RSS

“माझी माय सरसोती, मले शिकवते बोली”

03 नोव्हेंबर

“स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे…

जुने पणास त्याजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नवीनता समावुदे !!

दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे !!

नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे !!

किती साधे शब्द, किती साधी रचना.. पण चराचराचं कल्याण मागणारी रचना ! जणू ज्ञानदेवाने मागितलेल्या पसायदानाचा उत्तरार्धच ! साधेपणा या माणसाच्या लेखनातच नव्हे तर स्वभावातही काठोकाठ भरलेला होता. कुठून आला असेल हा विलक्षण साधेपणा, ही विलक्षण प्रतिभा या माणसामध्ये!

जळगावच्या या तरुण कविने सातवीत असताना आपली पहिली कविता लिहीली. आपल्या कवितांसाठी ओळखला गेलेला हा माणुस अतिशय उत्तम चित्रकारदेखील होता. त्यांची वैशिष्ठ्ये इथेच संपत नाहीत, त्याने पं. विष्णु दिगंबर पलुस्करांकडून संगीताचे शिक्षण घेतले होते. या गुणी माणसाला समग्र “ज्ञानेश्वरी” मुखोद्गत होती. या सरळ साध्या माणसाच्या नावावर “काव्यकेतकी छंद लीलावती” तत्सम सहा काव्यसंग्रह आहेत. कवी चंद्रशेखर यांनी या व्यक्तीला ‘महाराष्ट्र काव्य कोकीळ’ ही पदवी दिली होती…! तरीही हा माणुस सदैव जगाच्या चमक चांदणीपासुन दुर राहीला….

पण या माणसाच्या हातुन यापेक्षाही मोठं असं एक काम व्हायचं होतं. साधारण १९५०च्या जुन किंवा ऑगस्ट महिन्यात हे सदगृहस्थ काही कामानिमीत्त मुंबईत आले असता आचार्य अत्रेंना भेटायला गेले. भेटीत सहज त्यांनी खिशातली वही काढुन त्या वहीतलं एक गाणं अत्रेसाहेबांना गाऊन दाखवलं. साहेबांनी त्यांच्या हातातली वही अक्षरशः ओढुनच घेतली, त्यातली गाणी वाचली… आणि त्यावर त्यांची पहिली ज्ञात प्रतिक्रिया होती …

“अहो, हे बावनकशी सोने आहे. हा खुप अनमोल ठेवा आहे. आतापर्यंत लपवुन का ठेवलात?”

अत्रे साहेब म्हणतात, ” मी अक्षरशः झपाटल्यासारखा त्या जुनाट वहीची पाने चाळत गेलो, पुन्हा पुन्हा वाचत गेलो. त्यातली एक कविता वाचताना अक्षरशः नि:शब्द होत गेलो. ”

तत्काळ अत्रेसाहेबांनी ती गाणी गणेश पांडुरंग परचुरे प्रकाशनातर्फे छापुन घेण्याची सोय केली. १९५२ साली ते पुस्तक बाहेर पडले आणि महाराष्ट्रातील रसिकांना एक अनमोल खजिना सापडला. खजिनाच का.., खरे तर त्या कवितांच्या रुपाने महाराष्ट्राला सोन्याची खाणच सापडली म्हणाना.

कारण त्या सदगृहस्थांचे नाव होते “सोपानदेव नथुजी चौधरी” आणि त्या कविता होत्या त्यांच्या आईच्या “निसर्गकन्या” बहिणाबाई चौधरींच्या.

बहिणाई

अत्रेसाहेब त्या कविता वाचल्यावर काय काय म्हणाले असतील माहीत नाही. पण त्यांचा एकंदर स्वभाव बघता प्रत्येक ठिकाणी ते वापरत असलेले वाक्य त्यांनी इथे वापरलं असण्याची बर्‍यापैकी शक्यता आहे. आणि बहिणाबाईंच्या कवितांच्या बाबतीत ते खरं ठरण्याची १००% शक्यता आहे. अत्रे साहेब म्हणाले असतीलही….

“गेल्या दहा हजार वर्षात अशा कविता लिहील्या गेल्या नाहीत………..

आणि मला खात्री आहे आपल्या साध्या सरळ, गावरान बोली भाषेत लिहीलेल्या कवितांमधून बहिणाबाई जे काही सांगुन गेल्या, ते सांगणारी कविता पुढील दहा हजार वर्षात जन्माला येण्याची शक्यता खुपच कमी आहे.

आपले सर्वांचे लाडके पु.ल. उर्फ भाईकाका म्हणाले होते..

“सख्ख्या आईप्रमाणे, तिने आमची आयुष्ये समृद्ध केली.”

त्या अशिक्षित माऊलीकडे सगळ्या जगभराचे शहाणपण भरले होते.

बिना कपाशीने उले, त्याले बोंड म्हनु नये,
हरिनामाविना बोले त्याले तोंड म्हनू नये !!

नाही वार्‍याने हाललं त्याले पान म्हनू नये,
नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हनू नये !!

या चार ओळी वाचल्यावर, ऐकल्यावर, अंगी भिनवल्यावर मला सांगा काय गरज आहे कुठल्या मंदीरात जाण्याची, कुणा गुरुचे शिष्यत्व घेण्याची. त्या जगावेगळ्या माईसाठी देवत्वाचे निकषच वेगळे होते. तिच्या लेखी देव केवळ मंदीरात नव्हता तर तो चराचरामध्ये सामावला होता.

एकदा त्यांची नणंद म्हणजे सोपानदेवांची आत्या राजीबाई यांनी तिला विचारले…

“वैनी, मी आणि तू , दोगीबी अशा अनपढ, अडाणी… मग तुला हे शिकवते कोण?”

त्यावर ती माऊली म्हणते….

माजी माय सरसोती मले शिकवते बोली ,
लेक बहिनाच्या मनी किती गुपितं पेरली !!

माज्यासाठी पांडुरंगा तुजं गीत भागवत ,
आभायात समावतं, माटीमधी उगवतं !!

तुज्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी ,
देवा तुजं येनं-जानं वारा सांगे कानामधी !!

अरे देवाचं दरसन.. झालं झालं आपसुक,
हिरिदात सुर्यबापा दावी अरुपाचं रुप !!

एक अडाणी, अशिक्षीत स्त्री, जिला शिक्षणाचा अजिबात गंध नाही, जिने कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, ती बाई सांगते की माझ्या हृदयात सुर्यबाप्पा येतो आणि जे सर्व सामान्यांना दिसत नाही असं त्या परमेश्वराचं निर्गुण रुप दाखवतो. नाही हो…ती कुणी सामान्य स्त्री नव्हतीच, साक्षात आई सरस्वतीच आली होती त्या वेड्या बागड्या रुपात या अडाणी जगाला त्याच्या भाषेत जगणं शिकवायला. त्याचं जगणं समृद्ध करायला.

अत्रेसाहेबांनी ती वही जेव्हा अधाशासारखी वाचुन काढली, तेव्हा त्यातली एक कविता त्यांनी वेगळी काढली आणि परचुरेंना खास सांगितलं ही कविता सगळ्यात आधी छाप. यात शब्द, स्पर्श, रस, रुप आणि गंध हे पाची आले आहेत. ही आयेच्या मायेची आरती आहे. यात सगळ्याचं सार आलं आहे.

“अरे किती रंगविशी रंग, रंग भरले डोळ्यात,
माझ्यासाठी शिरिरंग, रंग खेळे आकाशात!!

फुलामधी समावला धरत्रीचा परमय..,
माज्या नाकाले इचारा, नथनीला त्याचे काय!!

धर्तीमधल्या रसाने जीभ नाझी सवादते,
तवा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते !!

तिला जगणं उमजलं होतं. तिने जगणं जाणलं होतं, त्यासाठी तिला कुठल्या शाळेत जायची गरज नाही पडली कधी. कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता देखील तिला भल्या भल्या विद्वानांना लाभत नाही असं ज्ञान लाभलं होतं.

आला सास, गेला सास, जिवा तुझं रे तंतर,
अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर…!

देव कुठे, देव कुठे आभायाच्या आरपार,
देव कुठे, देव कुठे तुज्या बुबयामधी रं…!!

श्वास घेतला, श्वास सोडला एवढं साधं जगण्याचं तंत्र आहे. अरे वेड्या जिवा.., जगणं काय, मरणं काय एका श्वासाचं अंतर. मग उगा त्याबद्दल एवढी वृथा आसक्ती कशाला? देव कुठे आहे, तर तो सगळ्या आभाळात (अवकाशात, आसमंतात) आरपार सामावलेला आहे. कशाला हवे देऊळ आणि कशाला हवीत अवडंबरे..? वेड्या तो तुझ्या डोळ्यांत (तुझ्या नजरेत) सामावला आहे.

साधारण १८८० च्या सुमारास मराठवाड्यातील आसोदे या गावात श्री. उखाजी महाजन या जमीनदार व्यक्तीच्या घरात बहिणाईचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावातील एक ३० वर्षाचे श्री. नथुजी चौधरींशी त्यांचे लग्न झाले. बहिणाईच्या वयाच्या तिसाव्या वर्षी नथुजींचा मृत्यु झाला. म्हणजे वाट्याला आलेले सांसारिक आयुष्य अवघे १७ वर्षाचे. नेमके त्यांच्या मृत्युच्या आधी, काही काळच घराच्या, इस्टेटीच्या वाटण्या झालेल्या. पदरात दोन मुले… एकाकी, अबला स्त्री म्हणल्यावर साहजिकच संधीसाधू, मतलबी नातेवाईकांनीही होते ते ही हिरावून घेतले. त्यात डोक्यावर सावकाराचे कर्ज…..

अशी संकटाची रांगच्या रांग समोर उभी असुनसुद्धा बहिणाई निर्लेप राहीली. गंगेचा पाण्यासारखी निर्मळ राहीली. तिच्या कवितांमध्ये कधी दु:ख, वेदना, दारिद्र्य अशा गोष्टींचा प्रभाव आढळत नाही, की परिस्थितीचे ओरखडेही आढळत नाहीत. परिस्थितीचे फटके खाल्यावर येणारा कडवटपणातर चुकूनही आढळत नाही. बहिणाईचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांना प्रखर प्रतिभा तर होतीच, पण त्याबरोबरच भावात्मक दृष्टीही लाभली होती. परमेश्वरावर श्रद्धा असल्याने किर्तनाची आवड होती, त्यातून एकप्रकारचा बहुश्रुतपणा लाभला होता. त्यांचा मोठा मुलगा ओंकार हा प्लेगमुळे अपंग झाला होता. त्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच पडली आणि त्यांनी ती शेवटपर्यंत निभावली. पण तरीही संसाराबद्दल त्यांच्या मनात कधी कटुता आली नाही की त्यांच्या कवितेतूनही ती डोकावली नाही.

उलट बहिणाई सांगते…

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तंव्हा मिळते भाकर

भोगाव्या लागलेल्या त्रासाबद्दल ती कधी कुठली गार्‍हाणी गात बसत नाही, तर संकटे हा जगण्याचा मुलभुत घटकच आहेत, त्यांच्याशिवाय जगण्याला अर्थ येत नाही यावर तिचा ठाम विश्वास होता. तिने सगळ्या वेदना, सगळ्या आपत्ती कायम भुषणासारख्या मानल्या. त्यांचा राग राग न करता त्याबद्दल रडत न बसता त्यांच्यावर मात करण्याचं स्वत:चं असं एक वेगळंच तत्त्वज्ञान जगापुढे मांडलं.

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं,
राऊळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नहीं रडनं कुढनं,
येड्या, गयातला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड,
एक तोंडामध्ये कडु, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भिलावा,
त्याले गोड भीमफूल, मधी गोडांब्याचा ठेवा

देखा, संसार संसार, शेंग वरतुन काटे,
अरे.., वरतुन काटे, मधि चिकने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन दु:खाले होकार

देखा, संसार संसार, दोन जिवाचा सुधार,
कधी नगद उधार, सुखदु:खाचा बेपार !

अरे संसार संसार, असा मोठा जादुगार,
माझ्या जिवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा संसार संसार, आधी देवाचा इसार,
माझा देवाचा जोजार, मग जिवाचा आधार,

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ……….!!

बहिणाई खरोखर सरस्वती होती. साध्या साध्या शब्दांतून तीने आपले जगण्याबद्दलचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले. बहिणाईच्या कविता विशेषकरुन जाते, घरटे, मोट, चल, पेरणी, कापणी यांच्यात गुंतलेल्या होत्या, गुंफलेल्या होत्या. ती नेहमी म्हणे…….

देवाची, त्याच्या पायाची चाहूल झाडांच्या पाना पानात लागते, आसमंतात फिरणारा, घुमणारा वारा देवाच्या येण्याची बातमी कानात सांगतो.

कधी कधी हिच बहिणाई विनोदाने म्हणते…

“जो असतो पण दिसत नाही तो देव, जे दिसतं पण असत नाही ते भुत!”

बहिणाई म्हणजे स्वतःच मुर्तीमंत प्रतिभा होती, जिवंत कविता होती. सोपानदेवांनी त्यांच्या लहानपणाचा एक अनुभव सांगितला होता. एकदा सकाळी सकाळी बहिणाई जात्यावरच्या ओव्या गात होती…

“सावित्री.., सावित्री सत्यवानाची सावली,
निघे सत्यवान त्याच्या मागुन धावली!”

सोपानदेवांनी विचारले, “आई हे गाणं कुठे शिकलीस तू?”

तर बहिणाई म्हणाली..

“अरे काल तू तर तो ‘सत्यवान-सावित्रीचा’ धडा वाचत होतास ना, “सावित्रीचे चातुर्य!” मी आइकला.”

त्या निरक्षर स्त्रीने तो धडा नुसता ऐकुन त्यावर कविता केली होती. कशा सुचत असतील तिला ओळी? पण एक मात्र खरे आईची प्रतिभा लेकात म्हणजे सोपानदेवांमध्ये पुरेपूर उतरली होती.

सोपानदेव सांगतात …

तिची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टीच जगावेगळी होती. ते म्हणतात ना “जे न देखे रवी, ते देखे कवि!” प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची स्वतःची अशी एक शैली होती तिच्याकडे. मुळातच कसलेही शालेय शिक्षण नसल्याने, शिक्षणामुळे मनावर बिंबवल्या जाणार्‍या कुठल्याही गोष्टींचा पगडा असा तिच्या मनावर नव्हता. रोजचं जगणं हीच तिची शाळा होती. त्यामुळे आपल्या रोजच्या जिवनातील अनुभवांनाच तीने आपल्या कवितेचे मुळ बनवले. त्यामुळे तिच्या कविता सहज, साध्या पण मुळापर्यंत पोचणार्‍या बनुन गेल्या.

सोपानदेवांना शाळेच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता. प्रभु श्रीराम लहानपणी एकदा आकाशातला चंद्र हवा म्हणून हट्ट धरुन बसले. तेव्हा राजाच्या प्रधानाने त्यांना आरशात चंद्र दाखवला आणि ते शांत झाले अशी काहिशी ती कथा आहे.

या कथेवर बहिणाईची प्रतिक्रिया मात्र वेगळीच होती. ती म्हणाली

“त्या परधानानं सगळा घोटाळा केला बघ!”

लहानगा सोपान आश्चर्यात पडला, “अगं आई, उलट प्रधानाने चातुर्याने बाल श्रीरामांचं समाधान करून त्यांचं रडणं थांबवलं, यात घोटाळा कसा काय?

“येड्या, रामाचा भक्त कोण्..हनुमान ! रामाचा हट्ट जर त्येच्यापर्यंत पोचवला आस्ता तर तो एकच उडी मारून चंद्र घेवून आला आसता, अन त्या चंद्राला रामानं हात लावला कि आपोआपच रामाच्या पावन स्पर्शानं चंद्रावरचा डाग बी पुसला गेला असता ना?”

त्या अशिक्षीत स्त्री कडे एवढा जगावेगळा विचार करण्याची शक्ती कुठून आली असेल. म्हणूनच मी म्हणतो ती सर्वसामान्य स्त्री नव्हतीच, तिच्या रुपाने माय सरस्वतीच भुतलावर आली होती.

ज्ञानेश्वरभगिनी संत मुक्ताबाई हिच्याबद्दल तिला विलक्षण प्रेम होते. ती आपल्या एका गाण्यात मुक्ताईबद्दल म्हणते…

“माझी मुक्ताई, दहा वरीसाचं लेकरू
चांगदेव योगियाने, तिला मानली रे गुरू

ऐक ज्ञानराजा, आदिमाया पान्हावली
सर्वाआधी रे मुक्ताई, पान्हा पिऊनीया गेली!”

पण असे असले तरी तिची भक्ती आंधळी नव्हती. नसत्या अवडंबरावर तिचा प्रचंड राग असे. गळ्यात तुळशीमाळा घालून मिरवणार्‍या वारकर्‍यांना ती विचारते,

“अशा माळा घालून, गंध लावुन का कोणी संत होतो?”

“तोंडावरी अंगावरी हजार टिके (गंध)
गंध लावुनीया संत होता येते का कुठे?”

बहिणाई निसर्गाला देव मानायची. ती म्हणायची, अरे गंध, माळा असल्या अवडंबरामध्ये देव असतो का कुठे? मले विचार, मला देव कुटं दिसतो.., बी पेरलं की कोंब येतो, मले त्यात देव दिसतो…

“धरित्रीच्या कुशीमध्ये बी-बियाणं निजली
वर पसरली माती, जशी शाल पांघरली !

बीय टरारे भुईत, सर्वे कोंब आले वर्हे
बहरले शेत जसे अंगावरले शहारे !

ऊन वार्‍याशी खेळता एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं, जसे हात जोडीसन !

टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी
जसे करती कारोन्या (करुणा), होऊ दे रे आबादानी !

काय म्हने, कणसं कशी वारियाने डुलताती
दाने आली गाडी माडी…

देव अजब गारोडी, देव अजब गारोडी !”

ती देवदर्शनाला मंदीरात जायची , पुजा अर्चनाही करायची. पण त्यात ती कधीच रमली नाही. ते मंदीर बघून बहिणाई म्हणायची….

“एवढा मोठ्ठा देव आन हे एवढंसं मंदीर.., याच्या कसा रे मायीत आसल तो, पण असो त्येही त्याचं येक रुप हाये. पण देवदर्शनापेक्षा मला भजन किर्तन ऐकण्यात खरं ग्यान मिळते.”

त्यांच्या गावातल्या विठ्ठल मंदीरामध्ये टाळ्-मृदंगाचे भजन चालायचे, त्याला बहिणाई म्हणायची ही माझी “मराठी शाळा” तर श्री राम मंदीरामध्ये तबला-पेटीसह भजन चालायचे त्याला बहिणाई “माझी इंग्रजी शाळा” म्हणायची.

सोपानदेव एक किस्सा सांगतात. त्यांचे लक्ष्मीबाई टिळकांशी (स्मृतीचित्रंकार)खुप चांगले संबंध होते. सोपानदेव लक्ष्मीबाई टिळकांना “आई”च म्हणत असत. त्यांचाही सोपानदेवांवर विलक्षण लोभ होता. एकदा बोलता बोलता सोपानदेव त्यांना म्हणाले..

“आई, तुम्ही इतकी स्मृतीचित्रे लिहीलीत, एखाद्या उच्च विद्या विभुषीत माणसालाही जमणार नाही इतकी सुरेख उतरली आहेत ती. कसं काय जमतं हे?”

त्यावर लक्ष्मीबाई म्हणाल्या…

“अरे मी पदवीधर नाही का? माझी पदवी म्हणजे “इन्फन्ना” म्हणजे इन्फंट क्लासमध्ये नापास म्हणून मी शाळा सोडली, पण बहिणा तर माझ्या पेक्षा खुपच श्रेष्ठ आहे…तिची पदवी “शादन्ना” म्हणजे शाळेचे दर्शनच नाही.

बहिणाईला आपल्या बोलीभाषेत बोलायची सवय, त्यामुळे सर्वसामान्य नागरी भाषेत ती खुप कमी बोलायची. तिचं साधं बोलणं देखील तिच्या भाषेतच असायचं. ते काव्यमय असायचं पण तरीही ते काव्य आहे असं कधी वाटतच नसे मुळी…., ती म्हणायची…….

“काय रे.., काय वेडीचं लिहून घेताय तुम्ही? गाय दुध देते ते किती मोलाने आणि किती शेर विकलं जातं हे तिला कुठे माहित असतं. तसच आहे हे..चांगलं असो वाईट असो, माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडतात , बस्स त्यात काय मोठंसं?”

तिनं खुप काही रचलं असेल. ती येता जाता सहज कविता करायची. तिने जवळ पास ३५० च्या घरात अभंग रचले असावेत असा अंदाज आहे. तिचं ते सगळं साहित्य जर कुणी उतरून ठेवलं असतं तर आज महाराष्ट्र केवढा समृद्ध झाला असता. कधी वाटतं की तिला लिहीता वाचता येत नव्हतं यामुळे आपली केवढी मोठी हानी झालीय…

पण एकीकडे असंही वाटतं बरं झालं तिला लिहीता वाचता येत नव्हतं, नाहीतर बिचारी लिहून ठेवण्यातच गुंतून गेली असती आणि आपण एका समृद्ध साहित्याला मुकलो असतो. प्रत्येक गोष्टीत ती माय काहीतरी अर्थ शोधायची. जळगावात नानासाहेब फ़डणीस यांनी पहिला छापखाना काढला, त्याबद्दल बोलताना बहिणाई म्हणते…

“नानाजीचा छापखाना
त्यात मोठ मोठे पुठ्ठे
तसे शाईचे दराम
आणि कागदाचे गठ्ठे…
मानसापरी मानूस
राहतो रे येडजाना (अशिक्षीत)
अरे, होतो छापिसनी,
कोरा कागद शहाना !”

वर सांगितल्याप्रमाणे संकटाला घाबरुन जाणे, रडणे तिला अजिबात मान्य नसायचे. मुळात माणुस जन्माला येतो तोच रडत रडत मग निदान मिळालेलं आयुष्य तरी हसत हसत जगावं या मताची बहिणाई होती.

हास हास माज्या जिवा
असा संसारात हाश
इडापिडा संकटाच्या
तोंडावरी कळं फ़ास !”

उगाच दु:खांना उगाळत बसण्यात काय अर्थ आहे? जे काही पदरात पडलेय ते आनंदाने स्विकारायचे, दु:खाला विसरून सुखाने आयुष्याला सामोरे जायचे हे तिचे साधे सरळ तत्वज्ञान होते. ती विलक्षण आशावादी होती.

“माझं दु:ख, माझं दु:ख जशी अंधारली रात
माझं सुख, माझं सुख हातातली काडवात
माझं दु:ख, माझं दु:ख तळघरात कोंडले
माझं सुख, माझं सुख हांड्या झुंबर टांगले !”

(काडवात : त्या काळातली बॅटरी , काष्ठवर्ती म्हणत बहुदा तिला)

सोपानदेवांनी डॉ. विठ्ठल प्रभु यांनी घेतलेल्या त्यांच्या एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता. एकदा सोपानदेव कुठल्यातरी एका कविसंमेलनासाठी नागपूरला गेले होते. आपल्या कवितेच्या जोरावर त्यांनी त्या संमेलनातील कविंसकट रसिकांनादेखेल जिंकून घेतले. पण नंतर त्या कविसंमेलनाच्या छापील अहवालात कुठेही त्यांचा उल्लेखच नव्हता, त्यामुळे सोपानदेव खुप नाराज होते. त्यावर बहिणाईने त्यांचे सांत्वन केले…

“अरे, छापीसनी आलं ते मानसाले समजलं
छापासनी राहिलं ते देवाले उमजलं !”

सोपानदेव कुठल्या ना कुठल्या कारणाने बाहेरच राहील्याने बहिणाईच्या बर्‍याच कविता त्यांना अर्धवटच माहीत होत्या. पण सुदैवाने त्या सार्‍या कविता त्यांच्या मोठ्या बहिणीला पाठ होत्या. तिच्याकडुन ऐकून त्या सोपानदेवांनी लिहून ठेवल्या.

जव्हा इमान सचोटी पापामधी रे बुडाले
तव्हा याच मानसानं किल्ल्या कुलुप घडले…
किल्ल्या राहिल्या ठिकानी, जव्हा तिजोर्‍या फोडल्या
तव्हा याच मानसानी बेड्या लोखंडी घडल्या….! ”

शास्ता आणि शासन यावर एवढे प्रभावी भाष्य, एवढ्या सोप्या आणि कमी शब्दात कुणी केल्याचं आठवतय?

प्रत्येक सासुरवाशिणीच्या मनात माहेराबद्दल असलेल्या विलक्षण ओढीबद्दल बोलताना बहिणाई म्हणते…

“माज्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा
वाटेवरच्या दगडा ,  तुला फुटली रे वाचा ”
त्यावर तो माहेरच्या वाटेवरचा दगड म्हणतो…
“नीट जाय मायबाई नको करु धडपड
तुझ्याच मी माहेरच्या वाटेवरचा दगड…”

कायम माहेर-माहेर करणार्‍या सासुरवाशीणींकडे बोट दाखवणार्‍यांना उद्देशुन त्यांनी एक अतिशय अर्थपुर्ण, सुंदर कविता लिहीली आहे. चौधरी कुटूंबात बहिणाईच्या आधी कुणाला मुलीच झाल्या नव्हत्या, त्यामुळे लेकीसाठी आसुसलेली बहिणाई म्हणते…

माजं माहेर माहेर सदा गानं तुझ्याओठी
मग माहेरुन आली सासराले कशासाठी..?
अरे, योग्या तूले नाही रे कळायचं…
अरे, लागले डोहाळे सांगे शेतातली माती…
गाते माहेराचं गानं, लेक येइल रे पोटी…!
देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते…!

या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी अतिशय सुंदर आहेत. बहिणाई उत्कटतेने माहेराची महती सांगते…

“देव कुठे देव कुठे भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या माहेरात समावला”

घरातली दळण, कांडणं करताना, धान्य निवडताना, पाखडताना बहिणाईच्या तोंडी सहजपणे गाणं तयार होत असे हे तिच्या दैवी प्रतीभेचं वैशिष्ठ्य होतं. तिच्या मनात विलक्षण सोशिकता होती, जिव्हाळा होता. तिच्या कवितांमध्ये एकप्रकारचा सहजपणा होता. ती अशिक्षीत असली तरी अडाणी नव्हती. बहिणाईच्या कविता अहिराणी भाषेत आहेत असा एक सर्वमान्य समज आहे, पण सोपानदेव म्हणतात की बहिणाईच्या कविता अहिराणी नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत आहेत. तिला ते “सेवा पाटील भाषा” म्हणतात. तिच्या कवितेतली निरनिराळी रुपकं बघीतली, अनुभवली की प्रकर्षाने जाणवतं की आई सरस्वतीला काही काळ मनुष्यजन्माचा मोह पडला आणि बहिणाईच्या रुपाने तीने तो मनसोक्त अनुभवला.

अशी ही जगावेगळी, तरी सगळ्यांना भावलेली माय ३ डिसेंबर १९५१ रोजी पंचतत्वात विलीन झाली.

बहिणाईला उद्देशून कविवर्य बा. भ. बोरकरांच्या दोन ओळी उद्धृत करतो आणि या लेखाचा समारोप करतो…

“देव तुझ्या ओटी-पोटी, देव तुझ्या कंठी ओठी,
दशांगुळी उरलेला देव तुझ्या दाही बोटी….!”

माये, बहिणाये तुझे उपकार कसे फेडणार आहोत गं आम्ही?

संदर्भ :

१. हास्यरंग २००९ : दिवाळी अंकातील डॉ. विठ्ठल प्रभू यांचा निसर्गकन्या हा मुलाखतवजा लेख.

२. श्रीपूर्वी प्रतिबिंब १९७९ : दिवाळी अंकातील बहिणाबाईची गाणी हा लेख

३. विकिपिडिया : बहिणाबाई चौधरी /

४. https://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=786

विशाल विजय कुलकर्णी

 

4 responses to ““माझी माय सरसोती, मले शिकवते बोली”

 1. mandar kulkarni

  फेब्रुवारी 22, 2011 at 4:28 pm

  Khupch chan!!!! Its diificult to control emotions.

   
  • विशाल कुलकर्णी

   फेब्रुवारी 23, 2011 at 5:43 pm

   बहिणाबाई हे माझे दैवत आहे मंदारजी. त्यामुळे लिहीताना माझीही तुमच्यासारीच अवस्था झाली होती. धन्यवाद 🙂

    
 2. subhash panse,pune

  जून 4, 2012 at 2:59 pm

  वाचताना मन हेलावून गेले.माझी माय सरसोती,माझी माय माऊली बहिणाबाई.

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: