RSS

माझा सखा !

11 जून

तसा तो मला नेहमीच भेटायचा….
कधी परसातल्या कडुनिंबावरून हलकेच ओघळताना.
कधी अंगणात फुललेल्या निशिगंधेला रडवताना….
तर कधी घराच्या छतावर जोराजोरात थापा मारुन मी आलोय रे…., म्हणून सांगताना !
लहानपणी शाळेत जातानाच्या पाऊलवाटेवर आपोआपच उगवून आलेल्या दगडफुलांना गोंजारताना…
अनवाणी पायांनी रस्त्यावरच्या डबर्‍यात साचलेले पाणी
एकमेकांच्या अंगावर उडवीत सवंगड्यांबरोबर मस्ती करताना…
तो नेहमीच भेटायचा….
सख्ख्या मित्राप्रमाणे…., सख्ख्या मित्रासारखा …
डोळ्यातली आसवे लपवताना….
तो माझ्यासवे बोलायचा, खेळायचा, बागडायचा क्वचित रडायचाही…
पण रडू नको म्हणून नाही सांगायचा, तर स्वतःच माझ्याबरोबर रडायचा…
मग त्याच्या रडण्यात माझी आसवेही लपून जायची…, धुवून जायची…
ती तशी धुवून गेली की तो हलकेच मिस्कील हसायचा…
एखाद्या खोडकर पण समंजस मित्रासारखा !
त्या दिवशी शेजारच्या काकुंनी सांगितले…
चल आपल्याला आईकडे जायचेय दवाखान्यात, तुला छोटा भाऊ झालाय…
केवढा आनंद झाला होता त्याला…
एखाद्या नाचर्‍या मोरासारखा, किं माझ्या मनमोरासारखा?
………पण तो बेभान होवून नाचला…!
आमची दोस्ती तेव्हापासूनची.. कीं त्याही आधीची….
आई सांगायची तिला म्हणे एकाच वेळी दोन दोन लेकरे सांभाळावी लागली होती..
माझ्या जन्माच्याही आधी…
आत ‘मी’ आणि बाहेर ‘तो’….
तो खुप जुना आहे, आदि आहे, अनंत आहे.. पुरातन तर आहेच पण चिरंतनदेखील आहे…
पण मी मात्र त्याला बरोबरीचाच मानतो…. जुळं भावंडच जणू..!
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा बोलका साक्षीदार….
सांगितलं ना…! तो बोलतो माझ्याबरोबर…, मग….?
कुठल्याही सच्च्या मित्रासारखा तो रुसतो देखील खुप लवकर…
मित्रांचा अधिकारच असतो तो.., मग कुठेतरी दडून बसायचा…
त्या वेड्याला कुठे माहीत होतं…
अरे राजा.., तू कुठेही लपलास, कितीही लपलास…
तरी माझ्यापासुन कसा लपणार आहेस?
आपल्याच सावलीपासुन कधी लपता येतं का? वेडा कुठला….
तो कायम मनातच असायचा…
असला लपाछपीचा खेळ त्याच्या अगदीच आवडीचा…
पण माझ्याबरोबर खेळताना नेहमीच हरायचा…
मग कधी माझ्या डोळ्यांतून तर कधी कवितेतून बरसायचा…!
तो असाच अमनधपक्याने कधीही यायचा…
मग हळुहळु धरा सारी धुरकट व्हायला लागायची…
त्याच्या येण्यानं तिच्या शरीराला सुटलेला तो मादक गंध ….
हलकेच गात्रा गात्राला भिजवत वेडंपिसं करायचा…
मला भेटायचा तो नेहमीच…
नदीतीरावर संथ लाटांशी खेळताना…
पाण्याशी खेळणार्‍या लाजर्‍या लव्हाळ्याशी बोलताना…
वेशीबाहेरच्या मंदीरात ….
तिच्या नजरेत हलकेच हरवून जाताना…
तो कधी बराचसा लाजरा वाटायचा …
तिच्या बटेवर रेंगाळताना हळुवारपणे ओघळून जायचा…
मी हलकेच त्याला स्पर्श करायचा…
आणि तो लाजाळूच्या झाडासारखा लाजुन बसायचा…
मला भेटायचा तो…
आईच्या कुशीत हलकेच विसावताना…
तिच्या डोळ्यातली ममता शोषताना…
कधी बरसायचा बेभान…, उन्मुक्त समीरासारखा…
हलकेच स्पर्शायचा …
अंगांगावर उठलेल्या गारेगार शिरशिरीसारखा…
मग मी वेड्यासारखा त्याला वेचू पाहायचा…
गात्रा गात्रातून मनसोक्त साठवू पाहायचा…
तो मला नेहमीच भेटायचा…
तो मला नेहमीच भेटतो …
आमच्या भेटीला ॠतूंची बंधने नसतात…
आम्हाला भेटायला काळाच्या चौकटी नसतात…
तो कधी आईच्या वात्सल्यात भेटतो…
कधी प्रियेच्या केशसंभारात भेटतो …
कधी कधी नकळत माझ्याच कवितेत हरवतो ….
कधी हुलकावण्या देत खोडकरपणे हसायचा…
कधी हसता हसता…
हलकेच डोळ्यातल्या आसवांना वाट करून द्यायचा..
सखाच तो….
येता जाता माझ्यावर हक्क गाजवायचा,
तुझ्या माझ्या प्रायव्हसीचाही त्याला मत्सर वाटायचा
तू माझ्या जवळ असलीस की मग त्याला चेव यायचा…
मग मला चिडवत…, कधी हलकेच तूला खिजवत…
आपला एकांत मोडत तो बेफ़ाम बरसायचा…….
तो असाच आहे….
तुझ्यासारखा !
आपल्या हक्कावर आक्रमण नाही रुचत त्याला ….
तुझ्या माझ्या स्वप्नातल्या…
कळ्या फुलवणारा..,

पाऊस… माझा सखा !

विशाल.

या लेखावर एक माबोकर मित्र सुर्यकिरण याने दिलेल्या सहज सुंदर प्रतिक्रिया…

सुर्यकिरण | 11 June, 2010 – 14:29

विशल्या, तुझा नि माझा सखा एकचं की रे..

भेगाळलेल्या भूईवर थेंबाच्या घुंगराचे चाळ बांधून थुई थुई नाचणारा !

सुर्यकिरण | 11 June, 2010 – 14:44

कधी उगाच काळ्या मेघांच्या पाट्या दाखवून
आश्वासनांची खैरात मांडणारा..
तर कधी बिनबोभाट वळवाच्या वादळातून,
वृद्ध वडाला उन्मळून पाडणारा…

सुर्यकिरण | 11 June, 2010 – 14:59

कधी उगाच माळरानी झालर होऊन झुलणारा,
तर कधी गवताच्या पात्यावरती थेंब होऊन डुलणारा,
कष्टाच्या कातडीवरती अल्हाद म्हणून झिरपणारा,
तरी कधी उंच उंच दर्‍यांना एकसंथ चिरणारा…

सुर्यकिरण | 11 June, 2010 – 16:30

लाटांच्या ऐकऐक झेपेला बळ देणारा,
सागराचे मंथन करूनी किनार्‍यावर होणारा..
शिडाच्या जहाजाला दूर दुर नेणारा,
कागदाच्या हो होडीला डबक्याची जागा देणारा..

विशाल.. मूळ कविता सुंदर म्हणून तर इतकं लिहायला सुचतयं..

सुर्यकिरण | 12 June, 2010 – 19:05

किनार्‍याची पाऊले लाटांच्या उसळ्त्या प्रवाहाने दडवणारा,
रात चांदण्याच्या कुशीतून मुसळधार कोसळणारा,
मंडूकाला गालफुगीचं आमत्रंण देणारा,
बैलांच्या जोडीलां काळ्या भूईत चिखल करायला सांगणारा…

सुर्यकिरण | 17 June, 2010 – 18:05

श्रावणमासी हर्ष, हिरव्या गालिचांचा स्पर्श अल्हादाने देणारा,
पंढरीच्या वारीत अफाट भक्तीची गाथा सांगणारा..
व्रत अन वैकल्यांची माळ अंखड जपणारा…
सखा माझा असा अमृताहूनही थोर कुंभ जिवनाचे अविरत पाझरणारा…

सुर्यकिरण | 17 June, 2010 – 18:40

ओल्या जखमांवर पुन्हा पुन्हा रेंगाळणारा…
छत्रीच्या छताखालीसुद्दा डोळ्यातून ओलावणारा…
जातो जातो म्हणतानाही उंबर्‍याशी घोटाळणारा…
“पुन्हा येईल मी आठवांच्या सरीतून” वाकूल्या दाखवित निघूण जाणारा…

सुक्या.. मस्तच रे.. लगे रहो सुक्याभाई !

विशाल

 

6 responses to “माझा सखा !

 1. महेंद्र

  जून 11, 2010 at 4:06 pm

  🙂 suparb!!

   
 2. शेखर जोशी

  जून 11, 2010 at 8:57 pm

  विशाल,
  लेख आवडला. छान जमलाय.
  शेखर जोशी

   
 3. Priya

  जून 10, 2013 at 11:41 pm

  mastach! 🙂

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: