RSS

मी परत येइन…. (भाग २)

15 नोव्हेंबर

मी परत येइन : भाग १

फाट्यावर नेहमीप्रमाणे गाडी थांबली. दिरगुळे मास्तरांनी डाक ताब्यात घेतली. नेहमीप्रमाणे ड्रायव्हरबरोबर दोन शब्द बोलून आणि तंबाखुची चिमूट दाढेखाली दाबुन त्यांनी सायकलला टांग मारली.

“अहो…अहो काका, जरा थांबता का? हे कुठलं गाव आहे?”

एक नाजुक आवाजातला प्रश्न कानी आला. मास्तरांनी आवाजाच्या रोखाने नजर वळवली. एक २७-२८ वर्षाची सुस्वरुप मुलगी बसमधुन उतरुन उभी होती. पाठीवर एक ट्रॅव्हल बॅग अंगात जीन्स, शॉर्ट कुर्ता असा आधुनिक वेष…… !

तिने प्रसन्न हसुन दोन्ही हात जोडले.

“नमस्कार… मी अदिती! मला तडवळ्याला जायचं होतं. ड्रायव्हरने इथे उतरवलं, पण इथे तर कुठलंच गाव दिसत नाहीये.”

दिरगुळे मास्तर तिच्याकडे पाहातच राहीले.

“तडवळ्यात कुणाकडं आली आसल ही बाई. की कुणी पत्रकार आहे? पण तडवळ्यात तिला काय बातमी मिळणार आहे?

“नमस्कार ताई, मी दिगंबर दिरगुळे, तडवळ्याचाच आहे. आपण कोण? पत्रकार आहात काय?”

“दिरगुळे काका, मी अदिती देशमुख ! मुंबईहुन आलेय., पत्रकार नाही चित्रकार आहे. महाराष्ट्रातील जुन्या वाड्यांचा अभ्यास करतेय सद्ध्या. माझा एक मित्र काही दिवसापूर्वी थोडा वेळ तडवळ्यात थांबला होता त्याच्याकडून कळाले की तडवळ्यात एक शेकडो वर्षापूर्वीचा पण अजुनही बर्‍यापैकी सुस्थीतीत असलेला वाडा आहे. म्हणलं काही स्केचेस करुन घ्यावीत , म्हणुन आले होते. कंडक्टरने इथे उतरवलं, पण इथे तर कुठलंच गाव दिसत नाहीये.”

तसे मास्तर हसले, ” अहो ताई, गाव इथुन सात्-आठ किलोमीटरवर आहे. चला येत असाल तर माझ्याबरोबर.”

“नाही, नाही तुम्ही कशाला त्रास घेताय, मी येइन काही तरी वाहन पकडुन. नाहीतर एखादी रिक्षा वगैरे धरुन.” अदिती त्यांच्या सायकलकडे पाहात म्हणाली.

तसे मास्तर पुन्हा एकदा जोरजोरात हसायला लागले.

“अहो ताई, तुमचं शहरगाव नाही हे, इथे कुठली आलीय रिक्षा-बिक्षा? हेच बघा ना, रोजची डाक घ्यायला सुद्धा मला इथे यावं लागतय. दुसरं कुठलंच वाहन नाही मिळणार इथे. दुपारच्याला एखादी बैलगाडी आली इकडं तरच. चला, अशा ओसाड जागेवर तुम्हाला एकटं सोडायलाही मन धजावत नाहीये माझं.” दिरगुळे मास्तर प्रामाणिकपणे म्हणाले, तसं अदितीच्या लक्षात आलं. बस निघून गेली होती. तिच्याबरोबर उतरलेले एक दोन जण गावाच्या दिशेने चालायला लागलेही होते. आता फाट्यावर ती आणि मास्तर दोघेच होते. अदिती पटकन निर्णय घेवून रिकामी झाली. समोरचा माणुस साधा सरळ दिसतोय. ताई-ताई करतोय. इथे एकट्याने थांबण्यापेक्षा थोडी रिस्क घ्यायला काही हरकत नाही. अर्थात जर दिरगुळेनी जर काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला असताच तरी त्यांना हाताळायला अदिती समर्थ होती. कर्नल देशमुखांनी तिला अशा प्रकारे ट्रेन केले होते की अदिती एका वेळी दहा ट्रेनड कमांडोजबरोबरही निशस्त्र लढू शकेल याचा तिला विश्वास होता. शेवटी वेळ काय कुठेही आणि कसलीही येवु शकते. तुम्ही किती सामर्थ्यशाली आहात यापेक्षा तुमचा स्वतःच्या सामर्थ्यावर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचे.

ते दोघे गावात पोहोचले तेव्हा एक वेगलीच घटना त्यांची वाट पाहात होती. सगळे गाव पुन्हा एकदा शिरपाच्या घरासमोर जमा झालेले होते.

“काय झाले रे, रोहिदास?”

मास्तर सायकलवरून उतरून गर्दीत घुसले. अदिती त्यांच्यामागोमाग होतीच. सगळ्यांच्या नजरा आता अदितीकडे लागल्या. पण त्याकडे दुर्लक्ष करुन अदिती मास्तरांच्या मागोमाग गर्दीच्या मध्यभागी पोचली. मधोमध शिरपा बेशुद्ध पडला होता. लोक भांबावल्यासारखे बघत गर्दी करुन उभे होते.

इथे मात्र अदितीने लिड घेतला.

“चला भाऊ, बाजुला व्हा, थोडी हवा लागु द्या. कुणीतरी पाणी आणा थोडं. ” ती आपल्या परीने शिरपाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करु लागली. तेवढ्यात तिचे लक्ष त्याच्या हाताच्या मुठीकडे गेले. शिरपाच्या उजव्या हाताची मुठ घट्ट आवळलेली होती, त्याच्या चेहर्‍यावर कसलीतरी आश्चर्यमिश्रीत भीती दाटलेली दिसत होती. तिने त्याच्या मुठ उघडुन त्यात लपलेली वस्तू बाहेर काढली आणि मास्तरांच्या हातात दिली. मास्तर आपल्या हातातल्या सोन्याच्या डुलाकडे पाहतच राहीले.

“हे कसं शक्य आहे? रोहिदास, आधी मला सांग कुशा कुठे आहे?”

विस्फारलेल्या नजरेने डुलाकडे बघत मास्तरांनी रोहिदासला, एका गावकर्‍याला विचारले.

“काय बी म्हायित न्हाय, मास्तर. तिनं बी गायब झालीया! म्हुन तर शिरपा बेसुद पडला. काल रातीच्याला त्यो रानावरच हुता. सकाळच्या पारी घरी आला तर कुशाक्का गायब. कुटंबी दिसना. म्हुन माज्या घरला आला, ततं आलीया का त्ये बगाया. शकुनं सांगटलं त्येला की न्हाय बाबा, एकत्या सकाळच्या पारी कुशाक्का आमच्या घरी कशाला येल. म्हुन मग समदं गाव धुंडाळलं पर कुटं बी नाय गावली. नंतर शिरपा त्येच्या घरात शिरला आन येकेदमच जोरशात वरडुन बेसुध पडला. म्हुन मग आमी हितं जमा झालो. त्येला सुद्धीवर आनायची कोशीश करतच हुतो तोपत्तुर तुमी आन ह्या ताई येवुन पोचलासा. आन मास्तर, ह्या ताई कोन हायती, दागदर हायती का?”

“नाही रे, त्या वेगळ्याच कामासाठी आल्या आहेत. नंतर सांगेन, आधी शिरप्याला शुद्धीवर आणु म्हणजे नक्की काय झाले ते कळेल.”

“काका, हे सगळे तुम्हाला मास्तर म्हणताहेत म्हणजे तुम्ही शिक्षक आहात तर. बाय द वे हा सगळा काय प्रकार आहे ते मला सांगाल का? कारण त्या कानातल्या रिंगकडे पाहिल्यावर झालेली तुमची प्रतिक्रिया फारच वेगळी वाटली मला.”

अदितीने आता संभाषणात भाग घेतला.

“ती खुप विचित्र कहाणी आहे ताई.”

“मला आता या सगळ्याच प्रकारामध्ये इंटरेस्ट यायला लागलाय. तुम्ही सांगाच आणि आधी मला ते ताई म्हणायचं बंद करा, तुमच्यापेक्षा लहान आहे मी. नुसतं अदिती म्हणलंत तरी चालेल.”

मास्तरांनी मग झालेले सगळे तिला सांगितले म्हणजे रंगीच्या मृत्युपर्यंत. त्यापुढे काय घडलं ते त्यांनाही माहीती नव्हतं.

“अदिती, मला मघाशी धक्का बसला कारण हे सोन्याचे डुल आम्ही रंगीच्या प्रेताबरोबरच पुरले होते. ते रंगीला खुप आवडायचे म्हणुन घरची एवढी गरीबी असुनसुद्धा शिरपा आणि कुशाने ते सोन्याचे डुल तसेच रंगीच्या कानातच राहू दिले होते. पण मग हा एकच डुल आता बाहेर तोही थेट शिरपाच्या हातात सापडतो, त्यामुळे मला धक्का बसला. अदिती, रंगीचे प्रेत कुणी उकरून तर काढले नसेल?”

“पण त्याने काय साध्य होणार आहे? समजा एक गोष्ट धरुन चालु की कोणी माहितगाराने किंवा गरजुने तिच्या कानातल्या सोन्याच्या डुलाच्या मोहाने तिचं प्रेत परत उकरून काढलं, तर मग परत तो इथे कशाला येइल? आलाच तर दुसरा डुल कुठेय? की मग शिरप्यानेच………!”

“नाही अदिती, ते डुल तिच्या कानात तसेच ठेवायची इच्छा शिरप्यानेच व्यक्त केली होती. त्यामुळे तो…..,

“आपण जावून रंगीला पुरले होते ती जागा चेक करु या का?” अदितीने मास्तरांचे बोलणे मध्येच तोडत विचारले.

“अगं पण तू आली होतीस वेगळ्याच कामासाठी, आता इथे अडकली आहेस वेगळ्याच कामात? खरंतर मला वाटतं तू थोडा वेळ आराम कर, आणि संध्याकाळच्या गाडीने परत जा. इथलं सगळं वातावरण थोडं स्थीर झालं की मी तूला बोलावेन परत. तुझा फोन नंबर देवुन जा मला.”

“या गावात फोन आहे?” अदितीच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उभे राहीले.

“एकच आहे आणि तो माझ्याकडेच आहे, कारण गावातले पोस्टाचे व्यवहार मीच बघतो ना. त्यामुळे त्या लोकांनी फोन पुरवलेला आहे.”

“ग्रेट, माझी काळजी करु नका तुम्ही. मी पेशाने प्रायव्हेट डिटेक्टिव्हदेखील आहे. आता या केसचा काहीतरी छडा लावल्याशिवाय मी परत जाणार नाही. यदाकदाचित तसेच परत गेले तर आमचे कर्नल मला लाथ मारुन परत पाठवतील. तिथे लोकांना तूझी गरज असताना तू पळुन कशी आलीस म्हणुन?”

अदिती हसुन म्हणाली.

“अच्छा, म्हणजे चित्रकला ही तुझी आवड आहे आणि गुप्तहेरी हा पेशा. तुझ्याकडे बघून मात्र वाटत नाही तू गुप्तहेर असशील म्हणुन.”

“गुप्तहेर म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण एनी वे, गुप्तहेर असाच हवा ना तो जर सगळ्यांना ओळखु आला तर त्यात गुप्त ते काय राहीले?” अदिती मिस्कीलपणे म्हणाली तसे दिरगुळे मास्तर कौतुकाने हसले. ही पोरगी काही वेगळीच होती.

“ठिक आहे, गावकरी शिरपाकडे बघतील, आपण रंगीला जिथे पुरले होते तिथे जाऊ. पण ती जागा जर कुणी उकरलेली नसेल तर मात्र मी ती उकरण्याची परवानगी तुला देणार नाही. असो, हे कर्नलसाहेब म्हणजे तुझे बॉस का?”

अदिती आणि मास्तर तिकडे जायला निघाले.

“येस, ही इज माय बॉस, माय गॉड, माय मॉम, माय फ्रेंड, माय फिलॉसॉफर, माय स्ट्रेंग्थ …. ते माझे बाबा आहेत. रिटायर्ड कर्नल रणधीरराजे देशमुख. तुम्हाला सांगते मास्तर सत्तरी आलीय आता बाबांची , अजुन दोन वर्षात सत्तरचे होतील. पण अजुन एखाद्या लोखंडी कांबेसारखे कडक आहेत.”

दोघेही इप्सित स्थळी जावुन पोहोचले. पण रंगीला पुरलेली जागा जशीच्या तशी होती. अगदी त्यावर वाहीलेली आता सुकलेली काही फुलेदेखील अजुन तिथेच पडुन होती. इथे तर सर्व इंटॅक्ट आहे. मग तो सोन्याचा डुल बाहेर कसा काय आला?”

अदिती विचारात पडली. हे कसं शक्य आहे? काही वेगळंच तर नाही…., मागे एकदा बाबा म्हणाले होते की आपण मानु अथवा न मानु जगात एक तिसरी शक्ती अस्तित्वात आहे. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार आहेच त्या धर्तीवर जिथे देव आहे तिथे……..

“छ्या, कुठेतरीच भरकटतेय मी.” अदिती स्वतःवरच हसायला लागली.

“काय झालं गं, का हसली……………..”

“मास्तर, आवो मास्तर, गुरुजींनी बलीवलय तुमास्नी, लगीचच.”

कुणीतरी गावकरी हाका मारत आला, तसे मास्तर गोंधळले.

“गुरूजी….? श्रीराम गुरूजी म्हणायचेय का तुला? अरे पण ते तर गेल्या कित्येक दिवसात त्यांच्या राहत्या घरातून देखील बाहेर पडले नाहीत. गेल्या कित्येक दिवसात ते कुणाला भेटले पण नाहीत. फक्त तुका न्हावी तेवढा जातो आणि भेटतो त्यांना.”

“मगासच्याला तुकाच सांगीत आला व्हता, गुरुजींनी तुमास्नी बलिवलय म्हुन. लै घाईत व्हता, चला बिगी बिगी.”

आधी मास्तरांच्या मनात आले अदितीला त्या गावकर्‍याबरोबर आपल्या घरी पाठवुन द्यावं आणि आपण श्रीराम गुरुजींना भेटायला जावं. पण परत एक विचार मनात आला कोण जाणे कदाचित गुरुजींनी या संदर्भातच बोलावलं असेल.

“अदिती तू पण चल बरोबर, काहीतरी घोळ आहे. गुरुजी गेल्या कित्येक दिवसात कुणालाच भेटले नाहीत, दिसलेही नाहीत एक तुका सोडला तर…, आणि आज त्यांनी मला भेटायला बोलावलेय. काहीतरी महत्त्वाची गोष्ट असणार.”

“श्रीराम गुरूजी…? हे पण तुमच्यासारखेच शिक्षक आहेत का?”

“नाही गं. आधी ते गावातल्या मंदीरातील मारुतीरायाची पुजा-अर्चना, देखभाल वगैरे करायचे. दोन वर्षापुर्वी त्यांची पत्नी वारली आणि गुरुजीही तसे वृद्धच झाले आहेत आता. त्यामुळे अलिकडे ते फारसे घराबाहेर पडतच नाहीत. मला काही मदत लागली की मीच जातो त्यांना भेटायला. आमच्या गावचे कुटूंबप्रमुखच आहेत म्हणेनास.”

“अच्छा, चला जावुया बघुया. या संदर्भात काही असेल तर मलाही उपयोग होइल.”

दिरगुळे मास्तर आणि अदिती गुरुजींना भेटावयास निघाले.

श्रीराम गुरुजींचं घर गावच्या दुसर्‍या टोकाला होतं. तीन खोल्यांची छोटीशी बैठी जागा होती. मास्तर आणि अदिती घरात शिरले. अदिती चौकसपणे घराकडे पाहायला लागली. तिच्या लक्षात आलं की घरात सगळीकडे कुठल्यातरी विचित्र चित्रमय भाषेत काही ओळी लिहून ठेवल्या आहेत.

“कुठली भाषा आहे ही……?” अदिती विचारात पडली. घरात खिडक्या, दरवाजे सगळीकडे वेगवेगळी . “हा काय प्रकार आहे?” तिला स्वतःला चार पाच परदेशी भाषांबरोबरच बर्‍याचशा स्थानिक भाषाही येत होत्या. चित्रकार असल्याने खुप चित्रलिप्यांचा तिने अभ्यास केला होता. पण ही लिपी काहीतरी वेगळीच होती.

“आत ये पोरी? सगळं सांगतो……..?” आतल्या खोलीतुन आवाज आला तसे मास्तरांच्या मागोमाग अदिती आतल्या खोलीत शिरली.

आत एका छोटेखानी पलंगावर एक सत्तर-पंचाहत्तरीच्या घरातील व्यक्ती निजली होती. मास्तरांनी त्यांना वाकुन नमस्कार केला, अदितीनेही त्यांचे अनुकरण केले. गुरुजींची प्रश्नार्थक मुद्रा पाहून मास्तरांनी त्यांना अदितीबद्दल सांगीतले.

“अच्छा, म्हणजे असे आहे तर. चित्रे काढण्यासाठी म्हणुन आलीस आणि या प्रकरणात अडकलीस तर.”

श्रीरामगुरुजींना एकदम खोकल्याची उबळ आली. तसे मास्तरांनी त्यांना आधार देवुन पलंगावरच बसते केले. पाठीला एक उशी दिली.

“आभारी आहे दिगंबर. एक सांगु पोरी, तू परत जा. तू डिटेक्टीव्ह का काय म्हणतेस ती असशीलही. पण इथे जे काही घडतेय ते तुझ्या, माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या क्षमतेबाहेरचे , किंबहुना क़क्षेबाहेरचे आहे. स्पष्टच सांगायचे झाले तर इथे तुझ्या जिवाला धोका आहे. खरेतर सगळ्या गावालाच धोका आहे, पण ते आमचे प्राक्तनच आहे. तू अजुन यात पुर्णपणे गुंतली गेलेली नाहीस तोवरच बाहेर पड. इथे काही तरी फार भयानक, विघातक असं घडतय.”

श्रीराम गुरुजींनी खोकत खोकत हळुवार आवाजात तिला सांगीतले. तशी अदितीच्या त्यांच्या थोडी जवळ सरकली.

” गुरूजी…, मी तडवळ्याला यायचा निर्णय घेतला तेव्हाच या प्रकरणात गुंतले गेलेय. नाहीतर कुणाच्या ऐकीवातही नसलेल्या तडवळ्यात यायची मला त्या देवाने का बुद्धी दिली असती? मुंबईत सगळं व्यवस्थीत चाललेलं असताना मला इथे यायची बुद्धी झाली म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या देवाला देखील मी इथे हवीय, हो की नाही. माझ्या जीवाची काळजी नका करू, येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी जायचे आहेच, मग त्याच्याबद्दल वृथा भीती कशाला बाळगायची मनात? तुम्ही सांगा मला काय सांगताय ते.”

“मला वाटलंच होतं तू ऐकणार नाहीस म्हणून. खरेतर तू येणार हे ही माहीत होते मला. स्वामींनी सांगीतल्यापासुन तुझीच वाट पाहत होतो. म्हणजे तुच असे माहीत नव्हते, पण जेव्हा मास्तरांनी तुझे नाव सांगितले तेव्हाच मी ओळखले होते ती तुच आहेस म्हणुन. तरीही मी एकदा तपासुन पाहीले माझ्यापरीने. स्वामींनी सांगीतले होते की गावावर खुप मोठे संकट येणार आहे, आत्ताच कुणाला काही बोलु नकोस? पण योग्य वेळी तुला संकटाची लक्षणे लक्षात येतीलच. त्याच वेळी एक अपरिचित मुलगी गावात येइल. ती मुलगीच गावाची या संकतातून सुटका व्हायला कारणीभुत होइल. त्या मुलीचे नावही त्यांनी माझ्या शिवलीलामृताच्या पोथीवर लिहून ठेवले होते. गुरुजींनी आपली पोथी उशीखालुन काढुन अदितीच्या हातात दिली. पोथीच्या मुखपृष्ठावरच किरट्या पण वळणदार अक्षरात लिहीले होते “अदिती”!

आता आश्चर्यचकीत होण्याची पाळी अदितीची होती. पोथीचे मुखपृष्ठ पाहताना एकच गोष्ट तिला खटकली होती…….! तिने काही बोलायच्या आधी गुरुजींनी पोथी तिच्या हातून काढून घेतली.

“गुरूजी हे मात्र खरोखर विलक्षण आहे. तुमच्या सदगुरुंना भेटायलाच हवं एकदा.” अदिती अगदी मनापासुन बोलली.

“काळजी करु नकोस, या युद्धादरम्यान तुझी स्वामींशी भेट होइलच ते तुला एकटीला सोडणार नाहीत. मी अजुन एका व्यक्तीची वाट पाहतोय, ती व्यक्ती आली की तुम्ही या युद्धाला पुर्णपणे तयार व्हाल. तुझ्या एकटीच्या हातातली गोष्ट नाहीये ही.”

“म्हणजे काय आहे काय नक्की हे गुरूजी? काही भुत, पिशाच्च वगैरे…..”

बर्‍याच वेळानंतर दिरगुळे मास्तरांनी संभाषणात भाग घेतला.

“सांगतो, प्रथम तुम्ही दोघेही एक सांगा भुत, प्रेत, आत्मा, काळी शक्ती यावर तुमचा विश्वास आहे का?”

मास्तर विचारात पडले. अदिती मात्र लगेच उच्चारली…

“गुरुजी, या सगळ्यांचं माहीत नाही पण देव या शक्तीवर माझा विश्वास आहे. जर देव आहे हे खरं मानलं तर अशी काही निगेटीव्ह शक्तीही असायलाच हवी. प्रकाश असेल तर अंधार हा असणारच. चांगलं आहे तिथे वाईटही असणारच.”

श्रीराम गुरुजींचा चेहरा उजळला.

“मला हेच ऐकायचं होतं पोरी. कारण दिगंबरची कितीही इच्छा असली तरी त्याचे सामर्थ्य्, त्याची क्षमता खुप तोकडी आहे आणि या युद्धात त्या सामर्थ्याची, श्रद्धेची, इच्छा शक्तीची खुप गरज आहे. खरेतर माझी इच्छा आहे की ती तिसरी व्यक्ती येइपर्यंत थांबायला हवे. पण ती व्यक्ती अजुनही आलेली नाही आणि गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्यात ते पाहता आपल्याकडे फारसा वेळ उरलेला नाहीये. ती शक्ती प्रचंड शक्तीशाली आहे, तिच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, दुर्दैवाने ती परमेश्वराच्या विरोधी बाजुची आहे.”

“म्हणजे…? तुम्हाला नक्की काय म्हणायचय गुरुजी? कोण आहे ती शक्ती?” इति अदिती.

“अशा शक्तीला नाव नसतं बेटा, देवाला एक आपण वेगवेगळी नावे दिली आहेत, पण या शक्तीला नाव नाही. असे असले तरी ती परमेश्वराइतकीच सनातन आहे, त्याच्या इतकीच शक्तीशाली आहे. अवध्य आहे, अविनाशी आहे.”

“तसं असेल तर मी, किंवा तुमची ती येणारी तिसरी व्यक्ती आम्ही कसे काय या बलाढ्य शक्तीचा सामना करणार आहोत? नाही…मी माघार घेत नाहीये, ते माझ्या रक्तातच नाहीये. पण एक सावधगिरी म्हणुन तुम्हाला विचारतेय.

“बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मुळात तू किंवा ती तिसरी व्यक्ती , तुम्ही कुठे लढणार आहात. लढणार आहे ती तुमची ईश्वरी शक्ती.”

“तुमची ईश्वरी शक्ती… आमची….?” अदितीने तुमची आणि आमची या शब्दांवर जरा जोर दिला. तसे श्रीराम गुरुजी थोडेसे गोंधळले.

“अगं म्हणजे तुमच्या पाठीशी असलेली ईश्वरी शक्ती. तुम्ही केवळ माध्यम आहात. खरेतर माझीच निवड झाली असती पण मी खुप थकलोय गं आता.”

“आणि आम्ही म्हणजे ती ईश्वरी शक्ती नक्की कुणाशी लढणार आहे?”

“खरे तर मला ते नेमकं माहीत नाहीये. त्याला प्रत्येक काळानं वेगवेगळं नाव दिलय. कधी कालकुट, कधी कपालवर्मन तर कधी लिअ‍ॅटोर, कधी तो हिटलर म्हणुन ओळखला गेला तर कधी स्टॅलीन म्हणुन, कोण जाणे आज त्याचे नाव अजुन काहीतरी वेगळंच असेल. तुला माहीती असलेलं त्याचं एक नाव सांगतो….

तो कधीकाळी ‘काऊंट ड्रॅक्युला’ म्हणुनही ओळखला जात असे. त्या त्या वेळी तेवढ्यापुरता त्याचा अंत झालाय असे वाटते पण त्याला शेवट नाहीये. तो पुन्हा पुन्हा कुठल्या ना कुठल्या रुपात जन्म घेतो. यावेळेस त्याने आपली कर्मभुमी म्हणुन पुन्हा एकदा भारतभुमीची निवड केलीय. सुरुवात त्याने तडवळ्यापासुन केलीय. इथुन आपले साम्राज्य वाढवायचा त्याचा विचार आहे. अजुन त्याचे साथीदार फारसे नाहीत, जे आहेत ते सुप्तावस्थेत आहेत , कमजोर आहेत. तो पुन्हा पुर्ण शक्तीशाली व्हायच्या आत त्याला संपवायला हवय. नाहीतर समुळ मानवजातच घोक्यात येइल.”

नंतर गुरुजी खुप वेळ बोलत होते. त्यांनी अदितीला बर्‍याच गोष्टी समजावून सांगितल्या, काही मंत्र काही अक्षरे शिकवली. त्यांच्यामते त्या अक्षरांमध्ये प्रचंड सामर्थ्य होते. ती ठराविक वेळी, ठराविक पद्धतीनेच उच्चारायला हवी होती. अन्यथा तिच्यावरच उलटायची जास्त शक्यता होती.

“बाय द वे, गुरुजी, मी दुसरी आणि कुणीतरी तिसरा किंवा तिसरी व्यक्ती पण येणार आहे असे तुम्ही म्हणालात. पण मग पहिली व्यक्ती कोण आहे ते तुम्ही नाही सांगीतलेत.” अदितीने आपली शंका विचारली “आणि हो, तुम्ही त्या चित्रविचीत्र आकृत्यांचा, त्या लिपीचा अर्थ सांगणार होतात.”

गुरुजी पुन्हा थोडेसे विचारात पडले, पुढच्याच क्षणी त्यांनी उत्तर दिले. पहिली व्यक्ती कोण ते तुला योग्य वेळी कळेलच ना आणि त्या विचित्र भाषेबद्दल म्हणशील तर ती एक प्राचीन भाषा आहे. माझ्या संरक्षणासाठी म्हणुन माझ्या गुरुजींनी म्हणजे स्वामींनी ही वास्तु त्या मंत्रांच्या साहाय्याने सुरक्षीत करुन ठेवलीय.

“पण गुरुजी, या सगळ्यांशी तुमचा संबंध कुठे आणि कसा येतो किंवा कसा आला?”

गुरुजींच्या डोळ्यात पाणी उभे राहीले…त्यांनी भिंतीवर टांगलेल्या आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहीले.

“या सगळ्याची सुरूवात माझ्या पत्नीपासुन झालीय पोरी. त्याचा पहिला बळी माझी पत्नी होती गं. त्यावेळी स्वामी पाठीशी उभे राहीले म्हणुन मी वाचलो. माझी पत्नी पहिल्यापासुन अतिशय लालची होती. धनप्राप्तीसाठी म्हणुन ती गपचुप अशा काळ्या शक्तीची उपासना करत होती. तिचाच आधार घेवुन तो या जगात आला आणि पहिला बळी त्याने तिचाच घेतला. गेले दिड दोन वर्षे तो हळु हळु आपली ताकद वाढवतोय. पण स्वामींनी या गावाभोवती बंधन घातलेले असल्याने तो इथे काही करु शकत नव्हता. पण हे बंधन त्याला कायमचे अडवु शकणार नाही हे स्वामींना माहीत होते. म्हणुनच त्यांनी मला जिवंत राहायला भाग पाडले, कारण तू आल्यावर तूला मार्ग दाखवायला कुणीतरी हवे होते ना. आता ज्याप्रकारे रंगीचा मृत्यु झालाय त्यावरुन तो पुन्हा एकदा बर्‍यापैकी शक्तीशाली झालाय, स्वामींची बंधने त्याला अडवायला तोकडी ठरली आहेत. रंगीच्या शरीरातले सर्व रक्त त्याने शोषुन घेतले असेल. आता कुसुम पण गायब झालीय म्हणजे रंगीच्या मार्फत त्याने तिला पण आपल्या अनुयायात सामील करुन घेतले असणार.

दिगंबर, गावातल्या सगळ्यांना सांगुन ठेव. अगदी जवळच्या माणसावर सुद्धा विश्वास ठेवु नका. रात्रीच्या वेळी कुणालाही घरात घेवु नका अगदी सख्ख्या आईला सुद्धा. पोरांनो लवकर काहीतरी करा….., त्याच्या अनुयायांची संख्या वाढतेय, काही दिवसात कदाचित सगळं गावच…., त्या आधीच काहीतरी करा…., तरच या म्हातार्‍याच्या आत्म्याला शांती लाभेल. या चित्रांची गरज काय म्हणुन विचारलेस ना पोरी तू? जर ही चित्रे नसती इथे रेखाटलेली तर कदाचित आज मी ही त्यांच्यात असलो असतो. गेले दोन आठवडे ते चौघे पाच जण दर रात्री माझ्या घराबाहेर घिरट्या घालत असतात. मला हाका मारतात. सगळ्यात जास्त त्रासदायक, वेदनादायक गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे त्यांच्यात माझी पत्नी पण असते.”

एकच विनंती आहे पोरांनो ‘त्या’चा शेवट करण्यात किंवा त्याला इथुन पळवुन लावण्यात जर तुम्ही यशस्वी झालात, तर त्यानंतर या लोकांना म्हणजे त्याच्या अनुयायांना नष्ट करा. त्यांना नष्ट करणे सोपे आहे. कारण ते त्याच्यासारखे अमर नाहीत.

सुरुवात कुठून करायची हा प्रश्न फक्त राहीला…..

तर सुभेदार देसायांचा वाडा सद्ध्या त्याचे निवासस्थान आहे. तो सापडला तर तिथेच सापडेल. एक गोष्ट लक्षात घ्या अजुन तो पुर्णपणे सामर्थ्यशाली बनलेला नाहीये आजवर तोवरच त्याला हरवणे, बंदीस्त करणे शक्य आहे. सद्ध्यातरी तो फक्त रात्रीच बाहेर पडु शकतोय. उद्या त्याच्या शक्ती परत आल्या की दिवस आणि रात्र दोहोंवर त्याची हुकुमत असेल. त्यामुळे सद्ध्या शक्य तितक्या लवकर दिवसा उजेडीच त्याचा शोध घ्या. कारण तो कितीही कमजोर असला तरी रात्रीचा सम्राट आहे, रात्री त्याच्या शक्ती अमर्याद असतात. तेव्हा जे काय करायचे ते दिवसाच. रात्री तुम्ही त्याच्यापुढे तग धरु शकणार नाही. तुम्हास यश लाभो. आता मला निरोप द्या. स्वामी, मला तुमच्यात सामावुन घ्या.”

दुसर्‍याच क्षणी मास्तरांच्या हातात असलेली गुरुजींचा हात थंड पडला.

********************************************************************************************************************

“मास्तर, दुपारचे चार वाजले आहेत. आपल्याकडे अजुन खुप वेळ आहे. तुम्ही गुरुजींच्या पुढच्या तयारीला लागा. तोवर मी जरा त्या देसाईंच्या वाड्याची पाहणी करुन येते.”

“वेडी आहेस का पोरी? गेलो तर आपण दोघेही जावु, मी तुला एकटीला त्या नरकात जावु देणार नाही. तो राक्षस जिथे आहे तिथे तुला एकटीला मी नाही जावु देणार. चल मी देखील येतो.” दिरगुळे मास्तरांच्या स्वरातली काळजी जाणवत होती.

“नाही मास्तर, तुम्हाला बरोबर नाही घेवुन जाऊ शकत मी. ऐकलंत ना मघाशी गुरुजींनी काय सांगीतलं ते? आणि तुमच्या घरच्यांचं काय? तुम्ही माझी काळजी करु नका. तो दिवसा शक्तीहिन आहे. सद्ध्यातरी दिवसा तो माझं काहीही करु शकत नाही. तुम्ही गुरुजींच्या पुढच्या तयारीला लागा. मी नक्की परत येइन…. आणि…

“आणि काय?” दिरगुळे मास्तरांनी घाबरुन विचारले.

अदितीने आपल्या खिशातून एक विजीटींग कार्ड बाहेर काढले, मास्तरांच्या हातात दिले..

“आणि जर सकाळपर्यंत, हो सकाळपर्यंत माझी वाट बघा, मी जर आज रात्रीच्या आधी बाहेर नाही पडले तर रात्री वाडयात शिरण्याचा वेडेपणा करु नका. रात्री या कार्डवरच्या रेसिडेंशियल फोन नंबरवर फोन करुन कर्नलना परिस्थितीची कल्पना द्या आणि सकाळ झाल्यावरच वाड्यात शिरा. कुठल्याही परिस्थितीत रात्री वाड्यात शिरू नका.”

अदितीने श्रीराम गुरुजींनी दिलेले सर्व साहित्य जवळ असल्याची खात्री करुन घेतली. त्यांनी शिकवलेले मंत्र पुन्हा एकदा मनातल्या मनात घोकले. देवाचे नाव घेतले आणि वाड्याच्या दिशेने निघाली.

मास्तर भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहात होते. त्यांच्याही नकळत त्यांनी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात आपले हात जोडले. कोण कुठली ही पोर ना नात्याची ना गोत्याची, पण त्यांच्यासाठी, त्यांच्या गावासाठी आपले प्राण धोक्यात घालायला निघाली होती. त्यांच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहात होते. जणुकाही त्यांच्या भावना कळल्यासारखी अदिती मागे वळली.

“जर नाहीच आले परत तर कर्नलना फोन जरुर करा, ते येतील तेव्हा त्यांना सांगा…, त्यांची आदु एक क्षणभरही कचरली नाही. तिने त्यांना दिलेलं वचन पाळलय……!” आणि ती भरकन मागे वळून वाड्याकडे चालायला लागली.

मास्तर गावाकडे वळले, बरीच कामे उरकायची होती………………..

*********************************************************************************************************************

दुसरा दिवस उजाडला. सकाळचे नऊ – साडे नऊ वाजले होते. काल दुपारी वाड्याकडे गेलेली अदिती परत आली नव्हती. मास्तरांच्या डोळ्यातल्या पाण्याला खंड नव्हता. ते कर्नलची वाट बघत होते.

त्यांच्या मनात अनेक प्रश्न रुंजी घालत होते….

अदितीचं काय झालं असेल? ती जिवंत असेल का? असेल तर कुठल्या अवस्थेत असेल? आपण अदितीला जावु दिलं ती मोठी चुक केली का? गुरुजींनी आपल्या पत्नीबद्दल, माईंबद्द्ल खोटं का सांगितलं ? ती माऊली शेवटपर्यंत गावासाठी झटत होती………

महत्वाचे म्हणजे ती तिसरी व्यक्ती कोण असेल?

त्यांना माहीतच नव्हतं, त्या तिसर्‍या व्यक्तीला त्यांनीच कालच फोन करुन बोलावलं होतं. फक्त श्रीराम गुरुजींचा आणि त्यांच्या स्वामींचा अंदाज थोडक्यात चुकला होता. या तिसर्‍या व्यक्ती बरोबर आणखी एक चौथी व्यक्ती तडवळ्यात येणार होती. तडवळ्याचं नष्टचक्र थोड्याच वेळात संपणार होतं…..

पुन्हा शुभ्र, पवित्र वातावरण तडवळ्यात नांदणार होतं…….

क्रमशः

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: