RSS

बिलंदर : भाग ३

05 मे

आता पुढे ….

तीने डोळे उघडले आणि आजुबाजुला नजर टाकण्याचा प्रयत्न केला. पण सगळीकडे अंधार पसरला होता. एक प्रकारची भयाण शांतता वातावरणात व्यापून राहीली होती. आणि वर प्रचंड उकाडा जाणवत होता. तीने हात पाय हलवायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की आपले हात पाय पक्के जखडलेले आहेत.. तशी ती शिरा ताणून ओरडली…

“वाचवा…वाचवा……!”

तिचा आवाज मध्येच कुठेतरी अडवल्यासारखा दाबला गेला आणि अंधारातून कुणीतरी प्रसन्नपणे हसल्याचा आवाज तिच्या कानावर पडला….

“कोण आहे? कोण आहे तिकडे?” ती घाबरून ओरडली.

“हाय कामिनी, कसं वाटतय? काही आठवतय?”

अंधारात काडी ओढल्याचा आवाज झाला आणि एक बारीक ज्योत पेटली, त्या उजेडात तिला एक चेहरा दिसला. एका विलक्षण देखण्या तरुणाचा चेहरा होता तो….

“कोण..? कोण आहेस तू? ही कुठली जागा आहे? प्लीज मला वाचव? किं… तुच मला असं बांधून ठेवलं आहेस? का पण…? ”

“मी कोण…? मी… मित्र !” तो पुन्हा हसला.

“मी तुला ओळखत नाही. कोण आहेस तू? मला इथे असं का बांधून ठेवलं आहेस? तू माझ्या भावाला ओळखत नाहीस? त्याला कळाले तर तो तुला जिवंत सोडणार नाही. सोड मला. नाहीतर परिणाम फार वाईट होतील.”

तसा तो दचकून मागे सरकला….

“हळू.. घाबरलो ना मी….कामिनी? कां कामिया? आणि तुझा तो भाऊ मला मारणार, तो मोमीन?

तशी ती दचकली. कोण आहेस तू? तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे?

“सांगितलं ना…मी मित्र आहे गं ! अगदी जवळचा…. तुझी मुक्तता करण्यासाठी तर आलोय मी! आणि तुझ्याबद्दल काय माहिती आहे म्हणशील तर सबकुछ? म्हणजे तु कामिनी नसून कामिया पठाण आहेस. मोमीन पठाण उर्फ मोमीनभाईची सख्खी बहीण. तुम्ही दोघे बहिणभाऊ मिळून त्या रोहीत भारद्वाजला सुद्धा गंडा घालताय… ! बरोबर ना? कसली ग्रेट आहेस गं तू! खरे तर एक स्त्री असण्याचा फायदा तुला मिळायला हवा. नाही…, मी तुला सोडलं ही असतं गं… पण गंमत म्हणजे तू इतकी नीच आहेस की सख्ख्या भावाशी सुद्धा पैश्यासाठी सौदेबाजी करतेस.. किती ७०-३०.. बरोबर ना? ज्या माणसाने तुझ्यावर जिवापाड प्रेम केलं, तुझ्यावर विश्वास टाकला, त्यालाच उध्वस्त केलंस. त्याला मृत्युच्या हवाली केलंस? सोडू तुला? कशासाठी?”

तो अगदी शांतपणे बोलत होता.

“तू सतीश बद्दल बोलतोयस….., तुला कुठेतरी बघितलय मी.” कामिनी चमकलीच… “येस, तू आमच्या ऑफीसात इंटरव्ह्युसाठी आला होतास ना परवा…, काय बरं नाव तुझं?

“शिरीष… शिरीष भोसले ! तोच मी !! सतीश देशमुखचा जिगरी दोस्त…. आणि तुमच्या चांडाळ चौकडीचा काळ.”

“म्हणजे इरफानला….

“मीच मोडली त्याची मान. साला दारुच्या नशेत माझ्या सत्याला नाही नाही ते बोलत होता, आपल्याला नाही सहन झालं.. मानच मोडली त्याची. त्यानंतर तुझ्या भाईच्या, मोमीनच्या अड्ड्यात शिरून त्याचं डोकं फोडणारा देखील मीच होतो… आता त्याची काँटॅक्टसची डायरी माझ्याकडे आहे…

येडा…..! त्याची माणसं सगळ्या मुंबईत मला शोधत फिरताहेत आणि मी धारावीत, त्याच्या अड्ड्याच्या मागेच, अगदी मागच्या खोलीत राहतोय… दिव्याखाली अंधार असतो …. , नाही…?”

शिर्‍या खदखदा हसला….

“तू.. तू विकृत आहेस?”

“मी विकृत? मग आपल्या सारख्याच माणसांची विक्री करून पैसा कमावणारे तुम्ही काय आहात? निर्दोष तरुणींना आपल्या जाळ्यात फसवून त्यांना विदेशी नेवुन विकणारे तुम्ही काय आहात? लहान लहान मुलांना त्या विकृत अरबांची विकृत खाज भागवण्यासाठी विकणारे तुम्ही काय फार शहाणे, साव आहात?” शिर्‍याचा आवाज चढला होता.

त्याच्या ल़क्षात आले की ती कसला तरी कानोसा घेण्याचा प्रयत्न करतेय. हातातली विझलेली काडी टाकून देवून त्याने दुसरी काडी पेटवली आणि तो तिची किव करणारं हंसायला लागला…

“अहं.., काही उपयोग होणार नाही त्याचा. आपण कुठे आहोत माहितीये का तुला? आपण ना सद्ध्या मुलूंडच्या कंटेनर यार्डच्या अगदी कोपर्‍यात असलेल्या एका कंटेनरमध्ये आहोत. कुठल्यातरी विदेशी कंपनीने परदेशातून काही मशिनरी मागवली होती. त्यासाठी हा स्पेशल कंटेनर बनवुन घेण्यात आला होता. वॉटरप्रुफ, शॉकप्रुफ आणि साऊंड प्रुफ सुद्धा! तू कितीही किंचाळलीस तरी इथुन तुझा आवाज बाहेर जाणार नाही. आता अजुन महिनाभर तरी हा कंटेनर इथे असाच बंद अवस्थेत पडून राहणार आहे…! मला फक्त काही पैसे खर्च करावे लागले यासाठी. इथल्या एका वॉचमनला पाच लाख दिले, मी फक्त आजची रात्र हा कंटेनर माझ्या ताब्यात घेण्यासाठी. पैसे घेवून तो बिचारा लगोलग त्याच्या मुलखात झारखंडला निघून गेला…. ते पाच लाख कुठून आले माहीतीय. तुझ्या भावाच्या डायरीतली काही माहिती म्हणजे मोमीनच्या वर्सोव्याच्या गोडावूनची माहिती तुमच्या एका प्रतिस्पर्ध्याला विकली. आत्तापर्यंत ते गोडावून साफ झालं असेल…. तुझ्या भाईला आणखी एक दणका! अर्थात त्याला पण संपवणार आहे मी… पण त्याला अजुन वेळ आहे. सद्ध्या तुझी पाळी!”

“तू भाईच्या वर्सोव्याच्या गोदामाची माहिती फ़ोडलीस? कुणाला दिलीस ती माहिती तू? तिथे किती माल होता माहितीये तुला?”

“किती का असेना? मला काय त्याचं. मला ताबडतोब पैशाची गरज होती, मी माहिती विकली. तुझ्या त्या भाईला हवालदील करून सोडणं हा ही एक हेतू होताच म्हणा. सॉलीड मजा येतेय यार. माझ्या दोस्ताला मारलेत ना तुम्ही! खुप तडफडला का गं तो मरताना? पण त्याने जीवनाची भिक नसेल मागितली तुमच्याकडे. झुकला नसेल तो. मला… मला खात्री आहे. साला नको तितका तत्त्ववादी आणि काय्..काय म्हणतात ते आदर्शवादी होता नालायक. काय मिळालं? तर हा असा बेवारस मृत्यू?….”

शिर्‍याचा आवाज कापायला लागला होता. डोळ्यातून पाणी यायला लागले होते…..

“पण त्याने चांगल्या कामासाठी, या समाजासाठी आपला जीव दिला. मला अभिमान आहे त्याचा. पण त्याच्या खुन्यांना मी सोडणार नाहीये… एकेकाला खलास करेन. अगदी कुत्र्याच्या मौतीने मराल सगळे. इरफान, तू , तुझा मोमीन भाई आणि शेवटी तुझा तो भारद्वाज. पण त्याला मारायच्या आधी ही किड, हा तुमचा धंदा उध्वस्त करायचा आहे मला.”

“एवढे सोपं नाहीये ते , तू अजुन मोमीनला ओळखलं नाहीयेस? तुला पाताळातूनही शोधून काढेल तो. धारावीतच लहानाचा मोठा झालाय तो. धारावीतला तुझा ठाव ठिकाणा शोधून काढणे त्याला कठीण नाही. थोड्याच तो इथपर्यंतही येवून पोचतो की नाही बघच तू.”

“तुझ्या आशावादी स्वभावाचे मला खरेच कौतूक वाटते कामिनी. तुझी दुर्दम्य आशा पाहून मी देखील तुला मारण्याचा माझा विचार बदलण्याचा विचार करायला लागलोय.”

शिर्‍याने धुर्तपणे जाळे पसरायला सुरूवात केली, मासोळी फसणारच याचे त्याला पुर्ण खात्री होती. साहजिकच कामिनीचे चमकलेले डोळे त्या अंधुक प्रकाशातही त्याच्या नजरेला जाणवल्यावाचुन राहीले नाहीत.

“मला काय करावे लागेल? माझ्याकडून काय हवेय तुला?”

“फार नाही, पण थोडी माहिती? मोमीनच्या नाड्या माझ्या हातात आहेत, राहता राहीला रोहीत भारद्वाज…. मला रोहितचे इन्स अँड आउट्स हवेत, ते तुझ्याइतके चांगले कुणाला माहित असणार आणि अर्थातच …… तुमच्या येवू घातलेल्या नव्या सो कॉलड टॅलेंट हंट इव्हेंटची पुर्ण माहिती. माझ्या माहितीनुसार यावेळचा लॉट खुप मोठा आहे.”

कामिनी आता सावरली होती, तिच्यामधली पाताळयंत्री बाई जागी व्हायला लागली.

“समज…., समज मी तुला हि सगळी माहिती दिली तर त्या बदल्यात मला काय मिळेल?”

“कामिनी, तूला तुझे प्राण परत मिळतील ते पुरेसे नाहीत का?”

“तू माझे म्हणणे नीट समजून घ्यायला तयार नाहीयेस शिरीष. थोडा विचार कर… तूला तुझ्या मित्राच्या खुनाचा सुड घ्यायचाय. मला पैसा कमवायचाय. लेट अस बी प्रॅक्टिकल! सुडाच्या आनंदाबरोबर तूला जर भरपूर पैसा मिळाला तर तो नकोय का? ”

शिर्‍या थोडा विचारात पडला. ती संधी साधून कामिनीने आपले घोडे पुढे रेटण्याचा प्रयत्न चालूच ठेवला.

“म्हणजे बघ शिरीष, इतक्या कमी वेळात तू या भानगडीच्या आत पर्यंत घुसलास, एवढेच नाही तर आमच्या एका माणसाला खलास केलंस, मोमीनभाईसारख्या नामचिन गुंडाला आसमान दाखवून त्याची अतिशय महत्त्वाची डायरी हस्तगत केलीस. यु आर नेक्स्ट टू सुपरमॅन फॉर मी! विचार कर तुझी बुद्धी, ताकद आणि माझं सौंदर्य, माझे काँटॅक्ट्स जर एकत्र आले तर अल्पावधीत आपण कोट्याधीष होवू. शिरीष, लक्षात घे मोमीन, रोहीत यांसारखी क्षुद्र चिलटं आपण सहजा सहजी चिरडून टाकू. या मुंबईचे राजे बनू आपण. पैसाच पैसा…गाड्या, बंगले, फार्म हाऊसेस….! विचार कर शिरीष… दुनिया हमारी मुठ्ठीमें होगी.”

शिर्‍याच्या चेहर्‍यावर भराभर होणारे बदल कामिनीला सुखावत होते. त्या नादात हातातली पेटवलेली काडे पेटीची काडे शिर्‍याच्या चेहर्‍यासमोर असल्याने कामिनीच्या चेहर्‍यावर अंधार पडलेला होता, नाहीतर कामिनीच्या चेहर्‍यावरचे खुनशी भाव बघून शिर्‍याने तिथेच तिला खलास केले असते.

शिर्‍याने पुढे होवून तिचे बांधलेले हात-पाय सोडले.

“ठिक आहे कामिनी. तुझी बंधनं सोडतोय मी, पण कुठलीही चुकीची हालचाल करू नकोस, इर्फानप्रमाणे तूझीही मान मोडायला मला एक सेकंदही लागणार नाहीये. आणि आता बोलायला सुरूवात कर….., तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे काम करतोय दगा देण्याचा प्रयत्न केलास, तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही.”

“वेडा आहेस का शिरीष? नाऊ वुई आर पार्टनर्स बडडी! चल आपण आधी माझ्या फ्लॅटवर जावू. वुई विल हॅव सम ड्रिंक्स आणि मग मी तुला सगळं काही सांगेन. चीअर्स!”

कामिनी पटकन उठायला गेली, तसे शिर्‍याने तिच्या खांद्यावर हात दाबून तिला पुन्हा खाली बसवले.

“माझ्या डोक्यावर काय तुला गाढवाचे कान दिसताहेत का कामिनी? आधी तू बोलशील, मग मी माझ्या पद्धतीने खात्री करून घेइन. त्यानंतर तू प्रामाणिक आहेस याची खात्री पटल्यावर मी तुझी इथून मुक्तता करेन. ओके?”

“ओ, कम ऑन शिरीष, अजुन तुझा माझ्यावर विश्वास नाही? असा कसा रे तू?” कामिनीने अंगाला लाडिक हेलकावे देत विचारले.

“ए फुकणे, हि असली हत्यारं आपल्यावर नाय वापरायची, समजलं? मी भोसले आहे पठाण किंवा भारद्वाज नाही… चल जगायचं असेल तर बोलायला सुरूवात कर. आणि मला जेनुइन माहिती हवीय, थोडा जरी संशय आला तरी आपली पार्टनरशिप खल्लास. चल फुट आता तोंडातून, नाहीतर डोक्यातून फोडीन.”

तशी कामिनी दचकून मागे सरकली.

“शिर्‍या मी सगळे सांगते, पण मी सांगितल्यावर तू मला सोडून देशील याचा भरवसा काय?”

“हे बघ, मी मुंबईत पैसे कमवायला म्हणूनच आलोय. मुंबईत उतरल्या उतरल्या एका पापभिरू माणसाला चुन्ना लावूनच मुंबईत येणे साजरे केलेय मी. जोपर्यंत तू खरे बोलते आहेस, तो पर्यंत तुला माझ्याकडून धोका नाही. आणि तुझ्या सुदैवाने तू स्वतःच्या हाताने सत्याचा खुन केलेला नाहीस, त्यामुळे तूला माफी मिळू शकते. पण हो… आता किंवा यानंतर कधीही मला धोका द्यायचा प्रयत्न केलास तर माझ्याशी गाठ……”

एकदम कंटेनर मध्ये कसला तरी विचित्र आवाज यायला लागला. कंटेनरमध्ये असलेल्या एकमेव प्रचंड लोखंडी पेटीतून तो आवाज येत होता.

“काय आहे त्यात?” कामिनीने घाबरून विचारले…

“गॉड नोज! पण जोपर्यंत त्या पेटीला कुलूप आहे तोपर्यंत आपल्याला त्याचा विचार करायची गरज नाही. नाही का?” त्या लोखंडी पेटीला लटकलेल्या कुलपाकडे निर्देश करत शिर्‍याने विचारले, तशी कामिनी जरा शांत झाली.

“ठिक आहे शिरीष, तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला सर्व काही सांगते. पण त्यानंतर मोमीन आणि रोहीतपासून मला वाचवायची जबाबदारी तुझी. अ‍ॅग्रीड?”

“डन !” शिर्‍याने हसुन दुजोरा दिला आणि कामिनी बोलायला लागली.

प्रत्येक शब्दाबरोबर शिर्‍याच्या कपाळावरच्या रेघा अजुनच ठळक होत्या. संताप संताप होत होता. ही माणसं किती नीच आहेत याचा उलगडा झाल्यावर शिर्‍याला आपल्या मस्तकावर कोणीतरी मणामणाचे घण घालतय असे वाटायला लागले. जवळ जवळ अर्ध्यातासाने कामिनी बोलायची थांबली.

“हे किती भयानक आहे? कसली नीच माणसं आहेत ही? माझ्या सत्याचे काय हाल केले असतील या लोकांनी? आणि तरिही सत्याने तोंड उघडले नाही.” शिर्‍याच्या मनात पहिला विचार आला तो हा.

पण प्रत्यक्षात मात्र तो कामिनीला म्हणाला…

“म्हणजे हा वेल सेटल्ड बिझनेस आहे तर आपल्यासाठी. फक्त रोहीत आणि मोमीन ला संपवले की झाले?”

“अहं शिर्‍या, तू त्या तिसर्‍या व्यक्तीला विसरतो आहेस, ज्याची माहिती फक्त आणि फक्त रोहीतलाच आहे. तोच तर खरा सुत्रधार आहे. गेले कित्येक दिवस मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतेय. पण रोहीत काही लिंकच लागू देत नाही.”

“दॅट इज नॉट अ बिग इश्यु! ते तू माझ्यावर सोड! रोहीतकडून ते काढून घ्यायचे काम माझ्याकडे लागले, चौदावे रत्न दाखवले की भुते ही बोलतात, ये रोहीत किस झाड की पत्ती है! फक्त समस्या एकच आहे की हा तिसरा माणुस कोण आहे ते रोहीतला तरी माहीत आहे का?”

“पण रोहीत किंवा मोमीन ही फार शक्तीशाली माणसे आहेत शिरीष.”

“ह्म्म्म बघू !” शिर्‍या उठला, तशी त्याच्याबरोबर कामिनीही उठायला गेली,

“चल मला एखाद्या टॅक्सी स्टँडवर सोड. मी जाईन तिथून बांद्र्याला.”

“नो..नो..नो..नो..नो..नो..नो..नो.. नो जानेमन! इतक्यात नाही. मी बाहेर जाईन, तुझ्या सांगण्याची खात्री करून घेइन. आणि मग तूला सोडायचं का नाही त्याचा विचार करेन. ”

शिर्‍याने अंधारात कुठेतरी हात घालून एक कॅमेरा बाहेर काढला.

“नाईट विजन कॅमकॉर्डर आहे, तुझं सगळं बोलणं रेकॉर्ड झालय, तुझ्यासकट.. फक्त तू! हा कॅमकॉर्डर मी अशा पद्धतीने सेट केला होता की त्यात फक्त तू आणि तूच दिसावीस. मला माझा चेहरा असा कुठेही आलेला, कुणीही पाहीलेला नाही आवडत. आता रोहीत आणि मोमीनला बोलतं करताना याचा मला वापर करता येइल. कारण हे तुझं कन्फेशनच आहे एकप्रकारे.”

“तू मला फसवलंस शिरीष.” कामिनी उसळली.

तसे शिर्‍याने तिला पकडून परत बांधून टाकले. तोंडात बोळा कोंबला……

“अहं मी तूला अजिबात फसवलेलं नाही. खरं सांगु दिलेला शब्द पाळायला वगैरे मी काही प्रभू रामचंद्र किंवा राजा हरिश्चंद्र नाहीये. अगं अख्खं कोल्हापूर मला बिलंदर शिर्‍या म्हणून ओळखतं. शिर्‍या नावाचा प्राणी विश्वास ठेवायच्या अजिबात लायकीचा नाही असं लोकांचं ठाम मत आहे. शिर्‍या फक्त एकाच माणसाच्या बाबतीत प्रामाणिक होता.. तो म्हणजे सत्या, सतीष देशमुख ! आणि त्याला तुम्ही लोकांनी मिळून मारलय…..

खरे तर तुझ्यावर विश्वास टाकावा इतकी लायकीच नाहीये तूझी. अगं चांडाळणी, ज्याने तुझ्यावर विश्वास टाकला त्या सत्याशी किती प्रामाणिक राहीलीस तू? अगदी रोहीत किंवा तुझा सख्खा भाऊ मोमीनलाही धोखा द्यायला निघालीस तू? तुझ्यासारख्या नागिणीवर मी कसा भरवसा ठेवायचा? कोण जाणे, उद्या तू इथून बाहेर पडलीस की मला संपवायचीदेखील तयारी करशील. मलासुद्धा धोखा देणार नाहीस कशावरून?”

समोर मृत्यू दिसल्यावर मात्र कामिनीचा धीर सुटला ती रडायला लागली. तसा शिर्‍याने तिच्या तोंडातला बोळा काढला….

“रडुन घे बाई हवे तेवढे! यानंतर तूला किती दिवस असे एकटेच रडावे लागणार आहे कोण जाणे?”

“म्हणजे तू मला मारणार नाहीयेस तर?” कामिनीने हळूच विचारले. तिच्या मनात सुटकेच्या आशा जागृत व्हायला लागल्या होत्या.

“अर्थात मी मघाशीच म्हणलं ना तूला, मी तुला मारण्याचा विचार बदललाय म्हणून.”

“मग तुझी खात्री पटली की तू परत येशील ना मला सोडवायला?”

“नक्की येइन, म्हणजे काय येणारच. पण खात्री पटल्यावर लगेच नाही, तर मोमीन, रोहीत आणि तो जो कोणी तिसरा आणि मुख्य सुत्रधार आहे त्याला तुमच्या या सिंडिकेटसहीत संपवल्यावर्. अर्थात तोपर्यंत तू जर राहीलीस जिवंत तर मी तूला नकी सोडून देइन.”

“म्हणजे … मी… नाही समजले?” कामिनीचा आवाज कापत होता.

शिर्‍याने परत कापडाचा बोळा तिच्या तोंडात कोंबला आणि तो त्या लोखंडी पेटीकडे वळला….

“तुला मघाशी उत्सुकता वाटत होती ना, या पेटीत काय आहे म्हणून?”

शिर्‍या एकदम उत्साहाने बोलायला लागला.

“तुला आठवतं काही महिन्यांपुर्वी बी.एम.सी. ने म्हणे एक मोहीम राबवली होती. “उंदीर पकडा पैसे मिळवा.” मी ही तेच केलं. ज्या दिवशी मला समजले की सत्याचा खुन झालाय, त्याच दिवशी मी ठरवले होते की सुड घ्यायचा. माझ्या खुराफती, उपद्व्यापी डोक्यात अनेक योजना साकार व्हायला लागल्या. मग मी ना, छोटे छोटे पँप्लेट्स तयार करून घेतले… “जिवंत उंदीर घेवून या आणि प्रत्येक उंदीरामागे वीस रुपये घेवून जा!” आणि हे पँप्लेटस रोज पेपर वाटणार्‍या पोरांच्या मार्फत प्रत्येक घरी जातील याची व्यवस्था केली. लोकल्समध्ये, सार्वजनिक शौचालयांमध्ये ही पँप्लेटस चिकटवली गेली.

बरं यात पुन्हा शिरीष भोसले कुठेही नाहीत? तर ‘सुब्रमण्यम रामस्वामी नायर’ नावाच्या एका कळकट मद्राशाने माझ्यासाठी हे काम केलं. अर्थात पोलीस जर त्याच्यापर्यंत पोहोचलेच तर तो जे काही वर्णन सांगेल त्या वरून पोलीस एका पोक आलेल्या, तोंडातले दात पडलेल्या, कंबरेतून पार वाकलेल्या, टक्कल पडलेल्या ६०-६५ वर्षाच्या एका सणकी वृद्धाचा शोध घ्यायला सुरूवात करतील. जो त्यांना कधीच सापडणार नाही. कारण तो नाहीच्चय मुळी. आता तू म्हणशील त्यासाठी लागणार असलेले पैसे मी कुठून आणले?…..

….. तर तो माझा प्रश्न आहे. मी चोरी केली असेल, डाका टाकला असेल तुला काय त्याचं?

आता तू विचारशील मी हे उंदीर का जमा केले?… मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. तुला माहितीये? उंदरांना एक मुलभुत सवय असते, किंवा स्वभाव वैशिष्ठ्य म्हण ना त्यांचे. त्यांना, रादर त्यांच्या दातांना सतत काहीतरी चघळायला लागते, चावायला लागते. कुरतडायला लागते. अर्थात दात सतत चालू राहीले पाहीजेत. काही चावायला नाही मिळालं की ते संतापतात, चिडतात मग दिसेल त्या वस्तुवर तुटून पडतात.

आता तूला वाटेल हे सगळे मी तुला का सांगतोय?

तर त्याचं कारण असं आहे की ते सगळे उंदीर या लोखंडी पेटीत आहेत. मघाचा तो विचित्र आवाज.., तो या संतप्त उंदरांचाच होता. किमान ७०० तरी गोळा झाले होते. त्यातले निम्मे जरी अजुन जिवंत राहीले असतील तरी पुरे. म्हणजे काही उपासाने… अरे हो तूला सांगायचेच विसरलो गेले तीन चार दिवस या उंदरांना काहीही खायला मिळालेले नाहीये. मग त्यातल्या त्यात जे सशक्त असतील त्यांनी आपल्याच सहकार्‍यांवर हल्ला चढवण्याची, किंवा उपासमारीने गलितगात्र झालेल्या दुर्बऴ उंदरांवर हल्ला चढवून त्यांना आपले भक्ष्य बनवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

आता मी काय करणार माहिती, मी जाताना फक्त त्या पेटीचे कुलूप उघडणार आणि त्याचे झाकण आतून जरासा धक्का दिला तरी उघडले जाईल इतपत किलकिले करून ठेवणार. मग मी इथून बाहेर पडेन. कंटेनरला बाहेरून कुलूप लावून घेइन. मग थोड्याच वेळात सारे उंदीर, अर्थात जिवंत असलेले या पेटीतून बाहेर पडतील. मग बाहेर पडले की आधी कंटेनरच्या बाहेर पडण्याचा, सुटकेचा मार्ग शोधतील. पण हा अभेद्य लोखंडी कंटेनर त्या बिचार्‍यांना आपल्या दातांनी काही कुरतडता येणार नाही. मग ते अजुनच चिडतील, मग एकमेकावर हल्ले करतील. मग त्यांना रक्ताची चटक लागेल.. मग कदाचीत त्यांना अजुन भुक लागेल. तू तर पाहतेच आहेस या कंटेनरमध्ये कागद, कापड कशाचाही एक तुकडादेखील नाही. तुझ्या अंगावरील वस्त्रे, तो दोरखंड आणि तोंडातला बोळा सोडला तर.

मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की तुझ्या अंगावरचे सगळे कपडे, तो दोरखंड आणि तोंडातला बोळा कुरतडून होइपर्यंत त्या भुकेलेल्या, संतप्त उंदरांनी तुझ्याकडे आपला मोहरा वळवू नये म्हणून. बघ मी माझा शब्द पाळला की नाही? मी तुला अजिबात मारणार नाही. आय्..आय प्रॉमीस यू..! या सगळ्यातून वाचलीस तर मी तूला नक्की सोडून देइन. ओक्के! आता येवू मी.”

कामिनी तडफडायला लागली, हात पाय झाडायला लागली. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. तशी शिर्‍याने पटदिशी मान वळवली.

“कुठेतरी या चांडाळणीची अवस्था बघून दया यायची मला!”

तो भर्रकन कंटेनरच्या बाहेर पडला आणि त्याने कुलूप लावून घेतले. कुलूप लावताना त्याने तो संमिश्र असा चिं चिं चा आवाज ऐकला आणि तो समाधानाने हसला.

आकाशाकडे बघत त्याने हात जोडले…

“माफ कर सत्या, तूला दिलेलं वचन मोडलं मी आज. एका स्त्रीवर हात उचललाय मी आज. केवळ हातच नाही तर तिचे प्राण घेण्याची व्यवस्था करून बाहेर पडलोय मी. तुझ्या मरणाला कारणीभूत असलेल्या दुसर्‍या व्यक्तीला तुझ्याकडे पाठवतोय मी. पण यापुढे, आता मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये. तुला दिलेल्या शपथा, वचने पाळत बसलो तर तू सुरू केलेले हे काम कधीच पुर्ण करता येणार नाही रे.”

यावेळी मात्र शिर्‍याचे डोळे अतिशय थंड होते.

********************************************************************************************************

दारावर टक टक झाली, तशी शिर्‍याने उठून दार उघडले.

“अवधूत कामत” आहेत का?

समोर एक तिशी-पस्तिशीतला माणुस उभा होता.

“नाही अवधूत अजुन आला नाही कामावरुन. काही काम होते का? मला सांगा, मी देइन त्याला निरोप.”

“मी..मी अविनाश वाळूंजकर. अवधुतबरोबर त्याच्या कुरियर कंपनीत कामाला होतो कुरियर बॉय म्हणुन. नुकताच सोडलाय जॉब मी. पण तुम्ही कोण? इथे कधी बघितलं नाही तुम्हाला?” त्या माणसाने विचारले…

त्याची शेवटची वाक्ये ऐकली तसा शिर्‍या सावध झाला.

“नाही मी इथे नसतो. सायनला राहतो, मित्र आहे अवधुतचा. अधुन मधुन राहायला येतो इथे अवधुतकडे.”

शिर्‍या समोरच्या माणसाच्या नजरेला नजर भिडवून बोलत होता, तशी त्या माणसाने नजर हटवली.

समोरचा माणुस सपशेल खोटे बोलत होता. त्याचे बोलणे, चालणे कुठल्याही अँगलने कुरियर बॉयचे वाटत नव्हते. त्याची उभे राहण्याची पद्धत, आवाजातली जरब स्पष्टपणे सांगत होती की हा माणूस डिपार्टमेंटचा आहे…

पण याचे औध्याकडे काय काम असावे…

कदाचित हा माणुस? हा तोच तर नसेल… सत्याचा पडद्यामागचा मित्र?

शिर्‍याने अपेक्षेने त्याच्याकडे बघत मनाशी काहीतरी निर्णय घेतला………..

क्रमशः

विशाल कुलकर्णी

 

One response to “बिलंदर : भाग ३

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: