RSS

राँग नंबर….: २

08 जुलै

शिर्‍याचे हात सळसळायला लागले होते. कालच ७०-८० हजाराला बांबु बसला असल्याने त्याने या प्रकरणात लक्ष घालायचे नक्की केले होते. तसेही त्यांचे अंतर्मन काही वेगळीच ग्वाही देत होते. आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडणार असलं की अशी फिलींग्ज यायची त्याला. नव्याने येणार्‍या अनामिक साहसाच्या कल्पनेने त्याचे बाहु स्फुरण पावायला लागले होते. तो आतुरतेने हातातल्या मोबाईलकडे बघत बसला…

राँग नंबर : भाग १

आता पुढे……

*******************************************************************************************************************************************************************

“ट्रिंग ट्रिंग….ट्रिंग ट्रिंग….ट्रिंग ट्रिंग….ट्रिंग ट्रिंग………

बराच वेळ वाजत असलेला फोन शेवटी वैतागुन त्याने उचलला.

“हॅलो डेडशॉट……………………..”

“पख्तुनी?”

“या अल्ला, यावेळेसतरी निदान सही आदमी मिळाला.”

“मी समजलो नाही…”

“त्याची गरजही नाही, ते तेवढे महत्त्वाचेही नाही. एक क्षुल्लक राँग नंबर लागला होता सकाळी, तुला फोन करताना.”

“एनी वेज, आतापर्यंत तू गुजरात सोडला असशील नाही…..?”

“जानता हूं कॅप्टन, बहोत चालाक हो तुम. वैसे तुम्हे ये बात पता नही चला पायी होंगी की फिलहाल मै एक्झॅक्ट कहां हू? पता भी कैसे चलेगा? तुम्हारा वो बंदा, जिसको तुमने मेरे पिछे छोडा था, क्या नाम था उसका…? हा…कुलदिप! वो तो मेरे हातो अल्ला को प्यारा हो चुका है! बंदा बडा ही ढीट निकला, अपने नामके अलावा कुछ नही बताया उसने.”

कॅप्टनने एक थंड निश्वास टाकला…

“पख्तुनी, कुलदिपकी मौतका हिसाब तुझसे मै खुद लुंगा! यावेळेस तू परत जाणार नाहीस एवढे लक्षात ठेव. यावेळेसही मागच्यासारखाच पराभव तुझ्या पदरी पडेल तोही तुझ्या मृत्युसकट हे लक्षात ठेव!”

कॅप्टनच्या आवाजात अचानक एक निष्ठुर थंडपणा आला होता.

“छोडो भी डेडशॉट, तुफानकोभी कभी रोक सका है कोइ? और इसबार तो तूमभी फिरभी अकेले हो. तुझा तो कर्नल जावुन बसला डेन्मार्कमध्ये आणि त्याची ती शैतान की खाला ती हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होवून पडलीय. तू अकेला क्या बिगाड लेगा मेरा?”

“तेरे लिये तो मै अकेला ही काफी हूं पख्तुनी! इसबार तेरी कब्र यही बनायेंगे हम!!”

“छोडो कॅप्टन, ये बाते तो होती ही रहती है और होती ही रहेंगी. ना अब तक तुम मुझे खत्म कर पाये हो…..”

“और ना ही आजतक तुम अपना आतंक यहा फैला पाये हो पख्तुनी! प्रत्येक वेळी थोबाडावर आपटला आहेस. तरी अजुन माज जात नाही तुझा.”

तसा पख्तुनी खदखदुन हसायला लागला…

“छोड यार कॅप्टन, अपनी ये तु तु मै मै तो चलती ही रहेगी. ये नही जानना चाहेगा, इस बार तेरे मुल्कमें क्युं आया हूं मै?”

कॅप्टन शांतच राहीला, पख्तुनी स्वतःहुनच बोलेल याची खात्री होती त्याला. किंबहुना त्यासाठीच पख्तुनीने फोन केला होता त्याला. एकमेकांना या पद्धतीने खेळवायची दोघांची खुप जुनी सवय होती.

“डेडशॉट, इसबार तेरा कुछ सामान मेरे हाथ लग गया है……

पख्तुनीने अतिशय आनंदाने आपल्या येण्याचा हेतु जाहीर केला…! कॅप्टन शांतच होता.

“डेडशॉट, इस बार मेरे हाथ कुछ हिरे लगे है……!”

हिर्‍यांचं नाव काढताच कॅप्टन सावध झाला.

“हिरे……..?”

“अब आये ना मिया जगहपर! हो…. हिरे!! साठ कोटीचे हिरे…….

“साठ कोटीचे हिरे आणि….?”

“येस डेडशॉट…. आणि, और , अ‍ॅंड ! या ‘आणि’त तर खरी मज्जा आहे. त्या ‘आणि’नेच मला परत एकदा तुझ्या देशात खेचुन आणलय कॅप्टन !”

“डोंट वरी पख्तुनी, इट्स ऑफ नो युज फॉर यु! ते ‘आणि’ शी संबंधीत जे काही आहे ते त्याच्या मालकाशिवाय, त्याच्याविना दुसर्‍या कुणालाच वापरता येणार नाही. आणि एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेव. आजपासून तुझ्यापासून त्या ‘आणि’च्या मालकापर्यंत पोहोचणार्‍या प्रत्येक रस्त्यावर कॅप्टन चैतन्य निंबाळकर नावाची ही अभेद्य भींत उभी असेल.”

तसा पख्तुनी खदखदुन हसायला लागला.

“ट्राय युवर बेस्ट कॅप्टन… जो तुमसे बन पडे करलो, अबकी बार उस बंदेको अपने साथ लेके ही जाऊंगा मै!”

“हम्म्म देखते है……!”

कॅप्टनने फोन खाली ठेवला आणि दोन आठवड्यांपुर्वीचा तो प्रसंग सर्रकन त्याच्या डोळ्यासमोरून परत फिरला….

*******************************************************************************************************************************************************************

सकाळी १०-१०.३० ची वेळ असेल बहुदा. त्याचा ऑर्डर्ली सांगत आला की चीफ साहेबांनी बोलवलेय म्हणुन. चीफ कडे जायचे म्हणले की कॅप्टन चैतन्यच्या अंगावर काटाच यायचा. ब्रिगेडीअर प्रकाश चक्रवर्ती, इंडीयन मिलीटरी इंटेलिजन्सचा चीफ. अतिशय कडक आणि तेवढाच खडुस म्हणुन ओळखला जाणारा हा म्हातारा. त्याचे सोर्सेस प्रचंड होते. त्याला प्रत्येक गोष्टीची खबर असायचीच. कुठलीही कारणे, बहाणे त्याच्यापुढे चालायचे नाहीत. समोरच्याचा खोटेपणा क्षणार्धात पकडणारा खडुस म्हातारा म्हणूनच तो ओळखला जायचा. चैतन्यशी तर त्याची कायम बाचाबाची व्हायची. कारण म्हातारा जुन्या वळणातला… सगळीकडे आपले जुने कायदे, जुन्या पद्धती लागु करायला पाहायचा आणि चैतन्य कायम त्याच्या नियमांना, पद्धतींना पद्धतशीरपणे चुड लावत असायचा. पण कसेही असले तरी म्हातारा चैतन्यवर खुश असायचा कारण चैतन्यकडे एखादी केस सोपवली की पुढच्या क्षणी त्याबद्दल विसरून गेले तरी चालते हे त्याला अनुभवाने पक्के माहीत झाले होते.

नेहमीप्रमाणे चैतन्य परवानगी न घेताच धाडकन दरवाजा लोतून आत शिरला, तसा म्हातार्‍याने डोळे वटारले. पण चैतन्यवर त्याचा काहीच परिणाम होणार नव्हता, झालाही नाही.

आत गेल्या गेल्या चैतन्यने दोन्ही पाय जुळवून एक कडक सॅलुट ठोकला आणि अदबीने चीफसमोर उभा राहीला.

“मला बोलावलेत चीफ तुम्ही?”

“बोलावू नये का?”

“मी जावु, बरीच कामे पडून आहेत.”

“कॅप्टन जरी आपण इंटेलिजन्सवाले असलो तरी मिलीटरीचाच एक भाग आहोत. यु शुड अ‍ॅटलिस्ट फॉलो दी आर्मी प्रोटोकॉल!”

तसा चैतन्य शांतपणे खाली बघत उभा राहीला. आत्ता दहा-पंधरा मिनीट म्हातारा त्याचे पेटंट लेक्चर ऐकवणार याची त्याला खात्री पटली. झालेही तसेच. बोलून झाल्यावर चीफने समोरची एक फाईल त्याच्याकडे फेकली.

“सिट डाऊन कॅप्टन… चेक दी फाईल!”

फाईलचे पहिले पान बघताच कॅप्टनने तोंड वाकडे केले. कुठलेतरी दिल्लीतील लोकल वर्तमानपत्र होते. बहुदा फारसा खप नसणारे. नाहीतर असल्या साध्या चोरीच्या बातमीला फ्रंटपेजवर स्थान कसे काय मिळाले असते? साधी नेहमीची चोरीची बातमी होती. कुठल्याश्या सुप्रसिद्ध प्रायव्हेट वॉल्टमधून हिर्‍यांची चोरी झाली होती.

“सो, आता मी माझी कामे सोडून या हिरेचोराला शोधण्यात आपला वेळ घालवावा असे आपले म्हणणे आहे तर.”

चैतन्यने तोंड वाकडे केले.

“येस, आय वाँट यु टू फाईंड आऊट धिस थीफ! कॅप्टन साठ कोटींचे हिरे होते. पण मला त्या हिर्‍यांशी काही देणेघेणे नाही. ती निव्वळ एक धुळफ़ेक आहे. अर्थात हिरे चोरीला गेलेत पण व्हॊल्टमधुन नाही तर चालत्या सॉरी उडत्या विमानातून. ते परत नाही मिळाले तरी चालेल. पण त्या हिर्‍यांबरोबर आणखी एक गोष्ट गायब झालीय. ती गोष्ट लवकरात लवकर परत मिळणे अत्यावश्यक आहे. ती वस्तू जर चुकीच्या माणसाच्या हातात पडली तर राष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचु शकतो.”

“काय ?”

कॅप्टनच्या चेहर्‍यावर उभे राहीलेले प्रश्नचिन्ह पाहून चीफनी हलक्या आवाजात बोलायला सुरूवात केली. ते जवळ जवळ अर्धातास बोलत होते. त्यांच्या बोलण्यादरम्यान कॅप्टन चैतन्यच्या चेहर्‍यावरचे भाव भरा भरा बदलत चालले होते. आधी आश्चर्य, मग कुतुहल मग काळजी असे चेहर्‍यावरचे भाव बदलत जावून शेवटी पुन्हा जेव्हा त्याच्या चेहर्‍यावर नेहमीचं खेळकर पण कठोर हास्य रेंगाळायला लागलं.

“सो कॅप्टन, व्हाट्स युवर डिसीजन?”

“ही केस फक्त माझीच आहे सर! लवकरात लवकर ती गोष्ट परत आपल्याकडे असेल.”

“एक लक्षात ठेव कॅप्टन. तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. ती गोष्ट शोधण्याबरोबरच तूला त्या व्यक्तीच्या संरक्षणाचे शिवधनुष्यही पेलावे लागणार आहे. जर चुकून ती गोष्ट चुकीच्या हातात पडली तर त्यांच्या जिवाला धोका आहे हे नक्की.”

“तुम्ही काळजी करू नका सर. माझी त्यांच्यावर पुर्ण नजर असेल.”

************************************************************************************************

आणि आज पख्तुनी सांगत होता की ती वस्तू त्याच्याकडे आहे आणि त्या वस्तुसाठी म्हणून तो त्या वस्तुच्या मालकाला आपल्याबरोबर पाकिस्तानात घेवुन जायला भारतात आला होता.

क्षणभर्…एक क्षणभरच, चैतन्यच्या मनात एक विचार येवुन गेला. कर्नलसाहेब आणि आदिती हवे होते आज. पण कर्नल कुठल्याश्या गोपनीय कामासाठी डेन्मार्कला गेले होते. तर आदिती परवाच्या सतनाच्या जंगलात अतिरेक्यांबरोबर झालेल्या झटापटीत प्रचंड जखमी होवून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होती. त्याला  कर्नलसाहेबांबद्दल प्रचंड आदर वाटला अचानक. पोटची एकुलती एक पोर हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झगडत असताना तिच्याकडे पाहायचे सोडून हा माणुस देशकार्यासाठी लांब निघून गेला होता.

एक क्षणभरच कॅप्टनच्या मनात, आदितीच्या काळजीने चलबिचल झाली पण लगेच पुढच्याच क्षणी तो स्थिर झाला. त्याचे असे विचलीत होणे त्याच्या आदितीला आणि कर्नलनाही मुळीच रुचले नसते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कर्तव्यनिष्ठुर मनालाच ते पटले नव्हते. अगदी कठोरपणे त्याने आदितीचा विचार मनातून बाजुला काढला आणि पख्तुनीशी दोन हात करायला सिद्ध झाला.

पख्तुनी, कॅप्टन, कर्नल आणि अदितीबद्दल जास्ती जाणुन घेण्यासाठी वाचा “मी परत येइन….!” 😉

*************************************************************************************************

पण पख्तुनी आणि कॅप्टन दोघांच्याही गावीदेखील नव्हते की कर्नल आणि आदिती जरी या केसमध्ये नसले तरी त्यांच्या तोलामोलाची किंबहुना काकणभर सरस अशी एक व्यक्ती पख्तुनीच्या एका चुकीच्या कॉलमुळे या प्रकरणात खेचली गेली होती. आदिती किंवा कर्नल कितीही झाले तरी कायद्याच्या कक्षेत राहून काम करणारी माणसे होती. तर त्याला कसलीच बंधने माहीत नव्हती. इनफॅक्ट कायद्याचे लुपहोल्स शोधून आपला स्वार्थ साधणे हा त्याच्यासाठी निव्वळ पोरखेळ होता. आणि इथे तर साठ कोटींच्या हिर्‍यांचे आमिष होते. साठ कोटींच्या त्या तथाकथित हिर्‍यांसाठी तो आपली सगळी ताकद पणाला लावणार होता.

त्याच्या दृष्टीने या केसमध्ये त्याचा प्लस पॉइंट हा होता की त्याला इथे काहीच गमवायचे नव्हते. निदान सत्य माहीत होइपर्यंत तरी.

कॅप्टन चैतन्य निंबाळकर आणि पख्तुनी गेली कित्येक वर्षे एकमेकांशी झगडत, एकमेकावर मात करत आले होते. पण यावेळेस त्यांच्या मार्गात आणखी एक धोंड उभी राहणार होती.

“त्याला त्याचे मित्र कौतुकाने, तर शत्रु अतिशय आकसाने म्हणत……बिलंदर !!

******************************************************************************************************************************************************************

क्रमशः

विशाल कुलकर्णी

 

6 responses to “राँग नंबर….: २

 1. Amit

  ऑगस्ट 8, 2011 at 10:33 pm

  मस्तच..पुढच्या भागाची वात बघत आहे 🙂

   
 2. Manish

  सप्टेंबर 23, 2011 at 5:29 pm

  khup chan aahe katha pan राँग नंबर…. cha pudhcha part kuthe aahe?

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 23, 2011 at 5:44 pm

   तिसरा भाग टाकलाय बघा. मुखपृष्ठावरच आहे आता. वाचुन अभिप्राय नक्की द्या !

    
   • vaibhav14476

    जानेवारी 1, 2014 at 12:45 pm

    आता कुठे शोधू तिसरा भाग ??????

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: