दिनांक १ मे २०१० रोजी महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. एक वेगळीच भावना मनात जन्माला आलीय. गेली कित्येक वर्षे जगण्याच्या , विकासाच्या धडपडीत स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र. दगडांचा, मातीचा, वीरांचा, कलावंतांचा, बुद्धीवंताचा, शास्त्रज्ञांचा….समाजसुधारकांचा आणि ….. राजकारण्यांचा …… महाराष्ट्र माझा !
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्राने खुप प्रगती केलेली आहे. मुंबई आजही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जगातील बहुतांशी नामवंत कंपन्या महाराष्ट्रात आपली ऑफीसे थाटून आहेत. शेती, संस्कृती, खाद्यपदार्थ, निसर्ग, इतिहास सगळेच विलक्षण आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मनाला खुप आनंद होतो आणि गर्व वाटायला लागतो मराठी मातीत जन्माला आल्याचा, महाराष्ट्रीय असल्याचा. पण खरेच महाराष्ट्र विकसीत झालाय का? विकासाच्या नक्की व्याख्या तरी काय असतात? गेल्या ५० वर्षात हळू हळू आपले राज्य कुठल्या दिशेने जात आहे हेही लक्षात घ्यायला हवेच. ५० वर्षे उलटून गेली तरी अजुनही मुलभूत प्रश्न तसेच आहेत. विज भारनियमन आहेच, सगळीकडे असणारा भ्रष्टाचाराचा राक्षस इथेही आहेच. सत्तेसाठी चालणार्या अमानुष राजकारणापायी सामान्यजनांची होणारी फरफट आजही आहेच. कृषीराजाची काय अवस्था झालेली आहे हे सांगायलाच नको, रोज वर्तमानपत्रात कुठल्या ना कुठल्या शेतकर्याच्या आत्महत्येची बातमी असतेच. पण आमचे राजकारणी मात्र आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे यावरच समाधान मानताना दिसतात. मुळ समस्येवर घाव घालायचा प्रयत्नच केला जात नाही. याचसाठी केला होता का अट्टाहास? याचसाठी का छेडले होते “संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे रणश्रूंग? याचसाठी दिले होते १०६ हुतात्म्यांनी आपले बलिदान? छत्रपती शिवाजीराजांनी ध्यास घेतलेले, अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताने शिंपलेले हिंदवी स्वराज्य हेच होते का?
खरेतर हे आपले दुर्दैव आहे की विदेशी सैन्याविरुद्ध लढून आपण भारतमातेला स्वतंत्र केले, स्वातंत्र्ययुद्धात मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता, तरीही महाराष्ट्र मिळवण्यासाठी मराठी माणसाला बलिदान द्यावे लागले. कधी मोरारजी देसाई कधी कॉंग्रेसच्या विरोधात तर कधी आपणच संसदेत पाठवलेल्या कृतीशुन्य प्रतिनिधींबरोबर. ज्याप्रमाणे जनरल डायर ने जालियनवाला हत्याकांड घडवून आणले त्याच प्रमाणे मोरारजी देसाईने निशस्त्र आणि सामान्य मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या यात १०६ हुतात्मे झाले. काय होती नेमकी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ…?
संयुक्त महाराष्ट्र चळवळ :
दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी १०६ हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर काँग्रेसने मराठी आणि गुजराती बांधवांचे मिळुन द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. परंतु मराठी माणसांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आणि एक स्वप्न खंडित स्वरूपात (कारवार, बेळगाव वगळून पण मुंबईसह) साकार केले.
पार्श्र्वभूमी :
संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपणास १९२० पर्यंत मागे नेता येतो. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य यांची सांधेजोड करून राष्ट्रीय शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज प्रतिपादन केली. याच काळातील लोकशाही स्वराज्य पक्षाच्या (काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी) उद्देशपत्रिकेत व पक्षाच्या कार्यक्रमात भाषावार प्रांतरचनेचा आगह धरला व महाराष्ट्र हा स्वतंत्र एकभाषी प्रांत व्हावा अशी घोषणा केली. १९१७ च्या कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. पट्टभी सीतारामय्या यांनी आंध्र प्रांत स्वतंत्र करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला अॅनी बेझंट, पं. मदनमोहन मालवीय, म. गांधी यांनी विरोध केला, तर लो. टिळक यांनी पाठिंबा दिला. म. गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्यावर १९२१ च्या नागपूर अधिवेशनात म. गांधी यांनीच ‘भाषावार प्रांतरचनेचा’ ठराव मांडला. कॉंग्रेसची फेर उभारणी भाषा तत्त्वावर केली यामुळे कॉंग्रेस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली. १९२८ मध्ये कामकरी शेतकरी पक्षाने पं. मोतीलाल नेहरू कमिटीसमोर भाषावार राज्याची मागणी करून महाराष्ट्राची मागणी पुढे केली. नेहरू कमिशननेसुद्धा भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केली.
१५ ऑक्टोबर, १९३८ रोजी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ‘वर्हाडसह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत’ असा शब्द मुद्दाम वापरण्यात आला. कारण ‘सी. पी. अँड बेरार’ प्रांतातून वर्हाड वगळून त्याचा स्वतंत्र विदर्भ प्रांत करण्यात यावा अशी शिफारस मुख्यमंत्री रवीशंकर शुक्ल यांनी केली होती. १९३९ च्या नगरच्या साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा’ प्रदेशांचा मिळून जो प्रांत बनेल, त्याला ‘संयुक्त महाराष्ट्र’ असे नाव द्यावे असा ठराव झाला. ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा शब्दप्रयोग येथपासून वापरात आला. ‘सी.पी.अँड बेरार’ प्रांताच्या विधीमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी ‘वर्हाड’ च्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत ‘संयुक्त महाराष्ट्र सभा’ स्थापली. १९४१ मध्ये पुण्यात डॉ. केदार यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ स्थापण्यात आली.
दिनांक १३ मे, १९४६ रोजी बेळगांव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या ललित विभागाचे अध्यक्ष माडखोलकर यांनी भाषणात ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ मागणीचे सूतोवाच केले. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, मध्यप्रांत, वर्हाड, मराठवाडा, गोमंतक यांचा त्यांनी समावेश केला होता. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी २८ जुलै, १९४६ रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरविण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव परिषदेने मुंबईसह महाराष्ट्राचा नारा दिला. भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भाषावार प्रांतरचना कितपत उपयुक्त आहे हे बघण्यासाठी न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आयोगाचे कामकाज चालू असतानाच ३० ऑगस्ट, १९४७ रोजी म. गांधी यांनी ‘हरिजन’ मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात लेख लिहिला. ‘भाषावार प्रांतरचनेला धरून मुंबईने योग्य ती सर्वमान्य योजना तयार करावी’, असे गांधीजींनी सुचविले. दार कमिशनसमोर १७ प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी करून ‘अकोला करार’ केला. १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे मुंबईत अधिवेशन भरले. तेथे अण्णा भाऊ साठे यांनी ‘मुंबई कुणाची’ हा कार्यक‘म सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला जे निवेदन दिले त्यात त्यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ यावर भर दिला. दिनांक १० डिसेंबर, १९४८ ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. दार यांनी मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क नसल्याचे सांगितले. दार कमिशनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभी सीतारामय्या यांची ‘जेव्हीपी’ समिती निर्माण केली गेली. या समितीनेसुद्धा पुढे मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला. या समितीचा अहवाल येताच रामराव देशमुख यांनी स्वतंत्र वर्हाडचा आग्रह सोडून मध्यप्रांत – वर्हाडप्रांत मुंबई राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. सरदार पटेल व नेहरूंना महाराष्ट्रात कोण विरोध करणार? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी सेनापती बापट पुढे झाले. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव मांडला.
महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय करण्यासाठी पं. नेहरू यांनी फाजलअली आयोग नेमला. आयोगापुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन ठेवले. आयोगाने द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य व संपूर्ण गुजराथी प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, ‘पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही’, अशी वल्गना केली. विधानसभेत ‘त्रिराज्य’ स्थापनेचे बील (विधेयक) चर्चेला येणार होते. महाराष्ट्रातील जनतेने याच्या विरोधात मोर्चा काढला. सरकारने विधानसभेकडे जाणारे रस्ते अडवले. जमाव हाताळता न आल्याने पोलिसांनी गोळीबार केला यात १५ जण मरण पावले. सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण जे १०६ हुतात्मे झाले त्यातील हे पहिले पंधरा होत. त्रिराज्य ठरावाच्या विरोधात ‘लोकमान्य’ पत्राचे संपादक पां. वा. गाडगीळ यांनी विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकमताच्या दडपणामुळे त्रिराज्य ठराव बारगळला.
दिनांक १६ जानेवारी, १९५६ रोजी पं. नेहरू यांनी मुंबई शहर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राहील अशी घोषणा केली व त्रिराज्याऐवजी ‘द्वैभाषिकाची’ घोषणा केली. ‘विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजराथ’, अशी घोषणा केली. जनतेच्या प्रतिकि‘या या निर्णयाच्या विरोधात जाताहेत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत एकूण ६७ लोक हुतात्मा झाले. याच वेळेला जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. हैदराबाद विधानसभा कॉंग्रेस पक्षानेसुद्धा याच मागणीची ‘री’ ओढली. संसदेत फिरोज गांधी यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे सांगितले. विख्यात अर्थतज्ज्ञ व मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईच्या प्रश्र्नावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनाम दिला. जून, १९५६ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ ची स्थापना झाली.
ऑगस्ट, १९५६ मध्ये लोकसभेत ‘महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गुजराथ, सौराष्ट, कच्छ, मुंबई यांचे मिळून एक संमिश्र राज्य करावे अशी सूचना आली. सरकारने ती तात्काळ स्वीकारली. ऑक्टोबर, १९५६ मध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने यशवंतराव चव्हाण मु‘यमंत्री झाले. या नव्या राज्याची मुंबई राजधानी झाली. कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र विधानसभा पक्ष अस्तित्वात आला. मुंबई महापालिकेत या पक्षाला बहुमत मिळाले व आचार्य दोंदे महापौर झाले. १९५९ मध्ये इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, द्वैभाषिक राज्य ही न टिकणारी गोष्ट आहे. त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ९ सदस्यीय समिती नेमली. या समितीने द्वैभाषिक राज्य संपुष्टात आणून गुजरात या स्वतंत्र राज्याची शिफारस केली. इंदिरा गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका मान्य केली. संसदेने दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. २६ जिल्हे, २२९ तालुके समाविष्ट असणारे राज्य अस्तित्वात आले
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गिळून टाकली असती. आज मुंबई तथाकथित कॉस्मोपॉलिटिन आहे, ती कुण्या एका भाषिकांची नाही, असे एकत्रितपणे कंठशोष करुन सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी १०६ मराठी हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी वाचायलाच हवा, मुंबईसाठी मराठी माणसाने काय मोजले आहे, ते मुंबईला कॉस्मोपॉलिटिन म्हणणारे काय जाणोत? त्यांना ते आपणच सांगायला हवे, पण त्यासाठी आधी ते आपल्याला तरी माहीत असायला हवे की नको?
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ठिकठिकाणी भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. त्यासाठी आंदोलने होऊ लागली. तेलगू राज्य व्हावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून नंतर प्राणत्याग करणारे श्रीरामलू पोट्टी हे अखेरीस राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना समितीने आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. त्यावेळी या समितीने मराठी व गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य न करता या दोहोंचे मिळून एक राज्य करावे व त्याची राजधानी मुंबई असावी अशी शिफारस केली. या शिफारशीवरच ही समिती थांबली नाही, तर निजामाच्या ताब्यात असलेला मराठी भाषिकांचा मराठवाडा व तत्कालीन मध्य भारतात असलेला विदर्भ यांचे मिळून मराठी भाषकांचे विदर्भ राज्य करण्याची शिफारस करून तमाम मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले.
याला विरोध करण्यसाठी सर्व पक्षीय मराठी नेते एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समितीची स्थापन सहा फेब्रुवारी १९५६ रोजी केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून एकेकाळचे ब्राह्मणेतरांचे नेते केशवराव जेधे यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळी सर्व पक्षांचे नेते होते. आचार्य अत्रे यांची मुलखमैदान तोफ तर होतीच, पण सुधारकाग्रणी प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे हे नेतेही त्यात होते. या सर्वांनी महाराष्ट्राला जागे केले. स्वतंत्र भाषक राज्य असण्याची जाणीव निर्माण केली. या समितीचा प्रभाव एवढा पडला की त्यानंतर झालेल्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत समितीला १०१ जागा मिळाल्या. पण गुजरात, मराठवाडा व विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या साथीने यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.
पण यानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ थाबंली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली. त्यावेळी केंद्रात अर्थमंत्री असलेल्या सी. डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. चिंतामणरावांना खरेतर आधुनिक महाराष्ट्राचे रामशास्त्रीच म्हणायला हवे. त्यामुळे या लढ्याला नैतिक बळ प्राप्त झाले. पुढे मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाईं यांनी हे आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या निर्दयीपणामुळेच फ्लोरा फाऊंटनजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०६ जण हुतात्मा झाले. मराठी राज्यासाठी १०६ जणांचे रक्त सांडले. या घटनेनंतर मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य वाढले. मग देसाईंना हटवून मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतराव चव्हाणांकडे देण्यात आली. त्यानंतर मग अखेरीस १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य होत असताना मराठी भाषिकांची मोठी वस्ती असलेले बेळगाव मात्र कर्नाटकातच राहिले. शिवाय डांग, निपाणी असे छोटे छोटे भागही अनुक्रमे गुजरात व कर्नाटकात गेले. त्याची जखम आजही ठसठसती आहेच. त्यात आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचीही भर पडली आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपले बलिदान दिले.
संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे या दिवसाला ‘सोन्याचा दिवस’ असे संबोधले होते. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले होते, की ‘महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस आले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`
1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस! या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मंत्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला यत्किंचितही थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते.
सद्यस्थिती:
ज्या मुंबईवरून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहीली त्या मुंबईची आज स्थिती काय आहे?
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबई एक आहे. मुंबई महानगर म्हणून जो भाग ओळखला जातो, त्याची एकूण लोकसंख्या दीड ते पावणे दोन कोटीच्या आसपास आहे. त्यात नवी मुंबई आणि ठाणे या महागनर पालिकांचाही समावेश होतो. जगातील दहा व्यावसायिक केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश होतो, यावरून मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्त्व लक्षात यावे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी जशी आहे, तशीच ती मनोरंजनाचीही राजधानी आहे. देशातील २५ टक्के व्यापार, बंदराच्या माध्यमातून होणारा ४० टक्के व्यापार आणि ७० टक्के भांडवली व्यवहार भारताच्या गंगाजळीत भर घालत असतात. मुंबईतच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आहे. शिवाय अनेक बड्या कंपन्यांची मुख्यालये याच महानगरात आहेत.
देशातील एकूण कारखानदारी नोकरदारांपैकी दहा टक्के लोक येथे रहातात. देशातील ४० टक्के आयकर आणि साठ टक्के कस्टम ड्यूटी येथून जमा होते. वीस टक्के केंद्रीय अबकारी कर येथूनच केंद्राच्या तिजोरीत भरला जातो. शिवाय देशाचा ४० टक्के परकीय व्यापार येथूनच चालतो. कॉर्पोरेट करापैकी चाळीस अब्ज रूपयांचा कर मुंबई देते.
मुंबईचे प्रती माणशी उत्पन्न ४८ हजार ९५४ आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या ते तिप्पट आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, टाटा ग्रुप, गोदरेज, रिलायन्स यांच्यासारखी भारतातील बडी व्यावासायिक आस्थापनांचे मुंबईत मुख्यालय आहे. फोर्च्युन ग्लोबल ५०० कंपन्यांमधील चार कंपन्या मुंबईत आहेत. अनेक परकीय बॅंका आणि वित्तीय संस्थांनी मुंबईत शाखा उघडल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्थाही येथे आहेत. ज्यात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, ऑईल अँड नॅचरल गॅस लि. (ओएनजीसी), बॉम्बे हाय याचा समावेश होतो. देशातील चौदा टक्के तेलाची गरज बॉम्बे हायमधून भागवली जाते.
मनोरंजनाचे केंद्र येथेच असल्याने त्याला बॉलीवूड असेही म्हटले जाते. बॉलीवूड ही जगातील सर्वांत मोठी मनोरंजनाची इंडस्ट्री आहे. दरवर्षी जगात सर्वाधिक चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार होतात. या आधी बहुतांश मराठी चित्रपट कोल्हापूरातून निर्माण होत पण आज घडीला मराठी चित्रपटांचेही मुंबई हेच प्रमुख केंद्र आहे.
तरीही मुंबईला, पर्यायाने महाराष्ट्राला केंद्राकडून किती विकास निधी मिळतो?
मराठी भाषा :
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराविक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार विचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले.
तसेच कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेत म्हणतात की, ”माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा, तिच्यासंगे जागतील मायदेशातील शिळा”. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवटी चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले. अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोणी करेल काय? वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही किंवा त्यांना ती शिकावी वाटत नाही यात दोष कुणाचा आहे? त्यामुळे नुकसान कुणाचे होत्येय? आम्हाला याने काहीच फरक का पडत नाही?
आर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल.
काही महत्त्वाच्या प्रश्नांवरही सर्वानुमते अगदी सार्वजनिक पातळीवर विचार व्हायला हवाय.. उदा.
१. भारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे? इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा किती घटली आहे? इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली? त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे? इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्यांची संख्या किती आहे? या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा.
२. शिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली? मराठी माध्यमांच्या शाळा किती वाढल्या, किती घटल्या? त्याची कारणे काय आहेत? बर्याचशा महाविद्यालयांतून आज सरकारने सक्तीचे करूनही आजही मराठी ही वैकल्पिक भाषा आहे… याचा विचार व्हायला नको का?
३. महाराष्ट्रात हजारो मराठी स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित केलेली कुठे आढळत नाही. मराठी पुस्तकांचे प्रकाशक आहेत. त्या पुस्तकांसाठी ग्रंथालये आहेत, त्यांच्या वाचकांची शक्यताही वाढत असवी. वेळोवेळी यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. नियतकालिके सुरू होतात व बंदही पडतात. मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चित्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे.
४. महाराष्ट्रात शासकीय व गैरशासकीय स्तरांवर मराठीचा वापर किती होत आहे याचे काही मोजमाप योजून, त्याचे एकूण मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत हे बघायला हवे.
शेवटी आपल्या या महाराष्ट्राला, लाडक्या महाराष्ट्राला वंदन करून पन्नासाव्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करुया. गोविंदाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे …
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।
अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।
भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी।।
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।1।।
जय महाराष्ट्र !
समाप्त.
संकलन.
प्रस्तुत लेख पुरेसा वेळ हाती नसल्याने पुर्णपणे मी लिहीलेला नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माहितीसाठी काही वर्तमानपत्रे, काही संस्थळावर उपलब्ध माहिती आणि काही लेख यांचा संदर्भ घेवून लिहीला आहे. तरी याचे श्रेय त्या सर्वांचे आहे.
संदर्भ : दै.महाराष्ट्र टाईम्स, दै. लोकसत्ता तसेच मराठी वेब दुनीया या संस्थळावरील श्री. आशिष कुलकर्णी यांचे व इतरांचे काही लेख.