RSS

मला खात्री आहे : भाग ३

29 जुलै

“माय गॉड, याची अवस्था तर एखादे भुत बघीतल्यासारखी झालेय.”

त्याचा अवतार अगदी बघवत नव्हता. केस अस्ताव्यस्त झालेले. डोळे लाल भडक. त्यात कसलीतरी अनामिक भीती भरलेली…! त्याने चोरट्या नजरेने आधी इकडे तिकडे आणि मग हळुच राणेंकडे बघीतले. मग थरथरत्या आवाजात म्हणाला.

“अहं हळु बोला, त्याला सगळं ऐकु जातं. त्याच्यापासून काहीच लपत नाही. तो…तो परत आलाय!”

मला खात्री आहे : मागील भाग

आता पुढे
*************************************************************************************************************************
“अहं हळु बोला, त्याला सगळं ऐकु जातं. त्याच्यापासून काहीच लपत नाही. तो…तो परत आलाय!”

तसे राणे चरकले.

“आल्यापासुन त्याचं असंच चाल्लय राणेसाहेब. मध्येच थोडा वेळ नॉर्मल होतो नंतर लगेच परत असा काहीतरी विचित्र बोलायला लागतो. सुकुमार, चल हे साहेब तुला सुरक्षीत ठिकाणी घेवुन जायला आलेत. तिथे तो नाही येवु शकणार. हे साहेब अडवतील त्याला.”

सुकुमारने मान वर करून राणेंकडे पाहीले. क्षणभर पाहातच राहीला आणि अचानक खदखदा हसायला लागला…! हसता हसता अचानक थांबला आणि राणेंना खुण करुन जवळ बोलावले. राणे त्याच्याजवळ गेले. त्याने राणेंच्या कानाजवळ आपले तोंड आणले…

आणि…

एकदम ओरडला..

“मी नाही सांगणार जा! तो मारेल मला !!”

तसे राणे एकदम सुन्न होवून गेले. ही केस भलत्याच स्तरावर चालली होती. असे नक्की काय घडले होते तिथे की बापटच्या डोक्यावर असा विचित्र परिणाम झाला असावा. की हा माणुस नाटक करतोय?

आश्लेषा सुन्न होवून त्यांच्याकडे पाहात उभी होती.

“इथे आल्यापासुन त्याचं हेच चाललय साहेब. म्हणुनच मी म्हटलं त्याला वैद्यकीय उपचारांची नितांत आवश्यकता आहे. ”

“त्याला कसलातरी प्रचंड धक्का बसलाय. सर्वात आधी त्याला एका मानसोपचार तज्ञाकडे नेणं गरजेचं झालय. कारण तिथे नक्की काय झालय आणि हा ‘तो’ कोण आहे यावर फक्त सुकुमारच प्रकाश टाकू शकतो. आपण असे करु या आमच्या डिपार्टमेंटच्या मानसोपचारतज्ञाकडे त्याला घेवुन जावुया. मी डॉ. निंबाळकरांशी बोलतो. त्यांचा संमोहनविद्येचाही चांगला अभ्यास आहे. आपण त्यांची मदत घेवून बघु.”

राणेंनी बापटच्या चेहर्‍याकडे बघत ऐकवलं. पण त्याच्या चेहर्‍यावर काहीही भाव नव्हते. त्याचा भावहिन चेहरा पाहील्यावर राणेंची थोडी निराशाच झाली. तो जर नाटक करत असेल तर संमोहनतज्ञाबद्दल ऐकल्यावर त्याची थोडी तरी चलबिचल होइल असे त्यांना वाटले होते. पण एकतर त्याच्यावर खरोखरीच काहीतरी वाईट प्रसंग गुदरलेला होता किंवा तो अगदीच निर्ढावलेला तरी होता.

राणेंनी त्याला कुठलीही संधी द्यायची नाही असेच ठरवले होते, त्यामुळे राणे त्याला थेट डॉ. निंबाळकरांकडेच घेवून गेले. सोबत आश्लेषा होतीच. ती पोरगी बिचारी मैत्रीपायी नाहकच या सगळ्या भानगडीत अडकली होती. तोही प्रश्न राणेंच्या डोक्याला कुरतडत होता.

“सुकुमारला अशा विचित्र परिस्थितीत तिची आठवण कशी काय राहीली? तीचीच आठवण का आली? त्यांच्यात खरोखर केवळ निखळ मैत्री आहे की आणखी काही. ह्म्म्म, या आश्लेषाला बोलतं करायलाच हवं पण ते तिला तिळमात्रही संशय येवु न देता.”

राणेंनी बापटला डॉ. निंबाळकरांच्या स्वाधिन केलं. त्याआधी डॉक्टरांना सर्व प्रकरण नीट समजावून सांगितले , अगदी त्या रक्तरंजीत चिठ्ठीसहीत.

“तुम्ही थोडा वेळ वाट पाहा बाहेर. मला सुकुमारशी थोडं एकांतात बोलायचय. तुम्ही कुठे फ़िरुन आलात तरी चालेल तासभर. निघा आता…”

डॉक्टरांनी दोघांनाही अक्षरश: बाहेर हाकलुन लावले. ही संधी चांगली होती. तसेही दुपार व्हायला आली होती. राणेंना बराच वेळ एक संशय येत होता की बहुदा आश्लेषा सुकुमारच्या प्रेमात असावी.

“चला तिथे त्यांना तासभर तरी लागेल आता. तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेवु या. निदान कॉफीतरी घेवु जवळच्या एखाद्या कॉफी हाऊसमध्ये.”

राणेंनी सुचवले. थोडा विचार करुन आश्लेषा कॉफीला तयार झाली. तसेही सुकुमारच्या अशा अवस्थेत काही पोटाला लागणार नव्हतेच. त्यापेक्षा कॉफी बरी. असाही तासभर वेळ घालवायचा होताच. दोघे जवळच्याच एका बरिस्तामध्ये शिरले.

राणेंनी ऑर्डर दिली.

“सुकुमार, तुमच्याकडे आला तेव्हा त्याची अवस्था कशी होती? म्हणजे कपडे वगैरे फ़ाटलेले होते, काही जखमा वगैरे?”

“नाही सर, कपडे मळलेले होते, पण फ़ाटलेले नव्हते. तो प्रचंड घाबरलेला होता. खुप थकलेला होता. कित्येक मैल चालत आल्यासारखा. त्याची अवस्था पाहून मी त्याला फ़ारसे प्रश्न नाही विचारले. आला की सरळ झोपलाच. पाणी सुद्धा प्यायला नाही.”

“आश्लेषा, तुम्ही सुकुमारला कॉलेजच्या दिवसांपासुन ओळखताय ना? तसा तो खुप हुशार होता असे मी ऐकलेय त्याच्या स्टाफ़कडून. कॉलेजलाईफमध्ये सॉलीड फेमस असेल ना तो?”

राणेंनी सुकुमारची प्रशंसा करत अलगद आश्लेषाच्या आवडीच्या विषयाला हात घातला आणि आश्लेषा बोलायला लागली.

“होता म्हणजे काय? तो अजुनही तेवढाच हुशार आहे. शैलीच्या आकस्मिक मृत्युने थोडासा भांबावलाय इतकेच. नाहीतर तो खुप स्ट्राँग आहे तसा….”

“पण वाटत नाही. एवढ्या लवकर त्याचा तोल गेला म्हणजे…………”

राणे व्यवस्थितपणे आगीत तेल ओतायचे काम करत होते. त्यांना हवा तो परिणाम झालाच आनि आश्लेषा तावातावाने त्यांच्या कॉलेजलाईफबद्दल बोलायला लागली……

थोड्यावेळाने दोघे परत डॉक्टरांकडे आले. तोपर्यंत डॉक्टरांचे कामही संपलेले होते.

“राणे, त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्युचा सॉलीड शॉक बसलाय. त्यामुळे तो काय मनाला येइल ते बडबडतोय. सद्ध्या मी त्याला हिप्नोटाईज करुन झोपवलय. त्याला विश्रांतीची अतोनात आवश्यकता आहे. त्याचं खुप प्रेम असावं आपल्या पत्नीवर. तिच्या मृत्युने तो खुपच डिस्टर्ब झालाय.”

डॉक्टरांच्या चेहर्‍याकडे बारकाईने बघत राणेंनी आश्लेषाच्या चेहर्‍याकडे नजर टाकली. तिचा चेहरा एवढासा झाला होता. का कुणास ठाऊन पण राणेंना वाटले की डॉक्टर काहीतरी लपवताहेत त्यांच्यापासुन. राणेंनी लगेचच निर्णय घेवुन टाकला.

“मॅडम, तुम्ही त्याला आपल्याबरोबर घेवुन जा. मी आत्ताच त्याला अटक करत नाहीये. पण इथल्या पोलीस चौकीचा एक कॉन्स्टेबल कायम तुमच्याबरोबर असेल. काहीही समजा, पण जोपर्यंत तो निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी रिस्क घेणार नाही. त्याला या अवस्थेत तकॉन्स्गरज आहे म्हणुन मी ही रिस्क घेतोय. पण प्लीज, गैरफायदा घेवु नका.”

तसा आश्लेषाचा चेहरा फुलला.

“थँक्स अ लॉट सर. मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा मी त्याला घेवुन पोलीस चौकीला हजर होइन. ”

“इथे नाही, त्यासाठी तुम्हाला त्याला घेवुन माथेरानला यावे लागेल. मी माथेरान पोलीस चौकीला असतो.”

“मी येइन साहेब, तुम्ह्मी सांगाल तिथे येइन. मला फक्त सुकुमार यातुन बरा व्हायला हवा आहे.”

“ठिक आहे, दोन दिवस आराम करा. सोमवारी त्याला घेवुन माथेरानला पोहोचा. थोडा वेळ थांबा इथे. मी इथल्या पोलीस स्टेशनशी बोलुन एक कॉन्स्टेबल तुमच्या बरोबर देंण्याची व्यवस्था करतो. एक लक्षात ठेवा, तुमच्यावर नजर ठेवणे एवढेच कारण नाहीये. जर सुकुमार खरोखर निर्दोष असेल तर आता धोका त्यालाही आहे. कारण दोन मृत्यु घडलेत आणि त्या दोन्ही मृत्युंचा तो एकुलता एक साक्षीदार आहे. यातला सुकुमारला माहीत असलेला हा जो कोणी ‘तो’ आहे, तो खरोखरच असेल तर तो सुकुमारच्या मागावर असणार. सुकुमार जरा यातुन सावरला की मला त्याचा जबाब घ्यायचा आहे. त्यासाठी सोमवारी तुम्ही त्याला घेवुन माथेरानला येताय…!”

राणेंच्या त्या साध्या बोलण्यातही एकप्रकारची जरब होती. आश्लेषाने मान डोलावली.

तिला सुकुमारपाशी सोडून राणे डॉक्टर निंबाळकरांच्या केबिनकडे निघाले. त्यांना खात्री होती की डॉक्टर नक्की काही तरी लपवताहेत.

“सुकुमारने तुम्हाला नक्की काय-काय सांगितले डॉक्टर?”

“राणे, मीही खरेतर थोडा विचारात पडलोय. मघाशी त्या मुलीसमोर मी बोललो नाही खरा. हि केस खरोखर खुप विचित्र आहेत. दोन शक्यता संभवतात. लहानपणापासुन मनात कसलीतरी भीती बसलेली असावी. पण मला ही सगळी स्किझोफ्रेनियाची लक्षणे वाटताहेत. हा आजार त्याला लहानपणापासुन असावा. मधल्या काही काळात तो मनाच्या कोपर्‍यात खोलवर दाबला गेला असावा बहुतेक. त्याला संमोहित करताना मी त्याला त्याची बालपणच्या काळात घेवुन गेलो. हे तेव्हापासुनच आहे. त्याने संमोहित अवस्थेत सांगितल्याप्रमाणे हा जो कोणी ‘तो’ आहे, तो त्याला लहानपणीदेखील भेटायचा. त्रास द्यायचा. कदाचित यावेळी तो शिशुपालला स्वत:च्या लहानपणीच्या ’तो’ बरोबर रिलेट करतोय. एकदा तर सुकुमार त्यातुन मरता मरता वाचलाय. कुठल्यातरी भीतीने, धक्क्याने त्याच्या मेंदुवर विलक्षण परिणाम केलाय खरा. पण सुदैवाने त्यामुळे तो वेडा होण्याच्या ऐवजी दोन भागात विभागला गेलाय.”

राणे भंजाळल्यासारखे त्यांच्याकडे बघत होते.

“डॉक्टर खरं सांगायचं तर तुम्ही जे सांगताहात, मला त्यातलं काहीही कळलं नाही.”

डॉक्टरांनी एक थंड सुस्कारा सोडला.

“ठिक आहे राणे. सुकुमारने मला सांगितलेली माहिती मी तुम्हाला सगळं स्पष्टच सांगतो…..! संमोहित अवस्थेत तो बोलायला लागला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आधी त्याला सहा महिन्यापुर्वीच्या त्या दिवसात घेवुन गेलो, जेव्हा शिशुपाल त्याला प्रथम भेटायला आला होता…..

****************************************************************************************

सुकुमार बापट….

त्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफीसात काम करत बसलो होतो. त्या युनिक केमिकल्सवाल्याशी फोनवर थोडं वाजलंच होतं माझं. अरे गेले दहा वर्षे त्याच्याकडून हायड्रोजन पेरॉक्साईड घेतो आम्ही. पण पठ्ठ्या ५% डिस्काऊंट वाढवुन द्यायला तयार नाही? तशात मकरंद दार वाजवुन आत आला. त्याच्या बरोबर असलेल्या शिशुपालला पाहून मी हादरलोच.

“शिशुपाल तू? अचानक , इथे कसा काय? कुठे होतास इतकी वर्षे?”

शिशुपालने तिरक्या नजरेने मकरंदकडे पाहीलं. ते लक्षात येवुन मी मकरंदला बाहेर जायला सांगितलं.

“सुकुमार, मी परत आलोय्…परत जायला!”

“मी समजलो नाही शिशुपाल. अरे, एकतर इतक्या दिवसांनी भेटला आहेस. लगेच जायच्या गोष्टी कसल्या करतोयस? थोडा वेळ थांब. मी माझं इथलं काम आटोपतो. मग दोघे मिळुनच घरी जाऊ. शैलीला केवढा आनंद होइल तुला भेटून.”

“बस कर यार हा साळसुद चांगुलपणा, मला कंटाळा आलाय आता. तुलाही पक्के माहिती आहे की माझ्या येण्याने शैलीला अजिबात आनंद होणार नाहीये. झालातर वैतागच होइल. तुम्ही लोकांनी माझ्या साधेपणाचा गैरफ़ायदा घेतलात. तुझ्या सांगण्यावरुन शैलीने माझ्याशी प्रेमाचे खोटेच नाटक केले. आधी हवी तेवढी माझ्या पैशांवर ऐश करुन घेतलीत आणि ……!”

“शिशुपाल अरे केवळ गंमत होती ती. आम्हाला वाटले नव्हते ते तु इतके गंभीरपणे घेशील म्हणुन. पण तू ते खरेच धरुन चाललास पण शेवटी कुठे ना कुठे ते थांबवायला हवे होते ना ? म्हणुन मग शेवटी नाईलाजाने सांगुन टाकले तुला. आणि त्यावेळी तूही ते अगदी खिलाडू वृत्तीने स्विकारले होतेस मग आत्ता अचानक असा सुर का?”

’काय करायला हवं होतं मी तिथे? इतक्या सगळ्या लोकांसमोर तुम्ही माझी टिंगल उडवलीत. इतक्या वर्षाच्या आपल्या मैत्रीचाही विचार केला नाहीत. तुम्ही मित्र म्हणून केलेली माझी थट्टा-मस्करी एकवेळ चालवुन घेण्यासारखी होती. पण चार चौघात तुम्ही चौघांनी मिळून ज्या पद्धतीने चार चौघात माझे हसे केलेत ते मी अजुनही विसरलेलो नाहीये सुकुमार. निदान माझ्या जिवलग मित्रांकडुन ही अपेक्षा नव्हती मला. आपलेआपण असताना तुम्ही काहीही केले असते तरी मी ते मित्राखात्यात खपवुन घेतले असते. तसेही माझ्यास दिसण्यावरुन कायमच तुम्ही माझी थट्टा करायचात, मी कधीच मनावर घेतले नव्हते. पण हा प्रसंग काळजावर खुप मोठा चरा उमटवून गेलाय सुकुमार. मी खुप प्रयत्न केला ते सगळे विसरण्याचा. पण नाही जमले. मी शैलीलाही विसरु शकत नाही आणि तुम्ही केलेला अपमान , ती अवहेलनाही विसरु शकत नाही.’

शिशुपालच्या स्वरात अतिशय खिन्नता होती, पण हळुहळु त्याचा स्वर तीव्र होत चालला होता. मी थोडा चरकलोच. कारण शिशुपाल जितका साधा होता तितकाच पझेसिव्हही होता आणि गर्भश्रीमंत असल्याने तितकाच हट्टीदेखील होता. त्याने जर मनावर घेतले असते तर आपला पैसा वापरून तो आमच्यावर सुड उगवु शकत होता. तसे झाले असते तर आम्हाला ते खुप जड गेले असते. म्हणुन मी थोडा त्याला चुचकारण्याचा प्रयत्न केला.

“अरे मित्रा, तु एवढे गंभीरपणे घेशील या सर्व गोष्टी याची कल्पना असती तर आम्ही अशाप्रकारे तुझी मस्करी केलीच नसती. एक काम करु… आपण सगळे पुन्हा एकदा भेटुयात. मी सगळ्यांना तुझी माफ़ी मागायला सांगतो. सॉरी यार… पण या गोष्टी इतक्या थराला जातील असे वाटले नव्हते.”

“आता वेळ निघुन गेलीय सुकुमार! मी तेच सांगायला आलोय. गेल्या काही वर्षात मी खुप मनस्ताप सहन केलाय. आता नाही सहन होत हे. मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय.”

“आत्महत्या……अरे काय बोलतोस काय तु? हा वेडेपणा आहे..शिशुपाल! अरे साधी थट्टा होती ती.”

“पण माझं शैलीवरचं प्रेम ही थट्टा नव्हती सुकुमार, रादर अजुनही माझं तिच्यावर तेवढंच प्रेम आहे. म्हणुनच मी हा निर्णय घेतलाय. अहं.. घाबरु नकोस ! मी आत्महत्या जरी करणार असलो तरी पोलीसांसाठी काही नोट वगैरे ठेवुन जाणार नाहीये.”

मी नकळत एक सुटकेचा नि:श्वास टाकला तसा तो जोरात हसला.

“अहं, तरी तुमची सुटका होणार नाहीये. मी परत येइन, खात्री बाळग. मी नक्की परत येइन. तुम्हा सगळ्यांना एकेक करुन बरोबर घेवुन जाईन. पण इतक्या सहजासहजी नाही. गेली काही वर्षे जे काही मी भोगलेय ते सगळे तुम्हाला भोगायला लावेन. खात्री बाळग… मी माझा एकेक शब्द पुरा करून दाखवीन.”

तो दार उघडुन निघुन गेला तरी मी त्याच्या रिकाम्या जागेकडे बघतच राहीलो. थोडा अस्वस्थ झालो होतो खरा. पण काय करु शकत होतो. आणि त्याचं परत येण्याची भाषा करणं वगैरे थोडंसं हास्यास्पदच वाटलं मला. मी थोड्या वेळाने विसरुनही गेलो.

पण खरा धक्का दोन दिवसानंतर बसला जेव्हा पोलीसचौकीतुन फोन आला.

“नमस्कार साहेब, मी सब इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय. आपण सुकुमार बापट का?”

“हो, मी सुकुमारच बोलतोय साहेब. काय काम होते माझ्याकडे?”

“बापटसाहेब, अ‍ॅक्चुअली आम्हाला काल माहीमच्या किल्ल्यापाशी एक डेड बॉडी सापडलीय. त्या व्यक्तीच्या खिश्यात एक चिठ्ठी सापडलीय की जर माझे काही बरे वाईट झाले तर माझा मृतदेह माझ्या मित्राच्या हवाली करण्यात यावा. माझ्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी त्याने करावेत अशी माझी इच्छा आहे. साहेब, चिठ्ठीवर तुमचे नाव आहे. प्रेत खुप वाईट अवस्थेत सापडले आहे. माश्यांनी खाल्लाय मृतदेह. तुम्हाला चौकषीसाठी इथे यावे लागेल.”

माझ्या काळजात लक्क झालं. पहिला संशय आला तो……………..

माझा संशय खरा ठरला. तो मृतदेह शिशुपालचाच होता. पण त्याने स्वतःवर अंत्यसंस्कार करायचे काम माझ्यावर का सोपवले हे मात्र मला कळले नाही. शिंदेंनी बराच वेळ जबाब घेतला माझा. शिशुपालने आत्महत्या का केली असावी? त्याला ओळखणारे तुम्हीच की आणखीही कोणी आहेत? परवा शिशुपाल तुम्हाला कशासाठी भेटला होता? (आयला हे पोलीस फारच फास्ट असतात. काल मेलेला माणुस परवा मला भेटला होता ही बातमी लगेच यांच्यापर्यंत पोचलीसुद्धा?) पण समहाऊ मी त्यांची खात्री पटवण्यात यशस्वी झालो.

शिशुपालच्या अंत्यसंस्काराला आम्ही सगळेच जमलो होतो. मी सगळ्यांना शिशुपालच्या भेटीबद्दल, विशेष्तः त्याच्या त्या चेतावणीबद्दल सांगितलं. सगळे थोडावेळ गंभीर झाले. पण शिशुपालची मृत्युनंतरही परत येवुन आम्हाला त्रास देण्याची कल्पना कुणालाच पटत नव्हती.

“अरे रागाच्या, संतापाच्या भरात बोलुन गेला असेल तो. असं कधी होतं का कुठे?”

आश्लेषाने तर सरळसरळ उडवून लावलं. पण शैली मात्र घाबरली होती. कारण शिशुपालची अशी अवस्था होण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आम्ही दोघेच जबाबदार होतो. तो एक साधा विनोद होता आमच्या दृष्टीने (खरेतर आता त्याला एक साधा विनोद म्हणणेही कसेसेच वाटत होते. त्या साध्या (?) विनोदाने शिशुपालचे प्राण घेतले होते.) पण मस्करीची कुस्करी झाली होती. खरेतर आमचे चुकलेच होते. एक जवळचा मित्र होता शिशुपाल. थट्टा आपल्या-आपल्यात झाली असती तर चालली असती. पण आम्ही तर त्याला सगळ्या कॉलेजसमोर फजीत केले होते. एका अर्थी आम्हीच त्याच्या मृत्युला कारणीभूत ठरलो होतो. दिवस हळु हळू जात होते. हा हा म्हणता ४-५ महिने उलटून गेले. पण शैली दिवसेंदिवस खचतच चालली होती. तिच्या नोकरीच्या ठिकाणाहून देखील वारंवार तक्रारी यायला लागल्या होत्या. कामात वारंवार चुका होणे, लक्ष नसणे , भलतीकडेच हरवलेली असणे असे प्रकार तिच्या बाबतीत घडायला लागले होते. मग सगळ्यांचे म्हणणे पडले की मी तिला घेवून कुठेतरी बाहेर फिरुन यावे. मुर्ख लेकाचे ! अरेर गेला तो शिशुपाल, आता त्याच्या त्या मुर्खपणाच्या धमक्यांना महत्त्व देवुन मी विनाकारण माझ्या रजा वाया घालवायच्या, पैसे जाणार ते वेगळेच. मला ते पटत नव्हते.

पण शेवटी मेजॉरीटीचे म्हणणे मला ऐकावेच लागले. त्या घटनेनंतर ४-५ महिन्यांनी गृपच्या सल्ल्यावरून मी शैलीला कुठेतरी आउटींगला घेवुन जायचे ठरवले. पैसे खर्च करायची इच्छा नसताना सुद्धा. तिलाही या सगळ्यातून चेंज हवा असल्याने (आणि माझ्याकडून अशी ऑफर येणे दुर्मीळच असल्याने) ती लगेच तयार झाली……!”

“ह्म्म्म…..!” इथपर्यंतची लिंक तर जुळली. पण पुढे तिथे, माथेरानला नक्की काय झालं सुकुमार?”

“माथेरान……….! त्या शिशुपालमुळे हा नाहक खर्च गळ्यात पडला होता माझ्या. शनिवारी एका दिवसात शैलीने चक्क सातशे रुपये खर्च केले. पण शैली खुश होती. तिच्या डोक्यातुन शिशुपालाचे विचार कुठच्या कुठे गायब झाले होते. त्यामुळे मी ही जरा निवांत झालो होतो. शैलीच्या आनंदासाठी एवढा पैसा खर्च करणे…., पण ठिक आहे. तिला त्याचा उपयोग झालाय ना. मग नो प्रॉब्लेम! पैसे काय कुठल्यातरी टेंडरमध्ये मिळवता येतील. आपल्याला काय अवघड आहे? त्याच खुशीत मी चक्क दुसर्‍या दिवशी म्हणजे रवीवारी चार पॉइंटसाठी एक घोडेवाला ठरवायचे मान्य केले. शैली प्रचंड खुश होती. क्षणभर मलाही वाटून गेले की आपल्या तथाकथीत काटकसरीपायी आपण आयुष्याला एका मोठ्या आनंदाला मुकत तर नाही आहोत?

त्या रात्री शैली एखाद्या नववधुसारखी लाजत होती. खुप जुन्या आठवणी निघत होत्या. मी सवयीप्रमाणे आरशासमोर उभा राहून दाढी करत होतो. एकदम शैली म्हणाली………

“आपण खुप चुकीचं वागलो ना रे सुकु. आपण शिशुपालच्या बाबतीत एवढा अतिरेक करायला नको होता. आपला जवळचा मित्र होता तो.”

“जाऊ दे गं. जे झालं ते झालं. आता पुन्हा त्याची आठवणही नको.” मी तिची समजुत काढत म्हणालो…….

“असं कसं? असं कसं विसरता येइल सगळं?”

“अरेच्चा शैलु, तुझा आवाज असा कसा काय वाटतोय फाटल्यासारखा अचानक?”

मी वळून शैलीकडे बघीतलं. पण शैलीचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. ती रुमच्या दरीच्या बाजुला असलेल्या खिडकीकडे पाहात होती … डोळे विस्फारून!

खिडकीत काचेच्या बाहेरच्या बाजुला तो उभा होता…..

“शिशुपाल्………आमचा परवाच आत्महत्या केलेला जिवलग (?) मित्र………”

“शिशुपाल मार्कंड….!”

मी अक्षरश: स्पेल बाऊंड झाल्यासारखा खिडकीकडे ओढला गेलो. काचेतून बाहेर बघीतले तर तो अधांतरी तरंगत होता त्या भयाण दरीत. मला काय चाललेय, काय होतेय काहीच कळत नव्हते. त्याने खिडकीवर हळूच टकटक केली. मी भारावल्यासारखे खिडकी उघडली…

बाहेर कुणीच नव्हतं ! फ़क्त ती भयाण अंधारी दरी………..

“शिशुपालsssssssssssssss……….”

मी नकळत एक हाक मारली. त्या दरीतून माझ्याच आवाजाचे कितीतरी प्रतिध्वनी उमटले. पण शिशुपाल काही परत दिसला नाही.

“सुकु……., इकडे…तो इकडे आहे!”

मागुन शैलीचा आवाज आला आणि मी गर्रकन मागे वळलो.

तो…

तो तिथेच होता. तिथल्या आरामखुर्चीवर आरामात मागे पुढे डोलत होता. शैली घाबरुन ताठ उभी राहीलेली. पुढच्याच क्षणी ती भीतीने कापायला लागली.

“मी म्हणालो होतो ना, मी परत येइन ! तुम्हाला सुखा-सुखी जगु देणार नाही….. मी परत आलोय सुकुमार. यावेळी मी फक्त शैलीसाठी आलोय. तेव्हा फक्त तीलाच घेवुन जाईन. पुढच्या वेळी तुझा….., अहं..एवढ्या लवकर नाही. आधी त्या दोघांचा नंबर आहे. तुला शेवटी नेइन. आपली माणसं आपल्या डोळ्यासमोर कुणी हिरावून नेताना काय वाटतं? ते तुला कळायला नको?”

“शिशुपाल…. शैली माझी होती आणि माझीच राहील. तू काहीही करु शकणार नाहीस. तू तीला इथुन कुठेही घेवुन जाऊ शकणार नाहीस.”

मी रुमच्या दारापाशी त्याला आडवा उभा राहुन जोरात ओरडलो. पण माझा माझ्या स्वतःच्या शब्दांवरच विश्वास नव्हता. खरेतर माझा आवाज इतका कातर झाला होता की मलाच ओळखु येत नव्हता. तसा शिशुपाल खदखदा हसायला लागला.

“अरे दरवाजा बंद करुन काय होणार आहे सुकुमार? मी येतानाही त्या दरीकडच्या खिडकीतून आलोय. जातानाही तिथुनच जाणार आहे. फरक एवढाच की येताना एकटाच आलो होतो, जाताना आम्ही दोघे असु… मी आणि माझी लाडकी शैली ! चल शैली निघायचं ना…?”

हसतच शिशुपालने आपले हात शैलीकडे पसरवले. तसे शैलीने एक किंचाळी फोडली आणि दुसर्‍याच क्षणी ती कोसळली. शिशुपाल हसतच होता. मी शैलीकडे झेपावलो.पण……

“अहं, उगीच धडपड करु नकोस. ती आता तिथे नाहीये. तिथे फक्त तिचा देह आहे. शैली इथे आहे माझ्यापाशी… ही बघ!”

मी पाहीले तर शैली खरोखर शिशुपालच्या शेजारी उभी होती. मग माझ्या मिठीतली शैली… ती कोण होती? का खरोखरच शैलीचा आत्मा तिचा देह सोडून बाहेर पडला होता. मी एकदम माझ्या मिठीतल्या तिच्या देहावरुन नजर काढून शिशुपालकडे नजर टाकली. तर…

ते दोघेही तिथे नव्हते. ते …

ते खिडकीतुन बाहेर पडत होते. माझी शैली त्या शिशुपालबरोबर त्या दरीत चालली होती. मी वेगाने त्यांच्यामागे खिडकीकडे झेपावलो आणि खिडकीतुन बाहेर त्यांना पकडण्यासाठी उडी मारली. त्या अंधार्‍या दरीत मी कोसळायला लागलो……………

*************************************************************************************************

“हे सुकुमारचं स्टेटमेंट होतं राणे संमोहनावस्थेतलं. पण त्याला यापुढचं काहीही आठवत नाही. तो दरीत कोसळला होता तर वाचला कसा? आश्लेषापर्यंत कसा पोहोचला? त्याला काहीही आठवत नाहीये.”

डॉक्टरसाहेब….त्यामुळेच मला हे सगळंच संशयास्पद वाटत होतं. पण आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा कबुलीजबाब त्याने संमोहनाच्या प्रभावाखाली दिलाय म्हणजे तो खोटा असुच शकत नाही. पण जर खरा मानावा तर मग त्या खोलीत सापडलेला शिशुपालचा म्रुतदेह काही वेगळेच सांगतोय. मुळातच माझा या भुत्-प्रेत वगैरे गोष्टींवर विश्वास नाहीये. पण तरी एकवेळ गृहित धरुन चाललं की शिशुपाल मृत्युनंतर खरोखर भुत झालाय, म्ह्मणजे तो आधीच मेलाय हे मान्य करणे आले. पण तसे असेल तर त्या खोलीत सापडलेलं ते शिशुपालचं प्रेत? ते नक्की काय आहे? तो शिशुपाल असेल तर मग आधी मेलेला ज्याला या मित्रांनी मिळून अग्नी दिला तो शिशुपाल कोण? डॉक्टर…. माझं डोकं फिरायची वेळ आलीय आता? मला खरेच काहीही कळत नाहीये. काय खरे, काय खोटे?

हा एक गोष्ट करता येइल. ज्या पोलीस चौकीने सुकुमारला शिशुपालच्या मृत्युची बातमी दिली होती, जिथुन त्याने त्या तथाकथीत शिशुपालचं प्रेत ताब्यात घेतलं होतं तिथुन आधी त्या गोष्टीची खातरजमा करायला हवी.

“राणे, ते तर तुम्ही करालच पण माझं बोलणं अजुन संपलेलं नाहीये. आठवतं..मी सुरुवातीला काय म्हणालो होतो…”

“डॉक्टर प्लीज आता मी क्विझ्-क्विझ खेळण्याच्या मनस्थितीत नाहीये हो. तुम्ही कोडी घालु नका. स्पष्ट सांगा. ही केस संपेपर्यंत बहुदा मलाच वेड लागणार आहे.”

राणे डोकं धरुन म्हणाले. ही केस अनपेक्षीतरित्या खुपच गुंतागुंतीची होत चालली होती.

“राणे, मी तुम्हाला म्हणालो होतो की मला ही सगळी ल़क्षणे स्किझोफ्रेनियाची वाटताहेत. हा त्रास त्याला लहानपणापासुनचा आहे.”

तसे राणेंचे डोळे चकाकले…

“अरे हो…. हे मी विसरलोच होतो. पण डॉक्टर तुम्हाला हा संशय कशामुळे आला?”

“येस ! मी त्याच मुद्द्याकडे येतोय राणे. सुकुमारचा हा जबाब संपल्यानंतर मी त्याला ट्रान्समधुन बाहेर काढले आणि नेहमीच्या पद्धतीने झोपवले. झोपेतुन जागा झाल्यावर मी त्याला पाणी देवु केले तर त्याने अतिशय विचित्र नजरेने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला……

***************************************************************************

कोण तुम्ही? मी इथे कसा काय आलो? मला तर सुकुमारने त्याच्या हॉटेलच्या रुमवर भेटायला बोलावलं होतं. मी रुमचा दरवाजा वाजवला आणि शैलीनेच दरवाजा उघडला. मला बघून ती एकदम घाबरली आणि जोरात किंकाळी मारुन बेशुद्ध पडली.

“मला प्रथम हे सांगा. तुम्ही कोण?” इति डॉ. निंबाळकर

“कोण म्हणजे? मी ‘शिशुपाल्…शिशुपाल मार्कंड! सुकुमारने मला भेटायला बोलावलं होतं हॉटेलवर. हं..सगळे गैरसमज संपवून टाकु म्हणे. इतकं सोपं आहे ते. आधी चार चौघात माझा अपमान केला. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे माझ्या प्रेमाची इतकी निर्घुण थट्टा केली होती त्या दोघांनी मिळून. कसं शक्य आहे विसरणं…..

कॉलेजमेट्स त्या कुत्सित नजरा….

त्यांच्या डोळ्यातला तो उपहास…

ती आश्लेषातर म्हणाली होती…. ‘कौआ चले हंसकी चाल…..!”

एवढा सगळा अपमान, तोही चारचौघात झालेला, केवळ एक गैरसमज म्हणुन विसरणे शक्य तरी होते का?

मी खरेतर आज सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच असा पक्का निर्धार करुन आलो होतो आणि शैलीने बेशुद्ध पडून मला चांगलीच संधी दिली होती. ती बेशुद्ध असे पर्यंतच सर्व उरकुन घ्यायला हवे होते. म्हणजे तिला काही कळायच्या आत सर्व होवुन गेले असते. मला माझ्या अपमानाचा सुड घेण्याची चांगली संधी दैवाने दिली होती.

बेशुद्ध पडलेल्या शैलीला सावरण्यात सुकुमार थोडासा बेसावध झाला होता, मी ती संधी साधली आणि त्याला कंबरेला धरुन मागे खेचले. त्याला काहीही कळायच्या आत खिडकीपर्यंत ओढत नेले आणि उघड्या खिडकीतुन थेट बाहेरच्या दरीत भिरकावून दिले. त्याला दरीत भिरकावून मागे वळतो तोच माझ्या डोक्यात कसलातरी जोराचा फटका बसला आणि मी बेशुद्ध झालो. तो आत्ताच शुद्धीवर येतोय. डोकं प्रचंड दुखतय माझं. तुमच्याकडे एखादी पेनकिलर आहे का?”

डोके दाबत सुकुमार (किं शिशुपाल?) बोलत होता. डॉक्टर निंबाळकर विचारात पडले होते. पण अधिक माहिती काढण्याच्या हेतुने त्यांनी विचारले..

“पण हॉटेलमधल्या वेटरने किंवा रिसेप्शनवरच्या ऑपरेटरने तर पोलीसांना सांगितले की त्या रात्री कोणीच सुकुमारला भेटायला आले नव्हते.”

“हं फालतु वेटर तो, त्याची नजर चुकवणे काय अवघड होते. त्यात रात्रीची वेळ असल्याने तो आधीच बेसावध , अर्धवट झोपेत असावा. त्याचे लक्ष नाही बघून मी गपचुप आत शिरलो होतो. त्याने हटकले असतेच तर सांगितले असते मला सुकुमारने बोलावलेय म्हणुन. सुकुमार नाही म्हणु शकलाच नसता. पण मला शक्यतो सर्व गुप्तपणे आटपायचे होते. मी सुकुमार आणि शैलीला या जगातुन संपवायच्याच हेतुने आलो होतो. त्यामुळे मी गुपचुप त्या रात्रपाळीवर असलेल्या वेटरची नजर चुकवुन थेट सुकुमारच्या खोलीवर पोचलो होतो. सुकुमारला तर मी संपवलं पण शैली वाचली…………! माझ्या डोक्यावर कोणी तो फटका मारला कुणास ठाऊक? प्रचंड दुखतेय डोके!! ”

*************************************************************************************************

“राणे, वेड तुम्हालाच नाही तर ते लागायची पाळी माझ्यावर सुद्धा आलीय! शिशुपाल आणि सुकुमार ही एकाच व्यक्तीची दोन रुपे आहेत म्हणावे तर शिशुपालला भेटलेली , ओळखणारी माणसे आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे आश्लेषादेखील त्याला ओळखतेय. सुकुमारच्या असिस्टंटनेही त्याला ओळखलेय. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्याचे प्रेतही तिथेच सापडलेय. काय गोंधळ आहे देवच जाणे? माझे शास्त्रही अपुरे पडतेय इथे राणे.”

“डॉक्टर, खरंच तर शिशुपालचा आत्मा नसेल शिरला सुकुमारच्या अंगात?”

“कमॉन राणे. असं काहीही नसतं.”

“मग हे काय आहे डॉक्टर? माझाही विश्वास नाहीये असल्या गोष्टींवर. पण मग या सगळ्या अनाकलनीय प्रकारांमागे नक्की काय आहे?”

“सुकुमार खरोखरच एखाद्या मानसिक रोगाने आजारी आहे की मग या जगात खरोखर पिशाच्च, भुत-प्रेत अशा योनीही अस्तित्वात आहेत?”

राणे आणि डॉक्टर बराच वेळ एकमेकांकडे नि:शब्द होवुन पाहात राहीले.

क्रमशः

 

7 responses to “मला खात्री आहे : भाग ३

 1. BinaryBandya™

  जुलै 30, 2011 at 5:52 pm

  apratim!!!!

  pudhacha bhag yeudya lavkar…

   
 2. Amit

  ऑगस्ट 8, 2011 at 11:33 pm

  खूपच छान .. शेवटची twist जबरी होती 🙂

   
 3. Amit

  ऑगस्ट 8, 2011 at 11:38 pm

  अंतिम भागाऐवजी इथे comment केली 😦

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 12, 2011 at 10:55 सकाळी

   तुम्ही वाचलेत, तुम्हाला आवडले आणि आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत हे महत्वाचे. कुठे दिली तो मुद्दा दुय्यम आहे अमित ! खुप खुप आभार्स 🙂

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: