RSS

मला खात्री आहे : भाग २

29 जुलै

मॅनेजर सॉलीड गोंधळला होता. राणे चमकले, तसेच गर्रकन पुन्हा मागे वळले आणि आरामखुर्चीकडे आले. त्या प्रेताकडे पुन्हा एकदा पाहताना यावेळेस मात्र त्यांना ते जाणवलं. त्यांनी काहीतरी पाहीलं होतं. आरामखुर्चीचा आपण बसतो तो तळ आणि हात टेकवायची लाकडी पट्टी या दोन्हीच्या मध्ये एक कागदाचा बोळा अडकलेला होता. राणेंनी उत्साहाने तो बोळा सोडवून घेतला….

बहुतेक एखाद्या जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा होता तो. त्यावर लालसर शाईने (की रक्ताने) वेड्या वाकड्या अक्षरात लिहीले होते…

“तो परत आलाय…., मला खात्री आहे!”

भाग १

आता पुढे….

*********************************************************************************************************************

“पक्की खात्री आहे तुम्हाला?” हातातला कागद वाचत राणेंनी मॅनेजरला विचारले.

“आता तो म्हणजे नक्की कोण परत आलाय हे मला कसं माहीत असणार आणि त्याची खात्री मी कशी देणार?” त्यांच्या हातातल्या कागदावरचे वाक्य वाचत मॅनेजरने परत त्यांनाच विचारले. तसे राणेंची मुद्रा चमत्कारिक झाली.

“अहो मी तुमच्या विधानाबद्दल म्हणतोय. ते बापट नाहीत याची खात्री आहे का तुम्हाला?”

“मग हो, त्या माणसाला कसा विसरेन मी. देखणा तर तो होताच पण अजुन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी होती त्याच्यामध्ये. प्रचंड कंजूस वाटला मला तो माणुस्..म्हणजे मिस्टर बापट. अवघ्या १०० रुपयावरून किती वाद घातला माझ्याशी. कळस म्हणजे अगदी रजिस्टरवर सही करतानादेखील sb एवढीच सही केली त्यांनी.”

तसे राणे खदखदुन हसले.

“ओके, ठिक आहे. असते एखाद्याची सवय. चला, तुम्ही मला त्यांच्याबद्दल जी काही माहिती सांगता येइल तेवढी सांगा. तुमच्या स्टाफलाही भेटू आपण. सानप, तुम्ही बघा इथलं निस्तरायचं तोवर मी यांच्याकडे बघतो. चला कोरगावकर…!”

राणे कोरगावकरांबरोबर बोलत परत लॉबीमध्ये आले.

रिसेप्शन डेस्कपाशी ७-८ जण एकत्र येवुन गलका करत होते. मॅनेजरबरोबर राणेंना पाहताच सगळे शांत झाले. राणेंनी मॅनेजरला विचारले.

‘हा तुमचा स्टाफ?’

मॅनेजरने कसनुसे हसत त्यांच्याकडे पाहीले. ‘साहेब, या अनपेक्षित घटनेने सगळेच घाबरलेत, त्यामुळे थोडा गोंधळ झालाय खरा.’

‘ओके, लेट्स टॉक टू देम! तुम्ही वर सानपांपाशी थांबा, कदाचित त्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल. मी इथे बघतो.’ राणेंनी मुद्दामच मॅनेजरला परत पाठवून दिले कारण त्याच्यासमोर हॉटेलचा स्टाफ खुलणार नाही याची खात्री होती त्यांना.

‘काल जेव्हा बापट कंपनी इथे आली तेव्हा त्यांना कुणी अटेंड केलं होतं तुमच्यापैकी.’

‘काल नाही साहेब, ते नवराबायको परवा दिवशी रात्री चेक इन झाले होते. मीच होतो त्यावेळी रिसेप्शन डेस्कला. सॉलीड वाद घातला होता त्यांनी, शेवटी मॅनेजर साहेबांनी मधे पडून समजुत घातली म्हणून मिटलं नाहीतर गोंधळ झाला होता. अगदी मिसेस बापट देखील खुप वैतागल्या होत्या.’

‘असं काय झालं होतं की आल्या आल्या त्यांनी वाद घातला?’

‘साहेब, त्या बाईंनी फोनवरुन बुकींग केलं होतं तेव्हा कुठली रुम हवी ते काही सांगितलं नाही त्यांनी. पण इथे आल्यावर ते साहेब म्हणाले त्यांना व्हॅली साईडचीच रुम हवीय म्हणून. त्या रुमचे दर थोडे जास्त आहेत. पण त्यांना ती आहे त्याच दरात हवी होती. साहेब फक्त १०० रुपयाचा फरक आहे दोन्ही मध्ये पण तेवढ्यासाठी वाद घातला त्यांनी. नंतर मॅनेजरसाहेबांनी आहे त्याच दरात रुम द्यायचे कबुल केले तेव्हा शांत झाले.’

‘आणि मिसेस बापट? ती बाई कशी वाटली? म्हणजे स्वभावाने…………!’

‘तसं नाही सांगता यायचं साहेब,कारण त्या फारशा बोलल्याच नाहीत. पण चेहर्‍यावरून नवर्‍याच्या वागण्यावर त्याही वैतागल्या आहेत हे दिसत होतं.

“आणि हे असं झाल्याचं कधी कळालं तुम्हा लोकांना?”

“साहेब, आज त्यांनी घोडेवाल्याला बोलावलं होतं सकाळी. युसुफ़भाई साडे आठलाच येवुन हजर झाला. पण यांचं काही खाली यायचं नाव नाही. रुमवर फ़ोन केला तर उचलेनात. कदाचित अजुन झोपले असतील म्हणुन आम्ही घोडेवाल्याला अजुन थोडावेळ बसवून घेतला. पण नंतर तो पण कुरकुर करायला लागला. कारण एकतर बापट साहेबांनी त्याच्याशी प्रचंड घासाघिस करुन त्याला चार का पाचच पॉईंटपुरता ठरवला होता. त्यामुळे त्याचे हे पॉईंट्स आटोपुन त्याला परत दुसर्‍या गिर्‍हाईकाबरोबर जायचे होते. म्हणुन मग मी आमच्या एका बॉयला त्यांच्या रुमवर निरोप द्यायला पाठवले. पण तो सांगत आला की ते लोक ओ ही देत नाहीत आणि दारही उघडत नाहीत. त्यानंतर मी ही जावुन खुप हाका मारल्या. शेवटी अजिबातच उत्तर येइना म्हटल्यावर वरच्या व्हेंटीलेटरमधुन आत डोकावून पाहीले. तर त्या बाई अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. आरामखुर्चीवर पण कुणीतरी पडलं होतं पण त्याचा चेहरा दिसत नव्हता. ते बापटसाहेबच असावेत असे समजुन मी मॅनेजरसाहेबांना बोलावलं. खुप हाका मारुनही त्यांचे लक्ष जात नाही असे लक्षात आल्यावर मग वेगळीच शंका येवुन मॅनेजर साहेबांनी तुम्हाला फोन करुन बोलावलं.”

“हम्म्म…, अस्सं आहे तर!”

राणे बराच वेळ त्या लोकांशी बोलत राहीले. पण बापट हा एक कंजुस माणुस होता आणि आहे ते प्रेत त्याचे नसुन दुसर्‍याच कुणाचे तरी आहे या व्यतिरीक्त आणखी कुठलीही माहिती त्यांना मिळू शकली नाही. शेवटी त्या प्रेताचे फोटो घेवुन मुंबईतील बापटचा पत्ता शोधायचा त्यांनी निर्णय घेतला.

“सानप, तुमचे काम आटपून तुम्ही प्रतं पोस्टमार्टेमला पाठवून द्या. तिथला रिपोर्ट काय येतो ते बघू. मीन टाईम मी एकदा मुंबईला जाऊन येइन म्हणतो.”

**********************************************************************************************************

“या फोटोतल्या माणसाला ओळखता का? कुठे पाहिलय याला?

समोरच्या खुर्चीत बसलेल्या शिष्ठ बाईला इन्पेक्टर राण्यांनी विचारले तशा तिच्या कपाळावर आठ्या चढल्या.

ठरवल्याप्रमाणे इन्स्पे. राणे मुंबईत येवून दाखल झाले होते. सुकुमार बापटने दिलेल्या घराच्या पत्त्यावर त्यांनी पहिली भेट दिली. तिथल्या शेजार्‍यांकडून एवढेच कन्फर्म होवु शकले होते की श्री. बापट हे अतिशय प्रायव्हेट लाईफ जगणार्‍यांपैकी एक होते. काही दिवसांपूर्वीच कुठेतरी पिकनिकला म्हणून गेले होते. त्यानंतर त्यांच्याबद्दल बाकीची काही माहिती नाही मिळु शकली. पण शेजारच्या एका रिकामटेकड्या कट्ट्यावरून बापट ओरिएंटल केमिकल्स लि. मध्ये काम करतात एवढी माहिती त्यांना मिळाली आणि ते बापटच्या ऑफीसमध्ये येवुन पोहोचले होते.

इथे बर्‍याच जणांशी बोलुनही त्यांना बापटबद्दल फारशी माहिती मिळु शकली नव्हती. बापट मुळातच अतिशय आत्मकेंद्रीत असा माणुस असावा. त्याचे कंपनीत फारसे कुणाशीच जवळचे तर सोडाच, पण हाय-हॅलोइतके संबंधही दिसत नव्हते. इथल्या कर्मचार्‍यांशी बोलता बोलता मिळालेल्या माहितीवरून बापट हा कायम आपल्या कामाशी काम ठेवुन वागणारा माणुस होता. पण आपल्या कामात मात्र प्रचंड हुशार! महत्त्वाचे म्हणजे कुणाशी त्याचे फारसे संबंध नसले तरी कुणी त्याच्याबद्दल वाईटही बोलत नव्हते. एकंदरीत इतर कुठल्याही गोष्टीत दखल न देता आपले काम करत राहणारी अबोल पण सरळमार्गी माणसे असतात त्या पठडीतला दिसत होता बापट. पण गेल्या शुक्रवारपासुन मात्र गायबच होता. गेल्या कित्येक वर्षात एकही विनाकारण रजा न घेतलेला बापट आता गेले दोन्-तीन दिवस कसलीही पुर्वसुचना न देता गायब असल्याने ऑफीसचा स्टाफ मात्र गोंधळला होता. कुठेही फ़ोनवर देखील त्याच्याशी संपर्क होवु शकला नव्हता. तसेच त्यांच्या घराला लागलेले टाळेही तसेच होते. त्यांच्याबरोबरच त्यांची पत्नी ‘शैली’देखील गायब होती. भल्या माणसाने सुटी वाढवण्यासाठी काही निरोप, फ़ोन पण केला नव्हता. पण तरीही त्यांचे आतापर्यंतचे स्वच्छ आणि आदर्श रेकॉर्ड लक्षात घेवून कंपनीने आणखी काही दिवस वाट पाहुन मग सरळ त्यांच्या अचानक गायब होण्याबद्दल रितसर पोलीस तक्रार करायचे ठरवले होते.

त्यामुळेच राणे जास्त गोंधळात पडले होते.

इतके साधे सरळ आयुष्य जगणारा हा माणुस आपल्या बायकोबरोबर विकांत साजरा करायला माथेरानला येतो काय? तिथे त्याच्या बायकोचा खुन होतो काय? त्याच्या पत्नीच्या शवाबरोबर भलत्याच माणसाचे शव सापडते काय? आणि एवढे सगळे कमी होते म्हणून की काय…

एक विचित्र, पण गुढ वाटणारी रक्ताने लिहीलेली चिठ्ठी मागे सोडून बापट गायब होतो काय? सगळेच अतर्क्य होते. बरं…बापटच हे खुन करून पळालाय म्हणावं तर घटनाक्रम आणि घटनास्थळावरील स्थिती असे दाखवत होती की शैलीचा मृत्यु कसल्यातरी अज्ञात धक्क्याने हृदय बंद पडुन झालाय. याही पुढची धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दुसर्‍या व्यक्तीचा मृत्युही त्याच कारणाने झाला होता. अर्थात पोस्टमार्टेमचा रिपोर्ट येणे अजुन बाकी होते. पण शवांची सर्वसाधारण लक्षणे सामान्य आणि नैसर्गिक मृत्युकडेच बोट दाखवत होती. शैलीच्या बाबतीत मात्र तिला कसलीतरी भीती वाटत असावी हे तिच्या चेहर्‍यावरून साफ ध्यानात येत होते.

शेवटी राणे त्या कंपनीच्या शिष्ठ वाटणार्‍या रिसेप्शनिस्टसमोर येवुन बसले होते आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या शवाचा फोटो दाखवून तिला विचारत होते.

“या फोटोतल्या माणसाला ओळखता का? कुठे पाहिलय याला?

तिच्या कपाळावर आकस्मिकपणे आठया पडल्या. ती बहुदा काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असावी.

“बघा मॅडम, काहीही बारिक सारिक आठवलं तरी सांगा. हे खुप महत्त्वाचे आहे?”

तसे तिने शंकेच्या स्वरात विचारले.

“माफ करा साहेब , पण आधी तुम्ही बापटसाहेबांबद्दल विचारत होतात. आता अचानक हा फोटो दाखवताय. बापटसाहेव ठिक आहेत ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना?”

तसे आजुबाजुचा सगळा स्टाफ त्या दोघांकडे वळुन पाहायला लागला. राणे जी गोष्ट सांगायचे टाळत होते तेच नेमके समोर आले होते. शक्यतो बापटबरोबर घडलेली घटना आत्ताच उघड करायची नाही असे त्यांनी ठरवले होते. पण आत्ता पर्यायच नव्हता. शेवटी राणेंनी निर्णय घेतला आणि घडलेली घटना सांगायला सुरुवात केली. अर्थात बारकावे वगळून राणेंनी फक्त सौ. बापट आणि तो अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तसेच बापटांचे आश्चर्यकारकरित्या गायब होणे या गोष्टी तेवढ्या त्यांनी सांगितल्या. त्या रक्तरंजीत चिठ्ठीचा संदर्भ मात्र त्यांनी वगळला.

सगळा स्टाफ शॉक झाला होता. कुजबुजीला सुरुवात झाली. आत्ता मात्र दोघे-तिघे जण तो फोटो पाहायला झेपावले.

“साहेब, हा माणुस तीन महिन्यांपूर्वी बापट साहेबांना भेटायला आला होता. स्वतःला तो बापट साहेबांचा क्लासमेट म्हणत होता. पण त्याची एकंदर वर्तणुक, दिसणे सगळेच काही विचित्रच वाटत होते. ”

राणेंनी ही माहिती देणार्‍या व्यक्तीकडे पाहीले.

“मी मकरंद देशमुख. बापट साहेबांचा असिस्टंट. साहेबांना भेटायला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आधी माझ्याकडेच यावे लागते साहेब.”

“मकरंद, त्या दिवशी काय काय झाले होते? जरा नीट सांगता का?”

“साहेब केबिनमध्ये नक्की काय झाले त्याची पुर्ण माहिती मलाही सांगता येणार नाही. पण त्या दिवशी हा माणुस माझ्याकडे आला. म्हणजे शोभाने त्याला माझ्याकडे पाठवले. ”

“शोभा…?”

“साहेब, मी शोभा, शोभा जगताप!” ती रिसेप्शनिस्ट त्वरेने पुढे आली.

“अच्छा तुम्ही होय, ठिक आहे. मकरंद तुम्ही पुढे कंटिन्यु करा…”

“तर साहेब हा माणुस, याचे नाव ‘शिशुपाल मार्कंड’ आहे, म्हणजे होते, माझ्याकडे आला आणि साहेबांचा जुना मित्र आहे म्हणाला. म्हणुन मी त्याला घेवून साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. तर त्याला बघून बापटसाहेब एकदम दचकुन उभे राहीले…”

“तुम्ही बापटांच्या केबिनमध्ये त्याला घेवुन जाण्यापुर्वी नियमाप्रमाणे आधी बापटांना कल्पना दिली नव्हती का?”

तसा मकरंदचा चेहरा एवढासा झाला.

“सॉरी साहेब…, गडबडीत ते लक्षातच आलं नाही माझ्या.”

“ओके, पुढे काय झालं?”

“हा… तर साहेब एकदम दचकुन उभे राहीले आणि म्हणाले…शिशुपाल तू? अचानक , इथे कसा काय? कुठे होतास इतकी वर्षे?”

“बापटसाहेबांनी त्याच्यावर एकदम प्रश्नांची सरबत्तीच केली. नंतर एकदम त्यांना माझे अस्तित्व जाणवले असावे कारण ते एकदम माझ्याकडे बघून सटपटले आणि मला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले. नंतर तो माणुस तासभर तरी आत होता. नंतर तासाभराने हसत हसतच बाहेर पडला. जाताना मला थँक्यु पण म्हणून गेला. पण खरे सांगु का साहेब, तो भेटून गेल्यावर बराच काळ बापटसाहेब खुप अस्वस्थ होते. त्या नंतर मात्र तो कधीच आला नाही. मीही विसरुनच गेलो होतो, तर आज तुम्ही त्याच्या मृतदेहाचाच फोटो घेवून आलाय.”

“ह्म्म असे आहे तर. हा आणखी एक गुंता वाढला आता. आता हा शिशुपाल खरोखर बापटांचा मित्र होता का? किंवा बापटांशी त्यांचा काय संबंध आहे? तो माथेरानला कसा काय पोचला? तो बापटांच्या पाळतीवरच होता का? पण त्याला नक्की बापटांकडे काय काम असावे आणि तिथे त्याने असे काय पाहीले की भीतीने त्याचे हृदयच बंद पडले? आणि बापट कुठे गायब झालेत?”

प्रश्न्..प्रश्न आणि प्रश्न……..!!

राणेंचे डोके भंजाळुन गेले होते. याबद्दल आधिक काही माहिती मिळाल्यास आपल्याला त्वरीत कळवण्यास सांगुन त्यांनी बापटांचे ऑफीस सोडले.

*********************************************************************************************************************

कालचा दिवस प्रचंड धामधुमीत गेलेला. एवढी धावपळ करुनही त्या अज्ञात मृत इसमाचे नाव सोडले तर काहीच हातात आले नव्हते. सुकुमार बापट तर जणु वार्‍यावर विरघळूनच गेला होता. शेवटी राणेंनी माथेरानला बदली होण्यापुर्वी मुंबईत असताना वाढवलेलं त्यांचं खबर्‍यांचं जाळं वापरायचं ठरवलं. आपले सोर्सेस त्यांनी कामाला लावले आणि परत माथेरानला जायचे निश्चित केले. आत्तापर्यंत पोस्टमार्टेमचा रिपोर्टही आलेला असणार. त्याने देखील बर्‍याच गोष्टींवर प्रकाश पडू शकेल. त्या हॉटेलच्या खोलीला पुन्हा एकदा भेट द्यायला पाहीजे. कारण दरवाजा आतुन बंद असताना बापट त्या खोलीतुन गायब कसा झाला असेल? मागे तर पुर्ण दरीच आहे, म्हणजे तिथुन बाहेर पडण्याची शक्यता नाहीच आणि शिशुपालला त्याच्या खोलीत येताना कोणीच कसे बघितले नाही? ……….

असे हजार प्रश्न राणेंच्या डोक्यात गोंधळ माजवत असतानाच अचानक त्यांचा मोबाईल फोन वाजायला लागला.

“नमस्कार, इन्स्पेक्टर राणे माथेरान पोलीस स्टेशन, बोलतोय.”

“साहेब मी आश्लेषा बोलतेय. तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुमची मदत करु शकते.”

“कोण तूम्ही? माझी काय मदत करणार?”

“साहेब तुमचा सुकुमार बापट सद्ध्या माझ्याकडे आहे, माझ्या घरी!”

राणे तीन ताड उडायचेच काय ते बाकी राहीले.

“क्काय? तुम्ही कोण आहात ? सुकुमार बापटशी तुमचा काय संबंध? तो तुमच्याकडे कसा काय आला?”

“साहेब, माझा पत्ता देते. प्रत्यक्ष भेटीतच सगळे काही सांगेन. या गोष्टी फोनवर बोलता येण्यासारख्या नाहीत. सद्ध्या फक्त एवढेच सांगते की सुकुमार माझा जुना मित्र आहे आणि या क्षणी मी त्याला माझ्या बेडरुममध्ये कोंडून ठेवलाय………..

“कोंडून ठेवलाय? तो तुमचा जुना मित्र आहे म्हणताय , वर त्याला कोंडून ठेवलय म्हणताय?”

राणेंचा स्वर एकदम थोडासा चमत्कारिक झाला.

“साहेब, तुम्ही या तर खरे इथे. त्याला बघीतल्यावर मी काय म्हणतेय त्याचा अर्थ कळेल तुम्हाला?”

“ठिक आहे, तुम्ही तुमचा पत्ता द्या मला.”

अचानक सगळा सीनच चेंज झाला होता. आत्तापर्यंत गुढ बनत चाललेला बापट अचानक मुंबईत त्याच्या एका जुन्या मैत्रीणीच्या घरी जावुन पोचला होता. राणेंनी आश्लेषाचा पत्ता घेतला आणि माहीमच्या तिच्या घरी जावून धडकले.

“सर्वात आधी मला हे सांगा मिस आश्लेषा , तुम्हाला माझा मोबाईल नंबर कुठून मिळाला?”

आश्लेषाने एक दीर्घ श्वास घेतला.

“मला तुमचा नंबर ओरीएंटलमधुन मिळाला साहेब. तुम्ही काल तिथे येवुन गेलात त्यानंतर आज लगेचच मला शोभाने फोन केला. खरेतर गेले दोन दिवस झाले सुकुमार माझ्याकडेच आहे. पण जे काही घडलेय ते मला आज शोभाकडुन कळाले. त्यानंतर लगेचच मी तुम्हाला फोन केला. खरं सांगते साहेब, गेले दोन दिवस तो माझ्याकडे आहे. पण त्याची अवस्था एवढी विचित्र आहे की मला काहीच कळेनासे झालेय. मी २-३ वेळा धोका पत्करुन शैलीला फोन करायचा प्रयत्नही केली. पण ती फोन उचलायलाच तयार नाही. आज शोभाकडुन हे सगळं कळलं आणि मी शॉकच झाले, मग न थांबता लगेच तुम्हाला फोन केला आनि बोलावून घेतले. पण खरेच सांगते साहेब, सुकुमारची अवस्था फारच विचित्र आहे. तुम्ही बघाच एकदा त्याला….”

“ओरीएंटलशी किंवा सुकुमारशी तुमचा कसा काय संबंध येतो?”

राणेंमधला पोलीसी शंकेखोरपणा डोके काढायला लागला.

“साहेब, मीही आधी ओरिएंटलमध्येच काम करत होते. सहा महिन्यापुर्वी मी जॉब चेंज केला आणि गॅमनला जॉइन झाले. अ‍ॅक्चुअली मी सुकुमारची सेक्रेटरी होते. पण माझ्यामुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यात काही गोंधळ निर्माण झाला होता. त्याची बायको शैली अतिशय संशयी स्त्री आहे. मी आणि सुकुमार , सुकुमारच्या लग्नाआधीपासुनचे मित्र आहोत. गेले कित्येक वर्षे आम्ही एकत्र काम करत होतो. खरेतर शैलीलाही आधी काही आक्षेप नव्हता. आमची चांगली मैत्रीही झाली होती. गेल्या वर्षापासुनच ती अचानक बदलल्यासारखी वागायला लागली. दोन -तीन वेळा माझ्याशी भांडली देखील खुप. मला खुप वाईट वाटलं. पण शेवटी सुकुमार माझा खुप चांगला मित्र आहे. माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही कलह निर्माण होवु नये या एकाच कारणाने मी नोकरी सोडली.”

राणे थोडे संभ्रमात पडले होते.

“ठिक आहे. अजुन बर्‍याच गोष्टी विचारायच्या आहेत मला. पण त्याआधी आपण सुकुमारला भेटु. चला मला दाखवा तो कुठे आहे आणि कसा आहे ते?”

“साहेब, तुम्ही त्याला अटक तर करणार नाही ना?”

आश्लेषाने घाबरत घाबरत विचारले.

“तो कुठेही पळून जाणार नाही याची खात्री देवु शकाल तुम्ही? जरी अजुनही त्यानेच हा गुन्हा केलाय हे सिद्ध झालेले नसले तरी तो आमचा पहिला संशयित आहे हे लक्षात घ्या. मला त्याला अटक करावीच लागणार आहे.”

राणेंनी अतिशय कठोरपणे सांगितलं. तसं आश्लेषाच्या चेहर्‍यावर चिंतेची रेघ उमटली.

“साहेब त्याची अवस्था खुप वाईट आहे. तुम्ही बघालच आता. खरेतर त्याला वैद्यकीय मदतीची खुप आवश्यकता आहे. ”

बोलता बोलताच तिने बेडरुमचा दरवाजा उघडला. साधंच इंटेरिअर होतं. एक लाकडी कपाट, एक ड्रेसिंग टेबल आणि मधोमध असलेला एक डबल बेड. या क्षणी तरी बेड रिकामा होता.

“अरेच्चा, इथेच झोपवलं होतं मी सुकुमारला. गेला कुठे?”

आश्चर्यचकीत झालेली आश्लेषा गडबडीत आत शिरली. तिच्यामागे शिंदेही आत शिरले. बेडरुममध्ये कुठेही सुकुमारचा पत्ता नव्हता.

“ते दार कसलं आहे? बाथरुम आहे का?”

खोलीत दिसणार्‍या एका बंद दरवाज्याकडे पाहात राणेंनी विचारलं.

“हो, बाथरुमच आहे. एक मिनीट हा बघते.”

दरवाजा आतुन बंद होता.

“सुकुमार, सुकुमार आत आहेस का तू? बाहेर ये तुला भेटायला कोणीतरी आलय?”

आश्लेषाने हाका मारायला सुरुवात केली. पण आतुन उत्तर नाही. बराच वेळ हाका मारल्यावर शेवटी राणे पुढे सरकले.

“लिव्ह इट टू मी नाऊ! ”

सगळी ताकद एकवटून दारावर धक्के द्यायला सुरूवात केली. काही क्षणातच दरवाजा बिजागर्‍यातून निखळला आणि दार उघडले.

बाथरुमच्या एका कोपर्‍यात सगळे अंग संकोचुन घेवुन, डोके दोन्ही पायात खुपसुन सुकुमार उकिडवा बसला होता. हा माणुस कोरगावकरांनी सांगितलेला तो देखणा सुकुमार बापट आहे यावर विश्वास ठेवणे राणेंना जड जात होते. राणेंनी हलकेच त्याला हाक मारली….

“सुकुमार, काय झालय? घाबरु नकोस , मी आहे आता तुझ्याबरोबर!”

तसे हळुच सुकुमारने मांड्यात खुपसलेली आपले डोके बाहेर काढले.

“माय गॉड, याची अवस्था तर एखादे भुत बघीतल्यासारखी झालेय.”

त्याचा अवतार अगदी बघवत नव्हता. केस अस्ताव्यस्त झालेले. डोळे लाल भडक. त्यात कसलीतरी अनामिक भीती भरलेली…! त्याने चोरट्या नजरेने आधी इकडे तिकडे आणि मग हळुच राणेंकडे बघीतले. मग थरथरत्या आवाजात म्हणाला.

“अहं हळु बोला, त्याला सगळं ऐकु जातं. त्याच्यापासून काहीच लपत नाही. तो…तो परत आलाय!”

क्रमश :

 

One response to “मला खात्री आहे : भाग २

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: