RSS

तुकाकाका ….

25 नोव्हेंबर

लहानपणी उन्हाळ्याची सुटी लागली की एक कार्यक्रम ठरलेला असायचा. गावाकडे पळणे….

माझं लहानपण तसं बर्‍याच ठिकाणी गेलं. आण्णांची नोकरी पोलीसखात्याची, त्यात ते खाकीवाले, त्यामुळे दर वर्ष – दिड वर्षांनी बदली ठरलेली. (खाकीवाले : पोलीसांच्या दोन जाती असतात. खाकीवाले आणि खाSSSकी वाले, सुज्ञास अधिक सांगणे नलगे).

सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आमचे एक छोटेसे गाव आहे! गाव तसा छोटाच आहे. हजार एक लोकवस्तीचा. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. सगळे जुन्या पद्धतीचे आता मोडकळीला आलेले वाडे.

गावाला बस स्टॉप असा नाहीच. वेशीवर असलेले मारुतीचे मंदीर हाच तिथला बस स्टॉप. मंदीराला लागुनच गावाची वेस आहे. वेशीपाशीच पडकी चावडी आणि सार्वजनीक पाणवठ्याची प्रचंड मोठी विहीर. या विहीरीला सगळे मिळुन एकुण सोळा रहाट होते पाणी काढण्यासाठी. आता चारच उरले आहेत. विहीरीचं पाणी पण आटत चाललेय. मुळात आता घरोघर नळ आल्याने तिचा वापर फारच कमी झालायगावात सरळसोट एक लांबलचक रस्ता या टोकापासुन त्या टोकापर्यंत पसरलेला. रस्त्याच्या दुतर्फा आमचे छोटेसे गाव वसलेले आहे.

माझे कुणीतरी खापर पणजोबा काहीशे वर्षापुर्वी गावात येवुन स्थाइक झालेले. आम्ही मुळचे कर्नाटकातील बदामीचे. मुळ आडनाव “विद्वत”. पण तत्कालीन राज्यकर्त्याने जगण्यासाठी म्हणुन महाराष्ट्रात आलेल्या आमच्या पुर्वजांना त्यांच्या निष्ठेवर खुश होवुन आजुबाजुच्या पाच गावाचे सारा वसुलीचे काम (कुळकर्णीपद) दिले आणि आम्ही कुळकर्णी, मग हळुहळु कुलकर्णी म्हणुन ओळखले जावु लागलो. पुढे कुलकर्णी हेच आडनाव कायम झाले. गावात आमचा एक प्रचंड असा वाडा होता. आता खुप मोडकळीला आलाय. त्यातलाच काही भाग दुरुस्त करुन, पुन्हा बांधुन काढुन आमची आताची पिढी वाड्यात राहते. एकेकाळी वाडा खुप प्रशस्त होता, ऐसपैस होता. दिंडी दरवाज्यातुन आत शिरलं की समोर अंगण आहे. अंगणात मधोमध तुळशी वृंदावन. आणि अंगणाच्या चारी बाजुनी कोटासारख्या खोल्या आहेत. पुर्वी दोन्ही मजले मिळुन एकुण १० खोल्या होत्या. सद्ध्या सहा फक्त शिल्लक आहेत. दिंडी दरवाज्याच्या अगदी समोर अंगणाच्या त्या बाजुला आमची देवघराची खोली आहे. अगदी दारात उभे राहीलेल्याला देखील आमचे शिसवी देवघर स्पष्ट दिसायचे, आता देवघराची जागा बदललीय. अंगणाला लागुन असलेली ओसरी आणि ओसरीला लागुन देवघर. देवघराचा उंबरा जवळ जवळ एक फुट उंचीचा होता. आता काढुन टाकलाय.

उन्हाळ्याची सुटी लागली की आण्णा आम्हाला गावी सोडून यायचे. इतरही चुलत, आत्ये भावंडे यायची. कधीही उठा, येता जाता कणगीतल्या भुईमुगाच्या शेंगा, कोवळी तुर, हुलगे अशा मेजवानीवर हात साफ करा. शाळेची काळजी नाही. अभ्यास नाही त्यामुळे आम्ही पोरेसोरे सॉलीड खुश असायचो. दिवसभर शेतावर हुंदडायचे, विहीरीत बिंडा बांधुन पोहायचे, झाडावर चढायचे. धमाल असायची नुसती.सद्ध्या घोटीत आमची ३० एकर शेती शिल्लक आहे. काकाने विहीरीत पोहायला शिकवलेले. पांगार्‍याचा बिंडा बांधुन धडा धडा विहिरीत उड्या मारायच्या. मग बांधावरच्या चिंचेवर चढुन तोडलेल्या चिंचासाठी भांडणे. विहिरीवर बसुन मस्तपैकी काकुने करुन दिलेल्या लाल मक्याच्या भाकरी, वांग्याची भाजी हाणायची. ते दिवस खरोखर खुप सुखाचे होते. त्यावेळी उन्हाळ्याची सुटीही चांगली महिनाभर मिळायची. आजच्यासारखे क्लासेसचे फॅड अजुन निघाले नव्हते ना.

पण या महिन्यातला एक दिवस घातवारासारखा उगवायचा.

सकाळी-सकाळी दारातून हाळी ऐकु यायची.

“बामणीन वैनी, हायती का देव घरात?”

तो बामणीन वैनी शब्द ऐकला की आमची त्रेधा उडायची. कारण काकुला या नावाने बोलावणारा गावात एकच माणुस होता, ज्याच्या नावाने आमच्या घरातलं प्रत्येक लहान मुल घाबरायचं. अगदी २ वर्षाच्या लेकरापासुन ते १५ वर्षाच्या छोकर्‍यापर्यंत.  मला तर वाटतं, आमचं घरच काय गावातली सगळी पोरं त्याला घाबरत असावीत. त्याचं नाव होतं “तुकाराम बागल” पण गावात लहान थोर सगळेच त्याला ओळखायचे ते “तुका न्हावी” म्हणुनच. आम्ही गावी गेलो की एक दिवस काका त्याला बोलावुन घ्यायचे आणि मग सगळ्या बच्चे कंपनीची एका रांगेत , तरटावर बसुन झकास हजामत व्हायची. तुकाच्या हातात एकदा मान दिली की मग सगळे केस भादरुन होइपर्यंत काही खरं नसायचं. आमची मान म्हणजे त्याची खाजगी मालमत्ता असल्यासारखी वापरायचा तुका. मला त्याच्याकडुन केस कापुन घ्यायला कधीच आवडायचं नाही, कारण तो अगदीच बारीक भादरुन टाकायचा सगळे केस. आधीच आम्ही वामन मुर्ती त्यात केसही एवढेशे म्हटले की अवतार जाम अफलातुन दिसायचा. १२-१३ वर्षाचे वय असल्याने स्वतःच्या दिसण्याबद्दलची जागरुकता वाढायला सुरूवात झाली होती.

कारण हा तुका आम्ही तिथे गेल्यानंतर १५-२० दिवसांनी उगवायचा, तोपर्यंत परत यायची वेळ झालेली असायची आणि डोइवर फरशी घासायच्या केस झडलेल्या ब्रशसारखी खुरटे घेवुन पुण्यात वावरायची शॉल्लेट लाज वाटायची. पण काकांसमोर कुणाचेच चालायचे नाही. सगळ्यांना आपली गर्दन त्या गारद्याच्या हाती द्यावीच लागायची. तुका मग आपली हत्यारे परजत गोंधळलेल्या, बावरलेल्या आदिलशाही सैनिंकावर गनिमी काव्याने एकदम हल्ला करणार्‍या मर्द मावळ्यासारखा (च्यायला उपमा उलट्या झाल्या का?) तुटून पडायचा. त्याचा हात सॉलीड जड होता. एखाद्याचे तरी रक्त निघायचेच. मग ते तुरटीच्या खड्याने खसखसुन पुसत तो रक्त टिपून काढायचा.  ती सिच्युएशन बघण्यासारखी असायची….

काकांनी दम दिलेला असल्याने आम्ही त्याला तुकाकाका म्हणायचो, पण त्याला नुसते तुकाच म्हणलेले आवडायचे. तर तुका आपली धोकटी उघडुन बसलेला असायचा. त्याच्या समोर तरटावर हातात आरसा धरुन आमच्यापैकी एखादा बकरा…, कत्तलखान्यात खाटकाच्या सुरीखाली उभ्या असलेल्या बकर्‍याच्या चेहर्‍यावरही एवढे केविलेवाणे भाव नसतील असा त्याचा चेहरा.  शेजारी एका रांगेत बाकीचे ७-८ जण. रांगेत आपला नंबर शेवटचा असावा अशी प्रत्येकाचीच केविलवाणी धडपड चालु असायची. शेजारीच काका बसुन असायचे. सगळ्यांची “हजामत” होइपर्यंत ते बसल्या जागेवरुन उठायचे नाहीत. त्यामुळे मनात असो वा नसो कुणालाच ते टाळता यायचे नाही. तुकाचा हात जबरदस्त चालायचा. दोन तासात सगळ्यांची भादरुन (डोकी) टाकायचा तो. त्यात त्याची एक कातरी खुपच जुनी झालेली होती. तिने बर्‍याचदा केसाला चांगलीच ओढ बसायची आणि ओसरीचे रुपांतर रुदनगृहात व्हायचे. काम पुर्ण होइपर्यंत तुका एक शब्दही बोलायचा नाही. आता ‘बाल’हत्या करायला गेले की अखंड बडबड (तिही फालतु) करणारा इथला नापित पाहीला की मला तुकाची जाम आठवण येते.

एकदा मात्र तुका बोलला. संज्या, आमच्या तीन नंबरच्या, चुलत आत्याचा मुलगा, वय वर्षे सात (हुश्श ) वैतागुन त्याला म्हणाला. तुका काका मी मोठा झालो की मोठ्ठं कटींग सलुन काढणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझे केस भादरणार सगळे. मग तुला कळेल, काय त्रास होतो ते. (तोवर तुकाची पण कुणी भादरु शकेल यावर आमचा विश्वासच नव्हता.) तसा तुका भडकला.

“गप ए फुटाण्या, एक कानफटात दीन बघ. सलुन काढणार म्हणे. गपचुप अभ्यास करुन विंजनेर व्हायाचं तं हजामती करणार म्हणे. फटके दीन गांXवर सणकुन दोन.”

दुसर्‍याच क्षणी तुकाचा आवाज एकदम मऊ झाला.

“देवा, तुमी चांगलं शिका, लै मोटं व्हा. दागदर व्हा, विंजनेर व्हा. आमी हावोच की असली हलकी सलकी कामं कराया. तुमच्यासारक्याचं काम न्हवं ह्ये.”

तूका न्हावी…

काळा कुळकुळीत वर्ण, अंगात एक बर्‍यापैकी पण स्वच्छ असणारा सदरा आणि गुडघ्यापर्यंत येणारं धोतर असा त्याचा वेश. एका खांद्यावर अडकवलेली चामड्याची धोकटी आणि दुसर्‍या खांद्यावर एक घोंगडी. त्या घोंगडीवर त्याने त्याच्या गुरुंचा कापडी फोटो शिवुन घेतला होता. श्री शिवलाल स्वामी तसे आमच्या सगळ्या गावचेच गुरु. आजच्या सो कॉलड बाबा-बुवा सारखे नाहीयेत ते. भजने, प्रवचने उत्तम करतात पण त्यावर त्यांचा फारसा विश्वास नाही. सोलापूरातील सेटलमेंट नामक कुप्रसिद्ध भागात त्यांनी उद्यम नगर म्हणुन एक छोटीशी वसाहत स्थापन केलीये. तिथे त्यांनी वडर, लमाण ई. जमातीतील तसेच इतरही समाजाने वाळीत टाकलेल्या लहान मोठ्या गुन्हेगारांसाठी एक पुनर्वसन केंद्र चालवले आहे. त्यांच्यासाठी लहान लहान उद्योग चालु करुन दिले आहेत. असो तर स्वामींचा फोटो तुकाच्या घोंगडीवर असे.

एका भेटीत तुकाच्या खांद्यावर त्याची चिरपरिचीत घोंगडी दिसली नाही म्हणुन त्याला विचारले तर त्याने जवळजवळ उडवुनच लावले…

“हरपली की देवा कुटंशी!” मी विसरूनही गेलो.

नंतर आठवड्याभराने आम्ही पोरं-पोरं शेताकडुन येत असताना वेडी अंपी दिसली रस्त्यात. कर्नाटकातल्या कुठल्यातरी गावातली ही बाई, कोणी तरी नोकरीचे आमिष दाखवुन इकडे आणली आणि नंतर चक्क त्याने तिला सोलापूरच्या बुधवारपेठेत विकले. त्या धक्क्याने वेड लागुन इकडे तिकडे भटकत ती आमच्या गावात येवुन पोचली, ती इथलीच होवून गेली. तिच्याकडे ती घोंगडी बघितल्यावर साहजिकच आम्हाला स्फुरण चढले.

“ए येडे, हि घोंगडी आमच्या तुकाकाकाची आहे  ” म्हणुन आम्ही ती घोंगडी तिच्याकडुन हिसकावुन घेतली आणि परत तुकाला नेवुन दिली. अर्थात त्यामागे आमचा स्वार्थ होता. तुकाकडुन मिळेल तेवढी सवलत हवीच होती. दुसर्‍या दिवशी घोंगडी परत अंपीच्या अंगावर दिसली. तुकाला विचारायला गेलो तर म्हणाला…

“जाऊ द्या देवा, येडी हाये पण माणुसच हाये ना. तिलाबी थंड वाजतीच की. म्हुन म्याच दिली व्हती घोंगडी तिला.”

मी अवाक होवून बघतच राहीलो. तुकाचं हे नवीनच रुप पाहायला मिळालं होतं आज.

दिवस हळु हळु जात होते. आम्हीही मोठे होत गेलो. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलत होती. मध्येच एक दिवस काकांचा फोन आला. मी १० वीत होतो तेव्हा. तुका लग्न करत होता, त्यासाठी आई-आण्णांना खास आमंत्रण होतं. आण्णा आश्चर्यात पडले होते. तुका जवळ जवळ काकांच्याच वयाचा, आण्णांपेक्षा ८-९ वर्षांनी लहान. पण इतके दिवस लग्नाविना राहीलेला. सगळे मागे लागुन देखील ‘मला नाय लावायचा पाट!’ यावर अडून राहीलेला. आज वयाच्या चाळीशीनंतर लग्नाला कसा काय तयार झाला?

पण आई-आण्णा आठवणीने गेले. ते परत आल्यावर कळलेली हकिकत अफाटच होती. गावाबाहेरच्या वस्तीतला (म्हारवडा) सोपाना. त्याच्या विधवा पोरीवर गावातल्याच काही पोरांनी बलात्कार केला होता. रखमीनं थेट पावातल्या विहीरीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. नेमका त्यावेळी तुका तिथे रानातच होता. त्यानं तिला वाचवलं आणि सरळ लग्न करुन रिकामा झाला. सुरुवातीला गावात थोडा गोंधळ झाला. कारण ती एक तर विधवा, त्यात म्हारवड्यातली , तुका जातीनं न्हावी त्यामुळे गावातल्या तथाकथित प्रतिष्ठीत लोकांनी याला विरोध केला. त्यासाठीच काकांनी आण्णांना बोलावले होते. आण्णांनी लोकांची समजुत काढली आणि रखमीला घर मिळालं. पण तुका आता आम्हाला नव्याने कळायला लागला होता.

माझं इंजीनिअरींग पुर्ण झाल्यावर एकदा गावी गेलो होतो, तेव्हा तुकाला मुद्दाम जावुन भेटलो. आता पन्नाशीच्या घरात होता तुका. त्याच्या पाया पडुन सांगितलं…

“तुकाकाका, तू सांगितल्याप्रमाणे विंजनेर झालो रे.” तसा तुका उसळुन म्हणाला…

“देवा तू तर चित्तरकार होनार हुता ना, विंजनेर मी त्या संज्याला सांगितलं हुतं.” म्हणजे हे ही त्याच्या लक्षात होतं. चित्र काढण्याची आवड असणं आणि चित्रकार होणं यातला फरक त्याला समजावुन सांगण्याच्या फंदात मी पडलो नाही. त्यानं माझ्या पाठीवरुन हात फिरवला आणि म्हणाला…

“त्ये कायका आसंना, आन्ना लै खुश आस्तील न्हवं. पोरं मोटी जाली की आय-बापाला हुनारा आनंद लै येगळाच अस्तोय बग.”

मला माहीत नव्हतं पण या घटनेच्या दोनच आठवडे आधी तुकाचा मुलगा साधं तापाचं निमीत्त होवून तडकाफडकी गेला होता. नंतर जेव्हा काकांकडुन ही गोष्ट कळली तेव्हा हळहळण्याशिवाय दुसरं काहीच करु शकलो नाही मी. आजही गावी जातो तेव्हा थकलेला तुका भेटतो आणि विचारतो…

“काय देवा, हजामत करायची का? बसताय तरटावर…..!”

आता गावात कटींग सलुनही झालीत. तरटाची जागा खुर्च्यांनी घेतलीय. हातात धरायच्या तुकाच्या फुटक्या आरशाची जागा मोठ मोठ्या मिरर्सनी घेतलीये. तुकाही खुप थकलाय आता. पण इतके दिवस अरेतुरे करणारा तुकाकाका आता अहोजाहो करतो, किती सांगितले तरी त्याला ते पटत नाही. मग मी हलकेच हसतो, कधी कधी मुड असेल तर अगदी हजामत नाही पण दाढीला मात्र त्याच्यासमोर नक्की बसतो. पण खरंच सांगतो…

अजुनही त्याचा हात थरथरत असला तरी तेवढाच जोरात चालतो, पण अजिबात त्रास देत नाही. कारण आता मला तुका पुरेपुर उमजलाय.

विशाल

 

8 responses to “तुकाकाका ….

 1. महेंद्र

  नोव्हेंबर 25, 2010 at 8:24 pm

  व्यक्ती चित्र झकास….. 🙂 डॊळ्यापूढे उभे केलेस सगळे काही.

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 26, 2010 at 11:08 सकाळी

   धन्यवाद महेंद्रदादा, खुप दिवसापासुन लिहीन म्हणत होतो, काल लिहीले. बरं वाटतय आता 🙂

    
 2. सचिन

  नोव्हेंबर 25, 2010 at 9:01 pm

  तुकाकाका अगदी डोळ्यासमोर उभे राहिले रे.

  शेवट वाचताना डोळ्यात पाणी आल रे.

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 26, 2010 at 11:08 सकाळी

   धन्यवाद मित्रा, तुकाकाका तसाच आहे रे, अगदी वेगळा पण आपल्या वेगळेपणाची जाणीवच नसलेला. साधा, सरळ म्हणुनच हृदयाला भिडणारा 🙂

    
 3. sahajach

  नोव्हेंबर 27, 2010 at 12:55 pm

  सुंदर….

   
 4. mandar kulkarni

  फेब्रुवारी 22, 2011 at 4:17 pm

  Very nice…..keep it up

   
 5. neeyati

  जानेवारी 10, 2015 at 4:03 pm

  mast. khup chan. m pahilya pasunch city madhe rahanariy, gaw as m kadhi pahilch nhi. tyamule ashi kontich athwan nhi mazi. ithe pratyek jan aapaplya flats madhe ani dar band – ghrachihi ani manachi hi ………

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: