RSS

जा री जा री ओ कारी बदरीया…….

20 डिसेंबर

कधी कधी कसं होतं ना? एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची – श्रोत्याची अवस्था “देता किती घेशील दोन कराने” (इथे “ऐकता किती ऐकशील दोन कानाने” असे वाचायलाही हरकत नाही 😉 ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते.

आता हेच बघा ना. श्री. एस.एम.श्रीरामलु नायडू या यंडु गुंडू वाटणार्‍या नावाच्या माणसाने १९५५ साली युसुफसाब उर्फ दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांना घेवून ‘आझाद’ नावाचा एक तद्दन मसालापट काढला. त्याला बॉलीवुडमध्ये ’पोषाखीपट’ असे गोंडस संबोधन आहे. अगदी टिपीकल हिंदी किंवा दाक्षिणात्य मसालापटात शोभणारी कथा….

वडीलांच्या मृत्युनंतर त्याच्या मित्राच्या घरी वाढलेली नायिका ‘शोभा’ , त्या मित्राचा लहानपणीच परागंदा झालेला मुलगा, प्रत्येक चित्रपटात असायलाच हवा असा संकेत असणारा एक श्रीमंत खलनायक ‘सुंदर’ ! तर तारुण्यात पदार्पण केल्यावर ही शोभा अचानक गायब होते. खुप शोध घेतला जातो. त्यानंतर अचानक ती परतुन येते. आल्यावर आपल्याला ‘आझाद’ नावाच्या एका श्रीमंत माणसाने आपल्याला वाचवल्याचे सांगते. पुढे जावून ती आझादशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर करते. त्यात ‘आझाद’ हाच शहरातील बुरख्याआड वावरून रॉबीनहुडगिरी करणारा कुप्रसिद्ध (?) दरोडेखोर असल्याचा गौप्यस्फोट. मग शोभाच्या पालकांसमोर तिचे लग्न एका दरोडेखोराशी कसे लावायचे हा कुटप्रश्न आणि शेवट सगळं गोड ! असे अगदी साधे आणि टिपीकल कथानक असलेला हा चित्रपट !

पण दैवानेच सुबुद्धी दिली असेल कदाचित म्हणून या चित्रपटाला संगीत देण्याचे काम त्याने रामचंद्र चितळकर उर्फ़ ’सी. रामचंद्र’ नावाच्या अफ़लातून माणसाकडे सोपवले आणि सुप्रसिद्ध गीतकार राजेंद्रकृष्ण यांना बरोबर घेवून कै. आण्णांनी इतिहास घडवला.

राधा ना बोले ना बोले ना बोले रे…..: गायिका लता मंगेशकर , गीतकार राजेंद्रकृष्ण

कितना हंसी है मौसम, कितना हंसी सफर है… ( गायक : लतादीदी आणि सी. रामचंद्र, गीतकार : राजेंद्रकृष्ण)

अपलम चपलम चपलाई रे : (गायिका लतादीदी आणि उषाताई मंगेशकर : गीतकार राजेंद्रकृष्ण)

कितनी जवाँ है रात : (गायिका लतादीदी, गीतकार राजेंद्रकृष्ण)

कभी खामोश रहते है : (पुन्हा लतादीदी आणि राजेंद्रकृष्ण)

देखो जी बहार आयी, बागो में खिली कलिया (पुन्हा लतादीदी आणि राजेंद्रकृष्ण)

मरना भी मोहोब्बतमें किसी काम ना आया : रघुनाथ जाधव आणि पार्टी यांनी गायलेली ही मस्त कव्वाली म्हणजे आण्णांच्या वर्सटॅलिटीची कमाल होती.

आझादची जवळ जवळ सगळीच गाणी गाजली. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या निमीत्ताने आठवत राहीली. कधी कै. आण्णांच्या निमीत्ताने, कधी कै. राजेंद्रकृष्ण यांची स्मृतीप्रित्यर्थ , कुठल्या ना कुठल्या कारणाने ही गाणी पुन्हा पुन्हा आपल्या कानांवर पडत राहीली. त्यातल्या त्यात “राधा ना बोले ना बोले, कितना हंसी है मौसम, अपलम चपलम, कितनी जवा है रात” ही गाणी तर प्रचंड लोकप्रिय झाली. पण या सर्व अत्युत्तम गाण्यांच्या गोंधळात या चित्रपटातील एक अतिशय सुंदर गीत कधी आणि कसे काळाच्या ओघात हरवून गेले कळालेच नाही.

लतादीदींनीच गायलेले स्व. राजेंद्रकृष्णजींचे हे गीत कै. आण्णांनी ‘शिवरंजनी’ रागात बांधलेले होते. या गाण्याचे चित्रीकरणही मोठे सुंदर आणि मोहक होते. खुर्चीवर बसलेला देखणा ‘आझाद’, शेजारीच बसलेले ‘चरणदास’ आणि ‘शांता’ (शोभाचे पालक) आणि तिच्या सख्या आणि या सगळ्या आपल्या माणसांसमोर धुंद होवून नाचणारी निरागस, अल्लड, अवखळ शोभा उर्फ मीनाकुमारी. (नंतरच्या आयुष्यात अतिशय थोराड वाटायला लागलेली मीनाकुमारी तिच्या सुरुवातीच्या चित्रपटात इतकी गोड दिसत असेल यावर विश्वासच बसत नाही. पाहा.. आझाद, बैजुबावरा, कोहिनूर) . एक अवखळ, अल्लड प्रेमिका साक्षात पावसाळी नभांना (कारी बदरिया) सांगते…

जा री जा री ओ कारी बदरीया
मत बरसो री मेरी नगरीया
परदेस गये है सावरिया…
जा री जा री……

माझ्या विरहावर अजुन मीठ चोळायला इथे येवु नकोस. माझा साजण परदेशी गेलाय. त्याच्या विरहाने मी आधीच अर्धी झालेय त्यात तू त्रास देवू नकोस. तू जाच कसा इथून !

काहें घिर घिर शोर मचायें री…
मेरा नरम करेजवा जलाये री
मेरा मनवा जलें, कोइ बस ना चले
हाय…., तक तक के सुनी डगरीया
जा री जा री…..

पावसाच्या काळ्या नभांना ती रागेजुन म्हणते, का उगाच पुन्हा पुन्हा गर्जना करून मला त्रास देतो आहेस. माझ्या नाजुक हृदयावर एवढे भारी आघात करतोयस? साजण दुरगावी गेल्याने माझे मन जळतेय, कुठ्ल्याचा उपायाचा काहीच परिणाम होत नाहीये. त्याच्या वाटेकडे डोळे लावून लावून मी आधीच त्रासलेय. तेव्हा तू जाच कसा इथून ! मीनाकुमारी मुळातच तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. या गाण्यातले तिच्या चेहर्‍यावरचे विविध विभ्रम, मग त्यात प्रियाबद्दलचे प्रेम, ती अनामिक ओढ, तक्रार करतानाही प्रियाच्या आठवणीने डोळ्यात दाटलेले ते लाजरेपण, त्याच्या विरहाने आलेलं एकाकीपण या सगळ्या भावना ती केवळ आपल्या चेहर्‍यावरील विभ्रम आणि डोळ्यातील भावांच्या साह्याने सादर करते.

शेवटी हळुच त्या पावसाळी नभालाच सुचवते की जा, तू त्या गावी जा जिथे माझा साजण आहे. त्याला माझ्या हृदयाची वेदना सांग. त्याला म्हणावे “तुझी ही प्रिया तुझ्या विरहाने वेडीपिशी झालेय. तिच्या डोळ्यातील आसवांना खंड नाहीये. जा लवकर जा माझ्या साजणाला माझा निरोप दे….

जैय्यो जैय्यो री देस पिया कें
कहियो दुखडे तू मेरे जियांकें
कहियो छम छम रोये, अंखिया ना सोये
हुयी याद में पी की बावरीया…
जा री जा री ओ कारी बदरिया…..

लतादीदींची सगळीच गाणी अप्रतिमच असत. पण खासकरून कै. आण्णांसाठी लतादीदींनी गायलेली सर्व गाणी म्हणजे त्यांच्या गानप्रतीभेचा उत्तुंग आविष्कारच होती. आण्णांसाठी लतादीदी जेवढ्या आत्मियतेने गायल्या तेवढ्या त्या एक ‘मदनमोहन’ सोडला तर कुणासाठीच गायल्या नसतील.

हे गाणं इथे पाहता, ऐकता येइल.

तू नळीवर इथे ” जा री जा री ओ कारी बदरीया………………...

किंवा इथे…

गाणं आवडलं तर नक्की कळवा ! 🙂

विशाल….

 

3 responses to “जा री जा री ओ कारी बदरीया…….

 1. अभिषेक

  डिसेंबर 20, 2011 at 2:09 pm

  गाण आवडायचा प्रश्नच येत नाही विशालदा… लेख ही तुम्ही छान लिहिला आहे…

   
 2. haris

  जुलै 11, 2012 at 1:16 सकाळी

  great one i like respect your eforts

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: