणे त्याच्यावर अन्याय ठरेल, कारण प्रत्येक लहान सहान गोष्टींना तो लावत असलेलं भन्नाट लॉजिक भल्या भल्यांना वेड लावायला पुरेसं आहे. कारवार जवळच्या एका लहानश्या खेडेगावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा लंपन. आई वडील आणि त्याची छोटी बहीण जवळच्याच एका छोट्या शहरात राहतात. लंपनला त्याचे घडायचे वय म्हणुन त्याच्या आज्जी-आजोबांकडे शिकायला ठेवण्यात येते. लंपनचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन आहे. एक वेगळेच लॉजिक आहे. आजुबाजुच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीला स्वतःचं लॉजीक लावत अठ्ठाविसशे एकोणावीस वेळा त्यावर विचार करायची त्याची सवय आपल्यालाही वेड लावते. त्याला एक मैत्रीण पण आहे, सुमी उर्फ मिस सुमन हळदीपुर. लंपनच्या प्रेमात पडण्यामागे त्याचं हे स्वतःचं असं , स्वतःच निर्मीलेलं निरागस विश्व तर होतंच पण त्याहीपेक्षा महत्वाचे असे आम्हा दोघातले दोन कॉमन पॉईट्स मला सापडले होते ते म्हणजे लंप्याची गाण्याची आवड आणि पुस्तकांचे वेड !
मनापासुन सांगतो आगदी सत्तेचाळीस हजार एकोणाविसशे अठ्ठावीस वेळा वाचलाय मी लंपन, पण प्रत्येक वेळी तो काही ना काही नवीन शिकवतोच. वपुंनी उभी केलेली व्यक्तीचित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली हे माझं वेड आहे. पण लंप्याच्या डोळ्यातून पाहीलेले नकादुचे खंडागळे, जुन्या गाड्या नव्यासारख्या करुन विकणारे हिंडलगेकर अण्णा, त्यांच्या सगळ्या गल्लीला वेड लावणार्या पोरी, सारखा केसांवर हात फिरवत बोलणारा, हिडलगेकर अण्णांच्या मुलीवर लाईन मारणारा एसक्या, गाणं शिकवणार्या आचरेकर बाई, हत्तंगडी मास्तर, शारदा संगीतचे म्हापसेकर सर, आचरेकर बाईंचा मानलेला मुलगा ‘त्ये म्याडहुन म्याड जंब्या कटकोळ हंपायर’, फुटबॉलचं वेड असणारा पण प्रत्यक्षात सायकल दुरुस्तीचं दुकान चालवणारा कासारगौड, दुंडाप्पा हत्तरगीकर, त्याच्या टांग्याचा दर दोन मिनीटाला थांबणारा घोडा, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी असे लंप्याचे मित्र, सुमी उर्फ मिस हळदीपूर अशी एकेक पात्रे जेव्हा डोळ्यासमोर फेर धरुन नाचायला लागतात ना तेव्हा नकळत वपुंचाही विसर पडायला होतो.
लंप्याच्या अफलातुन भावविश्वाबद्दल युपुढेही बरेच काही लिहायचेय, मी तर लिहीणारच आहे. पण मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर लंप्याला वाचलय, त्याला पाहीलय. प्रत्येकाने कधी ना कधी स्वतःमध्ये लंप्याला जागवलय. तुम्हाला काय वाटतं? लंप्याची आठवण झाली की सगळ्यात आधी काय आठवतं. तुम्ही पण लिहा इथे प्रतिसादात, मी पण लिहीतो….
मला लंप्याचं नाव काढलं की आठवतो तो प्र. ना. संतांनी सांगितलेला गोट्या खेळताना म्हणायचा एक अफलातुन मंत्र……
पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर
मागे कधीतरी मिपावर श्रीं. नंदन यांनी लिहीलेल्या एका लेखात म्हटले होते…
“लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं. ”
वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ही चारच पुस्तके प्रकाश संतांनी लिहीली.
दुर्दैवाने २००३ साली त्यांचे अकाली निधन झाले. पण या चारही पुस्तकांनी माझे आयुष्य समृद्ध करुन सोडलेले आहे. माझे लहानपण गेले ते गोट्या आणि सुमाच्या गोष्टी, फाफेचे कारनामे, टारझनची साहसे, विक्रम वेताळाच्या गोष्टी आणि हान्स अॅंडरसनच्या परिकथा वाचण्यात. दुर्दैवाने प्रकाश नारायण संतांनी लंपनची पहिली कथा वनवास लिहीली त्या वर्षी म्हणजे १९९४ साली मी माझे बालपण खुप मागे सोडले होते. पण लंप्याच्या या ओळखीमुळे कुठेतरी हरवलेले ते बालपण पुन्हा एकदा जगण्याचा निर्भेळ आनंद उपभोगता आला. पुढचे काही माहीत नाही पण आज एक मात्र मी खात्रीने सांगतो की किमान मरेपर्यंत तरी मी लहानच राहणार आहे, निदान लंप्याशी असलेली माझी दोस्ती निभावण्यासाठी तरी……
मग लिहीताय ना?
लंपनशी असलेले तुमचे नाते, तुमच्या दोस्तीच्या त्या म्याड, म्याड आठवणी …..
विशाल…
सिद्धार्थ
मार्च 21, 2012 at 3:14 pm
लंप्याबद्दल या आधी देखील वाचले होते. ह्या पोस्टमुळे पुन्हा आठवले. आजच ऑर्डर करतो आणि मॅड होऊन जातो.. धन्यवाद…
विशाल कुलकर्णी
मार्च 21, 2012 at 3:18 pm
जरुर वाचा सिद्धार्थ ! चारही पुस्तके संग्रहात असायलाच हवी अशीच आहेत. मन:पूर्वक आभार 🙂
Veedee (@Veedeeda)
मार्च 21, 2012 at 4:24 pm
पुण्यात आहात का तुम्ही ? कधी भेटूयात ?
विशाल कुलकर्णी
मार्च 21, 2012 at 4:26 pm
नमस्कार , मी पुण्यातच असतो. सातारा रोडला धनकवडीत राहतो. ०९९६७६६४९१९ हा माझा फ़ोन नंबर. नक्की भेटुया. धन्यवाद 🙂
full2dhamaal
मार्च 21, 2012 at 5:40 pm
धन्यवाद…
आत्ताच हा लेख वाचला आणि ह्या ४ही पुस्तकांची मागणी नोंदवली…
अजून अशीच काही नावे सुचवा..(पुस्तक ओळख करून नाही दिलीत तरी चालेल..शितावरून भाताची परीक्षा झालेली आहे)
विशाल कुलकर्णी
मार्च 21, 2012 at 5:43 pm
धन्यवाद बंधु ! शिं.त्र्य. वाचले आहेत का? इथे पाहा….
https://magevalunpahtana.wordpress.com/2012/03/09/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/
Sagar Bhandare
मार्च 21, 2012 at 11:24 pm
अफलातून लेख लिहिला आहेस रे विशाल लंपन वर. लंपन सिरिजच नेहमी पारायणे करावीत अशी आहे. वनवास ने जो सुखाचा प्रवास प्रकाश नारायण संतांनी करुन दिला आहे तो अद्भुत असाच आहे. संतांच्या या मानसपुत्राची एक अप्रतिम ओळख तू तुझ्या बहारदार लेखणीने करुन दिली आहेस. अभिनंदन 🙂
विशाल कुलकर्णी
मार्च 22, 2012 at 9:21 सकाळी
मन:पूर्वक आभार मित्रा ! आता लिहायला घ्या…It’s your turn now ! 🙂
Madhuri Pange
मे 3, 2012 at 5:57 pm
लेखन आवडलं. लंपनबरोबर माझंही मैत्र जुळलंय फार पूर्वी. आणि हो, तो शिकायला नव्हता आजोळी… लंपन अर्थात प्र. ना. संत.. दस्तुरखुद्द आणि तंतोतंत. ते आपल्या आजोबांना दत्तक गेले लहानपणीच. त्यांच्या पुस्तकावर प्र. ना. संत या नावाबरोबर भालचंद्र गोपाळ दीक्षित हे नाव दिसेल.
विशाल कुलकर्णी
मे 3, 2012 at 7:05 pm
प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार माधुरीजी.
ही माहिती मलाही नवीन आहे. म्हणजे या प्र.ना. संताच्या स्वताच्या आठवणी आहेत हे माहीत होते. पण ते आजोबांना दत्तक गेले होते ही माहिती नवीच आहे. या माहितीबद्दल खुप खुप आभार.
सस्नेह,
विशाल