त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तो म्हणजे त्याचा मानसिक कणखरपणा आणि जबरदस्त इच्छाशक्ती. बेसलाइनवरुन खेळण्यात तो पटाईत आहेच, पण खेळातील वेग, फिटनेस अशा सर्वच बाबीत तो मास्टर आहे. त्याच्या खेळात बेकरची आक्रमकता आहे, सांप्रासचा संयमी झंझावात आहे. कधी त्याच्या खेळात आगासीची उत्कट एकाग्रता डोकावते तर कधी मार्टीनाचं अफलातुन टायमिंग. तो मॅकेन्रोच्या वेगाने खेळतो पण मॅकेन्रोचा उद्धटपणा त्याच्यात नावालाही नाही.
म्हणुनच अवघ्या २३ वर्षाचा, सहा फुटी, डावखुरा, स्पेनचा हा खेळाडु रफायेल नदाल परेरा उर्फ टेनीसप्रेमींचा लाडका राफा जेव्हा मैदानात समोर उभा राहतो तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या मनात भीती नाही उभी राहत तर त्याऐवजी या उमद्या खेळाडुबद्दल एक आदराची भावना निर्माण होते.
राफाने आजवर ९ ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा व १८ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यु.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा “ओपन टेनीस” मधला नदाल हा केवळ ७ वा व वयाने सर्वात लहान टेनिसपटू आहे. आजवर पाच वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणार्या रफायेल नदालला क्ले कोर्टचा बादशहा मानले जाते ते उगाच नाही.
राफ़ाचे फ़्रेंच ओपन विजेतेपद
विंबल्डन विजेता राफ़ा
असो राफाचे करियर मांडणे हा हेतु नाहीये इथे. ती माहिती आंतरजालावर सहज गुगलुन किंवा विकीपिडीयावर उपलब्ध आहे. या लेखाचा हेतु फक्त राफाचे अभिनंदन करणे हाच आहे. कारण नुकत्याच मिळवलेल्या अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाबरोबर ग्रँडस्लॅम स्पधेर्तील सलग २१ सामन्यात अपराजित राहण्याचा सिलसिला राफाने कायम राखला आहे. रॉड लेवर यांच्यानंतर फ्रेंच ओपन, विम्बल्डन व अमेरिकन ओपन अशा सलग तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा नदाल पहिला टेनिसपटू. १९६९मध्ये लेवर या तीन स्पर्धांशिवाय ऑस्ट्रेलियन ओपनही जिंकली होती. आता जानेवारीतील ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली की ‘राफा स्लॅम’ ची चौकट पूर्ण होइल आणि ती राफा करेलच.
टेनिस कोर्टवरचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि मैदानाबाहेरचे सख्खे मित्र
सद्ध्या जागतिक क्रमवारीत फेडरर नंतर दुसर्या क्रमांकावर असलेल्या राफाने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोवॅक जोकोविचचा ६-४, ५-७, ६-४, ६-२ असा पराभव करून अमेरिकन ओपन टेनिस स्पधेर्च्या जेतेपदावर नाव कोरत आपले पहिलेच अमेरिकन जेतेपद मिळवले! या लढतीदरम्यान आलेल्या अनेक नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत राफाने पुन्हा एकदा आपल्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यावर मात केली आणि फ्रेंच ओपन, विंबल्डन, अमेरिकन ओपन अशी तिन्ही ग्रँडस्लॅम विजेतेपदे सलगपणे जिंकणारा तो सातवा टेनिसपटू ठरला. पहिला सेट राफाने अगदी सहजपणे ६-४ असा खिशात घातला. पण नंतर वादळी वार्यामुळे खेळ थोडा वेळ थांबवण्यात आला. या व्यत्ययामुळे तो थोडासाच विचलीत झाला. पण जोकोविचने त्याचा फायदा उठवीत दुसर्या सेटवर ५-७ असे आपले नाव कोरले. पण आपल्या चुका सुधारत राफाने तिसर्या व चौथ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत दोन्ही सेट निर्विवादपणे जिंकत सामना आणि ग्रॅंडस्लॅमही आरामात आपल्या खिशात घातले.
प्रिय राफा, आता आम्ही तुझे सर्व चाहते वाट पाहतोय ती तुझ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या झंझावाती विजेतेपदाची !
त्यासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा !
संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स आणि विकीपिडीया
राफाची ऑफिशियल वेबसाईट : http://www.rafaelnadal.com/
विशाल कुलकर्णी
संकेत
सप्टेंबर 15, 2010 at 7:52 pm
राफामधे नक्कीच फ़ेडररच्या पुढे जाण्याची क्षमता आहे.. तो जास्त प्रतिभावंत आहे.
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 15, 2010 at 8:36 pm
नक्कीच ! त्याच दिवसाची वाट पाहतोय. प्रत्येकाचा सुर्य कधी ना कधी मावळणारच. धन्यवाद.