RSS

अलविदा जॅमी….

15 मार्च

हॅलो जॅमी,

तुझ्या दैदिप्यमान कारकिर्दीबरोबरच योग्य वेळी घेतलेल्या या योग्य निर्णयालाही मानाचा मुजरा रे भावा !

अलविदा जॅमी

अलविदा जॅमी

ज्याच्या त्याच्या तोंडी एकच गोष्ट ऐकायला मिळतेय…. तूझी निवृत्ती ! कुणी म्हणतेय राहूल क्रिकेटच्या राजकारणाचा बळी ठरला. कुणी म्हणतेय महेंद्रसिंग धोनीच्या डावपेचांचा बळी ठरला. पण एक गोष्ट तूही कबुल करशील मित्रा, गेल्या इंग्लंडच्या दौर्‍याबरोबरच ऑस्ट्रेलियातही राहूल नावाच्या अभेद्य वॉलच्या बचावाला वारंवार तडे जाताना दिसत होते. मिस्टर डिपेंडेबलच्या अभेद्य भिंतीला कळत्-नकळत कसर लागायला लागली होती. तुझ्यातल्या सच्च्या खेळाडुने ते ओळखलं नसेल असं कसं होइल? बहुतेक त्यामुळेच तू निवृत्तीच्या निर्णयाप्रत आला असावास. कारणे काहीही असोत राहूलभौ, पण एक गोष्ट मात्र मी आज अगदी आनंदाने आणि ताठ मानेने सांगू शकतो. आजपर्यंत तुझ्याबद्दल आदर, प्रेम होतेच पण आज मात्र तुझ्याबद्दल मनस्वी अभिमानही वाटतोय. तुझ्यासारखा कुठलाही समर्पित क्रिकेटपटू निवॄत्त होणं आमच्यासारख्या वेड्या चाहत्यांच्या कधीच पचनी पडत नाही. आम्हाला तो त्या खेळाडुवर अन्यायच वाटत राहतो. तुझ्या बाबतीतही काही वेगळी भावना नाहीये.

पण प्रामाणिकपणे सांगू राहूल, तू तुझ्या वक्तशीरपणाबद्दल, तुझ्या टायमींगबद्दल विख्यात आहेस. आणि त्या अनुभवावरून सांगतो तुझं हे निवृत्तीचं टायमिंगही अगदी अचुक आहे. यावेळचा कॉलही तू बिनचुकपणे घेतला आहेस आणि निभावला आहेस. म्हणून तर तुला आम्ही मिस्टर डिपेंडेबल म्हणतो ना!

खरं सांगायचं तर तुझा खेळ मला नेहमीच एखाद्या मुरब्बी, ठाय लयीत गाणार्‍या दर्दी गायकासारखा वाटत आलाय. अगदी शांतपणे खेळपट्टीचा अंदाज घेत, प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीची शक्तिस्थाने ओळखत, त्यांच्या क्षेत्ररक्षणाचे व्युह भेदत आपल्या खेळाचा स्वर हळु हळू करत थेट तारसप्तकात नेवून ठेवणे हे तुझ्या खेळाचं वैशिष्ठ्य. मला वाटतं भारताचा भारताबाहेर सर्वाधिक यशस्वी ठरलेला एकमेव खेळाडू असशील तू. जगातल्या क्रिकेट खेळणार्‍या प्रत्येक देशाच्या संघाविरुद्ध प्रत्येक देशात खंडीभर धावा करणारा तू एकटाच असशील. परिस्थिती जेवढी प्रतिकुल तेवढा तुझा सुर जास्त चांगला लागायचा. आपल्या प्रत्येक खेळातून स्वतःच्याच चुका शोधत त्या सुधारत राहणे हा तुझा मुलभुत गुण. त्याच्या जोरावरच तर तू इथपर्यंत येवून पोहोचलास. आजही कसोटीत सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडुंच्या रांगेत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहेस तू. तुझ्या पुढे असण्याची ताकद फक्त सचीनमध्येच होती. कसोटीमध्ये १३,२८८ धावा (त्यात ३६ शतके आणि ६३ अर्धशतके) तर एक दिवसीय सामन्यांमध्ये १२ शतके आणि ८३ अर्धशतके (एकुण १०,८८९ धावा) सोपं नाहीये रे हे.

अलविदा जॅमी....

अलविदा जॅमी....

खरं सांगू का जॅमी, तशी आकडेवारी सगळी जिभेवर आहे रे. पण तुझं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी, या… या असल्या आकडेवारीची मुळी गरजच नाहीये रे. तुझी संपुर्ण कारकिर्दच एवढी देखणी आहे ना की या असल्या आकडेवार्‍या, संख्याशास्त्रे, हे विक्रमांची नोंद ठेवणे याची गरजच भासत नाही आम्हाला. या सगळ्याची गरज फक्त रेकॉर्ड किपर्सना. आम्हा तुझ्या पंख्यांना त्याची गरज नाही.

राहूल द्रविड ही काय चीज आहे हे सांगणारे उत्तम उदाहरण म्हणजे बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तुझ्या नावाने उभी करण्यात आलेली ही भिंत तुझ्याबद्दल सांगायला पुरेशी आहे.

The Wall : Mr. Dependable

The Wall : Mr. Dependable

आमच्यासाठी फक्त राहुल आमचा आवडता खेळाडु आहे हे पुरेसे आहे. नसेल तो तेंडुलकरएवढा आक्रमक, पण त्याच्या टायमिंगची सर इतर कुठल्या खेळाडुच्या बॅटला आहे? भारतीय टीम खरोखर अतिशय उत्तम टीम आहे. प्रत्येक खेळाडुच्या भात्यात एक ना एक ब्रह्मास्त्र आहेच आहे. पण जॅमी, ही सगळी ब्रह्मास्त्रे एकहाती आणि सहजपणे वापरू शकणारे टीममध्ये जे बोटावर मोजता येणारे खेळाडु आहेत त्यात तू खुप वरच्या क्रमावर आहेस. तुझ्या भात्यात असलेल्या विविध फटक्यांबरोबर संयम, प्रसंगावधान, विनम्रता, टायमिंग आणि सहनशीलता ही तुझी अस्त्रे अजुन कुणाजवळ आहेत? तुझ्या या अस्त्रांमुळे जगातल्या प्रत्येक (समकालीन) उत्कृष्ट अशा खेळाडुलाही कधी ना कधी आपलीच नखं कुरतडायला, आपला संयम सोडायला भाग पाडलेलं आहे. मुजरा स्विकार भावा !

काल – परवा मीमराठीवर श्री विरोचन यांनी तुझ्याबद्दल लिहीलेला हा सुंदर प्रतिसाद वाचला आणि तुझ्याबरोबरच विरोचनजींनाही वाकुन मुजरा करावासा वाटला. ते म्हणतात…….

कालच कुठेतरी हि बातमी वाचली आणि सगळी रंगपंचमी बेरंग झाल्यासारखी वाटली. कधी ना कधी निवृत्त होणार हे माहित असून देखील हा दिवस कधी येऊच नये असंच वाटत होतं. खरंतर राहुल द्रविड विषयी काय बोलणार?? सिर्फ नाम हि काफी है – “राहुल द्रविड”!!!! एखादं नाव उच्चारलं कि लगेच त्या माणसाची छबी डोळ्यासमोर उभी राहावी तसं राहुल म्हटलं कि ‘राहुल द्रविड’ हाच बाय डीफॅाल्ट डोळ्यासमोर येतो. कुणी त्याला ‘भिंत’ म्हणतात, कुणी ‘अँम्ब्युलन्स’, नियमित रात्री उगवणारा, अढळ ‘ध्रुवतारा’. पण मला तरी त्याला ‘राहुल द्रविडच’ म्हणावसं वाटतं. उगीच विशेषणांची भाऊगर्दी त्याच्या स्फटिका सारख्या स्वच्छ कारकीर्दीवर उगीचच पोत्याने गुलाल-बुक्का उधळलेली वाटते…

त्याची कारकीर्द कोकण रेल्वेच्या प्रकल्पा सारखीच ‘इंजीनिअरिंग मार्वल’ आहे. प्रत्येक वळणावर कस लागेल अशी परिस्थिती पण कोकण रेल्वे चाकरमान्यांना सुखरूप नेऊन सोडते. प्रवास संपला की सगळेजण सुटकेचा निश्वास टाकतात. कुठे धबधबा पाहिला, कुठे सूर्योदयाचे फोटो काढ, नदी, डोंगर, वळणं, पाऊस यांचं तोंड फाटेस्तोवर कौतुक पण ज्यामुळे ह्या गोष्टी अनुभवता आल्या तिच्या पदरी उपेक्षा ती उपेक्षाच. असाच राहुल द्रविड गाडी सुखरूप पोहोचवतो सगळे सुटकेचा निश्वास टाकतात पुन्हा कधीतरी अॅडलेड, कोलकाता सारखी अवघड वळणं येतात, द्रविड सुखरूप गाडी फलाटाला लावतो. कधीतरी ऑस्ट्रेलिया-२०१२ सारखी दरड रेल्वे मार्गावर कोसळते आणि न भूतो न भविष्यति टीकेस पात्र ठरला. असामान्य व्यक्तींची अपयश पण असामान्य असतात. भिंत भेदून त्रिफळा उध्वस्त होताना राहुल द्रविड बघणं हे माझ्या लेखी तरी या जन्मीचं पाप आहे. कदाचित पुढच्याच मालिकेत पुन्हा अद्भुत, अविश्वसनीय, अजरामर खेळी खेळलाही असता पण असा निर्णय त्याने का घेतला? जाऊ दे, मला तरी श्रद्धास्थानांना प्रश्न विचारलेलं आवडत नाही. राहुलची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतली पहिली खेळी झाकोळली गेली तशीच त्याची एग्झीट पण ऑस्ट्रेलियातल्या पराभवाच्या ढगाआड झाकोळली.

आत्ताच पत्रकार परिषदेतल एक वाक्य वाचलं “I don’t believe that you judge careers, or what people have done for 15-20 years based on one or two matches at the end. It is the body of work over a lifetime that goes into making a success story.” एकंच परफेक्ट स्ट्रेट ड्राइव्ह सर्वांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन दिमाखात सीमारेषेपलीकडे गेला. पटकन “No tribute is enough for Dravid ” हे सचिनच वाक्य आठवलं!!!! आणि डोळ्यासमोर आलं द्रविडला लॉर्डसवर १०० केल्या नंतर मिळालेलं “standing Ovation”.

एकंच सांगावसं वाटतं – “वी मिस यू राहुल्या”!!!! : हे माझ्याकडून “standing Ovation” समज.

असा स्कोअर बोर्ड परत पाहायला मिळेल का कधी?

असा स्कोअर बोर्ड परत पाहायला मिळेल का कधी?

तुझ्याबद्दल सांगताना इंग्लंडचा माजी खेळाडु ’एड स्मिथ’ म्हणतो…

One word has attached itself to Dravid wherever he has gone: gentleman. The word is often misunderstood. Gentlemanliness is not mere surface charm – the easy lightness of confident sociability. Far from it: the real gentleman doesn’t run around flattering everyone in sight, he makes sure he fulfils his duties and obligations without drawing attention to himself or making a fuss. Gentlemanliness is as much about restraint as it is about appearances. Above all, a gentleman is not only courteous, he is also constant: always the same, whatever the circumstances or the company.

A gentleman champion of timeless steel and dignity : by ‘Ed Smith’ (Former England, Kent and Middlesex batsman)

तुझी उणीव जाणवेल हे तर नक्कीच. आम्ही तुला कधीच विसरु शकणार नाही हि काळ्या पाषाणावरची रेघ आहे मित्रा !

अलविदा…….

तुझ्या असंख्य चाहत्यांपैकी एक…. !

 

4 responses to “अलविदा जॅमी….

 1. सुहास

  मार्च 15, 2012 at 12:48 pm

  अजून काही बोलायला शिल्लक नाय राव…. अफाट लिवलय भाऊ 🙂 🙂

   
 2. विशाल कुलकर्णी

  मार्च 16, 2012 at 11:41 सकाळी

  धन्यवाद सायबा 🙂

   
 3. विद्याधर

  मार्च 25, 2012 at 12:19 सकाळी

  >>मला तरी श्रद्धास्थानांना प्रश्न विचारलेलं आवडत नाही.
  🙂

  फायनली आज कॉमेंट पोस्ट झाली… ब्लॉअरशी तह झालेला दिसतोय वर्डप्रेसचा! 🙂

   

सुहास साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: