RSS

इजुआबा

04 ऑक्टोबर

तसं त्याचं नाव ’विजय जगताप’ पण सगळे त्याला इजुआबाच म्हणायचे.

मी त्याला सगळ्यात प्रथम बघितलं तीच मुर्ती अजुनही माझ्या डोळ्यासमोर आहे. मी त्याला कधी उभा राहीलेला बघितलाच नाही. मुळात मी त्याला पहिल्यांदा पाहीलाच ते मुळी तीन चाकी सायकलवर बसलेला. उभा राहीला असता तर सहा-साडे सहा फ़ुट नक्कीच दिसला असता. गव्हाळ, पण उन्हाने रापलेला वर्ण. अंगात एक पांढरी , मळकट बंडी, कंबरेला गुंडाळलेली चौकड्यांची लुंगी. (कंबरेच्या खालचे सगळे अंग लकव्याने अधु झालेले) पण डोळ्यात एक विलक्षण बेरकी चमक. बोलणं आश्चर्य वाटेल इतकं मृदु, कारण त्याच्या तीन चाकी सायकलला कायम एक कुर्‍हाड लटकलेली असायची. माझे काका सांगत की त्याच्याकडे एक देशी कट्टा (बंदुक्)पण होती. चेहर्‍यावर (कपाळावर) एक मोठा, तिरका व्रण. बहुदा चाकुचा असावा. इजुआबाला विचारले की हसुन म्हणायचा.

“देवा, लै मोटीलट कानी हाये ती. तुमी न्हान हैसा अजुन. मोटे जालात की सांगन कदीतरी.”

मी मोठा होइपर्यंत तो राहीलाच नाही. मी ११-१२ वर्षाचा होइपर्यंतच तो गेला. त्यावर्षी गावी गेलो तेव्हा नेहमीप्रमाणे रावताच्या ‘फायुस्टार’ पाशी त्याची सायकल दिसली नाही. मी काकांना विचारले…

“काका, इजुआबा कुठे गेला?”

“गेला रे तो देवाघरी मागच्या महिन्यात.”

“त्यो मुडदा कसला जातुया देवाघरी, ब्येणं नरकातच जायाचं त्ये!”

दुध्यांची म्हातारी फुस्स करुन एखादा नाग अंगावर यावा तशी वसकली. तसे काका समजावणीच्या सुरात म्हणाले…

“गेला आता आज्जे तो. मेल्या माणसाच्या माघारी कशाला वाईट बोलायचं. त्याची कर्मं त्याच्याबरोबर. आन शेवटी शेवटी सुधारला होताच ना तो? त्याच्यामुळं तर रावताचा सुन्या वाचला ना?”

मला एक गोष्ट कळली नाही की इजुआबासारखा माणुस नरकात कसा जाईल? कारण इजुआबा गावातल्या तमाम चिल्ल्या-पिल्ल्यांचा (माझ्यासहीत) अतिशय लाडका होता. तिथंच रावताच्या ‘फायुस्टार’ ‘चा’ टपरी पाशी कायम त्याचा ठिय्या असायचा. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक पोरा-बाळांना त्याच्या तीन चाकी सायकलच्या हॅंडलला अडकवलेल्या एका मळकट पिशवीतून गोळ्या, चॉकलेटं, कधी आठवड्याच्या बाजारात घेतलेली गाठी शेव, कधी रेवड्या असं काही बाही वाटत असायचा इजुआबा. माझ्याशी तर त्याचं खुप जमायचं. लहान पोरांना एवढा जिव लावणारा इजुआबा नरकात कसा जाईल हेच मला कळायचं नाही.

अगदी बर्‍यापैकी कळायला लागेपर्यंत मला त्याचे नाव ‘इजुआबा’ आहे असे वाटत होते. नंतर कधीतरी कळाले त्याचे नाव विजय आहे म्हणून.

मी एकदा त्यालाच विचारले होते.

“असलं कसलं रे तुझं नाव? इजुआबा…!”

तसा हसुन त्यानं माझ्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाला..

“इशुदेवा, आवो इजुआबा न्हाय काय माजं नाव. त्ये आपलं समदे गाववाले म्हन्तेत म्हुन पडलं हाये. माजं नाव आहे ‘इजय जगताप’. ”

“अव्वा, म्हणजे तुझं आणि आमच्या आण्णांचं नाव एकच आहे की!” मी अजुन खुश. सगळ्या गावाला सांगत फिरलो, इजुआबाचं आणि आमच्या आण्णांचं नाव एकच आहे म्हणुन.

“नगो रं लेकरा ! न्हाय त्या माणसाशी नगो बराबरी करु माजी. आरं इजु आण्णा म्हंजी देवमानुस आन मी जनमजात राकुस हाय बाबा!”

लहान होतो तेव्हा, फारसं काही कळलं नाही. मीही विसरुन गेलो. रोज रोज गोळ्या-चॉकलेटं देणारा माणुस राक्षस कसा असेल बरं? वेडाच आहे इजुआबा. मी आपली स्वतःचीच समजुत घालुन घ्यायचो. तसे आमच्या गावात दोन इजुआबा होते. एक थोरला…रावताचा आन दुसरा हा तीन चाकी सायकलवरचा.

‘इजुआबा, तुला तुझ्या आईने पोलियोचा डोस दिला नव्हता का रे?”

एकदा मी त्याच्या कंबरेखालच्या लुळ्या पडलेल्या अंगाकडे बघत विचारलं. तसा आकाशाकडे बघत खिन्न हसला…

“न्हाय वो देवा, तिने समदं येवस्तितच केलं हुतं माजंबी. ही माज्याच करनीची फळं भोगतुया बगा.”

“म्हणजे?”

“जावु द्या, न्हान हायसा..!”

त्याच्याबद्दल काही विचारायला गेलं की तो त्याचं नेहमीचं उत्तर देवुन माझी बोळवण करायचा आणि पिशवीतला खाऊ काढून हातात कोंबायचा.

“जावा, कुणी बिगिटलं तर वरडल तुमास्नी.”

हे ही एक कोडंच होतं. लहानपणापासुन मी गावातल्या चिल्ल्या-पिल्ल्यांना त्याच्याकडून खाऊ घेताना बघत आलो होतो. पण गावातली मोठी माणसं आपली पोरं त्याच्याबरोबर दिसली गेली की जबरदस्तीने ओढून न्यायची, त्यांच्यावर डाफरायची. मलाही गावातल्या म्हातार्‍या-कोतार्‍या नेहमी सांगायच्या.

“इशुनाथा, त्या इज्याबरुबर नगा बोलत जावू. वंगाळ माणुस हाये त्यो.”

पण गंमत म्हणजे सगळ्या गावाचे त्याच्याबद्दल वाईट मत असुनही माझ्या आण्णांनी किंवा काकांनी मला कधीच अडवले नव्हते. खरेतर आण्णा आणि काकादेखील त्याच्याशी कधीही बोलायचे देखिल नाहीत. आणि माझा आणि त्याचा सहवास अवघा पाच-सहा वर्षाचा. तेही मी दर ३-४ महिन्यातुन काका सोलापूरी आमच्या घरी आले की त्यांच्याबरोबर घोटीला जायचो ४-५ दिवसांसाठी तेवढ्यापुरताच. पण तेवढ्यातही इजुआबाबरोबर मस्त दोस्ती झाली होती. मला इजुआबा खुप आवडायचा. तो मला कधीच अरे-तुरे करायचा नाही. नेहमी इशुदेवा अशी गोड हाक मारायचा. कधी-कधी साड्याला गेला की माझ्यासाठी तिथुन चांदोबाची पुस्तके आणुन ठेवायचा.

उदरनिर्वाहासाठी तो काय करायचा हे तो जिवंत असेपर्यंत कधी कळालेच नाही. मुळात या गोष्टीवर विचार करण्याइतके माझे वयच नव्हते तेव्हा. पण तो गावातून राऊंड मारायला निघाला की त्याच्या तीन चाकी सायकलच्या मागच्या लोखंडी पट्टीवर उभे राहायला खुप आवडायचे मला. त्याच्या लोखंडी सीटला धरुन उभे राहायचे, मध्येच त्याच्या पिशवीत हात घालुन जे काही आत असेल ते बचकभर काढून तोंडात ताकत राहायचे. का कोण जाणे पण अधु असुनही सगळा गाव त्याला वचकुन असायचा. आपल्या मुलांवर ओरडणारे इजुआबाला मात्र काही म्हणायचे नाहीत.

आणि असा इजुआबा नरकात कसा जाईल?

जसा-जसा मोठा होत गेलो तसे दर ३-४ महिन्यात गावाकडे पळणे कमी झाले. आण्णांचीसुद्धा पुणे-मुंबई अशा ठिकाणी बदली होत होती. माझीही शाळा (हायस्कुल) सुरु झालेले. त्यामुळे गावाकडे जाणे हळु हळु कमीच होत गेले. इजुआबाचाही विसर पडत गेला. शाळा संपली, कॉलेज सुरू झाले. यथावकाश ते ही संपले. नोकरी लागली मग लग्न झाले. लग्नानंतर कुलदेवाच्या दर्शनासाठी म्हणुन गावाकडे गेलो. घोटीचा दुधाळ्याचा महादेव हा आमचा कुलदेव. त्या रात्री सगळे गप्पा मारत बसलेले असताना काकुंनी अचानक जुने अल्बम काढून आणले.

“बघ तुझा नवरा लहानपणी कसा बावळट होता.” हे बहुदा आपल्या नव्या सुनेला पुराव्यानिशी दाखवायचे तिला हुक्की आलेली असावी. ते लोक फोटो बघत होते. या कोण? ते काका कोण आहेत? अय्या, ही छोटी मुलगी केवढी गोड दिसत्येय. ही हंबीरकाकाची बायडी बर्का, आता भारी टेचात राहतेय. लहानपणी बघ कशी शेंबडी दिसत्येय. तुझ्या नवर्‍याला चिडवायचा हंबीरकाका..काय जावायबापु म्हणुन!” या आणि असल्या अनेक निरर्थक (?) गप्पा सुरू होत्या ते कृष्ण्-धवल फोटो बघत. माझी अवस्था जाम वाईट. कारण यच्चयावत सगळ्या फोटोत आमची एकच पोज. हाताची घट्ट घडी घातलेली. तेल लावुन चोपुन्-चापुन बसवलेले केस. हातात एक कुठलंतरी पुस्तक (हे वेड मात्र तेव्हापासुन होतं) त्यामुळे प्रत्येक फोटो बघताना बायको तिरक्या नजरेने माझ्याकडे बघत हसायची. (ती कुत्सितपणे हसते असे मला उगाचच वाटत होते तेव्हा…आता खात्री पटलीय 😉 )

“हे कोण आहेत?”

एकदम उत्सुकतेने विचारलेला तो प्रश्न ऐकला आणि मीही सहजच अल्बमवर नजर टाकली. तो फोटो कुणाचा आहे हे लक्षात आले आणि मी अल्बमवर झडपच घातली. तो माझा इजुआबा होता.

“अरे काका, हा तर इजुआबा आहे. त्याचा फोटो कधी काढला होता?”

या फोटोतला इजुआबा मात्र टेचात आमच्या आण्णांच्या खांद्यावर हात टाकुन उभा होता. बहुदा आण्णांच्या आणि त्याच्या तरुणपणीचा फोटो असावा तो. त्यावेळी तो पंचवीस एक वर्षाचा असावा बहुदा.

“माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा होता विजु. पण माझ्याच शाळेत होता. आमची मैत्री तेव्हापासुनची होती.”

आण्णा शांतपणे म्हणाले. मी उडालोच…

“मग, तुम्ही आणि काकांनी त्याच्याशी बोलणे का टाकले होते?”

आता मी मोठा झालो होतो. लहानपणीची अजाण परिस्थिती आता राहीलेली नव्हती. काय ते कळणे हा माझा अधिकारच होता. कारण इजुआबाने गावात सगळ्यात जास्त जिव मलाच लावला होता.

आण्णांनी तो फोटो माझ्या हातातून घेतला आणि फाडून टाकला.

“तो चुकीच्या मार्गाला लागला होता. माझ्याशी मैत्री ठेवण्याचा अधिकार त्याने तरुणपणीच गमावला होता.”

आण्णा अगदी शांतपणे म्हणाले आणि अचानक घराबाहेर निघुन गेले.

“विशु, तू आता लहान राहीलेला नाहीयेस. म्हणून तुला सगळे सांगायला काही हरकत नाही. पण प्लीज, यापुढे चुकुनही आण्णापुढे विजुचा विषय काढू नकोस. त्याला प्रचंड मनस्ताप होतो त्या आठवणींनी.”

काका हळुवार स्वरात म्हणाले आणि माझ्या खांद्यावर हात टाकून मला बाहेर घेवुन आले. घरातलं वातावरण अचानक शांत झालं होत<.

"आण्णा आणि विजु एकाच शाळेत होते. दहावीपर्यंत. विजु प्रत्येक वर्गात २-३ वर्षे काढणारा एक रानगट मुलगा होता विशु. आण्णाची त्याची ओळख कशी झाली कुणास ठाऊन. पण त्या दोघांचे खुप जमायचे. आण्णापेक्षा ८ वर्षांनी मोठा असलेला, शाळेच्या हेड मास्तरला दाद न देणारा विजु, आण्णाला मात्र कायम दबकुन असायचा. कारण काहीही असो पण त्यांचे जमायचे. नंतर ९ वीतच त्याने शाळा सोडली. आणि आण्णा घरच्या परिस्थितीमुळे सोलापुरला अनाथ विद्यार्थी गृहात राहून शिकला. एस्.एस्.सी. नंतर आण्णाने पण आपले शिक्षण सोडले आणि नोकरी धरली. आम्हा भावंडांची जबाबदारी डोक्यावर घेतली होती ना! मी डबल ग्रॅज्युएट झाली, सुरेखा बी.एड. झाली. सुमनने नर्सिंग केलं. कुंदीचं मात्र आप्पांनी (माझे आजोबा) लहानपणीच लग्न लावुन दिलं होतं. खरं तर सुरेखा-सुमनचंही व्हायचं पण आण्णाने विरोध केला. मी पोरींना शिकवणार म्हणाला. म्हणून आम्ही शिकलो.

पण या कालखंडात त्याचा विजुशी असलेला संपर्क सुटला होता. आम्हालाही शिकायला म्हणुन बार्शीला ठेवलं होतं. विजुवर आण्णाचाच काय तो अंकुश होता. आण्णा सोलापूरला गेला आणि विजु मोकाट सुटला. आधी गावात लहान्-सहान चोर्‍या, मारामार्‍या करत मग हळुहळु सोलापूरला पोचला विजु. हळु हळु तो पक्का गुन्हेगार बनत गेला. आण्णाची आणि विजुची पुन्हा भेट झाली. ती सोलापूरच्या तुरुंगातच. आण्णा पोलीसात जमादार असताना कुठल्यातरी एका गुन्हेगाराला सोलापूर कारागृहात पोचवायला गेला होता. तिथे त्याला विजु भेटला. एका हाफ मर्डरच्या गुन्ह्याखाली आणला होता तिथे त्याला. कोर्टात केस चालु होती. कच्चा कैदी म्हणुन होता तिथे तो. आण्णा क्षणभरच बोलला असेल त्याच्याशी. खुप रडला आण्णा त्या दिवशी घरी येवुन. मी आण्णाला रडलेला बघीतला ते फक्त तेव्हाच. त्या आधीही नाही आणि नंतरही नाही.

नंतरही बातम्या मिळतच राहील्या. त्या केससाठी दोन- अडीच वर्षाची शिक्षा भोगुन विजु बाहेर पडला होता. त्यानंतर त्याच्याबद्दल कळाले ते पुन्हा वर्तमानपत्रातुनच. एका मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती त्याला. त्याला जेल मध्येच काही कैद्यांनी बेदम मारला. इतका मारला की त्याचा कंबरेखालचा सगळा भागच लुळा पडला. पोलीस रुग्णालयात काही वर्षे उपचार झाले त्याच्यावर. नंतर मात्र पोलीसांनीच त्याला घोटीत आणुन टाकला. काही दिवसात बरा झाला तो. त्यानंतर कधीतरी ती तीन चाकी सायकल विकत घेतली त्याने. आता आपल्या सगळ्या अपराधांबद्दल लाज वाटायला लागली होती त्याला. पण त्याचा शेवटचा गुन्हाच असा होता की गावाने हळु हळु त्याला परत स्विकारले पण आण्णाने मात्र त्याला कधीच माफ केले नाही. मी आणि आण्णा म्हणुनच त्याच्याशी कधीच बोलत नव्हतो. पण कुठेतरी मनात त्याच्याबद्दल असलेला ओलावा टिकून होता, किंवा त्याच्या पश्चातापाची खात्री पटली असेल कदाचित. म्हणुन आण्णाने तुला त्याच्याबरोबर फिरायला कधीच मनाई केली नाही.

"अच्छा, म्हणुन त्याने मला त्याच्या अपंगत्वाबद्दल कधीच सांगितले नव्हते तर. बाय द वे तो गेला कसा?"

अरे त्यावेळी गावात बैलगाडीच्या शर्यती होत्या. देवीच्या माळावर सगळे जमलेले. कसे कोण जाणे पण शिंद्यांची गाडी उधळली आणि बैल सुटला. त्या उधळलेल्या बैलासमोर जायची देखिल लोकांना भीती वाटत होती. नेमका बैल रावताच्या सुन्याच्या अंगावर आला. ते १०-१२ वर्षाचं पोर घाबरुन गेलं. पण बैलाने सुन्याला ढुसणी द्यायच्या आधीच विजुने आपली सायकल मध्ये घातली. बैलाने त्याला सरळ शिंगावरच घेतला. त्यातच गेला विजु! आयुष्यभर केलेल्या पापांसाठी एकदाच प्रायश्चित घेतलं त्याने.

"मग आता त्याने प्रायश्चित घेतलं होतं तरी आण्णा त्याला माफ करायला तयार का नाहीत?"

मी विचारलं.

नाही कसं रे इशुनाथा. आण्णानं तर त्याला लै आधीच माफ केलं होतं. माफ केलं नसतं तर आण्णाने तो मरेपर्यंत त्यालाही कळु न देता त्याचा सगळा खर्च चालवला असता का? त्याला वाटायचं, ह्यो राऊतच त्याला दर म्हैन्याला पैसं देतोय. पर त्ये पैशे आण्णानं दिल्यालं असायचं माझ्याकडं. पर तुला तं म्हायित हाये ना, आण्णा कसला कडक पोलीसवाला हाय त्ये. एक पोलीस म्हणुन त्यानं कधीच माफ नाय केलं विजुला.

जवळच उभा असलेला हंबीरकाका माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाला.

माझा माझ्या आण्णांबद्दलचा आदर शेकडो पटींने वाढला होता.

विशाल कुलकर्णी

 

6 responses to “इजुआबा

 1. Mandar

  ऑक्टोबर 6, 2011 at 2:02 pm

  Lekh tar sundar ahech.
  Navin format awadla re design!!

   
 2. देवेंद्र चुरी

  ऑक्टोबर 8, 2011 at 10:40 सकाळी

  मस्तच लिहाल आहेस विशालदा…सगळ चित्र डोळ्यापुढे उभ राहील…अण्णांना सलाम यार ….तरीही का कोणास ठाऊक पण अस वाटतेय कि अण्णांनी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायला हव होत एकदातरी ……

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 13, 2011 at 10:21 सकाळी

   धन्यवाद देवेन !
   ते त्यांनाही मान्य आहे. पण आदतसे मजबूर ! त्याचे सगळे गुन्हे माफ़ केले असते त्यांनी. पण बलात्कार हा गुन्हा त्यांच्या लेखी हत्येपेक्षाही जास्त जघन्य आहे. हत्येने माणुस फ़क्त मरतो, बलात्कार त्या स्त्रीला आयुष्यभर मरण भोगायला लावतो. 😦

    
 3. Priya

  नोव्हेंबर 10, 2011 at 5:48 pm

  hi gosht khari ahe? 😦
  heart touching 😦

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: